कॉफी हाऊस मर्डर (एस. एस. विर्क)

s s virk
s s virk

‘आपला सेठ चांगला माणूस आहे, तो आपली चांगली काळजी घेतो,’ असं सांगत इस्माईलनं त्या चौघांना थांबवण्याचा प्रयत्न केला; पण दारूच्या नशेत असलेल्या चौघांनीही त्याला गप्प बसायला सांगितलं.

कॉफी हाउसमधल्या खुनाची गोष्ट सांगण्याआधी वाचकांसाठी एक-दोन नोंदी.
गेल्या आठवड्यातली कहाणी लिहिताना मी माझ्या स्वतःच्याच भावनांविषयी थोडा संभ्रमात होतो. भावनात्मक अस्वस्थतेमुळे शरीरात काही जटिल प्रक्रिया होतात आणि आपल्याही नकळत डोळ्यात अश्रू उभे राहतात. डॉ. प्रमोद मेहता यांच्या अकाली मृत्यूबद्दल अचानक कळल्यावर मला असाच धक्का बसला होता. माझेही डोळे नकळत पाणावले होते आणि दोन थेंब गालांवर ओघळले होते. खरं तर ‘माझ्या डोळ्यांतून अश्रू ओघळले’ असं म्हणणं योग्य झालं असतं; असं ही कथा वाचणाऱ्या माझ्या एका मित्रानं मला सुचवलंही; पण मला ते पटलं नाही. माझ्या मते अश्रूंच्या आणि डोळ्यांतून ओघळणाऱ्या पाण्याच्या थेंबांत एक सूक्ष्म फरक आहे. आपण सामान्य माणसं कदाचित या फरकाला फार महत्त्व देत नसू; पण कविह्रदयाचे संवेदनशील लोक मात्र ही भावनात्मक अनुभूती समजावून देतात, प्रसिद्ध उर्दू कवी ‘हजीं लिहितात :-
हम तो ‘हजीं’ ये समझे है
दामन जो भिगो दे, पानी है,
आँसू तो वोही इक कतरा है
पलकों पे जो तडपे, बह ना सके

म्हणून लिहिताना मी फक्त ‘डोळे पाणावले आणि दोन थेंब गालांवर उतरले’ असंच लिहिलं, 'अश्रू' असा शब्द वापरला नाही
***

लोकांचा विश्वास मिळवण्यासाठी पोलिस ठाणी, चौक्‍यांमधल्या पोलिस कर्मचाऱ्यांचं लोकांशी वागणं-बोलणं कसं असावं याचं प्रशिक्षण त्या त्या पातळीवरच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना देण्याचा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढावा असाही उद्देश त्यामागं असतो. मीदेखील असे प्रयत्न करायचो; पण काही वेळा तो मोठाच फ्लॉप शो ठरायचा. माझ्या एका पोस्टिंगदरम्यान मी पोलिस लायनीत काही क्रीडासुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. आजूबाजूच्या परिसरातल्या शाळा-कॉलेजांतले शिक्षक, डॉक्‍टर आणि अन्य सुशिक्षित लोकांनीही त्या सुविधा वापराव्यात असा माझा प्रयत्न असायचा. बऱ्याच जणांनी ही कल्पना उचलून धरली आणि पोलिसांव्यतिरिक्त इतरही लोक बॅडमिंटन,
व्हॉलीबॉल, बास्केटबॉल खेळायला पोलिस लायनीत येऊ लागले. काही महिन्यांनी आमच्या कर्मचाऱ्यांच्या वागण्या-बोलण्यात काही फरक पडला का हे तपासण्याचा मी प्रयत्न केला. फारसा काही फरक पडलेला दिसला नाही; पण एकदा पोलिस वसाहतीत नियमितपणे खेळायला येणाऱ्या कॉलेजातल्या एका शिक्षकाचं बोलणं कानावर पडलं. त्यानं शिवीगाळवाल्या पोलिसी भाषेची शैली एकदम सही सही उचलली होती! असो. सगळे प्रयोग यशस्वी होतातच असं नाही.
अलीकडंच पोलिसांच्या एका मेळाव्यात अशाच अपयशाची भावना व्यक्त करणाऱ्या उर्दूतल्या दोन ओळी ऐकायला मिळाल्या :-
रफ्ता रफ्ता हर पुलिसवाले को शायर कर दिया
महफिल-ए-शेर-ओ सुखन में भेज कर सरकार ने
एक कैदी सुबह को फाँसी लगा कर मर गया
रातभर गजलें सुनाई उस को थानेदार ने

***

जून १९७८ मध्ये माझी पुण्याला उपायुक्त म्हणून बदली झाली. यवतमाळ जिल्ह्यातल्या रूढा गावातल्या दरोड्याची हकीकत मी आपल्याला यापूर्वीच सांगितली आहे. ती घटना आधीच्याच म्हणजे मे महिन्यातली. रूढाच्या दरोड्याचा तपास करताना टीम म्हणून काम केल्याचा आम्हाला फायदा झाला होता. वेळ न घालवता नियोजन करून काम केलं की अवघड गुन्ह्यांचाही तपास करता येतो हे लक्षात आल्यानं आमच्या अधिकाऱ्यांचा आत्मविश्वास वाढला होता. अचूक नियोजन, पेचप्रसंगाची हाताळणी, आपल्याला नेमकं काय हवं आहे याबद्दल आपल्या सहकाऱ्यांना व्यवस्थित माहिती देणं याबाबत मीदेखील खूप काही शिकलो होतो. मेहनतीचं फळ मिळतं, आपल्या हालचाली गुन्हेगारांपेक्षा जास्त वेगानं झाल्या तर गुन्हेगार सापडू शकतात हा या प्रकरणातून मिळालेला आणखी एक धडा होता. पुढच्या महिन्यात क्राईम मीटिंगमध्येही आम्ही याविषयी सविस्तर चर्चाही केली; पण नंतर लगेच माझी बदलीच झाली.

मी १९७२-७३ मध्येही काही महिने पुणे ग्रामीण पोलिस दलात उपविभागीय अधिकारी म्हणून काम केल्यानं पुणे जिल्ह्याचा पश्‍चिम भाग मला चांगला माहीत होता. त्या परिसरात अंतर्गत भागांमध्ये मी बराच फिरलोही होतो. त्या वेळी आमचं मुख्यालय पुणे शहरात असल्यनं शहरातलाही बराच भाग मला माहीत होता. माझ्या कामाचा पुणे शहराशी थेट संबंध नसला तरी मला पुणे शहर खूपच आवडलं होते. शहरात माझे बरेच मित्रही झाले होते. कधीतरी आम्ही कॉफी हाऊसमध्ये गप्पा मारायला भेटत असू. महाराष्ट्राबद्दल मला त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळत होतं. या मित्रांमध्ये काही लष्करी अधिकारी होते, एक-दोन डॉक्‍टर होते. सोमेश भोंसले त्यांच्यापैकीच एक. सोमेश विमा एजंट होता. लष्कर भागात त्याचं छोटंसं ऑफिसही होतं.
आधी आम्ही भेटत असू त्या वेळी या सगळ्या मित्रांनी मला प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याच्या रूपात पाहिलं होतं. आता मात्र मी यवतमाळमध्ये तीन वर्ष पोलिस अधीक्षक म्हणून काम करण्याचा अनुभव घेऊन आलो होतो. आधी मी मराठी भाषा समजून घेत होतो, बोलायला शिकत होतो; पण आता मात्र पोलिसांशी संबंधित कोणत्याही विषयावर अगदी आयत्या वेळीही बोलू शकण्याइतपत माझी प्रगती झाली होती. त्यामुळे त्यांच्याबरोबर गप्पा मारताना त्यांचं मोडकं-तोडकं हिंदी ऐकणं हा मजेचा भाग असायचा. मी मात्र त्यांच्याशी शुद्ध मराठीत बोलत असे.
खरं तर शहरात किंवा पोलिस आयुक्तालयात काम करणं हे जिल्ह्याच्या तुलनेत सोपं असायचं. कारण, पोलिस दल अधिक प्रशिक्षित असायचं, कार्यक्षेत्र तुलनेनं मर्यादित असायचं आणि उपलब्ध सुविधाही अधिक चांगल्या असायच्या. माझ्या कार्यक्षेत्राच्या कोणत्याही भागात पोचायला जास्तीत जास्त वीस मिनिटं पुरत असत. पोलिस ठाण्यांचं कामकाज, भेटी अधिक सुनियोजित असायच्या. त्यामुळे माझं कार्यक्षेत्र, घडलेले किंवा घडू शकणारे गुन्हे, इतर समस्या यांबाबत माहिती घेण्यास मला फार वेळ लागला नाही.

एका सुटीच्या दिवशी मी मोकळा असल्यानं आम्ही मित्रांनी कॉफी प्यायला भेटायचं ठरवलं. गप्पांमध्ये कॉफीचे कप रिचवताना कुणीतरी शहरातल्या गुन्हेगारीचा विषय काढला. मग प्रत्येकानं त्यावर आपापलं मत मांडलं. शहराचा विस्तार मर्यादित असल्यानं आणि मनुष्यबळ जास्त असल्यानं झटपट हालचाली करता येतात, त्यामुळे गुन्हेगारी नियंत्रणात ठेवणं शहरी भागात सोपं जातं, असं मत मी व्यक्त केलं. रूढाच्या तपासाचा अनुभव माझ्या गाठीशी होता. शिवाय, खुनाच्या प्रकरणांचा तपासही सोपा असतो. कारण, प्रत्येक खुनामागे काहीतरी उद्देश असतो. त्यामुळे खुनाच्या गुन्ह्याचा तपास करणं मला नेहमीच सोपं वाटत आलं आहे, असंही मी मित्रांना सांगितलं.

सोमेश मात्र माझ्याशी सहमत नव्हता. त्यानं तपास न लागलेल्या गुन्ह्यांची यादीच सांगितली. ‘‘चार वर्षांपूर्वी या कॉफी हाऊसमध्येच एक खून झाला होता. रात्रीच्या वेळी ‘ऑफिसातली कॅश बॉक्‍स फोडून चोरी करू नका’ असं सांगणाऱ्या एका वेटरला चोरी करणाऱ्या चार वेटरनी ठार मारलं होतं. आजपर्यंत या प्रकरणाचा तपास लागलेला नाही.’’ तो टेबलावर हात आपटत सांगत होता.

बाकीचे मित्र त्याच्या या माहितीमुळे प्रभावित झाल्यासारखे दिसत होते. माझं उत्तर सोपं होतं. ‘‘सोमेश, तू ज्या प्रकारच्या घटनेबद्दल बोलतो आहेस तशा घटनेचा तपास लागत नाही, असं होतंच नाही. खुनाच्या प्रत्येक घटनेत काही ना काही धागेदोरे सापडतात; पण ते नीट तपासावे लागतात. इथं असं घडलेलं दिसत नाही; पण निश्र्चिंत राहा. हे प्रकरण माझ्याच हद्दीतलं आहे. एका आठवडाभरात मी हे प्रकरण पाहतो. मग आपण त्याविषयी पुन्हा बोलू या.’’
दुसऱ्या दिवशी लष्कर पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांना फोन करून मी कॉफी हाऊस खूनप्रकरणाची फाईल पाठवून द्यायला सांगितलं. मला हे प्रकरण नीट समजावून सांगू शकेल, माझ्याशी चर्चा करू शकेल अशा एखाद्या हुशार उपनिरीक्षकालाही पाठवून देण्याच्या सूचना मी निरीक्षकांना दिल्या. दुसऱ्या दिवशी सुधाकर दातार नावाचे एक तरुण उपनिरीक्षक फाईल घेऊन माझ्याकडं आले. उमद्या, प्रसन्न व्यक्तिमत्त्वाच्या दातारांनी केवळ ती फाईल केवळ वाचलीच नव्हती तर तपासाचा तपशीलदेखील त्यांना ठाऊक होता. त्यांनी दिलेली फाईल मी फावल्या वेळात सविस्तरपणे वाचली.

आतापर्यंत झालेला तपास मला फारसा रुचला नाही. तपासाला कोणतीही शिस्त नव्हती, धागेदोरे नीट तपासलेले नव्हते. चारही आरोपी कॉफी हाऊसमध्ये काम करत होते. त्यामुळे कॉफी हाऊसच्या मालकाकडून त्यांच्याबद्दल काहीतरी तपशील नक्कीच मिळू शकला असता; परंतु फाईलमध्ये अत्यंत अपुरी माहिती होती. कॉफी हाऊसमध्ये सहा महिन्यांहून अधिक काळ काम केलेल्या आरोपींचा ठावठिकाणा शोधण्याचे फारसे प्रयत्न झाले नव्हते. ते वेगवेगळ्या वेळी नोकरीला लागले असले तरी एकाच ठिकाणी काम करत असल्यानं ते एकमेकांचे ‘मित्र’ बनले होते. त्यांची मूळ गावं, मित्र, नातेवाईक, ओळखीचे लोक किंवा त्यांनी यापूर्वी जिथं काम केलं होतं त्या ठिकाणांची माहिती मिळवणं आवश्‍यक होतं; पण फाईलमध्ये अशी काहीच माहिती उपलब्ध नव्हती.

मी दातारांबरोबर त्या खुनाविषयी चर्चा केली. एकूण प्रकरणात फारशी गुंतागुंत नव्हती. साधारणतः रेस्टॉरंट किंवा ढाब्यांवर काम करणाऱ्या वेटर मंडळींपैकी ज्यांची त्या गावात घरं नसतात ते रात्री तिथंच राहतात. दिवसभर काम करायचं, रात्री टेबल-खुर्च्या वगैरे हलवून जागा करून तिथंच झोपायचं; पुन्हा सकाळी सगळी मांडामांड करायची असा त्यांचा दिनक्रम असतो. त्यात फारसा बदल होत नाही. कॉफी हाऊसमध्ये सुमारे पंधरा वेटर होते. त्यापैकी काही जण रात्री तिथंच झोपायचे.
हल्ल्यात मरण पावलेल्या इस्माईलला एका रात्री काही आवाज ऐकून जाग आली. मालकांच्या ऑफिसमध्ये कुणी तरी आहे, असं वाटल्यानं तो तिकडं गेला तेव्हा त्याच्याबरोबर काम करणारे रणजित, अशोक, विजय आणि उत्तम हे चार वेटर कॅश बॉक्‍स फोडण्याचा प्रयत्न करत होते. ‘आपला सेठ चांगला माणूस आहे, तो आपली चांगली काळजी घेतो,’ असं सांगत इस्माईलनं त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला; पण दारूच्या नशेत असलेल्या चौघांनीही त्याला गप्प बसायला सांगितलं. ‘मालकाकडं चोरी करू नका,’ असं इस्माईल त्यांना सांगत असतानाच चिडून विजय व उत्तमनं त्याला पकडलं आणि रणजित व अशोक यांनी त्याच्यावर चाकूनं वार केले. इस्माईल बेशुद्ध पडल्यावर ते चौघेही तीसेक हजारांची रोकड घेऊन फरार झाले.
थोड्या वेळानं बहादूर नावाच्या दुसऱ्या एका वेटरला इस्माईल रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. मृत्यू होण्यापूर्वी इस्माईलनं बहादूरला काय घडलं ते सांगितलं.
बहादूरनं या घटनेबद्दल मालकाला आणि पोलिसांना कळवलं. पोलिसांनी खुनाचा व दरोड्याचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला; पण तपासात काहीच प्रगती नसल्यानं एक-दोन महिन्यांनी ‘शोध लागत नाही’ असं म्हणून तपास बंद करण्यात आला. आरोपींना पकडण्याचे फारसे प्रयत्न झाले नव्हते. दातारच मला म्हणाले :,‘‘सर, खूप बाबी लक्षातच घेतल्या गेलेल्या नाहीत.’’ मी त्यांच्याशी सहमत होतो. या प्रकरणाचा विचार करताना मला वेटर मंडळींच्या सर्वसाधारण जीवनशैलीबद्दल, मानसिकतेबद्दल अधिक जाणून घ्यायचं होतं.

‘‘एखाद्या हुशार, अनुभवी वेटरला भेटता येईल का?’’ मी दातार यांना विचारलं. दुसऱ्या दिवशी दातार एका सावळ्या, सडपातळ दिसणाऱ्या माणसाला घेऊन आले.
‘‘हे आर.टी. शेट्टी,’’ दातार म्हणाले.
मला काय जाणून घ्यायचंय ते मी शेट्टी यांना सांगितल्यावर एकदम त्यांचे डोळे चमकले.
‘‘सर, तुम्ही कॉफी हाऊस मर्डरचा तपास करण्याचा प्रयत्न करता आहात का?’’
माझ्या मनात काय आहे हे समजू शकणाऱ्या आणि मी काही बोलण्यापूर्वीच आम्हाला त्याची मदत का हवी आहे हे समजू शकणाऱ्या माणसाच्या बुद्धिमत्तेबद्दल आणि परिपक्वतेविषयी मला आश्‍चर्य वाटलं.
‘‘तुम्हाला कसं माहीत?’’ आश्‍चर्याच्या धक्‍क्‍यातून सावरल्यावर मी शेट्टींना विचारलं.
(पूर्वार्ध)
----
(ही कहाणी सत्यघटनेवर आधारित आहे. मात्र, काही व्यक्तींची आणि स्थळांची नावं बदलण्यात आलेली आहेत.)
(या लेखाचे बौद्धिक संपदा हक्क लेखकाकडे आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com