"मुलांना कर्तृत्ववान बनवा' (पुष्कर श्रोत्री)

पुष्कर श्रोत्री
रविवार, 5 एप्रिल 2020

मी व्यग्र असलो, तरी शनायाची दैनंदिन माहिती मी नियमितपणे तिला विचारत असतो. तुला काही अडचण आहे का? कशाचा स्ट्रेस आहे का? वगैरे. कारण आजच्या पिढीला आपल्यापेक्षा जास्त पातळ्यांवर ताणतणावांना सामोरं जावं लागत असतं.

मी व्यग्र असलो, तरी शनायाची दैनंदिन माहिती मी नियमितपणे तिला विचारत असतो. तुला काही अडचण आहे का? कशाचा स्ट्रेस आहे का? वगैरे. कारण आजच्या पिढीला आपल्यापेक्षा जास्त पातळ्यांवर ताणतणावांना सामोरं जावं लागत असतं. ताण कमी कसा करता येईल, वेळेचं नियोजन कसं करता येईल याबद्दल तिला मार्गदर्शन करतो. मी घरी असलो, तर तिचा ब्रेकफास्ट, डबा, जेवण बनवण्यापासून सर्व काही करतो. हे सर्व करण्यात खूप आनंद आहे. आमच्यात खूप मोकळं नातं आहे- कारण आमच्यात मोकळा संवाद आहे.

माझ्या पालकांकडून मी शिस्त पाळणं शिकलो. माझे आई-वडील दोघंही नोकरी करायचे. घरी आजी असायची. त्यामुळे शाळा, शाळेनंतर ग्राउंड आणि त्यानंतर उरलेला वेळ मी घरातच असायचो. आमच्या घरी सतत पाहुणे येत असायचे. त्यांचं आदरातिथ्य करणं- म्हणजे "या' असं म्हणण्यापासून त्यांना पाणी देणं, हवं नको ते बघणं, अगदी घरी आलेल्या पोस्टमनलासुद्धा पाणी हवंय का विचारणं- अशा सगळ्या गोष्टी मी लहानपणापासून घरात बघत आलोय. घरात कामाला येणाऱ्या मावशी म्हणजे आमच्या कुटुंबातल्या सदस्यच होत्या. त्या पस्तीस वर्षं आमच्याकडे कामाला होत्या. थोडक्‍यात माझे आई-वडील हे खूप जास्त माणसं जोडणारे होते. त्यांच्या मोठा मित्रपरिवार होता; तसंच सर्व नातेवाईकांशीही त्यांचे अतिशय प्रेमाचे संबंध होते. अशा सगळ्या गोष्टी त्यांनी त्यांची नोकरी; तसंच आमचं शिक्षण हे सांभाळून केल्या. सर्वांना सांभाळून राहणं, नाती जपणं, माणसं जोडणं ही आई-वडिलांकडून आलेली माझी सगळ्यांत मोठी शिदोरी आहे.

माझी आजी आजारी असायची. त्यामुळे आई पहाटे उठून, आजीचं करून, सगळ्यांचे डबे, जेवण बनवून ऑफिसला निघायची. विलेपार्लेवरून चर्चगेटला ट्रेननं जायची आणि तिथून पुढं पंधरा-वीस मिनिटं चालत जायची. संध्याकाळी परत घरी येऊन स्वयंपाकाबरोबर आमचे वेगवेगळे चोचले पुरवायची. कधी मासे, कधी आणखी वेगवेगळे प्रकार बनवायची. आमच्या घरातले निर्णय घेणारी व्यक्ती आजी असल्यामुळे सर्व नातेवाईक सल्ला घ्यायला, कधी पत्रिका द्यायला, तर कधी तिला बघायला घरी यायचे. सणासुदीला तर हमखास पाहुणे असायचेच. या सगळ्यांचं करत असताना आई कायम हसतमुख असायची. आईला नंतर कॅन्सर डिटेक्‍ट झाला होता; पण तरीसुद्धा ती स्वतःच्या वेदना बाजूला सारून सर्व येणाऱ्यांचं यथोचित स्वागत करत होती. स्वतःचा आजार बाजूला सारून साऱ्यांचं प्रेमानं करायला खूप धाडस लागतं. येणाऱ्या प्रत्येकाचं तर तिनं केलंच; पण आमच्याकडूनही त्या गोष्टी करून घेतल्या. आमच्याकडे आजीच्या बहिणीसुद्धा नेहमी यायच्या. एकदा मी घरी आलो, तेव्हा घरात सहा आज्या होत्या. अशा प्रकारे येणाऱ्यांचं करण्यापासून आमचा अभ्यास घेण्यापर्यंत सर्व गोष्टी आई अतिशय काळजीपूर्वक करायची. यावरून तुम्ही समजू शकता, की ती किती कर्तव्यदक्ष होती. बायको, सून, आई अशा सगळ्याच पातळ्यांवर ती श्रेष्ठ होती. एका अर्थानं तिनं सगळं घर धरून ठेवलं होतं. याच सगळ्या गोष्टी माझ्या पत्नीनं बघितल्या होत्या आणि आता तीसुद्धा या सर्व गोष्टी तितक्‍याच तत्परतेनं करते. फक्त तीच नाही, तर माझे दोन्ही भाऊ आणि त्यांच्या पत्नीसुद्धा हाच वसा पुढे चालवत आहेत. त्यामुळे आमच्या घराचे दरवाजे चोवीस तास उघडेच असतात. मुंबईत नव्यानं काम करण्यासाठी येणाऱ्या नवोदित कलाकारांपासून ते जुन्या मित्रांपर्यंत सारे जण मी नसतानासुद्धा घरी येऊन राहतात आणि माझी मुलगी शनायासुद्धा त्यांना काय हवं नको ते बघते. हे सगळं आईकडूनच आलं आहे आणि आता या दोघी ते आचरणात आणत आहेत.

काळानुरूप माझ्या पालकत्वामध्ये काही फरक नक्कीच आहे; पण बऱ्याचशा गोष्टी सारख्याच आहेत. उदाहरणार्थ, घराला एक शिस्त असली पाहिजे, एक सिस्टिम असली पाहिजे, हा विचार माझ्या लहानपणी मी अनुभवत होतो आणि आता मीदेखील घरात तोच विचार राबवतो. शनाया आता एकोणीस वर्षाची आहे. तिच्या वाढदिवशी अर्धा दिवस ती आमच्याबरोबर असते आणि अर्धा दिवस मित्रमैत्रिणींबरोबर असते. मला वाटतं, की तिनं पूर्ण दिवस आमच्याबरोबरच राहावं; पण मग मी विचार करतो, की विद्यार्थीदशेत मीदेखील असंच करत होतो. मग आता शनायानं केलं, तर कुठं बिघडलं? थोडक्‍यात पालक म्हणून काळ बदलला असला, तरी भावना तशाच आहेत. घराला शिस्त तेव्हाही होती आणि आताही आहे. पूर्वी टीव्ही नव्हता आणि असला तरी तो मर्यादित काळच बघायचा असा नियमच होता. त्यातही, तुम्हाला नेमका कोणता कार्यक्रम बघायचा हे ठरवून तेवढाच बघायचा असा आईचा दंडक होता. त्यामुळे आम्ही कार्यक्रमाआधी आमचा गृहपाठ करून मगच टीव्हीसमोर बसायचो. आतासारखे तेव्हा चोवीस तास टीव्ही सुरू नसायचे. आता टीव्हीसोबत मोबाईलदेखील आले आहेत; पण त्यातही काही नियम आम्ही घरात ठरवले आहेत. जेवताना मोबाईल घ्यायचा नाही; तसंच घरात सर्वजण बोलत असतील, तर त्यावेळी मोबाईल हातात घ्यायचा नाही. त्यामुळे शिस्त तेव्हाही होती आणि आताही आहे.

शनायाला मी खूप उशिरा मोबाईल दिला. सुरुवातीला साधा जुना मोबाईल आणि बारावीनंतर स्मार्ट फोन घेऊन दिला. मोबाईलचा वापर सतत करू नये, असं मी तिला सांगितलं आहे. याचं सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे त्यातून निघणारे रेडिएशन हे अत्यंत घातक असतात. त्यामुळे मोबाईल सतत वापरणं, छातीशी, डोक्‍याशी ठेवणं या शास्त्रीय दृष्टीनं अयोग्य असणाऱ्या गोष्टी आम्ही सर्वच जण टाळतो. त्याचा अतिवापर आम्ही सारेच टाळतो. शेवटी मोबाइल आपल्यासाठी आहे, की आपण मोबाईलसाठी हा विचार आपण प्रत्येकानं केला पाहिजे. मोबाईल वाजला, की हातातलं काम टाकून धावण्याचं कारण काय? पूर्वी मोबाईल नव्हते, तर माणसं एकमेकांशी बोलत नव्हती का? मोबाईल गरजेचा नक्कीच आहे; पण आपल्या आयुष्यावर त्यानं आरुढ होता कामा नये. हे मी शनायालाही सांगितलं आहे. त्यामुळे ती या गोष्टी पाळते. झोपताना मोबाईल एअरप्लेन मोडवर टाकून झोपते.

आधी आम्ही सर्वजण म्हणजे मी आणि माझे दोन्ही भाऊ एकत्र राहायचो. मोठ्या भावाचा मुलगा साहिल आणि धाकट्या भावाची मुलगी श्वेता हे दोघंही माझ्या अंगावर खेळलेले. साहिल लहान होता, तेव्हा माझ्याकडे बेबीसीटिंगचं काम असायचं. मी कॉलेजला जाताना साहिलला सोबत घेऊन जायचो. माझे मित्र-मैत्रिणी त्याला खेळवायचे. खरं तर कॉलेजात असं चालायचं नाही; पण मला तेव्हा कोणी काही बोलायचं नाही. धाकट्या भावाची मुलगी श्वेता शनायापेक्षा मोठी आहे. त्यामुळे मी बाहेरून आलो, तर सगळ्यात आधी हातपाय धुवून मी तिच्याशी खेळलं पाहिजे, तिला घेतलं पाहिजे आणि मग मी शनायाला घ्यायचं, असा तिचा हट्ट असायचा. मी तिला आधी घेतलं नाही, तर ती अकांडतांडव करायची. आजूनही आमची एकमेकांशी तशीच ऍटॅचमेंट आहे. मुळात मी लहान मुलांमध्ये खूप रमतो. मला लहान मुलं खूप आवडतात. त्यामुळे इतर नातेवाईकांची लहान मुलंही वेळप्रसंगी माझ्याच ताब्यात असायची. याच आवडीमुळे माझा पहिला चित्रपट "उबंटू' हा लहान मुलांच्या कथेवरच आधारित होता.
आम्हा भावंडांतच नाही, तर आमच्या पुढच्या पिढीतली मुलंही एकमेकांना घट्ट धरून आहेत. कारण आमच्या घरातलं वातावरणच तसं आहे. लहान मुलांना मुलांसारखंच वाढू द्यावं. त्यांनी मस्ती नाही करायची तर कोणी करायची? शनायानं लहानपणी भरपूर मस्ती, दंगा केलाय. धडपडली आहे. हट्ट केला आहे. त्यासाठी मी तिला रागावलो आहे. जंक फूड, फास्ट फूड यापासून शनायानं लांब राहावं, असं मला आधीपासूनच वाटत होतं. माझा भाऊ एका जगप्रसिद्ध जंकफूड ब्रॅंचचा मॅनेजर असला, तरी ते अन्न शनायानं खाऊ नये, असं मला वाटायचं. त्यामुळे त्यातल्या त्यात तशा अधिक चांगल्या आणि हेल्दी फूडचा पर्याय मी शोधायचो. त्यामुळे तिचंही समाधान व्हायचं आणि मलाही समाधान वाटायचं. शनायाला तसं फार रागवावं लागायचं नाही. मी केवळ थोडं मोठ्यानं "शनाया...!' असं म्हटलं, तर ती लगेच ओठ काढायची, तिचे डोळे डबडबायचे. अर्थात मस्ती मात्र भरपूर करायची.

मला वाचनाची अतिशय आवड होती, त्यामुळे शनायानंही भरपूर वाचावं असं मला वाटायचं; पण तिला वाचनाची नाही, तर गाण्याची जास्त आवड आहे. ती दिवसभर गाणी ऐकते. अर्थात म्हणून मी तिच्यावर कधी वाचनाची जबरदस्ती केली नाही. तिनं तिची आवड जपावी आणि त्याचा आनंद घ्यावा असंच मला वाटतं.

मुलांना काही मूलभूत गोष्टी पालकांनी शिकवायलाच हव्यात. उदाहरणार्थ, आपण कुठल्या देशात राहतो, आपण कुठल्या घरात जन्माला आलो आहोत, आपल्याकडच्या प्रथा परंपरा काय आहेत, आपल्या देशाचा इतिहास काय आहे, भविष्यात उत्तम नागरिक बनायचं आहे तर त्यासाठी प्रयत्न करणं या गोष्टी मुलांना शिकवल्या गेल्याच पाहिजेत. ज्या ज्या वेळी समाजात मुलींवर, स्त्रियांवर अत्याचाराच्या घटना वाचनात येतात, त्या प्रत्येक वेळी माझ्या मनात हा विचार येतो, की अत्याचार करणाऱ्या मुलांवर त्यांच्या पालकांनी संस्कार केले असतील का? जर त्यांच्यावर उत्तम संस्कार केले गेले असते, तर त्यांनी असं कृत्य केलंच नसतं. नागरिक म्हणून पालकांनी मुलांवर चांगले संस्कार करायलाच पाहिजेत. त्यासाठी नागरिकशास्त्र अत्यंत महत्त्वाचं आहे. दुसरी आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण मुलांना इंग्रजी भाषा शिकण्यासाठी इंग्रजी शाळेत घालतो. मुलं तिथं ती शिकतात. त्यामुळे पालकांनी घरात मुलांशी मराठी अर्थात आपली मातृभाषाच बोलली पाहिजे. मुलांना मराठी आलीच पाहिजे. आम्हीसुद्धा शनायाला इंग्रजी माध्यमात घातलं; पण घरात मात्र तिच्याशी मराठीच बोलत होतो. त्यामुळे ती मराठी उत्तम बोलते आणि इंग्रजीदेखील उत्तम बोलते. शनायाला "ऱ्हस्व, दीर्घ'ला "पहिली, दुसरी' असं म्हणणं अजिबात आवडत नाही. इतकी ती भाषेच्या बाबतीत काटेकोर आहे.

आपण पालक असलो, तरी काही वेळा आपल्याकडून चुका होतात आणि मुलं त्या चुका दुरुस्त करतात. थोडक्‍यात ती आपल्याला शिकवतात. माझ्या तोंडातून अनवधानानं काही वेळा शिव्या निघून जायच्या. त्यावेळी शनाया पटकन म्हणायची ः ""बाबा, शिव्या देणं चांगलं नसतं, नको देऊस पुन्हा.'' तसंच मला पूर्वी सिगारेट ओढायची सवय होती. एकदा शनाया मला म्हणाली ः ""बाबा, शाळेत एक लेक्‍चर झालं, ते मी तुला सांगते.'' त्यानंतर तिनं मला ते सर्व लेक्‍चर, माहिती आणि उदाहरणांसहित बोलून दाखवलं. त्यामध्ये सिगारेट पिणं कसं वाईट आहे, त्याचे परिणाम काय होतात अशा सर्व गोष्टींचा समावेश होता. ते ऐकल्यावर माझी मुलगी माझं सिगारेट पिणं किती गांभीर्यानं घेते, याचा मला धक्का बसला. त्यानंतर काही दिवसांनी मी सिगारेट सोडली. असे शिकवणीचे प्रकार शनायाकडून झाले आहेत. अर्थात त्याचा मला आनंदच आहे.
मी व्यस्त असलो, तरी शनायाची दैनंदिन माहिती मी नियमितपणे तिला विचारत असतो. तुला काही अडचण आहे का? कशाचा स्ट्रेस आहे का? वगैरे. कारण आजच्या पिढीला आपल्यापेक्षा जास्त पातळ्यांवर ताणतणावांना सामोरं जावं लागत असतं. सध्याचं जग अधिक स्पर्धात्मक असल्यानं त्यांचे ताणतणाव वेगळे असतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर दिवसभराचा तिचा दिनक्रम आणि रात्री दिवसभरात काही अडचणी, टेन्शन आलं का? असं सर्व मी शनायाला विचारत असतो. त्यानुसार ताण कमी कसा करता येईल, वेळेचं नियोजन कसं करता येईल याबद्दल तिला मार्गदर्शन करतो. मी घरी असलो, तर तिचा ब्रेकफास्ट, डबा, जेवण बनवण्यापासून सर्व काही करतो. हे सर्व करण्यात खूप आनंद आहे. आमच्यात खूप मोकळं नातं आहे- कारण आमच्यात मोकळा संवाद आहे.

शनाया सध्या म्युझिक प्रॉडक्‍शनचा कोर्स करत आहे. तिचं हे पहिलंच वर्ष आहे. अलीकडे मुलांना त्यांच्या आवडीनुसार भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. शनायाला संगीत आवडतंच, त्यामुळे तिनं या कोर्सची निवड केली.

केवळ आई-वडील म्हणून मूल जन्माला घालणं म्हणजे पालक नव्हे, तर आपलं मूल सुदृढ, निरोगी, आनंदी आणि उत्तम नागरिक बनण्यासाठी कटाक्षानं काळजी घेणं म्हणजे पालकत्व होय. तुमचा रंग, वर्ण, नाव हे तुमच्या हातात नसतं, तर कर्तृत्व तुमच्या हातात असतं. आपल्या मुलाला कर्तृत्ववान बनवणं हे पालकत्व आहे.
(शब्दांकन : मोना भावसार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang pushkar shrotri write parents article