मंड आणि दहशतवाद (एस.एस. विर्क)

एस.एस. विर्क
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

एक दिवस मी रिबेरोसाहेबांशी मंडविषयी बोललो. ते बेट दहशतवाद्यांच्या दृष्टीनं सुरक्षित आश्रयस्थान बनलं असल्याचं सांगून मी त्यांना मंडवरच्या माझ्या फेऱ्या, शिकारीच्या नावाखाली तिथं केलेली पायपीट, माझ्या दोन सहकाऱ्यांनी तिथं मच्छिमारांमध्ये राहून मिळवलेली माहिती अशी सगळी माहिती दिली. त्यांनीही त्यात रस दाखवला. मला त्यांनी मंडविषयी, तिथं पोचण्यातल्या अडचणी, अवघड भूभाग, तिथं कारवाई करण्याचे अन्य काही मार्ग याविषयी अनेक प्रश्न विचारले. ऑपरेशनची आखणी करण्यासाठी मंडच्या अंतर्गत भागाची हवाई पाहणी करून, व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं आवश्‍यक असल्याचं मी सुचवलं.

एक दिवस मी रिबेरोसाहेबांशी मंडविषयी बोललो. ते बेट दहशतवाद्यांच्या दृष्टीनं सुरक्षित आश्रयस्थान बनलं असल्याचं सांगून मी त्यांना मंडवरच्या माझ्या फेऱ्या, शिकारीच्या नावाखाली तिथं केलेली पायपीट, माझ्या दोन सहकाऱ्यांनी तिथं मच्छिमारांमध्ये राहून मिळवलेली माहिती अशी सगळी माहिती दिली. त्यांनीही त्यात रस दाखवला. मला त्यांनी मंडविषयी, तिथं पोचण्यातल्या अडचणी, अवघड भूभाग, तिथं कारवाई करण्याचे अन्य काही मार्ग याविषयी अनेक प्रश्न विचारले. ऑपरेशनची आखणी करण्यासाठी मंडच्या अंतर्गत भागाची हवाई पाहणी करून, व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं आवश्‍यक असल्याचं मी सुचवलं. ‘‘मी तुम्हाला लष्कराचं एक हेलिकॉप्टर मिळवून देतो. तुम्ही प्लॅन तयार ठेवा. एखाद्या दिवशी अगदी आयत्यावेळीही तुम्हाला निघावं लागेल,’’ ते तत्काळ म्हणाले.

अमृतसरला रूजू झाल्यानंतर सुरवातीला काही काळ माझा मुक्काम रेस्टहाऊसमध्येच होता. मी भेटायला बोलावल्यावर करमसिंग लगेचच आले. निवडणुकांच्या आधी मंडचा विषय जिथं थांबला होता, तिथूनच पुन्हा मंडवर काम करायला सुरवात करण्याविषयी आम्ही चर्चा केली. मंडवरून दहशतवाद्यांना बाहेर काढायचं आणि दहशतवाद्यांचा सुरक्षित तळ म्हणून मंडचा उपयोग होऊ द्यायचा नाही हा आमचा उद्देश असल्याचं करमसिंग यांच्या एव्हाना लक्षात आलं होतं. त्यांचीही आम्हाला मदत करण्याची तयारी होती. ‘ऑपरेशन मंड’ची आखणी खूप काळजीपूर्वक करावी लागणार होते; कारण मंडवरच्या वाटा, खाचखळगे, डबकी आणि बेटाची एकंदरच रचना या सगळ्याची दहशतवाद्यांना आमच्यापेक्षा जास्त चांगली माहिती होती. दरम्यानच्या काळात करमसिंग यांनीही मच्छिमारांकडून दहशतवाद्यांच्या हालचालीची जेवढी माहिती मिळवता येईल तेवढी मिळवून ठेवली होती. त्यांच्या माहितीनुसार निवडणुकांच्या काळात सुरक्षादलांचा दबाव टाळण्यासाठी बऱ्याच दहशतवाद्यांनी मंडवर मुक्काम हलवला होता. त्या भागातल्या ठाणेदारांकडूनही मला अशीच माहिती मिळली होती; पण निवडणुकींची धामधूम संपल्यावर मात्र इतके दिवस लपून राहिलेले दहशतवादी आता बाहेर पडायला लागले होते. पोलिस ज्यांच्या मागावर होते असेच दहशतवादी फक्त आता मंडमध्येच राहिले होते. मी करमसिंग यांना त्यांच्या नेटवर्कमधून दहशतवाद्यांच्या तळांची आणखी काही माहिती मिळते का ते पाहायला सांगितलं.

करमसिंग यांच्या मदतीनं पुरेशी तयारी करून काही दिवसांनी मी त्या भागातल्या पोलिस ठाण्याला भेट दिली. रेकॉर्डस वगैरे तपासल्यानंतर मी ठाणेदारांना बोटीनं मंड परिसरात एखादा फेरफटका मारता येईल असं विचारलं. उपअधीक्षक आणि इतर अधिकारीही तयार झाले. नोव्हेंबर महिन्यातली छान थंडीभरली सांज होती. इरिगेशन डिपार्टमेंटच्या एका मोठ्या मोटरबोटीतून मी; आमचे उपअधीक्षक, ठाणेदार, माझ्या सुरक्षापथकातील जवान आणि दोन स्थानिक मच्छीमारांबरोबर अमृतसरच्या बाजूनं मंडच्या दिशेनं निघालो. त्या मच्छिमारांकडून मला दहशतवाद्यांच्या हालचालींविषयी आणखी माहिती मिळत होती. मच्छिमारांना धमकावून दहशतवादी काहीवेळा त्यांना सामान वगैरे द्यायला भाग पाडायचे, असं ते सांगत होते.

पावसाळा नुकताच संपला होता. प्रचंड वाढलेल्या हत्ती गवतामुळे आणि इतर झाडंझुडपांमुळे फार लांबवरचं काही दिसत नव्हतं. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी गवत आणि झुडपं तोडून शेतीसाठी जमीन साफ केली होती. तुकड्यातुकड्यांनी कुठं कुठं अशी मोकळी जमीन दिसत होती. वाटेत आम्ही काही बदकांवर बार टाकले. पहाणाऱ्याला वाटावं आम्ही शिकारी करताच चाललो आहोत; पण मी बारकाईनं नदीच्या दोन्ही बाजूंचे किनारे पाहत चाललो होतो. किनाऱ्यांवरची गावं, घरं आणि दुसऱ्या बाजूला मंड.

माझे रिडर राममूर्ती आणि पीएसओ अशोकही माझ्याबरोबर होते. दोघंही चांगले धाडसी पोलिसवाले होते. त्या दोघांची आपापसात काहीतरी कुजबूज चालली होती. ‘‘कसली चर्चा चाललीय,’’ मी त्यांना विचारलं. ‘‘फार काही विशेष नाही सर,’’ एएसआय राममूर्ती म्हणाले. मीही विषय वाढवला नाही. थोड्यावेळानं आम्ही अमृतसरकडे परत फिरलो.

दहशतवादविरोधी ऑपरेशन्समधला महत्त्वाचे नियम म्हणजे गुप्तता आणि मौन. राममूर्तीच्या हुशारीची मला कल्पना होती. राममूर्ती एखाद्या चांगल्या डिटक्टिव्हसारखा विचार करू शकत असे. अमृतसरला पोचल्यावर राममूर्ती यांनी दुसऱ्या दिवशी भेटीची वेळ मागितली. दिलेल्या वेळेला राममूर्ती आणि पीएसओ अशोकबरोबरच आले. मंडवर नेहमी वावरणाऱ्या मच्छिमारांमध्ये काही पोलिसांना पाठवलं तर मंडच्या रचनेबद्दल आणि दहशतवाद्यांच्या हालचालींबद्दल चांगली माहिती काढता येईल, अशी कल्पना त्यांनी मांडली. नुसतीच कल्पना सांगून ते थांबले नाहीत, तर एकदोन आठवडे मंडवर जाऊन रहाण्याची तयारीही त्यांनी दाखवली.
मी करमसिंग यांना फोन करून असा प्लॅन यशस्वी होऊ शकतो का याची चाचपणी केली. त्यात धोके होते; पण प्रयत्न करायला हरकत नाही असं करमसिंग यांचं मत पडलं. थोड्याच दिवसांत राममूर्ती आणि अशोक मंडकडे रवाना झाले. आठवडाभर मच्छिमारांबरोबर राहून त्यांनी बोटीनं येऊन मंडवर सहज प्रवेश करता येतील अशा जागांची यादी आणि नकाशे तयार केले. त्यातल्या सहा जागा अमृतसरच्या बाजूला होत्या आणि आठ रियासतीच्या बाजूला. पुरेसा फोर्स वापरून मंडवर येण्याजाण्याचे हे मार्ग रोखून आम्ही कारवाई करू शकलो असतो. हे मार्ग रोखल्यावर पोहून नदी पार करण्याशिवाय दहशतवाद्यांकडे निसटून जाण्याचा दुसरा कोणताच रस्ता नव्हता; पण तेही तितकंसं सोपं नव्हतं. राममूर्ती आणि अशोक यांनी आणलेली माहिती आमच्या तयारीच्या दृष्टीनं महत्त्वाची होती. ती माहितीही आमच्या ऑपरेशन प्लॅनमध्ये समाविष्ट झाली.

दरम्यान, पंजाबमधल्या शिरोमणी अकाली दल-भाजप सरकारनं औदार्य दाखवत काही दहशतवाद्यांची मुक्तता करायला सुरवात केली होती. सुटका झालेल्या लोकांचं मतपरिवर्तन होईल, असं सरकारला वाटत होतं; पण प्रत्यक्षात सुटका झाल्यानंतर काही लोक अंडरग्राऊंड होऊन पुन्हा दहशतवाद्यांना सामील झाले. त्यांनी अकाली नेत्यांना उघडउघड लक्ष्य करायला सुरवात केली, त्यातल्या अनेकांवर हल्ले झाले, अनेकांची सुरक्षा वाढवावी लागली. नागरिकांवरचे हल्ले थांबले नव्हते. अकाली नेते आणि दहशतवाद्यांमधला संघर्ष विकोपाला गेला होता. सुवर्ण मंदिर परिसरातही दहशतवाद्यांचा वावर वाढायला लागला होता. सन १९८६च्या जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांत दहशतवाद्यांच्या हालचालींमध्ये वाढ झालेली दिसली. ते आता अधिक संघटित झाले होते, त्यांच्याकडे चांगली शस्त्रं आली होती, ते अधिक आक्रमकही झाले होते. राज्य सरकार अजूनही दहशतवाद्यांविरूद्ध सर्वंकष कारवाईचे आदेश देण्याच्या मनःस्थितीत नव्हतं. दहशतवाद्यांविरूद्ध जोमानं कारवाई हाच दहशतवाद रोखण्याचा एकमेव उपाय होता, हे सरकारच्या लक्षात येत नव्हतं आणि सरकारनं थोडीशी देखील सौम्य भूमिका घेतली, तर सरकार कमजोर असल्याचं चित्र उभं केलं जात होतं.

मार्चच्या २८ तारखेला दहशतवाद्यांच्या एका गटानं लुधियानातल्या रा. स्व. संघाच्या शाखेवर हल्ला केला. अनेक स्वयंसेवक या हल्ल्यात मारले गेले. सरकारसाठी हा मोठा धक्का होता; पण त्यांच्याकडे यावर काहीच उत्तर नव्हतं. हल्ल्यानंतर केंद्रातल्या अंतर्गत सुरक्षा विभागाचे राज्यमंत्री अरूण नेहरू यांनी लुधियानाला भेट दिली. पोलिस दलातले एक नामवंत अधिकारी ज्युलिओ रिबेरोही त्यांच्याबरोबर होते. आयपीएसच्या महाराष्ट्र काडरचे रिबेरो त्यावेळी केंद्रीय गृह मंत्रालयात विशेष सचिव होते. पंजाबमधल्या दहशतवादाला तोंड देण्यासाठी रिबेरो यांच्याकडे पंजाबच्या पोलिस महासंचालकपदाची जबाबदारी सोपवावी अशी विनंती मुख्यमंत्री सुरजीतसिंग बरनाला यांनी नेहरू यांना केली. रिबेरो त्यावेळी नागरी स्वरूपाच्या पदावर होते; पण पंजाब पोलिसांच्या महासंचालकपदाची जबाबदारी त्यांना स्वीकारावी लागली. रिबेरो यांनी त्याच दिवशी त्यांची नवी जबाबदारी स्वीकारली. त्यांची वर्दी आणि रोजच्या वापराच्या इतर वस्तू त्यांनी नंतर दिल्लीहून मागवून घेतल्या.

रिबेरो हाडाचे पोलिस अधिकारी होते. ते लगेचच कामाला लागले. त्यांनी पंजाब प्रश्नाचा अभ्यास सुरू केला. प्रश्नाचं स्वरूप, तो कसाकसा वाढत गेला आणि प्रश्नाची, हत्यांची त्यावेळची स्थिती त्यांनी समजावून घेतली. सगळ्या पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी दहशतवादाविरूद्धची त्यांची रणनीती स्पष्ट केली. राज्यात सक्रिय असणाऱ्या वेगवेगळ्या दहशतवादी गटांची माहिती असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या टीम्स त्यांनी बनवल्या. प्रत्येक गटात सक्रिय असणाऱ्या दहशतवाद्यांच्या याद्या केल्या, त्यांच्या कुंडल्या जमा केल्या. या दहशतवाद्यांच्या मागावर राहण्यासाठी अधिकाऱ्यांच्या टीम्सच्या नेमणुका केल्या.

रिबेरोसाहेबांनी दहशतवाद्यांविरूद्ध चालू असलेल्या कारवायांचाही अभ्यास केला. या कारवाया अधिक परिणामकारक व्हाव्यात यासाठी त्यांनी काही बदलही सुचवले. दहशतवाद्यांच्या विरूद्ध मोठ्या कारवाया करता याव्यात यासाठी त्यांना केद्रीय निमलष्करी दलांचीही मोठ्या प्रमाणावर मदत हवी होती. त्याप्रमाणे केंद्रीय राखीव पोलिस दल आणि सीमा सुरक्षा दलालाही दहशतवादविरोधी कारवायांमध्ये सामील करून घेण्यात आले. केंद्रीय राखीव पोलिस दलाकडे अमृतसर जिल्हा आणि सीमा सुरक्षा दलाकडे गुरूदासपूर जिल्हा सोपवण्यात आला. हे दोन जिल्हे दहशतवादाच्या आगीत सर्वाधिक होरपळले होते.

निमलष्करी दलाचं नेतृत्व करण्यासाठी, दहशतवादाला आळा घालण्यासाठी रिबेरोसाहेबांना काही खंबीर अधिकारी हवे होते. काही नावं निश्‍चित करून त्यातल्या काही जणांशी ते स्वतः बोलले. त्यांच्या यादीतल्या बऱ्याच जणांनी टाळाटाळ केली. आपण स्वतः पंजाबचेच असल्यानं आपण तिकडे गेलो, तर खेड्यात राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांना त्रास होईल, असं एका अधिकाऱ्यानं सांगितलं. दुसऱ्या एका अधिकाऱ्याची पत्नी गंभीर आजारी असल्यानं त्यांना तिच्यापाशी असणं आवश्‍यक होते. आणखी एका अधिकाऱ्यानं रिबेरोसाहेबांना बऱ्याच अटी ऐकवल्या. त्यांच्या यादीतल्या शेवटच्या अधिकाऱ्यानं मात्र त्यांना होकार दिला. ‘‘तुम्हाला पंजाबमध्ये रूजू व्हायला किती वेळ लागेल,’’ रिबरोंनी त्या अधिकाऱ्याला विचारलं. ‘‘बदलीची ऑर्डर आज मला मिळाली, तर उद्या मी आपल्याबरोबर अमृतसरमध्ये असेन,’’ तो अधिकारी उत्तरला. आपल्या काही अटी वगैरे नाहीत; तिथली परिस्थिती पाहून काय काय आवश्‍यक असेल ते आपल्याला नंतर सांगेन, असंही त्या अधिकाऱ्यानं सांगितलं. रिबेरोसाहेबांनी मग पाठपुरावा केला आणि आसाममध्ये असलेले के. पी. एस. गिल पंजाबमध्ये नव्यानं निर्माण करण्यात आलेल्या सीआरपीएफच्या महानिरीक्षकपदी दाखल झाले.

अमृतसर त्या काळात फारच अशांत होतं; पण निळ्या रंगाची पगडी असेल, तर कोणीही निर्धास्तपणे फिरू शकायचे कारण निळी पगडी म्हणजे शासकीय किंवा राजकीय अधिकाराची खूण असल्यासारखी होती. रिबेरोसाहेबांनी अमृतसरच्या सर्किट हाऊसमध्ये राहू नये असं वरिष्ठ पोलिस अधीक्षक म्हणून माझं मत होतं. तिथं मंत्रिमंडळातल्या अनेकांचं तिथं कायम येणंजाणं असायचं आणि सत्ताधारी पक्षांच्या कार्यकर्त्यांचाही तिथं राबता असायचा. रिबेरोसाहेबांच्या सुरक्षेबाबत मी कोणताही धोका पत्करू इच्छित नव्हतो.

रिबेरोसाहेब आठवड्यातून दोन-तीन दिवस अमृतसरला येतील, तेव्हा त्यांना राहण्यासाठी योग्य जागा शोधण्याच्या प्रयत्नात मी होतो. मला पूर्णपणे सुरक्षित, मध्यवर्ती आणि सगळ्या सुविधा असणारी जागा हवी होती; पण अशी जागा सापडत नव्हती. मी जिथं राहत होतो, तो माझा सरकारी बंगलाच रिबेरोसाहेबांसाठी योग्य आहे, असं मला एकदम जाणवलं. मी एकटाच राहत असल्यानं तसाही तो प्रशस्त बंगला बऱ्यापैकी मोकळाच होता. तिथं सगळ्या सुविधा होत्या, पुरेशी मोकळी जागा होती, एक स्वतंत्र व्हरांडा होता, थोडी हिरवळही होती आणि मुख्य म्हणजे आवश्‍यक ती सगळी सुरक्षा यंत्रणाही तिथं तैनात होती.

रिबेरोसाहेबांच्या पत्नी मेल्बा रिबेरोही नेहमी त्यांच्याबरोबर असायच्या. त्या दोघांनाही माझ्या मनातली जागा दाखवल्यावर लगेचच त्यांनी ती पसंत केली, आणि एक मोठा प्रश्न सुटला. बंगल्यावर चांगला खानसामाही होता, हव्या त्या पद्धतीचं जेवण तो बनवत असे; पण रिबेरो पती-पत्नींना साधंच जेवण पसंत असायचं, ते जेवायचेही अगदी कमी. मी दिवसभर कामानिमित्त बाहेरच असायचो; पण एखाद्या दिवशी लवकर परतलो, तर रिबेरोसाहेबांबरोबर रात्रीचं जेवण घेण्याची संधी मला मिळायची. एकूण ही व्यवस्था उत्तम जमली होती.

एक दिवस मी रिबेरोसाहेबांशी मंडविषयी बोललो. ते बेट दहशतवाद्यांच्या दृष्टीनं सुरक्षित आश्रयस्थान बनलं असल्याचं सांगून मी त्यांना मंडवरच्या माझ्या फेऱ्या, शिकारीच्या नावाखाली तिथं केलेली पायपीट, माझ्या दोन सहकाऱ्यांनी तिथं मच्छिमारांमध्ये राहून मिळवलेली माहिती अशी सगळी माहिती दिली. त्यांनीही त्यात रस दाखवला. मला त्यांनी मंडविषयी, तिथं पोचण्यातल्या अडचणी, अवघड भूभाग, तिथं कारवाई करण्याचे अन्य काही मार्ग याविषयी अनेक प्रश्न विचारले. ऑपरेशनची आखणी करण्यासाठी मंडच्या अंतर्गत भागाची हवाई पाहणी करून, व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं आवश्‍यक असल्याचं मी सुचवलं. ‘‘मी तुम्हाला लष्कराचं एक हेलिकॉप्टर मिळवून देतो. तुम्ही प्लॅन तयार ठेवा. एखाद्या दिवशी अगदी आयत्यावेळीही तुम्हाला निघावं लागेल,’’ ते तत्काळ म्हणाले.
माझे सगळे प्रश्न एकदमच सुटले होते- निदान त्यावेळपुरते तरी.

(क्रमशः)
(या लेखाचे बौद्धिक संपदा हक्क लेखकाकडे आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang s s virk write in and out crime article