‘मंड’चं रहस्य (एस. एस. विर्क)

s s virk
s s virk

लांबवरून आम्हाला येताना पाहून भट्ट्यांजवळ एकच पळापळ झाली. तीन-चार लोक घाईघाईनं आमच्या दिशेनं येताना दिसले. त्यांचा एकंदर रोख आम्ही येऊ नये असाच दिसत होता. त्यामुळे आम्ही थांबून त्यांना येऊ दिलं. ‘‘सरदार म्हणताहेत तुम्ही येऊ नका. काल रात्री खाडकूसिंग आले आहेत. ते असताना धोका पत्करण्यात काही अर्थ नाही. तुम्ही परत जा,’’ त्यातल्या एकानं हरदेवसिंगांना सांगितलं. आम्ही लगेचच परत फिरलो. काय झालं ते मला नीट समजलं नव्हतं. म्हणून मी त्यांना विचारलं : ‘‘कोण खाडकू सिंग?’’ हरदेवसिंग म्हणाले : ‘‘साहेब, दहशतवादी आले आहेत. कधीकधी ते मंडवर येऊन चार-दोन दिवस रहातात. अवैध दारूधंद्यांना त्यांचा विरोध असल्यानं या भट्टीवाल्यांना आज गाशा गुंडाळावा लागणार आहे.’’

‘पंजाब’ शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, तर ‘पंज’ म्हणजे पाच आणि ‘आब’ म्हणजे पाणी हे दोन शब्द पाहावे लागतात. या दोन शब्दांचा संयोग म्हणजे पंजाब. पंजाब म्हणजे पाच विस्तीर्ण नद्यांचा प्रदेश. एकेकाळी दिल्लीच्या उत्तर सीमेपासून ते ‘नॉर्थ वेस्ट फ्रॉन्टीयर प्रांत’ (एनडब्ल्यूएसपी) म्हणजे वायव्य सरहद्द प्रांतापर्यंत पसरलेला भूभाग. आजची हरियाना, हिमाचल प्रदेश आणि पंजाब राज्यं आणि आता पाकिस्तानात असलेला पंजाब प्रांत किंवा पश्‍चिम पंजाब हा सगळा प्रदेश ब्रिटिश काळात पंजाब म्हणूनच ओळखला जायचा. ब्रिटिश सत्तेच्या जोखडातून स्वतंत्र होत असताना पंजाबला दुर्दैवी फाळणीला सामोरं जावं लागलं. झेलम आणि चिनाब नद्यांचा प्रमुख भाग फाळणीनंतर पाकिस्तानात गेला. हिमाचल प्रदेशातून वाहणारी रावी नदी काही अंतर गुरूदासपूर जिल्ह्यातून वाहते; पण नंतर रावी नदीही पाकिस्तानात जाते. दोनच नद्या खऱ्या अर्थानं आजच्या पंजाबमध्ये राहिल्या : बियास आणि सतलज. पंजाबमधून वाहणाऱ्या या दोन मोठ्या नद्यांचा हरिकेजवळ संगम होतो आणि फिरोजपूरजवळच्या हुसैनीवाला गावानजीक त्या पाकिस्तानात प्रवेश करतात. या हुसैनीवाला गावात नदीकाठीच भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या पार्थिवांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. तिन्ही शहिदांचं स्मारक आजही तिथं आहे.

या पाच नद्यांनी पंजाबमधली केवळ शेतीच फुलवली असं नाही, तर लोकसंस्कृती, खाद्यसंस्कृती आणि या नद्यांच्या खोऱ्यांत राहणाऱ्या लोकांच्या स्वभाववैशिष्ट्यांनाही आकार दिला. या नद्यांच्या आधारानं लोकांनी शेती फुलवली, पशुधन सांभाळलं; वाढवलं. या परिसरातून लष्करात भरती होणाऱ्यांचं प्रमाणही मोठं होतं. ब्रिटिशांनी भारतात उभारलेल्या लष्करातले पंचवीस ते तीस टक्के लोक जुन्या पंजाबमधले असायचे. स्वातंत्र्यानंतर, १९६७ मध्ये राज्यांची पुनर्रचना झाल्यावर पंजाबमधून हरियाना आणि हिमाचल प्रदेश ही दोन राज्यं निर्माण करण्यात आली. त्यामुळे बियास आणि सतलज या दोनच नद्या खऱ्या अर्थानं पंजाबमध्ये राहिल्या, कारण रावी नदीचा बराचसा भाग पुनर्रचनेनंतर हिमाचल प्रदेशात गेला.

पंजाबच्या ईशान्य भागाला लागून असलेल्या हिमाचलमधून बियास पंजाबमध्ये प्रवेश करते. खडूर साहबजवळ बियासचा प्रवाह दुभंगतो. तिथं नदीच्या मध्यभागी लांब-रुंद बेट निर्माण झालं आहे. बियासचा एक प्रवाह अमृतसर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहतो. आता अमृतसर जिल्ह्याचंही विभाजन होऊन त्यातून तरन तारण आणि मजीठा हे नवे जिल्हे निर्माण झाले आहेत. दुसरा प्रवाह कपूरथाळा जिल्ह्याच्या सीमेवरून वाहतो. कपूरथाळा ही पूर्वीची एक मोठी रियासत होती, तर बियासचे दोन्ही प्रवाह हरिके गावाजवळ पुन्हा एकमेकांना मिळतात. इथंच सतलज नदीही बियासला मिळते.
बियासच्या दोन प्रवाहांच्या मधलं बेट जवळपास वीस किलोमीटर लांब आणि पाच ते दहा किलोमीटर रुंद आहे. हे बेट म्हणजे ‘मंड’. सहज जाऊन येण्यासारखा हा भाग नाही. इथं पोचायचं म्हणजे अगदी आतल्या खेड्यांमधून छोट्या अरुंद रस्त्यांवरून नदीच्या अलीकडं जिथपर्यंत वाहन जाऊ शकेल तेवढा प्रवास एखाद्या वाहनानं करायचा. उरलेलं अंतर चालत जाऊन नदीपर्यंत पोचायचं. नदीकाठापासून बेटापर्यंतचं अंतर जास्तीतजास्त दोनएकशे यार्डांचं असलं, तरी नदीचं पात्र खोल असल्यानं बेटावर पोचण्यासाठी बोटीशिवाय पर्याय नाही. मंडवर उतरल्यावर पहिला सामना व्हायचा हत्ती गवताच्या गचपणाशी. पाऊस पडून गेला असेल, तर बेटावर पाण्याचे असंख्य छोटे छोटे प्रवाह आणि डबकी साचलेली असतात. अशातही नदीकाठच्या गावांतले काही उत्साही शेतकरी बोटीतून नांगर, बैल अगदी ट्रॅक्‍टरही घेऊन मंडवर शेती करत असत. पावसाळ्यात तिथं बरीच भात शेती असायची, नंतर बटाटे आणि मग गव्हाची पेरणी व्हायची. मात्र, बऱ्याचदा मंड बियासच्या पुरात बुडून जायचं. पुराचा इशारा मिळाला, की हे शेतकरी पिकं सोडून घाईघाईनं बाहेर पडायचे. पुरात शेतीचं नुकसान व्हायचं; पैसा आणि श्रम अक्षरशः पाण्यात जायचे. पाणी ओसरलं, की हे शेतकरी पुन्हा त्यांच्या शेतीकडं वळायचे.

शेतकऱ्यांशिवाय मंड परिसरात सतत वावर असायचा तो मच्छिमारांचा. मासेमारी करणाऱ्या ठेकेदारांसाठी हे लोक काम करायचे. पकडलेले मासे लवकरात लवकर बाजारपेठेत पोचणं आवश्‍यक असल्यानं त्यांतल्या एक-दोन जणांकडं मोटरबोटी असायच्या. गरज पडली, तर सरकारी अधिकारीही या बोटींचा वापर करायचे.
मासेमारी करणारे दहा-बारा ठेकेदार एकत्र येऊन ग्रुप करायचे. त्या भागातल्या व्यवसायावर त्या ग्रुपचे वर्चस्व असायचं. त्या त्या भागातली पोलिस ठाणी, इरिगेशनचे अधिकारी आणि बाकीच्या खात्यातल्या लोकांबरोबरही ते चांगले संबंध ठेवून असायचे. एरवी सहजपणे न मिळणारी बारीकसारीक माहिती मंड परिसरात वावरणाऱ्या या लोकांकडून मिळायची. मंडवर पोलिस ठाणी नसल्यानं वेळप्रसंगी या माहितीचा उपयोग व्हायचा.

मंड आणि आजूबाजूच्या पाणथळ परिसरात दहशतवाद्यांची ये-जा असल्याचं ऐंशीच्या दशकाच्या सुरवातीला पोलिस आणि सुरक्षादलांच्या लक्षात आलं. पोलिस मागावर असले, की दहशतवादी मंडमध्ये आसरा घ्यायचे. मग काही दिवस ते शहरांपासून, मोठ्या गावांपासून लांब राहायचे, मंडमधून बाहेर पडायचे नाहीत. पाठलाग थंडावला, की पुन्हा त्यांच्या कारवाया सुरू व्हायच्या. त्यामुळं दहशतवाद्यांचं आश्रयस्थान म्हणून मंड कुख्यात झालं होतं. पोलिस तिथं क्वचितच जात असल्यानं दहशतवाद्यांच्या अनेक गटांनी मंडवर काही ठिकाणी पक्की बांधकामंही केली होती. गरज पडेल तसा दहशतवाद्यांकडून त्यांचा वापर होत असे.

मी मंडविषयी पहिल्यांदा ऐकलं ते जालंधरला वरिष्ठ जिल्हा पोलिसप्रमुख असताना. सतलज नदीलगतच्या गावांमधल्या बेकायदा दारूधंद्याविषयीच्या चर्चेत मंडचा उल्लेख झाला होता. अधिक चौकशी केल्यावर, मंडवर मोठ्या संख्येनं हातभट्ट्या लावल्या जातात आणि तिथून बाटल्या, पिपं, ट्रॅक्‍टरच्या ट्युबांमध्ये भरून ही दारू नदीलगतच्या गावात आणून विकली जाते, असं मला समजलं. मंड परिसरात पोलिस नसल्यानं बेकायदा दारूचा धंदा बिनधास्तपणे सुरू असायचा.

पोलिस अधिकाऱ्यांच्या एका मासिक बैठकीत मी याविषयी बोललो. नदीलगतच्या गावांतल्या ठाण्यांमध्ये काम केलेल्या अधिकाऱ्यांकडून माझ्या माहितीला दुजोरा मिळाला; पण तिथं छापं घालणं तितकं सोपं नव्हतं. मंडवर जायचं म्हणजे सर्वांत आधी बोटी हव्यात. त्याशिवाय अवैध धंदेवाल्याकडून प्रतिकार होण्याची शक्‍यता लक्षात घेऊन पुरेसं मनुष्यबळ, त्यांच्याकडे पुरेशी शस्त्रं, छाप्यादरम्यान पुरावे रेकॉर्ड करायला कॅमेरे अशी सगळी सामग्री गोळा करण्यापासून सुरवात व्हायची. अशी सगळी तयारी करूनही मंडवरील अवैध दारू धंद्यावरच्या या आधीच्या छाप्यांना फारसं यश आलं नव्हतं, कारण बऱ्याचदा छापा पडायच्या एक-दोन दिवस आधीच अवैध धंदेवाले तिथून पसार झालेले असायचे. ‘माझ्या जिल्ह्याच्या एका लांबच्या कोपऱ्यात का असेना; पण वरिष्ठ पोलिस अधिक्षक म्हणून मला तो भाग पाहायचा आहे,‘ असं मी ठाणेदारांना सांगितल्यावर एका उपअधीक्षकांनी आणि नदीजवळच्या दोन ठाण्यांच्या ठाणेदारांनी आम्हाला जास्तीतजास्त जवळ जाऊन तिथली परिस्थिती पाहता येईल अशा बेतानं बोटी, मनुष्यबळ, पुरेशी शस्त्रं, दुर्बिणी, बॅटऱ्या वगैरेंची जमवाजमव सुरू केली.

ठरल्या दिवशी मी नदीकाठाच्या एका फार्महाऊसवर पोचलो. समोर पसरलेल्या बेटावर चार-पाच ठिकाणी धूर दिसत होता. याचा अर्थ तिथं हातभट्ट्या लागलेल्या होत्या. नदी ओलांडून मंडवर उतरल्यावर गवतातून, उंचसखल भागातल्या पाण्याच्या डबक्‍यांमधून वाट काढत आम्ही त्या धुराच्या दिशेनं चालायला सुरवात केली. थोडं चालल्यावर भट्ट्या दिसायला लागल्या. दुर्बिणीतून पाहिल्यावर तिथं काम करणारे पाच-सहा लोकही स्पष्ट दिसत होते. आम्ही चालत असतानाच माझ्यासाठी जालंधरच्या मुख्यालयातून संदेश आला. राज्यपालांच्या सल्लागारांच्या दौऱ्यामुळे मला लगेच जालंदरला परत जावं लागणार होतं. उपअधीक्षकांना त्या चार-पाच दारू भट्ट्यांवर एकत्रितपणे छापा घालण्याच्या सूचना देऊन मी परतलो. मला लवकर परतावं लागलं असलं, तरी ‘मंड’ नावाच्या एका अगदी वेगळ्या, कल्पनेपलीकडल्या जागेशी माझा परिचय झाला होता. अशी एखादी जागा अस्तित्वात असेल अशी शंकाही मला त्याआधी कधी आली नव्हती.

तोपर्यंत, म्हणजे सन १९८४पर्यंत, सुसंघटित रितीनं दहशतवाद्यांशी सामना करण्याची वेळ माझ्यावर आली नव्हती. ‘मंड’मुळे माझ्यातला पोलिस अधिकारी अस्वस्थ झाला- कारण तिथं बेकायदा रितीनं दारू गाळली जात होती आणि ती माझ्या जिल्ह्यात विकली जात होती. अवैध दारूला चाप लावण्यासाठी मी सगळ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या खबऱ्यांकडून मिळेल ती सगळी माहिती गोळा करायला सांगितली. आमचे उपअधीक्षक एक दिवस हरदेवसिंग यांना घेऊन माझ्याकडे आले. हरदेवसिंग त्या भागातले एक प्रगत शेतकरी होते, ते स्वतः उत्तम शिकलेले होते. नदीच्या काठावर त्यांची चांगली शेती होती. मंडवरही ते शेती करायचे. मंडवर नेहमीच जात-येत असल्यानं त्यांच्या मालकीची एक बोटही होती. त्यांना शिकारीचाही छंद होता. फारसा गाजावाजा न करता मी एकदा मंडला भेट द्यावी, असं हरदेवसिंग यांनी मला सुचवलं. मी सहज पिकनिकसाठी किंवा शिकारीसाठी मंडवर गेल्यासारखं दिसलं, तर कोणालाच काही शंका येणार नाही, हवं तसं हिंडून बेट नीट पाहता येईल. नंतर छापे घालण्याचं नियोजन करता येईल. कल्पना चांगली होती. मुख्य म्हणजे त्यासाठी फार मोठ्या तयारीचीही गरज नव्हती. आम्ही जवळचीच एक तारीख पक्की केली.
शॉटगन, माझा कुत्रा आणि शिकारीचा सगळा जामानिमा घेऊन मी त्या दिवशी सकाळी सात वाजताच हरदेवसिंग यांच्या गावी पोचलो. हिवाळ्याचे दिवस होते. बोटीनं मंडवरच्या हरदेवसिंगांच्या शेतात पोचल्यावर वाफाळत्या चहानं आमचं स्वागत झालं. थंडीतल्या त्या सकाळी असा गरमगरम चहा घेण्याची मजाच काही औरच होती. मी सगळ्यांसाठी सॅंडविच नेली होती. चहा-सॅंडविचचा समाचार घेतल्यावर आम्ही कामगिरीवर निघालो. हरदेवसिंगांची तिथं गव्हाची शेती होती; पण तिथं राहणारे त्यांचे कामगार भाज्याबिज्याही लावत असत.

लांबवर थोडा धूर दिसत होता. त्या दिशेनं आम्ही चालायला सुरवात केली. वाटेत तितर आणि काही बदकांवर बारही टाकले. चालताना आम्हाला कोल्हे, ससे आणि चिंकारा, बारशिंग्यासारखी काही हरणंही दिसली; पण आमचं लक्ष्य वेगळंच होते. हरदेवसिंग तिथलेच असल्यानं हातभट्ट्या लावणारे लोक त्यांच्या माहितीचे होते. ‘शिकारीसाठी या भागात येणार असल्याचं मी त्यांना कळवलं आहे. त्यामुळे आपल्याला काही अडचण येणार नाही. तुमची इच्छा असेल, तर त्यांचं रसायनही तुम्हाला चाखायला मिळेल,’ हरदेवसिंग म्हणाले. बोलता बोलता आम्ही भट्ट्यांच्या बरेच जवळ पोचलो होतो.

लांबवरून आम्हाला येताना पाहून भट्ट्यांजवळ एकच पळापळ झाली. तीन-चार लोक घाईघाईनं आमच्या दिशेनं येताना दिसले. त्यांचा एकंदर रोख आम्ही येऊ नये असाच दिसत होता. त्यामुळे आम्ही थांबून त्यांना येऊ दिलं. ‘‘सरदार म्हणताहेत तुम्ही येऊ नका. काल रात्री खाडकूसिंग आले आहेत. ते असताना धोका पत्करण्यात काही अर्थ नाही. तुम्ही परत जा,’’ त्यातल्या एकानं हरदेवसिंगांना सांगितलं. आम्ही लगेचच परत फिरलो. काय झालं ते मला नीट समजलं नव्हतं. म्हणून मी त्यांना विचारलं : ‘‘कोण खाडकू सिंग?’’
‘‘साहेब, दहशतवादी आले आहेत. कधीकधी ते मंडवर येऊन चार-दोन दिवस रहातात. अवैध दारूधंद्यांना त्यांचा विरोध असल्यानं या भट्टीवाल्यांना आज गाशा गुंडाळावा लागणार आहे,’’ हरदेवसिंग म्हणाले. म्हणजे प्रश्न फक्त अवैध दारूभट्ट्यांचा नव्हता. दहशतवादीही तिथं जात-येत होते, हा प्रश्न जास्त गंभीर होता.
परत येताना माझ्या मनात तिथले शेतकरी, मच्छिमार आणि अगदी अवैध दारू धंदेवाल्यांपासून ते दहशतवाद्यांपर्यंत सगळ्या समाजकंटकांचं आश्रयस्थान असणाऱ्या त्या गूढ, रहस्यमय बेटाचेच विचार होते. तिथं आणखी फिरल्यावर काय काय पाहायला मिळेल हे रहस्य मला उलगडायचं होतं.
(क्रमशः)
(या लेखाचे बौद्धिक संपदा हक्क लेखकाकडे आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com