rohini ninawe
rohini ninawe

स्वतःवरती प्रेम कर..! (रोहिणी निनावे)

आज जागतिक महिला दिन. एकीकडे स्त्री यशाच्या अनेक शिड्या चढत असताना, दुसरीकडे ॲसिड हल्ल्याचीही शिकार होताना दिसते. एकीकडे घरच्यांचं सुख बघताबघता स्वतःचं सुख कुठं आहे हेही विसरून जाते. एकीकडे पूजली जात असताना दुसरीकडे शिकारही होते. या स्त्रीची बलस्थानं, तिची स्थिती, तिची ओझी, तिच्यातल्या क्षमता, तिच्यावरची बंधनं आदींबाबत चर्चा आणि ‘स्वतःवरही प्रेम करण्याचा’ एक मंत्र.. आजच्या या खास दिवसानिमित्त.

स्त्री जन्माला येते, तेव्हा अनेक घरांत फारसा उत्साह नसतो.. आणि तिचा जेव्हा मृत्यू होतो.. तेव्हा तिच्या खोलीत सापडतात काही वस्तू. तिनं मायेनं विणलेल्या आठवणी. तिच्या हातांनी दिवसरात्र कष्ट केल्यानं सजलेली एक न एक भिंत. कुठल्याही परिस्थितीत तिच्या हसत राहण्यानं  उमलत, दरवळत राहणारी फ्लॉवर पॉटमधली कागदी फुलं... इस्त्रीच्या घडीसारखं तिनं आवरून ठेवलेलं घर, कॅलेंडरवर तिनं केलेल्या नोंदी. फ्रीजवर तिनं चिकटवलेला रोजच्या मेन्यूचा चार्ट. टिपून ठेवलेले महत्त्वाचे नंबर, भाजीवाल्याशी केलेली घासाघिस, लॉंड्रीवाल्याशी घातलेली हुज्जत, येणाऱ्या पाहुण्यारावळ्यांचं अगत्यानं केलेलं स्वागत... आणि तिची अशी एक अदृश्य खोली! कारण आजही तिला अगदी मोकळेपणानं, तिच्या मनासारखं जगायचं असेल, तर सगळ्यांपासून लपून जगावं लागतं. तिनं स्वतःसाठी निर्माण केलेल्या छुप्या खोलीच्या दाराआड तिचं तिचं एक वेगळं जग असतं...कपाटाच्या ड्रॉवरमध्ये सापडतं तिचं मनमोकळं हसू... बिनधास्त फाटकी जीन्स घालून.. बेभान डान्स करायची ऊर्मी, घराबाहेरच्या जगात ‘मला पण माझं मीपण शोधायचं आहे, साजरं करायचं आहे,’ हे ओरडून सांगू पाहणारं.. एक व्याकुळ मन.  

किती घरात स्त्रीच्या मनातली ही खोली दिसते घरातल्यांना? का गरज पडते आपल्याला महिला दिनाचा समारंभ करण्याची?... सरसकट सगळ्या कुटुंबांत नाही; पण आजही अनेक घरांत स्त्रीला गृहीत धरलं जातं. सो कॉल्ड आधुनिक घरांतही!
पुरातन काळापासून स्त्री हे शक्तीचं रूप मानलं जातं. स्त्रीला ‘कधी मेणाहून मऊ, तर कधी वज्राहून कठोर’ म्हटलं जातं; पण स्त्रियांच्या उत्कर्षाविषयी आणि त्यांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीविषयी बोललं, की मग मात्र ‘स्त्रीवादा’चं लेबल लावलं जातं. तिची, तिच्या विचारांची, तिच्या यशाची टिंगल टवाळी केली जाते. स्त्री कर्तृत्व क्षेत्रात पुरुषापेक्षा अधिक पुढे गेली, की तिचं कौतुक करण्याऐवजी तिची बदनामी केली जाते.

अनेक भूमिकांची ‘मान’करी
स्त्रीला अनेक भूमिका निभवाव्या लागतात. आई, बहीण, मुलगी, सून, काकू, मावशी, ऑफिसमधली कर्मचारी आणि इतर किती तरी. ती सतत या भूमिकेमधून त्या भूमिकेमध्ये जात असते. पुरुष म्हणतील : ‘मग काय झालं आम्हीसुद्धा या सगळ्या भूमिका निभावतो.’...हो, पण प्रश्न आहे अपेक्षांचा. स्त्रीकडून प्रत्येक नातं खूप अपेक्षा करतं. प्रत्येक गोष्ट तिनं अचूक केली पाहिजे. तिच्या हातून चूक होता कामा नये... सगळे ‘डूज’ अँड ‘डोंट्‍स’ हे तिच्यासाठीच आहेत.  
कितीसे पुरुष आहेत जे नोकरी करून थकून घरी आलेल्या बायकोला घरकामात, स्वयंपाकात मदत करतात? किंवा शेजारी उभं राहून चार आपुलकीच्या गप्पा मारतात? खऱ्या अर्थानं सहजीवन देतात? जे नियम घरातल्या बाईला लागू केले आहेत, ते नियम स्वतःसुद्धा पाळतात?  
सकाळी उठल्यावर अगदी दारात ठेवलेली दुधाची पिशवीसुद्धा घ्यायला नवरा, मुलं उठत नाहीत. घरातल्या गृहिणीला जसं काही आरामात बसून पेपर वाचत चहा घेण्याचा हक्कच नाही. सगळ्यांचा चहा-नाश्ता झाला, की मग बिचारी डबे, स्वयंपाक करायला स्वतःला जुंपते. घरात प्रत्येकाची आवड वेगळी असल्यानं रोज डब्यात कुठली भाजी करावी, या ‘राष्ट्रीय’ प्रश्नाला तिला सामोरं जावं लागतं. मग मुलांना सोडायला जा, आवरून नोकरीवर जा.. परत येताना पुन्हा तोच प्रश्न : ‘स्वयंपाक काय करायचा?’ मुलांची परीक्षा जवळ आली आहे, त्यांना क्लासला सोडायचं आहे... म्हणजे ही यादी संपतच नाही. हे सगळं काम स्त्रीचंच आहे हे अनेक घरांमध्ये गृहीतच धरलं जातं. मुलं, नवरे घरी आल्यावर मोबाईल, गॅजेट्स यांमध्ये डोकं खुपसून ‘चहा दे गं’, ‘खायला कर की’ अशा ऑर्डरी सोडतात. शिवाय एवढं करूनही तिला चांगलं टापटीप राहावं लागतं, नवरा-मुलाला शोभेल असं!

प्रेझेंटेबल राहण्याचंही ओझं
आजच्या जगात मेंटेन्ड राहावं लागतं. मग वेळात वेळ काढून जिम, झुंबाच्या क्लासला जाण्याचा द्राविडी प्राणायाम! मुलांच्या शाळेतल्या पेरेंट्सचे ग्रुप्स, सोसायटीमधले ग्रुप, नातेवाईकांचे, ऑफिसमधले ग्रुप्स असे अनेक व्हॉट्सॲप ग्रुप मॅनेज करायचे. शिवाय उत्तर दिलं नाही, तर ‘शिष्ट कुठची’ अशी ‘फुलं’ तिला वाहिली जातातच. ऑफिसमध्ये टिकून राहायचं. दिलेली कामं पूर्ण करायची.. पुरुषांच्या सेक्स हॅरॅसमेंटला सामोरं जायचं, बरोबर काम करणाऱ्या स्त्री कर्मचाऱ्यांच्या असूयेला तोंड द्यायचं. शहरी भागांत हे चित्र असलं, तरी ग्रामीण भागांतल्या स्त्रीची तरी वेगळी काय अवस्था आहे? इथं नोकरी आहे, तिथं शेत आहे, इथं पोळ्या असतील, तर तिथं भाकरी आहे...पण चटके शेवटी सारखेच. इथं, तिथं सगळीकडंच!  
...अर्थात या सगळ्यांमधूनही ती आपला आनंद शोधायचा प्रयत्न करते. आपल्यातली धगधगती आग शोधून कधी अस्मानात भरारी घेते, तर कधी  कुस्तीच्या रिंगणातही ना भिता उभी राहते. आता ती फक्त ‘ती परी अस्मानीची’ किंवा ‘परिकथेतली राजकुमारी’ राहिलेली नाही. शोभेची किंवा उपभोगाची वस्तू राहिलेली नाही! असं एकही क्षेत्र नाही- ज्यात तिनं आपल्या निपुणतेची चुणूक दाखवलेली नाही.  
...आणि तितकंही  निराशाजनक चित्र नाही आपल्यापुढे. किती आदर्श आहेत- अगदी पूर्वापारपासून! आपल्याला पुढे नेणाऱ्या किती स्त्रिया होत्या .. लढवय्या होत्या. झाशीच्या राणीपासून अहिल्याबाई होळकर यांच्यापर्यंत.. सावित्रीबाई फुले यांच्यापासून ते साधनाताई आमटे यांच्यापर्यंत...  डॉक्टर आंनदीबाई जोशी यांच्यापासून ते सुनीता विल्यम्स यांच्यापर्यंत.  
राजकारण असो, विज्ञान क्षेत्र असो, अर्थकारण असो की क्रीडा क्षेत्र असो. प्रत्येक क्षेत्र स्त्रियांच्या कर्तृत्वानं झळाळून उठलं आहे.  
कर्तृत्ववान स्त्रियांची नावं घेऊ म्हटलं, तर पानं पुरी पडणार नाहीत.. तरी उत्साहापोटी मोह आवरत नाही. रमाबाई रानडे, सरोजिनी नायडू, मेरी क्युरी, मदर तेरेसा, इंदिरा गांधी, अरुण असफ अली, प्रतिभाताई पाटील, महादेवी वर्मा, इरावती कर्वे, लता मंगेशकर, शांताबाई शेळके, रोहिणी भाटे, अमृता शेरगील, अमृता प्रीतम, तस्लिमा नसरीन, अरुंधती रॉय, विजया मेहता, मेरी कॉम, पी. व्ही. सिंधू, कल्पना चावला, सानिया मिर्झा,
दुर्गाबाई खोटे, सुलोचनाबाई, स्मिता पाटील...अगदी न संपणारी यादी आहे. मग या यादीत आणखी कितीतरी नावं जोडली जात आहेत, जाणार आहेत, त्यात तुमचं नाव का असू शकत नाही?  

पंख छाटण्याचा प्रयत्न
पण वर्षानुवर्षं स्त्रीपेक्षा पुरुष श्रेष्ठ या मानसिकतेमधून मोठ्या झालेल्या काही पुरुषांना स्त्रीचं हे मोठं होणं.. पुरुषांच्याही एक पायरी वर जाणं सहन होत नाही. स्वतःला ‘पुरुष’ म्हणवणारे मग स्वतःचा पुरुषार्थ दाखवण्याचा एकच मार्ग निवडतात... स्त्रीची कुचंबणा, निर्भत्सना!! कुणी नवरा बायकोवर हात उचलतो, तिला तुडवतो, कुणी तिला नोकरी सोडायला लावतो, कुणी तिच्यावर संशय घेतो, तर कुणी तिच्या स्त्रीत्वाला मलीन करतो.  
यातूनच बलात्कार करणं, जाळून टाकणं, ॲसिड हल्ला करणं यांसारखे विकृत प्रकार घडतात.  
काम करणाऱ्या महिलांना रात्री-अपरात्री रस्त्याने प्रवास करून यावं लागतं, त्यांच्या सुरक्षेसाठी खूप काही व्यवस्था दिसत नाही. न्याय मिळत नाही. त्यामुळे समाजातल्या अशा प्रवृत्ती अधिकच सोकावलेल्या दिसतात. स्त्रियांनी घाबरून पुन्हा कोशात जाऊन दडावं, हाच त्यामागचा हेतू असतो. मुळात गरजच काय रात्री बेरात्री फिरण्याची, मेकअप करण्याची, हे असले कपडे घालण्याची म्हणून स्त्रीलाच बहुधा दोष दिला जातो, म्हणजे पुन्हा तिनंच स्वतःला मुरड घालायची, तिला हवं तसं तिनं जगायचंच नाही. अर्थात वाटेल तसं आणि वाट्टेल तसं.. यात फरक आहे.  
आणि तो बहुतांशी स्त्रियांना चांगलाच कळतो.  
...पण तूच कशी चुकीची आहेस हे वारंवार सांगून तिच्यामध्ये अपराधीपणाची भावना निर्माण केली जाते. आणि ‘माझंच काहीतरी चुकतं आहे,’ म्हणत ती गप्प होते, मान खाली घालते! ‘माझं काहीही चुकलं नाही’ असं ठामपणे सांगू शकत नाही. सगळ्या गोष्टींना मान तुकवून हो म्हणायची सवय लागली असते तिला. होकार हा सकारात्मक असेपर्यंत ठीक असतो; पण त्याचा परिणाम वाईट असेल तर नाही. मी नेहमीच म्हणते चुकीच्या गोष्टींना नाही म्हणायला शिका!

दृष्टिकोन बदलू शकता
मग आपणच कुठंतरी घरातल्या पुरुषांवर, समाजमनावर संस्कार करण्यात कमी तर पडत नाही ना, असाही विचार मनात येतो. प्रत्येक आईनं आपल्या मुलाच्या मनात त्याच्या आयुष्यातल्या प्रत्येक स्त्रीचा आदर करायला शिकवलं, तर खूप फरक पडू शकतो. आई ही मुलाची पहिली शाळा असते, असं म्हणतात मग या शाळेत हे का शिकवलं जात नाही? आईला मुलगा घरकामात मदत करायला लागला, तर उद्या बायकोलाही करेल; पण बायको ही पायातली वहाण आहे, असं आईच सांगू लागली, तर त्याच्यात काय फरक पडणार आहे? आपण शहरातले लोक जरी खूप बदलले असलो, स्त्रीचं  हे बदललेलं रोप आपण स्वीकारलं असलं, तरी गावाकडे काही ठिकाणी अजूनही स्त्रीची अवस्था बिकट आहे. ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र  देवता’ वगैरे बोलण्यापुरतंच असतं.  

आजही माझ्या परिचयाच्या काही मुली आहेत- ज्यांच्या सासवा सुनेसाठी नवीन बदल स्वीकारायला तयार नाहीत. ‘आम्ही जगलोच ना असे? मग तुम्हाला जगायला काय हरकत आहे,’ अशी वृत्ती आहे. घरात गाणं म्हणणं, पुरुषांबरोबर बसून टीव्ही बघणं, हे बेशरमपणाचं लक्षण समजतात. मग तिच्या आईचा उद्धार होतो. हे बदलायला हवं.  
आपली माध्यमं, समाजमाध्यमं याबाबतीत काय करताहेत? स्त्रीची कुठली इमेज मांडताहेत? तर आजही ती सहनशील बिचारीच दिसते. मी लेखन केलेल्या माझ्या मालिकांमध्ये- मग ती ‘दामिनी’ असो, ‘अवंतिका’ असो नाहीतर ‘राधिका’ असो- नायिकांना नेहमी संघर्ष करताना दाखवलं आहे, अन्यायाविरुद्ध लढा देताना दाखवलं आहे. तुम्ही भावनाशील असला, तर तो तुमचा कमकुवतपणा बनू देऊ नका. नेहमीच तुमच्या प्रत्येक कमकुवतपणाला, उणिवेला धार द्या... आणि तीच तुमची शक्ती बनवा, असं मी नेहमीच सांगत असते. आपण आपल्या आतल्या स्त्रीचा शोध घ्यायचा. माझ्यात काय आहे, मी कोण आहे, मला काय व्हायचं आहे याचा क्षणभर थांबून विचार करायची गरज आहे. तुलाही सुखानं जगायचं अधिकार आहे गं मुली!  
स्त्री ही अधिक सहनशील असते; पण त्याचबरोबर ती खंबीरही असते. कैकदा पुरुषांहूनही अधिक. मग बाळंतपणाच्या वेणा असोत, नाहीतर नवरा अकाली सोडून गेल्याच्या. ती सगळं काही सहन करून स्वतःच्याच राखेतून फिनिक्स पक्षासारखी भरारी घेते!
तुझं सुख तू दुसऱ्यांवर अवलंबून ठेवू नकोस.. तुझं सुख कशात आहे, हे तू तुझं ठरव. दिवसभराच्या धकाधकीतून काही क्षण चोरून तुला हवं तसं  जग. स्वतःसोबत मस्त कॉफी घे. पुस्तक वाच, कविता लिही. गाणी ऐक, गाणी म्हण. स्वतःभोवती गिरकी घे. स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला वळण दे. स्वतःच्या चित्रात इंद्रधनुष्याचे रंग भर. स्वतःबरोबरच एखाद्या ट्रिपला जा. घे एक मोकळा श्वास. तुझ्यातल्या स्त्रीला सलाम कर..!
नको दाबून ठेवूस मनातला कोंडमारा, हुंदका, नको सहन करूस अपमान आणि निर्भत्सना. मला नेहमी वाटतं, की प्रत्येक स्त्रीमध्ये एक ‘दामिनी’ लपलेली असते- बंदिस्त...तिला मोकळी वाट करून दे... आधी स्वतःचा आदर करायला शिक आणि दुसऱ्याला तुझा आदर करायला शिकव!
हे स्त्री..इतकंही कठीण नसतं हसणं.. घरातल्यांच्या आनंदासाठी लढतेस, तशी स्वतःच्या आनंदासाठीही लढ!
जाता जाता एक मी तुझ्यासाठी लिहिलेली ही कविता!

रोज एक नेम कर  
स्वतःवरती प्रेम कर..!
आरशात बघून स्वतःला  
म्हण तुझ्यासारखी नाही कुणी  
सावळी स्थूल वा असो ठेंगणी  
तू सुंदर... तू देखणी  
लाजायचं नाही देहाला  
मनाशी हे ठाम कर  
रोज एक नेम कर  
स्वतःवर प्रेम कर..!
कशी जगतेस, कशी वागतेस  
केवढी हसतेस, कशी दिसतेस  
म्हणतील शोभत नाही तुला  
या वयात केवढी नटतेस  
जे केलं नाहीस आजवर  
ते सारं मुद्दाम कर  
रोज एक नेम कर!
स्वतःवरती प्रेम कर..!
सगळे ‘नाही ‘चे  बांध तोडून  
एकदा एकटी  बाहेर पड  
बिचारेपणाची  कात टाकून  
तुझी तू नव्याने घड  
वीज तुझ्यात , तेज तुझ्यात  
मातीचे ही हेम कर  
रोज एक नेम कर  
स्वतःवरती प्रेम कर ... !

............
स्त्री ही अधिक सहनशील असते; पण त्याचबरोबर ती खंबीरही असते. कैकदा पुरुषांहूनही अधिक. मग बाळंतपणाच्या वेणा असोत, नाहीतर नवरा अकाली सोडून गेल्याच्या. ती सगळं काही सहन करून स्वतःच्याच राखेतून फिनिक्स पक्षासारखी भरारी घेते!
............
स्त्रीला अनेक भूमिका निभवाव्या लागतात. आई, बहीण, मुलगी, सून, काकू, मावशी, ऑफिसमधली कर्मचारी. ती सतत या भूमिकेमधून त्या भूमिकेमध्ये जात असते.
............
राजकारण असो, विज्ञान क्षेत्र असो, अर्थकारण असो की क्रीडा क्षेत्र असो. प्रत्येक क्षेत्र स्त्रियांच्या कर्तृत्वानं झळाळून उठलं आहे.
कर्तृत्ववान स्त्रियांची नावं घेऊ म्हटलं, तर पानं पुरी पडणार नाहीत. यादी न संपणारी आहे. या यादीत आणखी कितीतरी नावं जोडली जात आहेत, जाणार आहेत, त्यात तुमचं नाव का असू शकत नाही?
............
प्रत्येक स्त्रीमध्ये एक ‘दामिनी’ लपलेली असते- बंदिस्त... तिला मोकळी वाट करून दे... आधी स्वतःचा आदर करायला शिक आणि दुसऱ्याला तुझा आदर करायला शिकव.
.................
कितीसे पुरुष आहेत जे नोकरी करून थकून घरी आलेल्या बायकोला घरकामात, स्वयंपाकात मदत करतात? किंवा शेजारी उभं राहून चार आपुलकीच्या गप्पा मारतात? खऱ्या अर्थानं सहजीवन देतात? जे नियम घरातल्या बाईला लागू केले आहेत, ते नियम स्वतःसुद्धा पाळतात?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com