esakal | काही आठवणी...एक कहाणी (एस. एस. विर्क)
sakal

बोलून बातमी शोधा

s s virk

काही आठवणी...एक कहाणी (एस. एस. विर्क)

sakal_logo
By
एस. एस. विर्क

माझ्यासह अनेक मित्र आणि हितचिंतक नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून आले होते. प्रमोद आणि दिव्या खूप सुंदर आणि खूश दिसत होते. अडचणी असूनही ते एकमेकांबरोबर दृढपणे, अविचलपणे उभे राहिले म्हणून मी त्यांचं अभिनंदन केलं.

मला तर ‘ऑनर किलिंग’च्या घटना किंवा कौटुंबिक प्रतिष्ठेच्या बेगडी कल्पनांच्या आहारी गेल्यानं होणारी कृत्यं हे आपल्या सुसंस्कृत समाजाला लागलेले कलंकच वाटतात. एक काळ असा होता, जेव्हा बहुसंख्य लेकी-सुना शिक्षणाच्या अभावामुळे घराच्या चार भिंतींतच अडकून पडलेल्या असायच्या. चूल आणि मूल यापलीकडं त्यांना वेगळं विश्व नसायचं; पण काळ खूप बदलला आहे. मुली आता सर्व क्षेत्रांत अग्रेसर आहेत. आधीच्या काळात न शिकलेल्या किंवा शिक्षण अर्ध्यावर सुटलेल्या मुली पूर्णपणे त्यांच्या नवऱ्यांवर किंवा आई-वडिलांवर अवलंबून असायच्या; पण शिक्षणामुळे आज या परिस्थितीत फार मोठा बदल घडून आला आहे. शिक्षणात कुणालाही हार न जाणाऱ्या, सगळ्या क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वावरणाऱ्या मुली त्यांच्या हक्कांबद्दलही बोलू लागल्या आहेत. जीवनात आपल्याला काय करायचं आहे, आपण कुठं असणार आहोत, आपल्याला काय हवं आहे अशा मुद्द्यांवरची त्यांची मतंही अधिक निर्णायक, ठाम आणि स्पष्ट दिसतात. विवाहासारख्या निर्णयांमध्येही आपला विचार घेतला जावा यासाठी मुली आग्रही बनू लागल्या आहेत. आपला भावी पती जरी आपल्या आई-वडिलांनी निवडला असला तरी विवाहाबद्दलचा शेवटचा निर्णय आपला असावा, याबद्दल बऱ्याच मुली आता जागरूकपणे विचार करू लागल्या आहेत. यातून काही वेळा कौटुंबिक पातळीवर वादाचे प्रसंग उद्भवतात; पण हे प्रसंग योग्य पद्धतीनं, नाजूकपणे हाताळले तर असा दुरावा कौटुंबिक पातळीवरच संपून जातो, परस्पर संवादातून योग्य वाट सापडते.
मुलगी जेव्हा आयुष्याचा जोडीदार स्वतःच निवडते तेव्हा काही वेळा धर्म, जात किंवा अगदी श्रीमंती, गरिबी अशा मुद्द्यांवरही कुटुंबात पेचप्रसंग उभे राहतात. जस्सीचंच उदाहरण घ्या. जस्सी आणि मिठ्ठूची जात एकच होती; पण त्यांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये कमालीचं अंतर होतं. जस्सी प्रचंड श्रीमंत घरातली होती, तिचं कुटुंब अक्षरशः संपत्तीत लोळत होतं, तर दुसरीकडं मिठ्ठूला आणि त्याच्या भावाला मात्र जगण्यासाठी प्रचंड कष्ट करावे लागत होते. मुलाची किंवा मुलीची जात वेगवेगळी असेल तर काही वेळा कुटुंबांमधला हा पेच आणखी मोठा होतो आणि दोघांचे धर्मही वेगवेगळे असतील तर तो आणखी वाढतो. आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह केलेली आणि अत्यंत सुखा-समाधानानं संसार केलेली, करणारी अनेक जोडपी माझ्या मित्रमंडळींमध्ये आहेत. मी पुण्यात असतानाही असे अनेक सुखी संसार पाहिले आहेत. इथं जरा विषयांतर होत आहे, असं मला वाटतं. तुम्हालाही कदाचित असंच वाटत असेल. पुण्याबद्दल लिहिताना नेहमीच असे घडतं. कारण, मी माझ्याच विचारांच्या प्रवाहात वाहून जातो आणि माझा विचारांचा रोखही बदलून जातो; पण मी इथंच स्वतःला सावरतो आणि गेल्या आठवड्यात म्हटल्याप्रमाणे ‘कुटुंबाची प्रतिष्ठा’ विवाह वगैरे मुद्द्यांभोवती फिरणाऱ्या माझ्या कहाणीकडं वळतो.

तेव्हा मी पुण्यात पोलिस उपायुक्त होतो. एक दिवस मला एका मित्राचा फोन आला. त्या दिवशी कायदा-सुव्यस्थेशी संबंधित काहीतरी प्रश्न उद्भवला होता आणि मी नेमका त्यात व्यग्र होतो.‘जरा इमर्जन्सी आहे’, असं माझ्या मित्रानं टेलिफोन ऑपरेटरला सांगितल्यानं त्यानं मला फोन जोडून दिला. नोंदणी विवाह केलेल्या एका मुलाला आणि मुलीला त्यांच्या घरचे लोक खूप त्रास देत आहेत, असं मित्रानं मला फोनवर सांगितलं. ‘‘त्यांनी नोंदणी विवाह केला आहे, म्हणजे दोघांचंही वय अठरा पेक्षा जास्त असेल ना?’’ मी विचारलं. त्यांनी होकारार्थी उत्तर दिल्यावर मी त्यांना ‘काळजी करू नका, हातातला प्रॉब्लेम संपल्यावर पाहतो मी,’ असं सांगितलं. त्या दोघांना त्यांच्या घरातलेच लोक धमकावत असल्यानं माझा मित्र काळजीत होता. ती दोन्ही मुलं चांगल्या सुसंस्कृत घरातली होती, असंही मित्राच्या बोलण्यात आलं होतं. ‘काळजी करू नका, मी करतो फोन तुम्हाला,’ असं मी पुन्हा त्या मित्राला सांगितलं.
संध्याकाळी पुन्हा त्याचा फोन आला. त्या मुलांची त्याला खूपच काळजी वाटत होती. दरम्यान, आधी दिवसभरात मला आणखी काही मित्रांचे आणि काही मान्यवर व्यक्तींचेही फोन आले होते. ते सगळे फोन त्याच मुलांविषयी होते. ‘‘पोलिसांकडं तक्रारही नोंदवली आहे. त्या कुटुंबांकडून दबाव येत असल्यानं पोलिसही त्या मुलांच्या मागं लागले आहेत, त्यांना मदतीची खरंच गरज आहे,’’ असंही त्यातल्या एकानं मला खासगीत सांगितलं होतं. मी पुन्हा त्या सगळ्यांना ‘एवढं हातातलं काम झालं की फोन करतो,’ असं सांगितलं.

हातातलं काम संपवून मोकळं व्हायला मला संध्याकाळचे जवळजवळ सात वाजले. मोकळा झाल्यावर मी त्या मित्राला फोन करून ऑफिसला यायला सांगितलं. त्याचं ऑफिसही जवळच असल्यानं मित्र लगेचच आला. त्यानं सगळी कहाणी सांगितली. ‘‘तुम्हाला ते अमुक अमुक माहीत आहेत ना? डॉ. प्रमोद मेहता त्यांचा पुतण्या आहे. विद्यापीठाच्या बॉटनी डिपार्टमेंटमध्ये असिस्टंट प्रोफेसर आहे. ती मुलगीही त्याच्याच विभागात रिसर्च स्कॉलर म्हणून पीएच.डीचा अभ्यास करते. तिचं नाव दिव्या नहार. तो गुजराती आहे आणि ही मुलगी मारवाडी जैन. दोघंही चांगल्या कुटुंबांतले आहेत; पण त्यांच्या लग्नाला दोन्ही कुटुंबांचा विरोध आहे. मुलीच्या घरचे लोक श्रीमंत आहेत. रजिस्टर्ड मॅरेजचं कळल्यावर मुलीच्या घरच्यांनी डॉ. प्रमोदविरुद्ध दिव्याचं अपहरण केल्याची तक्रार नोंदवली. आता पोलिस त्यांच्या मागावर आहेत आणि ते दोघंही लपून-छपून राहताहेत. मुलीच्या घरच्यांनी कुणाला तरी मुलीला परत आणण्याची "सुपारी'ही दिली आहे.’’

हे सगळं ऐकल्यावर मला धक्काच बसला. ‘दोन सुशिक्षित, सज्ञान व्यक्ती. एकमेकांच्या संमतीनं, मित्रांच्या उपस्थितीत नोंदणी पद्धतीनं झालेला विवाह. पुण्यासारखं सुसंस्कृत शहर. पोलिसांकडं झालेली तक्रार. नवविवाहित जोडप्याला शोधण्याचा दबाव. त्यासाठी कुटुंबानं समाजकंटकांना दिलेली ‘सुपारी’. बाप रे. पुणं खरंच बदलतंय...’ असे वेगवेगळे विचार माझ्या मनात येत होते.
मी त्याच वेळी त्या ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना फोन केला. नोंदणी विवाहाबद्दल आधी त्यांनी जरा उडवाउडवी केली; पण नंतर मात्र त्यांनी ते मान्य केलं. कोणतंही बेकायदेशीर काम न करण्याचा आणि कुणावरही अन्याय न करण्याचा सल्ला मी त्यांना दिला. तक्रार दाखल करून घेण्याबाबत त्यांचे वरिष्ठ फारच आग्रही होते
हेदेखील त्यांनी आढेवेढे घेत मान्य केलं. मी त्या निरीक्षकांना प्रकरण जरा सबुरीनं हाताळण्यास सांगितलं. हे सगळं होईपर्यंत खूप उशीर झाल्यानं मी मित्राला प्रमोद आणि दिव्याला दुसऱ्या दिवशी सकाळी अकराच्या सुमारास माझ्या ऑफिसमध्ये पाठवून देण्यास सांगितलं.
‘‘ते उघड उघड बाहेर आले तर पळवून नेले जाण्याची त्यांना खूप भीती वाटते आहे,’’ मित्र म्हणाला.
‘‘तुम्ही पाठवा त्यांना, मी पाहतो त्यांना कोण पळवून नेतं ते. हे पुणं आहे ‘वाईल्ड वेस्ट’ नाही,’’ मी मित्राला सांगितलं.
‘खरंच पुणं इतकं बदललंय? आणि आपल्यालाच त्याची कल्पना नाहीये?’ मी स्वतःलाच विचारलं, ‘जरा नीट पाहायला हवं. या मुलांना भेटायलाच हवं.’
दुसऱ्या दिवशी सकाळी कुणीच न आल्यानं मी पुन्हा मित्राला फोन केला. ‘‘त्या जोडप्याचा कुणीतरी पाठलाग करत होतं आणि पोलिस आयुक्त कार्यालयाजवळच्या परिसरात गुंडांसारखे काही लोक दिसले,’’ असं त्यानी मला सांगितलं.
चहाच्या एका टपरीजवळ ते गुंड उभे होते. त्यातल्या काही जणांच्या कपड्यांचं आणि ते कसे दिसत होते याचं वर्णनही मला मित्राकडून मिळालं. मी क्राईम ब्रॅंचमधल्या एका उपनिरीक्षकाला लगेचच चहाच्या त्या टपरीजवळ असे कुणी लोक आहेत का ते पाहायला पाठवलं. थोड्या वेळानं त्या उपनिरीक्षकानं रस्त्यावर मवालीगिरी करणाऱ्या एकाला पकडून आणले. ‘‘साहेब, आणखी दोघं-तिघं होते. ते पळाले; पण हा सापडला.’’ त्या गुंडांनी याआधीही आमचा ‘पाहुणचार’ घेतला होता.

विद्यापीठातल्या एका जोडप्याला ‘भीती दाखवण्यासाठी’ त्यांना पैसे मिळाल्याचं त्यानी कबूल केलं. आता त्यांच्यापैकीच एकजण घाबरून माझ्या समोर उभा होता.
‘‘अरे वा, इक्बाल, तू तर एकदम मोठा भाई झालास की. सुपाऱ्या वगैरे घ्यायला लागलास. बोल, आता कशी ‘सेवा’ करायची तुझी?’’ तो भीतीनी थरथर कापत होता. ‘‘साब, माँ कसम, मारने की सुपारी नही थी. गरज पडी तो दो-चार लाफे मारने थे, डराना था. मैं अभी रिक्षा चला के रोटी कमाता हूँ साब. इस बार माफ कर दो,’’ तो म्हणाला. त्या जोडप्यापासून लांब राहायची सक्त ताकीद देऊन आम्ही त्याला जायला सांगितलं.
‘मित्रांना बरोबर घेऊन मला संध्याकाळी ऑफिसमध्ये भेटा’, असा निरोप मी प्रमोद आणि दिव्याला पाठवला; पण काही कारणांनी ते येऊ शकले नाहीत. कदाचित इतक्‍या आयत्या वेळेला त्यांच्या बरोबर यायला कुणालाच जमलं नसेल. मला फोन येतच होते. एक दिवस असाच गेला; पण काहीही करण्याआधी त्या मुलांना भेटणं आवश्‍यक होतं. त्यांची बाजू ऐकल्यावरच कायदेशीररीत्या काय काय करता येईल ते ठरवणं शक्‍य होतं.

तिसऱ्या दिवशी जेव्हा ते दोघं त्यांच्या मित्रांबरोबर ऑफिसला आले तेव्हा ते सगळेच घाबरलेले, तणावाखाली असल्याचं दिसत होतं. ‘सुपारी’ वगैरे देण्याच्या भानगडीत पडून स्वतःला कायद्याच्या कचाट्यात अडकवून घेऊ नका, असा निरोप मी दिव्याच्या घरच्यांपर्यंत पोचवल्याचं मी दिव्याला सांगितलं. मग त्या दोघांनी मला सगळी व्यथा सांगितली. माझ्या मित्राकडून मला आधी कळलेले सगळे तपशील जुळत होते. मग मी त्या दोघांना संरक्षण देण्याची व्यवस्था केली. विद्यापीठात असतानाही साध्या कपड्यातले पोलिस त्यांच्या आजूबाजूला राहतील अशीही व्यवस्था थोडे दिवस करता येणं शक्‍य होतं. ‘‘थोडा धीर धरा. मामला जरा थंड होऊ द्या. आपल्याला शरणागती पत्करायची नाही; पण दोघांच्याही आई-वडिलांनाही थोडा वेळ घेऊ द्या,’’ असं सांगितल्यावर ते जरा आश्वस्त झाले. मी त्यांना संरक्षण आणि आवश्‍यक ती मदत देण्याचं आश्वासन दिलं. थोड्या दिवसांसाठी राहायला जागा हवी असेल तर ती व्यवस्था करण्याचीही तयारी दर्शवली; पण बहुधा आता त्यांना जरा सुरक्षित वाटत असावं.
‘‘काही अडचण आली तर मला फोन करा,’’ हे आश्‍वासन
मी त्यांना दिल्यानंतर ते गेले.
त्या मुलांना भेटल्याच्या दुसऱ्या दिवशी मला पुण्यातले ज्येष्ठ नेते मोहन धारिया यांचा फोन आला. ते याच प्रकरणाबाबत बोलत होते. ‘‘विर्कसाहेब, काय चाललंय हे? का त्या मुलांना त्रास होतोय?’’ त्यांनी विचारलं. मी त्या मुलांना भेटलो आहे आणि सुसंवादातून हा प्रश्न मार्गी लावण्याचा माझा प्रयत्न असल्याचं मी धारियासाहेबांना सांगितलं. बोलता बोलता मी एकदम त्यांच्यासमोर एक कल्पना मांडली, ‘‘सर, तुम्ही पुण्यातले ज्येष्ठ नेते आहात. तुम्ही या दोघांसाठी एक रिसेप्शन आयोजित कराल का? या मुलांच्या मागं आपण उभे राहू. त्यांनी काही गुन्हा केलेला नाही. समारंभाच्या खर्चाचा काही वाटा मीही उचलेन,’’ सकारात्मक वृत्तीच्या धारियासाहेबांनी ही कल्पना लगेचच उचलून धरली.

‘‘खर्चाचा वाटा वगैरे नको; पण तुम्ही स्वतः या समारंभाला उपस्थित राहा. आपण साधा समारंभ करू. केक, एखादा गोड पदार्थ आणि समोसा; पण तुम्ही त्या आयोजनात असाल हे मला नक्की सांगा,’’ मी त्यांचं म्हणणं लगेचच मान्य केलं. कारण, अशा समाजमान्यतेमुळे या प्रश्नातली सगळी कटुताच संपून जाणार होती. मुलांच्या आई-वडिलांची येण्याची तयारी असेल तर त्यांनाही
निमंत्रण द्या, असंही मी धारियासाहेबांना सुचवलं.
धारियासाहेबांनी त्याच दिवशी संध्याकाळी त्यांच्याच घरी समारंभ आयोजित केला. माझ्यासह अनेक मित्र आणि हितचिंतक नवविवाहितांना आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून आले होते. प्रमोद आणि दिव्या खूप सुंदर आणि खूश दिसत होते. अडचणी असूनही ते एकमेकांबरोबर दृढपणे, अविचलपणे उभे राहिले म्हणून मी त्यांचं अभिनंदन केलं. घरातल्यांच्या विरोधाला तोंड देताना त्यांच्या बाजूनं उभ्या राहिलेल्या मित्रांचंही मी कौतुक केलं. काहीतरी चांगलं झाल्याची भावना घेऊन मी
धारियासाहेबांच्या घरातून बाहेर पडलो. त्यांची भूमिका खरचंच महत्त्वाची ठरली. कारण, ते उघडपणे मुलांच्या बाजूनं उभे राहिल्यानं सगळा प्रश्नच मिटला.
या प्रकरणानंतर बरीच वर्षं प्रमोद आणि दिव्या माझ्या संपर्कात होते. तेवढ्यात, पुण्यातल्या शांततामय वातावरणातून माझं नशीब मला दहशतग्रस्त पंजाबमध्ये घेऊन गेलं आणि मी वेगळ्याच जबाबदाऱ्यांमध्ये गुंतलो. प्रमोद आणि दिव्याकडून मला न चुकता दिवाळीनिमित्त किंवा नववर्षानिमित्त शुभेच्छापत्रं यायची. सुरवातीला त्या शुभेच्छापत्रांवर प्रमोद आणि दिव्या अशी दोनच नावं असायची, मग त्यात आणखी एक नाव जोडलं गेलं. पाठवणारे तीनजण झाले. आणखी काही वर्षांनी आलेल्या एका शुभेच्छापत्रावर चार नावं होती.

पंजाबमधल्या दहशतवादाशी माझा मुकाबला सुरूच होता; पण प्रमोद आणि दिव्या यांची शुभेच्छापत्रं त्या सगळ्या वातावरणातही एक सुखद झुळूक घेऊन यायची. जणू अंधाऱ्या रात्री दिसणारं इंद्रधनुष्यच! शक्‍य असेल तेव्हा मीही त्यांना उत्तर पाठवायचो. माझी पत्रं त्यांना मिळायची की नाही ते मला कधी कळलं नाही; पण अशीच काही वर्षं गेल्यावर ही शुभेच्छापत्रं येण्याचं अचानक थांबलं. प्रमोद आणि दिव्या यांच्याशी असलेला माझाही संपर्क तुटला. पंजाबमधून त्यांचा शोध घेणंही मला शक्‍य नव्हतं.
नंतर खूप वर्षांनी माझं पुण्याला येणं झालं. मी ज्या विमानानं दिल्लीला परतणार होतो त्या विमानाला उशीर झाल्यानं मी लोहगाव विमानतळावर वाट पाहत थांबलो होतो. धारियासाहेबही विमानतळावर आहेत, असं कळल्यावर मी त्यांना भेटायला गेलो. त्यांनीही अगदी प्रेमानं मला जवळ बसवून घेतलं. विमानतळावरच्या गडबडीतही आम्ही त्या वेळच्या परिस्थितीबद्दल, आधीच्या दिवसांबद्दल बोललो. बोलता बोलता मी त्यांना प्रमोद आणि दिव्या यांच्यासाठी त्यांनी आयोजित केलेल्या रिसेप्शनची आठवण करून दिली. त्यांच्याकडून आधी नियमितपणे शुभेच्छापत्रं येत असत, मग एकदम ती थांबली वगैरे सांगितलं. यावर, प्रमोदचं अचानक निधन झाल्याची बातमी धारियासाहेबांनी मला दिली. त्यानंतर त्यांचाही त्या कुटुंबाशी फारसा संपर्क राहिला नव्हता.

माझं विमान उड्डाणासाठी तयार असल्याची उद्घोषणा झाली आणि मी धारियासाहेबांचा आणि इतर मित्रांचा निरोप घेतला. प्रमोदचं निधन झाल्याचं ऐकून मला वाईट वाटत होतं. मी विमानाच्या दिशेनं चालत असताना नकळत मला भरून आलं, माझे डोळे पाणावले आणि दोन थेंब गालांवर ओघळले. दिव्या आणि तिची मुलं जिथं कुठं असतील तिथं सुखी असोत. परमेश्वराची त्यांच्यावर कृपा राहो. असो.
भेटू या पुन्हा पुढच्या आठवड्यात.

(ही कहाणी सत्यघटनेवर आधारित आहे. मात्र, काही व्यक्तींची आणि स्थळांची नावं बदलण्यात आलेली आहेत.)
(या लेखाचे बौद्धिक संपदा हक्क लेखकाकडे आहेत.)

loading image