समृद्ध करणारा वाचनानुभव (प्रा. भाऊसाहेब नन्नवरे)

prof bhausaheb nnaware
prof bhausaheb nnaware

वाचनातून होणारे संस्कार व्यक्तीच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाचे ठरतात. शालेय जीवनापासून ही ‘वाचन प्रेरणा’ विद्यार्थी-विद्यार्थीनींना मिळाली, तर भविष्यात ‘सशक्त व सक्षम’ अशी नवी पिढी घडण्यास नक्कीच मदत होईल. माजी राष्ट्रपती आणि वैज्ञानिक डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं सध्याचा वाचनव्यवहार, काय वाचावं, वाचनाचं महत्त्व आणि वाचनाची चळवळ आदींबाबत ऊहापोह.

‘दिसामाजि काहीतरी ते लिहावे। प्रसंगी अखंडित वाचीत जावे।’ ही समर्थ रामदासांची शिकवण वाचन, लेखनाचं महत्त्व विशद करते. अन्न, वस्र, निवारा यांच्याबरोबरच माणूस म्हणून व्यक्तीचा परिपूर्ण विकास होण्यासाठी वाचन खूप महत्त्वाचं आहे. आपल्याकडे आजही ग्रंथव्यवहाराला नगण्य स्थान दिलं जातं. पुस्तकं विकत घेऊन वाचण्याचा व्यवहार, छंद आजही आपल्या अंगवळणी पडलेला दिसत नाही. त्यासाठी केवळ ‘वाचन प्रेरणा दिना’सारख्या एका दिवसापुरता हा उपक्रम मर्यादित न राहता सातत्यानं सर्वांनीच हा वाचनाचा मूल्यसंस्कार अव्याहतपणे स्वीकारायला हवा. आजच्या काळात नवी पिढी ग्रंथांपासून, वाचनापासून दूर जाताना दिसते आहे. दूरचित्रवाणी आणि समाजमाध्यमांच्या प्रभावामुळं शाळा- कॉलेजमधले विद्यार्थी आणि मोठी माणसंही वाचनापासून फटकून राहताहेत, हे वास्तव सर्वत्र दिसतं. गोष्टी सांगणारी आजी आज घराघरात नाही. तिची जागा आता टीव्ही आणि मोबाईलनं घेतली आहे. अभ्यासक्रमाच्या पलीकडं जाऊन काही वाचायचं नसतं, असं मानणारी नवी संस्कृती उदयाला येऊ लागली आहे. त्यातूनच केवळ कागदोपत्री उच्चशिक्षित झालेली पिढी घडू नये यासाठी ‘वाचन प्रेरणा दिना’चं महत्त्व आहेच; पण त्यासाठी कारणं न सांगता, पळवाट न शोधता अखंडपणे ही ‘वाचन चळवळ’ व्यापक स्तरावर वृद्धिंगत व्हायला हवी.

काय आणि कसं वाचावं?
‘काय आणि कसं वाचावं?’ या प्रश्नाचं साधं सोपं उत्तर आपल्या आवडीनुसार सहज उपलब्ध होईल ते वाचावं, असं देता येईल. वाचनाला सुरवात होणं महत्त्वाचं! वाचनाची आवड हवी, व्यसन नको- कारण आवडीमुळं चांगलं तेच वाचलं जाईल. मन, बुद्धी, भावना आणि विचारांचं भरणपोषण होईल, असं वाचता येईल. निकोप आनंद ज्यातून मिळेल, योग्य-अयोग्यतेचा दृष्टिकोन देईल ते अखंडित वाचत जाऊ या.
मनातला अंधार दूर करून मन आणि विचाराला प्रकाशमान करण्याचं काम वाचनातून घडतं. कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, इतिहास, संतसाहित्य, तत्त्वज्ञानपर विचार, विज्ञान, कला यातलं आपल्या आवडीचं वाचत गेलो, तर मनोविश्रांती तर मिळतेच, शिवाय सकारात्मक दृष्टी विकसित होऊन जीवनाचा योग्य मार्ग सापडत जातो. म्हणून केवळ वाचायचं म्हणून न वाचता त्या वाचनात चिकित्सकपणा हवा. चिकित्सक वाचन हा चिकित्सक विचाराकडे घेऊन जाणारा प्रवास आहे. आजच्या युगात त्याचं नक्कीच महत्त्व आहे. वाचन ही जशी एक कला आहे, आवडीनं जोपासण्याचा छंद आहे; तसंच वाचनाचं एक शास्त्र आहे. प्रशिक्षणातून वाचनशास्त्र अभ्यासणं आणि नव्या पिढीत ते रुजवणं गरजेचं आहे.

ग्रंथसखा बनू या
ग्रंथ हेच गुरू आणि ते आपल्या जवळचे मित्र आहेत. जीवनाबद्दलची एक सजग दृष्टी देणारा तो वाटाड्या आहे. जीवलग सखा आहे, याची जाणीव जवळीकतेनं ग्रंथ वाचणाऱ्याला नक्कीच होते. चांगली माणसं आणि चांगली पुस्तकं आयुष्याला उभारी देतात. ती सतत आपल्याबरोबर असली, पाहिजेत. कारण कोणत्याही सुख-दु:खात ती आपली सोबत करत असतात. ज्येष्ठ कवी सतीश काळसेकर यांचं ‘वाचणाऱ्याची रोजनिशी’ हे साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त उल्लेखनीय असं ‘पुस्तकांविषयीचं पुस्तक’ (बुक ऑन बुक्स) आहे. त्यांचा ग्रंथसंग्रह आणि पुस्तकांविषयीचा प्रेमभाव सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. अनेक प्रतिभावंत लेखकांच्या पुस्तकांची ओळख करून देतानाच रसिक वाचक म्हणून आपण कसे घडलो ते या रोजनिशीतून त्यांनी सहजपणे मांडलं आहे. वाचकांना ग्रंथांकडं घेऊन जाण्यासाठी अशी पुस्तकं खूपच उपयोगी ठरतात.

कामाच्या गराड्यात वाचण्यासाठी वेळच नाही, अशी पळवाट शोधणारी मंडळी तासन्‌तास व्हॉटस्‌ॲप, फेसबुकवर रमलेली दिसतात. त्यापेक्षा उत्तमोत्तम ग्रंथांचं वाचन करू. ‘ग्रंथ सखा बनू या’ असं मानणारा, कर्जत तालुक्यातल्या ‘बार्डी’ या छोट्या गावातला अक्षय चव्हाण हा युवक स्वयंप्रेरणेनं ग्रंथालय चालवितो. अनेकांकडून त्यानं पुस्तकं गोळा करून आणली आहेत. अनेकांनी पुस्तकांची भेट देऊन या अनोख्या उपक्रमाला मोठा हातभार लावला आहे. गावातल्या मुलांनी मोबाईल खेळण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा ‘काही वाचावं’ हीच प्रेरणा यामागं आहे. गावीगावी असे अनेक अक्षय ‘ग्रंथांचे सोबती’ बनून उद्याची वाचनसंस्कृती नक्की जोपासतील ही खात्री आहेच.

नव्या पिढीत ‘वाचनाचा मूल्यसंस्कार’ करण्यात महत्त्वाची भूमिका आहे ती पालक व शिक्षकांची. हल्ली मुलं वाचतच नाहीत, अशी केवळ तक्रार न करता त्यांना वाचनासाठी वातावरण निर्माण करून देण्याचं आव्हान आपल्यासमोर आहे. ‘आधी केले मग सांगितले’ याप्रमाणे शिक्षक आणि पालकांनी आपल्या चौफेर वाचनातून हा आदर्श नव्या पिढीसमोर ठेवायला हवा. त्यासाठी शाळा महाविद्यालयांतल्या कपाटात बंदिस्त असलेली ग्रंथांची दालनं मुलांना खुली करून द्यायला हवीत. बालवयातच झालेले वाचनाचे संस्कार त्यांना आयुष्यभर प्रेरणा देत राहतील. शाळेची फी भरली, वह्या-पुस्तकं घेऊन दिली म्हणजे आपली जबाबदारी पूर्ण होत नाही. मोबाईल, टीव्हीच्या आहारी मुलं जाणार नाहीत, यासाठी अभ्यासक्रमाच्या बाहेरची ‘पूरक वाचण्यासाठीची पुस्तकं’ खरेदी केली पाहिजेत. इतर सर्व गोष्टींवर प्रचंड खर्च करणारी आम्ही मंडळी विकत घेऊन वाचायला मात्र आजही तयार होत नाही. खरं तर पूर्वीच्या तुलनेत आज मोठ्या प्रमाणात सर्व प्रकारची पुस्तकं सहज उपलब्ध होतात. ‘ई-बुक’च्या स्वरूपात ती सहज मिळतात. ऑनलाईन खरेदी करता येतात. गरज आहे ती त्याबद्दलच्या ‘सजग जाणिवेची आणि सकारात्मक दृष्टिकोनाची.’
वाचनाचा योग्य आणि परिपूर्ण असा संस्कार हा घराघरातूनच होऊ शकतो. आधुनिकीकरणाच्या प्रभावातून सर्व प्रकारच्या उंची वस्तू आपल्या घरात सहज दिसतात. मॉडर्न होण्यासाठी त्याचा आग्रह आणि अट्टाहास केला जातो; परंतु फारसं खर्चिक नसूनही ‘पुस्तकांचं कपाट’ मात्र आपल्या घरात नसतं. विकत घेऊन वाचण्याची अंगभूत सवय लागण्यासाठी शासन निर्णयाची गरज नाही. शक्य होतील तेवढी काही ना काही पुस्तकं आवर्जून घरी आणली पाहिजेत. कारण घरात पुस्तकं दिसली, तर ती उघडून बघण्याची, वाचण्याची प्रेरणा मुलांना मिळेल. जिज्ञासेपोटी मोकळ्या वेळेचा, सुट्टीचा त्यांचा काळ पुस्तकांच्या सानिध्यात जाईल. त्यासाठी घराची एक भिंत, एक कोपरा समृद्ध अशा ग्रंथांनी व्यापलेला असावा. जिथं काही ‘सुखाचे क्षण’ आपल्याला नक्कीच अनुभवता येतील. आपल्याच घरातल्या या ग्रंथालयात ‘अक्षरांची ही सुमने’ सर्वांनाच जगण्याचा सुगंध देत राहतील, यावर माझ्यासह तुम्हा सर्वांचाच विश्वास बसेल.

वाचन- एक अमृतानुभव
व्यक्तीनुसार वाचनाच्या तऱ्हा आणि आवडीनिवडी भिन्न-भिन्न असू शकतात. म्हणून स्वत:चा विचारविवेक जागृत करण्यासाठी वाचनाचा अनुभव आपल्याला नेहमीच समृद्ध करतो. त्यातून मन आणि बुद्धीचा विकास घडतो, तशीच भाषिक, वैचारिक, भावनिक क्षमताही वाढीस लागते. आयुष्यात येणाऱ्या सर्वच अनुभवांना समर्थपणे सामोरं जाणं आणि प्रत्येक क्षण अर्थपूर्ण जगणं म्हणजे काय ते वाचनातूनच कळतं. ‘असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग त्याला मिळतो सत्तर’ या ‘विंदां’च्या दृष्टिकोनाप्रमाणं जीवनावरची आसक्ती, सकारात्मक दृष्टी महान ग्रंथांच्या, पुस्तकांच्या वाचनातूनच विकसित होत जाते. वाचनाचा हा ‘अमृतानुभव’ आपल्याला निखळ आनंद देतोच. त्याचबरोबर रसिकाच्या ‘मनाची श्रीमंती’ वाढवितो. दु:ख पचवून आशावादी कसं जगावं, ते योग्य पद्धतीनं शिकवतो. विचारांचं सामर्थ्य आपल्याला ग्रंथच देऊ शकतात. मराठी सारस्वताचं ‘समृद्ध दालन’ आपल्याला सतत खुणावत राहतं. संतसाहित्यापासून ते आधुनिक साहित्यातले विविध प्रवाह आणि प्रकार यांच्या वाङ्‍मयानं संपन्न असलेला हा ‘अमृतानुभव’ आपण घ्यायला हवा. मातृभाषेबरोबरच अन्य भाषेतलं सकस आणि वैश्विक विचारधन वाचनातून आपल्यापर्यंत येत असतं. ते सारं काही जाणून घेण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती मात्र हवी असते.

‘गाव तेथे ग्रंथालय’, ‘ग्रंथ चळवळ घरोघरी’, ‘फिरती वाचनालये’, ‘ग्रंथ महोत्सव’, ‘वाचू आंनदे’ इथपासून ते ‘पुस्तकांचं गाव- भिलार’ असे अनेक उपक्रम ग्रंथ चळवळ रुजविण्यासाठी शासनस्तरावर राबवले जात आहेत. तरीही ‘वाचनाची ही चळवळ’ फक्त कागदोपत्रीच विकसित होते की काय, अशी शंका वाटत राहते. आजची शासकीय आणि सार्वजनिक ग्रंथालयं, शाळा महाविद्यालयांची ग्रंथालयं अजूनही अत्याधुनिक झालेली दिसत नाहीत. त्यांना शासनाकडून वेळेवर न मिळणारं अनुदान, रोडावलेली सभासद संख्या, कर्मचारी वर्गाची उदासीनता, त्यांचे अनेक वर्षांतले प्रलंबित प्रश्न अशा अडचणीत हा ग्रंथव्यवहार अडकलेला आहे. दुर्दैवानं शासकीय पातळीवर त्याचा गंभीर विचार आजही होताना दिसत नाही. ‘रिकामी वाचनालयं आणि उदास वाचकवर्ग’ असं चित्र सर्वत्र दिसतं आहे. वाचकाला वाचनासाठी प्रवृत्त करण्याची धडपड काही स्तुत्य अपवाद वगळता फारशी होताना दिसत नाही. ग्रंथ चळवळ हा एक सामाजिक जबाबदारीचा भाग आहे; पण त्याला आता उतरती कळा लागली आहे, असं खेदानं म्हणावं लागतं. याबाबत ग्रंथालयांचं आर्थिक सबलीकरण करणं, ग्रंथालयशास्त्रातल्या नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करणं, वाचनासाठी पोषक वातावरण निर्माण करणं महत्त्वाचं ठरेल. शासनस्तरावर प्रयत्न होतच आहेत. त्याला लोकसहभागाचं, तुमचं- माझं सर्वांचं सहकार्य मिळत नाही तोपर्यंत ‘वाचन प्रेरणा दिन’ हा केवळ एक दिवसापुरता फार्स ठरेल.

शेवटी ग्रंथ चळवळ जतन आणि वृद्धिंगत करण्यात अशी अनेक आव्हानं आणि अडचणी असल्या, तरी वैयक्तिक पातळीवर वाचनाची ही संस्कृती जतन करण्यासाठी आपण कटिबद्ध होऊ या. हा वाचनसंस्कार आपण स्वीकारू, पुढच्या पिढीत संक्रमित करू. ती केवळ आपली जबादारीच नाही, तर आजच्या युगाची ती खरी गरज आहे. ‘ज्योत से ज्योत जगाते चलो’ या भावनेतून मी माझ्यापासून सुरवात केली, तर ही ‘वाचनवेल’ पुन्हा एकदा नक्की बहरून येईल,असा विश्वास वाटतो. प्रत्येक वाचकाचा ग्रंथाशी घडणारा हा भावसंवाद आपणास समृद्ध करणारा ठरेल. वाचन ही गरजेचीच नाही, तर अपरिहार्य अशी गोष्ट आहे. वृत्तपत्र- नियतकालिकांच्या वाचनातून ‘वर्तमान’ जाणून घेत ‘अपडेट’ राहू या. विनोदी कला- साहित्यातून मनाचं रंजन करून घेऊ. चरित्र-आत्मचरित्रातून प्रेरणा-प्रोत्साहन घेऊ. विज्ञान तंत्रज्ञानाच्या वाचनातून ज्ञान मिळवू. काव्यात्म वाचनातून सौंदर्यदृष्टी शोधू. शोकनाट्यातून दु:ख पचवण्याची क्षमता आत्मसात करू. आधुनिक आणि समकालीन साहित्यातून आजचं जग अनुभवत नव्या दिशेचा शोध घेऊ. एकूणच मनातला अंधार दूर करून अंतरीचा दीप लावण्यासाठी ‘टेकवा टेकवा ग्रंथाशीच माथा’ असा भाव मनी बाळगून ही वाचन प्रेरणा समाजातला सर्व घटकांना  समृद्ध करेल आणि ‘बलसागर भारताचं’ आपलं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com