esakal | पासबुक (रवी वाळेकर)
sakal

बोलून बातमी शोधा

ravi walekar

श्रीनीचं पीपीएफ अकाऊंट होतं, हे मला पक्कं माहीत होतं. ती अगतिकपणे म्हणाली ः 'अण्णा, मेरे कू कुछ बी नयी मालूम'' आणि ती ओक्‍साबोक्‍शी रडायलाच लागली. रडतच आत गेली आणि कपाटातली बरीच कागदपत्रं टॉवेलमध्ये गुंडाळून घेऊन आली. त्या कागदपत्रांत मला पीपीएफचं पासबुक सापडलं. एक नाही, चक्क दोन!

पासबुक (रवी वाळेकर)

sakal_logo
By
रवी वाळेकर

श्रीनीचं पीपीएफ अकाऊंट होतं, हे मला पक्कं माहीत होतं. ती अगतिकपणे म्हणाली ः 'अण्णा, मेरे कू कुछ बी नयी मालूम'' आणि ती ओक्‍साबोक्‍शी रडायलाच लागली. रडतच आत गेली आणि कपाटातली बरीच कागदपत्रं टॉवेलमध्ये गुंडाळून घेऊन आली. त्या कागदपत्रांत मला पीपीएफचं पासबुक सापडलं. एक नाही, चक्क दोन!

श्रीनिवास आमच्या ऑफिसमध्ये अकाऊंट विभागात काम करायचा. वेगळा विभाग असल्यानं माझा त्याचा कार्यालयीन कामानिमित्त संबध यायचा नाही; पण दोस्ती होती. त्याला "श्रीनी' म्हणण्याएवढी माझी त्याची घसट. ऑफिसातल्या सहकाऱ्याला शक्‍यतो कोणी घरी बोलवत नाहीत; पण "श्रीनी'च्या घरी दोनदा जेवायला गेलेला मी एकटाच! ऑफिसातल्या बाकी कोणाला त्याचं घरही माहीत नव्हतं. तेलगू होता. एकदम देवभक्त. साईबाबा आणि तिरुपती बालाजींवर प्रचंड श्रद्धा. शुद्ध शाकाहारी आणि संपूर्ण निर्व्यसनी.

एकदा असंच सकाळी दहाला तो ऑफिसच्या लिफ्टमध्ये भेटला. "तुम आलूवेरा ज्यूस चालू करके देखो. मैने दिन से किया, बहुत अच्छा लगता जी!' श्रीनीच्या अशा "दीर्घायुष्याचं रहस्य' सांगणाऱ्या सूचनांना मी नवखा नव्हतो. श्रीनीचे आरोग्यविषयक सल्ले, त्याचं दररोजचं पथ्यपाणी, योगा, व्यायाम, चालणं वगैरेबद्दल ऐकून कधीकधी स्फूर्ती मिळायची; पण ती तेवढ्यापुरतीच.
दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे सकाळी ऑफिसला आलो. अकरा-साडेअकराला एक मीटिंग होती. मग जेवण. सगळं आटोपून लॅपटॉपवर ई-मेल तपासत बसलो. "सॅड डिमाइस' (दुख:द निधन) अशीही एक ई-मेल होती. चहाचा घोट घेता घेता मी सहज ती ई-मेल उघडली.
एका सेकंदात गोठलो. रक्ताभिसरण थांबलं. तोंडाला कोरड पडली. ई-मेलवर श्रीनीचा हसरा फोटो होता!
काल रात्री घरी जाताजाता रस्त्यातच त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता आणि रुग्णालयात पोचण्याअगोदरच त्याचं प्राणोत्क्रमण झालं होतं. मला काहीच सुचेना! संध्याकाळी एका सहकाऱ्याला घेऊन श्रीनीच्या घरी जाऊन थडकलो. दरवाज्यावर दोन पेंढ्या बांधलेल्या, हळदी-कुंकू वाहिलेला भाताचा ढीग उंबऱ्यापाशी आणि दाराला कुलूप! शेजारच्यांकडून कळलं, की दुपारीच "बॉडी' हैदराबादजवळच्या श्रीनीच्या मूळ गावी नेली होती. अस्वस्थ झालो. श्रीनीच्या फोनवर फोन करायला मन धजवत नव्हतं; पण केलाच. समोरून कोणीतरी तेलुगूत बोललं. त्यांना हिंदी वा इंग्रजी काहीच येत नव्हतं.
निराश होऊन दुःखद अंत:करणानं घरी परतलो. कामाच्या नादात हळूहळू दुःख कमी होत गेलं. महिना झाला असेल. एक दिवस अचानक श्रीनीच्या नंबरवरून फोन आला. क्षणभर दचकलोच. 'रवि अण्णय्या?'' ः एका स्त्रीचा थरथरणारा आणि साशंक आवाज. ती श्रीनीची बायको होती, हे मी लगेच ओळखलं. अण्णय्या हा "मोठा भाऊ' अशा अर्थाचा तेलुगू शब्द.

'ठोडा मदद चाहिये था,'' तिला हिंदी बोलायची सवय नव्हती. हिला पैशांची गरज आहे की काय? पैसे द्यायला माझी काहीच हरकत नव्हती. एकतर ती "माझ्या' श्रीनीची पत्नी होती, आणि आता तर मी तिचा "अण्णय्या'सुद्धा होतो.
'तुमारे आफिस मे रेड्डी करके कोई है क्‍या?''
मी कुणा रेड्डीला ओळखत नव्हतो. श्रीनीच्या विभागात असेल, तर माहीत नव्हतं. मी तिला उद्या चौकशी करतो, असं मोघम सांगितलं; पण कशासाठी हा रेड्डी हवाय, हा प्रश्न होताच. 'उसको एक हप्ता पैले दस हजार दिया था, ऐसा बोले थे,'' तिचं उत्तर.
मी त्याच्या ऑफिसमध्ये पोचलो. त्याच्या खुर्चीवर दुसरंच कोणीतरी बसलं होतं. क्षणभर उदास वाटलं. चौकशी केल्यावर समजलं, की आमच्या एका सप्लायरकडे रेड्डी नावाचा माणूस आहे. फोन केला. पलिकडे रेड्डी सुन्न! त्यानं तीनतीनदा विचारून हेच "श्रीनिवास साब' याची खातरजमा करून घेतली. श्रीनीनं त्याला पैसे दिले होतेच आणि यापूर्वीही बऱ्याचदा दिले होते. हा रेड्डी तर फोनवरच रडला. इतका भला निघाला, की दुसऱ्याच दिवशी पैसे आणून देतो म्हणाला.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी श्रीनीच्या घरी पोचलो. श्रीनीबरोबर घरातला जिवंतपणाही गेला होता. श्रीनीचा एक मोठा फोटो लावलेला होता. फोटोला प्लॅस्टिकचा हार. श्रीनीची दोन्ही मुलं समोर पलंगावर पुस्तकांच्या पसाऱ्यात अभ्यास करत बसली होती.
खुद्द श्रीनीच्या बायकोकडे बघवत नव्हतं. उदास खोल गेलेले डोळे, निस्तेज चेहरा. महिन्यात दहा किलोनं वजन घटलं असावं.
काय बोलावं, कोणी बोलायला सुरुवात करावी, हेच समजेना. नव्वदीची एक आजी उगाचच माझ्याकडे एकटक बघत होती. श्रीनीची बायको समोर खुर्चीवर फरशीकडे डोळे लावून.
मीच उठलो. पैशाचं पाकिट हातात देत म्हटलं ः 'रेड्डीने दिया. गिन लो!'' दोन-दोन हजाराच्या नऊ नोटा होत्या त्या. तिनं प्रश्नार्थक चेहऱ्यानं माझ्याकडे पाहिलं. 'रेड्डीने बताया, की पहले के भी आठ हजार देना बाकी था.''
मिनिटभर भयाण शांततेत गेलं. श्रीनीची बायको स्फुंदायला लागली. मोठ्या मुश्‍किलीनं ती मोठ्यानं रडणं आवरत होती. तिचं बघून मुलगी रडू लागली. मग मुलगा. आजी दोघांना घेऊन आत गेली.
'अण्णय्या, मेरे कू मालूम नै, किसको कित्ता पैसा दिया. ये तो मै पैसे कु लेकर झगडा की, तो बोले आज रेड्डी कू दस दिया, नै तो तेरेको देता था.''
'ऑफिसमध्ये विचारतो सगळ्यांना'' एवढंचं मी बोलू शकलो. सहज म्हणून मी विचारलं ः 'वो पीपीएफ के पैसे का देखा क्‍या?''
'वो तुम्हारे आफिसने फार्म भेजा है, तुम जरा देखते क्‍या?''
आतून जाऊन तिनं आमच्या ऑफिसचं मोठं पाकीट आणलं. ग्रॅच्युईटी, सुपरएन्युएशन, कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी या सगळ्यांचं व्यवस्थित वर्गीकरण, त्या महिन्याचा पूर्ण पगार, ऑफिसकडून मदत म्हणून एक रक्कम असे व्यवस्थित कागद त्यात होते. एक दिवस माझ्या अनुपस्थितीत असंच पाकीट माझ्याही घरी येईल?
'ये ही फार्म भरने का ना?''
'नही ये नही. ये कंपनीका पीएफ है, इसको ईपीएफ बोलते है. दुसरेवाला, जिसको पब्लिक प्रॉव्हिडंट फंड बोलते है, वो''

श्रीनीचं पीपीएफ अकाऊंट होतं, हे मला पक्कं माहीत होतं. दोन वर्षांपूर्वी "पीपीएफ अकाऊंटचे फायदे' यावर त्यानं तासभर माझं डोकं खाल्लं होतं. तिला काहीच कळलं नाही. रडके डोळे माझ्यावर रोखत ती अगतिकपणे म्हणाली ः 'अण्णा, मेरे कू कुछ बी नयी मालूम'' आणि ती ओक्‍साबोक्‍शी रडायलाच लागली. रडतच आत गेली आणि कपाटातली बरीच कागदपत्रं टॉवेलमध्ये गुंडाळून घेऊन आली. त्या कागदपत्रांत मला पीपीएफचं पासबुक सापडलं. एक नाही, चक्क दोन! एक स्वत:च्या नावाचं आणि दुसरं मुलीच्या नावाचं!
चार सेव्हिंग बॅंक अकाऊंटही होती; पण सगळी वर्षभरापूर्वी "अपडेट' केलेली. मग लक्षात आलं, आजकाल सारीच कामं मोबाईलवर होतात, बॅंकेत जातंय कोण? मी त्याचा मोबाईल मागितला. अपेक्षेप्रमाणे, सगळ्या बॅंकांची ऍप्स होतीच; पण शेअरबाजाराचं आणि म्युच्युअल फंडांचंही ऍप होतं! यातही याची गुंतवणूक असणार. सारी ऍप्स "पासवर्ड'नं संरक्षित! मोबाईलचा पासवर्ड शोधणं वा काढणं एकवेळ सोपं; पण बॅंकांचे पासवर्ड कसे काढणार? मी अगतिक झालो.
'कैसा करने का, अण्णय्या?'' 'मै देखता हूँ, किसी को पुछ के''
त्वरेनं घराबाहेर पडलो. उद्विग्न झालो होतो. नव्या तंत्रज्ञानाचे जेवढे फायदे, तेवढेच तोटे. या बाईंचे पुढचे सहा महिने निरनिराळ्या ऑफिसांमध्ये खेट्या मारण्यात जाणार, हे समोर दिसत होतं; पण स्पष्ट सांगायची हिंमत नव्हती.
बॅंकांना कागद, पुरावे, प्रमाणपत्रं, प्रतिज्ञापत्रं यांची भाषा कळते. बॅंका भावनांवर चालत नाहीत, त्यांची कागदपत्रांची भूक भागवताना प्रचंड मनस्ताप होत असतो.
छ्या! आपले सगळे आर्थिक व्यवहार बरेच पुरुष बायकोला सांगत का नाहीत? अकाऊंटमध्ये इतकी वर्षं काढलेल्या श्रीनीला आपल्या बायकोला सगळे व्यवहार सांगायला काय अडचण होती? आत्ता या क्षणी त्या बाईला आयुष्यातल्या पुढच्या आर्थिक संकंटाचा सामना एकटीलाच करायचा होता, आणि आर्थिक आघाडीवरच्या कुठल्याही बाबीविषयी ती या क्षणी तरी अनभिज्ञ होती. नवरा आयुष्यभर पुरणार आहे, हा तिचा समज की आपण आयुष्यभर टिकणार आहोत, हा नवऱ्याचा फाजील आत्मविश्वास?
श्रीनीच्या घरून निघालो. घरी जावंसं वाटत नव्हतं. उदास उदास वाटतं होतं. जवळच्या एका बाकावर नुसताच बसून राहिलो.

श्रीनीचं एक बॅंक-पासबुक फार जीर्ण होतं. अकाऊंट सुरू केल्याचं वर्ष होतं! श्रीनी अजूनही त्या खात्यात देवघेव करत होता. मला पहिली नोकरी मिळाली, तेव्हा कंपनीनं माझं "सॅलरी अकाऊंट' एका छोट्या बॅंकेत काढलं होतं. लग्न झालेलं नव्हतं, मी "नॉमिनी' म्हणून आईचं नाव टाकलं होतं. मी आजही ते खातं चालू ठेवलं आहे. बऱ्यापैकी शिल्लक त्या खात्यात अजूनही आहे.
अचानक मला जाणवलं, आई जाऊन चार वर्षं झाली, आपल्या लग्नाला इतकी वर्षं होत आलीत, अजूनही त्या खात्यावर "नॉमिनी' आईचं आहे! ऊद्या आपल्याला काही झाले, तर?
चर्रर्र झालं. दुसऱ्याचे दोष ठळकपणे दिसत होते, आपलं काय? आपल्या बायकोचं काय? तिला काय माहिती आहे? या जगाच्या अंतापर्यंत आपण जिवंत राहणार आहोत, हा फाजील आत्मविश्वास मलातरी कशातून आला? आपला कधीच "श्रीनी' होणार नाही, असं का वाटतं?
मग मात्र गडबडलो. तिथूनच, बायकोला फोन केला. 'अगं, त्या विजानं ते पंचेचाळीस हजार अजूनही परत केले नाहीत.''
'त्याचं आत्ता काय?''
'सुधीरला दिलेले पंधरा, आता तीन वर्षं झाले तरी परतवले नाहीत त्यानं.'' 'काय झालंय तुम्हाला?''
'लग्न झाल्या-झाल्या तुला कायनेटिक होंडा घेऊन दिली होती, ते आठवतंय? त्या कायनेटिकचा नंबरच मी सगळ्या बॅंकांच्या ऍपवर पासवर्ड म्हणून वापरतो.''
'तुम्ही फोनवर का सांगताय हे? घरी आल्यावर निवांत सांगा.''
आता हिला कसं सांगू, की संध्याकाळी सात वाजता, "साडेसात बजे पहुंचकर मै सिरफ थोडासा कर्डराईस खाऊंगा' असं म्हणणारा श्रीनी साडेसातला जिवंत घरी पोचू शकला नव्हता.

'मला बऱ्याच गोष्टी तुला सांगायच्यात...'' 'घरी या, निवांत बोलू. तुमच्या ना काही गोष्टी मला कळतच नाहीत,'' फोन ठेवत बायको म्हणाली.
तुला माझ्या बऱ्याच गोष्टी कळत नाहीत? मलाच माझ्या काही गोष्टी, चुका आज कळतायत.
...खरंतर, बऱ्याच नवऱ्यांना अजूनही कळत नाहीत!