अनाकलनीय मॉन्सून (डॉ. श्रीकांत कार्लेकर)

dr shrikant karlekar
dr shrikant karlekar

यंदाचा मॉन्सून अनेक अर्थांनी वेगळा आणि विचित्र ठरतो आहे. आगमनाच्या लांबलेल्या तारखा, परतीच्या लांबलेल्या तारखा, चुकलेलं अनुमान, अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य पावसाचं वाढलेलं प्रमाण, असमान वितरण असे बरेच धक्के त्यानं दिले आहेत. ‘असा पाऊस आधी कधी पाहिला नाही,’ अशी भावना अनेकांकडून व्यक्त होते आहे. हे नेमकं काय होत आहे, कशामुळं होत आहे, भारतातल्या मॉन्सूनचा पॅटर्नच बदलत चालला आहे का, त्याची बदललेली वैशिष्ट्यं कोणती आदी सर्व गोष्टींचा वेध.

या वर्षीचा मॉन्सून अनेक दृष्टींनी पूर्वीच्या मॉन्सूनपेक्षा वेगळा होता. खरं म्हणजे भारतातून एक सप्टेंबर आणि महाराष्ट्रातून एक ऑक्टोबरला सामान्यपणे परतीचा प्रवास सुरू करण्याची अपेक्षा असणारा हा मॉन्सून हा लेख लिहिण्याच्या तारखेपर्यंत म्हणजे दहा ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात रेंगाळतच होता. मॉन्सूनची यंत्रणा अजूनही आपल्याला नीटशी कळलेली नाही, या विचारधारेवर शिक्कामोर्तब करणारा या वर्षीचा मॉन्सून होता. हवामानशास्त्रज्ञांसमोर अजून मोठ्या संशोधनाचं आव्हानंच त्यानं उभं केलंय असं म्हणायला हरकत नसावी.

या वर्षीच्या मॉन्सूननं अनेक संस्थांनी केलेली, त्याच्या आगमनाची, निर्गमनाची, प्रमाणाची, तीव्रतेची आणि वितरणाची सगळी पूर्वानुमानं चुकवली. त्यानंच यापूर्वी नक्की केलेल्या अनेक कमाल आणि किमान नोंदींचा इतिहास बऱ्यापैकी मोडीत काढला. शेतकऱ्याला आशा- निराशेच्या झोक्यावर हिंदकळत ठेवलं, त्याची सगळी गणितं चुकवली आणि नियोजनाचे व विकासाचे दावे करणऱ्या सगळ्यांचेच त्याच्या पद्धतीनं वाभाडे काढले! त्याला गृहीत धरून राहू नये, नाहीतर पश्चात्ताप करावा लागेल असा स्वच्छ संदेशही दिला!

मॉन्सून ही एक विलक्षण शिस्तबद्ध, अवाढव्य आणि स्वयंचलित हवामान यंत्रणा आहे, या संकल्पनेला अजूनही फारसा धक्का लागला नसला तरी यंदाच्या मॉन्सूनमधल्या लहान-मोठ्या घटनांतून ही यंत्रणा थोडी विस्कळित होऊ लागली असल्याचे संकेत नक्कीच मिळाले आहेत. दर वर्षीच्या प्रत्येक मॉन्सूनमध्ये थोडंफार वेगळेपण गेल्या काही वर्षांपासूनच जाणवू लागलं असलं, तरी या वर्षी अनेक बाबतींत हे वेगळेपण ठसठशीतपणे समोर आलंय. निसर्गाकडे डोळसपणे बघणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तींच्याही ते लक्षात आलंय.

चार महिन्यांच्या मान्सूनच्या पहिल्या दोन महिन्यांत तुलनेनं कोरडी हवामान स्थिती असूनही हवामान खात्यानं केलेल्या पावसाच्या भाकितात असं म्हटलं होतं, की या वर्षी भारतात दीर्घकालीन (लॉंग टर्म) सरासरीच्या ९६ टक्के पाऊस पडेल आणि मॉन्सून सामान्य असेल! मात्र, त्यात दहा टक्क्यांनी वाढ होऊन ते ११० टक्के झालेलं आढळलं. तीस सप्टेंबरपर्यंतच या वर्षी एकूण ९६८.३ मिलिमीटर पाऊस झाला. भारतात सामान्यपणे ८८०.६ मिलिमीटर इतका पाऊस दरवर्षी पडतो. या वर्षी तीस सप्टेंबरपर्यंतच हे प्रमाण सामान्य प्रमाणापेक्षा दहा टक्क्यांनी जास्त होतं. गेल्या २५ वर्षांतला हा सर्वाधिक पाऊस आहे. यापूर्वी वर्ष १९९४ मध्ये ११२.५ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद आढळते. सन १९६१पासून २०१८पर्यंतची दीर्घकालीन पर्जन्य सरासरी (लॉंग पिरिअड ॲव्हरेज) ९१ मिलिमीटर आहे. या वर्षी ती ११० मिलिमीटर आहे. दीर्घकालीन सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस म्हणजे ‘सामान्य मॉन्सून’ असं हवामान खातं म्हणतं. ६ ऑक्टोबर २०१९ रोजी राजस्थानवर दीड किलोमीटर उंचीवर तयार झालेल्या प्रत्यावर्ती अभिसरणामुळं (अँटिसायक्लोनिक सर्क्युलेशन) तेरा ऑक्टोबरपासून मान्सून संपूर्ण भारतातून माघार घेईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला असला, तरी त्याचीही खात्री देता येत नाही.

जूनमधे सर्वत्र असलेल्या दुष्काळसदृश परिस्थितीनंतर यंदाच्या मॉन्सूनची ९ जूनला सुरवात झाली, मात्र त्याच्या परतीच्या प्रवासाची सुरवात गडगडाट आणि जोरदार वृष्टीनं झाली. या वर्षी पूर्व आणि ईशान्य भारतांत अनुक्रमे १३ आणि ३ टक्क्यांनी पाऊसमान कमी झालं. समुद्रकिनाऱ्याच्या पट्टयात २८ टक्के जास्त आणि दक्षिणेकडच्या इतर भागांत १६ टक्क्यांनी जास्त पाऊस नोंदवला गेला. आठ दिवस उशिरा सुरू झालेला २०१९ चा मॉन्सून महाराष्ट्रात २४ जूनला म्हणजे त्याच्या निर्धारित वेळेनंतर १४ दिवसांनी दाखल झाला. प्रारंभीच्या काळांत तो फारच दुर्बळ होता. ‘वायू’ नावाच्या, १० जून ते १७ जून या काळात अरबी समुद्रावर निर्माण झालेल्या अतितीव्र, आवर्ती, लघुभार प्रदेशाचा तो परिणाम होता. जुलैमध्येही मॉन्सूनमधे फारशी सुधारणा झाली नाही. याच काळात खरीप पिकांची पेरणी होते. त्यावर याचा परिणाम झालाच. उत्तम आणि सरासरी पाऊस व्हायला बंगालच्या उपसागरावरून येणारी मॉन्सून शाखा प्रबळ असणं आवश्यक असतं. मॉन्सूनचं उशिरा किंवा लवकर आगमन होण्याची कारणं दरवर्षी वेगवेगळी असतात. खरं म्हणजे एका दशकातल्या निरीक्षणांवरून पावसाचे आकृतिबंध (पॅटर्न) कळत नाहीत. शंभर वर्षांची आकडेवारी पाहिली, तर मॉन्सून विलंबानं येत असल्याच्या घटनांत वाढ झालेली दिसून येते. भारतातल्या पर्जन्यवृत्तीत गेल्या काही वर्षांपासूनच बदल जाणवू लागल्याचं हवामान शास्त्रज्ञांचं निरीक्षण सांगतं. काही ठिकाणी जूनमधे पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणात थोडी वाढ झाली आहे, तर काही ठिकाणी घट झाली आहे. जुलैमध्ये पावसात बहुतांश ठिकाणी घट झालेलीही दिसते आहे.

सप्टेंबरमध्ये प्रबळ
ऑगस्टनंतर मॉन्सून प्रबळ होऊ लागला असला, तरी ६ ते ९ ऑगस्ट या काळात निर्माण झालेल्या तीव्र लघुभारानं त्यात थोडे अडथळे आणलेच. सप्टेंबरमध्ये या वर्षी इतका पाऊस झाला, की गेल्या शंभर वर्षांत सप्टेंबरमधे इतका पल्ला कधीच गाठलेला नाही. सन १९१७ च्या सप्टेंबर मध्ये २८५ मिमी पावसाची नोंद झाली होती. असं असलं तरी त्याचं या काळातलं २०१९ मधलं वितरण अतिशय विषम होतं. या महिन्यातही २२ ते २५ सप्टेंबर आणि २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या दिवसांत अनुक्रमे अतितीव्र आणि तीव्र आवर्ती वादळांनी त्याच्या संचलनात वारंवार अडथळे निर्माण केलेच होते.
मॉन्सूनच्या मार्गक्रमणांत अशी लघुभार आवर्ती वादळं गेल्या काही वर्षांपासून अडथळे आणत असल्याचं निरीक्षण आहेच. या वर्षी ‘ढगफुटी’सदृश पर्जन्यवृष्टीही अनुभवाला आली. हवामान विभागाच्या व्याख्येनुसार ती ढगफुटी नसली, तरी परिणाम ढगफुटीसारखाच होता. आवर्ती वादळापेक्षा हा प्रकार खूपच वेगळा असतो. हे असं आरोही वादळ असतं, की ज्यात प्रचंड शक्तीनं ऊर्ध्व दिशेत कमीत कमी वेळात जास्तीत जास्त उंची गाठणाऱ्या हवेचा मुख्य सहभाग असतो. ढगफुटी हा अतितीव्र आणि जोरदार पर्जन्यवृष्टीचा आविष्कार आहे. साधारणपणे हा पर्जन्याविष्कार स्थानिक स्वरूपाचा असतो. काही विवक्षित प्रदेशात निर्माण होणाऱ्या वायुराशीच्या आरोही अस्थिरतेमुळं अशी पर्जन्यवृष्टी होते. कमी वेळात ढगफुटीसदृश पाऊस हा जणू या वर्षीच्या मॉन्सूनमधला आकृतिबंधच (पॅटर्न) झालेला दिसून येतो. २५ सप्टेंबरला पुण्याच्या कात्रज परिसरात दोन तासांत झालेला १०६ मिलिमीटर पाऊस, ८ ऑक्टोबर रोजी ठाणे- डोंबिवली परिसरात २१ मिनिटांत १०० मिलिमीटर झालेला पाऊस आणि ९ तारखेला संध्याकाळी पुण्यात पुन्हा एकदा झालेली जोरदार पर्जन्यवृष्टी ही त्याची काही ठळक उदाहरणं. ९ तारखेला पुणे शहरावर १२ किलोमीटर उंचीचा क्युम्युलोनिंबस ढग तयार झाल्यामुळे एका तासात २१ मिलिमीटर इतकी मुसळधार वृष्टी झाल्याचं भारतीय हवामान खात्यातर्फे सांगण्यात आलं.

दैनंदिन पावसातली तफावत
वर्ष २०१९ च्या मॉन्सूनचं वैशिष्ट्य म्हणजे दैनंदिन पावसात दिसून आलेली अस्थिरता आणि तफावत (व्हेरियाबिलिटी). या वर्षीच्या मॉन्सूनचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यानं परतीचा प्रवास सुरू करायला लावलेला उशीर. मान्सूनचा परतीचा प्रवास हा कधीही १ सप्टेंबरच्या आधी सुरू होत नाही आणि याची सुरवात नेहमीच राजस्थानच्या पश्चिम टोकापासून होते. सर्वसामान्य तारखेपेक्षा तब्बल ३८ दिवसांनी म्हणजे ९ ऑक्टोबरला मॉन्सूनचा यंदाचा परतीचा प्रवास पश्चिम राजस्थानपासून सुरू झाला असल्याचं भारतीय हवामान खात्यातर्फे जाहीर करण्यात आलं आहे. हा एक उच्चांकच आहे. संपूर्ण भारतातून बाहेर पडायला त्याला अजून दोन-तीन दिवस लागतीलच. गेल्या ५८ वर्षांत पाऊस परतीचा व्हायला इतका उशीर कधीच झाला नव्हता. वर्ष १९६१ मध्ये तो जास्तीत जास्त उशिरा म्हणजे १ ऑक्टोबरला माघारी वळला होता. मागच्या वर्षी २९ सप्टेंबर २०१८नंतर मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला होता. गेल्या काही वर्षांतल्या मॉन्सूनच्या परतीच्या तारखा बघितल्या, तर असं लक्षात येतं, की निर्धारित वेळेपुढे ८ ते २८ दिवस परतीला विलंब लागणं ही मॉन्सूनची वृत्ती गेल्या दशकभरात वाढलीच आहे. मात्र, या वर्षी हा विलंब थोडा जास्तच आहे.
मॉन्सून परतीचा होऊ लागला, की मग विजांचा गडगडाट, विजेचे लोळ आणि संध्याकाळी मुसळधार पाऊस या घटना हमखास दिसून येतात. अजूनही आपण त्या अनुभवतो आहोत. परतीच्या मॉन्सूनची गेल्या काही वर्षीची तऱ्हा मात्र वेगळीच असल्याचंही लक्षात येतंय. या वर्षी कधी सकाळपासून, कधी दुपारी नाहीतर संध्याकाळी आणि रात्री-बेरात्री परतीचा हा मॉन्सून नुसता ओतत होता. त्यानं शेतातली उभी पिकं भुईसपाट केली आणि जमिनींची भरपूर झीजही केली. या वर्षी भारतात आणि महाराष्ट्रातही अनेक ठिकाणं परतीच्या मॉन्सूनच्या तडाख्यात सापडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती; पण हा तडाखा थोडा जास्तच होता! या पावसामुळं काही फायदेही नक्कीच होतील. मृदेची आर्द्रता वाढेल आणि भूजलातही या पावसामुळे नक्की वाढ होईल.

मॉन्सून आता परत जाऊ लागला असल्यामुळं जाता जाता तरी त्यामुळं वर्षभरात जिथं पावसाची कमतरता होती, तिथं ती थोडीफार भरून निघेल का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आणि ते साहजिकच आहे. भारतातल्या शेतीसाठी चार महिन्यांचा मॉन्सून पर्जन्यकाल हा अतिशय महत्त्वाचा असतो. उन्हाळी आणि हिवाळी पीकपेरणीच्या आणि पाण्याच्या वर्षभराच्या उपलब्धतेच्या दृष्टीनं त्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहेच. या वर्षी सरासरीपेक्षा पाऊस दहा टक्क्यांनी जास्त झाला असला, तरी त्याचं प्रादेशिक वितरण मात्र तितकंसं समाधानकारक नाही असं दिसतं आहे.

महाराष्ट्राच्या मराठवाड्यात अर्थातच चित्र नेहमीच खूप वेगळं असतं. इथली बहुतांश शेती मॉन्सूनच्या पावसावरच अवलंबून आहे आणि दुर्बळ आणि विलंबित मॉन्सून व कमी पाऊस याचा मोठा फटका विदर्भ आणि मराठवाड्याला नेहमीच बसत आलेला आहे. स्कायमेट या संस्थेच्या निरीक्षणानुसार, मॉन्सूनमध्ये बंगालच्या उपसागरावर तयार होणारी तापमान- वारे- वायुभार यंत्रणा भारताच्या मध्यवर्ती भागाकडे सरकते आणि विदर्भापर्यंत तिचा परिणाम जाणवतो. विदर्भ आणि मध्य प्रदेशाच्या भौगोलिक समीपतेमुळं (प्रॉक्सिमिटी) विदर्भात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडतो. मात्र, अरबी समुद्रावरून येणारी मॉन्सूनची शाखा मराठवाड्याला येईपर्यंत खूपच दुर्बल होऊन जाते. मॉन्सून ट्रफ किंवा पश्चिमी अडथळे (डिस्टर्बन्सेस) या यंत्रणाही इथपर्यंत पोचू शकत नाहीत. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या मध्ये स्थान असलेला मराठवाडा या सर्व कारणांमुळं पुरेशा पावसापासून नेहमीच वंचित राहतो. अत्यल्प पाऊस, मॉन्सूनच्या चार महिन्यांत एका महिन्याभरापेक्षा जास्त मोठा खंड यामुळं याही वर्षी मराठवाड्यावर दुष्काळाचं सावट होतंच. खरं म्हणजे मराठवाड्याची संपूर्ण भिस्त अनेक वेळा परतीच्या पावसावर असते. परतीच्या मोसमातला या वर्षीचा पाऊस अजूनही म्हणावा तितका समाधानकारक नाही!

अतिवृष्टीच्या प्रमाणात वाढ
या वर्षीच्या पावसानं अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण केली. मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली. मुंबई, सांगली, कोल्हापूर, नाशिक इथं अभूतपूर्व पूरपरिस्थिती निर्माण झाली. महाप्रलयाच्या या भयावह विळख्याला या वर्षीच्या मॉन्सूनमधली अतिवृष्टी कारणीभूत असली, तरी माणसानं निसर्गनियमात केलेल्या अनिर्बंध हस्तक्षेपाचा यांत मोठा वाटा आहे, या सत्याकडं मात्र हेतुपुरस्सर डोळेझाक केली गेली. अनेक हवामानतज्ज्ञांच्या मतानुसार, अतिवृष्टीची ही सगळी घटना हवामानबदलाशी संबंधित अशा टोकाच्या (एक्सट्रीम) हवामान घटकाशी निगडित आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार गेली काही वर्षं भारतभर जाणवत असलेल्या पर्जन्यवृत्तीतल्या बदलाचा यावर्षीची अतिवृष्टी हा एक परिणाम आहे. सन १९५० ते २०१८ या कालखंडातल्या हवामानबदलाचा अभ्यास असं सुचवतो, की अतिवृष्टीच्या प्रमाणात या कालखंडात अनेक ठिकाणी खूप वाढ झाली आहे. साधारणपणे रोज १०० ते १५० मिलिमीटर इतका पाऊस नोंदवला जाण्याची वृत्तीही प्रकर्षानं लक्षात येते आहे. काही तज्ज्ञांच्या मते, या घटनेचा हवामानबदलाशी काहीही संबंध नाही. पश्चिमी अडथळे (वेस्टर्न डिस्टर्बन्स) आणि मान्सूनप्रणाली यातली आंतरप्रक्रिया आणि भारतीय मान्सूनच्या नैऋत्य मोसमी वारे आणि बंगालच्या उपसागरावरील वाऱ्याची शाखा या दोन्ही शाखा कार्यशील झाल्यामुळं; तसंच समुद्रावर मोठा लघुभार प्रदेश तयार झाल्यामुळं इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला.

मात्र, या पावसामुळं अनेक धरणं पाण्यानं पूर्णपणे भरली. धरण प्रदेशांत गेल्या वर्षींपेक्षा पाण्याचा साठा खूपच जास्त आहे, असं निरीक्षण नोंदवण्यात आलंय. केंद्रीय जल आयोगाच्या (सेंट्रल वॉटर कमिशन) माहितीनुसार, भारतातल्या १७० धरणांत आज १५१ अब्ज घनमीटर पाणी असून ते एकूण क्षमतेच्या ८६ टक्के इतकं आहे.
मॉन्सून ही अवाढव्य यंत्रणा कितीही शिस्तबद्ध असली, तरीही त्यात अनिश्चिततेचं प्रमाणही तितकंच मोठं आहे. सध्याच्या काळात ही यंत्रणा अनेक कारणांनी बाधित होऊ लागल्याचे संकेत याआधीच मिळू लागले आहेत. उष्ण कटिबंध प्रदेशातील जमीन आणि पाण्याच्या तापमानात मानवी हस्तक्षेपामुळं सतत होणारे बदल यामुळं ही यंत्रणा प्रामुख्यानं बाधित होऊ लागली आहे. सामान्यपणे जमीन समुद्रापेक्षा जास्त वेगानं तापते. त्यामुळं जमीन आणि पाण्याच्या तापमानात जो फरक पडतो, तो मान्सून वाऱ्यांच्या निर्मितीला पोषक ठरतो. मात्र, वर्ष १९५० नंतर समुद्रजल पूर्वीपेक्षा जास्त उष्ण होत गेलं. ही प्रक्रिया एकविसाव्या शतकाच्या सुरवातीपर्यंत म्हणजे वर्ष २००२ पर्यंत प्रकर्षानं दिसून आली. याचं मुख्य कारण हे जमीन आणि समुद्र या दोन्ही पर्यावरण संरचनात होत असलेला मानवी हस्तक्षेप हेच असल्याचंही लक्षात आलं.
याच काळात भारतीय मॉन्सूनमध्ये पर्जन्यमानात दहा टक्क्यांनी घट झाली. जागतिक तापमानवाढीमुळं जमीन समुद्राच्या तुलनेत जास्त तापू लागल्यामुळं त्यानंतर पुन्हा एकदा तापमानातला हा फरक थोडा वाढू लागला. यामुळं पाऊसमान वाढेल किंवा मान्सून पूर्वपदावर येईल आणि वर्ष २०१८ चा भारतीय मान्सून ‘सामान्य मान्सून’ असेल, असं भाकीत गेल्या वर्षी करण्यात आलं होतं. मात्र, भारताच्या बहुतांश राज्यांत गेल्या वर्षी मॉन्सूनचा पाऊस बरसलाच नाही! देशात सर्वसाधारणपणे ८८७ मिलिमीटर इतक्या सरासरीनं पर्जन्यवृष्टी होते. गेल्या वर्षी ही वृष्टी ८०४ मिलिमीटर म्हणजे ९ टक्क्यांनी कमी झाली होती. या वर्षी ती दहा टक्क्यांनी वाढ होऊन ती ११० मिलिमीटर झाली.

जमीन आणि समुद्राच्या पाण्याच्या तापमानातला फरक मान्सूनमधलं पाऊसमान वाढेल की कमी होईल हे ठरवत असतो. असं असलं, तरी जागतिक तापमानवृद्धी, उत्तर आणि दक्षिण ध्रुव प्रदेशातील बर्फाचं वितळणं, हिमनगांचं उत्तरेकडून व दक्षिणेकडून ३० अंश उत्तर आणि दक्षिण अक्षवृत्तांच्या दिशेनं होत असलेले स्थानबदल आणि त्यामुळे जागतिक हवामानात होत असलेले बदल या आणि अशा अनेक गोष्टींचा मान्सूनवर निश्चितच परिणाम होऊ लागला आहे, यावर अनेक शास्त्रज्ञांत एकमत दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर मान्सूनचं आगमन, त्याची तीव्रता याबद्दलचे अंदाज अचूक राहण्याची शक्यताही थोडी कमी होते आहे, असं म्हणता येईल.

अनिश्चितता आणि विस्कळितपणा
भारतीय मॉन्सूनच्या काही निश्चित वृत्ती (टेंडन्सीज) असल्या, तरी अनिश्चितता आणि विस्कळितपणा हा अलीकडच्या वर्षांत मान्सूनचा स्थायीभावच बनतो आहे. दर वर्षी झपाट्यानं बदलत चाललेले मॉन्सूनचे आकृतिबंध (पॅटर्न) हा भारतासमोरचा सध्याचा मोठा काळजीचा विषय आहे. देशातली शेती, अन्न उत्पादन, पृष्ठजल आणि भूजल उपलब्धता या गोष्टी त्यामुळं नेहमीच संवेदनशील बनलेल्या आहेत. भारताच्या मोठ्या भागांत जाणवणारी पाण्याची समस्या ही नित्याचीच बाब झाली आहे. या सगळ्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत असतो. त्यामुळं मॉन्सूनचा नेमका अंदाज आणि भाकीत करणं ही आज फार मोठी गरजही आहे. भारतातल्या शास्त्रज्ञांकडून मर्यादित काळाकरता म्हणजे दोन किंवा तीन दिवसांकरता केलेलं भाकीत खूपच विश्वासार्ह असतं. मात्र, आठवडा किंवा पंधरवड्याकरता केलेलं भाकीत तितकंसं अचूक नसतं, असं जे. श्रीनिवासन या प्रथितयश वैज्ञानिकाचं म्हणणं आहे. महासागर, वातावरण आणि ढग यांतले सहसंबंध नीटसे न समजणं यामुळं मॉन्सूनचं दीर्घकालीन भाकीत करण्यात अडचणी येतात असंही ते म्हणतात.

दरवर्षी कमी-जास्त होणारं पाऊसमान, मॉन्सूनच्या आगमनाच्या आणि परतीच्या बदलत्या वेळा, पावसाच्या वारंवारितेत आणि वितरणात होणारे बदल या सर्व गोष्टींत जागतिक हवामानबदलाचाही मोठा हात आहे, यावर अनेक हवामान शास्त्रज्ञांत एकमत दिसून येतं. भारतात दरवर्षी सरासरी ८५० मिलिमीटर पाऊस देणारी मॉन्सून ही यंत्रणा विलक्षण स्थिर आणि सातत्यपूर्ण आहे. मात्र, तरीही दरवर्षी या यंत्रणेच्या विविध घटकांत दिसून येऊ लागलेला दहा टक्के इतका अल्प बदलही देशाच्या शेत व्यवसायावर आणि अर्थव्यवस्थेवर मोठाच परिणाम घडवू लागला आहे हे नक्की. मॉन्सून परतीचा होईपर्यंतच्या आणि त्याचं पूर्णपणे निर्गमन होण्यापर्यंतच्या विविध टप्प्यांतलं पाऊसमान, पर्जन्य दिवस, मृदा आर्द्रता प्रमाण, पृष्ठजल आणि भूजल निर्देशांक या सर्वच गोष्टी गेल्या काही वर्षांपासून विस्कटल्यासारख्या झाल्या आहेत. यामागची नेमकी कारणं शोधणं आणि इथल्या शेतकऱ्याला दिलासा देणं हे मोठं आव्हान भविष्यात आपल्याला पेलता आलंच पाहिजे, याविषयी दुमत असण्याचं कारण दिसत नाही!

भविष्यात, विशेषतः अशा बदलत असलेल्या मॉन्सूनमध्ये येऊ शकणाऱ्या नैसर्गिक आपत्तींच्या निवारणासंबंधीची कोणतीही योजना आपल्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडं अजूनही तयार नसल्याची धक्कादायक बातमी नुकतीच वाचनात आली. वास्तविक मॉन्सूनच्या चार महिन्यांतल्या नैसर्गिक परिस्थितीचा आधीच अंदाज घेवून, पूर्वानुभव आणि उपलब्ध आकडेवारी पाहून आपत्ती व्यवस्थापन आणि निवारण योजना पुरेशा आधी तयार करून ठेवण्याची नितांत गरज असते. अनेक देशांमध्ये काटेकोरपणे ही प्रथा पाळली जाते. भारतासारख्या मॉन्सून हवामानाच्या प्रदेशात तर अशा योजनांची नक्कीच निकड आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या नेमक्या योजना तयार नसतील, तर होणाऱ्या जीवित- वित्तहानीचं प्रमाण, आपल्या बेजबाबदारपणामुळं खूप मोठं असू शकतं. निसर्गाला त्यासाठी जबाबदार धरणं हे अगदीच चुकीचं आहे.

मॉन्सून ‘सामान्य’ असेल, असं भाकीत करण्यात आलं असलं, तरीही अशी असामान्य, ढगफुटीसदृश पर्जन्यवृष्टी होऊन, एकाएकी पूर येणं, जमिनी आणि दरडी कोसळणं अशा समस्या नक्कीच निर्माण होऊ शकतात याची जाणीव ठेवणं आणि त्यानुसार तयार राहणं आता अगदी अनिवार्य झालं आहे हे नक्की.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com