हीरकमहोत्सव : ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’चा (प्रताप पवार)

Pratap Pawar
Pratap Pawar

समाजातल्या गुणी, गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत करणाऱ्या ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’नं या वर्षी साठ वर्षांचा कार्यकाळ (१९५९-२०१९) दिमाखात पार केला. अशा या न्यासाच्या आतापर्यंतच्या कार्याचं अवलोकन.

प्रत्येक व्यक्तीचं आयुष्यात एक ध्येय असतं, की आपण कोणी तरी व्हावं किंवा काहीतरी करून दाखवावं, की ज्यामुळे आपली एक ओळख समाजाला व्हावी. किमानपक्षी आपल्या स्वतःच्या मनाला आनंद देणारं, समाधान देणारं असं काम आपल्याला करता यावं. आपल्या कामाचा स्वतःबरोबर समाजातील इतर घटकांनाही काही तरी उपयोग व्हावा, अशी धडपड आपापल्या आयुष्यात प्रत्येक व्यक्ती करत असते. अर्थात हेही तितकंच खरं, की प्रत्येकाच्या सर्व इच्छा पुऱ्या होतातच असं नाही; पण किमानपक्षी त्या पुऱ्या करण्याची इच्छा असेल, तर मार्गही सापडले जातात. अशा या विद्यार्थ्यांना त्यांचा हात धरून योग्य त्या मार्गावर नेण्याचं काम करणारी ‘सकाळ’ परिवारातील एक संस्था म्हणजेच ‘सकाळ इंडिया फाउंडेशन.’

समाजातील गुणी, गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन मिळावं, आवश्‍यक तिथं परदेशात जाऊन उच्चशिक्षण घेता यावं, हा दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून ३० मार्च १९५९ रोजी धर्मादाय शैक्षणिक न्यास म्हणून ‘इंडिया फाउंडेशन’ची नोंदणी झाली. कालांतरानं ‘सकाळ’च्याच या न्यासाची ओळख अधिक प्रखर होण्यासाठी ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ असं नामकरण करण्यात आलं. या वर्षी या न्यासानं हीरकमहोत्सवी वर्षांत पदार्पण केलं आहे. या साठ वर्षांच्या प्रदीर्घ काळात या न्यासानं विद्यार्थी-शिक्षक यांच्यासाठी अनेक उपक्रम राबवले आणि त्याचबरोबर शिष्यवृत्तीच्या स्वरूपात आर्थिक मदतही अगदी सढळ हातानं केली. अजून खूप मोठा पल्ला संस्थेला गाठायचा आहे आणि त्यासाठी समाजातील गुणी, गरजू व होतकरू अशा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा मदतीचा हात कसा देता येईल, हेच उद्दिष्ट या हीरकमहोत्सवी वर्षाच्या निमित्तानं समोर ठेवलेलं आहे. साठ वर्षांपूर्वी लावलेल्या या लहान रोपट्याचं आता मोठ्या वृक्षात रूपांतर झालं आहे. या वृक्षाची फांद्या-पानं, फुलं-फळं हा सारा पसारा आणखीन कसा जोमानं बहरेल, हेच उद्दिष्ट या निमित्तानं समोर ठेवलं आहे. अर्थातच, या वृक्षाला बळ देण्याचं काम या सुंदर वृक्षाचा अनुभव घेणाऱ्या आणि त्याचं सौंदर्य दुरून पाहाणाऱ्या प्रत्येकाचं आहे.

फाउंडेशनची उद्दिष्टं ः
साठीतलं ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ हे भारतातील गुणवान विद्यार्थी, शिक्षक, व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते यांना भारतात किंवा परदेशात उच्चशिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती स्वरूपात किंवा अनुदान देतं. होतकरूंना तांत्रिक शिक्षणासाठी आर्थिक साह्य करतं. विविध ज्ञानक्षेत्रांत संशोधन आणि अध्ययन करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रमांची आखणी करणं, प्रत्यक्ष कार्यक्रम करणं आणि याचबरोबर अशा स्वरूपाच्या कामांना साह्यभूत ठरतील अशा संस्थांची समान उद्दिष्टं साध्य करण्यासाठी आवश्‍यक ते कार्यक्रम एकत्रितपणे राबवणं. थोडक्‍यात सांगायचंच झालं, तर जिथं गुणवत्ता आहे; पण साधनसामग्रीची वानवा आहे, तिथं संबंधितांना बौद्धिक किंवा आर्थिक मदतीचा हात पुढे करून प्रोत्साहन देणं आणि त्यांच्या जीवनाला दिशा देऊन देशाच्या उत्कर्षाला हातभार लावण्यात खारीचा वाटा उचलणं अशा प्रकारची उद्दिष्टं ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ची असून, तशी दिमाखदार वाटचाल सुरू आहे.

मार्गदर्शन केंद्र ः
‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ हे आपल्या शैक्षणिक गुणवत्तेच्या आणि तसंच करिअरच्या उत्कर्षासाठी असलेलं एक उत्तम मार्गदर्शन केंद्र होऊन विद्यार्थी आणि पालकांना त्यासाठी आवश्‍यक ते मार्गदर्शन इथून मिळावं, यासाठी संस्थेचे विश्‍वस्त व कार्यकारिणीचे इतर सदस्य सतत कार्यरत असतात. हळूहळू संस्थेचा व्याप वाढत गेला. संस्थेची स्थापनाच मुळी परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती देण्यापासून झाली. आतापर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी या मदतीच्या रकमेची अगदी न चुकता वेळेत परतफेड केली आहे. त्यासाठी कोणालाही आठवण करण्याची वेळ आलेली नाही. विद्यार्थ्यांच्या मनातली कृतज्ञता हेच या फाउंडेशनचं संचित आहे.

पुण्याच्या शैक्षणिक प्रांगणात जगभरातले विद्यार्थी येतात. त्या सर्वांना भारतीय संस्कृतीची जवळून चांगली ओळख व्हावी म्हणून स्थानिक कुटुंबांत त्यांची व्यवस्था लावून देण्यात ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ पुढाकार घेतं. यातून होणारी सांस्कृतिक देवाणघेवाण जशी महत्त्वाची, तशी निर्माण होणारी नातीसुद्धा. अशीच नाती तज्ज्ञ मार्गदर्शक आणि विद्यार्थी यांच्यांतही निर्माण होतात. भारतातून परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सांस्कृतिक देवाणघेवाणीची संधी देण्याचाही प्रयत्न फाउंडेशन करत आलं आहे. अमेरिकेतल्या काही शिक्षण संस्थांच्या सहकार्यानं निवडक गुणवंत विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी अमेरिकेतल्या एखाद्या इच्छुक कुटुंबामध्ये निवासाचीही संधी देण्यात येत असे. पाच वर्षांत जवळजवळ पन्नास विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या सुविधेचा ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’च्या माध्यमातून लाभ घेतला आहे.
निवडक विद्यार्थ्यांसाठी दर रविवारी सुमारे तीन तासांचा खास अभ्यासवर्ग घेतला जातो. नामांकितांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये निश्‍चितच गुणात्मक बदल घडतो. गेल्या पाच वर्षांत शेकडो विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आहे.

करिअर डेव्हलपमेंट स्कीम :
असे अनेक विद्यार्थी निरनिराळ्या सामाजिक स्तरांतून येत असतात. विविध जाती-धर्मांच्या, विविध स्तरांतील आर्थिक परिस्थितीच्या या सर्व विद्यार्थ्यांमध्ये एकच गुण समान असतो आणि तो म्हणजे काहीतरी भव्यदिव्य करण्याची इच्छा-आकांक्षा! तिला खतपाणी घालण्याचं काम करताना अनेक दाते १०-१५ हजार रुपयांची देणगी देतात आणि त्यातूनच ‘करिअर डेव्हलपमेंट स्कीम’ फाउंडेशनला राबवता आली आहे. दरवर्षी पुण्यात वीस विद्यार्थी पाठवणाऱ्या कॅनडातल्या कॅलगरी विद्यापीठाच्या बरोबर काम करणारी ‘महाराष्ट्र सेवा समिती’, तसंच न्यूयॉर्कची ‘महाराष्ट्र फाउंडेशन’ आणि अमेरिकेतल्या ‘सॅन्टा क्‍लॅरा’ आणि अमेरिकेतल्या भारतीयांनी स्थापन केलेल्या ‘फाउंडेशन फॉर एक्‍सलन्स’ अशांसारख्या संस्था मदतीत सहभागी असतात. गेल्या साठ वर्षांत फाउंडेशनच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देण्यात आल्या आहेत.

संशोधन शिष्यवृत्ती :
विद्यालय आणि महाविद्यालय यांतला अध्यापनाचा दर्जा उंचावण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षकांच्या संशोधनावर भर देणारी प्रोत्साहन योजना फाउंडेशन आतापर्यंत राबवत आलं आहे. गुणात्मक किंवा दर्जात्मकदृष्ट्या लाभधारकांना ती डोंगराएवढी मोठी वाटली यात शंका नाही; पण समाजाची गरज लक्षात घेता हा व्याप आणखीन खूप मोठ्या प्रमाणावर वाढवण्याची आवश्‍यकता आहे. हे लक्षात आल्यावर फाउंडेशननं गेल्या वर्षापासून संशोधन शिष्यवृत्तीच्या रकमेत दुपटीनं वाढ केली. तरीसुद्धा संशोधनाची गरज आणि व्याप लक्षात घेता, लोकांना यात सहभागाची संधी मिळावी त्याचप्रमाणे संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणारा लाभदेखील आणखीन वाढावा, त्याबरोबर लाभार्थी वाढावेत, अशा दृष्टिकोनातून संस्थेचा निधी अधिक भरभक्कम करण्याची नितांत आवश्‍यकता आहे.

‘सकाळ इंडिया फाउंडेशन’नं २०१५-१६ आणि २०१६-१७ या दोन वर्षांत एक आगळावेगळा जीनिअस किड (Genius Kid Scheme) नावाचा उपक्रम राबवला. या उपक्रमामार्फत ज्या विद्यार्थ्यांची मेमोरेड ऑलिंपिक्‍स किंवा ज्युनिअर मेंटेल कॅलक्‍युलेशन वर्ल्ड चॅंपियनशिप २०१६ तसंच २०१७ मध्ये ‘बेलफील्ड’ जर्मनी इथं झालेल्या ज्युनिअर मेंटल कॅलक्‍युलेशन वर्ल्ड चॅंपियनशिप २०१७ साठी भारतातून ज्यांची निवड झालेली आहे, अशा विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचा हात दिला, तसंच अशा स्पर्धेसाठी जीनिअस किड फाउंडेशन, वापी (गुजरात) ही संस्था अथक प्रयत्न करते. त्या संस्थेलाही ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’नं आर्थिक मदत करून या संस्थेचा उत्साह द्विगुणित करण्याचा प्रयत्न केला.
या जागतिक स्पर्धेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना फाउंडेशननं आर्थिक मदत केली त्यातल्या एका विद्यार्थ्यानं सुवर्णपदकदेखील मिळवलं, याचा ‘सकाळ इंडिया फाउंडेशनला अभिमान आहे.

‘सकाळ इंडिया फाउंडेशन’नं काही फाउंडेशनना देखील आर्थिक मदत केली आहे. ‘सुहृद’ या पुण्यातल्या संस्थेमधल्या मूक-बधिर विद्यार्थ्यांसाठी Hearing Aids (श्रवणयंत्रे) घेण्यासाठी या संस्थेला अमेरिकेतल्या एका दानशूर व्यक्तीकडून आर्थिक मदत मिळवून दिली. त्याचप्रमाणे याच संस्थेची जी मूक-बधिर मुलांची निवासी शाळा आहे त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी पटांगण आणि खेळण्याचं साहित्य, तसंच वसतिगृहामधल्या सोयींसाठी म्हणून भरघोस आर्थिक मदतही मिळवून दिली आहे. अर्थातच या सर्व मदतीमुळे अशा या विद्यार्थ्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच सकारात्मक होण्यास खूप चांगली मदत झाली आहे.

‘सकाळ इंडिया फाउंडेशन’च्या हीरकमहोत्सवी वर्षानिमित्तानं गुणवंत, गरजू व होतकरू विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी अनेक नवनवीन शैक्षणिक उपक्रम सुरू करण्याचा, त्याचप्रमाणे सुरवातीपासून जे उपक्रम फाउंडेशन राबवत आलं आहे त्यांची व्याप्ती आणखीन वाढवण्याचा म्हणजेच विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीचा लाभ वाढावा आणि त्या अनुषंगानं लाभार्थी वाढावेत, असा मानस फाउंडेशनच्या कार्यकारिणीच्या सभासदांनी केला आहे. आतापर्यंत लहान लहान प्रमाणावर यासाठी आवाहन करण्यात आलं होतं. फाउंडेशनला दिलेल्या देणगीवर देणगीदाराला प्राप्तिकरात कलम ८०जी खाली सवलत मिळते. मोठी देणगी दिल्यास ती योग्य रीतीनं गुंतवून तिच्यावर मिळणाऱ्या व्याजाचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी अधिक नेमक्‍या, चांगल्या आणि मोठ्या योजना राबवण्यासाठी करता येतो. आवर्ती स्वरूपाच्या देणग्यांचा उपयोग गरजू, होतकरू आणि हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी होऊ शकतो. अशा विद्यार्थ्यांना पुस्तकं, संगणक तसंच तत्सम शैक्षणिक साधनेही उपलब्ध करून देता येतात.

‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ हे आतापर्यंत अतिशय शांतपणे पडद्यामागून कार्य करत आलं आहे; परंतु सध्याचं जग हे डिजिटलायझेशन आणि सोशल मीडियाचं असल्यानं फाउंडेशनच्या हीरकमहोत्सवी वर्षांच्या निमित्तानं ‘सकाळ’ इंडिया फाउंडेशननं आपली वेबसाइट अद्ययावत (update) करून घेतलेली आहे. त्यामुळे या वर्षीपासून बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती घेऊन उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज Online भरून घेतले गेले. यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत फाउंडेशनला पोचता येणार आहे.

याचबरोबर फाउंडेशनच्या हीरकमहोत्सवी वर्षापासून माध्यमिक शालेय विद्यार्थी दत्तक योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातल्या पात्र विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्चासाठी प्रत्येकी वार्षिक दहा हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. अशा समाजविधायक उपक्रमास समाजातल्या दानशूर व्यक्ती, संस्था, उद्योजक, खासगी कंपन्या आणि आस्थापनांना सामाजिक उत्तरदायित्वाचा भाग म्हणून या उपक्रमाला आर्थिक मदत करून या दत्तक योजनेत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. या आवाहनाला प्रतिसाद देऊन श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट, पुणे, नागपूर येथील रोहित माडीवार आणि इतर अनेक जणांनी हातभार लावण्याचं आश्‍वासन दिलं असून, त्यापैकी अनेक जणांनी शिष्यवृत्तीची रक्कमही फाउंडेशनकडे जमा केली असून, हा निधी आतापर्यंत जवळजवळ ५ लाख रुपयांपर्यंत जमा झाला आहे, हे सांगण्यास आम्हाला खूप आनंद होत आहे. आम्हाला खात्री आहे, की हळूहळू या उपक्रमाची व्याप्ती निश्‍चित वाढेल आणि अनेक संस्था आणि दानशूर व्यक्ती ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’च्या या उपक्रमाला मदतीचा हात नक्कीच पुढे करतील. फाउंडेशनच्या या ‘दत्तक योजनेचा’ फायदा ग्रामीण भागातले जे गरीब आणि होतकरू असे अनेक विद्यार्थी आहेत, त्यांना होऊ शकेल आणि हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू शकणार नाहीत. या योजनेचं यश हे केवळ समाजाकडून येणाऱ्या मदतीच्या ओघावर अवलंबून असणार आहे.

निधी वाढवण्याची आवश्‍यकता
सकाळ इंडिया फाउंडेशनचा हीरकमहोत्सव साजरा करण्याच्या दृष्टिकोनातून गेल्या वर्षापासूनच सामाजिक कार्यासाठी निधी देऊ इच्छिणाऱ्या मंडळींशी संपर्क साधून प्रयत्न सुरू केला आणि त्यातूनच आशादायी आणि उत्साहवर्धक चित्र निर्माण होऊ लागलं. पुण्यातली अग्रगण्य कंपनी फिनोलेक्‍स केबल्स लि. यांनी ५० लाख रुपयांची देणगी दिली. अनंत आर. खेर यांनी २ लाख, सुमिता एस. सोमण यांनी १ लाख, तसंच श्‍यामला व्ही. अथनी, प्रमिला व्यास, मनीषा डी. कुंडले आणि खादी चॅरिटेबल ट्रस्ट या प्रत्येकानं ५० हजार रुपयांच्या देणग्या दिल्या. त्याचप्रमाणे अमेरिकेतील प्रा. बलवंत दीक्षित व विद्या दीक्षित यांनी साडेतीन लाख रुपये आणि ‘गुडविल असोसिएशन’मार्फत नारायण देशपांडे व आशा देशपांडे यांनी जवळजवळ अकरा लाख रुपयांच्या देणग्या दिल्या. इतरही अनेक देणगीदारांनी शंभर रुपयांपासून ते दहा हजार रुपयांपर्यंत देणग्या दिल्या. अशा प्रकारे हीरकमहोत्सवी वर्षाच्या सुरवातीलाच जवळजवळ एकूण ६४ लाख रुपयांच्या देणग्या फाउंडेशनकडे जमा झाल्या आहेत. हा निधी किमान पाच कोटी रुपयांवर जाण्याची आवश्‍यकता आहे. तसं झाल्यास विद्यार्थ्यांची संख्या आणखी वाढवता येईल आणि आर्थिक मदतीची रक्कमही वाढू शकेल. रकमेच्या व्याजातून ‘करिअर डेव्हलपमेंट’साठी मार्गदर्शनाची व्यवस्था करता येईल. विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी शिक्षण क्षेत्रामधल्या, तसंच उद्योगव्यवसायातल्या, त्याचप्रमाणे सरकारी क्षेत्रातल्या मान्यवरांना निमंत्रित करण्याचा प्रयत्न आहे. अशा संवादातून हा निधी अधिक व्यापक पद्धतीनं लोकांपर्यंत काम घेऊन जाऊ शकेल. एका नामवंत व्यक्तीनं आई-वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जवळजवळ पंधरा लाख रुपये पोलिसांच्या मुला-मुलींना त्याच्या व्याजातून शिष्यवृत्ती दिली जावी, यासाठी दिले आहेत. ही व्यक्ती अतिशय उच्चपदस्थ असून, स्वतःचं नाव प्रसिद्ध न करण्याची अट तिनं स्वतःच घातली आहे. तशीच अगदी शंभर रुपयांपासून लाख रुपयांपर्यंतच्या लहान-मोठ्या रकमा देऊ शकणारी मंडळीही देणगी देण्यास पुढे आली, तर फाउंडेशनला पाच कोटी रुपयांचा एक किमान कायमस्वरूपाचा निधी उभारून त्याच्या व्याजाचा उपयोग गरीब, होतकरू आणि हुशार विद्यार्थ्यांच्या हितासाठी करता येणं शक्‍य होणार आहे. याहून अधिक जेवढी रक्कम जमा होईल, तेवढी अधिक विद्यार्थ्यांचा फायदा करून देणारी ठरेल.

अशी अनेकानेक उदाहरणं भारतातली, तसंच परदेशांमधली सांगता येतील. अर्थात ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ ही गेल्या साठ वर्षांपासून अनेक होतकरू, गरजू आणि अभ्यासू अशा प्रगतिपथावरील विद्यार्थ्यांच्या जणू पालकत्वाचीच भूमिका बजावते आहे, अशी लाभार्थींची भावना आहे. अशा या फाउंडेशनला मदत करणं, हे म्हणूनच विद्यादानाइतकंच महत्त्वाचं असं पवित्र कार्य आहे, कर्तव्य आहे. या शुभकार्यात आपलाही सहभाग असावा, अशी या हीरकमहोत्सवाच्या निमित्तानं अपेक्षा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com