न परतीची वाट (एस. एस. विर्क)

s s virk
s s virk

मी त्यांना म्हणालो :‘‘तुमच्या मुलासारखी चांगली, हुशार मुलं पुन्हा मुख्य प्रवाहात यावीत असं मला मनापासून वाटतं. मी त्याच्याशी बोलून त्याला योग्य मार्ग दाखवेन.’’

रूपोवाली ब्राह्मणा या गावाजवळ सीआरपीएफच्या गस्ती पथकाला ॲम्बुश केल्याचं कळल्यावर मी तातडीनं तिकडं धाव घेतली. माझी पायलट कार आणि एस्कॉर्ट मिळून तीन गाड्यांमध्ये आम्ही एकूण बारा जण होतो. ॲटोमॅटिक आणि सेमी-ॲटोमॅटिक रायफली, एक लाईट मशिनगन, काही ग्रेनेड्स, शिवाय आणखी काही लहान शस्त्रं, पुरेसा दारूगोळा आणि बारा प्रशिक्षित पोलिस जवान. आमच्याकडं अंधारातही अचूक मारा करण्याएवढा प्रकाश देणाऱ्या पॉवरफुल बॅटऱ्या आणि फ्लेअर्सही होते. हल्ला झालेल्या ठिकाणापासून जेमतेम पाच किलोमीटरवर असणाऱ्या सीआरपीएफच्या मुख्यालयातून जादा कुमक आम्ही अगोदरच रवाना केली होती. खरं तर माझ्याबरोबरचा ग्रूपही हल्लेखोरांना तोंड द्यायला पुरेसा होता. ग्रामीण भागातल्या अरुंद रस्त्यांवरून ३५ किलोमीटरचं अंतर ३५ मिनिटांत कापून आम्ही घटनास्थळी पोचलो तेव्हा हल्ल्यात जायबंदी झालेल्या आमच्या दोन्ही जवानांनी प्राणत्याग केला होता. हल्ला झाला तेव्हा हे दोघंही स्काउट्स म्हणून गस्ती पथकाच्या पुढं होते. हल्ल्याला प्रत्युत्तर देताना सीआरपीएफच्या जवानांनीही दोन दहशतवाद्यांना टिपलं होतं. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह शंभरेक यार्डांवर पडले होते. ते तसेच टाकून हल्लेखोरांनी पळ काढला होता.

गस्ती पथकाच्या ग्रूप कमांडरला भेटून हल्ल्याला यशस्वीपणे तोंड देणाऱ्या त्यांच्या पथकाच्या शौर्याचं मी कौतुक केलं. प्रशिक्षित आणि युद्धसज्ज जवानच हल्ल्याला असं चोख प्रत्युत्तर देऊ शकतात. दोन सहकारी मारले गेल्यानंतरही डगमगून न जाता सीआरपीएफच्या जवानांनी दहशतवाद्यांशी मुकाबला केला होता. चकमकीनंतर एक लाईट मशिनगन, दोन एके-४७ रायफली आणि बराच दारूगोळा त्यांच्या हाती लागला होता. जे दोन दहशतवादी मारले गेले त्यांचा सुरक्षा दलांवर झालेल्या अनेक हल्ल्यांमध्ये हात होता. मी त्या दोघांनाही ओळखलं, हरभजनसिंग मंड आणि त्याचा साथीदार मेजरसिंग. हे दोघं मारले जाणं हा दहशतवाद्यांना मोठा धक्का होता. सुरक्षा दलांसाठी मात्र ती मनोधैर्य उंचावणारी घटना होती. मंड आणि मेजरसिंग ठार झाल्याचं कळल्यावर केसीएफच्या सदस्यांनी दुःख व्यक्त केल्याचं सुवर्णमंदिर परिसरातल्या माझ्या सूत्रांकडून मला समजलं होतं.

कत्थू नंगलचे ठाणेदार आणि अमृतसर ग्रामीणचे उपअधीक्षकही हल्ल्याच्या ठिकाणी पोचले होते. हुतात्मा झालेल्या जवानांचे आणि मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवल्यावर आम्ही - मंड आणि मेजरसिंग दोघंही फिरोजपूर जिल्ह्यातले असल्यानं - या हल्ल्यात एखाद्या स्थानिक गटाचा हात असावा का याची चर्चा करत होतो. रूपोवाली ब्राह्मणावर हल्ला करणारा हा गट जिल्ह्याबाहेरचा होता. सीआरपीएफच्या जवानांशी गाठ पडतेय असं पाहिल्यावर त्यांनी लपून त्या गस्ती पथकावर हल्ला चढवला असणार.
‘‘गावात हत्याकांड घडवण्यासाठी स्थानिक दहशतवादी गटांनी या बाहेरच्या गटाला बोलावलं असेल का? जवळपासच्या गावात कुणी सक्रिय दहशतवादी आहे का? त्याचंच तर हे काम नसेल?’’ मी त्या दोघांना विचारलं.
‘‘सर, रणजितसिंग म्हणून एक जण आहे, त्या पलीकडच्या गावातला,’’ थोड्या अंतरावर दिसणाऱ्या घरांकडं निर्देश करत ठाणेदार म्हणाले. ‘‘ती जी घरं दिसताहेत ते आहे गद्दरज़ादा गाव. रणजितसिंग तिथलाच आहे. त्याचे वडील गुरदीपसिंग हे शिक्षक आहेत,’’ ठाणेदारांनी माहिती दिली.
रणजिंतसिंगबद्दल मला माहिती होतीच. अमृतसरच्या खालसा कॉलेजातला तो बीएच्या शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी होता. हुशार होता. त्याचं जवळजवळ सगळं शिक्षण शिष्यवृत्तीवर झालं होतं. ‘ऑल इंडिया सीख स्टुडंट्स फेडरेशन’मध्ये (एआयएसएसएफ) सक्रिय असणाऱ्या रणजितसिंगनं दोन महिन्यांपूर्वीच घर सोडलं होतं. दहशतवाद्यांची माहिती घेत असताना या रणजितसिंगचीही फाईल मी पाहिली होती. त्या वेळपर्यंत तरी एकाही गंभीर गुन्ह्यात त्याचा हात नव्हता; पण तो ज्या लोकांबरोबर राहत होता ते पाहता तो दिवसही फार लांब नव्हता. एक ना एक दिवस ते घडलंच असतं. त्याच्या वडिलांची भेट घ्यावी असा विचार अचानक माझ्या मनात आला. या हल्ल्यात रणजितसिंगचा काही हात असेल का याचाही अंदाज आला असता.

ठाणेदार आणि उपअधीक्षकांबरोबर मी मास्टर गुरदीपसिंग यांच्या ‘डेऱ्या’कडं (शेतघर) निघालो. गुरदीपसिंग एका खाटेवर आराम करत होते. आम्हाला पाहताच घाईनं उठून ‘सत्‌ श्री अकाल’ म्हणत त्यांनी आमचं स्वागत केलं. साध्याशा, ग्रामीण ढंगाच्या कुर्ता-पायजम्यातल्या गुरदीपसिंगांची पांढरी दाढी छातीवर रुळत होती. वय पन्नाशीच्या आसपास असावं. ठाणेदार आणि उपअधीक्षकांनी त्यांच्या मुलाबद्दल विचारल्यावर, आपल्याला काहीच माहीत नाही, असं उत्तर त्यांनी दिलं.
‘‘साहेब, तो आजकाल अजिबात घरी येत नाही. सुवर्णमंदिराच्या परिसरात दहशतवाद्यांबरोबर असतो. मी स्वतः एकदा तिथं जाऊन त्याला ‘तू तुझं बीए पूर्ण कर’ म्हणून सांगितलं; पण तो नाही म्हणाला,’’ ते म्हणाले.
गुरदीपसिंग जवळच्याच गावातल्या शाळेत शिक्षक होते. पत्नी आणि चार मुलींसह ते शेतातल्या घरातच राहायचे. दहशतवाद्यांबरोबर राहणाऱ्या या मुलाकडून त्यांच्या खूप अपेक्षा होत्या. मुलगा हुशार होता; पण आता त्याच्या जगण्याला वेगळंच वळण मिळालं होतं.
‘‘मास्टरजी, तुम्ही त्याचे वडील आहात. तुम्ही त्याला समजवायला हवं. कधीतरी तो आजच्यासारख्या एखाद्या चकमकीत सापडू शकतो. तुम्ही पुन्हा प्रयत्न करा. त्याला मलाही भेटायला सांगा,’’ एसएसपी म्हणून माझी ओळख करून देत मी त्यांना म्हणालो :‘‘तुमच्या मुलासारखी चांगली, हुशार मुलं पुन्हा मुख्य प्रवाहात यावीत असं मला मनापासून वाटतं. मी त्याच्याशी बोलून त्याला योग्य मार्ग दाखवेन.’’
मी त्यांना माझं व्हिजिंटिंग कार्ड दिलं आणि ‘तुम्हाला आवश्यकता भासल्यास तुम्ही किंवा तुमचा मुलगा मला केव्हाही फोन करू शकतो,’ असं त्यांना सांगितलं.
आपल्या मुलानं दहशतवादाचा मार्ग सोडावा, असं आपल्यालाही वाटतं असं सांगत गुरदीपसिंगांनीही ‘मुलाला भेटून नक्की त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न करेन,’ असं मला सांगितलं.

पुढचे काही दिवस नेहमीप्रमाणेच गडबडीत गेले. एक दिवस मी संध्याकाळी उशिरापर्यंत कार्यालयात थांबलो असताना फोन वाजला.
‘‘साहेब, एक ‘खाडकू सिंग’ (दहशतवादी शीख व्यक्ती) फोनवर आहे, त्याला तुमच्याशी बोलायचं आहे,’’ ऑपरेटरनं सांगितलं.
फोन घेतल्यावर पलीकडच्या बाजूनं एकदम मला आणि माझ्या कुटुंबाला संपवण्याचीच भाषा सुरू झाली. जराही विचलित न होता मी त्याला नाव विचारलं. पलीकडून काहीच उत्तर आलं नाही. त्यानं नावही सांगितलं नाही.
‘‘तू कसला ‘खाडकू सिंग’ आहेस?’’ मी खडसावणीच्या सुरातच म्हणालो.
‘‘स्वतःची ओळखही सांगायला तुला भीती वाटते का? लक्षात ठेव, मी एक सच्चा, सरळ चालणारा पोलिस अधिकारी आहे. कुणावरही अन्याय होऊ नये असं मला वाटतं. आणि तुझ्यासारख्या पोरासोरांना मी भीक घालत नाही. मला तुमचा रागही येत नाही, कारण तुम्ही सगळे भित्रे आहात. समोरासमोर येऊन मुद्दे मांडण्याची हिंमत तुमच्यात नाही, तुम्ही फक्त निनावी फोन करून किंवा पेपरांतून धमक्‍या देणार. तुम्ही सगळे तत्त्वशून्य, निर्नायक आणि बेजबाबदार मुलं आहात. शीख धर्माची शिकवण असणाऱ्या विनय आणि मर्यादा यांविषयी तुम्हाला काहीही माहीत नाही. तुझ्यासारख्या बेफिकीर, संस्कारहीन आणि निरुपयोगी लोकांबरोबर बोलण्याचीही माझी इच्छा नाही. पटेल असं काही बोलणार असशील तर विचार कर आणि पुन्हा फोन कर. आणि मला संपवायचं असेल तर खुशाल संपव, इथं कुणालाही त्याची भीती वाटत नाही. तिकडं गावागावामध्ये तुझ्यासारखे शेकडोजण फिरताहेत. मी तुझ्या असल्या धमक्‍या ऐकून घेणार नाही. मी फोन ठेवतो आहे. व्यवस्थित काही बोलायचं असेल तर पुन्हा फोन कर, नाहीतर खड्ड्यात जा,’’ एवढं बोलून मी फोन ठेवून दिला.

पंधरा मिनिटांनी पुन्हा त्याचा फोन आला. या वेळी तो बराच शांत झाला होता.
‘‘साहेब, मी रणजितसिंग. गद्दरज़ादा या गावचा. माझ्यावर दबाव आणावा म्हणून तुम्ही माझ्या वडिलांना धमकावलंत त्याचा मला राग आला होता. माझे वडील मला भेटून रडले. मी घरी परत यावं म्हणून ते विनवण्या करत होते,’’ तो म्हणाला.
‘‘तू रणजितच असणार याची कल्पना होती मला. ती चकमक झाली तिथून तुझं घर जवळ होतं, म्हणून मी तुझ्या घरी गेलो होतो; पण त्या चकमकीशी तुझा काहीच संबंध नाही हे माझ्या लक्षात आल्यानं आम्ही कुणालाच काहीही त्रास दिला नाही. मात्र, तुझ्या वडिलांना खरंच खूप वाईट वाटत होतं. आपण आपला मुलगा गमावून बसलो आहोत अशा पद्धतीनं ते बोलत होते. तुला चार बहिणी आहेत. तू बीएचा विद्यार्थी आहेस, हुशार आहेस. वडिलांची काहीतरी जबाबदारी तू उचलायला हवीस. तुझ्या वडिलांनी सर्वस्व गमावलं आहे. भविष्याबद्दलही ते काही फारसे आशावादी नाहीत. तू म्हणतोस तसं मी त्यांना धमकावलं नाही. मी फक्त त्यांना तुला घरी परत आणण्याचा प्रयत्न करण्याचा सल्ला दिला होता,’’ मी म्हणालो.
‘‘पोलिस मला घरी राहू देत नाहीत. ते सारखे आमच्या घरावर छापे घालत असतात. मग मी कसा परत येणार?’’
माझं उत्तर सरळ होतं, ‘‘रणजित, मी हा प्रश्न कायदेशीर मार्गानं सोडवू शकतो. आतापर्यंत तू गंभीर असं काही केलेलं नाहीस. अजूनही तू परत येऊ शकतोस. उद्या संध्याकाळी साडेसहा वाजता माझ्या कार्यालयात येऊन मला भेट. तुझं नाव कश्‍मीरसिंग असं सांग. कोणतंही शस्त्र जवळ ठेवू नकोस. ये उद्या.’’
‘‘पण मी तिकडं आलो की तुम्ही मला अटक कराल.’’
‘‘रणजित, मी पोलिस अधिकारी आहे. तुझा विश्‍वासघात करून तुला अटक करायला मी काही ठग नाही. माझ्यावर विश्वास असेल तर ये. निर्णय तुला घ्यायचाय,’’ असं म्हणून मी फोन ठेवला.

‘‘सर, तुम्हाला भेटायला कश्‍मीरसिंग म्हणून एकजण आला आहे,’’ असं माझ्या ऑफिस रनरनं सांगितल्यावर, त्याला आत घेऊन यायला मी सांगितलं. संध्याकाळचे साडेसहा वाजत आले होते. मध्यम बांध्याचा, गव्हाळ वर्णाचा, दाढी व्यवस्थित गुंडाळून बांधलेला एक तरूण मुलगा ‘सत्‌ श्री अकाल’ असं म्हणत आत आला. त्यानं निळसर रंगाचा शर्ट घातला होता आणि त्यावर गडद निळं जाकीट घातलं होतं.
‘‘रणजित, तू घर का सोडलंस?,’’ तो बसल्यावर मी त्याला विचारलं.
‘‘हे सगळं जाणून घेऊन तुम्ही काय करणार, साहेब?’’ त्यानं विचारलं.
‘‘मी तुझं सगळं रेकॉर्ड पाहिलं आहे. तू हुशार विद्यार्थी होतास. अनेक शिक्षकांनाही तू आवडायचास. मी त्यांच्यापैकी काही जणांशी बोललो आणि त्यांनी तुझ्याबद्दल खूप काही चांगलं मला सांगितलं. घर सोडण्याची कारणं तू जर सांगितलीस तर कदाचित मला आणखी काही मुलांना ‘रणजित’ होण्यापासून वाचवता येईल,’’ मी म्हणालो.
तो सांगायला लागला.

त्याचे शाळेतले आणि कॉलेजातले काही मित्र दहशतवाद्यांना सामील झाले होते. एकदा त्यातले काहीजण एक-दोन दिवसांसाठी त्याच्या ‘डेऱ्या’त राहायला आले होते. त्यानंतर त्याच्या त्या मित्रांना पकडण्यासाठी त्यानं माहिती द्यावी म्हणून पोलिसांनी त्याच्या घरावर छापे घालायला सुरवात केली. म्हणून तो सुवर्णमंदिर परिसरात आला आणि एआयएसएसएफ कार्यालयात काम करायला लागला.
मात्र, तो कोणत्याही गुन्ह्यात सामील नव्हता.
‘‘रणजित, तू परत घरी जाणार असशील तर हे छापे थांबवता येतील. तू पुन्हा कॉलेजला जाणं सुरू कर. बाकी मी पाहतो. तुझ्या गावच्या सरपंचांना बरोबर घेऊन तू पोलिसांना सरेंडर हो. विचार कर आणि मला कळव,’’ मी त्याला सांगितलं.
‘‘जरी तुला वेगळा निर्णय घ्यायचा असला तरी मला सांग. तू जर डिग्री मिळवलीस तर करिअरचे कितीतरी मार्ग तुझ्यासाठी खुले होतील,’’ असं सांगून मी त्याला निरोप दिला तेव्हा रात्रीचे आठ वाजले होते.
दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याचा फोन आला, ‘‘साहेब, मी सरेंडर करायला तयार आहे.’’
मी त्याला त्याच्या वडिलांना मला भेटायला पाठवून द्यायला सांगितलं. सरपंचांकडं जाऊन रणजित निर्दोष असल्याचं सांगून त्यानं सरेंडर होण्यासाठी सरपंचांची मदत घ्यायची, हे मी गुरदीपसिंगना समजावून सांगितलं. अपेक्षेप्रमाणे सरपंच तयार झाले आणि दोघांनाही त्यांनी ठाणेदार आणि पोलीस उपअधीक्षकांसमोर हजर केलं. त्यांनी रणजितची चौकशी केली. त्याच्यावर कोणताही गुन्हा नाही याची खात्री करून घेऊन आणि ताकीद देऊन त्याला जायला सांगण्यात आलं.

रणजित घरी परतला. त्यानं पुन्हा कॉलेजलाही जायला सुरवात केली. त्याच्या घरातले लोक, नातेवाईक, शिक्षक सगळेच त्यामुळे खूप खूश होते. मधल्या काळात एकदा रणजितची उभ्या उभ्या भेट झाली. ‘सगळं व्यवस्थित आहे...मुख्य प्रवाहात परत आल्यानं मी खूप आनंदात आहे,’ असं त्यानं मला सांगितलं. एक दिवस त्याचा फोन आला. त्याच्या आवाजातला आनंद लपत नव्हता, ‘‘साहेब, मला तुम्हाला आत्ता लगेच भेटायचंय. मी बीए झालोय. मार्कही चांगले मिळाले आहेत. तुम्हाला मिठाई द्यायचीय. माझ्याबरोबर वडीलही आहेत.’’
‘‘ओके, लगेच ये. मी खूप कामात आहे; पण तुझ्या आणि तुझ्या वडिलांच्या आनंदात सहभागी व्हायला मला खूप आवडेल. फक्त लवकर ये.’’
मी त्याची वाट पाहू लागलो...
(पूर्वार्ध)
# # # # # # #
(या कथनातल्या काही व्यक्तींची आणि स्थळांची नावं बदलण्यात आलेली आहेत.)
---
(या लेखाचे बौद्धिक संपदा हक्क लेखकाकडं आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com