राजकारण बहुत करावे! (रवि आमले)

ravi amale
ravi amale

विरोधकांनी अमुक तमुक घटनेचं राजकारण करू नये, असे सल्ले आपण सतत ऐकतो. अलीकडच्या हाथरसप्रकरणीही तसंच बोललं जात होतं. आपल्यालाही ते पटतं. कारण, आपल्यादृष्टीनं राजकारण म्हणजे काही तरी गलिच्छ. राजकारण म्हणजे केवळ सत्तेसाठी चाललेले उद्योग. पण, खरंच ते तसं असतं का? ‘राजकारण करू नका’ याचा नेमका अर्थ काय असतो?… या प्रश्नांच्या उत्तराचा हा शोध…

राष्ट्रभक्ती हे बदमाषांचं अखेरचं आश्रयस्थान असतं, असं ब्रिटिश राजकीय निबंधकार सॅम्युअल जॉन्सन यांनी १७७५ मध्ये म्हणून ठेवलं होतं. नाटककार जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनी त्यात किंचित बदल केला. ते म्हणाले, 'राजकारण हा बदमाषांचा अखेरचा अड्डा असतो…' आणि दूर कुंपणावर बसून राजकारणाकडं पाहणाऱ्या तमाम मध्यमवर्गानं त्यास जोरजोरात मान हलवत संमती दर्शविली.

या आपल्या मध्यमवर्गाची राजकारणाबाबतची अवघी समज वृत्तपत्रीय बातम्यांतून निर्माण झालेली. या बातम्या देणारे पत्रकारही अंतिमतः त्या मध्यमवर्गाचीच निपज, त्यांच्या आकलनालाही तीच खुरटी मर्यादा. परिणामी नेत्यांमधले कलगीतुरे, सत्तेसाठीच्या कुरघोड्या, आरोपांची चिखलफेक, भ्रष्टाचार, घराणेशाही अशा गोष्टी वेशीवर टांगणं म्हणजेच राजकीय वार्तांकन ठरलं. यातून राजकारण हे काही तरी गलिच्छ आणि घाणेरडं असतं, असा समज लोकमानसात मुरत गेला. एवढा, की आपण राजकारण करीत नाही, हे सांगण्यात प्रत्येकाला अभिमान वाटू लागला. लोक तर आता येथपर्यंत आले आहेत, की अमुक अमुक राजकीय नेता हा अजिबात राजकारण करीत नाही म्हणून आम्ही त्याला मानतो, असं म्हणू लागले आहेत. यात काही अंतर्गत विसंगती आहे, हेही त्यांच्या ध्यानी येत नाही. पण हे सामान्य माणसांच्या बाबतीतच घडतं असं नाही. राजकारणी मंडळीही प्रसंगोपात एकमेकांना सल्ले देत असतात, की राजकारण करू नका. उदाहरणार्थ - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्राला उद्देशून संदेश देताना ते म्हणाले होते, की राजकारण आपल्या पाचवीलाच पूजलेलं आहे, ते आपण सतत करतच असतो; पण आता या कोरोना संकटाच्या काळात तरी राजकारण करू नका. ठाकरे यांचं हे आवाहन भाजपच्या नेत्यांना उद्देशून होतं. तेव्हा भाजपचे नेते म्हणत होते, की आम्ही काही राजकारण वगैरे करीत नाही; आणि हेच नेतेगण परवा हाथरस बलात्कारप्रकरणी तावातावानं सांगत होते, की ते राहुल गांधी त्या घटनेचं राजकारण करत आहेत. अलीकडं आपल्या राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांची एक भूमिका असते. ती म्हणजे, भाजपची जी भूमिका असते, तिला मम म्हणणं. तर, त्यानुसार या वाहिन्यांच्या वृत्तदवंडीकारांनीही ‘ट्रेन्ड’ चालवण्यास सुरुवात केली, की विरोधी पक्ष बलात्काराच्या घटनेचं राजकारण करीत आहेत. हे असं प्रत्येक जण जेव्हा एकमेकांना ‘राजकारण करू नका’ असं सुनावत असतो, तेव्हा त्याचा अर्थ नेमका काय असतो, हे समजून घेण्यासाठी आपल्याला मुळात राजकारण म्हणजे काय, हे नीट तपासून घ्यावं लागेल.

राजकारण - पॉलिटिक्स - ही संज्ञा आली ग्रीकमधील पॉलिटिका या शब्दापासून. त्याचा अर्थ - शहरांचा कारभार. तो काळ होता पंधराव्या शतकाचा. तेव्हा ग्रीसमध्ये नगरराज्यं - पॉलिस - असत. तेव्हा त्या राज्यांचा कारभार सुव्यवस्थितपणे चालण्यासाठी जे काही केलं जात असे ते राजकारण, हा त्याचा साधा अर्थ. समर्थ रामदासांनी सतराव्या शतकात हेच वेगळ्या संदर्भात स्पष्ट केलं होतं. ‘शांती करून करवावी। तऱ्हे सांडून सांडवावी। क्रिया करून करवावी। बहुतांकरवी’ हे म्हणजे राजकारण, असं त्यांचं सांगणं होतं. ‘नीतिन्यायासि अंतर पडोंच नेदावें’, ‘फड नासोंचि नेदावा’ हे राजकारणाचं काम असल्याचं ते सांगत होते. राजकारणाचा अर्थ अशा रीतीनं व्यापक होत गेला, त्याला नाना कंगोरे प्राप्त झाले. सत्ताप्राप्तीसाठीचे खेळ हा त्यातलाच एक कंगोरा. हा खेळ कुठं नसतो? तो अगदी प्राण्यांतही असतो. घरांत, कुटुंबांत, कचेऱ्यांत… सगळीकडं तो सुरूच असतो. माणसांचं वैशिष्ट्य असं, की त्यांनी या खेळाला लोककल्याणाचं वळण लावलं. लोकशाही शासनव्यवस्था हे त्याचं एक उदाहरण. या व्यवस्थेतून राजकीय पक्षांचा उदय झाला. सत्ता मिळविण्यासाठी मग त्यांचे संघर्ष सुरू झाले. यात एक गफलत अशी झाली, की राजकीय मंडळी सत्ताप्राप्तीलाच अंतिम साध्य मानू लागले. खुर्चीतच आपला मोक्ष असं त्यांना वाटू लागलं. वस्तुतः सत्ता हे साधन असून, लोकहित हे त्याचं साध्य असतं हे ते विसरले; आणि मग निव्वळ सत्तेच्या लोभापायी नको नको ते तमाशे करू लागले. जेव्हा कोणी ‘राजकारण करू नका’ असं म्हणत असतं, तेव्हा त्याला हे तमाशे अभिप्रेत असतात. आपले विरोधक अशा प्रकारचा गलिच्छ आणि चुकीचा व्यवहार करीत आहेत, हे त्याला सुचवायचं असतं.

हे फार प्रभावी तंत्र आहे राजकीय प्रचारतंत्रातलं. विरोधक सतत ‘राजकारण’ करतात, असं लोकांना सतत सांगायचं. राजकारण आणि सत्तालालसेपायीचे उद्योग, समाजात भेद निर्माण करणारी कारस्थानं वगैरेंचं समीकरण जुळलेलं असतं लोकांच्या मनात. या गोष्टींबद्दल घृणा वाटत असते त्यांना. ती घृणा विरोधकांच्या दिशेनं वळवायची. यातून होतं असं, की विरोधकांचा सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकारच धोक्यात येतो. लोकशाहीत विरोधक असणं अत्यावश्यक असतं. सत्ता माणसाला भ्रष्ट बनवते हे आपण पाहतोच. तिथं विरोधकच नसतील, तर ती सर्वंकष सत्ता माणसाला - मग तो कितीही संत वा फकीर असो - सर्वंकष भ्रष्टच बनवते असं म्हणतात. तेव्हा विरोधक हे गरजेचेच. त्यांनी सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवायचा असतो, कुठं काही चूक दिसल्यास टीका करायची असते, प्रश्न विचारायचे असतात. हेच काम माध्यमांचंही असतं; पण हल्ली त्यांचंही असं झालं आहे, की कोणी सरकारला प्रश्न विचारले वा टीका केली, की ते सारे नकारात्मक ठरविले जातात. लोकांना म्हणे हल्ली ‘पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह’ हवं असतं सारं. सरकारचं चांगल्या कामासाठी कौतुक जरूर करावं, त्याला ‘पॉझिटिव्ह’ वगैरे म्हणावं, हे ठीक. किंबहुना त्यासाठी खुद्द सरकार, त्यांच्या जनसंपर्क यंत्रणा आणि ‘आयटी सेल’मधील जल्पकांचे जत्थे राबतच असतात. तेही विरोधी पक्षांनीच करावं असं म्हणणं हे जरा अतीच झालं. आपल्या विरोधकांना त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल बदनाम करणं, त्यांच्याविषयी जनतेच्या मनात अप्रीती निर्माण करणं, हा उद्योग सारेच राजकीय पक्ष करीत असतात. राजकीय प्रक्रियेचा भागच असतो तो. तेव्हा, ज्या कामासाठी लोकप्रतिनिधींना निवडून दिलेलं असतं, ते त्यांनी नीट केलं नाही, तर त्याबाबत त्यांना जाब विचारला गेलाच पाहिजे. असा जाब विचारणं याला 'राजकारण करणं’ म्हणत नाहीत. ठाकरे सरकारला कोरोना संकटाच्या हाताळणीबाबत विरोधकांनी प्रश्न विचारले, तर त्याला ‘राजकारण’ म्हणत नाहीत. त्याचप्रमाणे राहुल गांधी यांनी हाथरसप्रकरणी आवाज उठवला, तर त्यालाही त्यांनी ‘राजकारण केलं’ असं म्हणायचं नसतं. किंबहुना त्यांनी विरोधी पक्ष म्हणून हे केलं नाही, तर त्यांना धारेवर धरायचं असतं, तिथं ‘व्हॉट्स अबाऊटरी’ करीत बसायचं नसतं. त्या अमुक अमुक ठिकाणी बलात्काराचा गुन्हा झाला, तेव्हा हाथरसप्रकरणी निषेध करणारे आवाज कुठं गेले होते, असं म्हणणं ही ‘व्हॉट्स अबाऊटरी’. जिथं राज्ययंत्रणा गुन्हेगारांना पाठीशी घालू पाहात असते, जिथं न्यायाची प्रक्रिया बाधित झाल्याचं दिसत असतं, त्या प्रत्येक ठिकाणी सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणं हे केवळं विरोधकांचंच काम नसतं, तर ते सत्ताधाऱ्यांच्या समर्थकांनीही करायचं असतं. हा अगदीच आदर्शवाद झाला हे खरं; पण विशुद्ध राजकीय प्रक्रिया असते ती हीच.

हे सारं आपण समजून घ्यायला हवं. कोणी ‘राजकारण करू नका’ असं म्हणत असेल, तर त्याचा अर्थ सरकारला प्रश्नच विचारू नका, त्यांच्या कोणत्याही चुकीबाबत त्यांना जाब विचारू नका असा होतो, हे नीटच लक्षात घ्यायला हवं. अनेकांना त्यातली ही मेख समजत नाही. याचं कारण त्यांच्या मनातली राजकारणाची प्रतिमा. ती आता बदलली पाहिजे. सत्तालालसेपायी जे चालतं, त्याला राजकारण म्हणणं चूकच. ते निव्वळ सत्ताकारण असतं, त्यात गल्लत करता कामा नये. समाजातील जाणत्या मंडळींनी तरी हे समजून घ्यायला हवं, की काळ संकटाचा, आपत्तीचा असो, की सर्वसाधारण; प्रश्न विचारलेच पाहिजेत, राजकारण केलंच पाहिजे. समर्थांच्या शब्दांत सांगायचं तर, ‘राजकारण बहुत करावें’!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com