कहाणी एका जस्सीची (भाग-३) (एस. एस. विर्क)

s s virk
s s virk

त्या भागात ‘विदेशा’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सुरजितसिंगनं अनेकांना कॅनडात स्थलांतरित होण्यास मदत केली असल्यानं एका परीनं ते लोक त्याच्या उपकाराच्या ओझ्याखाली होते. दर्शनसिंगच्या पाठोपाठ जोगिंदरसिंगचा एक जुना मित्र गुरनेकसिंगही या कंपूत सामील झाला.

सुखविंदरसिंग ऊर्फ मिठ्ठूचा काटा काढण्यासाठी ‘पेशेवर’ मारेकऱ्यांना सुपारी देण्याची जबाबदारी ठाणेदार जोगिंदरसिंगवर सोपवण्यात आली होती. जोगिंदरसिंग हा पोलिस खात्यात सबइन्स्पेक्‍टर असला तरी समाजकंटकांशी, गुन्हेगारी-जगताशी मैत्रीपूर्ण संबंध राखण्यात त्याला खूप रस असायचा. सुरजितसिंगच्या कामासाठी तो अत्यंत योग्य होता. या कामात पैसाही असल्यानं जोगिंदरसिंगही जोमानं कामाला लागला होता. त्याला एक विश्वासू माणूस हवा होता. हे ‘प्रवासी भारतीय’ भित्रे असतात; पण ते भरपूर पैसे द्यायला तयार असतात त्यामुळे ठाणेदार जोगिंदरसिंग परिस्थितीचा पूर्ण फायदा उठवण्याच्या प्रयत्नात होता.

याच सुमारास सुरजितसिंगचा दर्शनसिंग नावाचा आणखी एक नातेवाईक या कटात सामील झाला. सुरजितसिंगच्या मुलाशी या दर्शनसिंगच्या मुलीचं लग्न ठरलं होतं. त्या भागात ‘विदेशा’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सुरजितसिंगनं अनेकांना कॅनडात स्थलांतरित होण्यास मदत केली असल्यानं एका परीनं ते लोक त्याच्या उपकाराच्या ओझ्याखालीही होते. दर्शनसिंगच्या पाठोपाठ जोगिंदरसिंगचा एक जुना मित्र गुरनेकसिंगही या कंपूत सामील झाला. काम लवकर व्हावं असा या मंडळींचा आग्रह असला तरी जोगिंदरसिंगच्या मते काम नाजूक आणि जोखमीचं असल्यानं त्यासाठी योग्य माणसंच लागणार होती. कुण्या ऐऱ्यागैऱ्यावर काम सोपवून चालणार नव्हतं. जोगिंदरसिंग त्यामुळे त्यांना थोडा धीर धरायला सांगत होता. त्याचं म्हणणं होतं : ‘घाईघाईत काही करू नका. योग्य कॉन्टॅक्‍ट असणारी, आपलं काम कोणतीही हयगय न करता, दया-माया न दाखवता करणारी माणसं आपल्याला हवी आहेत.’ तो काही गुन्हेगारांशी संपर्क साधण्याच्या प्रयत्नात होता; पण काही कारणांमुळे त्याला योग्य माणसं सापडत नव्हती.

काही दिवसांनी जोगिंदरसिंगनं सुरजितसिंगला आपल्या फार्महाऊसवर भेटायला बोलावलं. दुसऱ्याच कुणाच्या तरी मालकीचं असलेलं हे फार्महाऊस जोगिंदरसिंगनं असंच बळकावलं होतं. खात्यात फार चांगली प्रतिमा नसूनही जोगिंदरसिंगचे त्याच्यासारखीच मनोवृत्ती असणाऱ्या बऱ्याच वरिष्ठांशी सलोख्याचे संबंध होते. जोगिंदरसिंग स्वतः भ्रष्ट मार्गांनी पैसा कमवायचाच; पण असा पैसा वाटण्यातही त्याला लाज, शरम वाटत नसे.

सुरजितसिंग इतरांबरोबर जेव्हा फार्महाऊसवर पोचला तेव्हा तिथल्या एका मोठ्या हॉलमध्ये आठ-दहा लोक दारू पीत बसले होते. ते लोक धोकादायक असल्याची जाणीव त्यांच्याकडं बघूनच होत होती. त्यांच्या आजूबाजूला काही हत्यारंही पडलेली होती. जोगिंदरसिंगनं त्यांच्यातल्या दोघांची ओळख अनिलकुमार आणि अश्वनीकुमार अशी करून दिली. जमिनींशी संबंधित आणि इतरही अनेक गुन्हे त्यांच्या नावावर होते.
‘‘हे नुसतेच असे तसे मारेकरी नाहीयेत. सरकारमध्ये आणि पोलिसांत यांची पोच फार वरपर्यंत आहे. यांच्या टोळीनं याआधी अशी अनेक कामं केली आहेत. योग्य पैसे मिळणार असतील तर हे करत नाहीत असं कोणतंही काम नाही. तुम्हाला नेमकं काय हवं आहे ते त्यांना नीट सांगा, मग ते सांगतील कसं काम होईल ते,’’ जोगिंदरसिंग म्हणाला.

सुरजितसिंगनं त्या दोघांना मिठ्ठूचा प्रॉब्लेम आणि जस्सीला त्याच्यापासून वाचवून परत कॅनडात नेण्यासाठी मिठ्ठूला संपवणं कसं आवश्‍यक आहे ते सविस्तर सांगितलं. जस्सीचं काय करायचं ते तो नंतर ठरवणार होता. ‘काम होईल,’असं सांगून अनिलनं आणि अश्वनीनं सगळा मिळून २० लाखांचा खर्च सांगितला. त्यातला पाच लाख रुपयांचा ॲडव्हान्स लगेच द्यायचा होता. मिठ्ठू आणि जस्सीचे अगदी ताजे फोटो, त्यांच्या स्कूटरचा नंबर आणि आणखी काही माहितीही त्यांनी मागितली.
‘‘काम व्हायला जास्तीत जास्त दोन महिने लागतील आणि आता आणखी काही माहिती किंवा पैसे लागले तरच आपण भेटू नाहीतर काम झाल्यावरच आम्ही तुम्हाला कळवू,’’ अनिल आणि अश्वनी म्हणाले.

सुरजितसिंगनं तिथल्या तिथंच त्यांना पाच लाख रुपये ॲडव्हान्स म्हणून दिले. ‘उरलेले पैसे हरदेवसिंगकडं आहेत’ असं सुरजितसिंगनं त्या दोघांना सांगितलं. कारण, काम होण्यापूर्वी त्याला कॅनडाला परतायचं होतं. फोटो, स्कूटरचा नंबर वगैरेही त्यानं तिथल्या तिथंच त्यांना दिलं.
‘‘आता तुम्ही फार विचार करू नका. ते दोघे रोज कुठं जातात-येतात, दिवसभर कसे वावरतात यावर पाळत ठेवून आम्ही काम करू,’’ असं त्या दोघांनी सुरजितसिंगला सांगितलं. त्यानंतर थोड्याच दिवसांनी हरदेवसिंगकडं उरलेले पैसे देऊन सुरजितसिंग कॅनडाला निघून गेला.
अनिलकुमार आणि अश्वनीकुमार हे निर्ढावलेले गुन्हेगार होते. आपल्या सावजाच्या पाळतीवर राहण्यासाठी त्यांच्याकडं भरपूर माणसं होती. त्यांनी जस्सी आणि मिठ्ठूवर लक्ष ठेवण्यासाठी, त्यांचा पाठलाग करण्यासाठी माणसं कामाला लावली.
***

मिठ्ठू आणि जस्सीला लग्नानंतर पहिल्यांदाच आपला असा वेळ मिळत होता, त्यामुळे जास्तीत जास्त वेळ ते एकमेकांबरोबरच असायचे. काही वेळा ते जवळच्या नातेवाइकांना भेटायला जायचे, त्यांचे आशीर्वाद घ्यायचे. नातेवाइकांपैकी अनेकांनी त्यांना रीती-रिवाजानुसार जेवायला बोलावलं होतं. दोघंही त्यांच्या या नव्या आयुष्यात अत्यंत आनंदी होते. आपल्याविरुद्ध काहीतरी भयानक षड्‌यंत्र शिजत आहे हे त्या प्रेमी जीवांच्या ध्यानीमनीही नव्हतं.

गुन्हेगारी-जगतात अनेक वर्षं काढलेल्या अनिलवर आणि अश्वनीवर खून, खुनाचे प्रयत्न, दंगली, अतिक्रमणं, जमिनी बळकावणं असे अनेक गुन्हे दाखल होते. आपली कामं करून घेण्यासाठी बऱ्याच प्रतिष्ठित, प्रभावशाली लोकांनी त्यांना याआधी सुपाऱ्या दिलेल्या होत्या. त्यासाठी दोघांनाही मन चाहेल तेवढे पैसे मिळत होते.
जस्सीच्या आणि मिठ्ठूच्या मागावर असलेल्या लोकांकडून अनिलला आणि अश्वनीला दोघांच्याही हालचालींची माहिती मिळत होती. त्या रात्री साडेनऊच्या सुमारास जस्सी आणि मिठ्ठू घरी जात असताना अनिल आणि त्याच्या टोळीनं रस्त्यावरच्या एका लहानशा पुलावर त्यांची स्कूटर अडवली. तारीख होती ८ जून २०००. थोड्या झटापटीत ते दोघंही खाली पडल्यावर हल्लेखोरांनी त्यांना मुख्य रस्त्यापासून आत ओढत नेलं. हल्लेखोरांचं मुख्य लक्ष्य होतं मिठ्ठू. रस्त्याच्या बाजूला नेऊन त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले. मिठ्ठूनं थोडा प्रतिकार केला; पण मारेकऱ्यांसमोर त्याचं फारसं काही चाललं नाही. त्याचं सगळं शरीर रक्तबंबाळ झालं होतं. त्याची नाडी आणि हृदयाचे ठोके तपासल्यावर त्याची हालचाल थंडावल्याचं पाहून हल्लेखोरांनी जस्सीकडं मोर्चा वळवला. जस्सीला तिथून ७० किलोमीटरवर असलेल्या जोगिंदरसिंगच्या बलारा फार्महाऊसवर
नेण्यात येणार होतं. तिचे हात पाठीमागं बांधून, तोंडावर पट्टी बांधून ते तिला घेऊन गेले. बलारा फार्ममधून जोगिंदरसिंगनं कॅनडात सुरजितसिंग आणि त्याच्या बहिणीला, मनजित कौरला, फोन करून मिठ्ठू ठार झाल्याचं आणि काम ‘फत्ते’ झाल्याचं सांगितलं.
‘‘आता जस्सीचं काय करायचं,’’ असं विचारल्यावर मनजितकौरनं त्याला जस्सीकडं फोन द्यायला सांगितलं.
‘‘मला तिच्याशी बोलायचंय,’’ ती म्हणाली.
‘‘हे बघ जस्सी, मिठ्ठू आता मेला आहे. तुला घरी परत यायची इच्छा आहे का? आम्ही सर्व काही विसरून तुला माफ करू,’’ मनजितकौर म्हणाली. जस्सी रागानं धुमसत होती.

‘‘तू आई आहेस की राक्षसीण? तुझ्या स्वतःच्या मुलीलाच तू विधवा केलंस. तू माझ्या मिठ्ठूला मारलं आहेस, आता मलाही मारून टाक. तू काय केलं आहेस ते सगळ्या जगाला ओरडून सांगेन मी. राक्षस आहात सगळे तुम्ही,’’ ती आईवर ओरडली.
‘‘आता आणखी वेळ वाया घालवू नका; तिलाही तिच्या मिठ्ठूकडं पाठवून द्या,’’ आईनं मारेकऱ्यांना सांगितलं; पाठोपाठ एक किंकाळी रात्रीची शांतता चिरत गेली. नव्या जीवनाचा आनंद घेणाऱ्या त्या जोडप्यानं स्वतःसाठी निर्माण केलेलं जग उद्ध्वस्त झालं होतं. हीच जस्सी काही तासांपूर्वी मिठ्ठूच्या स्कूटरवर मागं बसून भविष्याची स्वप्नं पाहत होती आणि आता तिचं कलेवर लुधियाना (ग्रामीण) पोलिस ठाण्याच्या हद्दीतल्या एका छोट्या पुलाजवळ रक्ताच्या थारोळ्यात पडलं होतं.
-मारेकऱ्यांनी मिठ्ठूचा मृतदेह संगरूर जिल्ह्यातल्या अमरगढजवळ, जिथं त्याच्यावर हल्ला केला गेला होता, तिथंच टाकला होता. हल्लेखोरांचं लक्ष्य असलेले दोघंही मारले गेले होते. नेमकं काय झालं ते सांगायलाही आता कुणी उरलं नव्हतं. मारेकऱ्यांचं ‘काम’ पूर्ण झालं होतं. आपलं आता कुणीच काही वाकडं करू शकत नाही, अशा आत्मविश्वासानं मारेकऱ्यांनी आपापला रस्ता धरला.

त्याच दिवशी रात्री अमरगढ परिसरात राहणारे एक शेतकरी देवासिंग रात्री शेताला पाणी देऊन परत घरी जात होते. अचानक कुणीतरी मदतीसाठी हाका मारत असल्याचं त्यांना जाणवलं. हातातल्या छोट्या टॉर्चच्या प्रकाशात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एक माणूस बघून त्यांना धक्काच बसला. त्यांनी लगेच हालचाल करून त्या जखमी माणसाला पाणी पाजलं आणि जवळच्या शेतातल्या आणखी एका शेतकऱ्याला हाक मारून बोलावून घेतलं. बेशुद्धीच्या सीमारेषेवर रेंगाळणाऱ्या त्या जखमी माणसाला ते अमरगढच्या सरकारी दवाखान्यात घेऊन गेले. तिथून मग पोलिसांना या हल्ल्याविषयी समजलं. दरम्यान, त्या जखमी माणसाला विशेष उपचारांसाठी लुधियानाला हलवण्यात आलं होतं. पुढच्या दोन-तीन दिवसांत पोलिसांनी त्या जखमी व्यक्तीची ओळख पटवली. त्याचं नाव होतं सुखविंदरसिंग ऊर्फ मिठ्ठू. पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून घेतला. तपासात मिठ्ठूची कॅनेडियन नागरिक असलेली पत्नी जस्सी बेपत्ता असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली.
नऊ जूनला संगोवाल गावच्या सरपंचांनी लुधियाना (ग्रामीण) पोलिसांना बलारा फार्मजवळच्या रस्त्यावर एका तरुण स्त्रीचा मृतदेह पडल्याचं कळवलं. लुधियाना पोलिस लगेचच त्या ठिकाणी पोचले. वेळ न घालवता त्यांनी वायरलेसवरून सर्व पोलिस ठाण्यांना त्या तरुण स्त्रीचं वर्णन कळवलं. गंभीर जखमी असलेल्या एका व्यक्तीला अमरगढ पोलिसांनी आदल्याच दिवशी संरक्षण देऊन हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. दोन्ही घटनांमध्ये हल्ला झालेल्या व्यक्तींना झालेल्या जखमांमध्ये खूपच साम्य होतं. लुधियाना पोलिसांनी त्या अज्ञात तरुणीच्या मृतदेहाची छायाचित्रंही पाठवली होती. तिचा गळा कापला गेला होता आणि शरीरावर अन्य जखमांच्याही खुणा होत्या.

दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या आपल्या भावाला लुधियानातल्या रुग्णालयात दाखल केल्याचं समजल्यानं मिठ्ठूचा भाऊही तिथं पोचला होता. अमरगढ पोलिसांनी मिठ्ठूच्या भावाला छायाचित्रं दाखवल्यावर त्यानं ती जस्सी असल्याचं ओळखलं; पण याहून अधिक काहीच तो सांगू शकत नव्हता. नेमकं काय घडलं ते मिठ्ठू शुद्धीवर येईपर्यंत कुणीच सांगू शकणार नव्हतं.
दोन-तीन दिवसांनी मिठ्ठू शुद्धीवर आला; पण त्याची स्थिती गंभीर असल्यानं त्याच्याकडून कोणतीच माहिती मिळणं शक्‍य नव्हतं. योग्य वेळी चांगले उपचार मिळाल्यानं त्याची तब्येत हळूहळू सुधारत होती. सुरवातीला त्याचं बोलणं अस्पष्ट होतं. तो काय सांगतो आहे याची संगती लागत नव्हती; पण जस्सीच्या मृतदेहाची छायाचित्रं पाहिल्यावर मात्र त्याला अश्रू अनावर झाले. त्या खुनासाठी तो जस्सीच्या आई-वडिलांकडं आणि इतर नातेवाइकांकडं बोट दाखवत होता.
मिठ्ठू वाचला हे मात्र त्याच्या हल्लेखोरांना अनपेक्षित होतं. हल्ल्याची चौकशी सुरू झाली होती. अनिलचे आणि अश्वनीचे अनेक उच्चपदस्थांबरोबर चांगले संबंध असल्यानं त्यांनी संगरूर जिल्ह्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांवर दबाव आणायला सुरवात केली. कुटुंबातल्या जमिनीच्या वादातून हल्ला आणि हत्या झाली असावी किंवा वाटमारी करणाऱ्या एखाद्या टोळीचं हे कृत्य असावं अशी हाकाटी त्यांनी सुरू केली.

सुदैवानं वरिष्ठ पोलिस अधीक्षक जतिंदरसिंग औलख आणि उपधीक्षक राज बचनसिंग हे दोघंही अत्यंत सज्जन, प्रामाणिक आणि निष्णात अधिकारी असल्यानं दबावाकडं लक्ष न देता त्यांनी तपासासाठी एक विशेष पथक नेमलं. त्या पथकाची जबाबदारी इन्स्पेक्‍टर स्वर्णसिंग यांच्यावर सोपवली गेली. अमरगढ आणि लुधियाना पोलिसांनी दाखल करून घेतलेले गुन्हे एकाच प्रकरणाशी संबंधित असल्यानं आधी दाखल केलेल्या गुन्ह्याला आता अपहरणाचाही गुन्हा जोडून जस्सीच्या हत्येचा तपासही याच पथकाकडं सोपवण्यात आला.

स्वर्णसिंग यांनी मिठ्ठूचा जबाब नोंदवून घेतला तेव्हा त्यानं सुरजितसिंग मामाकडून मिळालेल्या धमक्‍यांबद्दल सांगितलं. जस्सीच्या आई-वडिलांनी त्याच्याविरुद्ध केलेली फसवणुकीची तक्रार, सुरजितसिंगचा त्यातला सहभाग अशा सगळ्या घटनाक्रमामुळे संशयाची सुई त्यांच्यावरच रोखली जात होती. स्वर्णसिंग यांनी सुरजितसिंगच्या फोनचं कॉल रेकॉर्ड तपासल्यावर हरदेवसिंग, दर्शनसिंग आणि ठाणेदार जोगिंदरसिंग यांच्या बरोबरचे त्याचे संबंध उघड झाले. जोगिंदरसिंगच्या कॉल रेकॉर्डवरून तो सतत अनिलकुमार आणि अश्वनीकुमारच्या संपर्कात असल्याचं निष्पन्न झाल्यावर पोलिसांनी वेळ न घालवता मारेकऱ्यांच्या टोळीतल्या काहीजणांना ताब्यात घेतलं. त्यांच्या चौकशीतून हा भीषण कट उलगडत गेला.
जोगिंदरसिंगच्या फार्म हाऊसमध्ये आणि तिथं सापडलेल्या गाडीतही जस्सीच्या रक्ताचे डाग आढळून आले. झडतीत अनेक धारदार शस्त्रं सापडली, त्यापैकी काहींवर मिठ्ठूच्या रक्ताचे डाग मिळाले. तांत्रिक तपासातून स्वर्णसिंग यांच्या पथकानं भारतात आणि कॅनडात शिजलेला कट आणि जस्सीच्या आई-वडिलांचा व सुरजितसिंगचा त्या कटातली सहभाग यांच्यातले दुवे जुळवले.

जोगिंदरसिंग निर्ढावलेला, पाताळयंत्री, कपटी माणूस होता. त्याच्यावर अनेक राजकीय नेत्यांचा आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा वरदहस्त होता. तो त्याच अहंकाराच्या गुर्मीत असायचा; पण अखेरीस त्यालाही अटक करण्यात आली. पैसा आणि राजकीय दबावाचा वापर करण्याचा त्यानं पुरेपूर प्रयत्न केला; पण वरिष्ठ अधीक्षक, उपधीक्षक आणि तपास अधिकाऱ्यांनी त्या दबावाला भीक न घालता आपलं काम पूर्ण केलं. पोलिसातले काही वरिष्ठ अधिकारी या तीन अधिकाऱ्यांवर इतके चिडले होते की त्यांच्या वार्षिक गोपनीय अहवालात काही प्रतिकूल नोंदी करून त्यांच्याबद्दलचे मत कलुषित करण्यापर्यंत त्या वरिष्ठांची मजल गेली होती; पण या सगळ्या अधिकाऱ्यांनी नेटानं तपास करून सगळ्या पुराव्यांनिशी संगरूरच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
स्वर्णसिंग यांच्या पथकाकडून तपास काढून घेऊन तो अन्य कुणाकडं तरी सोपवण्याचेही प्रयत्न झाले; पण ते यशस्वी झाले नाहीत. अनिल आणि अश्वनीसाठी हे सगळं नेहमीचंच होतं. जोगिंदरसिंग वर्दीतला गुन्हेगारच होता. तपास अधिकारी स्वर्णसिंगना तो नेहमी धमक्‍या द्यायचा : ‘‘आम्ही कायदेशीरदृष्ट्या खूपच प्रबळ आहोत. आम्ही तुमची केस टिकू देणार नाही, नंतर मी तुमचं करिअर पूर्णपणे बरबाद करेन.’’
अजूनही एक ‘लंबी लडाई’ बाकी होती. एका बाजूला प्रामाणिकपणा आणि कायदा तर दुसऱ्या बाजूला पैसा, गुन्हेगारी आणि माफिया. सत्‌ आणि असत्‌ यांच्यातल्या या लढाईविषयी अनेकजणांच्या मनात उत्सुकता होती...
(उत्तरार्ध : २)
---
(ही कहाणी सत्यघटनेवर आधारित आहे. मात्र, काही व्यक्तींची आणि स्थळांची नावं बदलण्यात आलेली आहेत.)
---
(या लेखाचे बौद्धिक संपदा हक्क लेखकाकडं आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com