मंडवर हल्ला (एस. एस. विर्क)

s s virk
s s virk

कारवाईच्या दिवशी पहाटे दोन वाजता तिसऱ्या ते आठव्या फेरीत जाणाऱ्या जवानांच्या सहा तुकड्या आम्ही अमृतसरवरून हरिकेच्या धावपट्टीवर हलवल्या. पहिल्या दोन तुकड्या मात्र अमृतसरहून निघून थेट मंडवरच्या दहशतवाद्यांच्या तळाजवळच्या ठरलेल्या ठिकाणी उतरणार होत्या. हरिकेच्या धावपट्टीवर जिथं आम्ही थांबलो होतो, तिथं दोन अवाढव्य हेलिकॉप्टर उतरली. एक मिनिटाच्या अवधीत दोन तुकड्यांना पोटात घेऊन दोन्ही हेलिकॉप्टरनी उड्डाण केलं. अशा तीन फेऱ्या झाल्या. माझ्या तुकडीसह मी दहशतवाद्यांच्या घराच्या मागच्या बाजूला उतरलो. आजूबाजूला पाण्याची असंख्य डबकी होती. चिखलात दिसणाऱ्या पावलांच्या खुणांचा माग काढत मी सर्व तयारीनिशी घरापर्यंत पोचलो.

के. पी. एस. गिल यांनी सन १९८६च्या मे महिन्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) वायव्य विभागाच्या महानिरीक्षकपदाची सूत्रं हाती घेतली. गिलसाहेबांचं प्रशासकीय मुख्यालय चंडीगडला असलं, तरी ऑपरेशन्सच्या दृष्टीनं त्यांचं मुख्यालय होते अमृतसर. अमृतसर जिल्हा त्या काळात खूपच अशांत होता. जवळपास पाच हजार चौरस किलोमीटर परिसरावर पसरलेला अमृतसर तेव्हा पंजाबमधला आकारानं सर्वांत मोठा जिल्हा होता. रिबेरोसाहेबांच्या योजनेनुसार अमृतसरमध्ये सीआरपीएफचे जवान मोठ्या प्रमाणावर तैनात केले जाणार होते. सीआरपीएफच्या पहिल्या तीन बटालियन अमृतसरमध्ये आल्यावर त्या तीन वेगवेगळ्या सेक्‍टरमध्ये विभागून मी त्यांच्यावर मुख्यतः गस्त, नाकाबंदी, झडत्या, छापे घालणं आदी जबाबदाऱ्या टाकल्या. अगदी आयत्या वेळी उद्‍भवणाऱ्या प्रसंगांना तोंड देण्यासाठी वरिष्ठ अधीक्षक म्हणून मी त्या बटालियन्सचा काही भाग रिझर्व्ह म्हणून राखून ठेवला होता. एका अदृश्य शत्रूबरोबर जणू आमची जोरदार लढाई सुरू होती.

आणखी बटालियन्सची कुमक मिळाल्यावर मी सेक्‍टर्सची संख्या तीनवरून आधी सहावर आणि मग बारावर नेली. प्रत्येक कमांडंट किंवा सेक्‍टर कमांडरकडे त्या त्या सेक्‍टरमधल्या ऑपरेशन्स आखण्याची आणि पार पाडण्याची जबाबदारी दिलेली असायची. अधिक ताकदीनिशी दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमध्ये घुसून त्यांना थेट आव्हान देता येईल, अशा पद्धतीनं आम्ही उपलब्ध मनुष्यबळ तैनात केलं होतं. दहशतवाद्यांवरचा दबाव आम्ही जसा वाढवत नेला, तशा दहशतवाद्यांच्या हालचाली नियंत्रणात येऊ लागल्या. ऑपरेशनल कमांडर म्हणून गिलसाहेब अती उत्तम होते. कारवाईच्यावेळी अधिकाऱ्यांनी त्यांच्या जवानांच्या बरोबरीनं, किंबहुना एक पाऊल पुढंच राहिलं पाहिजे यावर त्यांचा भर असायचा. त्यांच्या या आग्रहामुळे आम्ही परिस्थितीत खूप सुधारणा घडवून आणू शकलो. आता परिस्थिती आमच्या नियंत्रणात आली होती. एखादी दहशतवादी घटना घडल्यास सुरक्षादलं तातडीनं तिथं पोचून दहशातवाद्यांचा सामना करत असत. आमच्या जवानांचं मनोधैर्य त्यामुळे उंचावत होते. मीदेखील पंजाब पोलिसांना उत्साहित करून सीआरपीएफच्या मदतीनं दहशतवादाशी मुकाबला करण्यास प्रेरित करत होतो. दहशतवाद्यांबद्दल आम्ही मिळवलेली माहिती आणि सीआरपीएफची हत्यारबंद ताकद एकत्र आल्याचा चांगला परिणाम दिसायला लागला होता.

माझ्यासाठी एक हेलिकॉप्टर उपलब्ध करून देण्यात आलं आहे, असा निरोप मला एक दिवस महासंचालकांच्या कार्यालयाकडून मिळाला. दोन दिवस ते हेलिकॉप्टर अमृतसरमध्ये माझ्या ताब्यात राहणार होतं. मी माझ्या टीमबरोबर हवाई दलाच्या टीमची भेट घ्यावी असं मला सांगण्यात आलं. माझ्या टीममध्ये माझ्याबरोबर फक्त दोन खासगी छायाचित्रकार होते. त्यातला एक जण व्हिडिओग्राफर होता. दोघांकडंही लांबवरूनही चांगली छायाचित्रं काढता येतील अशा शक्तीशाली टेलीलेन्स होत्या. हवाई दलाच्या चमूला भेटून मी त्यांच्याबरोबर मंडकडे उड्डाण केलं. सुरवातीला हरिकेच्या बाजूनं मंडची हवाई पाहणी करण्याचं आम्ही ठरवलं होतं.

हरिकेच्या बाजूनं आम्ही आधी मंडची अमृतसर बाजू पाहिली. बियास नदीचा प्रवाह जिथं दुभंगतो तिथून मागं फिरून आम्ही रियासत बाजूनं पुन्हा हरिकेकडे आलो. दोन्ही किनारे पाहिल्यावर आम्ही प्रत्यक्ष बेटाकडे मोर्चा वळवला. बेटावरचे हत्ती, गवताचं गचपण, शेतांचे तुकडे, नाले, पाण्याचा फुगवटा आणि मंडवर रहाणाऱ्या माणसांची कुठंकुठं दिसणारी हालचाल या सगळ्याचं आम्ही वेगवेगळ्या उंचीवरून चित्रण केलं, भरपूर फोटो काढले. उत्तरेकडे जाताना अचानक दहशतवाद्यांनी मंडवर बांधलेला तळ माझ्या नजरेस पडला. त्या परिसरातल्या मच्छिमारांकडून आणि माझ्या सहकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवरून दहशतवाद्यांच्या तो तळ साधारणतः कुठं असेल याचा मला बऱ्यापैकी अंदाज होता. विटांनी बांधलेल्या दोन खोल्या बाहेरून चुन्यानी रंगवल्या होत्या, वर सिमेंटचे पत्रे होते. सकाळची वेळ होती, स्वच्छ प्रकाशात वरून चारएक माणसांच्या हालचालीही व्यवस्थित पाहता येत होत्या. आकाशात घिरट्या घालणाऱ्या हेलिकॉप्टरचा त्यांना काही संशय आल्याचं जाणवलं नाही. मलाही त्यांना काही जाणवू द्यायचं नव्हतं, त्यामुळे फार न रेंगाळता ठरवलेलं काम करून आम्ही परतलो.

दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस होता. इतक्‍या पावसात मंडवर नेमकी काय स्थिती असते, ते पाहण्यासाठी आम्ही आणखी एक चक्कर मारण्याचं ठरवलं. प्रचंड पाऊस झाल्यानं बियासचे दोन्ही प्रवाह चांगलेच फुगले होते. वरून बेटावर आडवेतिडवे वाहणारे असंख्य नाले दिसत होते. पावसानं मंडवर पोचणं, तिथं फिरणं आणखी दुरापास्त होऊन गेलं होतं.

ते सारं व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि छायाचित्रं मी रिबेरोसाहेबांना, गिलसाहेबांना आणि कारवाईत सामील होणाऱ्या सगळ्या सेक्‍टर कमांडरना दाखवली. प्रत्यक्ष कारवाईच्यावेळी आपल्याकडे मंडवरच्या ताज्यातल्या ताज्या स्थितीची माहिती असणं आवश्‍यक आहे, असं सगळ्यांचं मत पडलं. जवानांच्या हालचालींच्या दृष्टीनं मंडवरच्या जमिनीची स्थिती कशी आहे, त्याचीही माहिती लागणार होती. ही सगळी माहिती मी गोळा करत राहावं, असंही ठरलं. मच्छिमारांकडून आणि दहशतवाद्यांच्या संपर्कात असणाऱ्या माझ्या सोर्सेसकडून मला ताजी माहिती मिळत होतीच.
प्रत्यक्ष कारवाई कशी होईल याचा आम्ही वेगवेगळ्या बाजूंनी विचार केला होता. आमच्याकडे बरेच पर्याय होते. एक म्हणजे पहाटेच्या वेळी मोटरबोटींमधून मंडवर उतरून एकाच वेळी चार किंवा सहा ठिकाणांहून दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला चढवायचा. दोन, हरिकेहून निघून दहशवाद्यांचा तळ जिथं होता त्याच्या जवळ उतरून तिथून त्यांना घेरून त्या तळावर हल्ला चढवायचा. तिसरा मार्ग होता हवाई हल्ल्याचा. मोठी हेलिकॉप्टर्स वापरून पहाट फुटता फुटता हल्ला करता आला असता. दहशतवाद्यांचा तळ जिथं होता त्याच्या अगदी जवळ जेमतेम दोनएकशे यार्डांवर हेलिकॉप्टर उतरवून, पळण्याचे सगळे मार्ग रोखून, दहशतवाद्यांची कोंडी करता आली असती. पंजाब पोलिसांच्या तुकड्यांनी बोटींचे सगळे मार्ग रोखून धरले असते आणि सीआरपीएफच्या जवानांनी हल्ला चढवला असता. पंजाब पोलिसांच्या घोडदळाकडे नदीच्या किनाऱ्यालगतच्या भागांची जबाबदारी देता आली असती. पोलिसांनी कमांडो पद्धतीनं कारवाई आखण्याचे प्रसंग क्वचितच येत असत; पण सन १९८६च्या काळात तरी शत्रूच्या प्रदेशात अशा प्रकारे घुसून करून कारवाई करणं हा आमच्यासाठी संपूर्णपणे नवा अनुभव होता.

आमच्यासमोरच्या पर्यायांमधला सगळ्यात शेवटचा पर्याय सर्वांत स्वीकारार्ह दिसत होता. लागणाऱ्या एकूण मनुष्यबळाचा आम्ही अंदाज घेतला. एकावेळी प्रत्येकी अठ्ठावीस जवानांना नेऊ शकणारी दोन ऍसॉल्ट हेलिकॉप्टर आम्हाला या कारवाईसाठी देण्यात आली होती. संपूर्ण बेट वेढण्याइतके जवान मंडवर उतरवण्यासाठी आम्हाला एकूण आठ फेऱ्या कराव्या लागणार होत्या. अमृतसरवरून उड्डाण केल्यास मंडवर पोचायला प्रत्येक वेळी चाळीस मिनिटं लागणार होती. प्रत्येक फेरीसाठी दोन्ही हेलिकॉप्टर वापरूनही संपूर्ण फोर्स मंडवर उतरवायलाच अडीच तास लागले असते. हा वेळ खूप जास्त होता, आणि इतका वेळ घालवणं अयोग्यही होतं.

आम्ही पुन्हा थोडा अभ्यास केला. हरिकेजवळ युद्धकाळात वापरता येईल अशी एक धावपट्टी होती. त्यावेळी ती उपयोगात नव्हती. तिथून हेलिकॉप्टरनं मंड अवघ्या दोन मिनिटांवर होतं. त्यामुळे आम्ही आधी लागणाऱ्या मनुष्यबळाचे आठ भाग केले. प्रत्यक्ष हल्ल्यांमध्ये सहभागी असणारे जवान पहिल्या दोन खेपांमध्ये अमृतसरवरून जातील. दहशतवाद्यांचा तळाला मागच्या बाजूनं घेरून निसटण्याचे मार्ग रोखणाऱ्या तुकडीतले जवान दुसऱ्या खेपेत जातील आणि बेटाची उत्तर बाजू रोखण्याची जबाबदारी असलेल्या तुकड्या तिसऱ्या फेरीत आणि दक्षिण बाजू सांभाळणारे जवान चौथ्या फेरीत जातील असं ठरलं. माणसं निवडून त्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या. कमीत कमी वेळात धाव घेऊन हेलिकॉप्टरपर्यंत पोचून आत बसण्याची रंगीत तालीम घेण्यात आली. सगळी तयारी झाली; पण प्रचंड पाऊस सुरू झाला आणि कारवाई पुढं ढकलावी लागली.

दरम्यान, माझीच बदली झाली. मी अमृतसरमध्येच सीआरपीएफचा उपमहानिरीक्षक (ऑपरेशन्स) म्हणून रूजू झालो. नव्या वरिष्ठ पोलिस अधीक्षकांकडे पदभार सोपवून मी कॅनॉल रेस्टहाऊसमधल्या सीआरपीएफच्या मुख्यालयात मुक्काम हलवला. बदली झाली असली, तरी पाऊस थांबल्यानंतर मला पुन्हा ऑपरेशन मंडकडे वळायचं होतं. जुलै १९८६च्या दुसऱ्या आठवड्यात मी मंडची शेवटची हवाई पाहणी केली. सीआरपीएफचे एक कमांडंट जी. जी. ए. शर्मा माझ्याबरोबर होते. आणखी एकदा मंडची पाहणी केल्यानंतर प्रत्यक्ष कारवाईचे तपशील पक्के करण्यासाठी आम्ही गिलसाहेबांना भेटलो. जवानांना नेणाऱ्या पहिल्या फेरीचं -पहिल्या सॉर्टीचं -नेतृत्व कोण करणार हा प्रश्न होता. दोन्ही हेलिकॉप्टर एकाच वेळी उड्डाण करून एकाच वेळी उतरणार असल्यानं पहिल्या दोन्ही तुकड्या एकत्रच पोचणार होत्या. मला त्या परिसराची सगळ्यात चांगली माहिती असल्यानं पहिल्या तुकडीबरोबर जाण्याची माझी इच्छा होती. सीआरपीएफमध्ये येण्याच्या आधी कमांडंट शर्मा लष्करात होते, त्यांनाही पहिल्या तुकडीबरोबर जाण्याची इच्छा होती. चेंडू आता गिलसाहेबांच्या कोर्टात होता. त्यांनी निर्णय दिला : ‘‘पहिल्या सॉर्टीसोबत मी जाईन. नंतर शर्मा जातील. विर्क तिसऱ्या सॉर्टीबरोबर जातील.’’

कारवाईसाठी १८ जुलैचा दिवस ठरवून आम्ही कामाला लागलो.
आदल्या दिवशी म्हणजे १७ तारखेला पुन्हा प्रचंड पाऊस झाला. मात्र, ठरल्याप्रमाणं कारवाई होईल, असं गिलसाहेबांनी सांगितलं. कारवाईच्या दिवशी पहाटे दोन वाजता तिसऱ्या ते आठव्या फेरीत जाणाऱ्या जवानांच्या सहा तुकड्या आम्ही अमृतसरवरून हरिकेच्या धावपट्टीवर हलवल्या. पहिल्या दोन तुकड्या मात्र अमृतसरहून निघून थेट मंडवरच्या दहशतवाद्यांच्या तळाजवळच्या ठरलेल्या ठिकाणी उतरणार होत्या. हरिकेच्या धावपट्टीवर जिथं आम्ही थांबलो होतो, तिथं दोन अवाढव्य हेलिकॉप्टर उतरली. एक मिनिटाच्या अवधीत दोन तुकड्यांना पोटात घेऊन दोन्ही हेलिकॉप्टरनी उड्डाण केलं. अशा तीन फेऱ्या झाल्या. माझ्या तुकडीसह मी दहशतवाद्यांच्या घराच्या मागच्या बाजूला उतरलो. आजूबाजूला पाण्याची असंख्य डबकी होती. चिखलात दिसणाऱ्या पावलांच्या खुणांचा माग काढत मी सर्व तयारीनिशी घरापर्यंत पोचलो. पोझिशन्स घेऊन आम्ही घरात घुसलो. आत कोणीही नव्हतं. दहशतवाद्यांचा तळ असणारं ते घर पूर्णपणे रिकामं होतं.

आता फटफटायला लागलं होतं. इथले लोक पळून गेल्याचं स्पष्ट दिसत होतं. घराच्या बाहेर एका स्टोव्हवर दूध उकळत होतं. बाजूला जोडे पडले होते. तिथंच चार-पाच खाटाही पडल्या होत्या. हेलिकॉप्टरचा आवाज ऐकून तिथले लोक पळून गेल्याचं दिसत होतं. आम्ही आजूबाजूला शोध घेत असतानाच गिलसाहेब त्यांच्या तुकडीसह येऊन पोचले. ‘‘अरे, तुम्ही माझ्याआधी कसे काय पोचलात?’’ त्यांनी विचारलं. त्यांना येताना वाटेतले नाले पार करावे लागले होते. कंबरेएवढ्या पाण्यातून वाट काढत आल्यानं ते पूर्णपणे भिजले होते. आम्ही घराच्या दिशेनं सरळ येण्याऐवजी चिखलात उमटलेल्या पाऊलखुणांचा माग काढत आल्यानं नाले आडवे आले नाहीत, असं मी त्यांना सांगितलं.
आता आम्हाला पळून गेलेल्या दहशतवाद्यांचा शोध घ्यायचा होता.
दहशतवादी पळून गेल्याचं आणि त्यांचा शोध घ्यायचा असल्याचं मी बाकीच्या तुकड्यांना कळवलं. किनाऱ्यावर गस्त घालणाऱ्या पंजाब पोलिसांच्या तुकड्यांनाही मी सतर्कतेचे आणि संशयित व्यक्ती दिसल्यास ताब्यात घेण्याचे आदेश दिले. एका छोट्या हेलिकॉप्टरमधून मी स्वतः मंडवरून एक चक्कर मारली; पण पळून गेलेल्या दहशतवाद्यांचा काहीच मागमूस लागत नव्हता. दहशतवाद्यांच्या घरात तळघरासारख्या एका जागेत आम्हाला काही छोटी शस्त्रं, दोन एके-४७ रायफली लपवलेल्या सापडल्या. पिठाची आणि सुकामेव्याची पोती आणि साजूक तुपाचे भरपूर डबेही तिथं साठवून ठेवलेले सापडले. एकूणच दहशतवादी तिथं आरामात राहत होते, असंच दिसत होतं.

पळालेल्या दहशतवाद्यांचा शोध सुरू असतानाच रिबेरोसाहेबही हेलिकॉप्टरनं तिथं पोचले. दहशतवाद्यांनी आम्हाला गुंगारा दिल्यानं मी थोडा निराश झालो होतो; पण ती पहिलीच हवाई कारवाई इतक्‍या व्यवस्थितपणे पार पडल्याबद्दल रिबेरोसाहेब आणि गिलसाहेब मात्र समाधानी होते. इतके दिवस सुरक्षित मानल्या गेलेल्या दहशतवाद्यांचा त्या तळालाच थेट धडक देऊन आम्ही दहशतवाद्यांना तिथून हुसकवले होते. ‘‘आपण आपला इरादा पुरेसा स्पष्ट करून त्यांना एक संदेश दिला आहे,’’ रिबेरोसाहेब म्हणाले.

गायब झालेल्या दहशतवाद्यांचा शोध लागत नव्हता. थोडं थांबून आम्ही पुन्हा नव्यानं संपूर्ण बेटाचा शोध घ्यायला सुरवात केली. मी माझ्या तुकडीबरोबर पायी काही मैलांचा फेरफटका मारून आलो; पण काहीच उपयोग झाला नाही. आता संध्याकाळ व्हायला लागली होती. दहशतवाद्यांच्या घरात सापडलेलं सामान आणि शस्त्रं जप्त करून आम्हीही आवरतं घ्यायला सुरवात केली; पण तिथले लोक काहीही माग न ठेवता गडप झाले, म्हणजे गेले तरी कुठे आणि कसे? या प्रश्नाच्या उत्तराशिवायच आम्ही अमृतसरला परतलो.

महिन्याभरानंतर आम्ही भूपिंदर सिंग नावाच्या एका दहशतवाद्याला पकडलं. मंडवर आम्ही ज्या घरावर छापा घातला होता, तिथं हा भूपिंदर सिंगही राहत होता अशी माझी माहिती होती. त्याला माझ्याकडे आणल्यावर मी त्याला ते त्या दिवशी कसे पळून गेले ते विचारलं. दहशतवाद्यांनी मंडवर घरांबरोबर भूमिगत बंकर बांधून ते एकमेकाला जोडले असावेत अशी मला भीती होती. भूपिंदर थोडा हसून म्हणाला : ‘‘साहेब, त्या दिवशी तुम्ही आम्हाला जवळजवळ अडकवलंच होतं; पण तुम्ही आल्यावर आम्ही पाण्याकडे पळालो. तो अख्खा दिवस आम्ही पाण्याखालीच लपून राहिलो. त्या परिसरात गुलाबाशीचं झुडूप सापडते. त्याच्या काड्या पोकळ असतात. त्या तोंडात धरून त्यातून श्वासोछ्वासापुरती हवा घेत आम्ही दिवसभर पाण्याखाली राहिलो. संध्याकाळी तुम्ही सगळे गेल्यानंतर आम्ही बाहेर आलो. सगळा दिवस पाण्याखाली राहिल्यानं नंतर आमच्या सगळ्यांच्या अंगावर पुरळ उठले होते. खूप त्रास झाला त्या इन्फेक्‍शनचा.’’ त्यांच्या हुशारीचं किंवा कदाचित जिवंत रहाण्याच्या प्रयत्नाचं आश्‍चर्य वाटलं. ही घटना मी नंतर रिबेरोसाहेबांना आणि गिलसाहेबांनाही सांगितली. आमच्या सगळ्यांसाठीच तो एक मोठा धडा होता.

आमच्या पुढच्या आढावा बैठकीत मी गिल साहेबांना म्हणालो : ‘‘सर, मंडच्या समस्येवर आपल्याला कायमस्वरूपी तोडगा शोधायलाच हवा. एकुणात आपल्या हाताला काय लागलं याचा विचार करता आपली ही कारवाई आपल्याला थोडी जास्त महागातच पडली, असं मला वाटतं.’’

(संपूर्ण)
(या लेखाचे बौद्धिक संपदा हक्क लेखकाकडे आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com