तिची ऊर्जा, तिची शक्ती! (रूपाली शिंदे)

रूपाली शिंदे
Sunday, 8 March 2020

आज जागतिक महिला दिन. एकीकडे स्त्री यशाच्या अनेक शिड्या चढत असताना, दुसरीकडे ॲसिड हल्ल्याचीही शिकार होताना दिसते. एकीकडे घरच्यांचं सुख बघताबघता स्वतःचं सुख कुठं आहे हेही विसरून जाते. एकीकडे पूजली जात असताना दुसरीकडे शिकारही होते. या स्त्रीची बलस्थानं, तिची स्थिती, तिची ओझी, तिच्यातल्या क्षमता, तिच्यावरची बंधनं आदींबाबत चर्चा आणि ‘स्वतःवरही प्रेम करण्याचा’ एक मंत्र.. आजच्या या खास दिवसानिमित्त.

आज जागतिक महिला दिन. एकीकडे स्त्री यशाच्या अनेक शिड्या चढत असताना, दुसरीकडे ॲसिड हल्ल्याचीही शिकार होताना दिसते. एकीकडे घरच्यांचं सुख बघताबघता स्वतःचं सुख कुठं आहे हेही विसरून जाते. एकीकडे पूजली जात असताना दुसरीकडे शिकारही होते. या स्त्रीची बलस्थानं, तिची स्थिती, तिची ओझी, तिच्यातल्या क्षमता, तिच्यावरची बंधनं आदींबाबत चर्चा आणि ‘स्वतःवरही प्रेम करण्याचा’ एक मंत्र.. आजच्या या खास दिवसानिमित्त.

आठ मार्च- ‘महिलादिन’. स्त्रियांनी हक्कासाठी दिलेल्या लढ्याची आठवण. स्त्री असण्याची जाणीव आत्मविश्‍वासानं व्यक्त करण्याचा दिवस. समाजाला, संपूर्ण अवघ्या जगाला स्त्रीशक्तीची ओळख करून देणारा हा विशेष दिवस, तो महत्त्वाचा आहेच; पण उरलेल्या तीनशे चौसष्ट दिवसांचं काय? बाईला तिच्या स्त्रीत्वास्त्री असण्याचा अर्थ कोणकोणत्या संदर्भांमध्ये आणि कशा प्रकारे उलगडतो? शिक्षणाचा प्रकाश तिच्या वाट्याला उशिरानंच आला. पण ते नसतानाही स्त्रियांनी जो विचार केला, अनुभव जगले-भोगले या साऱ्यांतून त्यांना स्त्री असण्याचा, स्वतःमधील ऊर्जेचा प्रत्यय आला. अशी कोणती अनादी-अनंत वैशिष्ट्यं आहेत- स्त्रीच्या शरीर- मन- भावना- विचारांमध्ये- जी तिला जगण्याचं आत्मबळ देतात? बाई असण्याचे हे सत्त्वगुण कोणते? याचा विचार करण्यासाठी आठ मार्च हे एक सर्वमान्य आणि सबळ कारण इतकंच!

स्त्रीशिक्षण, स्त्रियांची चळवळ या साऱ्या घटना स्त्रीसाठी महत्त्वाच्या आहेतच; पण हे सारं घडण्याआधी बाईला तिच्या असण्याची जाणीव झाली. याला तिची भाषाच कारणीभूत आहे. स्त्रीपाशी असणारं अमोघ भाषाज्ञान. तिच्याकडे भाषा आत्मसात करण्याचं, भाषेतून व्यक्त होण्याचं असामान्य सामर्थ्य आहे. बाई तिच्या भाषेतून, तिच्या बोलण्यातून अगदी दगडालासुद्धा बोलकं करू शकते. बाईनं आत्मसात केलेली रोजची भाषा आणि त्या भाषेतून अचूकपणे अनुभव जोडणं आणि त्यातून जगण्याचं शहाणपण कमावणं, हा स्त्रीशक्तीचाच आविष्कार म्हणायला हवा. हे जगण्याचं भान देणारं, शहाणं-सुरतं स्त्रीत्व अगदी जात्यावर दळणकांडण करणाऱ्या कष्टकरी, अनागर आणि दुनियादारी अनुभवलेल्या स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वामध्ये होतंच. स्त्रीनं जगण्यातून, अनुभवांमधून कमावलेलं भाषाज्ञान, तिनं घडवलेली तिची स्वतःची स्वतंत्र भाषाशैली, तिच्या अभिव्यक्तीमधली अचूकता आणि सूचकता हे स्त्री असण्याचा अभिमान वाटावं इतकं महत्त्वाचं आहे. स्त्रीनं अवगत केलेली आणि आयुष्यभर तुडवलेली भाषेची, संवादाची, भाषेतून अवघं जग स्वतःच्या व्यक्तिमत्त्वामध्ये शोषून घेण्याची तिची ग्रहणक्षमता तिची एकाग्रता हे तिला आत्मबळ देणारं खूप मोलाचं कारण आहे. ‘माहेर’ हा शब्दच स्त्रीनिष्ठ आणि बाईच्या मनीमानसी घर करून राहिलेला. त्यामुळे मग ‘माझ्या माहेरच्या वाटे जरी लागल्या रे ठेचा। वाटेवरल्या दगडा तुला फुटली रे वाचा।’ असा तिचा अनुभव आहे. शेतात, घरात अखंड राबणाऱ्या या बाईला आणि तिच्या निमित्तानं अवघ्या बाईजातीला सापडलेली भाषेतून व्यक्त होण्याची अभिव्यक्तीची अनवट वाट हे स्त्रीचं सामर्थ्यच आहे.

अनुभवांचा अन्वयार्थ लावणं, हे खास बाईचं कौशल्य! दिसलेल्या, वाट्याला आलेल्या माणसांच्या, घटनांच्या संदर्भातले अनुभव बाई वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या धाग्यांनी जोडून घेते. अनुभवांना नव्या संदर्भात पाहणं, त्यामुळे आठवणींना जुन्याच साध्या प्रसंगांना प्राप्त होणारा नवीन अर्थ सांगणं, हा बाईच्या मनाला जडलेला छंद आहे. तोही अगदी जुना पुराणा! आठवणींना, घटनांना नवा अर्थ देणं, तो व्यक्त करणं आणि त्यातून जगण्यातलं समाधान, आनंद शोधणं ही तिच्या जगण्याची तिनं शोधलेली नवी, स्वतंत्र वाट आहे. दळणकांडण करणारी स्त्री जात्याशी बोलते. अगदी चालत्याबोलत्या, समोर बसलेल्या माणसासारखं बाई तिच्या भोवतालच्या वस्तू, प्राणी, भांडी, भिंत, चूल अगदी कशाशीही बोलते! मनानं सर्वांशी जोडून घेणं; सगळ्या भोवतालाचं होणं आणि त्यातही खूप मोठा आनंद आहे, याचा शोध स्त्रीला अगदी आदिम अवस्थेतच लागला असावा! म्हणूनच शेतीचा शोध लावणं तिला शक्‍य आहे; पण हा आनंदाचा ठेवा पुढेही निरंतर टिकून राहिलेला दिसतो. म्हणूनच ओवी रचणारी कुणीतरी अनाम अस्तुरी, जात्याला साकडं घालते. ‘जात्या तू ईसवरा नको मला जड जाऊ। बयाच्या दुधाचा सया पाटतात अनुभावु।’ असे तिची परीक्षा पाहणारे अनेक प्रसंग तिच्या वाट्याला आजही येतातच. मग काय ती थेट जात्याशी बोलते. त्याला म्हणते ‘तूच मला सांभाळून घे बाबा! कारण ही आता माझ्या शक्तीची आणि मायच्या दुधाची सत्त्वपरीक्षा आहे. कष्टाच्या जगण्यातून स्वतःची मानसिक पातळीवर सोडवणूक करून घेण्याची, मनानं मुक्त, मोकळं होण्याची ही खास तिची वाट आहे. मग ‘आठ मार्च’ येण्याची - असण्याची वाट कशाला बघावी! बाईच्या मनाचा कणखरपणा, चिकाटी, एकाग्रता, हे सारे तिचे ऊर्जास्रोत आहेत. ती कष्ट करते, अडचणींतून मार्ग काढते, कठीण प्रसंगांना सामोरी जाते. समंजसपणे न पटलेल्या अनेक गोष्टी मान्य करते. तेव्हा तिच्या मनःशक्तीचीच खंबीर साथ-सोबत तिला लाभते. स्त्रीची कणखरता कौतुकास्पद आणि वंदनीय अशीच गोष्ट आहे. अशा खंबीर मनानंच बाई मायाही करते. जीव लावते. हे करताना नुसताच हळवेपणा, स्वतःला बोल लावणं, मनातल्या मनात कुढणं यांत खूप वेळ घालवणं असं सगळं झालं, तरी त्यात खूप वेळ गुंतून पडायचं नाही. याचं भान बाईला चांगल्या प्रकारे असतं.
म्हणून ती सहजपणे म्हणते : ‘जीवाला जीव देते जीव देऊन पाहिला। पान्यातला गोटा अंगी कोरडा राहिला।’ हे व्यवहारी शहाणपण कमावणारी बाई आजच्या डिग्रीबहादूर स्त्रीपेक्षा जास्त हुशार म्हणायला हवी. कारण ती खूप मोलाचा सल्ला देते. तो सर्व काळांतल्या स्त्रियांसाठी महत्त्वाचा आहे. ती म्हणते : ‘कावळ्यानं कोटं केलं बाभूळवनामंदी। पुरुषाला माया थोडी, नारी उमज मनामंदी।’ हे तू मनानं, मनातून आणि मनातल्या मनात उमजून घे. एक बाई दुसऱ्या बाईला हे सांगते.
खरं तरं तिची भावनिक बुद्धिमत्ता नक्कीच उत्तम असणार आहे. ‘स्वतःच्या आणि इतरांच्या भावना ओळखण्याची, स्वतःला प्रेरित करण्याची आणि स्वतःमधल्या आणि इतरांमधल्या भावनांचं व्यवस्थापन करण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता,’ ही आहे शास्त्रशुद्ध व्याख्या; पण बाईनं जगण्यातून आलेल्या अनुभवांमधून, त्यांचा अर्थ लावण्यातून आणि तिच्या भाषाज्ञानातून तिची भावनिक बुद्धिमत्ता सिद्ध केलेली असते. ओवी रचणाऱ्या त्या अनाम स्त्रीचं आजच्या स्त्रीशी नातं तसं जुनंच म्हणायला हवं. म्हणूनच कविता महाजन यांच्या कवितेतल्या या ओळी खास स्त्रीच्याच आहेत. आनंद शोधण्याची तिची वाट छोटी आहे; पण ती स्वतःशी संबंधित आत्मनिर्भर; दुसऱ्या कुणावर अवलंबून नसलेली आहे.
बाई ओलांडते बाईपणाची मर्यादा
विणू लागते एक स्वेटर
स्वतःच्या उबेसाठी
आपण पाणी आपणच ओल
आपल्या जगण्याचं आपल्यालाच मोल!

आनंद शोधणं अगदी छोट्या-छोट्या गोष्टींमधून. ही आनंदी वृत्ती ही स्त्रीच्या जगण्याची विशेष जीवनरीतच! एकाच वेळी अनेक कामं बाई करू शकते, हे तिला कसं आणि का जमतं? कारण कामाच्या गतीशी, होणाऱ्या हालचालींशी, लयीशी बाई मनानं एकरूप होते आणि काम करताना लागणारी ऊर्जा आणि एकाग्रता यांचा समतोल बाई बरोब्बर साधते. ‘दळिता कांडिता तुज गाईन अनंता’ असं म्हणणाऱ्या जनाबाईपासून बाईला हे अचूकपणे साधलेलं आहे. ऊर्जा आणि एकाग्रतेचा समतोल साधत बाई अनेक कामं नीटनेटकी करते. बाईच्या अंगभूत शक्तीचा, तिच्या मनःशक्तीचा प्रत्यय तिचा तिला आलेला आहेच! तिचं जगणं ‘गुंतूनी गुंत्यात साऱ्या’ असं असलं, तरी मनानं, ‘मी माझे मोहित राहिले निवांत’ असं तिचं जगणं आहे. आठ मार्चच्या निमित्तानं स्त्रीवर होणारे अन्याय- अत्याचार, तिनं केलेला संघर्ष, तिनं तिचं कर्तृत्व सिद्ध करणं, मग यशस्वी स्त्रिया हे सगळं आठवलं पाहिजेच; पण त्याचबरोबर सर्वसामान्य स्त्रीची जीवनशक्ती, जगण्याची इच्छा इतकी जबरदस्त का असते, याचाही विचार केला पाहिजे. रुढार्थानं यशस्वी होण्याचं झगमगतं वलय नसताना अनेक जणी जगतात. जगण्याचं बळ कमावतात. त्या साऱ्याजणींचं मनःपूर्वक स्मरण निमित्त आठ मार्च महिलादिन!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang rupali shinde write womens day article