दिस जातील... दिस येतील (राजश्री सोवनी)

rajashree sovani
rajashree sovani

‘‘तुझ्या मित्रानं अविचारी कृत्य केलं म्हणून तूही तसंच करायला निघालास? त्याच्या घरी जा. धीर दे त्याच्या आई-वडिलांना. लक्षात ठेव, अंधकारानंतर पहाटेचं उगवणं हा सृष्टीचा नियमच आहे.
कोरोनामुक्तीची पहाटही कधी ना कधी निश्चितच उगवेल. सध्याची परिस्थिती कठीण आहे. मान्य.
मात्र, याही परिस्थितीत काही ना काही मार्ग नक्कीच निघेल. सध्या मात्र थोडा धीर धरायला
हवा.’’

‘‘विजय, ए विजय, अरे आत ये. आभाळ किती भरून आलंय; केव्हाही पाऊस येईल.’’
आईनं विजयला दुसऱ्यांदा हाक मारली. विजय मात्र शून्यात नजर लावून घराबाहेरच्या ओसरीवर बसून होता. कशातच लक्ष लागत नव्हतं त्याचं. गेले काही दिवस असंच सुरू होतं. त्याच्या काळजीनं आईच्या जिवाला घोर लागला होता. मनातलं काही बोलतही नव्हता पोर. शून्य नजरेनं तासन्‌तास बसून राहायचा. जेवायला बसला की घशाखाली घासच उतरायचा नाही त्याच्या. चेहऱ्याची रया पार उतरली होती त्याच्या.
आई पुनःपुन्हा विजयला हाका मारत होती; पण त्याचं लक्षच नव्हतं. अचानक तो उठला आणि गावाबाहेर जाणाऱ्या रस्त्याच्या दिशेनं चालू लागला. वाटेत भेटलेल्या ओळखीच्या लोकांचे आवाज त्याच्यापर्यंत पोहोचलेच नाहीत. तसंही त्याला आता कसलेच पाश नको होते. वाटेत एका झाडाखाली एक साधूबाबा बसले होते. संध्याकाळ झाली होती. कातरवेळी विहिरीच्या दिशेनं जाणाऱ्या विजयला त्यांनी पाहिलं आणि हाक मारली; पण विजयला आता काहीच ऐकू येत नव्हतं. विहीर जवळ आल्यावर त्याचा चालण्याचा वेग वाढला. धावत जाऊन साधूबाबांनी त्याचा हात धरला. त्यांचा हात सोडवून तो विहिरीच्या दिशेनं झेपावत होता.

‘‘का रे बाबा, एवढा लाखमोलाचा जीव तुला का नकोसा झालाय?’’ त्यांनी विचारलं.
विजय उत्तर देण्याच्या मनःस्थितीतच नव्हता. त्यांनी ओढतच त्याला झाडाखाली आणलं.
‘‘सोडा मला. मला जगायचं नाही,’’ तो पुनःपुन्हा म्हणत होता. ‘‘तुला जीवच द्यायचा आहे ना, खुशाल दे; पण त्याआधी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे,’’ असं ते त्याला म्हणाले. नाइलाजानं का होईना त्यांच्या दटावण्यानं तो थांबला. त्यांनी विचारलं : ‘‘मला सांग, माणूस जगतो कशावर?’’ विजय
काहीच बोलायला तयार नव्हता.
वारंवार विचारल्यावर तो म्हणाला : ‘‘अन्न.’’
साधूबाबांनी नकारार्थी मान हलवली.
‘‘वस्त्र, निवारा,’’ विजय उत्तरला.
ते म्हणाले : ‘‘अजून विचार कर आणि सांग.’’
विजय निरुत्तर झाला.
त्यावर ते म्हणाले : ‘‘माणूस जगतो आशेवर.’’
विजयला हे पटत नव्हतं.

साधूबाबा म्हणाले : ‘‘माणूस फक्त अन्न-वस्त्र-निवाऱ्यावर जगत असता तर सगळ्या गरिबांनी आत्महत्या केल्या असत्या. जोवर मनातली आशा जिवंत असते; तोवरच माणूस जिवंत राहतो. आशा संपली की तोही संपून जातो. तूसुद्धा आशेची साथ सोडली आहेस; म्हणून तुझी अशी अवस्था झाली आहे. मला सांग, तुझी नेमकी समस्या काय आहे?’’
विजयनं त्यांना त्याची कहाणी सांगायला सुरुवात केली. एकुलता एक असलेला विजय याच गावात लहानाचा मोठा झाला होता. त्याचे वडील शेती करायचे. फार मोठी शेती नसली तरी खाऊन-पिऊन कुटुंब सुखी राहील इतपत परिस्थिती होती त्यांची. दोन खोल्यांचं का होईना स्वतःचं घर होतं. सारं काही छान चाललं होतं; पण विजय चौथीत असताना त्याचे वडील अपघातात वारले आणि होत्याचं नव्हतं झालं. शेत विकावं लागलं. शिवणाचं मशिन खरेदी करून आई शिवणकाम करू लागली. परिस्थिती फारच हलाखीची होती. तालुक्याच्या गावी जाऊन विजयनं कसंबसं कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं. मात्र, बरेच दिवस त्याला नोकरी मिळतच नव्हती. शेवटी, त्यानं मुंबई गाठली. तिथं नुकताच तो एका कंपनीत नोकरीला लागला होता. स्वतःचं थोड्या पैशांत भागवून तो आईला पैसे पाठवत असे; पण कोरोनाच्या साथीमुळे लॉकडाउन झालं आणि त्याची कंपनी बंद पडली. मुंबईहून त्याला गावी परतावं लागलं. बंद पडलेली कंपनी पुन्हा कधी सुरू होईल? त्याला तिथं पुन्हा कामावर घेतील का? असे सारेच प्रश्न होते आणि जवळपास कुठं नोकरी मिळण्याची अजिबातच शक्यता नव्हती. रोजच कानावर येणारे कोरोनारुग्णांचे आणि बळींचे भयावह आकडे, कोरोनामुळे निर्माण झालेली मृत्यूची भीती, बेरोजगारीची समस्या आणि संपत चाललेली पैशांची पुंजी यामुळे विजयच्या मनाला निराशेनं घेरलं होतं. सर्वच बाजूंनी अंधार दाटून आल्यासारखा वाटत होता. आशेचा किरण कुठंही दिसत नव्हता. त्याला वाढवण्यासाठी आईनं घेतलेले कष्ट तो लहानपणापासून पाहत आला होता. आजही तिला मशिनवर कपडे शिवताना पाहून त्याला अपराधी वाटत होतं आणि अशा साऱ्या विपरीत परिस्थितीतच ती भयंकर बातमी कानी आली. शेजारच्या गावातल्या त्याच्या मित्रानं आत्महत्या केली होती. त्याची परिस्थितीही विजयसारखीच होती. तोही बेरोजगार झाला होता. या बातमीनं विजय पार खचून गेला होता. आईला त्याची फारच काळजी वाटू लागली होती. ती त्याला खूप समजवायची; पण त्याचा धीर हळूहळू सुटत चालला होता. मित्रासारखं आपणही जीवन संपवून टाकावं असं त्याला वाटू लागलं होतं. एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावावा आणि सुटावं या साऱ्यातून या विचारापर्यंत तो येऊन ठेपला होता.  साधूबाबांनी विजयची सारी कहाणी ऐकून घेतली आणि ते म्हणाले : ‘‘अरे, जीव द्यायचा असं ठरवलंस तेव्हा तुझ्या आईचा विचार तू केलास का? तुझे वडील गेले तेव्हा काय होतं तिच्याकडे? आयुष्याची लढाई किती खंबीरपणानं लढली ती. तिच्यासाठी तू आशेचा किरण होतास. आता तूच जीवन संपवलंस तर तिनं कुणाकडे पाहायचं? तुझ्या मित्रानं अविचारी कृत्य केलं म्हणून तूही तेच करायला निघालास? त्याच्या घरी जा. धीर दे त्याच्या आई-वडिलांना. लक्षात ठेव, अंधकारानंतर पहाटेचं उगवणं हा सृष्टीचा नियमच आहे. कोरोनामुक्तीची पहाटही कधी ना कधी निश्चितच उगवेल. सध्याची परिस्थिती कठीण आहे. मान्य. मात्र, याही परिस्थितीत काही ना काही मार्ग नक्कीच निघेल. सध्या मात्र थोडा धीर धरायला हवा. आजची परिस्थिती उद्याला असत नाही. काळ सतत बदलत असतो आणि जीव देणं हा कुठल्याही समस्येवरचा उपाय असूच शकत नाही. चारी बाजूंनी अंधार दाटला की स्वतःला  त्यातच न लोटता प्रकाशाचा वेध घ्यायचा असतो. विश्वासाचं बीज पेरून आशेचा अंकुर पल्लवित कर. वादळवाऱ्यानं कोलमडणारी वेल नव्हे, तर इतरांना बळ देणारा आधारवड हो.’’

साधूबाबांच्या बोलण्यानं विजय भानावर आला. विचार करू लागला. आईचा विचार मनात आल्यावर त्याला स्वतःचीच लाज वाटली. दिवस आता मावळला होता: सगळीकडे अंधार पसरू लागला होता. विजयच्या मनाचा गाभारा मात्र आशेच्या किरणांनी उजळून निघाला होता. कसल्याशा निर्धारानं तो घराच्या दिशेनं चालू लागला... 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com