आरोग्यदायी आहार हवा (राजवीरसिंह)

rajveer singh
rajveer singh

आपल्याला आपलं शरीर, मन आणि भावना यांच्यामध्ये निरोगी संतुलन साधायला यायला हवं. आपण आरोग्यदायी अन्न खायला हवं आणि जमेल तेवढं जंक फूड टाळायला हवं. घरी बनवलेल्या जेवणाला पर्याय नाही. एकदा का आपण भूक आणि जंक फूड खाण्याच्या सवयींवर ताबा मिळवला, की व्यक्तीला आपल्या निरोगी जीवनशैलीशी ताळमेळ साधता येतो. मी नवनवीन रेसिपीज्‌ शिकण्यासाठी युट्यूबची मदत घेतो.

कुठल्याही सबबी किंवा दुःखाशिवाय जगा, खा आणि झोपा. दिवसाची मजा लुटा आणि हेच करत राहा. कामातूनही ब्रेक घेणं गरजेचं आहे. वर्षातून निदान एकदा आधी कधीही न गेलेल्या ठिकाणाला भेट द्या. प्रवास करा, नवनवीन गोष्टी शिका, अनुभव घ्या आणि मग प्रेरणा द्या. निरोगी जीवनशैलीचा अंतर्भाव करून मी माझ्या मनाला ताजंतवानं बनवण्याचा प्रयत्न करतो. लांब चालायला जातो आणि वजनंही उचलतो. माझ्या चित्रीकरणानुसार वर्कआऊटचं शेड्यूल सांभाळतो. मात्र, त्यासोबत तडजोड करत नाही.

मी निदान चार ते पाच लिटर पाणी पितो आणि स्वतःला हायड्रेटेड ठेवतो. पाण्यामुळं आपल्या शरीरातला थकवा निघून जातो. तसंच, मन प्रसन्न राहतं. संतुलित आहार माझ्यासह सर्वांसाठीच गरजेचा आहे. मी स्वतः नवीन रेसिपी शिकतो आणि त्या बनवण्याचा प्रयत्न करतो. काही वेळा माझ्या आईकडूनही टिप्स घेतो अन त्यानुसारही अनेक पदार्थ बनवतो. तसंच, त्याची चव इतरांनाही चाखायला देतो. ओट्‌ससोबत प्रोटिन, फळांमध्ये केळी, सफरचंद खातो. त्याचबरोबर दही आणि सुका मेव्याचाही आहारात समावेश असतो. पोळी, सॅलड आणि भाजीही आहारात नियमित असते. सॅलडबरोबरच चार-पाच अंड्यांचं पांढरं गिल, चिकन ब्रेस्टचाही आहारात समावेश असतो. ब्लॅक कॉफीबरोबरच ग्रीन टीही घेतो. तसंच, लिंबू सरबताचंही सेवन करतो.

व्यायामात सातत्य
मी सकाळी धावून आल्यानंतर वर्कआऊट करणं पसंत करतो. आधी पायांचा आणि मग कोअर, अप्पर बॉडी, कार्डिओ करतो. वर्कआऊटच्या आधी आणि नंतर स्ट्रेचिंग नक्कीच करतो. मी आठवड्यातून चार-पाच वेळा सुमारे दोन तास व्यायाम करतो आणि माझ्या शरीराला हायड्रेटेड ठेवतो. मला स्ट्रेचिंग करणं मनापासून आवडतं. त्यामुळं स्नायूंना आराम मिळतो.
सर्वांनीच जिमला जाणं गरजेचं नाही. मी तर मुंबईला आल्यानंतर जिमला जायला सुरवात केली; कारण मी या शहरात नवीन होतो आणि प्रत्येक स्नायूसाठी असलेल्या मशिन्सनी भरलेल्या जिमचं मला आकर्षण होते. माझ्या बाबांनी मला मी मोठा होत असताना योगासनं शिकवली. वर्कआऊटनंतर स्नायूंना आराम मिळावा यासाठी त्याचा खूप उपयोग होतो. मी माझे बहुतेक कार्डिओ आणि वर्कआऊट प्रकार युट्‌युब व्हिडिओ पाहून शिकलो आणि वजन कमी झालं. माझ्या कामासाठी तसंच विविध प्रकारच्या व्यक्तिरेखांसाठी गरज असल्यामुळं मी जिमला जायला सुरवात केली. मात्र, सायकलिंग, चालणं, पोहणं किंवा कुठल्याही बाहेर खेळण्याच्या ऍक्‍टिव्हिटीमध्ये तुम्ही असलात, तर जिमला जाणं गरजेचं नाही, असं मला वाटतं. मात्र, त्यासाठी सक्रिय आणि फिट राहणं गरजेचं आहे. जिममध्ये असताना शक्‍यतो बोलू नये. तसंच, आपल्या व्यायामाकडं लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळं आपण चांगल्या प्रकारे एक्‍सरसाईज करू शकतो. त्यासाठी मेहनत करा. योग्य संगती आणि स्वच्छता राखा. चांगले शूज वापरा. ते खूपच महत्त्वाचं आहे; कारण त्यांच्यावर तुमच्या शरीराचं वजन असतं. विशेष म्हणजे मी जिमिंगसाठी कोणाचंही मार्गदर्शन घेत नाही. मी स्वतःच व्यायाम करतो. मला वाटतं, की आपण स्वतःच स्वतःला प्रेरणा देऊ शकतो.

मन ताजंतवानं हवं
आपलं मन ताजंतवानं राखण्यासाठी मी चांगलं संगीत ऐकतो, पेंट करतो. त्याचबरोबर कुटुंबीयांसह मित्रांसमवेत वेळही घालवतो. दूर ड्राईव्हला जातो, फिरायला जातो. त्याचबरोबर माझ्या कुत्र्यासोबतही खेळतो. अशाच गोष्टी करतो- ज्यामुळं मला आनंद मिळतो. त्यामुळं प्रत्येकानंच आपल्याला ज्या-ज्या गोष्टी आवडतील, ज्यातून आपल्याला आनंद मिळेल, आपलं मन प्रसन्न राहील अशा गोष्टी बिनधास्त करायला हव्यात. त्याचप्रमाणं वाईट विचार मनातून काढून टाकून चांगल्या गोष्टींकडं लक्ष केंद्रित करायला हवं. त्यामुळं आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहतं.
मी माझ्या बाबांसोबत योगासनं करत होतो. ते आर्मीमध्ये होते. मी अगदी दरदिवशी कडक रूटिन सांभाळायचो. ते माझ्या मित्रांनाही लवकर उठवून सकाळी धावायला आणि वर्कआऊटसाठी न्यायचे. मुंबईला आल्यानंतर मात्र मी हे रूटिन सांभाळू शकलो नाही. माझे बाबा मात्र अजूनही योगासन-प्राणायाम करत आहेत. शरीर, मन आणि भावनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी योगासनं खूपच महत्त्वाची आहेत. त्यामुळं आपली शरीरयष्टी, मन अन् चेहरा छान राहतो. तसंच, कोणत्याही कामाचा ताणतणाव जाणवत नाही. थकवाही येत नाही. दरम्यान, मी अभिनय क्षेत्रामध्ये आल्यानंतर माझं ४० ते ४५ किलो वजन कमी झालं आहे. त्यासाठी मी युट्‌युब व्हिडिओ पाहत होतो. खरं तर वजन कमी करणं माझ्यासाठी आव्हानच होतं; पण मी ते योग्य पद्धतीनं केलं.

सध्या मी ‘स्टार भारत’ या वाहिनीवरच्या ‘सुफियाना प्यार मेरा’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. ही एक गंभीर आणि रोचक प्रेमकथा असून ती दिल्लीमधल्या सुफी परिवारावर आधारित एक सामाजिक नाट्य आहे. अनिवासी भारतीय मुलगा एका मुक्त विचारांच्या आधुनिक मुलीच्या प्रेमात पडतो. ती तिचं आयुष्य आपल्या अटींवर जगते. ती आधुनिक असली तरी आपल्या संस्कृतीशी जोडलेली आहे. एकमेकांवरचं आपलं प्रेम सिद्ध करण्यासाठी ते कसे झगडतात याची ही कथा आहे. यात अनेक नाट्यमय वळणं असलेलं हे एक सामाजिक नाट्य आहे.
माझ्या कुटुंबीयांचा फिट राहण्यावर विश्‍वास आहे. आई-बाबा रोज दोनदा वॉकला जातात आणि त्यामुळं फिटनेसच्या बाबतीत वय हा केवळ एक आकडा आहे, असं माझं मानणं आहे. मला जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी माझी मैत्रिण अनघासोबत वर्कआऊट करतो. खरं तर आपली शरीरसंपदा चांगली राहण्यासाठी अन मन प्रसन्न राहण्यासाठी सर्वांनीच फिटनेसवर भर देण्याची गरज आहे. मी जे-जे प्रयोग माझ्या शरीरावर करतो, त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न माझे मित्र आणि कुटुंबीयही करतात. वेलनेस आणि फिटनेसबाबत मी सॉकर प्लेयर्सना फॉलो करतो. त्यांची शरीरयष्टी आदर्श असते असं मला वाटतं. बेकहॅम, गॅरेथ बाले आणि क्रिस्टिआनो रोनाल्डो हे माझे आदर्श आहेत. अक्षयकुमारही माझा आदर्श आहे. त्यानं ज्या पद्धतीनं आपली जीवनशैली राखली आहे, ते कौतुकास्पद आहे.
(शब्दांकन : अरुण सुर्वे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com