स्वतःवरचा विश्‍वास वाढेल... (प्रा. कुंडलिक कदम)

book review
book review

‘आत्मप्रेरणा’ हे एक वेगळ्या प्रकारचं पुस्तक लक्ष्मण जगताप यांनी लिहिलं आहे. लक्ष्मण जगताप शिक्षक आहेत. शिक्षक म्हणून काम करताना समाजातील वेगवेगळ्या घटकांचं त्यांनी बारकाईनं निरीक्षण केलंय. त्यांचं मन संवेदनशील असल्यानं त्यांच्या निरीक्षणाला चिंतनाची जोड आहे. समाजाबद्दल चिंतन करताना त्यांच्या असं लक्षात आलं, की प्रत्येक पालकास आपल्या मुलांकडून अपेक्षा असतात. आपल्या मुलानं चांगलं शिक्षण घ्यावं, त्याच्यावर योग्य संस्कार व्हावेत, समाजात त्यानं एक चांगला माणूस म्हणून जगावं, अशी भावना प्रत्येक पालकाची असते. बऱ्याच वेळा मुलांना पालक समजून घेत नाहीत. मुलांकडून अवाजवी अपेक्षा ठेवतात. बऱ्याच कुटुंबांत यावरून ताण-तणाव निर्माण होत असतात. खरंतर मुलांना समजून घेऊन, म्हणजे त्यांची आवड, बुद्धिमत्ता, कल, छंद यांसारखे पैलू विचारात घेऊन त्यांचं संगोपन करणं आवश्यक असतं.

पण मुलांचं संगोपन करत असताना ते कशा प्रकारे करावं, हे समाजातील प्रत्येक पालकाला जमतंच असं नाही. मुलांच्या संगोपनात अनेक अडचणी निर्माण होतात. मुलांच्या संगोपनात काही प्रसंग, घटना अशा निर्माण होतात, त्यावेळेस काय करावं हे कळत नाही.

या अडचणी, समस्या यांचं निराकरण कसं करावं, याच्याबद्दल योग्य वेळी योग्य मार्गदर्शन होणं गरजेचं असतं. पण हे कसं आणि कुठं मिळणार असा प्रश्न निर्माण होतो, त्यावर हमखास उत्तर ‘आत्मप्रेरणा’ हे पुस्तक आहे. या पुस्तकात पालकांना पडणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरं सहज उपलब्ध होणार आहेत. मुलांच्या संगोपनात आवश्यक असणारा सुसंवाद, मोकळेपणा, तुलना, प्रोत्साहन, प्रेरणा, स्वप्न, ध्येय, यश, अपयश, प्रेम, सहानुभूती, अहंकार, अतिलाड, राग, आनंद, समाधान, सुख-दुःख, ताण-तणाव अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टींविषयी मार्गदर्शन या पुस्तकाच्या माध्यमातून मिळणार आहे. अनेक भावनिक प्रसंगांत हे पुस्तक वाचून पालकांना योग्य निर्णय घेणं शक्य होणार आहे. या पुस्तकाच्या मदतीनं अनेक भावनिक गोष्टींचं समायोजन करणं सहज शक्य होणार आहे.

प्रत्येक मुलाच्या आतमध्ये एक ऊर्जा असते, ती ऊर्जा जागृत करणं आवश्यक असतं आणि ही ऊर्जा जागृत करण्यासाठी मुलांनीसुद्धा हे पुस्तक वाचलं पाहिजे. यात अनेक थोरामोठ्यांची उदाहरणं, त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग अनेक लेखानत वाचायला मिळतात.
ग्रेटा थनबर्ग ही एक शाळकरी मुलगी कसं आणि किती मोठं काम करू शकते, हे उत्तम उदाहरण या पुस्तकाच्या माध्यमातून मुलांसमोर येतं.

हे पुस्तक वाचल्यानंतर जीवनात सगळ्यात आवश्यक गोष्ट म्हणजे, आपला आत्मविश्वास वाढला जाणार आहे आणि जीवनात आत्मप्रेरणा निर्माण होणार आहे. या आत्मप्रेरणेमुळं माणूस असाध्य ते साध्य करू शकतो. आपल्या मुलांच्या चांगल्या संगोपनासाठी, त्याच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रत्येक मुलानं आणि पालकांनी हे पुस्तक वाचलंच पाहिजे. हे पुस्तक वाचून मुलं, पालक यांच्यात एक चांगली ऊर्जा निर्माण होणार आहे. या पुस्तकातून नकारात्मक विचारावर मात करून जीवनात सकारात्मक विचार कसा रुजवला जाऊ शकतो, याबद्दल उत्तम मार्गदर्शन मिळणार आहे. जगताप यांनी अगदी साध्या-सोप्या शैलीत अनेक उदाहरणं देत विषयांची मांडणी नेमकेपणानं केली आहे. त्यामुळं यातला आशय वाचकांपर्यंत अगदी सहजपणानं पोहचतो.

पुस्तकाचं नाव : आत्मप्रेरणा
लेखक : लक्ष्मण जगताप
प्रकाशक : परिस पब्लिकेशन, पुणे
(९०४९६५७९६५, ८२७५६९१४२७)
पृष्ठं : १५२, मूल्य : १६० रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com