‘पालकांनी उत्तम श्रोता व्हावं’ (प्रशांत दामले)

prashant damle
prashant damle

खेळीमेळीचं वातावरण आणि मोकळा संवाद घरात खूप महत्त्वाचा असतो. आपला मुलगा किंवा मुलगी लवकरात लवकर आपला मित्र किंवा मैत्रीण व्हावं यासाठी पालकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावा. तरच पुढं त्यांचं नातं आयुष्यभर छान राहातं आणि त्यांचे सूर उत्तम जुळतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट जपली पाहिजे ती म्हणजे, घरातल्या सर्वांची ‘लिसनिंग पॉवर’ उत्तम असली पाहिजे. मुलांपासून अगदी आजी-आजोबांपर्यत प्रत्येकाचं म्हणणं शांतपणे ऐकून घेण्याची क्षमता सगळ्यांकडे असावी. कुटुंबाची नाळ घट्ट जोडून ठेवण्यासाठी परस्परांत जास्तीत जास्त उत्तम संभाषण झालं पाहिजे. हे संभाषण नेहमी होकारार्थी असलं पाहिजे. तुम्ही मुलांचं म्हणणं जितकं शांतपणे ऐकता, तितकं मुलं तुमचं ऐकतात हा अलिखित नियम आहे. ऐकणं म्हणजे श्रोता होणं, पालकांनी उत्तम श्रोता होणं गरजेचं असतं. म्हणजे मुलंही पालकांचं ऐकतात.

वेळेनुसार प्रत्येक गोष्ट व्हायला पाहिजे, असा माझ्या पालकांचा आग्रह असायचा. तसंच ‘जी गोष्ट आपण करत आहोत, त्यात मन लावून काम केलं पाहिजे, तुमची कमाई शंभर रुपये असेल, तर त्यातले केवळ पन्नास रुपये तुम्ही खर्च केले पाहिजेत आणि उरलेल्या पन्नास रुपयांची बचत केली पाहिजे, या माझ्या पालकांनी शिकवलेल्या गोष्टी माझ्या अजूनही लक्षात आहेत. त्यामुळे वेळेचं महत्त्व, कामाप्रती असणारा प्रामाणिकपणा आणि बचत या महत्त्वाच्या गोष्टी मी माझ्या आई-वडिलांकडून शिकलो. खरं बोलण्यावर त्यांचा कायम कटाक्ष असायचा. त्यांनी सांगितलेलं वाक्य आजूनही माझ्या लक्षात आहे आणि आजही ते लागू होणारं आहे. ते म्हणायचे : ‘खरं बोललेलं लक्षात ठेवावं लागत नाही, खोट बोललेलं मात्र लक्षात ठेवावं लागतं.’ पुढील आयुष्यात त्यांची ही शिकवण मी कायम लक्षात ठेवली. माझे आई-बाबा खूप संतुलित विचारांचे होते. माझ्याकडून काही चूक झाली, तर त्यांची त्याबद्दल शिकवण्याची पद्धतही वेगळी होती. मला आठवतंय मी नववीत होतो. त्या वर्षी मला परीक्षेत खूप कमी मार्क मिळाले होते. पूर्वी प्रगतिपुस्तकात शेरा असायचा- ‘पुढच्या इयत्तेत ढकलले.’ तसाच शेरा माझ्या प्रगतिपुस्तकावर होता. ते बघितल्यावर माझ्यावर रागावण्यापेक्षा आई-बाबांनी शांतपणे ‘तुझी आता जबाबदारी काय आहे, या वयात तू काय करण्याची गरज आहे, तुझ्या आयुष्याकडून अपेक्षा काय आहेत?’ हे मला समजावून सांगितलं. त्याचबरोबर ते पुढं असंही म्हणाले : ‘‘चांगले कपडे मिळावेत, चांगलं खायला-प्यायला मिळावं, दिवाळीला उत्तम फटाके मिळावेत अशी तुझी आमच्याकडून अपेक्षा असते, तशाच आमच्याही तुझ्याकडून काही अपेक्षा आहेत. तू चांगला अभ्यास करावास, चांगले गुण मिळवावेस, स्वतःला चांगल्या सवयी लावाव्यास ही आमची अपेक्षा आहे; पण केवळ अपेक्षा म्हणून नव्हे, तर ती तुझी जबाबदारी आहे हे समजून घे. तुला ती पार पाडायची नसेल, तर तूही आमच्याकडून फार अपेक्षा ठेवू नकोस.’’ इतकी महत्त्वाची गोष्ट माझ्या पालकांनी अगदी शांतपणे, जवळ बसवून, चिडचिड न करता सहज समजावून सांगतली, हे मला फार महत्त्वाचं वाटतं. कारण हीच गोष्ट त्यांनी चिडून, ओरडून सांगितली असती, तर मीदेखील रागावून त्यांच्या सांगण्याकडे लक्ष दिलं नसतं. शांतपणे सांगितल्यामुळे एकमेकांत चर्चा होऊ शकते. त्यातून माझं काय चुकलं, मी कुठं कमी पडलो, पुढं काय सुधारणा केली पाहिजे, अशा प्रश्नांची उत्तरं मिळतात. चिडल्यावर एकतर्फी बोलणं होतं. वादच होतो, संवाद राहत नाही. वडिलांची ही शिकवण मला खूप महत्त्वाची वाटते. पुढच्या आयुष्यातही मी ती कायम लक्षात ठेवली.

माझे आई-बाबा दोघंही नोकरी करायचे. त्यावळेची परिस्थितीच तशी होती, की दोघांना नोकरी करावी लागली. घरासाठी ती गरज होती. दोघं नोकरी करत असल्यामुळे लहान असताना मला नेहमी असं वाटायचं, की त्यांचं माझ्याकडे दुर्लक्ष होतंय. म्हणून लग्न केल्यानंतर मी आणि गौरीनं म्हणजे माझ्या पत्नीनं असं ठरवलं होतं, की मी नाट्य क्षेत्रात जाणार असीन, तर एकानं घरी राहायचं आणि घर, संसार, मुलं, आई-वडील हे सांभाळायचं. त्यामुळे मी पूर्ण वेळ नाटक, अभिनय क्षेत्रात काम करण्याचं ठरवल्यानंतर घराची, मुलींची सर्व जबाबदारी गौरीनं घेतली. म्हणून मुलींच्या संगोपनाचा विषय येतो, तेव्हा नव्वद टक्के गौरीचं योगदान आहे आणि दहा टक्के माझं. अर्थात मुलींच्या प्रत्येक महत्त्वाच्या वेळी मी हजर असायचो. त्यानुसार माझं वेळापत्रक बनवायचो.
माझ्या लहानपणी घरात आम्ही दोघं भाऊ म्हणजे मुलंच होतो, तर मला दोघी मुली. त्यामुळे आम्ही दोघं भाऊ ज्या प्रकारे वाढलो, त्या तुलनेत मुलींना वाढवण्यात मला मोठा फरक नक्कीच जाणवला. त्याचं कारण म्हणजे, मुली जास्त भावनाप्रधान असतात, सॉफ्ट हार्टेड असतात, त्यामुळे त्यांच्याशी बोलताना सूरांचं भान जास्त ठेवावं लागतं. बोलण्याचा सूर इकडेतिकडे गेला, तर मुली मनाला जास्त लावून घेतात. याउलट मुलं स्वभावतःच टगी असतात. त्यामुळे त्यांच्याशी वेगळ्या पद्धतीनं बोलावं लागतं. त्यामुळे चंदना आणि कंकना या दोघी मुलींना वाढवताना मी हा सूर बिघडू दिला नाही.
दोघी मुलींचं लग्न आणि त्याचा निर्णय घेणं आम्हा दोघांसाठी अतिशय अवघड आणि आव्हानात्मक होतं. कारण मुली लग्न करून जातात ही गोष्ट मला खूपच कठीण वाटत होती. चंदना लग्न करून गेली, त्यानंतर धाकटी कंकना आहे, हा थोडा दिलासा होता; पण तिचंही लग्न झालं, तेव्हा तो काळ जास्त चॕलेंजिंग होता, परीक्षेचा होता. माझ्यापेक्षा गौरीसाठी ते खूप अवघड होतं. कारण मुली सतत तिच्याबरोबर असायच्या. मुलींमध्ये आणि तिच्यात छान मैत्री होती. लहानपणापासून ते मुलींचं लग्न होईपर्यंत प्रत्येक प्रसंगात ती हजर होती. लग्न करून मुलगी सासरी जाते, तेव्हा मुलगी आपल्या नव्या आयुष्यातलं पहिलं पाऊल टाकत असते आणि त्याच वेळी पालक म्हणून आपण खूप काही सोडत असतो, हरवत असतो. हा प्रसंग पालकांसाठी, खास करून आईसाठी खरोखरच मोठा कठीण असतो. खूप मोठी पोकळी त्यावेळी जाणवते, त्यातून बाहेर पडायला बराच काळ लागतो.

पालक म्हणून मुलांना वाढवताना काही मूलभूत गोष्टी मुलांना सांगाव्या लागतात. काय करायचं नाही हे एकदा स्पष्ट झालं, समजलं की काय करायचं हे बरोबर शिल्लक राहतं आणि समजतं. माझ्या करिअरमध्ये मी नेहमीच याच तत्त्वाचा वापर केला. अर्थात काय करायचं नाही हे सांगताना पालकांनी फार जबाबदारीचं भान ठेवलं पाहिजे. ही अतिशय ट्रिकी सिच्युएशन असते. कारण मला लहानपणी बाबांनी एखादी गोष्ट करू नकोस असं सांगितलं की, मी हमखास ती गोष्ट करायचो. माझ्या मते प्रत्येक लहान मुलामध्ये हा हुडपणा असतोच. त्यामुळे एखादी गोष्ट तुम्ही मुलांसमोर कशी मांडता हे फार महत्त्वाचं असतं. अशी अवघड परिस्थिती कौशल्यानं हाताळावी लागते. यामध्ये तुम्ही कोणत्या शब्दांचा वापर करत आहात आणि बोलण्याचा सूर कसा लावत आहात, या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. म्हणजे तुम्ही अरेरावीनं सांगत आहात की, प्रेमानं, समजुतीच्या सुरात सांगत आहात हे महत्त्वाचं ठरतं. ‘असं करू नकोस’ हे सांगण्यापेक्षा, ‘तू असं केलंस तर अधिक चांगलं होईल, तुला अधिक चांगलं यश मिळेल’ अशा सकारात्मक शब्दात सांगितलं, तर जास्त परिणामकारक आणि फायद्याचं ठरू शकतं.
मला एक प्रसंग आठवतोय. माझी धाकटी मुलगी कंकना बीकॉमच्या पहिल्या वर्षाला होती. तिनं ग्रॕज्युएशन करताकरता फॉॕरेन लँग्वेज शिकावी आणि सोबत सीए फाऊंडेशनची तयारी करावी असं ठरवंल होतं. एकदा सकाळी ती माझ्याकडे आली आणि म्हणाली : ‘‘बाबा, मी जे करते आहे त्यात मला काही इंटरेस्ट वाटत नाहीये. यात मला गंमत येत नाही आणि मनापासून हे करावसंही वाटत नाहीये.’’ हे ऐकल्यावर मला थोडं आश्चर्य वाटलं; पण मी तिला शांतपणे विचारलं : ‘‘तुला नक्की काय करायचं आहे?’’ त्यावर ती म्हणाली : ‘‘मला ‘हेअर अँड ब्युटी’ या क्षेत्रात काम करायचं आहे. हे ऐकल्यावर मी तिला म्हणालो : ‘‘ठीक आहे, तुला हे नाही करायचंय तर नको करूस; पण तुला जे करायचं आहे त्याची सर्व माहिती तू काढ, ते कसं करायचं हे ठरव आणि मला सांग. दोन दिवसांनी आपण याविषयी परत बोलू.’’ दोन दिवसांनी तिनं मला ‘टोनी अँड गाय’ या इन्स्टिट्यूटचं ब्रोशर आणून दाखवलं. जगातली या क्षेत्रातली ती क्रमांक एकची संस्था आहे. इथलं सर्टिफिकेट तिला जगात कोठेही उपयोगी ठरू शकतं अशा सर्व गोष्टी तिनं मला त्या क्षेत्राविषयी सांगितल्या. तिला तिथं प्रवेश घेऊन देण्यास मी तयार झालो; पण त्यावेळी मी तिला सांगितलं, की ‘आता करिअरचा संपूर्ण मार्ग तुला बदलायचा आहे, आधीचा मार्ग आपण बंद करत आहोत आणि तो पुन्हा उघडता येणार नाही. ‘टोनी अँड गाय’मध्ये गेल्यानंतर सहा महिन्यांनी पुन्हा कंटाळा आला, असं काही चालणार नाही. नाही तर तुला घरीच बसावं लागेल.’’ हे सगळं झाल्यानंतर तिनं अतिशय जबाबदारीनं तो अभ्यासक्रम पूर्ण केला आणि आता ती त्यांच्यासोबतच काम करत आहे आणि कंकनाचं खूप छान चाललं आहे. असे प्रसंग येत असतात; पण त्यावेळी संयम, सामंजस्य आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे सुसंवाद महत्त्वाचा असतो.
मी नाटकांमध्ये, चित्रपटांमध्ये कितीही व्यस्त असलो, तरी माझं कामाचं वेळापत्रक साधारण सहा-सात महिने आधीच मी तयार करतो. म्हणजे मार्चमध्ये माझं सप्टेंबर-ऑक्टोबरचं नियोजन तयार असतं. आमच्या चौघांचे वाढदिवस आणि आमच्या लग्नाचा वाढदिवस, यावेळी सुटी घेतो आणि तो वेळ कुटुंबासोबत घालवतो. आतापर्यंत मी नाटकांचे बारा हजार २३४ प्रयोग केलेत; पण या व्यस्ततेतही मी कधीच हे दिवस चुकवले नाहीत. तसंच जेव्हा आवश्यक असतं, तेव्हा मी कुटुंबासाठी वेळ काढतच असतो.

मुलांना आजच्या काळात भरपूर प्रलोभनं उपलब्ध आहेत. मोबाइल, टीव्ही, सोशल मीडिया असं बरंच काही आहे. या प्रलोभनांपासून दूर ठेवण्यासाठी मुलांना इतर गोष्टींमध्ये गुंतवून ठेवणं हा एक उपाय असू शकतो. आम्ही चंदना आणि कंकनाला अशाच प्रकारे गुंतवून ठेवलं होतं. डान्स, गाणं, परकीय भाषा शिकणं यासारख्या गोष्टींमध्ये त्या व्यस्त असायच्या. वेगवेगळे क्लास, शाळा, पुढे कॉलेज हे सर्व करून त्या बऱ्यापैकी दमायच्या. परिणामी लवकर झोपायच्या. त्यामुळे त्या पुरेशा मोठ्या होईपर्यंत तरी मोबाईल आणि तत्सम इतर गोष्टींपासून दूरच होत्या. मुलांना मोठं करताना बऱ्याच गोष्टींचं व्यवधान पालकांनी ठेवलं पाहिजे. खेळीमेळीचं वातावरण आणि मोकळा संवाद घरात खूप महत्त्वाचा असतो. आपला मुलगा किंवा मुलगी लवकरात लवकर आपला मित्र किंवा मैत्रीण व्हावं यासाठी पालकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावा. तरच पुढं त्यांचं नातं आयुष्यभर छान राहातं आणि त्यांचे सूर उत्तम जुळतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट जपली पाहिजे ती म्हणजे, घरातल्या सर्वांची ‘लिसनिंग पॉवर’ उत्तम असली पाहिजे. मुलांपासून अगदी आजी-आजोबांपर्यत प्रत्येकाचं म्हणणं शांतपणे ऐकून घेण्याची क्षमता सगळ्यांकडे असावी. आता कुटुंबं लहान झाली आहेत, तरी प्रत्येकानं ही गोष्ट केली पाहिजे. आपल्याकडे अजून अमेरिकेसारखं अठराव्या वर्षी मूल घर सोडून वेगळं राहत नाही. त्यामुळे कुटुंबाची नाळ घट्ट जोडून ठेवण्यासाठी परस्परांत जास्तीत जास्त उत्तम संभाषण झालं पाहिजे. हे संभाषण नेहमी होकारार्थी असलं पाहिजे. तुम्ही मुलांचं म्हणणं जितकं शांतपणे ऐकता, तितकं मुलं तुमचं ऐकतात हा अलिखित नियम आहे. ऐकणं म्हणजे श्रोता होणं, पालकांनी उत्तम श्रोता होणं गरजेचं असतं. म्हणजे मुलंही पालकांचं ऐकतात. मुलांचं म्हणणं मांडायची त्यांना संधी दिली पाहिजे. त्यांना खूप प्रश्न विचारण्याचे प्रयोग केले पाहिजेत- म्हणजे ती आपल्याशी अधिक बोलतात. त्यांचे प्रश्न, त्यांचं म्हणणं समजून घेतलं पाहिजे, थोडक्यात मुलांशी संवाद साधण्याचे सर्व मार्ग अवलंबले पाहिजेत.
(शब्दांकन : मोना भावसार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com