‘हम देखेंगे’ : एका ‘निषेधगाना’ची सुरेल गोष्ट (रवि आमले)

रवि आमले ravi.amale@gmail.com
रविवार, 5 जानेवारी 2020

कविश्रेष्ठ फैज अहमद फैज यांची ‘हम देखेंगे’ ही कविता म्हणजे हुकूमशाहीत दबलेल्या जनतेचा हुंकार. पाकिस्तानातील जनरल झिया यांच्या लष्करशाहीला आव्हान देणारं हे निषेधगान पुढं भारतीय उपखंडातील चळवळींत, आंदोलनांत निनादत राहिलं. जनतेच्या सार्वभौमत्वाची ग्वाही देतानाच जुलमी सिंहासनांना ते आव्हान देत राहिलं. आज मात्र ते वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. त्यातील प्रतिमासृष्टीवर आक्षेप घेतले जात आहेत. आयआयटी-कानपूरमध्ये या कवितेच्या निमित्तानं झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हा विशेष लेख...

कविश्रेष्ठ फैज अहमद फैज यांची ‘हम देखेंगे’ ही कविता म्हणजे हुकूमशाहीत दबलेल्या जनतेचा हुंकार. पाकिस्तानातील जनरल झिया यांच्या लष्करशाहीला आव्हान देणारं हे निषेधगान पुढं भारतीय उपखंडातील चळवळींत, आंदोलनांत निनादत राहिलं. जनतेच्या सार्वभौमत्वाची ग्वाही देतानाच जुलमी सिंहासनांना ते आव्हान देत राहिलं. आज मात्र ते वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. त्यातील प्रतिमासृष्टीवर आक्षेप घेतले जात आहेत. आयआयटी-कानपूरमध्ये या कवितेच्या निमित्तानं झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हा विशेष लेख...

सन १९८६ मधलं लाहोर.
दहशतीचे बूट रस्त्यारस्त्यावरून वाजत होते. जनरल झिया उल्‌ हक यांनी अवघ्या देशाचा कोंडवाडा केला होता. त्यांच्या धार्मिक राष्ट्रवादी लष्करशाहीत खूश होते ते केवळ लष्करी अधिकारी, सरकारी बाबू, बडे उद्योजक-व्यावसायिक, सत्तेच्या सावलीतले नेते-कार्यकर्ते, त्यांचे चमचे आणि अर्थातच धर्मांधांच्या झुंडी. पाकिस्तानला ‘खरं’ धर्मराष्ट्र बनवायचं होतं त्यांना. जिथं धार्मिक कायदा चालेल असं धर्मराष्ट्र...
जिथं महिलांना अधिकार स्वयंपाकाचा आणि प्रजननाचाच असेल असं धर्मराष्ट्र...जिथं कुणी काय नेसायचं, कुणी काय खायचं, कुणी कसं राहायचं आणि कुणाबरोबर राहायचं हे ठरवण्याचा अधिकार सत्ता
धाऱ्यांना आणि त्यांच्या पुठ्ठ्यातल्या धर्ममार्तंडांनाच असेल असं धर्मराष्ट्र...जिथं तुमच्या जन्मावरून तुमची लायकी ठरेल असं धर्मराष्ट्र...
जनरल झिया असं धर्मराष्ट्र उभारण्यासाठी सरसावले होते आणि त्यांच्या साह्याला होते उलेमांचे जथेच्या जथे.
अशा धर्मराष्ट्रात सर्वसामान्यांनी बोलायचं नसतं, प्रश्न विचारायचे नसतात. त्यांनी फक्त भाट बनायचं असतं सत्तेचं. जे भाट बनत नाहीत ते ठरतात देवाचे, धर्माचे, देशाचे द्रोही! ते गणशत्रू! पण तरीही काही लोक बोलतातच. सगळे धोके स्वीकारून बोलतात; पण या बोलण्याची तऱ्हा वेगळी असते. कुणी गद्यातून, कुणी पद्यातून, कुणी चित्रांतून, कुणी व्यंग्यचित्रांतून बोलत असतात. या अशा भाषिक आविष्कारांचं फार भय वाटत असतं हुकूमशहांना...बॉम्ब आणि बंदुकांपेक्षाही जास्त भय! त्यामुळे कोणत्याही हुकूमशाहीत पहिल्यांदा मोडल्या जातात त्या लेखण्या आणि ब्रश. कविश्रेष्ठ फैज अहमद फैज यांच्या उर्दू शायरीवर म्हणूनच पहारे बसवले होते जनरल झियांनी. ‘बोल के लब आझाद हैं तेरे...बोल जबाँ अब तक तेरी है...’ असं खणखणून सांगणारा कवी कोण मोकळा सोडील? ते परवडत नसतं सत्ताधाऱ्यांना; पण शब्द आणि विचार कोंडून राहत नसतात. ते वाहत जातात. झिरपत जातात. लोकांच्या मेंदूत आणि काळजात लपून बसतात.
त्याची प्रचीती ‘फैज मेला’मधूनही येत होती. सन १९८४ मध्ये फैजसाहेबांचं देहावसान झालं. त्यानंतर त्यांचे कुटुंबीय आणि चाहते यांनी ‘फैज फाउंडेशन’ची स्थापना केली. त्या संस्थेमार्फत फैज यांच्या जन्मदिनी फैज यांच्या काव्याचा महोत्सव भरवला जाऊ लागला. फैज यांच्यावर प्रेम करणारे अनेक गायक येत. फैज यांच्या कवितांचं गायन करत. समोर जनता बसलेली असे. कामगार, मजूर, शेतकरी, रिक्षाचालक इथपासून ते तरुण विद्यार्थी, प्राध्यापकांपर्यंत अनेकांची मिळून बनलेली ती जनता. कानात फैजसाहेबांचे शब्द आणि डोक्यात त्या शब्दांतील विचार भरून घेई ती. हुकूमशाहीत असं काही ऐकणं हाही विद्रोहच. ही जनता तो विद्रोह करत होती.

सन १९८६ च्या फेब्रुवारी महिन्यातही असाच ‘फैज मेला’ भरलेला होता. तारीख होती १३. ठिकाण : लाहोरमधलं सुप्रसिद्ध अल्‌हमरा सभागृह. ४०० ते ६०० लोकांची आसनव्यवस्था असलेलं ते प्रेक्षागृह त्या दिवशी गच्च भरलेलं होतं. बाहेरही मोठी गर्दी जमलेली होती. आरडाओरडा चालला होता. त्या सगळ्यांनाच आत यायचं होतं. अखेर आयोजकांनी दरवाजा उघडला. लोक जागा मिळेल तिथं, पायऱ्यांवर, जमिनीवर बसले. कार्यक्रम सुरू झाला.
या ‘फैज मेला’चं मुख्य आकर्षण होत्या इक्बाल बानो. लोकप्रिय
गझलगायिका आणि ठुमरीगायिका. त्या साडी नेसून रंगमंचावर आल्या तेव्हाच खरं तर त्यांच्या गायनाचं रूपडं कसं असेल याचा अंदाज श्रोत्यांना आला होता. जनरल झिया यांच्या धर्मराष्ट्रानं साडीवर बंदी घातली होती. त्या सहा वार कापडानं जणू त्यांचा धर्म बुडणार होता. त्या धार्मिक कायद्याला विरोध म्हणून इक्बाल बानो मुद्दाम काळी साडी नेसून आल्या होत्या.

त्यांनी गायला सुरवात केली. पहिले दोन शब्द उच्चारले आणि अवघं प्रेक्षागृह थरारून गेलं. टाळ्यांचा कडकडाट झाला. ते शब्द होते :
‘हम देखेंगे...’ फैज यांची ही गाजलेली नज्म. इक्बाल बानो त्यांच्या त्या गोड खड्या स्वरात गात होत्या :
हम देखेंगे...
लाजिम है की हम देखेंगे
वो दिन की जिसका वादा है...हम देखेंगे
जो लोह-ए-अजल में लिख्खा है...हम देखेंगे

आम्ही पाहणार आहोत...खरंच आहे ते...आम्ही पाहणार आहोत... त्या सनातन पुस्तकात जे लिहिलेलं आहे, ज्या कयामतच्या दिवसाचा, जेव्हा सगळ्यांचा अंतिम न्याय होतो त्या दिवसाचा जो वादा केलेला आहे...ते सारं आम्ही पाहणार आहोत.
त्या एकेका ओळीला कडकडून टाळ्या पडत होत्या. श्रोत्यांच्या ओठांतून आपसूकच दाद सुटत होती. इक्बाल बानो गातच होत्या :
जब जुल्म-ओ-सितम के कोह-ए-गराँ
रूई की तरह उड जाएंगे

जुलमाचे, अत्याचाराचे ते पर्वत जेव्हा कापसासारखे उडून जातील
हम महकूमों के पाँव तले ये धरती धडधड धडकेगी
और अहल-ए-हकम के सर ऊपर जब बिजली कडकड कडकेगी
हम देखेंगे...

आम्हा महकूमांच्या - गरीब-शोषितांच्या -पायांखाली ही धरती धडधड करू लागेल आणि सत्ताधीशांच्या डोक्यावर विजा कडकडाट करतील...आम्ही पाहणार आहोत हे...
इक्बाल बानोंच्या कंठातून या ओळी आल्या आणि श्रोत्यांनी एकच कल्ला केला. सगळ्यांच्या मनातल्या भावना तर उतरल्या होत्या फैज यांच्या त्या शब्दांतून.
त्या म्हणत होत्या :
जब अर्ज-ए-खुदा के काबे से सब बुत उठवाए जाएंगे
हम अहल-ए-सफा, मरदूद-ए-हरम मसनद पे बिठाए जाएंगे

आता इक्बाल बानो यांच्या आवाजाला धार चढली होती. स्वरांची पट्टी उंचावली होती. श्रोते भान विसरून गेले होते. त्यांच्या वाहवाहीनं, टाळ्यांनी सारा आसमंत गुंजत होता.
आणि पुढची ओळ आली :
सब ताज उछाले जाएंगे...
बस्स! प्रेक्षागाराचं छप्पर उडून जाणं तेवढं बाकी होतं. श्रोत्यांतून उठलेल्या ‘इन्कलाब झिंदाबाद’च्या आकाशभेदी निनादानं तिथला कण न् कण थरारून गेला होता. थांबतच नव्हत्या त्या घोषणा. गाणं थांबलं होतं. सुरू होतं ते संगीत...

त्या गीत-संगीतानं, श्रोत्यांच्या हुंकारांनी झिया शासनाला झिणझिण्या आल्या नसत्या तरच नवल. ता. १३ फेब्रुवारी १९८६ च्या त्या रात्रीच आयोजकांच्या घरांवर छापे पडले. काही सहभागी श्रोत्यांची चौकशी करण्यात आली. तो कार्यक्रम ध्वनिमुद्रित करण्यात आला होता. त्याच्या कॅसेट्स जप्त करण्यात येत होत्या. खासकरून ‘हम देखेंगे’ या गाण्याच्या कॅसेट्सवर पोलिसांचं लक्ष होतं. तरीही त्यातली एक कॅसेट देशाबाहेर, दुबईला गेलीच. तिथं तिच्या आणखी प्रती तयार करण्यात आल्या. त्या गाण्याचे पडसाद पुढं अनेक वर्षं उमटत राहिले. (ते गाणं आता यूट्यूबवरही उपलब्ध आहे.)
परवाच ते निषेधगान पुन्हा चर्चेत आलं. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधातल्या आंदोलनात ‘आयआयटी-कानपूर’चे विद्यार्थी ते गात होते. तर त्यावरूनही मोठा वाद झाला. इथल्या सरकारसमर्थक हिंदू धर्मनिष्ठांना त्या गाण्यात इस्लामी जिहाद दिसला. तुटून पडले ते समाजमाध्यमांतून त्या विद्यार्थ्यांवर. आयआयटीतल्या एक प्राध्यापिका म्हणाल्या : ‘या विद्यार्थ्यांनी धार्मिक रंग दिलाय आंदोलनाला.’

‘सगळ्या मूर्ती हटवल्या जातील, केवळ अल्लाहचं नाव तेवढं बाकी राहील’ असं ती मुलं म्हणाली.
खरं होतं का ते? तर खरंच होतं. फैज यांनीच तसं लिहिलंय :
जब अर्ज-ए-खुदा के काबे से सब बुत उठवाए जाएंगे
पुढं फैज म्हणतात :
बस नाम रहेगा अल्लाह का
जो गायब भी है हाजिर भी
जो मंजर भी है नाजिर भी
उठ्ठेगा अन-अल्‌-हक का नारा
जो मैं भी हूँ और तुम भी हो
और राज करेगी खुल्क-ए-खुदा
जो मैं भी हूं और तुम भी हो

अर्थ स्पष्ट आहे, की -
अल्लाहच्या काब्यातून - घरातून - सगळ्या मूर्ती बाहेर काढल्या जातील. त्या पवित्र स्थानापासून ज्यांना दूर ठेवण्यात आलं आहे त्या आम्हां श्रद्धाळूंना गादीवर बसवलं जाईल. सगळे राजमुकुट उडवून लावण्यात येतील आणि सिंहासनं उद्‌ध्वस्त केली जातील. जो अदृश्य आहे आणि उपस्थितही आहे, जो दृश्य आहे आणि पाहणाराही आहे, अशा त्या अल्लाहचं नाव तेवढं उरेल. आणि उठेल ‘मीच सत्य आहे’चा नारा. जसा मी सत्य आहे, तसेच तुम्हीही खरे आहात आणि मग देवाची लेकरं राज्य करतील. जसा मी देवाची निर्मिती आहे, तशीच तुम्हीही आहात...

जेव्हा भारतातले विद्यार्थी हे म्हणतात तेव्हा ती धार्मिक संदेशच देत असतात असं म्हटलं तर त्यात वावगं आहे ते काय? प्रश्न योग्य वाटतो हा. पण आहे मात्र अडाणी. ज्यांना कविता कशी असते हे समजत नाही त्यांनी तो विचारला तर एक वेळ समजून घेता येईल; पण काव्यरसिकांना मात्र तो शोभणारा नाही. ते कसं हे समजून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा या कवितेचे कवी - फैज अहमद फैज यांना समजून घ्यावं लागेल.

सर्वांत महत्त्वाचं म्हणजे फैज हे सुधारणावादी कवी होते. ते धर्मवादी मुळीच नव्हते. उलट ते निधर्मी होते, कम्युनिस्ट होते. आता असा माणूस काब्यातून मूर्ती उखडून फेकल्या जातील असं म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ वेगळा असतो. कवितेतल्या शब्दांना वाच्यार्थ असतो, भावार्थ असतो, ध्वन्यर्थ असतो हे समजून घेतलं पाहिजे. फैज हे आपल्या काव्यातून क्रांतिकारी विचार मांडत होते; पण त्यांची काव्यप्रतिमासृष्टी ही त्याच मातीतून आणि परंपरांतून आलेली आहे. आपल्याकडे उदाहरणार्थ : महात्मा गांधींजी जेव्हा रामराज्याचा विचार मांडतात तेव्हा प्रभू रामचंद्रांच्या नावानं इथं हिंदूंचं धर्मराज्य स्थापन करावं असं त्यांचं म्हणणं नसतं. प्रभू रामचंद्र यांच्या राज्याची जी वैशिष्ट्यं होती ती या राज्यातही असावीत असंच त्यांना म्हणायचं असतं. तीच बाब फैज यांच्या या कवितेची. ते इथं जरूर धार्मिक प्रतीकं वापरतात; पण त्यांचा मथितार्थ वेगळा असतो.

अल्लाहच्या घरातून सर्व मूर्ती फेकून दिल्या जातील, याचा अर्थ इथं सत्तेच्या मंदिरात बसलेल्या लोकांना खाली खेचलं जाईल असा आहे. त्या सत्तेवर मग कोण बसेल? तर ज्यांना सत्तेपासून वंचित ठेवण्यात आलं होतं असे लोक. तुम्ही-आम्ही. जे खरे आहेत. खरे श्रद्धावान आहेत. तेच इथल्या माजोरी सत्ताधीशांचं सिंहासन उद्ध्वस्त करतील. मग काय होईल? तर अल्लाहचं नाव राहील. इथं अधार्मिक फैज यांचा अल्लाह म्हणजे नमाजात ज्याची करुणा भाकली जाते तो नव्हे. एखादा नेता जेव्हा ‘माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय’ असं म्हणतो, तेव्हा तो पंढरपूरच्या विठ्ठलाबद्दल बोलत नसतो. उपमानामक अलंकाराचा वापर करून तो वेगळंच काही सांगत असतो. तसेच हे. फैज यांचा हा अल्लाह म्हणजे सत्य आणि न्याय होय. याच अल्लाहची लेकरं सत्तेवर येतील असं ते सांगत आहेत.

हे अर्थातच मुस्लिमद्वेष हाच ज्यांच्या राजकारणाचा पाया आहे त्यांना पटणार नाही. ते याकडे हिंदू विरुद्ध मुस्लिम याच चष्म्यातून पाहणार. इतरांनी मात्र तसा बावळटपणा करू नये. मुसलमानांतले धर्मांध वंदे मातरम्‌ला अशाच प्रकारे विरोध करताना दिसतात. त्यांना देशाला माता म्हणणं आणि त्या मातेला वंदन करणं यात धर्मद्रोह दिसतो. फैज लढत होते ते अशा एकाच माळेचे मणी असलेल्या प्रवृत्तींविरुद्ध आणि म्हणूनच आज इतक्या वर्षांनीही त्यांचे शब्द जिवंत आहेत. ते जुलमाच्या विरोधातल्या प्रत्येक आंदोलनाला, चळवळीला ऊर्जा देत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang ravi amale write faiz ahmed faiz hum dekhenge poem article