द सडन एन्काउंटर : २ (एस. एस. विर्क)

s s virk
s s virk

आता दुपारचे अडीच वाजत आले होते. आणखी चौघांना शोधायला आम्हाला आणखी बराच वेळ लागणार होता. अंधार पडायच्या आत संपूर्ण कारवाई पूर्ण करायची असल्यानं आमच्या पथकांना आवश्‍यक त्या सूचना देऊन आम्ही पुन्हा कामाला लागलो. आधी आम्ही त्या निसटलेल्या दहशतवाद्यावर लक्ष केंद्रित केलं.

इतक्‍या लवकर चकमक सुरू झाल्याचं ऐकून मला जरा आश्र्चर्यच वाटलं. जवाहरसिंग निघाल्यानंतर दीड तासानं गोळीबारीची पहिली खबर अपेक्षित होती. घाई केल्यानं कोणताही अडथळा न येता जवाहरसिंगनं जवळपास अर्धा तास आधीच लक्ष्य गाठलं होतं.
‘जंबो जेट’नं त्यांना त्या परिसराचा एक कच्चा नकाशा दिला होता. दहशतवादीही तयारीत असणार किंवा त्यांनी कुणाला तरी पाळतीवर ठेवलं असणार, त्यामुळे काही अनोळखी लोकांना येताना पाहून त्यांनी गोळीबार केला असणार, जवाहरसिंग आणि त्यांच्याबरोबरचे जवानही तयारीचे असल्यानं लगेचच चकमक सुरू झाली असणार...मी ताबडतोब सेक्‍टर कमांडरना काही अनुभवी अधिकारी आणि आणखी कुमक घेऊन मुसे गावात जायला सांगितलं. गरज पडली तर आणखी एखादी तुकडी सज्ज ठेवण्याच्या आणि सतत संपर्कात राहण्याच्या सूचनाही दिल्या.

मला ‘जंबो जेट’चं कौतुक वाटत होतं. मला दहशातवाद्यांची माहिती देण्याकरता चाळीसेक किलोमीटर मोटरसायकल चालवत तो अमृतसरला थेट सीआरपीएफच्या मुख्यालयात थडकला होता. इतकंच नव्हे तर, पहाऱ्यावरच्या रक्षकांची खात्री पटवून देऊन त्यांना मला उठवायला भाग पाडलं होतं.
गोळीबारात जखमी झाल्यानंतर मी माझ्या खोलीच्या चार भिंतींत अडकून पडल्यासारखा झालो होतो. ‘जंबो जेट’नं दिलेल्या या माहितीच्या निमित्तानं दीर्घ विश्रांतीनंतर मी पुन्हा एकदा दहशतवादाविरुद्धच्या माझ्या लढाईत परतलो होतो. कंट्रोल रूममध्ये जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांनाही मी मुसे गावातल्या घडामोडींबद्दल मला माहिती देत राहण्याच्या आणि जवळच्या सेक्‍टरनाही दक्ष राहायला सांगण्याच्या सूचना दिल्या. मुसे गावातून दहशतवादी निसटले असते तर ते शेजारच्या सेक्‍टर्समध्ये शिरण्याचा धोका होता.

दहशतवाद्यांकडे मोठा शस्त्रसाठा असल्याची माहिती मिळाल्यानं सेक्‍टर कमांडर एमएमजीसह मोठा फौजफाटा घेऊन मुसे गावाकडे रवाना झाले होते. पंजाब पोलिसांनाही आम्ही चकमकीबद्दल कळवल्यावर तरणतारणचे एसपी (ऑपरेशन्स) हरजितसिंग यांनीही पट्टी गावात कोम्बिंग ऑपरेशन करणाऱ्या त्यांच्या काही तुकड्या आमच्या मदतीला मुसेकडे पाठवल्या. जिल्ह्यातल्या सगळ्या दहशतवादविरोधी कारवायांमध्ये सहभागी असणाऱ्या हरजितसिंग यांचा ‘अत्यंत धाडसी अधिकारी’ असा लौकिक होता. ते मूळचे सीआरपीएफचे अधिकारी. त्या वेळी दोन वर्षांकरता ते पंजाब पोलिसमध्ये प्रतिनियुक्तीवर आले होते.
मुसे गावात पोचल्यावर हरजितसिंग आणि सीआरपीएफच्या सेक्‍टर कमांडरनी लगेचच नेमकी व्यूहरचना केली. जवाहरसिंगांकडे मनुष्यबळ कमी होतं; पण त्यांनी दहशतवाद्यांना फार्म हाऊसमध्येच रोखून धरलं होतं. दोन्ही बाजूंनी होणाऱ्या गोळीबारात एकाही गावकऱ्याला इजा होऊ नये असा हरजितसिंग आणि सीआरपीएफच्या सेक्‍टर कमांडरचा प्रयत्न होता. गावातल्या गुरुद्वाराच्या लाऊडस्पीकरवरून पोलिसांनी सगळ्या गावकऱ्यांना गुरुद्वाराजवळ जमायला सांगितलं. दहशतवादी फार्म हाऊसच्या मागच्या भिंतीवरून उड्या मारून गावात शिरले होते. ते एखाद्या घरात लपण्याची शक्‍यता गृहीत धरून प्रत्येक घराची झडती घ्यायला हवी होती. सगळे गावकरी बाहेर पडल्यावरच झडत्या घेणं शक्‍य होतं. अन्यथा क्रॉसफायरिंगमध्ये निरपराध गावकरी जखमी होण्याची भीती होती. जवाहरसिंग यांच्याबरोबरचे दोन जवान आधीच्या गोळीबारात जखमी झाले होते. सगळ्यात आधी त्यांना रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

सगळे गावकरी गुरुद्वाराजवळ जमल्याची खात्री झाल्यावर एसपी; ऑपरेशन्स यांनी फार्म हाऊसलगतच्या एका घरातून फार्म हाऊसची आणि आजूबाजूच्या परिसराची पाहणी करून दहशतवादी कोणत्या बाजूनं पळून जाऊ शकतात याचा अंदाज घेतला. फार्म हाऊसच्या मुख्य दरवाजाला कुलूप होतं. हरजितसिंग यांच्या पथकानं मग प्रत्येक घराची तपासणी सुरू केली. तिसऱ्या किंवा चौथ्या घरात ते असताना अचानकच दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. हरजितसिंग यांच्या मांडीला गोळी लागून ते गंभीर जखमी झाले. मोठा रक्तस्राव होत असल्यानं त्यांना हलताही येईना. त्यांच्या बरोबरच्या जवानांनी त्यांना उचलून सुरक्षित जागी नेण्याचा प्रयत्न केला; पण दहशतवाद्यांकडून होणाऱ्या गोळीबारामुळे तेदेखील शक्‍य झालं नाही. जवानांनी प्रयत्नांची शर्थ केली. रक्तस्रावामुळे थोड्याच वेळात हरजितसिंग यांची शुद्ध हरपली. जवानांनी गावातलाच एक ट्रॅक्‍टर मिळवला. एक-दोन घरांभोवतीच्या भिंती पाडून, ट्रॅक्‍टरसाठी वाट केली; पण या सगळ्याला खूप उशीर झाला होता. हरजितसिंग वाचू शकले नाहीत.

तरणतारणचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक संजीव गुप्ता यांनी फोनवर मला हरजितसिंग यांच्या मृत्यूची बातमी दिली. ‘‘सर, वाईट बातमी आहे. हरजितसिंग आता आपल्यात नाहीत. मीदेखील मुसेकडे निघालो आहे,’’ त्यांनी मला सांगितलं. एव्हाना सकाळचे अकरा वाजले होते. अजूनही चकमक सुरूच होती. दोन्ही बाजूंनी प्रचंड गोळीबार सुरू होता. माझ्याच आदेशावरून पहिली तुकडी मुसे गावात गेली होती आणि आता चकमक अधिक उग्र होत चालली होती. पोलिस अधीक्षक दर्जाचे एक अधिकारी मृत्युमुखी पडले होते. या गंभीर परिस्थितीत मी पण तिथं असायला हवं असं मला वाटायला लागलं होतं.

‘‘मीपण तिकडे येतो आहे,’’ मी वरिष्ठ पोलिस अधीक्षकांनी कळवलं. माझं जाणं डॉक्‍टरांना आणि माझ्या पत्नीला अजिबात मान्य नव्हतं. तिथं मी पुन्हा जखमी झालो तर...अगदी साधा धक्का लागून पडलो तरी त्यातून उद्भवणाऱ्या परिस्थितीत आजपर्यंतच्या सगळ्या उपचारांवर पाणी पडेल असं डॉक्‍टरांचं मत होतं; पण आम्ही आधीच एक वरिष्ठ अधिकारी गमावलेला असताना आणि अजूनही चकमक सुरूच असताना असं घरात बसून राहणं मला शक्‍य नव्हतं. मी डॉक्‍टरांना परिस्थितीचा अंदाज दिला. माझं जाणं किती आवश्‍यक आहे ते त्यांना पटवून दिलं. बॅटल ड्रेस चढवला, माझं रिव्हॉल्व्हर आणि एक
एके-४७ घेऊन मी बाहेर पडलो.
वरिष्ठ अधीक्षक मला मुसे गावाबाहेरच भेटले. तिथून मग आम्ही चकमक सुरू होती त्या दिशेनं चालतच निघालो. दोन्ही बाजूंनी गोळीबाराचे आवाज येत होते. फार्म हाऊसच्या अलीकडेच जवाहरसिंग यांची गाठ पडली. क्रॉलिंगमुळे त्यांची डांगरी - लष्करी पद्धतीचा गणवेश - ठिकठिकाणी फाटली होती. त्यांचेही दोन सहकारी जखमी झाले होते; पण त्यांच्या जिवाला धोका नव्हता. त्यांना तिथल्याच ग्रामीण रुग्णालयात नेलं होतं. हरजितसिंग यांचा मृतदेहही तिथंच खाटेवर ठेवण्यात आला होता. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत रात्रीचा दिवस करून लढणारा एक अत्यंत धाडसी अधिकारी आम्ही गमावला होता. सगळे कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून मृतदेह हरजितसिंग यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात लवकरात लवकर देता येईल याची व्यवस्था करण्यात आली होती. चकमक अजूनही सुरूच होती.

सेक्‍टर कमांडरनी घरांची झडती घेण्याचं काम पाच वेगवेगळ्या तुकड्यांवर सोपवलं होतं. गावाच्या मागच्या बाजूनं सुरुवात करून त्यांना समोरच्या बाजूपर्यंत पूर्ण गावाची तपासणी करायची होती. झडत्या घेताना घरांचं नुकसान होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांना दिलेल्या होत्या. अर्थात हे शक्‍य होतंच असं नाही. कारण, दहशतवाद्यांनी तीन ठिकाणी या तुकड्यांवरही हल्ले केले होते. घरांच्या भिंती फार उंच नसल्यानं एका घरातून दुसऱ्या घरात जाणं दहशतवाद्यांना सहज शक्‍य होतं. घराच्या आडोशाला लपून झडतीपथक टप्प्यात आल्यावर गोळीबार करणंही त्यांना शक्‍य होतं. अशाच एका हल्ल्यात आणखी दोन जवान जखमी झाले होते. जवळजवळ तासभर गोळीबार सुरू होता.

दहशतवादी एका घराच्या पहिल्या मजल्यावर लपून बसले असल्यानं उंचीचा फायदा घेऊन ते आमच्या पथकांवर गोळीबार करत होते. जमिनीवरून त्यांच्यावर मारा करण्याला मर्यादा असल्यानं शेजारच्या तीनमजली इमारतीच्या वरच्या मजल्यावरून त्यांना प्रत्युत्तर देणं शक्‍य होतं. दुसरा काहीच पर्याय आमच्यासमोर नव्हता. आम्ही गर्दीतून त्या तीनमजली इमारतीच्या मालकाला शोधून काढलं आणि फारशी वाच्यता न करता त्याला घेऊन एक पथक त्या इमारतीवर गेलं. आता लपून गोळीबार करणारे दहशतवादी आमच्यासमोर, माऱ्याच्या टप्प्यात आले होते. उंचीचा फायदा मिळाल्यावर आमच्या पथकांनी गोळीबार करत त्या गटातल्या तिघांपैकी दोघांना टिपलं. या तिघांनी जवळजवळ दोन तास आमच्या पथकांना गुंतवून ठेवलं होतं. इमारतीच्या मालकाला आम्ही, पोलिस त्याच्या इमारतीत कसे शिरले याबद्दल काहीच माहिती नसल्याचं सांगण्याचा सल्ला देऊन, त्याला जायला सांगितलं. पोलिस त्याच्या घरात कसे शिरले आणि छपरावर कसे पोचले याबद्दल त्यानं काहीही माहिती नसल्याचंच सांगत राहायचं होतं.

मग आमच्या एका पथकानं जाऊन त्या दोन दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले. त्यांच्याजवळ प्रचंड शस्त्रसाठाही मिळाला. तोही आम्ही मृतदेहांबरोबरच बाहेर आणून ठेवला. तिथं जे रक्ताचे डाग दिसत होते त्यावरून जखमी झालेला त्यांचा तिसरा साथीदार बहुधा शेजारच्या घरात गेला असावा असा अंदाज आम्ही बांधला.
आता दुपारचे अडीच वाजत आले होते. आणखी चौघांना शोधायला आम्हाला आणखी बराच वेळ लागणार होता. अंधार पडायच्या आत संपूर्ण कारवाई पूर्ण करायची असल्यानं आमच्या पथकांना आवश्‍यक त्या सूचना देऊन आम्ही पुन्हा कामाला लागलो. आधी आम्ही त्या निसटलेल्या दहशतवाद्यावर लक्ष केंद्रित केलं. तो फार लांब जाऊ शकणार नव्हता. जिथून तो निसटला ती जागा पाहिल्यावर तोसुद्धा चांगलाच जखमी झाला असणार असं आमच्या लक्षात आलं. तोपर्यंत आम्ही सगळ्याच घरांच्या छपरांवर ताबा मिळवला होता. तिथून आम्ही खाली वावरणाऱ्या दहशतवाद्यांवर नियंत्रण ठेवू शकणार होतो.

जखमी होऊन पळालेला दहशतवादी शेजारच्याच इमारतीत लपला असावा असा संशय आल्यानं आमच्या एका टीमनं त्या इमारतीच्या अंगणात एक हॅंडग्रेनेड फेकला. ग्रेनेड फुटल्याच्या आवाजाबरोबर कुणाच्या तरी जोरजोरात ओरडण्याचाही आवाज यायला लागला. तो पळून गेलेला दहशतवादी, ‘शरण यायचं आहे’, असं म्हणत ‘मला बाहेर येऊ द्यावं’ असं ओरडून सांगत होता. ते ऐकून आमच्या एका अधिकाऱ्यानं गोळीबार थांबवून त्या दहशतवाद्याला ‘दोन्ही हात वर करून’ बाहेर यायला सांगितलं. गंभीर जखमी झालेला एक माणूस काही क्षणांतच जेमतेम दाराबाहेर आला आणि कोसळून पडला. ग्रेनेडच्या स्फोटात तो चांगलाच जखमी झाला होता. आमच्या एका पथकानं नंतर त्या जागेवरून बरीच शस्त्रं आणि दारूगोळा जप्त केला. जखमी झालेल्या त्या दहशतवाद्यावर सीआरपीएफ युनिटच्या डॉक्‍टरांनी लगेचच उपचार सुरू केला; पण त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही. काही क्षणांतच त्यानं शेवटचा श्‍वास घेतला.

दरम्यान, घरं तपासण्याचं काम सुरूच होतं. सायंकाळी चारच्या सुमाराला फक्त चारच घरं तपासायची राहिली होती. लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी आमच्या दिशेनं गोळीबार करावा यासाठी आमची पथकं प्रयत्न करत होती. अचानक एका घराच्या खिडकीतून आमच्यावर गोळीबार सुरू झाला. त्याला प्रत्युत्तर देतानाच आम्ही दहशतवाद्यांचे सुटकेचे सगळे मार्ग बंद करून टाकले होते. बराच वेळ गोळीबार सुरू होता; पण त्याचा फारसा उपयोग होत नव्हता. मग आम्ही एक धाडसी प्रयत्न केला. ज्या घरात दहशतवादी लपले होते त्या घराच्या मागच्या बाजूनं एक पथक शिड्या लावून छपरावर चढलं. छप्पर मातीचं असल्यानं आवाज होणार नाही अशा बेतानं थोडं खणून त्यांनी दोन ग्रेनेड आत फेकले. ग्रेनेडचे स्फोट झाल्यावर एकच शांतता पसरली. आतून होणारा गोळीबारही थांबला. त्या घरात शिरल्यावर आम्हाला आणखी दोन मृतदेह मिळाले. आमच्या माहितीनुसार, ते सहाजण होते. त्यामुळे आणखी एक जण सापडायला हवा होता. आम्ही पुन्हा सगळा गाव शोधला; पण कुणीच सापडलं नाही. कदाचित चकमक सुरू झाल्या झाल्या एक जण पळून गेला असावा.

सायंकाळी सहाच्या सुमाराला आमचं ऑपरेशन संपलं. पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घालून आम्ही प्रचंड मोठा शस्त्रसाठा पकडला होता; पण आम्ही आमचा एक उत्तम अधिकारी गमावला होता. आमचे चार जवानही जखमी झाले होते. सुदैवानं जखमींपैकी कुणाचीच स्थिती फारशी गंभीर नव्हती.
ऑपरेशन संपवून परत येताना मी दिवसभराच्या घडामोडींवर विचार करत होतो. पाच हत्यारबंद, हिंसक, पाकिस्तानात ट्रेनिंग झालेले दहशतवादी आम्ही मारले होते. हे एक मोठं यश किंवा सफलता आहे का? या चकमकीनं आणखी एक बळी घेतला होता...हरजितसिंगना आम्ही गमावले होते... हरजितसिंग यांच्यासारखे अधिकारी तर सोडाच; माणूसही भेटणं कठीण आहे. हे सहाही जण देशाची, पंजाबची किंवा आमच्या समाजाचीच मुलं होती की नाही...? ते ज्या निरर्थक हिंसेला बळी पडले होते त्यामुळे आम्हाला यश मिळाले होतं की अपयश हे मला समजत नव्हतं. माझी मनःस्थिती द्विधा झाली होती. काही वेळात मी अमृतसरला पोचलो; पण मी कोणत्याच निर्णयाला येऊ शकलो नव्हतो.

मी जेव्हा कंट्रोल रूममध्ये परतलो त्या वेळी माझी पत्नी माझ्या खोलीत बसून पूजा करत होती. डॉक्‍टरांची टीमही तिथंच होती.
‘‘मी कोणतीही रिस्क घेतलेली नाही,’’ असं मी त्यांना सांगितलं; पण त्यांचं समाधान झालं नाही. डॉक्‍टरांनी मला आडवं व्हायला लावलं आणि पूर्णपणे तपासलं. मी माझ्या तब्येतीची पुरेशी काळजी घेत नाही म्हणून ते सगळे प्रचंड नाराज होते. माझ्या पत्नीचा अर्थातच डॉक्‍टरांना पूर्णपणे पाठिंबा होता.
अशा एन्काउंटरच्या ठिकाणी जाऊन जीव धोक्‍यात घातल्याबद्दल नंतर राज्यपालांनी आणि डीजीपींनीही माझी थोडी कानउघाडणी केली.
इथं केवळ एका एन्काउंटरची कहाणी सांगणं हा माझा हेतू नाही. चांगलं चाललेलं आयुष्य सोडून मातृभूमीची सेवा करण्यासाठी दहशतवाद्याचं आयुष्य स्वीकारणाऱ्या बलजितसिंग ऊर्फ ‘जंबो जेट’सारखे काही ‘अनसंग हीरो’ किंवा अज्ञात व्यक्ती असतात हे वाचकांच्या लक्षात आणून द्यावं असं मला वाटतं. मुसे गावातलं एन्काउंटर केवळ ‘जंबो जेट’च्या पुढाकारामुळे शक्‍य झालं. असे बरेच जण होते. त्यांच्यातल्या काहीजणांचा त्याग कधीच नोंदवला गेला नाही, ते दहशतवादी म्हणूनच मारलेही गेले. काही अजूनही जिवंत आहेत, त्यातले काहीजण आजही माझ्या संपर्कात असतात. योगायोगाचा भाग म्हणजे मी ही कहाणी लिहीत होतो तेव्हा असाच एक जण काहीतरी किरकोळ कामासाठी माझ्याकडे आला. ‘‘काय लिहिताय?’’ असं त्यानं विचारल्यावर मी त्याला ‘‘ ‘सकाळ’च्या वाचकांसाठी लिहितोय,’’ असं सांगत ‘जंबो जेट’ची कहाणी सांगितली. सगळी गोष्ट ऐकल्यावर तो म्हणाला : ‘‘सर, आयुष्य म्हणजे एक चमत्कारच म्हणायचा...ती रात्र कधी संपेल असं कधीच वाटलं नव्हतं.’’
हे ऐकून मी काही बोललो नाही; पण तो गेल्यानंतरही माझ्या कानात त्याचे शब्द निनादत राहिले... ‘‘खरंच...आयुष्य हा चमत्कार आहेच आणि आजचा शांत पंजाब हादेखील चमत्कारच आहे.’’
(संपूर्ण)

(या कहाणीतल्या काही व्यक्तींची व संस्थांची नावं आणि टोपणनावंही बदलण्यात आलेली आहेत.)
(या लेखाचे बौद्धिक संपदा हक्क लेखकाकडे आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com