कॉफी हाऊस मर्डर -२ (एस. एस. विर्क)

s s virk
s s virk

एक दिवस दुपारी माझ्या ऑफिसमध्ये शिर्डीहून लाईटनिंग कॉल आला. शेट्टी फोनवर होते : ‘‘साहेब, मी आत्ता इथं विजयला पाहिलं. मी इथल्या पोलिस चौकीत जातो आहे. तुम्ही तिथल्या अधिकाऱ्यांना त्याला पकडायला सांगा.’’ मी लगेच शिर्डी पोलिस चौकीला लाईटनिंग कॉल बुक केला (त्या दिवसांत एसटीडी, मोबाईल वगैरे नव्हते) आणि तिथल्या उपनिरीक्षकांना शेट्टींबरोबर जाऊन ते दाखवतील त्या माणसाला ताब्यात घ्यायला सांगितलं. विजयनं नुकतंच लग्न केलं होतं आणि नववधूला घेऊन तो शिर्डीला आला होता. थोड्याच वेळात तिथल्या पोलिसांना त्याला रीतसर अटक करून, न्यायालयातून त्याला पुण्याला नेण्याची परवानगी घेतली.

‘‘साहेब,’’ शेट्टी सांगू लागले : ‘‘वेटर्सचा संबंध असणारी कॉफी हाऊस मर्डर ही शहरातली एकच केस आहे. वेटरचा खून वेटर्सनीच केलाय. मी नेहमी त्या केसबद्दल विचार करत असतो. या खुनाचा तपास करणं खूप सोपं होतं, असं मला नेहमी वाटतं; पण तपास लागलाच नाही. या प्रकरणातल्या आरोपींना ओळखणारे खूप लोक आहेत. आमच्यापैकी अनेक लोकांनी त्यांच्याबरोबर काम केलंय. कोणीतरी काहीतरी माहिती देऊ शकलं असतं; पण त्यावेळी यश आलं नाही. या केसचा तपास कधीतरी परत सुरू होईल असं मला सारखं वाटायचं. आज तो दिवस आलाय.’’
‘‘या खुनाचा तपास लागेल असं वाटतं तुम्हाला? आरोपी सापडतील?’’ मी शेट्टींना विचारलं.
‘‘घटना घडल्याला, साहेब, आता चार वर्षं होऊन गेली आहेत. त्याचवेळी तपास करणं सोपं होतं. आता आपल्याला पुन्हा पहिल्यापासून सुरवात करावी लागेल; पण कुठे पळतील ते? आपण त्यांना नक्की पकडू शकतो,’’ शेट्टी म्हणाले.
‘‘कशाच्या आधारे तुम्ही एवढं ठामपणे सांगताय?’’
‘‘साहेब, वेटर म्हणून काम करणारा ही लाईन सहसा सोडत नाही. आपण आत्ता जरी सुरवात केली, तरी ते मिळण्याची खूप शक्‍यता आहे.‘
आमची ही चर्चा लांबत चालली होती, इतरही कामं होती म्हणून मी शेट्टींना ‘संध्याकाळी ऑफिस संपल्यावर पुन्हा भेटू, तोवर त्यांना आणखी काही सुचतंय का ते पाहा,’ असं सांगितलं. त्यांनाही कामाला जायचं होतं. संध्याकाळी साडेपाच ते सात अशा वेळेत माझ्या ऑफिसमध्ये भेटायचं आम्ही ठरवलं, म्हणजे सातनंतर शेट्टी पुन्हा त्यांच्या कामाला जाऊ शकले असते.

पुढच्या आमच्या भेटींमध्ये त्यांच्याकडून खूपच माहिती मिळत गेली. हॉटेल्स्‌ -रेस्टॉरंटस्‌मध्ये काम करणारी ही वेटर मंडळी जणू दोन वेगवेगळी आयुष्य जगत असत. कमी पगारावर राहून हॉटेलमध्ये येणाऱ्या गिऱ्हाईकांची सरबराई करणारा नोकर ही त्या आयुष्याची एक बाजू. त्यातले बरेचसे चांगल्या घरांतून आलेले असायचे. ही त्यांच्या आयुष्याची दुसरी बाजू. त्यांच्या वागण्याबोलण्यातून ते दिसून यायचं. बरेचजण थोडंफार शिकलेले असायचे, काहीजण इंग्रजीही चांगलं बोलू शकायचे. त्यातल्या बऱ्याच जणांनी एखाद्या छोट्याशा कारणानं घर सोडलेलं असायचं. घरातून पळून आलेल्या अशा एक-दोन मुलांना त्यांच्या कुटुंबीयांनी शोधून परत नेल्याची उदाहरणंही शेट्टींकडून ऐकायला मिळाली. तसं पाहिलं तर या कामात जेवण्याखाण्याचा आणि राहण्याचा फारसा प्रश्न नसायचा. जिथं काम करायचे तिथं जेवण मिळण्याची हमी असायची. तशा बोलीवरच काम घेतलेलं असायचं. रात्री झोपण्याची सोयही तिथेच व्हायची. पगार कमी असला, तरी गिऱ्हाईकांकडून मिळणाऱ्या टिपमधून बऱ्यापैकी वरकमाई व्हायची.

या वेटर्समध्ये चांगले कलाकारही सापडायचे, असंही शेट्टीनी एकदा सांगितलं होतं. काही चांगले चित्रकार होते. काही कवी होते, तर काही जण चांगलं लिहायचे, गायचे. फावल्या वेळात बासरी आणि गिटार वाजवणाऱ्या वेटर्सची हकिकतही त्यांनी ऐकवली होती. कॉफी हाऊस केसमधला विजयही चांगली चित्रं काढायचा, विशेषतः पोर्ट्रेटस. ‘‘नागपूरमध्ये त्याच्याबरोबर काम करत असताना मी त्याला चित्र काढताना पाहिलं आहे,’’ शेट्टी एकदा म्हणाले होते. हॉटेलात काम करणाऱ्या वेटर्सच्या आणि एकूणच माणसांच्या स्वभाववैशिष्ट्यांबद्दलच्या माझ्या ज्ञानात या गप्पांमुळे भर पडत होती.
आरोपींबद्दलही शेट्टींना थोडीफार माहिती होती. ‘‘तशी माझी त्यांची मैत्री नव्हती; पण शहरातल्या वेटर्सची युनियन करण्याचा आम्ही एक प्रयत्न केला होता. त्याला यश आलं नाही; पण त्या काळात काही वेळा आम्ही भेटायचो,’’ शेट्टी सांगत होते. त्यांच्या माहितीनुसार, रणजितचं खरं नाव रणजित गुप्ता किंवा दासगुप्ता. जरा चिडखोर आणि एकदम फायरब्रॅंड असणारा रणजित बंगाली वळणानं बोलायचा. त्यांच्या म्हणण्यानुसार त्याच्यावर डाव्या विचारसरणीचा प्रभाव होता. त्याला हिंसेचं वावडं नसावं, असं त्याच्या बोलण्यावरून वाटत असे. वेटरची नोकरी धरण्याआधी बहुधा तो एखाद्या संघटनेचा कार्यकर्ता असणार. कोलकाता (तेव्हाचं कलकत्ता) आणि बंगालबद्दल त्याला खूप माहिती होती, असंही शेट्टींच्या बोलण्यात आलं.
उरलेले तिघं हिंदी भाषिक पट्ट्यातले असावेत. त्यात अशोक सगळ्यात उंच आणि दिसायला भक्कम होता. कायम छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडायला तयार असायचा. मारायची आणि वेळ पडली तर मरायचीही त्याची तयारी असायची. त्याच्याविरूद्ध आधीही काही गुन्हेही दाखल होते आणि त्यातून वाचण्यासाठी तो इकडे पळून आला होता, असंही शेट्टींनी ऐकलं होतं. मध्यम उंचीचा, गहू वर्णाचा विजय तसा वागाबोलायला बरा होता. तो चित्रं काढायचा. बराच काळ तो दिल्लीत राहिला असावा, कारण त्याच्या बोलण्यात दिल्लीचा उल्लेख वारंवार येत असे. उत्तमसुद्धा मध्यम उंचीचा होता. बोलक्‍या स्वभावाच्या उत्तमचं कोणाशीही पटकन जमून जात असे. तो उत्तर प्रदेशाच्या पश्‍चिमी भागातला असावा. त्याच्या बोलण्यात नेहमी उत्तर प्रदेशातल्या सहारणपूर आणि मेरठचे संदर्भ असायचे, असं उत्तमला ओळखणाऱ्या काही लोकांनी शेट्टींना सांगितलं होतं. आपल्या हातून खून घडेल असं त्याला वाटलं नसावं. रणजित आणि अशोक गुन्हेगारी वृत्तीचे असले, तरी बाकी दोघं मात्र केवळ मैत्रीखातर त्यांच्यात सामील झाले असावेत. शेट्टी शहरातल्या इतर काही हॉटेलांमधल्या त्यांच्या ओळखीच्या लोकांकडून आणखी काही माहिती मिळवण्याच्याही प्रयत्नात होते.

या सगळ्या माहितीच्या आधारे मी त्या गुन्ह्याविषयी एक सविस्तर परिपत्रक करून देशात जिथं जिथं पॉश हॉटेल्स आहेत अशा सगळ्या शहरांमधल्या पोलिसांना पाठवून दिलं. आरोपी रस्त्याकडेच्या कुठल्यातरी ढाब्यावर किंवा छोट्या हॉटेलात नोकरी न पाहता एखाद्या चांगल्या, उंची हॉटेलात नोकरी धरतील, असा विचार करून आम्ही सुरवात केली होती. सगळी उपलब्ध माहिती गोळा करून आरोपींना पकडण्यासाठी पीएसआय दातारांना बरोबर घेऊन मी एक छोटी टीमही तयार केली. आरोपींबरोबर आधी कधीतरी काम केलेल्या वेटर्सची चौकशी आम्ही दुसऱ्या एका टीमकडे सोपवली.
या केसचा तपास आम्ही परत सुरू केल्याचं आणि आरोपींचा छडा लागेल याची मला खात्री असल्याचं मी कॉफी हाऊसमधल्या मित्रांना सांगितलं. हे ऐकल्यावर सोमेशनं फार उत्साह दाखवला नाही. ‘‘मी जेवणाची पैज लावायला तयार आहे. त्यावेळी ज्या केसचा तपास लागला नाही, त्याचा आता चार वर्षांनी काय तपास लागणार?’’ सोमेश म्हणाला.

एक गोष्ट सांगायची विसरलो, आमच्यात नेहमी ‘जेवणाच्या’ पैजा लागायच्या. त्यासाठी आम्हाला काहीही कारण चालायचं. एखादी क्रिकेटची मॅच किंवा पोटनिवडणुकीचा निकाल, काहीही. आणि जेवण म्हणजे दोराबजीकडून सगळ्यांसाठी मिळून काही पदार्थाच्या दोन दोन प्लेटस मागवायच्या. सगळा मिळून शंभर दोनशे रुपयांचा मामला असायचा, आमच्या पैजा म्हणजे! जेवणापेक्षा पैज जिंकल्याचा आनंदच जास्त मोठा!! सोमेशनं पैजेचा विषय काढल्यावर मीदेखील आमच्या ग्रुपमधल्या सगळ्या ‘सन्माननीय साक्षीदारां’च्या समक्ष ते आव्हान स्वीकारलं. पैजेचा निकाल काहीही लागला तरी जेवण नक्कीच होतं.

जसजसे आम्ही या केसवर काम करायला लागलो, तसतशी खूप रोचक माहिती आमच्यासमोर येत गेली. शेट्टींबरोबरच्या चर्चांचा खूप उपयोग होत होता. तेदेखील मिळेल ती माहिती जमा करण्याच्या प्रयत्नात होते. आमचं नियोजन आणि धावपळ बघून केसचा तपास लागणार याबद्दल आपल्याला शंका नसल्याचं ते वारंवार बोलून दाखवायचे. ‘‘आता नक्कीच तपास लागणार. होनाच मांगता,’’ ते म्हणायचे.
दर तीन-चार दिवसांनी आम्ही तास-दोन तासांसाठी भेटत असू आणि तपासातल्या प्रगतीचा आढावा घेत असू. जवळजवळ वीस अधिकारी आणि कर्मचारी अत्यंत कसोशीनं आणि गंभीरपणे या प्रकरणाचा तपास करत होते.
एक दिवस दुपारी माझ्या ऑफिसमध्ये शिर्डीहून लाईटनिंग कॉल आला. शेट्टी फोनवर होते : ‘‘साहेब, मी आत्ता इथं विजयला पाहिलं. मी इथल्या पोलिस चौकीत जातो आहे. तुम्ही तिथल्या अधिकाऱ्यांना त्याला पकडायला सांगा.’’ मी लगेच शिर्डी पोलिस चौकीला लाईटनिंग कॉल बुक केला (त्या दिवसांत एसटीडी, मोबाईल वगैरे नव्हते) आणि तिथल्या उपनिरीक्षकांना शेट्टींबरोबर जाऊन ते दाखवतील त्या माणसाला ताब्यात घ्यायला सांगितलं.

विजयनं नुकतंच लग्न केलं होतं आणि नववधूला घेऊन तो शिर्डीला आला होता. थोड्याच वेळात तिथल्या पोलिसांना त्याला रीतसर अटक करून, न्यायालयातून त्याला पुण्याला नेण्याची परवानगी घेतली. त्याला लगेच त्याच दिवशी पुण्याला घेऊन येण्यासाठी मी एक टीमही पाठवली होती. आम्ही या प्रकरणात एकाला अटक केल्याची बातमी पुण्यात पसरली. सोमेशला कळल्यावर खात्री करून घेण्यासाठी त्यानं मला फोन केला. मी त्याला लगेच ऑफिसला यायला सांगितलं. विजयला पाहिल्यापाहिल्या सोमेशनं त्याला ओळखलं. विजयनंही सोमेश कॉफी हाऊसला नेहमी येत असे आणि आपण त्याला खूपवेळा सर्व्ह केल्याचं कबूल केलं.

विजय शिकलेला होता. घरातून पळून येऊन त्यानं वेटरची नोकरी धरली होती. या प्रकरणानंतर तो खूप अस्वस्थ होता. मूळ गावी गुरूग्रामला (तेव्हाचं गुरगांव) जाऊन एका शाळेत त्यांनी कला शिक्षकाची नोकरी मिळवली होती. तिथंच एका शिक्षिकेबरोबर त्याचं सूतही जमलं होतं. नुकतंच त्यांनी लग्नही केलं होतं. त्याच्या सामानात अर्धवट काढलेली आणि इतरही काही चित्रं सापडली. केलेल्या गुन्ह्याचा त्याला पश्‍चात्ताप होत होता आणि त्याबद्दल प्रायश्‍चित्त घेण्याचीही त्याची तयारी होती. पोलिस कस्टडीत असताना मी त्याला इतर तिघा आरोपींची चित्र काढायला सांगितली. त्यानं काढलेली चित्रं अगदी हुबेहूब होती, असं कॉफी हाऊसच्या मालकानी आणि तिथं नेहमी येणाऱ्या अनेकांनी आम्हाला ती चित्रं पाहिल्यावर सांगितलं. उत्तम दिल्लीत किंवा उत्तर प्रदेशच्या पश्‍चिम भागात कुठंतरी आणि अशोक राजस्थानात असेल, अशीही माहिती आम्हाला विजयकडून मिळाली.

आम्ही ती चित्रंही उत्तम आणि अशोक सापडू शकतील अशा सगळ्या भागांत पाठवली. दिल्लीला पाठवलेल्या आमच्या एका टीमनं उत्तमला पकडून आणलं. दातार राजस्थानात अशोकच्या मागावर होते. जयपूरमधल्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून गायब झालेल्या ‘गुन्हेगारी वृत्ती’च्या लोकांची माहिती घेत असताना त्यांना काही नावं मिळाली. जयपूरच्या ग्रामीण भागातल्या किशनगंज ठाण्याच्या हद्दीतला जगदीश प्रसादचा चेहरा आम्ही पाठवलेल्या चित्रांपैकी एकाशी मिळताजुळता असल्याचं तिथल्या अधिकाऱ्यांनी दातारांना सांगितलं. हा जगदीश प्रसादही बरेच दिवस बेपत्ता होता; पण त्यावेळी तो गावात परत आला होता. पुण्याची पोलिस टीम घरी आल्याचं पाहून तो मागच्या दारानं पसार झाला. हा जगदीश प्रसादच कॉफी हाऊस खून प्रकरणात हवा असलेला अशोक आहे याची खात्री पटल्यावर दातारांनी त्याच्या कुटुंबीयांना त्याला हजर करायला सांगितलं. ‘‘आम्हाला त्याचं नाव, पत्ता माहिती नसतानाही आम्ही चार वर्षांनी त्याला शोधून काढला आहे. आता आम्हाला त्याचा ठावठिकाणा कळला आहे. तो जगाच्या पाठीवर कुठंही असला तरी आज ना उद्या आम्ही त्याला शोधून आणू. आता त्याच्यासाठी पुण्याला येऊन पोलिसांसमोर हजर होणं एवढा एकच मार्ग उरला आहे,’’ असं त्याच्या कुटुंबीयांना सांगून दातारांनी त्यांना आपलं नाव, पत्ता आणि टेलिफोन नंबर दिला आणि ते पुण्याला परतले. एका महिन्यानंतर जगदीश ऊर्फ अशोक पुण्यात दातारांसमोर आला आणि सरेंडर झाला. त्यानंतर तपास पूर्ण करून आरोपींविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं.

आम्ही तपास केला; पण पुरावे गोळा करायला चार वर्षांचा वेळ गेला होता. आरोपींना ‘संशयाचा फायदा’ मिळून त्यांची सुटका झाली; पण त्याचं मला फार वाईट वाटलं नाही, कारण फौजदारी कायद्याची प्रक्रिया जारी आहे आणि आज ना उद्या प्रत्येक गुन्हेगाराला कायद्याला सामोरं जावं लागतं हा संदेश देण्यात आम्ही यशस्वी ठरलो होतो.
पैजेत ठरल्याप्रमाणं सोमेशनी दोराबजीकडून जेवण मागवून आम्हाला सगळ्यांना मोठी फिस्ट दिली, हे वेगळं सांगायला नकोच.
या प्रकरणात महत्त्वाची भूमिका असणाऱ्या काही व्यक्तींविषयीचे माझे काही विचार आहेत. ते मी आपल्याला पुढच्या आठवड्यात सांगेन. तेव्हा भेटू पुढच्या आठवड्यात.

(उत्तरार्ध)
(ही कहाणी सत्य घटनेवर आधारित आहे; मात्र काही व्यक्तींची आणि स्थळांची नावं बदललेली आहेत.)
(या लेखाचे बौद्धिक संपदा हक्क लेखकाकडं आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com