...आनंदानं द्यावीशी वाटणारी परीक्षा ! (प्रतीक्षा लोणकर)

pratiksha lonkar
pratiksha lonkar

पालकांकडून आपल्याला जे मिळालं आहे त्याचं भान ठेवणं आणि त्यातून योग्य ते आपल्या पाल्याला देणं ही खूप मोठी प्रक्रिया आहे, ती खूप थकवणारी आहे त्याचबरोबर आव्हानात्मक आहे, पण त्याच वेळी ती खूप आनंद देणारी बाब आहे. हा खूप समृद्ध करणारा अनुभव आहे. पालकत्व ही माणसांना समजून घेण्याची, शिकवण्याची आणि शिकण्याची प्रोसेस आहे. माझ्या मतानुसार थोडक्यात आयुष्यभर आनंदानं द्यावीशी वाटणारी परीक्षा म्हणजे पालकत्व होय.

माझी आई शिक्षिका होती आणि वडील डॉक्टर होते. वडील प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करत असल्यामुळं त्यांची नेहमी बदली होत असे. वडिलांच्या फिरतीच्या नोकरीमुळं आम्हालाही म्हणजे आम्हा सर्व भावंडांना त्यांच्याबरोबर फिरावं लागत होतं. यामुळं मुलांच्या शिक्षणाचं नुकसान होऊ शकतं हे आईच्या लक्षात आलं. म्हणून तिनं महानगरपालिकेच्या शाळेमध्ये तिची बदली करून घेतली, जेणेकरून आम्हाला एका ठिकाणी राहता येईल. त्यामुळं औरंगाबादला तिला स्थायी स्वरूपाचा मुक्काम करता आला. वडील फिरतीवर असले तरी आम्ही आईबरोबर औरंगाबादमध्येच होतो. आईनं आमच्या शिक्षणासाठी घेतलेल्या या निर्णयामुळं लहानपणापासून आमच्यात शिक्षणाचं महत्त्व रुजलं गेलं. आमच्या शिक्षणात पुढं अडचण आली नाही. लहानपणी आईनं सुरवातीला आमचा अभ्यास घेतला असेल; पण पुढं लवकरच आम्ही स्वतःच स्वतःचा अभ्यास करू लागलो, कारण शिक्षणाचं महत्त्व कळलं होतं. त्यामुळं अभ्यासासाठी घरातल्या वडिलधाऱ्या मंडळींना बोलावं लागमं, त्यांनी सतत सांगणं अशा गोष्टी घडलेल्या मला आठवत नाही.

आई नोकरीबरोबरच इतर लहान-मोठ्या सामाजिक उपक्रमांमध्येसुद्धा सहभागी व्हायची. शाळेतील विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या स्पर्धा, त्यासाठी मुलांना जबाबदारीनं घेऊन जाणं, शाळेतल्या समारंभात उत्साहानं सहभागी होणं, या गोष्टी ती पुढाकार घेऊन करायची. फक्त नोकरी आणि घर एवढंच ती करत नव्हती. त्यामुळं अवलंबून न राहणं, इतर बाबतीतही स्वावलंबी होणं, स्वतंत्र होणं हे संस्कारही आमच्यावर नकळत झाले. त्या काळानुसार साधारण सातवी-आठवीत मुली गेल्या, की त्यांना भाजी, पोळी व इतर स्वयंपाकघरातल्या गोष्टी शिकवल्या जायच्या. त्यापेक्षा स्वावलंबी बनलं पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, या गोष्टी अधिक ठळकपणे आईनं शिकवल्या. अर्थात, आईचं बघून स्वयंपाकही येत होता; पण आईनं त्यासाठी फार आग्रह कधी धरला नाही. आईच्या वेगळ्या दृष्टिकोनामुळं आम्ही वक्तृत्व स्पर्धा, नाटक अशा उपक्रमांत सहभागी होत होतो. पहिल्यांदा अभ्यासच केला पाहिजे, असा आग्रह तिनं कधी धरला नाही. अभ्यासाबरोबर इतर गोष्टींतही सहभागी झालं पाहिजे, असं तिनं नकळतपणे आमच्यावर बिंबवलं. शिवाय, अभ्यास आम्ही करतच होतो, त्यामुळं आमचा सर्वांगीण विकास झाला असं म्हणता येईल.

दुसरी आणखी एक महत्त्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते, की दहावीत मी मेरिटमध्ये होते. पण, मी जेव्हा कला शाखेला मला जायचंय असं सांगितलं, तेव्हा मला घरून कुठलाही विरोध झाला नाही. ते कळल्यावर आमचे सर घरी आले आणि ते आई-बाबांना म्हणाले, ‘‘ तिला एवढे चांगले मार्क मिळाले आहेत, तिचं गणित इतकं चांगलं आहे, तर ती कला शाखा का निवडत आहे? तुम्ही तिला समजावून सांगा.‘‘ पण तरी माझ्या आई-वडिलांनी मला सायन्स घे म्हणून कुठलाही आग्रह धरला नाही. ‘‘ तिला कला शाखा निवडायची आहे ना, मग घेऊ देत,’’ असंच त्यांचं म्हणणं होतं. माझ्या निर्णयाला त्यांनी पूर्ण पाठिंबा दिला. हे स्वातंत्र्य त्यांनी मला दिलं याचं मला खूप विशेष वाटतं. वडील डॉक्टर होते, आई शिक्षिका होती, तेव्हा मुलांनी यापैकीच काहीतरी व्हायला हवं, असं काही दडपण किंवा आग्रह नव्हता. त्याकाळात असा निर्णय घेणं थोडंसं धक्कादायकच होतं; पण आई-वडिलांच्या पाठिंब्यामुळं मला ते सहज शक्य झालं. पालक म्हणून मला त्यांची ही भूमिका फारच विशेष वाटते.

काळानुसार त्यांच्या आणि माझ्या पालकत्वामध्ये काही मोठे फरक नक्कीच आहेत. पण, तरी शेवटी पालकत्व हे काही पातळ्यांवर समानच असतं, असं मला वाटतं. पालकत्वामध्ये येणाऱ्या जबाबदाऱ्या, अडचणी, एन्झायटी या गोष्टी तेव्हाही होत्या आणि आजही आहेत. पण काळाचा फरक खूपच मोठा आहे. टीव्ही, मोबाईल, इंटरनेट यांसारख्या कितीतरी गोष्टींपासून आता आपल्याला मुलांना दूर ठेवावंसं वाटतं. आता करोनाच्या काळात तर मला हे खूपच प्रकर्षानं जाणवलं. आपण मुलांना अशा गोष्टींपासून दूर ठेवू पहात असतो आणि त्याच वेळी त्या गोष्टी त्यांना खुणावत असतात. आमच्या लहानपणी मुलांमध्ये आज्ञाधारकपणा दिसायचा. पालकांनी सांगितलेलं ऐकायचं, त्याबद्दल का? कशाला? असे प्रश्न निर्माण करायचे नाहीत. आई- वडील जे सांगतील ते ऐकायचं अशीच पद्धत होती. पण, आता मात्र तसं चित्र दिसत नाही. आमची पिढी वडिलांना, ‘‘अहो बाबा’’ म्हणायची, आता मात्र त्याची जागा, ‘‘ए बाबा’’नं घेतली आहे. आता मुलांचं पालकांशी खूप मैत्रीपूर्ण नातं निर्माण झालेलं दिसतं, त्यावेळी ही जागा आदराची आणि काहीशी धाकाची होती. या सगळ्या बदलाचे काही फायदे आहेतच; पण काही ठिकाणी, ‘‘अरे हे असं नको होतं,’’ असंही वाटतं. त्या काळातील आज्ञाधारकपणा आपण आज मुलांकडून अपेक्षित करू शकत नाही. हल्ली मुलांना एखादी गोष्ट करू नकोस असं आपण सांगतो, तेव्हा ती गोष्ट का करायची नाही इथपासून, त्याचे परिणाम काय होऊ शकतात, इथपर्यंत सगळं सांगावं लागतं. त्यांच्या सगळ्या शंकांचं निरसन करावं लागतं आणि एवढं सगळं करून आपण जर चुकून एखाद्यावेळेस ती गोष्ट केली, तर मुलांचा कात्रीत पकडणारा प्रश्न तयार असतो, ‘‘ तू कसं हे केलंस?’’ आमच्या लहानपणी आम्ही पालकांना असं विचारूच शकत नव्हतो, हिंमतच नव्हती तेवढी. आता मुलांशी खूप सांभाळून बोलावं लागतं. हा काळाचा फरक आहे. बदलेल्या काळामुळं मुलांमध्ये स्मार्टनेस आलेला आहे, तेवढी हुशारी त्यांच्याकडं आहे, भरपूर गोष्टींची उपलब्धता आहे आणि ते सर्व जाणून घेण्याची उत्सुकतादेखील या पिढीकडं आहे. आपणही पालक म्हणून या सगळ्या गोष्टी मुलांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्याला या गोष्टी मिळाल्या नाहीत, असा एक दृष्टिकोन यामागं असतो आणि आपलं मूल काळानुसार मागं नाही पडलं पाहिजे अशीही भावना त्यापाठीमागं असते. पण, आपण मुलांना जेव्हा या आधुनिक गोष्टी उपलब्ध करून देतो, तेव्हा आपली जबाबदारीही खूप वाढते. कारण कोणत्याही गोष्टीचा योग्य वापर करायला शिकवणं हे जास्त महत्त्वाचं असतं. तसंच, उपलब्ध आहे ते सगळं देणं हेदेखील योग्य नसतं. कारण, मुलांना काहीतरी न मिळण्याची पण किंमत कळायला पाहिजे. अशा वेळी काय द्यायचं, किती द्यायचं, तसंच काय द्यायचं नाही, हे ठरवणं आजच्या काळात पालक म्हणून मला आव्हानात्मक वाटतं. कारण मुलांना काही मिळालं नाही, तरच त्यांच्यात काहीतरी मिळवण्याची जिद्द निर्माण होऊ शकेल. अन्यथा, त्यांना सहज मिळालेल्या गोष्टींची किंमत राहाणार नाही. अशा दोन्ही गोष्टींचा समतोल साधणं हे पूर्वीपेक्षा आताच्या काळात जास्त आव्हानात्मक झालं आहे. पूर्वी घरात दोन-तीन भावंडं असायची. तसंच, उन्हाळ्याच्या सुट्टीत आते-मामे भावंडं यायची, ती महिनाभर राहायची. एकमेकांच्या सोबतीनं मुलं नकळत मोठी व्हायची, त्यामुळं ‘ मुलं वाढतात’ ही त्यावेळची संकल्पना होती. त्यांना ‘ वाढवायला लागतं’ अशी आताची संकल्पना त्या वेळी नव्हती. म्हणून मला आताचं पालकत्व जास्त चॅलेंजिंग वाटतं. एकीकडं नव्या गोष्टी उपलब्ध करून देणं, त्या गोष्टींचं महत्त्व सांगणं, दुसरीकडं काय नाही दिलं, का नाही दिलं हे सांगणं आणि त्यातून मुलांचा समतोल विकास घडवणं, हे सगळं सांभाळावं लागतं. मुलांना घरात आपण काही गोष्टींचं बंधन घालू शकतो; पण बाहेरच्या जगात आणखी खूप प्रलोभनं असतात, त्याच्यासाठीही त्यांना तयार करणं, खंबीर बनवणं हेदेखील पालक म्हणून महत्त्वाचं आणि तितकंच कठीण आहे. बरेचदा आपण जे करतो आहे, ते बरोबर आहे ना? आपल्या मुलीला जे देत आहोत, ते योग्य आहे ना? असे प्रश्नदेखील माझ्या मनात निर्माण होत राहतात. अशावेळी एकच असणारं मूलदेखील हे पूर्वीच्या काळातल्या तीन-चार मुलांच्या बरोबरीनं वाटू लागतं. पालक म्हणून आपल्याही मनात असतं, की आपल्या मुलानं अथवा मुलीनं काहीतरी छान करावं. क्षेत्र कोणतंही असो, पण त्यात उत्तम यश मिळवावं. त्यामुळं त्याची आवड ओळखून त्याबाबत त्याला जागरूक करणं, त्याला तिथपर्यंत नेणं, त्याचे मित्र चांगले आहेत ना हे बघणं... हे सगळं एकत्रित जमून येणं आता फार अवघड झालं आहे. म्हणून पालकांनी मुलांना नुसता वेळ देऊन चालण्यासारखं नाही, तर ‘क्वालिटी टाइम’ देणं आवश्यक आहे. कारण, लॉकडाउनच्या काळात मी बघितलंय की मुलांना मोबाईल आणि टीव्हीपासून दूर ठेवताना नाकीनऊ येतं. हे बघू नका, असं जेव्हा आपण मुलांना सांगतो, तेव्हा त्याऐवजी काही चांगला पर्याय त्यांच्यासमोर ठेवावा लागतो. त्यासाठी आपल्याला स्वतःला मार्ग शोधून त्यात सहभागी व्हावं लागतं.

हल्लीची मुलं खूप हुशार आहेत, त्यामुळं चांगल्या गोष्टी जशा ते चटकन आत्मसात करतात, तशाच वाईटही करू शकतात. ते रोखणं हे पालकांचंच काम आहे आणि त्यासाठी मुलांना क्वालिटी टाइम देणं गरजेचं आहे. मी आणि माझे पती प्रशांत आम्ही दोघं या गोष्टी आमची मुलगी रुंजीसाठी करतो. तिला चांगली गाणी ऐकवतो, चांगली पुस्तकं वाचून दाखवतो. नुसतं ऐक, वाच, बघ, असं म्हणून मुलं ती गोष्ट करत नाहीत. आधी आपण स्वतः ती करून, त्याची आवड मुलांच्या मनात निर्माण करावी लागते. या लॉकडाउनच्या काळात रुंजीला आम्हाला आवडलेले काही चित्रपट दाखवले. आमची आणि तिची भावनिक आवड कुठंतरी जुळावी असा त्यामागचा उद्देश होता. आपण नुसतं घरात असून उपयोग नसतो, तर मुलांबरोबर सुसंवाद असणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी आम्ही रात्री झोपण्यापूर्वी अर्धा-एक तास एकत्र बसून फक्त गप्पा मारतो. या वेळी आम्ही तिघंही एकमेकांना एकमेकांच्या गोष्टी सांगतो. कधी कधी ही बाष्कळ बडबडही असू शकते; पण यातलं शेअरिंग मला खूप महत्त्वाचं वाटतं.

हल्ली बहुतेक घरांत एकच मूल असतं. ही मुलं एकलकोंडी होऊ नयेत असं वाटतं. अलीकडं कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांचा इमोशनल कोशंट तपासला जातो. एखादी परिस्थिती तुम्ही कशी हाताळता, भावनिकदृष्ट्या तुम्ही किती सक्षम आहात, अशा गोष्टी यामध्ये तपासल्या जाता. हा ईक्यू उत्तम राहण्यासाठी मुलांशी असलेला संवाद, शेअरिंग महत्त्वाचं ठरतं. कारण अनेकदा मुलांना बरंच काही वाटत असतं; पण ते एक्स्प्रेस करण्याची त्यांना सवयच नसते. ‘‘ मला वाईट वाटलंय, मला या गोष्टीबद्दल असं वाटतंय, मला आता रडायचंय,’’ या गोष्टी मुलांनी व्यक्त करणं खूप महत्त्वाचं असतं. कारण या सर्व गोष्टी तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकासासाठी खूप गरजेच्या आहेत. आपलं मूल सतत पुस्तकात डोकं खुपसून बसलं आहे आणि घरी येणाऱ्या माणसाशी दोन शब्दपण ते बोलत नसेल, तर त्याच्या त्या पुस्तक वाचण्याचं मला अजिबात कौतुक वाटणार नाही. किंवा, कॉम्प्युटरवर बसून घरी येणाऱ्या व्यक्तीकडं रुंजी पाठ फिरवणार असेल, तर मला अजिबात तिला असं घडवायचं नाहीये. मुलांच्या सामाजिक, भावनिक वागणुकीत समतोल असणं महत्त्वाचं आहे. आजची परिस्थिती बघता एक नॉर्मल मूल घडवणं खरोखरच चॅलेंजिंग बनलं आहे. या सर्व गोष्टींचा विचार करूनच आम्ही रुंजीला वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. तिला आम्ही सांगत असतो, की सगळा वेळ अभ्यासातच नाही घालवायचा. वाचन, खेळणं, थोडा वेळ टीव्ही बघणं या गोष्टीही केल्या पाहिजेत. आम्ही तिघं दर गुरुवारी एकत्र सिनेमा बघतो. थोडक्यात, एकत्र वेळ घालवण्यासाठी वेगवेगळे उपाय करतो. शेअरिंग, व्यक्त होणं, बोलणं या गोष्टी तुम्हाला विकसित करतात. म्हणून रुंजीला वाढवताना हे सगळं करण्याकडं माझा आणि प्रशांतचा आम्हा दोघांचाही कल आहे. या गोष्टींची मुलांना थोडी थोडी सवय होत गेली, तर बाहेरच्या जगातही ती अतिशय खंबीरपणे उभं राहू शकतात.

माझ्या अनुभवातून पालकत्व हे खूप आनंददायी आहे; पण त्याचवेळी दुसरीकडं खूप आव्हानात्मकही आहे. अनेकदा असं वाटतं, की ते आपलं एक ‘प्रोजेक्टच’ आहे. कारण त्यातून आपणही खूप काही शिकत असतो. मुलांना काही शिकवण्यापेक्षा आपल्या वागणुकीतून ती जे काही शिकतात, ते जास्त ठळकपणे त्यांच्या मनावर बिंबतं. त्यासाठी आपल्याला पालक म्हणून सतत जागरूक राहण्याची गरज असते. ती काही अर्ध्या किंवा एक तासाची प्रोसेस नाही, तर ती आयुष्यभराची आहे. मी जर रुंजीला टीव्ही बघू नकोस, असं सांगत असेल, तर टीव्ही न बघणं ही आधी माझी जबाबदारी आहे. पालकत्व ही दीर्घकाळ चालणारी गोष्ट आहे, त्याचे अनेक पदर आहेत. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या उक्तीनुसार प्रत्येक मूल हे वेगळं असतं. माझी एखादी कृती दोन वेगळी मुलं वेगळ्या पद्धतीनं बघू शकतात, त्यातून वेगवेगळ्या गोष्टी ती घेऊ शकतात. थोडक्यात, आपण जे सांगत आहोत, त्या व्यतिरिक्त आपल्या मुलाचं एक वेगळं आणि स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळं आपण सांगितलेल्या गोष्टींमधून मूल काय घेईल हे लगेच सांगणं वा समजणं आवघड आहे. शिवाय, स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असल्यामुळं आपलं म्हणणं त्याच्यावर लादताही येण्यासारखं नाही. आपण नकळतणे आपल्या इच्छा मुलांवर लादत असतो. माझ्या व प्रशांतच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर, आपण असं करता कामा नये हे आम्ही ठरवलं. कारण, रुंजीला एखादी गोष्ट आतून करावीशी वाटली, तरच ती आनंदानं करेल आणि बहरेल ना! ही गोष्ट सर्व पालकांनी लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळं पालकत्व ही मुलांपेक्षा आपलीच शिकण्याची प्रोसेस आहे, असं मला वाटतं. मूल झाल्यानंतर आपला संयम सर्वांत जास्त वाढतो, नव्हे तो वाढवावाच लागतो. तसंच शेअरिंग, दुसऱ्याला समजून घेण्याची क्षमतादेखील वाढते. मला नेहमी वाटतं, की तुम्ही जर मुलांना वेळ देऊ शकत असाल, तरच त्यांना जन्माला घालावं. मीसुद्धा रुंजीला जन्म देण्यापूर्वी हा विचार केला होता. घर हे आपण छोटंसं जग म्हणतो; पण बाहेरचं जग किती मोठं आहे, त्या सगळ्यासाठी आपण पुरे पडू शकू असा विश्वास वाटेल, तेव्हाच मूल जन्माला घालावं असं मला वाटतं. पालकत्वामध्ये परिपूर्णता किंवा अंतिम सत्य असं काही नसतं. ती सतत सुरू असणारी क्रिया आहे. त्यामुळं त्यातील सुंदर क्षणांचा आनंद फक्त घेत राहावा. ‘‘ मी तुझ्यासाठी एवढं केलं,’’ असं मुलांना म्हणता कामा नये. कारण शेवटी ते आपल्या आनंदासाठी आपण केलेलं असतं, हे लक्षात घेतलं पाहिजे, तरच आपल्याला कुठली निराशा येऊ शकत नाही आणि आपण ती गोष्ट मुलांवर लादू शकत नाही. समाजात वावरताना आपली वागणूक कशी असली पाहिजे, हे मुलांना शिकवलं पाहिजे. तसंच, समोरच्या व्यक्तीचं काय म्हणंण आहे ते ऐकून घेणं, ते समजून घेणं शिकवलं पाहिजे. संस्कार वगैरे शब्द मला वापरावेसे वाटत नाहीत, कारण तुम्ही जे वागता, घरात जी मूल्यं असतात, तीच मुलं शिकत असतात, ते वेगळं शिकवण्याची गरज नसते. शिकवायचंच असेल, तर माणसानं माणसाशी कसं वागावं, त्याला कसं जाणून घ्यावं, योग्य ठिकाणी व्यक्त कसं व्हावं हे मुलांना शिकवलं पाहिजे. मुलांचं सामाजिक भान संतुलित आणि उत्तम ठेवणं हे आजच्या काळात खूप गरजेचं आहे. कारण हल्ली मुलं एकएकटी असतात, घरात सगळ्या गोष्टी उपलब्ध असतात, बाहेरच्यांशी संपर्क येण्याची शक्यता कमी असते. त्यामुळं या गोष्टी केल्या पाहिजेत.
हल्लीची मुलं टेक्नोसॅव्ही आहेत, त्यामुळे येणारं नवं तंत्रज्ञान मी रुंजीकडून शिकत असते. कारण ही मुलं अगदी सहजपणे स्मार्ट फोन, कॉम्प्युटर हाताळतात. काही वेळा माझं डबिंग, काही रेकॉर्डिंग असेल, तर ती त्याचं शूटिंग वगैरे सहज करते. तिच्यामुळं मलाही या गोष्टी आता जमायला लागल्या आहेत. पण, मुलांच्या मोबाईल-टीव्ही वापरावर आपल्यालाच नियंत्रण ठेवावं लागतं. किती वापरायचं आणि कुठं थांबायचं याची सीमारेषा ठरवावी लागते.

रुंजीच्या जन्मानंतर बराच काळ मी काम थांबवलं होतं आणि सुरू केल्यानंतर पूर्वीइतकं काम करणं टाळलं. रुंजीच्या वेळा व्यवस्थित मॅनेज होत आहेत ना, हे बघूनच काम करत होते. तरीही एकदा रुंजी आजारी होती आणि माझं मालिकेचं शूटिंग लांबलं. घरी प्रशांत होता, सासूबाई होत्या; पण तरी त्या वेळी माझी खूपच घालमेल झाली. असे परीक्षेचे प्रसंग येतात आणि आपल्याला त्यांना तोंड द्यावंच लागतं.

लॉकडाउनच्या काळात मी चार महिने घरीच होते, तेव्हा आता रुंजी स्वतः मला म्हणते, की "आई तू आता काम सुरू कर, मी व्यवस्थित राहीन, काही काळजी करू नकोस." माझ्या बाहेर जाण्यामुळं चुकून संसर्ग होऊ नये, ही माझी भीती तिला बोलून दाखवली, तर ती त्यावर सांगते, "आल्यावर अंघोळ केली की झालं!" म्हणजे हा समजूतदारपणा नकळतपणे मुलांमध्ये निर्माण होत जातो. मला आलेल्या कामाच्या बाबतीतही ती खूप चांगला सल्ला देते. हे काम तू कर, हे करू नकोस, असं तर्कसंगत सांगते. तिला कामाचं महत्त्व माहीत आहे आणि मी काम केल्यामुळं तिच्याकडं दुर्लक्ष होणार नाही हेदेखील माहीत आहे. कारण रुंजी झाल्यानंतर काम सुरू केलं, तेव्हा मी दिवसाचीच शिफ्ट करायचे, रात्री शक्यतो तिच्याबरोबर राहायचे. तिच्या गरजेनुसार वेळेचं नियोजन केलं होतं. तसंच, माझ्या सासूबाई घरी असतात, शिवाय मी दिवसभरासाठी कामाला बाई ठेवल्या आहेत. त्यामुळं ती घरी एकटी आहे असं कधी होत नाही. माझा वेळ आणि हे सगळं नियोजन झाल्यावरच मी काम करण्याचा निर्णय घेतला होता. कारण नुसतं जन्म देणं हे मला चालणारच नव्हतं. रुंजीला घरात अतिशय चांगलं वातावरण मिळणं आणि ती उत्तम प्रकारे वाढणं, हेच माझं उद्दिष्ट होतं आणि आजही आहे. त्यादृष्टीनं मी व प्रशांत आम्ही दोघं प्रयत्न करत असतो. आमच्या दोघांपैकी किमान एक जण तरी रुंजीच्याजवळ राहील हे आम्ही नेहमीच बघत असतो. पालकत्व ही शिकवण्याची आणि शिकण्याची एकत्र प्रोसेस आहे असं मला वाटतं. आपल्या पालकांकडून आपल्याला जे मिळालं आहे, त्याचं भान ठेवणं आणि त्यातून योग्य ते आपल्या पाल्याला देणं अशी ती प्रोसेस आहे. ती खूप थकवणारी आहे, आव्हानात्मक आहे; पण त्याच वेळी ती खूप आनंद देणारी आहे. हा खूप समृद्ध करणारा अनुभव आहे. पालकत्व ही माणसांना समजून घेण्याची, त्यांच्याबरोबर शेअरिंग करण्याची, शिकवण्याची आणि शिकण्याची प्रोसेस आहे. थोडक्यात, "आयुष्यभर आनंदानं द्यावीशी वाटणारी परीक्षा म्हणजे पालकत्व होय."

(शब्दांकन : मोना भावसार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com