घोंगड्या! (रवी वाळेकर)

ravi walekar
ravi walekar

सहामाहीच्या शेवटच्या परीक्षेनंतर सरांनी मला ‘टीचर्स रूम’मध्ये बोलावलं आणि एक चिठ्ठी माझ्या हातात देऊन सांगितलं : ‘‘ ही चिठ्ठी वडिलांना दे. नागपुरात भाषणाची स्पर्धा आहे. तीत तू भाग घे. जायचं भाडं आपल्याला भरायचं आहे. तुझ्या वडिलांना काही ते जास्त नाही.’’

‘‘घोंगड्या लै डेंजर हाये बर्का...’’ आमच्याच वाड्यात राहणाऱ्या सातवीतल्या सुनीलदादानं मला मौलिक माहिती पुरवली होती.
‘‘त्याच्याशी एकदम नीट राहायचं. आमच्या वेळी ४६ जणांना त्यानं पहिल्याच घटकचाचणीत नापास केलं होतं.’’
‘‘बाप रे! किती जण होते तुमच्या वर्गात?’’ मी भीत भीत विचारलं.
‘‘४७!’’
पोटात गोळाच आला.
त्या सरांचं आडनाव चांगलं दोनअक्षरी होतं; पण हे ‘घोंगड्या’ असं त्यांना का म्हणायचे कुणास ठाऊक. शाळेतले सगळेच ‘दादा’ त्यांना ‘घोंगड्या’च म्हणायचे म्हणून आम्हीही तसंच म्हणायला लागलो.

प्राथमिक शाळेची टेकडी पार करून माध्यमिक शाळेच्या डोंगरावर चढायला नुकतीच सुरवात झाली होती. शाळेचा गणवेश, टैमटेबल, ‘म्याय कम्मिंग, स्स्सर?’ असं इंग्लिशमध्ये विचारणं याचं भलतंच अप्रूप वाटत होतं.
प्राथमिक शाळेत हे सारं नव्हतं. गणवेश वगैरे फालतू भानगडी नव्हत्या. पूर्ण कपडे घालून जाणं हेच खूप होतं. पवार गुरुजी एकटे सगळा वर्ग हाकायचे. सरकारी कामांमधून वेळ मिळाला तर अधूनमधून शिकवायचेही! ‘पारथमिक शाळा’ असा खरा उच्चार असलेल्या या शाळेत चार वर्षांत मी, ‘गायी पाण्यावर काय म्हणुनी आल्या’ ही कविता आणि १२ पर्यंतचे पाढे एवढंच शिकल्याचं आठवतं. चार वर्षं वर्गात इतर काय शिकलो ते काहीच आठवत नाही.
वर्गात नसेल; पण ‘डबा खायच्या’ आणि ‘लघ्वीच्या सुट्टी’त मात्र बरंच ज्ञानसंपादन व्हायचं.

रिठ्याच्या बिया घासून घासून गरम करून चटका कसा द्यायचा... अंगठ्याला थुंकी लावून आणि अंगठा चार बोटांच्या मध्ये घुसवून बुक्की कशी मारायची...पोट खपाटीला जाईपर्यंत कागदी विमानाच्या शेपटात फुंक मारून ते सगळ्यांपेक्षा वर कसं उडवायचं...भिंगानं कागद कसा जाळायचा...पडलेल्या दाताचा योग्य उपयोग कसा करायचा... भळभळणाऱ्या जखमेवर एका दिवसात खपली धरण्यासाठी काय करायचं...अशा अनेक गोष्टी गुरुजींनी न शिकवता आणि गुरुजींना न कळू देता शिकलो.
निव्वळ तिरस्कार करण्यासाठीच जणू देवानं निर्माण केलेल्या ‘मुलगी’नामक प्राण्यापासून दूर कसं राहायचं...कधीकाळी एखाद्या ‘फिंद्री’च्या मागं बसावंच लागलं तर संबंधित मुलीला कळूही न देता तिच्या वेण्यांच्या ‘रिबणी’ एकत्र करकचून कशा बांधायच्या अशा बऱ्याच मौलिक गोष्टी शिकता शिकता शाळेतली पहिली चार वर्षं कशी निघून गेली ते कळलंही नव्हतं.
पवार गुरुजींचं एक बरं होतं. ‘हजेरी’ घेतली की ते एखादा धडा वाचायला वा कविता पाठ करायला सांगायचे आणि आपल्या लिखाणाच्या कामाला लागायचे. ते त्यांच्या कामात आणि आम्ही आमच्या कामात! एकमेकांना काडीचाही त्रास देत नसू. वर्षातून एकदा ‘इनसपेक्टर सायेब’ नावाचा फाजील इसम येई. तो यायच्या आधीचा आठवडा फक्त थोड्या हाल-अपेष्टा काढाव्या लागायच्या!
पवार गुरुजी अधूनमधून छड्या वगैरे मारायचे; पण त्याचं काही विशेष नव्हतं. ते देत असलेल्या शिक्षांपैकी खरी मोठी शिक्षा असायची ती दोन मुलींमध्ये बसवलं जाण्याची शिक्षा! सगळी मुलं तिरप्या डोळ्यांनी बघत तोंडावर हात ठेवून हसायची आणि शिक्षा मिळालेल्या मुलाला मेल्याहून मेल्यासारखं व्हायचं. लहान होतो, समज नव्हती. त्या वयात ती शिक्षा वाटायची! (पुढं कॉलेजात आल्यावर, दोन बुकं जास्त शिकून पवार गुरुजी आपल्या वर्गावर ‘प्रोफेसर’ म्हणून यायला हवे होते असं राहून राहून वाटायचं.)
***

माध्यमिक शाळेला ‘हाय्स्कूल’ म्हणायचं हे नव्या शाळेच्या पहिल्याच दिवशी समजलं. शाळेत कधी झिपऱ्यांची शुद्ध नसलेल्या गुरुजींच्या साऱ्या शिष्या इथं दोन वेण्या घालून, एकसारख्या लाल रंगाच्या रिबिनी लावून एकदम झोकात! स्नो-पावडर लावून, कपाळावर टिकली लावून, डोक्याला खोबरेल तेल चोपडून आलेल्या. ‘प्राथमिक’मध्ये निळ्या गणवेशात असणाऱ्या कित्येकींना तर इथं ‘माध्यमिक’मध्ये आम्ही पहिल्या दिवशी ओळखलंही नाही! मुलांची अवस्थाही वेगळी नव्हती. दोन्ही खिशांतल्या गोट्या, चिंचा, विट्ट्या यांच्या वजनानं चड्डीची बटणं तुटली तरी पर्वा न करणारी पोरं इथं स्वच्छ पांढरा शर्ट निळ्या चड्डीत खोचून, ‘जंगणमन’ला चप्पल घालून रांगेत हजर!
इथं संपूर्ण नाक स्वच्छ असलेला विज्या ढगे याला (मूळ उच्चार : इजा ढग्या!) पवार गुरुजींनी तर सोडाच; खुद्द इजाच्या टेलर बापानंसुद्धा ओळखलं नसतं!
‘‘ही काही धर्मशाळा नाही. कधीही यायचं आणि कधीही जायचं असं इथं चालणार नाही. वर्गात येताना ‘म्याय कमिन सर’ असं विचारायचं,’’ पहिल्याच तासाला पहिलेच ‘सर’ कडाडले!
गुरुजींचे इथं ‘सर’ झाले होते. ‘काटकसर’ हा शब्द त्या काळी सगळीकडं ऐकू यायचा; त्यामुळं या ‘हायस्कुला’त ‘काटक’ नावाचे एखादे सरं असावेत असं उगाचंच वाटून गेलं; पण तसं नव्हतं.
‘काटक सर’ असे कुणी सर नव्हते. मात्र, हे पहिल्याच तासाला आलेले सर भलतेच ‘राकट सर’ होते हे खरं!
आपण आता इंग्लिशमध्ये बोलायला लागलो, या आनंदात पहिला दिवस मस्त गेला.
दुसऱ्या दिवशी ‘जंगणमन’ आणि ‘पारथना’ संपवून बेंचवर बसलोच होतो की सर आले. मी नुकताच पाच काडीपेट्यांवरच्या चित्रांच्या बदल्यात दोन रिकाम्या सिगारेट-पाकिटांचा ‘व्यवहार’ आटोपला होता. ही सिगारेटची पाकिटं वेगळी होती. आमच्या गावात ती सिगारेट कुणी ओढत नव्हतं; त्यामुळे दुर्मिळ खजिनाच मला मिळाला होता. मात्र, व्यवस्थित ‘डील’ झाल्याची खुशी दोन कानांच्या मधल्या भागावर आरपार पसरली होती!
‘‘हसतोस काय रे फिदी फिदी?’’
सर मलाच उद्देशून विचारत होते. ते वर्गात आले तेव्हा मी ओणवा होऊन मागच्या बाकावरच्या एकाशी ‘१२ चिंचोक्यांच्या बदल्यात ३ सागरगोटे’ अशा महत्त्वाच्या वाटाघाटी करत होतो. सर वर्गात आले तरी मी फारसं लक्ष दिलं नाही. त्यांना सागरगोट्यांत काय इंटरेस्ट असणार?
‘‘नाव काय रे तुझं?’’ मी खरं तर कालच नाव सांगितलं होतं; पण उगाच द्विपक्षीय संबंध बिघडू नयेत म्हणून परत सांगितलं. त्यांनी काल सांगितलेलं त्यांचं नाव मी लक्षात ठेवलं होतं आणि यांना माझं नाव आठवू नये? असतात काही जण विसरभोळे!
त्यांचं खरं नाव आणि ‘घोंगड्या’ हे टोपणनाव अशी दोन्ही नावं माझ्या लक्षात होती. ‘घोंगड्या सर’ म्हटलो असतो तर मजाच आली असती!
‘‘घरी कुणी आलं तर असंच दाताड दाखवतोस का?’’
मी ‘नाही’ म्हणालो खरा. कारण, तेच उत्तर त्यांना अपेक्षित होतं; पण मी खरंच घरी कुणी आलं तर काय करतो हेच मला आठवत नव्हतं!
ते एवढं महत्त्वाचं असेल असं कधी वाटलंच नव्हतं.
‘‘मग? मग काय करतो?’’
मी खरंच यावर कधीच विचार केला नव्हता.
‘‘काहीच नाही!’’
‘‘काहीच नाही? तू मूर्ख आहेस...’’
हे तर मी घरीही सकाळ-संध्याकाळ ऐकलेलं असायचं; त्यामुळे अमान्य असायचं काही कारणच नव्हतं.
‘‘आता तुम्ही सगळे मोठे झालात. हायस्कूलमध्ये आलात. वर्गात सर आले की ‘गुड मॉर्निंग, सर’ असं म्हणायचं. काय?’’
मग, त्या दिवशीची गुड मॉर्निंग ही पार गुड इव्हिनिंग होईपर्यंत आम्ही सगळेजण सामुदायिकरीत्या ‘गुड मारनिंग, स्स्सर’ असं घोकत राहिलो!
सर इंग्लिश शिकवायचे.
पुढचा आख्खा महिना या सरांनी आम्हाला सळो की पळो केलं. घामाघूम केलं.
या सरांचा वेग भन्नाट होता. आम्हीही त्यांच्या वेगानं पळावं ही त्यांची अपेक्षा! आम्ही बैलगाडीत, तर हे मोटारसायकलवर!
‘चला, पळा माझ्या बरोबरीनं!’ मग त्यांच्या मोटारसायकलची बरोबरी करता करता आम्हाला ते फरफटत न्यायचे. आमची दाणादाण, धावाधाव व्हायची. घटोत्कच पडल्यावर कौरवसेनेची जशी झाली होती तशी! बैल कुठं, गाडी कुठं, कासरा कुठं, चाबूक कुठं आणि आम्ही कुठं! अरारा...एकदम दैन्यावस्थाच! आम्हा मस्तवाल बैलांची केविलवाणी गोगलगाय होऊन जायची पार...
कुठून अवदसा आठवली आणि चौथी पास झालो असं वाटायचं.
काही जण तर संध्याकाळी पवार गुरुजींच्या घरी जाऊन, परत चौथीचं काही जमतंय का याची चाचपणीही करून आले!
***

‘‘ए, बी, सी, डी...किती शिम्पल आहे रे गधड्यांनो. तुमच्या क, ख, ग, घपेक्षा किती सोपं. काय?’’
सगळे ‘गधडे’ निमूटपणे माना डोलवायचे!
सिम्पल या साध्या शब्दाला हे ‘शिम्पल’ का म्हणत असावेत? पण, विचारायची सोय नव्हती!
‘‘नंदीबैलासारखे माना काय डोलावताय?’’
‘गधडे’ की ‘नंदीबैल’ यांतले आपण नक्की कोण याचा विचार करत असतानाच फर्मान सुटायचं : ‘परवा, सोमवारी चाररेघी वहीत पाच वेळा सगळे अल्फाबेट्स लिहून आणा.’’
एक कोमेजलेला, धारातीर्थी पडलेला रविवार डोळ्यांसमोर यायचा. खरं तर रविवारी शेजारच्याच गल्लीतल्या पोरांबरोबर ‘टेस्ट म्याच’ ठरवलेली असते. आता कॅन्सल केली तर ती पोरं गावभर ‘शेपूट घातली रे’ असा गवगवा करणार!
बरं, चाररेघी वही आणणं म्हणजे काही कमी दिव्य नसायचं! अगोदर आईला पटवावं लागायचं. मग तिच्या ‘कोऱ्या पानांची वही आहे ना? तीवर चार रेघा मारून घे...ताईच्या गेल्या वर्षीच्या वह्यांमध्ये काही पानं सापडतात का बघ...’ अशा अलौकिक सूचनांनुसार खिंड लढवावी लागायची. जिंकलो तर जेवताना वहीची केस हायकोर्टात पोचायची!
‘‘शाळा सुरू होतानाच घ्यायला काय होतं रे? रोज हे घ्यायचं आणि ते घ्यायचं...शाळेला सांग, आमच्या वडिलांचा सगळा पगार शाळेतच जमा करून घ्या दर महिन्याला. घेत राहा काय घ्यायचंय ते...’’
हे सगळं मुकाट्यानं ऐकून घेऊन पैसे मुठीत घेऊन दुकानाकडं पळायचं. दुकानदाराकडं तसली चाररेघी वही संपलेली नसेल तर हायसं होऊन, जाताना केलेला नवस फेडण्यासाठी, येताना मारुतीला जाऊन यायचं!
अल्फाबेट कसेबसे पाठ झाले तर ‘ए, ई, आय, ओ, यू’ हे पाच स्वर अगदी हैराण करून टाकायचे. मग टेन्शन द्यायला ‘टेन्स’ आले! त्यातही प्रत्येक काळाचे तीन तीन प्रकार! खरं तर, एकदा ‘पास्ट’ झाला म्हणजे पास्ट झाला. पुन्हा त्याचे तिन्ही प्रकार ‘प्रेझेंट’मध्ये कशासाठी? ‘फ्युचर’चे तीन प्रकार जेव्हा फ्युचर येईल तेव्हा बघू! ‘प्रेझेंट’मध्ये हा चोंबडा कशासाठी लुडबूड करतोय?
पण हे सगळं बोलायची चोरी होती. कारण,
‘शिम्पल आहे रे, गधड्यांनो’ असं ५४ गधड्यांचे सर तासाला दहादा म्हणायचे!
‘‘एकदा तुम्हाला ए, ई, आय, ओ, यू’ समजलं ना की ‘तुम्हाला इंग्लिश येत नाही’ असं म्हणायची कुणाच्या बापाची हिंमत नाही!’’
हे जे कुणी, ‘कोण आणि त्याचा बाप’ होते त्यांना आमच्या इंग्लिश शिकण्यात एवढा का रस होता ते समजायचं नाही; पण ते बाप-लेक पुढच्या आठवड्यात परत वर्गात हजर असायचे!
‘‘सी कधी वापरायचं, के कधी आणि एस कधी वापरायचं एवढं आलं ना की ‘तुम्हाला इंग्लिश येत नाही’ असं म्हणायची कुणाच्या बापाची हिंमत नाही!’’
हे बाप-लेक परत आमच्या मानगुटीवर!
पहिल्या काही महिन्यांतच, आता झालं एवढं शिक्षण पुरे करावं आणि कामधंद्याला लागावं, असं आमच्यातल्या बऱ्याच जणांना वाटू लागलं. ‘चौथी पास’ हे काही कमी शिक्षण नाही. कित्येक जण एवढंही शिकत नाहीत.
गोट्या, विटी-दांडू, पतंग, लपाछपी, लिंगोरच्या आणि मुख्य म्हणजे क्रिकेट यांचा बळी देऊन पाचवीला आम्ही थोडं फार इंग्लिश शिकलो आणि ‘सहाव्वी’ला आलो.
***

घोंगड्याला दिव्य सिद्धी प्राप्त आहे यावर आम्हा विद्यार्थ्यांमध्ये मे महिन्याच्या सुटीत एकमत झालं. ज्या पोरानं अभ्यास केलेला नसतो त्यालाच तो नेमका प्रश्न कसा विचारतो? आपण रविवारी ‘म्याच’ ठरवली की याला कसं कळतं? नेमका त्याच शनिवारी जास्तीचा ‘एचडब्ल्यू’ कसा देतो?
सहावीला तर घोंगड्यानं कहरच केला. वर्गात म्हणे इंग्लिशमध्ये बोलायचं, दुसरी भाषा चालणारं नाही! परिणाम? टॉयलेटला जाणाऱ्यांच्या संख्येत प्रचंड घट झाली! उगाच इंग्लिशचा खून नको आणि डोक्याला ताप नको म्हणून बरेच जण बेंबीला थुंकी लावून स्थितप्रज्ञासारखे बसायचे. बरेच जण जबड्यात कापसाचा मोठा बोळा घालून बसू लागले. सरांनी विचारलं तर ‘टीथ इज पेन’ असं लिहून देऊन ‘पेन’ नसलेल्या बाजूला मुस्काडात खाऊ लागले! इंग्लिश बोलण्यापेक्षा एक मुस्काडात खाल्लेली कधीही बरी!
तरीही सर हिरीरीनं शिकवतच राहिले. सगळ्या वर्गाला ‘शॅम्पेन’चं स्पेलिंग बरोबर आलं तेव्हा तर ते नाचायचेच बाकी होते! त्या आनंदात त्यांनी दुसऱ्या दिवशी ‘झेकोस्लोव्हाकिया’चं स्पेलिंग पाठ करून यायला सांगितलं!
‘घोंगड्यावर कुणीतरी ‘चेटूक’ केलंच पाहिजे,’ यावर त्या रात्री आम्हा चार-पाच मित्रांमध्ये एकमत झालं; पण हे ‘चेटूक’ नेमकं कोण करतो हे आमच्यापैकी कुणालाही माहिती नसल्यानं ‘घोंगड्या’ वाचला!
सहावीच्या दिवाळीच्या सुटीत नागपूरला मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिशमधून भाषणस्पर्धा होती. दोन गट. पाचवी ते सातवी ते आणि आठवी ते दहावी.
सहामाहीच्या शेवटच्या परीक्षेनंतर सरांनी मला ‘टीचर्स रूम’मध्ये बोलावलं आणि एक चिठ्ठी माझ्या हातात देऊन सांगितलं : ‘‘ ही चिठ्ठी वडिलांना दे. नागपुरात भाषणाची स्पर्धा आहे. तीत तू भाग घे. जायचं भाडं आपल्याला भरायचं आहे. तुझ्या वडिलांना काही ते जास्त नाही.’’
‘‘सर! ते भाड्याचं ठीक आहे; पण...’’
‘‘तू काळजी करू नकोस. मी भाषण लिहून देतो. तू सुटीत सराव कर. एकदम शिम्पल आहे रे...’’
त्यांनी ‘गधड्या’ हा शब्द निग्रहानं घशातून परतवला होता हे जाणवलं.
घरच्यांनी ना म्हणायचा प्रश्नच नव्हता. यथावकाश नागपूरला गेलो. मुखोद्गत केलेलं ‘सरांचं भाषण’ पोपटासारखा तिथं ‘बोललो’.
निर्णय नंतर जाहीर केला जाणार होता; पण मला काही त्याची काळजी नव्हती. भूगोलात वाचलेलं ‘नागपूर’ आता मी प्रत्यक्ष पाहिलं होतं. नागपूर पाहणारा शाळेतला मी पहिलाच!
***

दुसरी सहामाही सुरू झाली. नागपूरहून काहीच उत्तर आलं नव्हतं. फक्त विजेत्यांना कळवलं जात असावं. नंतर मी ती स्पर्धा विसरूनही गेलो.
पंधरा-वीस दिवस गेले असावेत. रात्री साडेदहाला एक माणूस तार घेऊन घरी आला. सगळे काळजीत. त्या काळी तार येणं अशुभसूचक! त्यात एवढ्या रात्री...!
वडिलांनी तार घेतली.
वाचली.
माझ्याकडं डोळे रोखत म्हटलं :
‘‘नागपुरात जिंकलास रे तू! तुझ्या गटात तू राज्यात पहिला आला आहेस!’’
आई तर आनंदानं रडायलाच लागली. मला काहीच उमजेना.
वडील उठले. मला म्हणाले :‘‘चल, शाळेचा गणवेश घाल.’’
मग आईकडं वळून म्हणाले : ‘‘कागदात साखर बांधून दे!’’
आम्हाला दोघांनाही काहीच कळलं नाही! रात्रीचे अकरा वाजले होते.
‘‘चल, तुझ्या सरांच्या घरी जाऊ. ही बातमी पहिल्यांदा ऐकायचा मान त्यांचा आहे!’’
सगळं गाव साडेआठ-नऊला झोपतं. आमच्या मोटारसायकलच्या आवाजानं सरांची आख्खी गल्ली उठली. मोटारसायकल असणं ही फार मोठी गोष्ट होती त्या काळी. गावात फक्त दोनच मोटारसायकल होत्या. त्यातली एक आमची!
डोळे चोळतच सरही बाहेर आले. फाटका बनियन आणि विटक्या पायजम्यात ते ओळखू येत नव्हते.
वडील बँकेत मोठ्या हुद्द्यावर होते. वडिलांकडं बघताच ते म्हणाले :
‘‘काय झालं, साहेब?’’
वडिलांनी साखरेची पुडी त्यांच्या हातात दिली.
‘‘नाही समजलं, साहेब!’’
वडिलांनी तार त्यांच्या हातात दिली.
तार वाचताच सर अतिशय भाववश झाले. त्यांना रडू फुटल्यासारखं झालं. भर ओसरल्यावर मला जवळ घेत, डोक्यावर हात फिरवत ते म्हणाले : ‘‘तुला सांगितलं नव्हतं? ‘शिम्पल’ आहे रे....’’
त्यांचा आवाज पुन्हा कातर झाला.
वडिलांनी मला खूण केली. मी सरांच्या पायांना हात लावून नमस्कार केला.
त्यांनी ‘नको रे, नको रे’ म्हणत मला उचलत छातीशी कवटाळलं.
‘‘सर, मला इंग्लिश येत नाही, असं कुणाचा बाप आता म्हणू शकत नाही!’’
‘‘खरं आहे रे पोरा...’’
आम्हाला कर्दनकाळ वाटणाऱ्या ‘घोंगड्या’चं हे वेगळंच रूप मी पाहत होतं. अशा सरांना आपण ‘घोंगड्या’ म्हणतो याची जाणीव होऊन मी मनातल्या मनात खूपच खजील झालो.
ते पाठीवर हात फिरवत असताना मला जाणवलं, की आई-वडिलांनंतर मुलाला जवळ घ्यायचा हक्क खरंच शिक्षकाचाच असतो!
शिम्पल आहे! नाही का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com