पालकत्वाचंही वर्तुळ असतं.... (राहुल सोलापूरकर)

rahul solapurkar
rahul solapurkar

पालकत्व हा जीवनातील वर्तुळाचा एक भाग आहे. जीवन अव्याहतपणे सुरूच असतं. तुम्हीच कधीतरी पाल्य असता, मग तुम्ही पालक होता. वय झाल्यानंतर तुमच्यातील शारीरिक क्षमता कमी झाल्यामुळं एकप्रकारचं पाल्यत्व तुमच्यात येतं, तोपर्यंत तुमचा पाल्य पालक झालेला असतो. हे वर्तुळ सतत सुरू असतं. या वर्तुळाचा भाग म्हणून तुम्ही काही काळासाठी पालकत्व स्वीकारलेलं आहे. त्या काळात जी जबाबदारी आली आहे, ती जास्तीत जास्त प्रामाणिकपणे आणि जसं शक्य असेल त्याप्रमाणे उत्तमरीत्या पेलण्याचा प्रयत्न करणं, याला मी 'पालकत्व' मानतो. संस्कारांचं धन पुढच्या पिढीकडं सोपवणं, हा पालकत्वाचा मूळ आधार आहे.

निम्न मध्यमवर्गीय परिस्थितीत मी वाढलोय. पुण्यात शनिवार पेठेतील एका छोट्या भाड्याच्या घरात आम्ही राहात होतो. मी, आई-वडील आणि भाऊ असं आमचं कुटुंब असलं, तरी आमच्या घरात तीन पिढ्या नांदत होत्या, असं मी म्हणेन. याचं कारण म्हणजे, माझा जन्म वडिलांच्या वयाच्या उशिरा झाला. माझ्यात आणि भावात तेरा वर्षांचं अंतर आहे. माझ्या मुंजीच्या दिवशी तो बँकेत नोकरीला लागला होता, एवढा आमच्या वयात फरक होता. मी शाळेत असतानाच वडील निवृत्त झाले, त्यामुळं अत्यंत निगुतीनं, काटकसरीनं जगणं, हा विचार त्यांच्या मनात कायम असायचा. वडिलांचं एक वाक्य मला कायम आठवतं, ‘अ स्टिचिंग टाइम सेव्हज नाइन’ म्हणजे थोडंसं काही झालं असेल, तर त्याची डागडुजी लगेच केल्यास पुढं मोठं नुकसान टळतं.

मी चांगलं शिकावं व शिकून मोठं व्हावं असं वडिलांना नेहमी वाटत असायचं; पण मी ठरवलं, की आपण अभिनयाच्या क्षेत्रात जायचं. बारावी सायन्सनंतर मी इंजिनिअरिंग सोडून आर्ट्सला गेलो, हे ज्या दिवशी त्यांना कळलं, तेव्हा ते खूप चिडले. त्यांनी मला विचारलं, की "व्हॉट यू वॉन्ट टू बी?" मी उत्तरलो, "आय वॉन्ट टू बी अॕन अॕक्टर." त्यावर ते आणखी चिडून म्हणाले, "यू वॉन्ट टू देन बेगर्स लाइन वुइच कल्टिवेट बेगर?" हे ऐकल्यावर मलाही त्यांचा राग आला व मी चिडून म्हणालो, "आय विल प्रूव्ह, इट्स नॉट अ बेगर्स लाइफ !" त्यानंतर त्यांचा माझ्यावर इतका राग होता, की भविष्यात माझे बरेच सिनेमे, मालिका आल्या; पण त्यापैकी काहीही लागलं, की घरात टीव्ही बंद व्हायचा. हा मुलगा आर्ट्सला जाऊन शिकला आणि अॕक्टर झाला हे बरोबर नाही, हेच त्यांचं म्हणणं होतं. पण, बाहेरून मात्र त्यांना कळत असायचं, की हा मोठा झाला, नाव कमावलं आहे, तरी कधी माझा चित्रपट, नाटक बघायला यायचे नाहीत. त्यांचं मतपरिवर्तन झाल्याची एक आठवण सांगतो. माझं शाहू मालिकेचं चित्रीकरण कोल्हापुरात सुरू होतं. त्याचा अत्यंत महत्त्वाचा सिक्वेन्स सुरू होता, त्यासाठी कोल्हापूर तीन दिवस बंद ठेवलं होतं. संपूर्ण जुन्याकाळचं वातावरण उभं करायचं म्हणून एमएसईबीचे सगळे खांब, बस स्टॉप काढून टाकले होते. रस्ता मातीचा रंगवून घेतला होता. हत्तीवर अंबारी ठेवून त्यातून माझी मिरवणूक, असे काही प्रसंग चित्रित करायचे होते. शपथ ग्रहणाच्या या प्रसंगाची प्रचंड तयारी केली होती. मी सजूनधजून तयार होतो. माझ्या सुरक्षिततेसाठी आजूबाजूला सुरक्षारक्षक होते, कारण माझ्या डोक्यावर शाहू महाराजांचा खरा ब्रुच होता आणि त्याची किंमत काही लाखांच्या घरात होती. त्या सिक्युरिटीतील एक जण पुण्याचा होता आणि तो मला ओळखत होता. त्यानं मला विचारलं, की "घरचं कोणी आलं आहे का शूटिंग पहायला?" मी म्हणालो, "नाही." तर तो पुन्हा म्हणाला, "आलंय की!" मी अंबारीत होतो आणि तो गर्दीतून माझ्या वडिलांना समोर घेऊन आला. मला एकदम धक्का बसल्यासारखं झालं, बाबा!! इथं कोल्हापुरात ?? यावर माझा विश्वासच बसत नव्हता. सेटवर सगळ्यांना कळलं, की माझे वडील आले आहेत. त्यांनी हार मागवला आणि मी बसलेल्या हत्तिणीच्या माहुताला सांगून तो हार हत्तिणीच्या सोंडेनं वडिलांच्या गळ्यात घातला. सगळं शूटिंग संपल्यानंतर वडील माझ्याबरोबर गाडीत बसून हॉटेलवर आले. मला म्हणाले, "मी इतकं ऐकून होतो तुझ्याबाद्दल, मालिकेबद्दल, म्हणून मी बघायला आलो, तू खूप नाव कमावलंस, उद्या जाईन." मी म्हणालो, "बाबा, माझं शूटिंग आहे, त्यामुळं मला इथंच राहावं लागेल. तुम्ही माझ्या गाडीतून पुण्याला जा, ड्रायव्हर तुम्हाला व्यवस्थित घरी सोडेल." त्या वेळी ते म्हणाले, "नाही, गाडी नको, मी एशियाडने आलो आहे आणि एशियाडनेच जाणार." मी त्यांना बरंच सांगण्याचा प्रयत्न केला; पण त्यांनी ऐकलं नाही. दुसऱ्या दिवशी ड्रायव्हर फक्त एसटी स्टँडवर गेला, त्यांना तिथं सोडलं आणि ते खरंच एशियाडनं पुण्याला आले. त्यानंतर मात्र शेवटपर्यंत घरी कोणीही आलं, तरी त्या प्रत्येकाकडं, 'माझा मुलगा जगात भारी' अशा शब्दांत ते माझं कौतुक करत होते. आपण चुकीचे होतो आणि आपला मुलगा बरोबर होता, हे कबूल करणं आणि मुलाचं सगळीकडं मोकळ्या मनानं कौतुक करणं, ही फार मोठी गोष्ट होती. असं फार कमी ठिकाणी बघायला मिळतं. माझ्या वडिलांनी ते कबूल केलं, याचा मला अभिमान आहे.

पालकत्व सांभाळताना आव्हानं कायम असतातच ! मी पालक झाल्यानंतर काळानुरूप वैज्ञानिक गोष्टींमध्ये बदल झालेत, त्यामुळं आव्हानंही वेगळी होती. थोडक्यात, आव्हानं होतीच; पण त्यांचं स्वरूप काहीसं बदलेलं होतं. माझा काळ रेडिओ ऐकण्यापासून ब्लॅक अँड व्हाइट टीव्ही, त्याला पुढं रंगीत काच लावण्यापर्यंतचा होता. पण, माझ्या मुलांच्या काळात डिजिटल टीव्ही, लॅपटॉप, स्मार्ट फोन हे सगळंच त्यांच्यापर्यंत आलेलं आहे. पियानोसारखी बटणं दाबून कॅसेट तिरकी होऊन उघडते, हे माझ्या मुलांना माहीतही नाही. गॅजेटसारख्या वैज्ञानिक गोष्टी काळानुरूप बदलत जातात; पण भावनिकदृष्ट्या पालकत्व कायम त्याच आव्हानांचं असतं, असं माझं मत आहे. त्यामुळं माझ्या आई-वडिलांनी आमच्यासाठी जे केलं, त्याचीच आताही गरज आहे. आपण माध्यम म्हणून राहून उत्तम संस्कार पुढच्या पिढीकडं देणं, ही प्रत्येक काळाची गरज असते. आज मुलांच्या हातात मोबाईल आहेत, त्यामुळं इतर देशांत, जगाच्या कानाकोपऱ्यांत काय सुरू आहे, हे त्यांना सहज दिसतं. त्याचा परिणाम म्हणून एकूणच मूलभूत संस्कारांत फरक दिसत आहे. बंदिस्त चौकटीत राहण्याच्या आणि संपूर्ण जग समोर खुलं असण्याच्या या दोन वेगळ्या परिस्थितींतील फरकातून स्वातंत्र्य आणि स्वैराचार यांतील सूक्ष्म फरक मुलांना समजावून सांगणं, ही आजच्या काळात गरज आहे. मुलांना कुठल्याही क्षणी स्वातंत्र्य देताना ते स्वैराचारात परिवर्तित होणार नाही ना, याच्याकडं लक्ष देणं ही आजच्या पालकत्वाची गरज आहे. आमच्या काळात अशी गरज नव्हती, कारण आमच्यासमोर जग एवढं खुलंच नव्हतं. आमच्या आई-वडिलांनी संस्काराकडं आणि शिक्षणाकडं एवढंच लक्ष दिलं. पण, आजच्या पालकत्वात मुलांना हे सांगणं फार गरजेचं आहे, की "तुला युरोप-अमेरिकेचं जे दृश्य दिसत आहे, ते सगळं तसंच नसतं, अशा पद्धतीच्या जगण्याचा विचार करू नकोस." तसंच, मुलांनी वाचन केलं पाहिजे, हे खरं असलं तरी, त्याबरोबर प्रवास, निरीक्षण, या गोष्टींची किंमत आजच्या काळात खूप मोठी आहे. काळाच्या ओघात एक गोष्ट पक्की आहे, की शिक्षणाला तरणोपाय नाही, हे मुलांना पालकांनी सांगितलंच पाहिजे. तुम्ही शिका, अनुभवानं समृद्ध व्हा, तरच येणाऱ्या काळात तुम्हाला टिकून राहता येईल. ही आजच्या पालकत्वाची गरज आहे.

आमच्या लहानपणी बारावीपर्यंत आई-वडील जे सांगतील, त्याच दिशेनं जायचं, अशी पद्धतच होती; पण आजच्या काळात मुलांना ते स्वातंत्र्य आहे. माझ्या दोन्ही मुलांनी - देवाशिष व ईशिता यांनी आपआपली करिअर आधीपासून ठरवली होती. माझ्यासारखं त्यांना बंड नाही करावं लागलं. मला आठवतंय, देवाशिषची दहावी झाली, तेव्हा मी अमेरिकेत होतो आणि तिथून आल्यावर त्यानं माला सांगितलं, की "बाबा मी मॅथमॅटिक्स सोडलं आणि जॉग्रॉफी घेतलं आहे." मी म्हणालो, "अरे असं का करतो आहेस?" त्यावर तो म्हणाला, "माझं ठरलं आहे, की मला डेंटीस्ट्रिच करायची आहे." मी म्हणालो, "अरे मेडिकल आणि इंजिनिअरिंग असे बारावीनंतर दोन्ही पर्याय ठेवावेत !" पण 'माझं ठरलं आहे' यावर तो ठाम होता. पुढं बारावीचा रिझल्ट लागल्यानंतर मी तेव्हाही नेमका अमेरिकेतच दौऱ्यावर होतो. मला पत्नीचा - मृणालचा फोन आला, "बारावी व सीईटी असे दोन्ही रिझल्ट लागले आहेत आणि देवाशिषला डेंटस्ट्रीला अॕडमिशन घ्यायची आहे." ते ऐकल्यावर मी पटकन म्हणालो, "मी काही डोनेशन वगैरे देणार नाही, कुणातरी हुशार मुलाची जागा आपण डोनेशन देऊन अडवायची नाही, त्यापेक्षा बीएस्सी कर." किती मार्क मिळाले हे मी विचारलंही नाही. माझं बोलणं देवाशिष ऐकत होता, तो म्हणाला, "बाबा, मार्कही चांगले मिळाले आणि सीईटीला दुसरा आलो. आता बोला, की फी भरायची आहे, त्यासाठी तरी पैसे देणार आहात का?" मी लगेच त्याला सॉरी म्हटलं. पुढं त्याच्या पद्धतीनं बीडीएस केलं, एमडीएसही केलं. त्यालाही लहानपणापासून नाटकात काम करायची आवड होती, त्यामुळं त्याला कोणी विचारलं, की तुला बाबांप्रमाणे करिअर नाही करायचं का? तर तो सांगायचा, "नाही, मी आधी शिक्षण पूर्ण करणार आहे, मग हौस म्हणून बघीन काय करायचं ते." हा जो काळाचा फरक आहे, मुलांचे विचार खूप स्पष्ट आहेत, ते आमच्या काळात नव्हतं. मुलांना वाढवताना मी दोन गोष्टी आवर्जून केल्या. एक तर मी त्यांना कधी शूटिंगच्या जगात फारसं नेलं नाही, कधीतरी गंमत म्हणून बघायला ती आली असतील; पण बाकी फार कधी आली नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे, व्यसनं आणि त्यांसारख्या गोष्टींपासून लांब रहा हे सतत सांगत आलो. तुम्हाला पाहिजे ते वाचा, ऐका, काही वाटलं तर मला विनासंकोच विचारा, फक्त आपलं मत व्यक्त करताना तारतम्य ठेवा, हे माझं त्यांना कायम सांगणं असायचं. कारण आत्ताची मुलं जास्त स्पष्टवक्ती आहेत, असं माझं ठाम मत आहे. आमची पिढी तशी नव्हती. माझी एखादी गोष्ट नाही आवडली तर, 'तुझं म्हणणं चुकीचं आहे,' असं मुलं सरळ सांगतात; पण स्पष्ट बोलण्यानं कोणी दुखावू नये म्हणून मी मुलांना बोलण्याची काळजी घेण्यास सांगितलं. तसंच, आजच्या काळातील मुला- मुलींचे मैत्रीचे संबंध म्हटले तर एका पॉइंटला अतिशय उत्तम आहेत आणि एका पॉइंटला अत्यंत अंतर राखलेलं आहे.

माझ्या मुलाच्या बाबतीतला एक किस्सा सांगतो. आमच्या ड्रायव्हरवर मी एकदा अतिशय क्षुल्लक कारणावरून चिडलो. माझा मूडही त्यादिवशी बिघडलेलाच होता, त्यामुळं मी त्याला लागेल अशा शब्दांत ओरडून बोललो. त्या ड्रायव्हरलाही त्याचं खूप वाईट वाटलं. पण, यानंतर देवाशिष येऊन मला म्हणाला, "बाबा, किती चिडलास तू !" मी म्हणालो, "काय रे! काय झालं एवढं बोललो तर? त्याला एवढी साधी गोष्ट समत नाही!!" त्यावर तो म्हणाला, "बाबा, ड्रायव्हर आहे ना तो, तू ज्या कारणासाठी, इतकी साधी गोष्ट म्हणून चिडलास, ती जर त्याला येत असती, तर तो ड्रायव्हर असता का? दुसऱ्या एखाद्या पोस्टवर असता ना!" हे त्यानं इतक्या सहजपणे मला समजावून सांगितलं, की नंतर मलाही ते पटलं, की अरे हा ड्रायव्हर आहे, दर वेळी त्यानं अमुक गोष्टीही कराव्यात अशी त्याच्याकडून अपेक्षा करणं चुकीचं आहे. या गोष्टी मुलं ज्याप्रकारे समजावून सांगतात, ते फार वेगळ्या पद्धतीचं असतं.

मला दोन हजार पंधरामध्ये मोठा अपघात झाला. त्या वेळी देवाशिषचं एमडीएस सुरू होतं, तरीसुद्धा त्यानं आणि ईशितानं घरची सगळी जबाबदारी ज्या पद्धतीनं घेतली, ते फारच विलक्षण होतं. ही मुलं फार लवकर शहाणी होतात, असं मला वाटतं. सुदैवानं दोघांकडं दोन गोष्टी खूप चांगल्या आल्या आहेत. एक म्हणजे, जेव्हा ते एखादी गोष्ट करायचं ठरवतात, तेव्हा ती पूर्ण झाल्याशिवाय थांबत नाहीत. माझंही असंच आहे, माझं जेव्हा एखाद्या विषयावरचं व्याख्यान किंवा त्याची तयारी असेल, त्या वेळी मृणालपासून मुलांपर्यंत सर्वांना माहीत असतं, की आता बाबाला डिस्टर्ब करायचं नाही. मी स्वतःला एका खोलीत कोंडून घेतो, सोबत आवश्यक ती पुस्तकं असतात आणि घरात सांगितलेलं असतं, की माझं झालं की मी जेवेन, फोनही घेणार नाही. हीच सवय मुलांकडं आली आहे. देवाशिषचं एखादं डेंटस्ट्रीचं आर्टिकल असेल किंवा एखादा विषय अभ्यासायचा असेल, तर तो पहाटेपर्यंत बसून, तो विषय संपवून मगच झोपतो. मुलं बघूनही आपल्याकडून बऱ्याच गोष्टी घेत असतात, त्यासाठी आपल्याला वेगळं काही सांगावं लागत नाही. तेच ईशिताच्या बाबतीतही आहे. ती इंजिनिअर झाली असून, आता एमएससाठी अमेरिकेला जाणार आहे. ती उत्तम कूकपण आहे. तिनं एखादी गोष्ट करायची ठरवली, तर ती आम्हाला सगळ्यांना किचनबाहेर काढते. मी म्हणतो, "अगं चिरणं वगैरे फालतू गोष्टी मी करतो, तू बाकीचं कर." त्यावर ती म्हणते, "मला तुझं हेच पटत नाही, ही गोष्ट फालतू नसते, चिरण्यात एक कला आहे आणि ते मला आवडतं." थोडक्यात, सर्व गोष्टी दोघेजण पूर्ण जबाबदारीनं करतात. त्यामुळं मला नेहमी असं वाटतं, की आपण जेवढे डोळे उघडे ठेवतो, त्याच्यापेक्षा पुढच्या पिढीचे डोळे जास्त खुले आहेत. थोडंसं निरीक्षण केलं, तर त्यांच्याकडूनही आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. तंत्रज्ञानाच्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी सहजसोप्या आहेत, कारण ते याच काळात जन्मलेले आहेत. त्यामुळं कॉम्प्युटर वगैरे गोष्टी मुलांकडून शिकणं मला आवडतं, हा परस्परातील 'गिव्ह अँड टेक' मला जास्त आवडतो.
तसा मी नेहमी दौरे, कार्यक्रम यांत व्यग्र असतो; पण वर्षातून एकदा कुठंतरी कुटुंबासह फिरायला जायचं, वेगळं काहीतरी बघायचं, हे जरूर करतो. त्या वेळी आम्ही चौघं बरोबर असतो. अर्थात, मी कामासाठी बाहेर असलो, तरी हल्ली मोबाईलमुळं ताबडतोब संपर्क साधता येतो आणि प्रत्येक विषयावर बोलणं सुरूच असतं. माझं मत आवश्यक असतं, तेव्हा मुलं मला नक्की फोन करतात. त्यामुळं मुलांना 'क्वान्टिटेटिव्ह, वेळेपेक्षा 'क्वालिटेटिव्ह' वेळ किती देता हे जास्त महत्त्वाचं असतं आणि तो मी देत असतो. शिवाय, मृणाल मुलांसोबत असते. तिनं बँकेची नोकरी सांभाळून मुलांकडंही बघितलं. तिनं सत्तावीस वर्षं नोकरी केली, मुलांची पूर्ण जबाबदारीही सांभाळली. नंतर मीच म्हणालो, आता नोकरी नाही केलीस तरी चालेल, तेव्हा तिनं ती सोडली. तिचं हे योगदान मला खूप महत्त्वाचं वाटतं.

गॅजेटच्या बाबतीत मी मुलांना कधी अडवत नाही, कारण तुम्ही कितीही अडवलं तरी तुमच्या मोबाईलवर काय येईल, हे सांगता येत नाही. तुमच्या हातात डिलीट करणं आहे. जसं, टीव्हीच्या बाबतीत भरपूर चॅनेल्स आहेत; पण काय बघायचं आणि काय नाही, हे आपण ठरवतो, कारण रिमोट आपल्या हातात असतो. तसंच, काय बघायचं आणि काय नाही, हे मुलांना शिकवणं हा पालकत्वाचा भाग आहे. ही गॅजेट्स कशी वापरायची ते आपल्यापेक्षा त्यांना जास्त चांगलं माहीत असतं. फक्त काय बघायचं हे 'नीर-क्षीर' बुध्दीनं ओळखण्याचा थोडाफार दृष्टिकोन आपण त्यांना द्यावा. माझ्या मते मुलांना जास्त बंधनात ठेवू नये. पूर्वीच्या काळी मुलांनी एखादा वेगळा प्रश्न विचारला तर, "ए गप्प बैस, तुला काय करायचंय, लहान आहेस तू अजून," असं म्हणून गप्प केलं जायचं. हे आजच्या मुलांच्या बाबतीत होऊ शकत नाही, कारण बऱ्याच गोष्टी त्यांना शाळेत सांगितल्या जातात, अभ्यासक्रमातून समजतात. अशा वेळी त्यातली अधुनिकता वाइटाकडं जाणार नाही, एवढी गोष्ट आपण पालक म्हणून करावी. गॅजेटवर बंदी घालू नये, कारण जेवढी बंदी घातली जाते, तेवढं मन ती गोष्ट करण्यासाठी उफाळून येतं, त्यामुळं सगळं बघा आणि काय घ्यायचं आणि काय नाही हे तुमचं तुम्ही ठरवा, याची जाणीव मुलांना देणं पुरेसं आहे. आता बंदी आली आहे म्हणून ठीक आहे; पण माझ्या मुलांनी कधी पब्जी खेळण्याची इच्छा व्यक्त केलेली मला आठवत नाही. काही चांगली कार्टून्स त्यांनी नक्की बघितली आणि ती कार्टून्स अजूनही आठवणींचा आनंद त्यांना देतात. मुलांच्या विशिष्ट वयाच्या वळणावर आपण त्यांना योग्य-अयोग्य काय, याची दृष्टी दिली, की पुढं ती बरोबर नीर-क्षीर बुद्धीनं वागतात. मुलांना एक गोष्ट मात्र मी सांगितली आहे, की कोणतीही माहिती मिळवायची असेल, तर विकिपीडिया अथवा गुगलवर जाऊ नका, ती खरी असेलच असं नाही. ती माहिती तुमच्या शोध पद्धतीनं इतर गोष्टींचा आधार घेऊन मिळवा.

पालकत्व हा जीवनातील वर्तुळाचा एक भाग आहे. जीवन अव्याहतपणे सुरूच असतं. तुम्हीच कधीतरी पाल्य असता, मग तुम्ही पालक होता. पुन्हा वय झाल्यानंतर तुमच्यात शारीरिक अक्षमतेमुळं एकप्रकारचं पाल्यत्व येतं, तोपर्यंत तुमचा पाल्य हा पालक झालेला असतो. हे वर्तुळ सतत सुरू असतं. या वर्तुळाचा भाग म्हणून तुम्ही काही काळासाठी पालकत्व स्वीकारलेलं आहे. त्या काळात जी जबाबदारी आली आहे, ती जास्तीत जास्त प्रामाणिकपणे आणि जसं शक्य असेल त्याप्रमाणे उत्तमरीत्या पेलण्याचा प्रयत्न करणं, हे मी 'पालकत्व' मानतो. माझ्याकडं पुस्तकांचा मोठा खजिना आहे, मी भरपूर वाचतो. तीच सवय मुलांनाही आहे. ती इंग्रजी माध्यमातून शिकलेली असल्यानं इंग्रजी पुस्तकं जास्त वाचतात. पण, त्यांनी मराठीपण वाचावं, असा माझा आग्रह असतो. सध्याच्या इतर मुलांच्या तुलनेत ती बऱ्यापैकी मराठी वाचतात. त्यांची गाण्याची आवड काळानुसार वेगळी असू शकते; पण आमच्या घरातील संस्कार मात्र त्यांच्यावर नक्कीच आहेत. घरात कोणी मोठी माणसं आली, तर दोन्ही मुलं त्यांना स्वतःहून वाकून नमस्कार करतात. येणाऱ्यांना आश्चर्य, संकोच वाटतो. ते नको म्हणतात; पण मी सांगतो, "नाही, ही आमच्या घरातील शिस्त आहे आणि दोन्ही मुलं ते करत आहेत, हे उत्तम आहे." मी स्वतः आई होती तोपर्यंत रोज सकाळी घरातून बाहेर पडताना आईला नमस्कार केल्याशिवाय निघत नसे. ही वर्षानुवर्षांची शिस्त आहे, जी पुढच्या पिढीच्या माध्यमातून आजही आमच्या घरात सुरू आहे. संस्कारांचं हे धन पुढच्या पिढीकडं सोपवणं, हा पालकत्वाचा मूळ आधार आहे.

(शब्दांकन - मोना भावसार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com