द सडन एन्काउंटर... (एस. एस. विर्क)

s s virk
s s virk

काही वेळातच मी इंटेरोगेशन सेंटरला पोचलो. आमच्या ताब्यातली व्यक्ती दिसायला एका परीनं रुबाबदार होती, सहा फुटांच्या वर उंची, रुंद खांदे आणि चांगली कमावलेली शरीरयष्टी. मी त्याच्यासमोर गेल्यावर तो उठून उभा राहिला...

दहशतवादाबरोबर लढण्याचा अनुभव खरोखरच वेगळा होता, नवीनही होता. दहशतवाद्यांशी होणाऱ्या चकमकी, त्यांच्याकडून होणारे हल्ले, चौकशीदरम्यान त्यांच्याशी होणारी प्रश्नोत्तरं हा सगळा वेगळाच अनुभव होता. प्रत्येक दिवशी मी नवीन काहीतरी शिकत होतो. एका कडव्या दहशतवाद्याची चौकशी करताना अचानक एक नवीन बाब माझ्या लक्षात आली व ती म्हणजे या दहशतवाद्यांना टोपणनावांचं फार आकर्षण असायचं. विशिष्ट सवयी किंवा लकबींवरून ही टोपणनावं दिली जायची आणि मग ती टोपणनावंच इतकी वापरली जायची की एखाद्या दहशतवाद्याचं त्याच्या गटात खऱ्या नावाऐवजी टोपणनावच रूढ व्हायचं. सतत डोकेदुखीची तक्रार करणाऱ्या दहशतवाद्याला ‘सिरपीड’ म्हटलं जायचं, तर पोटाची तक्रार असणारा ओळखला जायचा ‘पेढीपीड’ या नावानं किंवा सारखा खोकणारा बनायचा ‘काली खासी.’ ‘वाह-गुरू’, ‘सतनाम’, ‘ओय-होय’, ‘मस्कीन’ किंवा ‘प्रचारक’ अशीही नावं माझ्या कानावर आली होती. काही जणांना त्यांच्या जाडजूड शरीरयष्टीवरून नावं मिळायची. त्यातला एखादा ‘जंबो जेट’ असायचा किंवा त्याच्याहीपेक्षा अवाढव्य असेल तो ‘सुपर जंबो जेट’ असायचा. बोलण्याच्या सवयींवरून ‘मिचमिच’, ‘पटाका’ किंवा अगदी ‘सयापा’ अशीही नावं पडायची. परदेशात काँटॅक्ट असणाऱ्या एखाद्याला ‘विदेशा’ म्हटलं जायचं. या टोपणनावांमुळे दहशतवाद्यांची खरी नावं बाहेरच्यांना सोडाच; दुसऱ्या गटातल्या लोकांनाही समजायची नाहीत. त्यामुळे त्यातले बरेच जण एरवी त्यांच्या खऱ्या नावांनी वावरत असत. दहशतवाद्यांची चौकशी करताना बऱ्याच जणांशी त्यांच्या टोपणनावांविषयीही बोलून मी त्याबाबत बरीच माहिती जमवली होती.
‘जंबो जेट’ हे त्यातलंच एक टोपणनाव. हा ‘जंबो जेट’ चांगला ६ फूट ३ इंच उंचीचा तगडा शीख तरुण होता. उंच, अवाढव्य असला तरी आमच्या माहितीप्रमाणे तो बराच मवाळ होता. सुरुवातीला काही दिवस पाकिस्तानात असल्यापासूनच तो दहशतवाद्यांमध्ये ‘जंबो जेट’ म्हणून ओळखला जात असे. त्या वेळी शीख दहशतवाद्यांना लाहोरजवळच्या कोट लखपतच्या तुरुंगात ठेवलं जायचं. ज्यांच्याबद्दल पुरेशी माहिती मिळाली नसेल त्यांना इतर दहशतवाद्यांपासून वेगळं करून खुराडेवजा कोठड्यांमध्ये ठेवलं जायचं. त्या अंधाऱ्या कोठड्यांमधून दिवसाकाठी फक्त पंधरा मिनिटांसाठी त्यांना बाहेर काढलं जायचं. थर्ड डिग्री ट्रीटमेंटही रोजचीच असायची. आमच्या चौकशीत अनेक दहशतवाद्यांकडून मला ही माहिती मिळाली होती. ‘आयएसआय’ला ‘जंबो जेट’बद्दलचीही सगळी माहिती नीट मिळेपर्यंत त्याच्याही वाट्याला ही रोजची मारहाण यायची. त्याच्याबद्दल खात्री झाल्यावर त्यालाही इतर महत्त्वाच्या दहशतवाद्यांच्या कोठडीत हलवण्यात आलं होतं. लवकरच तो त्या गटाचा एक सक्रिय सदस्य बनून गेला. आधी काही काळ पाकिस्तानात काढल्यावर फेब्रुवारी १९८६ मध्ये तो भारतात आला. नंतरच्या काळात त्याला गटात बऱ्यापैकी वरचं स्थानही मिळालं. इतर अनेक दहशतवाद्यांप्रमाणे ‘जंबो जेट’ हे टोपणनावही आमच्या ‘वाँटेड’च्या यादीत होतं. अनेक वर्षं आम्ही त्याला शोधत होतो. मधल्या काळात आम्ही बऱ्याच दहशतवाद्यांना पकडलं. त्यांच्याकडून जी माहिती आम्हाला मिळत होती, तीमुळे अनेकदा आम्हाला आमच्या दहशतवाद्यांशी लढण्याची रणनीती बदलावी लागत असे.

काही वर्षं आमच्या हाताला न लागलेल्या ‘जंबो जेट’ला एक दिवस आमच्या एका टीमनं शोधून काढलं. त्या वेळीही त्यानं आम्हाला झुकांडी देण्याचा प्रयत्न केला; पण आम्ही आमच्या अनुभवातून आणि चुकांमधूनही शिकत असल्यानं, आमच्या प्रत्येक टीममध्ये किमान दोन चांगले रनर असायचे. एक-दोघं लांब पल्ल्याचे धावपटू आणि एक-दोघं पैलवानही असायचे, त्यामुळे आम्हाला गुंगारा देऊन पळण्याचा प्रयत्न करूनही ‘जंबो जेट’ पकडला गेला.

‘जंबो जेट’कडून बरीच नवी माहिती मिळण्याची शक्यता होती, त्यामुळे त्याला अटक झाल्याचं कळल्यावर मला खूप बरं वाटलं होतं. त्या वेळी गुरनामसिंग नावाचे उपअधीक्षक दर्जाचे एक अत्यंत अनुभवी अधिकारी आमच्या इंटेरोगेशन सेंटरचे प्रमुख होते. मी त्यांना फोन करून ‘जंबो जेट’ची चौकशी करण्याविषयी सूचना दिल्या. पंजाबचे राज्यपाल त्या दिवशी अमृतसरमध्ये होते. ‘राज्यपालांबरोबरची बैठक संपल्यानंतर मीदेखील तिकडे येतो’, असंही मी त्यांना सांगितलं.
थोड्याच वेळानं मला गुरनामसिंग यांचा पुन्हा फोन आला. आम्ही पकडलेला दहशतवादी ‘जंबो जेट’च आहे का, याबद्दल त्यांना शंका होती.
‘‘सर, मी त्याची चौकशी करायला सुरुवात केली तर तो आपल्या सगळ्या व्यवस्थेला शिव्या द्यायला लागला. त्याला एखाद्या ‘वरिष्ठ’ अधिकाऱ्याशी बोलायचं आहे. कुणीतरी एका ‘कनिष्ठ’ अधिकाऱ्यानं आपली चौकशी करावी हे ‘जंबो जेट’ला मान्य नाही असं वाटतं,’’ गुरनामसिंग म्हणाले.

काही वेळातच मी इंटेरोगेशन सेंटरला पोचलो. आमच्या ताब्यातली व्यक्ती दिसायला एका परीनं रुबाबदार होती, सहा फुटांच्या वर उंची, रुंद खांदे आणि चांगली कमावलेली शरीरयष्टी. मी त्याच्यासमोर गेल्यावर तो उठून उभा राहिला. माझी भेट मागण्याचं कारण विचारल्यावर तो म्हणाला : ‘‘साहेब, मला दहशतवादी ठरवण्यापूर्वी कृपा करून मला काय म्हणायचंय ते ऐकून घ्या.’’ त्याच्या डोळ्यात पाणी होतं.
त्यानं सांगितलेली कहाणी खरोखरच धक्कादायक होती. तो राजस्थानात स्थायिक झाला होता व शेती करणाऱ्या एका पंजाबी शीख कुटुंबातला मुलगा होता. ‘‘माझं खरं नाव बलजितसिंग. शाळेत मी चांगला खेळाडू आणि सर्वोत्तम एनसीसी कॅडेट होतो. अभ्यासातही चांगला असल्यानं सगळ्या शिक्षकांचाही मी लाडका होतो. ता. २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टच्या प्रत्येक कार्यक्रमातही माझा सहभाग असायचा. एक दिवस आमच्या एनसीसीच्या शिक्षकांबरोबर एक साहेब शाळेत आले होते. त्यांनीही माझं कौतुक केलं. त्या ‘साहेबां’चं नाव ए. सी. माथूर होतं. ते सेंट्रल एजन्सीमध्ये वरच्या हुद्द्यावरचे अधिकारी होते. त्यांच्याशी माझी चांगली मैत्री झाली. ते मला अभ्यास आणि करिअरविषयीही सांगत असत. हायर सेकंडरीची परीक्षा झाल्यावर, ‘देशासाठी काहीतरी करण्याची माझी इच्छा आहे’ असं एक दिवस मी माथूरसाहेबांना म्हणालो. देशासाठी जीवही धोक्यात घालण्याची, प्राण देण्याचीही माझी तयारी आहे, असंही मी त्यांना म्हणालो.
‘‘आपला देश तोडण्याचा प्रयत्न कारणाऱ्या परकीय शक्तींबाबत
माथूरसाहेब नेहमी बोलत असत. अशा फुटीरतावादी गटांना तोंड देण्याचे त्यांनी वेळोवेळी कसे प्रयत्न केले त्याबद्दलही ते सांगत असत. या चर्चांनी मी प्रभावित व्हायचो. जवळपास वर्षभर आमच्या अशा चर्चा चालल्या. मी माथूरसाहेबांना खूप मानत असे. पंजाबमधला दहशतवाद, पाकिस्तानात गेलेले शेकडो शीख तरुण, लाहोरमध्ये त्यांना मिळणारं प्रशिक्षण, त्यांचं केलं जाणारं ब्रेनवॉशिंग या सगळ्याबद्दलही ते सांगत असत...’’ ‘जंबो जेट’ सांगत होता : ‘‘देशाचे तुकडे व्हावेत अशी त्यांची इच्छा आहे. आधी पंजाब अलग करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, मग ते जम्मू-काश्मीरकडे वळतील, माथूरसाहेब नेहमी सांगायचे. हे ऐकून माझं रक्त तापत असे; पण मी काय करू शकणार होतो?’’

पाकिस्तानातल्या शीख दहशतवाद्यांना सामील होऊन आपल्या गुप्तचर यंत्रणांना मदत करण्याची माझी इच्छा एक दिवस मी माथूरसाहेबांजवळ बोलून दाखवली. ते नुसतेच हसले. ‘‘तू अजून खूप लहान आहेस. या दहशतवादी गटांवर आयएसआयची देखरेख असते. त्यात शिरून हेरगिरी करणं तेवढं सोपं नाही. ते तुझी सगळी माहिती काढतील. तुझ्या गावापर्यंत, घरापर्यंत पोचतील आणि असं एका रात्रीत कुणी दहशतवादी होत नाही,’’ ते म्हणाले.
‘‘पण मी खरंच दहशतवादी बनलो तर?’’ मी विचारलं.
‘‘मी राजस्थानातून गायब होऊन अमृतसरला जातो. तिथं दहशतवाद्यांना सामील होतो, मग ते मला लाहोरला पाठवतील. मग तर त्यांना शंका येणार नाही ना? ते मला त्यांच्यातलाच समजतील. याबाबतीत मी कुणाचीही खात्री पटवून देऊ शकेन असं मला वाटतं, माझ्यावर विश्वास ठेवा,’’ असं सांगत मी त्यांना मला जाऊ देण्याची गळ घातली. काहीशा अनिच्छेनंच त्यांनी त्यांच्या वरिष्ठांशी चर्चा करून मला माझ्या म्हणण्याप्रमाणे वागण्याची परवानगी दिली.
‘जिथं शिखांना गुलामासारखी वागणूक मिळते त्या भारतात मला सुखानं राहता येणार नाही, म्हणून मी खालिस्तानची लढाई लढायला जातो आहे’, अशी एक चिठ्ठी घरातल्यांसाठी लिहून ठेवून मी गायब झालो.’’
‘‘घर सोडून मी अमृतसरमधल्या बब्बर खालसा गटात सामील झालो. हे लोक अत्यंत कडवे धार्मिक होते. त्यांनी मला लगेच त्यांच्यात सामावून घेतलं. त्यांच्या दृष्टीनं मी शुद्ध खालसा किंवा ‘अमृतधारी’ शीख होतो. भारत-पाकिस्तान सीमेवर तस्करी करणाऱ्या एका गटाच्या मदतीनं त्यांनी मला आणि आणखी काही मुलांना पाकिस्तानात पाठवण्याचीही व्यवस्था केली. तस्करांनी त्या सर्वांना ‘आयएसआय’ हँडलर्सच्या ताब्यात दिलं,’’ तो सांगत होता...पण का कोण जाणे ‘आयएसआय’ला ‘जंबो जेट’बद्दल संशय होता. तो स्वतःबद्दल सांगत असलेली माहिती त्यांना पटत नव्हती. त्यांनी त्याला एका कोठडीत बाकीच्यांपासून वेगळं ठेवलं. त्या अंधाऱ्या कोठडीत मध्यम उंचीचा माणूस आडवा होऊन कसाबसा मावू शकत असे. याला तर अंगाची घडी करूनच आत शिरावं लागायचं.

हा मुलगा सांगत असलेली सगळी माहिती ‘आयएसआय’ तपासत होती. त्याच्या गावातून, शाळेतून मिळालेल्या माहितीवरून या मुलानं आधी कधी बंडखोरी केल्याचं किंवा दहशतवाद्यांबद्दल त्याला सहानुभूती असल्याचं दिसत नव्हतं. तो ‘अचानक’ दहशतवादी बनला होता. ‘आयएसआय’च्या अधिकाऱ्यांच्या मनात संशय निर्माण व्हायला एवढं पुरेसं होतं. त्यांना खात्री करून घ्यायची होती, म्हणून मग ते रोज त्याला कोठडीतून बाहेर काढून तासभर त्याचा अमानुष छळ करायचे. तो छळ, मारहाण त्यानं सहन केली होती.
‘‘ ‘देशभक्त छळाला घाबरून शरण जात नाहीत,’ असं माथूरसाहेबांनी मला सांगितलं होतं. असं काहीतरी घडेल अशा भीती त्यांना वाटत होती. म्हणून मी ते सगळं सहन केलं,’’ तो सांगत होता. जवळजवळ वर्षभर असा छळ झाल्यावर आयएसआयला त्याच्याबद्दल खात्री वाटायला लागली. ‘बब्बर खालसा’च्या लोकांनीही शिफारस केल्यानं ‘आयएसआय’नं या मुलाला ‘क्लिअर’ केलं. अखेरीस हा मुलगा ‘बब्बर खालसा’चा पाकिस्तानातल्या ग्रूपचा सक्रिय सदस्य झाला. त्याच्यावर नव्यानं भरती होणाऱ्या तरुण मुलांना शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सोपवली गेली. याची एकंदर वागणूक पाहून ‘आयएसआय’लाही याच्याबद्दल विश्वास वाटायला लागला होता.
‘‘मग आम्हाला भारतात पाठवण्यात आलं. इथं आल्यावर मी ‘बब्बर खालसा’चा एक महत्त्वाचा सदस्य बनलो होतो. या सगळ्या काळात मी वेळोवेळी माथूरसाहेब आणि आणखी काही जणांपर्यंत आवश्यक ती माहिती पोचवत होतो.’’
‘‘साहेब, पाकिस्तानात असताना मी खूप छळ सहन केला. आता मी इथं भारतात पकडला गेलो आहे आणि इथंही माझ्यासमोर तीच परिस्थिती आहे. माझा देश मला स्वीकारणारच नाही का?’’ त्याच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले होते. ‘‘देशभक्तीनं प्रेरित होऊन मी वर्षभर छळ सोसला. इथल्या व्यवस्थेनं माझ्यासारख्यांची दखलच घेतली नाही तर आमचं आयुष्य असंच अज्ञात राहील. मला या देशाचा एक साधा नागरिक म्हणून राहण्याची संधी मिळणारच नाही का?’’ तो विचारत होता.
मी त्याला हात देऊन उठवलं आणि त्याला मिठी मारली. देशभक्तीनं भारलेला, धार्मिक वृत्तीचा, संवेदनशील तरुण माझ्यासमोर उभा होता. या अशा धामधुमीतही त्यानं देशासाठी गुप्तचर बनण्याचं काम अंगावर घेतलं होतं, स्वतःचा आणि कदाचित आपल्या कुटुंबीयांचाही जीव धोक्यात घातला होता. एजन्सीनं ठरवलेल्या मार्गांनी तो माहिती पाठवत होता.

‘जंबो जेट’साठी एजन्सीकडूनही फोन येईल अशी माझी अटकळ होती. त्याला सोडण्याचा निर्णय अत्यंत गुंतागुंतीचा असणार होता. कारण, पकडला गेला तेव्हा ‘जंबो जेट’ एकटा नव्हता. त्याच्याबरोबर असलेले आणखी काही लोक आमच्या हाताला त्या वेळी लागले नव्हते. याचा अर्थ ‘जंबो जेट’ पकडला गेल्याची बातमी एव्हाना दहशतवाद्यांपर्यंत पोचली असणार. अशा परिस्थितीत त्याला सोडायचं म्हणजे त्याला उघडं पाडण्यासारखं ठरलं असतं. दहशतवाद्यांच्या गटांत तो पुन्हा परतू शकला नसता, कदाचित मारलाही गेला असता.
त्यामुळे आम्हाला विचारविनिमय करून काहीतरी प्लॅन करावा लागणार होता आणि फार काळजीपूर्वक तो अमलात आणावा लागणार होता. आता दिल्लीहूनही फोन यायला सुरुवात झाली होती. त्यांच्या महत्त्वाच्या हेराला, ‘बिगेस्ट अॅसेट’ला, पकडल्याबद्दल दिल्लीवाले आमच्यावर नाराज होते. आम्ही त्याला सोडून द्यावं अशी त्यांची मागणी होती; पण ‘जंबो जेट’ची ओळख उघड होऊ नये आणि दहशतवाद्यांना त्याच्याबद्दल वाटणाऱ्या विश्वासाला तडा जाऊ नये अशी माझी इच्छा असल्यानं मी दिल्लीच्या दबावाकडे जरासं दुर्लक्षच केलं. ‘‘सर, ‘जंबो जेट’ पकडला गेल्याचं आता सगळ्या दहशतवादी गटांना समजलेलं आहे, हे प्रकरण मला माझ्या पद्धतीनं हाताळू द्या,’’ मी त्यांना सांगितलं.
‘‘बलजित, यू आर रिअली ग्रेट. आय सॅल्यूट यू,’’ असं म्हणून ‘जंबो जेट’नं केलेल्या त्यागाबद्दल मी त्याला सॅल्यूट केला आणि बाहेर आलो.

त्याच दिवशी एक बैठक घेऊन आम्ही काही निर्णय घेतले. आता पुन्हा आम्हाला ‘डर्टी ट्रिक्स डिपार्टमेंट’ची मदत लागणार होती. आम्ही आमची योजना खरी वाटावी याची पुरेपूर काळजी घेतली होती. जवानांचा एक गट दुसऱ्या दिवशी रात्री ‘जंबो जेट’ला हातकड्या घालून त्याला बाहेर घेऊन जाईल अशी ती योजना होती. हे सगळे जवान आम्ही अत्यंत काळजीपूर्वक निवडलेले होते. ‘जंबो जेट’च्या अंगावर मळके कपडे असणार होते, बळाचा वापर केल्याच्या खुणा अंगावर असणार होत्या आणि खांद्याला आणि पायाला गोळी लागल्याच्या खुणाही असणार होत्या. आम्हाला एका खोटं एन्काउंटर दाखवून ‘गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला’ असं भासवायचं होतं. मात्र, तो दहशतवादी मेलाच नव्हता, नंतर हातकड्यांसकट तो पळून गेला, अशी स्टोरी आम्ही तयार केली होती. अमृतसरच्या बाहेर काही किलोमीटरवर असलेल्या एका शेतात ही चकमक होणार होती.
पळून गेल्यानंतर ‘जंबो जेट’ जी स्टोरी त्याच्या लोकांना सांगणार होता ती थोडी वेगळी असणार होती. ती स्टोरी अशी होती : ‘मला (‘जंबो जेट’ला) बनावट चकमकीत मारायचा पोलिसांचा बेत होता; पण गोळीबार होताना मी हलल्यानं गोळी माझ्या खांद्याला लागली आणि मी खाली कोसळलो. पोलिसांना वाटलं की मी मेलो आहे. थोडा वेळ मी तसाच पडून राहिलो आणि काही वेळानं हातकड्यांसकट पळून गेलो.’

दहशतवाद्यांचा सहानुभूतीदार असलेला एक जण जवळच राहत होता. ‘जंबो जेट’ त्याच्या घरी गेला, मग त्या सहानुभूतीदारानं त्याला मोटरसायकल वरून एका सुरक्षित जागी नेलं. तिथून ते एका गुरुद्वारात गेले. तिथं ‘जंबो जेट’ला एका खोलीत ठेवण्यात आलं. तिथं त्याच्या हातकड्या कापून काढण्यात आल्या. एका डॉक्टरला बोलावून त्याच्यावर उपचारही करण्यात आले. त्याच्या गटातले इतर लोकही त्याला तिथं भेटायला आले होते; पण त्यानं जखमांमुळे आणि रक्तस्रावामुळे शुद्धीत नसल्याचं सोंग करत वेळ मारून नेली. जवळजवळ एक आठवडाभर तो तिथं होता. त्याच्या गटातल्या लोकांच्या मते तो ‘खरंच नशीबवान’ होता म्हणून निसटू शकला. त्याचा शोध सुरू आहे हे दाखवण्यासाठी पोलिसांनी त्याच्या नातोवाइकांच्या, अगदी राजस्थानातल्या त्याच्या आई-वडिलांच्या, घरावर छापे घालून झडत्या घेतल्या.

काही दिवसांनी ‘जंबो जेट’ पळाल्याची घटना खरी असल्याची सगळ्यांचीच खात्री झाली. जखमा बऱ्या झाल्यानंतर पूर्वीप्रमाणे त्याच्यावर कामगिऱ्याही सोपवल्या जाऊ लागल्या. अखेर तो त्याच्या गटात पुन्हा पोचला होता आणि कोणताही संशय न येता त्याच्या गटानं त्याला पुन्हा सामावूनही घेतलं होतं. पूर्वीप्रमाणेच तो एजन्सीला खबरा देत होताच; पण आता तो माझ्याही संपर्कात होता. काही वेळा त्याचे फोन यायचे, कधीतरी वेळ-काळ पाहून तो भेटूनही जायचा.

ता. ९ मे १९८८ या दिवशी दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यात माझ्या जबड्याला गोळी लागली होती. आम्हीही जोरदार गोळीबार करून हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं होतं. या हल्ल्यानंतर जाग्या झालेल्या सरकारनंही सुवर्णमंदिराच्या परिसरातल्या दहशतवाद्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रीय सुरक्षा दलानं (एनएसजी) ‘ऑपरेशन ब्लॅक थंडर -II’ या नावानं ओळखली जाणारी ही कारवाई केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) मदतीनं टीव्ही आणि इतर प्रसारमाध्यमांच्या साक्षीनं केली होती. महत्त्वाचं म्हणजे, ही कारवाई सुरू असताना अमृतसर शहरातले नित्याचे व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू होते. ही कारवाई यशस्वी झाली. ही दहशतवाद्यांविरुद्धची जगातल्या सगळ्यात यशस्वी कारवायांपैकी एक मानली गेली.
या सगळ्या काळात अमृतसरमधल्या सीआरपीएफच्या मुख्यालयातच कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत माझ्यावर उपचार सुरू होते. माझ्यावर काही गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियाही झाल्या होत्या. सरकारी रुग्णालयात लोकांची खूप वर्दळ असते. तिथं पुन्हा हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेऊन कॅनॉल रोड रेस्ट हाऊसमधल्या मुख्यालयातच माझ्यासाठी तात्पुरती व्यवस्था करण्यात आली होती. मुख्यालयातच असल्यानं रोज घडणाऱ्या घटना मला समजत होत्या. माझ्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांकडूनही मला, बाहेर काय सुरू आहे, याचा अंदाज येत होता. एखाद्या रात्री गिलसाहेबही गप्पा मारायला येत असत. ‘ऑपरेशन ब्लॅक थंडर -II’चं नेतृत्व त्यांनीच केलं होतं. कारवाई यशस्वी झाल्यानं तेही खूप खूश होते.

जबड्यावर अस्थिरोपणाची एक शस्त्रक्रिया झाल्यानं त्या काळात मला बोलता येत नव्हतं. मोठ्या मुश्किलीनं मी काही शब्द बोलण्याचा प्रयत्न करायचो; पण त्याचा अर्थ लावताना बाकीच्यांची त्रेधा उडत असे. शस्त्रक्रियेनंतर डॉ. खन्ना यांनी मला सगळ्या वैद्यकीय सूचनांचं पालन करण्याविषयी बजावलं होतं. ‘‘आता जर (जबड्याच्या) या हाडाला काही झालं तर जगात कुठंही पुन्हा ते दुरुस्त होणार नाही,’’ असं त्यांनी निक्षून सांगितलं होतं. काळजी घेणं अत्यावश्यकच होतं, त्यामुळे उत्साहालाही आवर घालणं भाग होतं. अगदी थोडा व्यायाम वळगता अन्य काहीही हालचाली करायला डॉक्टरांनी मनाई केली होती. वाचन आणि थोडंसं लेखन हाच त्या काळातला माझा विरंगुळा होता.
एके दिवशी अगदी पहाटेची गोष्ट. ‘एक उंच, दांडगा शीख माणूस तुम्हाला भेटायला आला आहे,’ असा निरोप पहाऱ्यावरच्या माणसानं मला दिला. जेमतेम साडेपाच वाजत होते. ‘जंबो जेट’ असं नाव सांगणारा तो माणूस एकटाच होता. त्याच्या हालचालीही काहीशा संशयास्पद वाटल्यानं आमच्या जवानांनी त्याची कसून तपासणी केली होती; पण त्याच्याजवळ वावगं असं काहीच सापडलं नव्हतं. तिथंच एका बाजूला मी एक तात्पुरतं ऑफिस थाटलं होतं, तिथं मी त्याला घेऊन यायला सांगितलं.
आदल्या रात्री अमृतसरजवळच्या चभाल-भिखिविंड परिसरातल्या एका गुरुद्वारामध्ये त्यानं सहा दहशतवाद्यांचा एक ग्रूप पाहिला होता. ‘जंबो जेट’नंही रात्र तिथंच काढली होती. त्या सहा जणांकडे भरपूर शस्त्रं होती. ते कोणत्या तरी कामगिरीवर असावेत असा त्याला संशय होता. ‘जंबो जेट’च्या माहितीनुसार त्या वेळी ते सहाही जण मूसे गावालगतच्या गुरुद्वाराच्या जवळ असलेल्या फार्म हाऊसवर सापडण्याची शक्यता होती. त्या फार्म हाऊसला निळ्या रंगांचं एक दार आहे, अशीही माहिती त्यानं दिली. तातडीनं फोर्स पाठवला तर त्यांना धरता येईल, असंही त्यानं सांगितलं; पण त्या वेळी माझ्याकडे काहीच बॅकअप नव्हता. मी जवाहरसिंग नावाच्या माझ्या एका सहायकाला बोलवायला सांगितलं. पंजाब पोलिस दलातले जवाहरसिंग त्या काळात पूर्ण वेळ माझ्या बरोबर असत. ते आल्यानंतर ‘जंबो जेट’नं सगळी माहिती पुन्हा सांगितली.
माझ्या उपचारांच्या काळात आमच्या कंट्रोल रूमच्या रचनेत काही बदल झाले होते. त्याआधी मी तीस प्रशिक्षित जवानांची एक तुकडी कंट्रोल रूमजवळ तैनात ठेवायचो. आणीबाणीच्या प्रसंगी पाचेक मिनिटांमध्ये ही तुकडी उपलब्ध होत असे; पण आता त्या तुकडीतल्या जवानांना अन्यत्र हलवल्यानं त्या दिवशी तिथं फक्त चारच लोक होते. ‘जंबो जेट’ची माहिती ऐकल्यावर जवाहरसिंग उठून म्हणाले : ‘‘सर, फार काही बिघडलेलं नाही. ते सहा जण आहेत, आम्ही पाच जण आहोत. त्यानं काही फरक पडत नाही. अशी इन्फर्मेशन रोज रोज मिळत नाही. ही संधी साधायला हवी. आम्ही पुढं जाऊन त्यांना रोखून धरतो. तुम्ही सेक्टर कमांडरना लगेच आणखी लोक पाठवायला सांगा.’’ त्यांच्या म्हणण्यात धोका असला तरी तथ्यही होतं. त्या वेळी आमच्यासमोर दुसरा काही पर्यायही नव्हता. मी त्यांना परवानगी दिली.

संपर्कासाठी एक वायरलेस सेट घेऊन ते लगेच निघाले. मी तातडीनं सेक्टर कमांडरशी संपर्क साधून मूसे गावाकडे एक प्लाटून पाठवायला व अजून जास्त फोर्स तयार ठेवायला सांगितलं. जवळजवळ पाऊण तासानं जवाहरसिंगांकडून वायरलेस मेसेज आला : ‘‘सर, फायरिंग सुरू झालंय, आणखी लोक लगेच पाठवा...’’

(क्रमशः)

(या कहाणीतील काही नावं आणि टोपणनावंही बदलण्यात आलेली आहेत.)
(या लेखाचे बौद्धिक संपदा हक्क लेखकाकडे आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com