esakal | ई-श्रावण! (राजश्री सोवनी)
sakal

बोलून बातमी शोधा

rajashree sowani

ई-श्रावण! (राजश्री सोवनी)

sakal_logo
By
राजश्री सोवनी

‘‘मम्मा, या वेळी तू सेल्फी टाकायचा आहेस हं ग्रुपवर या कार्यक्रमाचा. बाकीच्या मावश्यांचे फोटोज्, सेल्फीज् बघ किती मस्त आलेत. मालतीकाकूंबरोबरचा सेल्फी चांगला कसा येणार? लाइक्‍स कसे मिळतील तुला?’’
‘‘आर्या ऽ अगं काय हे? किती प्रदर्शन मांडायचं गं प्रत्येक गोष्टीचं?’’ मी ओरडलेच.

बाहेर रिमझिम सरी पडत होत्या. वाफाळत्या चहाचा कप हातात घेऊन मी बाल्कनीत जाऊन बसेपर्यंत ऊन्हही पडलं. श्रावणातला ऊन्ह-पावसाचा हा अद्भुत खेळ! सारी सृष्टी हिरवाईनं नटलेली...पानापानावर नवचैतन्य. आषाढातल्या पावसानं चिंब झालेल्या भुईतून सृजनाचा हिरवा आविष्कार उमटतो तो श्रावणातच. विलोभनीय सृष्टिसौंदर्य लाभलेला, सणावारांनी गजबजलेला असा हा महिना.
‘‘व्हॉट अ ब्यूटी!’’ आमची कन्यका आर्या हॉलमध्ये अवतरली होती. मी आश्‍चर्यानं पाहिलं तर म्हणाली : ‘‘मम्मा, हा श्रावण नं?’’
ही चक्क श्रावणाच्या सौंदर्याबद्दल बोलतेय? कमालच झाली...!
‘‘अगं आर्या, कानातले हेडफोन्स काढून तुझ्या बेडरूमच्या खिडकीचे पडदे सरकवून पाहिलंस की काय तू बाहेरचं हे सृष्टिसौंदर्य?’’
मी मोठ्या कौतुकानं साश्र्चर्य विचारलं.
‘‘नो, नो मम्मा, अगं व्हिडिओज् गं... व्हॉटस्ॲपवर,‘इन्स्टा’वर केवढे व्हिडिओज् आलेत श्रावणावरचे. ओ माय गॉड! हाऊ ब्यूटिफुल! तो मोराच्या नाचण्याचा व्हिडिओ पाहून तर मी वेडी झाले अगदी...’’
‘‘अगं आर्या, कधीतरी उघड्या डोळ्यांनी प्रत्यक्षातलंही सौंदर्य बघ जरा. किती सुंदर आहे हा ऊन्ह-पावसाचा खेळ. सृष्टिसौंदर्यानं नटलेला सर्वात सुंदर असा हा महिना. पावसानं चिंब झालेल्या झाडांवरचे थेंब ऊन्ह पडल्यावर मोत्यासारखे चमकू लागतात. पानापानावर सोनसळी तेज पसरतं. ही उन्हातली रिमझिम...सप्तरंगी इंद्रधनू आणि पिसारा फुलवून नाचणारा धुंद मोर... वर्णन तरी किती करावं...कविकल्पनांना बहर येतो नुसता...’’
‘‘मम्मा, बोअर नको मारूस गं ऽऽ’’ असं म्हणत आर्या बेडरूममध्ये निघून गेली. धाडकन दार लावल्याचा आवाज आला आणि
कविकल्पनांमधून मी एकदम जमिनीवर आले!
***

तेवढ्यात प्रदीप आला ऑफिसमधून. चहा-पाणी उरकल्यावर
म्हटलं : ‘‘ए प्रदीप, या महिन्यात केव्हा वेळ आहे तुला? अरे दरवर्षीप्रमाणे सत्यनारायण करायचाय.’’
‘‘अरे हो, श्रावण सुरू झालाय नाही का?’’ प्रदीप म्हणाला.
‘‘प्रदीप, तू वेळ काढ आणि गुरुजींना निरोप दे तसा. आजकाल त्यांना बरंच आधी सांगावं लागतं बरं का. गेल्या वर्षीसारखं अगदी ऐनवेळी नको.’’
‘‘नेहा, मी काय म्हणतो...कशाला हवेत गुरुजी? सीडी आणू सत्यनारायणाच्या पूजेची किंवा यू ट्यूबवर व्हिडिओज् असतील ना?’’ प्रदीप म्हणाला.
‘‘काय रे प्रदीप? हे काय नवीनच?’’ मी म्हटलं.
‘‘नेहाबाई, काळाप्रमाणे बदला आता. तसंही आपणच चौघं असणार आहोत ना? डन! या रविवारचं ठरवून टाकू या. तू समोरच्या किराणा दुकानात व्हॉट्सॲपवर यादी पाठव सामानाची...की इव्हेंट मॅनेजमेंटवाल्यांना सांगायचंय! माझ्या मागं कटकट नकोय हं कुठलीच. ते काय केळीची पानं वगैरे. मला अजिबात वेळ नाहीय.’’
‘‘काहीतरीच काय रे? करीन मी सगळं मॅनेज. इव्हेट मॅनेजमेंटची काहीएक गरज नाहीए,’’ मी जरा गुश्शातच त्याला म्हणाले.
निखिल... आमचे सुपुत्र. कॉलेजमधून घरी आले. थोड्या वेळानं त्याला म्हटलं : ‘‘‘ए निखिल, या रविवारी मला केळीचे खुंट आणून देशील का रे?’’
‘‘मम्मा, मला नको सांगूस हां हे असलं काहीतरी. मी बिझी आहे,’’
निखिलनं लगेचच अंग झटकलं.
शेवटी मीच सगळी तयारी केली.
रविवारी लवकर उठून प्रसादाचा शिरा केला. सीडीप्रमाणे पूजा केली. खूप दिवसांनी साडी, नथ असं नटून झालं माझं आणि आर्याचंही. प्रदीप आणि निखिलही झब्ब्या-कुर्त्यात छानच दिसत होते. पूजा झाली. नैवेद्यही दाखवून झाला. आर्या-निखिलनं व्हिडिओ काढला. प्रसादाच्या शिऱ्याचे फोटो काढून झाले. पूजेच्या वेळचा सेल्फीही काढून झाला. पटापट सगळ्यांनी सगळ्या ग्रुप्सवर फोटो, व्हिडिओ फॉरवर्ड केले. सगळ्यांचे लाइक्‍सही आले. दिवसभर वेगवेगळ्या ग्रुप्सवर आलेल्या लाइक्‍सनी आम्ही सगळे सुखावून गेलो.

एक-दोन दिवसांनी कविताचा मेसेज आला. तिच्या मुलीची - मुग्धाची- मंगळागौर होती पुढच्या आठवड्यात. कविता माझी जिवाभावाची मैत्रिण. त्यामुळे जावं लागणारच होतं. सकाळच्या पूजेला नाही जमलं; पण ऑफिस सुटल्यावर लगेच पोचले. सकाळी पूजा झाली होती आणि संध्याकाळी सगळ्यांना आमंत्रण होतं. छोटा हॉलच बुक केलेला होता. मी पोचले तेव्हा कविता थोडी काळजीत दिसली. विचारलं तर म्हणाली : ‘‘मंगळागौरीचे खेळ सगळ्यांना पाहायला मिळावेत म्हणून मी एका ग्रुपला बोलावलं होतं; पण ऐनवेळी काहीतरी कारणानं त्यांना जमणार नाहीए. आणि मी तर सगळ्यांना कळवून बसले आहे. आता ऐनवेळी दुसरं कोण येणार?’’
तेवढ्यात आमच्या ग्रुपमधली अजून एक मैत्रीण -निशा- आली. ती म्हणाली: ‘‘अगं एवढंच ना? माझ्याकडं एक आयडिया आहे.’’ मागच्याच आठवड्यात तिच्या शेजारीच मंगळागौर झाली होती. त्यांनीही मंगळागौरीचे खेळ खेळणाऱ्या ग्रुपला बोलावलं होतं आणि त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंगही केलेलं होतं.
निशा म्हणाली : ‘‘ते व्हिडिओ रेकॉर्डिंगच आपण सगळ्यांना दाखवू या!’’
ही आयडिया सगळ्यांना आवडली. कविताकडून निशानं सगळ्या बायकांच्या मोबाईल नंबर्सची लिस्ट घेतली आणि व्हिडिओ फॉरवर्ड केला. जमलेल्या सगळ्या जणी मंगळागौरीच्या खेळाचा व्हिडिओ बघण्यात रंगून गेल्या. आलेल्यांपैकी काही जणींनी अजून काही व्हिडिओज्‌ डाऊनलोड केले आणि पाठवले सगळ्यांना. डाऊनलोड आणि फॉरवर्डचा खेळ असा काही रंगला म्हणून सांगू!
***

आज शुक्रवार. उद्या-परवा सुटी. त्यामुळे आज ऑफिसमध्ये खूपच काम होतं. घरी पोचेपर्यंत संध्याकाळचे सात वाजून गेले. स्वयंपाक उरकल्यावर मोबाईल हातात घ्यावा म्हटलं तर तो आर्यानं पळवलेला.
‘‘आर्या, तो मोबाईल दे आधी.’’
‘‘ए मम्मा, तुमच्या मैत्री ग्रुपवर बघ कसले एकेक फोटोज् आलेत,’’ आर्या म्हणाली.
‘‘कसले एवढे फोटो आलेत गं?’’ मी विचारलं तर म्हणाली : ‘‘अगं, वैशाली मावशी, निशा मावशी या सगळ्यांकडं तो फ्रायडेचा सवाष्ण कार्यक्रम झालासुद्धा. काय मस्त फोटोज्, सेल्फीज् पाठवलेत त्यांनी.’’
‘‘आर्या...अगं, ‘श्रावणी शुक्रवारची सवाष्ण’ असं म्हणतात त्याला. मलापण दाखव ना फोटोज्. मला या वेळी उशीरच झालाय. मालतीकाकूंना विचारायला पाहिजे पुढच्या शुक्रवारी वेळ आहे का ते,’’ मी म्हटलं.
‘‘ए मम्मा, मी काय म्हणते, मालतीकाकूंऐवजी दुसऱ्या कुणाला बोलावता नाही का येणार?’’ आर्यानं विचारलं.
‘‘अगं ऽ, दरवर्षी शेजारच्या मालतीकाकूच येतात आपल्याकडं,’’
मी समजावलं तिला.
‘‘मम्मा, या वेळी सेल्फी तू टाकायचा आहेस हं ग्रुपवर या कार्यक्रमाचा. बाकीच्या मावश्यांचे फोटोज्, सेल्फीज् बघ किती मस्त आलेत. मालतीकाकूंबरोबरचा सेल्फी चांगला कसा येणार? लाइक्‍स कसे मिळतील तुला?’’
‘‘आर्या ऽ अगं काय हे? किती प्रदर्शन मांडायचं गं प्रत्येक गोष्टीचं?’’ मी ओरडलेच.
***

आज सकाळी उठायला थोडा उशीरच झाला. पटापट कामं उरकायला घेतली. आज श्रावणी सोमवार असल्यानं साबूदाण्याच्या खिचडीचा बेत होता. तेवढ्यात प्रदीपनं हाक मारली.
‘‘नेहा, अगं किती वेळ? झाली का नाही खिचडी?’’
‘‘अरे, हो हो...होईल थोड्याच वेळात,’’ मी म्हटलं.
‘‘शेजारच्यांकडं बघ. खिचडी करून खाऊनपण झाली,’’
प्रदीप म्हणाला.
‘‘तुला कसं माहीत?’’ मी स्वयंपाकघरातून डोकावत विचारलं.
‘‘त्यांच्या अभयनं फोटोज् टाकलेत ना ‘इन्स्टा’वर! श्रावणी सोमवारची खिचडी...आहाहा! नुसतं बघूनच तोंडाला पाणी सुटलं.’’
‘‘अरे, ही बघ झालीच. घे खाऊन गरमागरम...’’ प्लेट पुढं करत मी म्हटलं.
‘‘ही कुठली प्लेट आणलीस? ती सेटमधली मस्त काचेची प्लेट आण. बटाट्याच्या फोडी, खोबरं, कोथिंबीर असं सगळं नीट दिसू दे त्यावर,’’ प्रदीपनं फर्मान सोडलं.
‘‘अरे प्रदीप, प्लेटच्या बदलाबदलीत गार होईल ती खिचडी,’’ मी म्हणाले.
‘‘होऊ दे गं...मलाही असा छान फोटो टाकू दे खिचडीचा. त्या अभ्याला म्हणावं, बघ बघ, आमची श्रावणी सोमवारची खिचडी...’’
मी दुसरी प्लेट आणून दिली. नवीन प्लेटमध्ये खिचडी काढून फोटोसाठी ॲरेंजमेंट करण्यात प्रदीप रमला. खिचडीचा आस्वाद घेण्यापेक्षाही फोटो काढून पाठवण्यातच रस होता त्याला. मी बघतच राहिले. प्रत्यक्षाहूनही प्रतिमांच्या असलेल्या मोहानं मी विचारात पडले. काही विचारावं म्हटलं तर मोबाईलचा कॅमेरा ऑन करून स्वारी श्रावणातली खिचडी कॅमेऱ्यात बंद करण्यासाठी सरसावली होती...!

loading image