esakal | कहाणी एका 'जस्सी'ची (एस. एस. विर्क)
sakal

बोलून बातमी शोधा

s s virk

कहाणी एका 'जस्सी'ची (एस. एस. विर्क)

sakal_logo
By
एस. एस. विर्क

'भारतात गेल्यावर त्या "विदूषका'ला भेटायचंही नाही. तू त्याला भेटलीस तर त्याचे वाईट परिणाम त्याला भोगावे लागतील,' अशी तंबीच जस्सीला आईकडून मिळाली होती. त्यावर जस्सी म्हणाली ः 'ममा, तू कशाला यात पडतेस? माझं मला पाहू दे ना...''

वाचकमित्र हो, गेल्या जानेवारीपासून गुन्हेगारी जगताविषयीचे माझे काही अनुभव मी आपल्याला सांगत आहे. या कहाण्या नकारात्मक गोष्टींमध्ये अडकलेल्या आणि त्यापायी गुन्हेगारीच्या रस्त्यावर चाललेल्या लोकांच्या असल्या तरी या कहाण्यांमधून समाजाला काहीतरी सांगण्याचा, संदेश देण्याचा माझा उद्देश आहे. उदाहरणार्थ ः अभीची गोष्ट घ्या. मिकी, रुबिना आणि सुरजितसिंगची पैशाची हाव आणि कोणत्याही मार्गानं झटपट श्रीमंत होण्याचा तो प्रयत्न होता. एम्पायर सिटी मर्डर प्रकरणातही पैशाची हाव होती, जोडीला विवाहबाह्य संबंधही होते.
या वेळी मी आपल्याला पंजाबी पार्श्‍वभूमीच्या "जस्सी' नावाच्या एका कॅनेडियन मुलीची कहाणी सांगणार आहे. ही मोहक आणि निरागस मुलगी आपल्या समाजानं निर्माण केलेल्या परिस्थितीला बळी पडली होती. कुटुंबाच्या "सामाजिक दर्जा'च्या आणि कुटुंबाच्या "प्रतिष्ठे'च्या कल्पना त्या तरुण मुलीसाठी घातक ठरल्या होत्या.
मी स्वतः या प्रकरणाचा तपास केला नाही; पण माझ्यालेखी हे प्रकरण अतिशय चटका लावणारं, दुःखद होतं. मी त्या वेळी दुसऱ्या ठिकाणी नेमणुकीला असलो तरी मी बारकाईनं हे प्रकरण पाहत होतो. काही घटनांचा तुमच्यावर कायमचा प्रभाव राहतो. अशा वेळी ती कहाणी आपल्याच जीवनाचा एक भाग असल्यासारखी वाटायला लागते. प्रसिद्ध उर्दू कवी सीमाब अकबराबादी यांनी लिहिलं आहे ः
कहानी मेरी रूदादे जहॉं मालूम होती है।
जो सुनता है उसी की दास्तॉं मालूम होती है।

जेव्हा जेव्हा मला ही गोष्ट आठवते तेव्हा उरात एक कळ आल्यासारखं होतं. कुणीतरी आपल्याला जखमी करून गेलं आहे असं वाटत राहतं. आज ती गोष्ट मी आपल्याला सांगतो आहे...

चार-पाच दशकांपूर्वी पश्‍चिमेकडच्या देशांतल्या वाढत्या औद्योगिकीकरणाबरोबर तिथली मनुष्यबळाचीही मागणी वाढत होती. औद्योगिक क्रांतीच्या या दुसऱ्या पर्वात यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणात झालं होतं तरी सुधारित तंत्रज्ञानामुळे कारखान्यांची संख्या वाढली होती आणि उत्पादनही वाढलं होतं. वाढत्या कारखानदारीमुळे यंत्रसामग्री हाताळण्याचं कौशल्य असणारे कुशल मेकॅनिक, इलेक्‍ट्रिशियन्स, फिटर, प्लम्बर आदींना तर अमेरिकेत, कॅनडात आणि इतर पाश्‍चिमात्य देशांमध्ये भरपूर मागणी होतीच; पण नवीन काम शिकण्याची तयारी असणाऱ्या अगदी अकुशल, अशिक्षित लोकांसाठीही चांगल्या संधी होत्या. नोकरीसाठी पश्‍चिमेकडं गेलेल्या या लोकांनी तिकडून पाठवलेल्या पैशामुळे पंजाबच्या ग्रामीण भागात बरकत आली होती. अनेक जणांनी आपल्या इतर नातेवाइकांनाही नोकऱ्यांसाठी परदेशात बोलावून घेतलं. लवकरच काही लोकांनी कुटुंबातल्या इतरांनाही तिकडं नेऊन तिथंच नव्यानं संसार थाटायला सुरवात केली.

पंजाबमधून परदेशात जाऊन स्थायिक झालेल्या अशा हजारो लोकांमध्ये जगराओंजवळच्या गोपालपूरचे दर्शनसिंग आणि मनजितकौर हेही होते. कॅनडातल्या ब्रिटिश कोलम्बिया या राज्यात व्हॅंकुव्हरच्या एका उपनगरात हे जोडपं स्थायिक झालं होतं. दर्शनसिंग स्वतः मेहनती असल्यानं कॅनडातही ते बऱ्यापैकी कमाई करत होते. जगराओंच्या परिसरात दर्शनसिंग आणि मनजित कौर यांच्या कुटुंबीयांकडं जवळपास 40 एकर शेतजमीन होती. शहर जसं वाढत गेलं तसा त्या शेतजमिनीला कमर्शिअल रेटनं भाव मिळायला लागला, त्या कुटुंबाच्या श्रीमंतीत भर पडत गेली आणि त्याबरोबर दर्शनसिंग यांच्या कुटुंबाचं त्यांच्या गावातलं वजनही वाढत गेलं.
जसविंदरकौर ही या जोडप्याची एकुलती एक मुलगी. तिचा जन्म कॅनडातलाच. लाडानं घरात तिला "जस्सी' म्हणायचे. तेच नाव पुढं तिला कायमचंच चिकटलं. कॅनडातच वाढलेली जस्सी पहिल्यांदा भारतात आली ती एका हिवाळ्यात. त्या शीत ऋतूतल्या ग्रामीण पंजाबच्या त्या मोहक रूपानं किशोरवयातल्या जस्सीला जणू भुरळच घातली. 'डॅड, इतका सुंदर देश आणि इथले इतके प्रेमळ लोक सोडून तुम्ही कॅनडातल्या त्या अनोळखी लोकांमध्ये का जाऊन राहिलात?'' जस्सी वडिलांना विचारायची. मात्र, "डॉलर्समध्ये कमाई करून अधिक श्रीमंत होण्यासाठी आपण कॅनडाला आलो' हे या प्रश्नाचं खरं उत्तर ते आपल्या मुलीला देऊ शकत नव्हते आणि तिचं समाधान होईल असं या प्रश्नाचं दुसरं उत्तरही त्यांच्याकडं नव्हतं. दर्शनसिंगनी मेहनत करून खरंच खूप पैसा कमावला होता; पण जस्सीला मात्र त्या संपत्तीचा गर्व नव्हता, ती खूपच प्रॅक्‍टिकल, अगदी साधी आणि प्रेमळ होती.

जस्सीला मोहक सौंदर्याचंही वरदान लाभलेलं होतं. उंच, शेलाटी, गहूवर्णी जस्सी कोणत्याही कपड्यात खुलून दिसायची. तिच्या सौंदर्यानं आणि खेळकर स्वभावानं तिला भेटणारा प्रत्येक जण मोहून जात असे. नृत्य आणि गायनातही निपुण असणाऱ्या जस्सीला उत्तम संभाषणकौशल्याचीही देणगी होती. कुणाशीही तिचं पटकन जमून जात असे. पहिल्याच भेटीत गावातल्या तिच्या वयाच्या सगळ्या मुलींबरोबर तिची मैत्री होऊन गेली होती.

जस्सी जेव्हा दोन वर्षांनी पुन्हा भारतात आली तेव्हा शिक्षण पूर्ण करून ती तिकडंच एका ब्यूटीपार्लरमध्ये ट्रेनी म्हणून काम करत होती. तारुण्यानं मुसमुसलेल्या जस्सीशी विवाह व्हावा अशी मनीषा बाळगणाऱ्या डझनभर विवाहेच्छू तरुणांनी तिच्या आई-वडिलांकडं विवाहाचे प्रस्ताव पाठवले होते. मात्र, कॅनडातल्या मोकळ्या वातावरणात वाढलेल्या जस्सीला त्यांच्यापैकी कुणीच भुरळ घालू शकलं नव्हतं.
'ममा, तूच सांग कुठल्या तरी अगदी अनोळखी मुलाशी मी कसं लग्न करू? "ब्याह' होण्याआधी मला त्या मुलाची नीट ओळख तरी करून घ्यायला हवी का नको? अनोळखी कुणाबरोबर मी लग्न करणार नाही,'' ती आईला सांगायची. आपल्या लेकीला शोभणाऱ्या, आपल्या पसंतीच्या मुलाबरोबर लग्न करायला जस्सी नाही म्हणणार नाही याची खात्री असलेल्या दर्शनसिंग आणि मनजीतकौर यांनी तिचं हे म्हणणं फारसं काही मनावर घेतलं नव्हतं.

कुटुंबातल्या विवाहसमारंभांसाठी म्हणून जस्सी या वेळी थोडा अधिक काळ भारतात राहणार होती. तिला तिच्या मामांच्या, सुरजितसिंग यांच्या - हाती सोपवून जस्सीचे आई-वडील कॅनडाला परतले. सुरजितसिंगही कॅनडातच स्थायिक झाले होते, त्यांनीही तिथलं नागरिकत्व घेतलं होतं. लग्न आटोपल्यानंतर जस्सी मामाबरोबर कॅनडाला परतणार होती. याच काळात जस्सी आणि मिठ्ठूची ओळख झाली.
लहानपणीच आई-वडिलांचं छत्र गमावल्यानंतर थोरल्या भावानं आणि काही नातेवाइकांनी सुखविंदरसिंग उर्फ मिठ्ठूचा सांभाळ केला होता. शाळा संपल्यावर मिठ्ठूनं जगराओंतल्याच महाविद्यालयात प्रवेश घेतला. उंच, रुबाबदार मिठ्ठू चांगला कबड्डीपटूही होता. वेळी-अवेळीही कुणालाही मदत करण्याच्या स्वभावामुळे गावातल्या लोकांनाही तो आवडत असे. दोन्ही भाऊ शेती करायचे. शेतीच्या उत्पन्नाला जोड म्हणून फावल्या वेळात ते रिक्षा आणि टॅक्‍सीही चालवायचे. एकदोनदा जस्सीनं मिठ्ठूच्या रिक्षातून प्रवास केल्यानं त्यांची ओळख झाली होती. दोघंही जाट शीख असले तरी त्यांच्या कौटुंबिक परिस्थितीमध्ये खूप तफावत होती; पण तरीही त्यांची चांगली गट्टी जमली होती. जस्सी कॅनडात वाढलेली, श्रीमंत घरची लेक होती, तर मिठ्ठू गरीब होता, जगण्याची कसरत करण्यासाठी त्याला भरपूर कष्ट करावे लागायचे. जस्सीच्या बोलण्यात बऱ्याचदा मिठ्ठूचा विषय असे. तिच्या आई-वडिलांशीही ती त्या "चंगा मुंडा'बद्दल (चांगल्या मुलाबद्दल) अनेकदा बोलली होती. तिच्या आई-वडिलांच्या दृष्टीनं मात्र मिठ्ठू निव्वळ एक जोकर -विदूषक होता. तिच्या मामाला तर मिठ्ठूचा रागच यायचा. त्यानं मिठ्ठूला जस्सीशी मैत्री न करण्याबद्दल खडसावलंही होतं. घरच्यांना आवडत नव्हतं; पण जस्सी आणि मिठ्ठूच्या मैत्रीवर मात्र त्याचा काहीच परिणाम झाला नव्हता.

काही दिवसांनी जस्सी मामाबरोबर कॅनडाला परत गेली; पण ती मिठ्ठूला विसरू शकत नव्हती. बऱ्याचदा ती मिठ्ठूला कॅनडाहून फोन करायची. मग ते दोघेही फोनवर तासन्‌तास बोलत राहायचे. एकमेकांबद्दल वाटणारा जिव्हाळा दोघांनाही जाणवत असला तरी दोघांनीही तो व्यक्त केला नव्हता. आपल्या मुलीनं मिठ्ठूबरोबरच्या मैत्री करण्याला जस्सीच्या आईचा प्रचंड विरोध होता. स्वतःचंच म्हणणं खरं करणारी - डॉमिनेटिंग - स्वभावाची काही माणसं असतात, जस्सीची आई त्यापैकी होती. जस्सीचे वडील त्यामानानं उदार मताचे होते; पण तिची आई आणि मामा नुसतेच हटवादी नव्हते तर आपलं म्हणणं खरं करण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकत होते. जस्सी मात्र त्यांच्या या वागण्याकडं फारसं लक्ष देत नव्हती. तशीही ती तिच्या आयुष्यात इतर कुणाला फारशी ढवळाढवळ करू देत नसे.

जवळच्या नात्यातल्या एका लग्नाच्या निमित्तानं जस्सीला पुढच्याच वर्षी भारतात येण्याचं निमित्त मिळालं."त्या "विदूषका'ला भेटायचंही नाही. तू त्याला भेटलीस तर त्याचे वाईट परिणाम त्याला भोगावे लागतील,' अशी तंबीच जस्सीला आईकडून मिळाली होती. 'ममा, तू कशाला यात पडतेस? माझं मला पाहू दे,'' या जस्सीच्या वक्तव्याला तिच्या आईनं 'तू आमची मुलगी आहेस आणि तुझ्या बऱ्या-वाइटाचा निर्णय घेण्याचा हक्क आम्हाला आहे,'' असं उत्तर मिळालं होतं. जस्सीनं आईच्या रागाकडं दुर्लक्ष केलं.
आपण खूप दिवसांचा विरह सहन केल्याची जाणीव आतापर्यंत
जस्सी आणि मिठ्ठू दोघांनाही झाली होती. इतक्‍या विरहानंतर आता आपण एकमेकांशिवाय जगू शकणार नाही असं दोघांनाही जाणवत होतं. स्वभावतःच थोडी बेधडक असणाऱ्या जस्सीनं अखेर प्रेम व्यक्त करण्यात पुढाकार घेतला. 'लग्न कर म्हणून माझे आई-वडील माझ्या मागं लागले आहेत. मी त्यांच्याशी बोलते तुझ्याबद्दल,'' ती मिठ्ठूला म्हणाली. मिठ्ठूनं मात्र असं काहीही न करण्याचा सल्ला तिला दिला.

"तुझ्या आई-वडिलांना असं काही कधीच पसंत पडणार नाही आणि परिणामी मला गावात राहणंही कठीण होईल. आणखी काही दिवस तरी आपल्या प्रेमाबद्दल कुणालाही काही कळता कामा नये,' असं त्याचं म्हणणं होतं. त्या दोघांनी जरी काहीही न बोलण्याचं ठरवलं होतं तरी रिक्षानं जाण्या-येण्याच्या निमित्तानं जस्सी आणि मिठ्ठू जवळजवळ रोज एकत्र दिसत असल्यानं लोकांना त्यांचा संशय यायला लागला होता.
जातीपातींच्या आणि गरिबी-श्रीमंतीच्या व्याख्यांनी निर्माण केलेल्या भेदाभेदांबद्दल जस्सी अनभिज्ञ होती. मिठ्ठूची आणि तिची जात एकच असली तरी तो गरीब घरातला होता. त्याची आणि त्याच्या भावाची मिळून वंशपरंपरेनं मिळालेली थोडी जमीन होती; पण जस्सीच्या कुटुंबीयांकडं भरपूर जमिनी होत्या. त्यांची आर्थिक परिस्थितीही मिठ्ठूपेक्षा कितीतरी पटींनी चांगली होती. दोघांमधला हा फरक उमजला तरी कॅनडातल्या मोकळ्या वातावरणात लहानाची मोठी झालेल्या जस्सीला तो फार मोठा प्रश्न आहे असं कधीही वाटलं नव्हतं. मिठ्ठूबरोबरच्या तिच्या मैत्रीमुळे घरात वाद होणार याची तिला कल्पना होती; पण मिठ्ठू तिला आवडत होता आणि त्यापेक्षा अधिक विचार करणायाची तिची तयारी नव्हती.

जस्सीनं तिच्या आई-वडिलांना मिठ्ठूबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला; पण तिच्या आईनं आणि मामानं भारतातल्या वास्तव्यादरम्यान तिच्याशी "लग्न' या विषयावरच बोलण्याचं टाळलं. एकदा कॅनडात परतल्यानंतर तिला पुन्हा भारतात येण्याची संधीच द्यायची नाही, असा तिच्या आईचा विचार होता; पण जस्सी आजूबाजूच्या मुलींची परिस्थिती पाहत होती. आपल्याला घरातून तीव्र विरोध होणार हे तिला कळून चुकलं होतं. मिठ्ठूला आपल्यापासून दूर करण्यासाठी त्याला एखाद्या खोट्या प्रकरणातही गोवलं जाऊ शकतं, याचीही तिला जाणीव झाली होती.
जस्सीनं मग एक धाडसी निर्णय घेतला. घरात कुणालाही कळू न देता आपण नोंदणी (रजिस्टर्ड) पद्धतीनं विवाह करू असं तिनं मिठ्ठूला सुचवलं. थोड्या विरोधानंतर अखेर मिठ्ठू लग्नाला तयार झाला. एप्रिल 1999 मध्ये रजिस्ट्रारकडं जाऊन ते विवाहबद्ध झाले. "काही महिन्यांनंतर मी तुला कॅनडामध्ये यायला मदत करेन,' असं मिठ्ठूला सांगून जस्सी तिच्या आई-वडिलांबरोबर कॅनडाला परतली...
(पूर्वार्ध)

(ही कहाणी सत्यघटनेवर आधारित आहे, मात्र, काही व्यक्तींची आणि स्थळांची नावं बदलण्यात आलेली आहेत.)
(या लेखाचे बौद्धिक संपदा हक्क लेखकाकडे आहेत.)