कहाणी एका जस्सीची (भाग-४) (एस. एस. विर्क)

s s virk
s s virk

जस्सी आता या जगात नाही; पण तिच्या हत्येनं समाजासाठी अनेक प्रश्न मात्र उभे केले. आपण सुसंस्कृत समाजात राहत असलो तरी आपला मूळचा रानटीपणा अजून गेलेला नाही, हेच यातून दिसतं. मुलीला ‘लक्ष्मी’ मानणारा आपला समाज तिचा जीव घेण्याच्या थरालाही जाऊ शकतो.

जस्सीच्या निर्घृण हत्येनं सुसंस्कृत समाजाला हादरवून सोडलं होतं. या प्रकरणाला भरपूर प्रसिद्धीही मिळाली होती.‘ऑनर किलिंग’चा बळी ठरलेल्या जस्सीला आणि मिठ्ठूला लोकांची सहानुभूतीही मिळत होती. या हत्येतून एक मुद्दा अगदी स्पष्ट दिसत होता व तो म्हणजे, मिठ्ठू भलेही चांगला मुलगा असेल; पण आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या तो दुर्बल होता आणि म्हणून अधिक श्रीमंत घरातल्या मुलीशी लग्न करण्याचा त्याला अधिकार नव्हता! तरीही त्यानं आपल्यापेक्षा श्रीमंत घरातल्या मुलीशी लग्न केलंच तर त्याला आणि त्या मुलीलाही जगण्याचा हक्क उरत नाही! श्रीमंत आई-बाप त्यांना सुखानं जगू देणार नाहीत, ते त्यांना मारूनही टाकू शकतात, जसं जस्सीच्या बाबतीत घडलं. या हल्ल्यात मिठ्ठूही मारला गेला असता, तर ‘ऑनर किलिंग’चा हा प्रकार, त्यामागचा कट, त्यातलं क्रौर्य कधीच उघडकीस आलं नसतं. कदाचित पोलिस रेकॉर्डमधल्या उघडकीस न आलेल्या गुन्ह्यांच्या यादीत ‘आणखी एका हत्याकांड’ अशी भर पडली असती.

नशिबानं मिठ्ठू वाचला आणि हे निर्घृण कृत्य जगासमोर आलं. नशिबाचा आणखी एक भाग म्हणजे, या प्रकरणाचा तपास प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या हातात होता. या अधिकाऱ्यांनी गुन्ह्याचं गांभीर्य ओळखलं, त्यांनी योग्य पद्धतीनं तपास करून दोषींना शिक्षा होईल अशा रीतीनं हे प्रकरण तडीस नेण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. या प्रकरणातल्या तांत्रिक पुराव्यावरून आणखी एक बाब स्पष्ट होत होती व ती म्हणजे, काही वरिष्ठ अधिकारीही या ‘पेशेवर’ मारेकऱ्यांच्या संपर्कात होते; पण पोलिस यंत्रणेच्या गुन्हेगारीकरणाला जबाबदार असणाऱ्या अशा लोकांना जिम्मेदार धरण्यात आपली व्यवस्था कदाचित कमी पडली.

असे सडक्‍या मनोवृत्तीचे काही थोडे लोक वगळले तर बहुसंख्य अधिकारी, राजकीय नेते आणि सर्वसामान्य लोक या कटाला बळी पडलेल्या जोडप्याच्या बाजूनं होते. तिकडं कॅनडातही जस्सीच्या हत्येचा निषेध करणारी मोहीम सुरू झाली होती. बळी पडलेली व्यक्ती कॅनडाची नागरिक असल्यानं तिथल्या पोलिस यंत्रणेनंही या हत्येची दखल घेतली होती. रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांच्या अधिकाऱ्यांची एक टीमही पंजाबमध्ये आली होती. आपल्याकडच्या प्रसारमाध्यमांतही खूप काळ हे प्रकरण गाजत होतं; पण भाडोत्री मारेकरी सगळीकडंच असतात, काही वेळा त्यांचीच चलती असते. पोलिस अधिकारी, पुढारी आणि समाजातल्या इतर क्षेत्रांतल्या मान्यवर मंडळींशी चांगले संबंध ठेवण्याची ‘कला’ही त्यांनी साधलेली असते. या प्रकरणातले भाडोत्री मारेकरीही याच प्रकारातले होते.

जस्सीच्या खुनाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी जस्सीच्या आईच्या - मनजितकौरच्या - आणि मामा सुरजितसिंग ऊर्फ ‘विदेशा’च्याही विरोधात पुरेसे पुरावे जमा केले होते. नियमांनुसार पंजाब सरकार, सीबीआय आणि इंटरपोल अशा मार्गानं त्या दोघांना कॅनडातून प्रत्यार्पण करून पंजाबमध्ये आणून त्यांच्याविरुद्धही जस्सीच्या हत्येचा आणि मिठ्ठूवरच्या हल्ल्याचा खटला चालावा यासाठी अर्ज करण्यात आले. त्या दोघांनीही कॅनडातल्या न्यायालयात प्रत्यार्पणप्रक्रियेला आव्हान दिलं. पंजाब सरकार या प्रकरणात प्रतिवादी असल्यानं पंजाब पोलिसांचे अधिकारी कॅनडातल्या सुनावणीला उपस्थित होते. जस्सीच्या हत्येत मनजितकौरचा आणि सुरजितसिंगचा हात असल्याचं न्यायालयासमोर ठेवलेल्या पुराव्यांतून स्पष्ट होत होतं. कॅनडा सरकारला जस्सीबद्दल सहानुभूती असली तरी फाशीच्या शिक्षेला सरकारचा विरोध होता. तिथल्या न्यायालयानं कायदेशीर बाबी तपासून प्रत्यार्पणाला स्थगिती दिली. इकडं संगरूरच्या न्यायालयात इतर आरोपींवरची खटल्याची कारवाई सुरू झाली होती. आरोप निश्‍चित करण्याचे आदेशही न्यायालयानं दिले होते. कॅनडातले आणि भारतातलेही काही मानवाधिकार गटही मनजितकौरच्या आणि सुरजीतसिंगच्या प्रत्यार्पणाबाबत आग्रह धरत होते. मात्र, कायदेशीर मुद्द्यांमुळे प्रत्यार्पण लांबत होतं.
प्रत्यार्पणाला विलंब होत असल्यानं इतर आरोपींवरील खटल्याची सुनावणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोषनिश्‍चिती होऊन सुनावणी सुरू झाल्यावर खटला लांबवण्यासाठी आरोपींनी वेगवेगळ्या कायदेशीर क्लृप्त्या वापरायला सुरवात केली. बचावासाठी त्यांनी वकिलांची फौज उभी केली होती. एफआयआर रद्द व्हावा,
मनजितकौरचं आणि सुरजितसिंगचं प्रत्यार्पण झाल्यानंतर खटल्याची सुनावणी व्हावी अशा मुद्द्यांवर त्यांनी उच्च न्यायालयात अर्जामागून अर्ज करणं सुरू केलं. बचाव पक्षाच्या वकिलांनी उपस्थित केलेल्या सगळ्या आक्षेपांना संगरूरच्या पोलिस अधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात समर्पक उत्तरं दिली. ‘या प्रकरणात आपल्याला गोवण्यात आलं आहे,’ असा आरोप एका अर्जाद्वारे करण्यात आला होता. या अर्जावरच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी तपास अधिकारी स्वर्णसिंग यांना काही प्रश्न विचारले होते. न्यायमूर्तींच्या प्रश्नांना उत्तरं देताना स्वर्णसिंग यांनी संपूर्ण घटना न्यायालयाला सविस्तरपणे कथन केली. कट कसा शिजला, मारेकऱ्यांचं क्रौर्य, आरोपींनी तपासात ढवळाढवळ करण्याचे, अडथळे आणण्याचे कसे प्रयत्न केले, या प्रकरणाच्या निमित्तानं दिसलेला पैसा, बाहुबल आणि राजकीय सत्ता यांचे लागेबांधे त्यांनी मांडले. केवळ ‘कुटुंबाच्या प्रतिष्ठे’खातर जस्सीला आणि मिठ्ठूला संपवण्याचं हे कारस्थान कसं रचलं गेलं तेदेखील स्वर्णसिंग यांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे स्पष्ट केलं.

या घटनेवर कडक भाष्य करताना न्यायमूर्तींनीही,चांगल्या शिकल्या-सवरलेल्या, कॅनडासारख्या प्रगत आणि मोकळ्या वातावरणात राहणाऱ्या घरातले लोक आपल्याच कुटुंबातल्या मुलीला इतक्‍या क्रूरपणे ठार मारू शकतात, आजही समाजात असे प्रकार घडतात, याविषयी आश्‍चर्य आणि खेद व्यक्त केला. या प्रकरणाची सुनावणी सुरू करावी आणि वेळेत संपवावी असे स्पष्ट आदेश त्यांनी दिले. उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर मात्र खटला पुन्हा रुळावर आला आणि प्रकरणाची सुनावणी सुरू झाली.
सामाजिक दबावामुळे पोलिसांनी आपल्याला बनावट आरोपांमध्ये अडकवलं आहे, त्यांचा या गुन्ह्याशी काहीही संबंध नाही, असं ठसवण्याचा प्रयत्न आरोपींकडून सुनावणीदरम्यान केला जात होता; पण जगराओं पोलिसांकडं दाखल केलेली मिठ्ठूविरुद्धची खोटी तक्रार, त्याला अटक करण्यासाठी आणलेला दबाव यातून जस्सीचे कुटुंबीय त्याला जस्सीपासून दूर करण्याच्या प्रयत्नात होते हे दिसत होते. जस्सीनं कॅनडातून पाठवलेला मिठ्ठूविरुद्धच्या तक्रारीला विरोध करणारा फॅक्‍स मेसेज, तिनं प्रत्यक्ष येऊन दिलेली साक्ष यातून जस्सीच्या आईचा आणि मामाचा तिच्या लग्नाला विरोध होता आणि कोणत्याही मार्गानं हे लग्न रद्दबातल ठरवण्याचा त्यांचा प्रयत्न होता हे सिद्ध होत होतं. मिठ्ठूला दिलेल्या धमक्‍या, त्याच्याविरुद्ध खोटी तक्रार करण्याचा प्रयत्न, हल्ल्यात वापरलेल्या हत्यारांवर सापडलेले त्याच्या रक्ताचे डाग या सगळ्यावरून ‘कुटुंबाची प्रतिष्ठा’ किंवा ‘ऑनर किलिंग’ हा मुद्दा स्पष्ट होत होता. शिवाय, गावात असे अनेक लोक होते ज्यांनी जस्सीच्या कुटुंबीयांचा तिच्या लग्नाला विरोध होता हे न्यायालयात शपथेवर सांगितलं.
फोन कॉल्सचं रेकॉर्डही फार महत्त्वाचं ठरलं. या तपशिलांमुळे कटातले अनेक दुवे उघड झाले. कॅनडातून करण्यात आलेले फोन,
मनजितकौरनं आणि सुरजितसिंगनं दिलेली सुपारी घेतलेले अनिलकुमार, अश्वनीकुमार, जोगिंदरसिंग, दर्शनसिंग आणि हरदेवसिंग यांच्यात झालेल्या फोन कॉल्सवरून ते त्या काळात सतत एकमेकांच्या संपर्कात होते, हल्ला झाला तेव्हा आरोपी संगरूरमध्ये घटनास्थळी होते आणि ‘काम’ झाल्यावर आरोपी लुधियानाला परतले, हे सगळे सिद्ध करणं या फोन रेकॉर्डमुळे सहज शक्‍य झालं. वैद्यकीय आणि रक्ततपासणीचे अहवालही महत्त्वाचे ठरले. सरकारी वकिलांनी बचावपक्षाचे सगळे मुद्दे समर्थपणे खोडून काढले.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश इंद्रजितसिंग यांच्या समोर ही सुनावणी सुरू होती. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं अनिलकुमार, अश्वनीकुमार, जोगिंदरसिंग आणि इतर चार आरोपींना जन्मठेप सुनावली. या प्रकरणाकडे अनेकांचे लक्ष लागून राहिलेलं होतं. त्यांनी निकालाबाबत समाधान व्यक्त केलं. मनजितकौर आणि सुरजितसिंग यांच्या प्रत्यार्पणाचं प्रकरण कॅनडातल्या सर्वोच्च न्यायालयासमोर होतं. त्यावर काहीच निर्णय झाला नव्हता. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध खटला चालवता आला नाही.
दरम्यान, प्रदीर्घ न्यायालयीन लढाईनंतर एक वर्षापूर्वी कॅनडातल्या सर्वोच्च न्यायालयानं मनजितकौरचा आणि सुरजितसिंगचा ताबा भारताकडं देण्यास परवानगी दिली व त्यानंतर त्या दोघांनाही भारतात आणण्यात आलं. पुढच्या काही आठवड्यांतच त्यांच्या विरुद्धचा खटला सुरू होणं अपेक्षित आहे. घटना घडून आता १९ वर्षं होऊन गेली असली तरी कायद्याचं चक्र फिरत असतंच.
मिठ्ठू अजूनही जिवंत आहे...जगण्याची इच्छा आणि दिशा हरवलेला मिठ्ठू अजूनही जगतो आहे. या प्रकरणात आरोपींना शिक्षा झाल्यानंतरही त्याला वेगवेगळ्या प्रकरणात गोवण्यात आलं आणि बराच काळ त्याला तुरुंगातही राहावं लागलं. त्याची काही चूक नसताना त्याला फार मोठी किंमत मोजावी लागली.
जस्सी आता या जगात नाही; पण तिच्या हत्येनं समाजासाठी अनेक प्रश्न मात्र उभे केले. आपण सुसंस्कृत समाजात राहत असलो तरी आपला मूळचा रानटीपणा अजून गेलेला नाही, हेच यातून दिसतं. मुलीला ‘लक्ष्मी’ मानणारा आपला समाज तिचा जीव घेण्याच्या थरालाही जाऊ शकतो. एक आई इतकी क्रूर होते की ती आपल्याच मुलीला ‘ठार मारा’ म्हणून सांगते. आजही या मुद्द्यांचा गंभीरपणे विचार करणं आवश्‍यक आहे.

जस्सी गेली असली तरी ‘ऑनर किलिंग’चा मुद्दा अजूनही जिवंत आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागांत अशा अनेक ‘जस्सीं’ना रोज जीव गमवावा लागतो आहे. वर्तमानपत्रात, इतर माध्यमांमध्ये अशा बातम्या आपण हरघडी वाचतो, पाहतो. सहिष्णुता आणि संवेदना हरवून बसलेल्या आपल्या समाजात हा प्रश्न अक्राळविक्राळ स्वरूप धारण करतो आहे. अशी प्रकरणं अत्यंत समजूतदारपणे, नाजूकपणे हाताळायला हवीत आणि त्यांना कायद्याचं भक्कम पाठबळही हवं असं मला वाटतं. आपले काय मत आहे याविषयी?
मी पुण्यात असताना असंच एक प्रकरण माझ्यासमोर आलं होतं. इथे ‘ऑनर किलिंग’चा मुद्दा नव्हता; पण विरोध, धमक्‍या व जोडीला मारहाणीची भीती दाखवणं हे प्रकार सुरू होते. ‘लग्न झालं असलं तरी ते मोडावं लागेल. दोघांच्या आर्थिक स्थितीत फरक आहेत आणि दोघंही वेगळ्या वेगळ्या समाजांचे आहेत,’ असा मुद्दा होता. या प्रकरणात (जस्सीसारखी) संपवण्याची नाही तरी ‘थोडी फार मारठोक’ करण्याची सुपारी दिली गेली होती. योगायोगाने ते मला भेटले. सगळ्यांच्या संमतनं, समाजातल्या काही मान्यवरांच्या मदतीनं आम्ही दोन्ही कुटुंबांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्या प्रकरणाचा शेवट सुखद झाला हीच समाधानाची बाब.
पुढच्या लेखात मी आपल्याला ही कहाणी सविस्तर सांगेन.
तेव्हा, भेटू या पुढच्या आठवड्यात.
(संपूर्ण)
(ही कहाणी सत्यघटनेवर आधारित आहे. मात्र, काही व्यक्तींची आणि स्थळांची नावं बदलण्यात आलेली आहेत.)
(या लेखाचे बौद्धिक संपदा हक्क लेखकाकडं आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com