पोलिस इन्टेरोगेशन : एक कला (एस. एस. विर्क)

s s virk
s s virk

चौकशी करताना मी नेहमी संशयिताची नजर वाचण्याचा प्रयत्न करत असे. बलजित प्रश्नकर्त्याच्या नजरेला नजर देण्याचं टाळत असल्याचं लक्षात आलं. काही वेळा प्रश्न विचारणाऱ्याकडे न पाहताच तो उत्तर द्यायचा, काही वेळा तो व्यवस्थित समोर बघून बोलायचा...

कोणत्याही गंभीर गुन्ह्याचा तपास लावण्यासाठी गुन्ह्याची आणि संशयितांची कसून चौकशी होणं आवश्‍यक असतं आणि अशी चौकशी करणं ही एक कला आहे. मात्र, बऱ्याचदा वरिष्ठ अधिकारी हे अत्यंत महत्त्वाचं काम कनिष्ठांवर सोपवतात असा माझा पोलिस खात्यातला बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे. त्याला अनेक कारणंही आहेत. एकतर अशी चौकशी वेळखाऊ असते, शिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांना कायदा व सुव्यवस्थेचं, मनुष्यबळाचं नियोजन, वाहतुकीचं नियोजन, लोकसंपर्क अशी अनेक व्यवधानं असतात. या सगळ्यात गुन्ह्यांच्या तपासाला पुरेसं प्राधान्य मिळत नाही. एखादं प्रकरण महत्त्वाचंच असेल किंवा कमी वेळात रिझल्ट्‌स द्यायचे असतील तर वरिष्ठ अधिकारी तपासात सहभागी होत असतात. पद्धतशीर तपास म्हणजे गुन्हा उघडकीला आणण्याची जणू गुरुकिल्लीच. लपवलेल्या माहितीचा एकेक पदर कसून तपास करताना उलगडत जातो, संशयित गुन्हेगार गुन्ह्याची कबुली देतो, पुरावे मिळत जातात. ही सगळी प्रक्रिया अनेकदा रंजक असू शकते.

पोलिस खात्यातल्या माझ्या कारकीर्दीच्या सुरवातीपासूनच मला कसून चौकशी करण्याची ही ‘वाईट सवय’ लागली. पोलिस अकादमीतल्या प्रशिक्षणाबरोबरच जिल्हास्तरावर प्रत्यक्ष काम करताना मला सखोल चौकशीचं महत्त्व उमगत गेलं. कसून चौकशी करण्याची किंमत मला खऱ्या अर्थानं कळली ती जळगावात शांताराम भिकू जैन या कुख्यात पाकीटमाराला भेटल्यावर. गुन्हेगार आणि गुन्हेगारी विश्वाचं आपलं ज्ञान किती वरवरचं आणि मर्यादित आहे ते शांतारामला भेटल्यावर माझ्या लक्षात आलं. या सदराच्या अगदी सुरवातीलाच सांगितलेली शांतारामची कहाणी आपल्याला आठवत असेल. (सप्तरंग, ता. १३ आणि २० जानेवारी २०१९). पुढं संधी मिळेल तेव्हा अट्टल गुन्हेगारांशी बोलून गुन्हेगारी जगताबद्दल अधिकाधिक माहिती काढून घेणं हा माझा छंदच बनला. या छंदातून माहितीचं आणि अशी माहिती देणाऱ्या स्रोतांच एक जाळंच विणलं गेलं. कोळी जसं त्याचं जाळं विणत जातो, तसंच हे जाळंही विणत न्यावं लागतं. त्यातून तपासासाठी अनेक मुद्दे मिळत जातात. एखादा अगदी अवघड वाटणारा गुन्हाही उलगडायला त्याचा उपयोग होतो.

माझ्या कारकीर्दीत संशयितांच्या दीर्घ चौकशीचे, चौकशीसाठी रात्र रात्र जागण्याचे अनेक प्रसंग माझ्यावर आले. तासन्‌तास चौकशी करून अनेकदा दिवस उजाडायच्या आत आम्ही गुन्ह्याची उकल करून नंतर दिवसा बाकीचे सोपस्कार पूर्ण केले आहेत. झोप यायची; पण जेवणा-खाणाऐवजी ब्लॅक कॉफीवर रात्र काढून आम्ही तपास पुरा करायचो. अशी एखादी रात्र जागून काढल्यावर गुन्ह्याचा तपास लागल्याचा आनंद वाटायचाच; पण त्याहीपेक्षा गुन्हेगारावर मात केल्याचं समाधान जास्त असायचं. खात्यातल्या सुरवातीच्या दिवसांमध्ये असं रात्री जागून मी अनेक जटील प्रकरणांचा तपास लावण्यात यशस्वी झालो होतो.

चौकशीच्या या प्रक्रियेत आवर्जून कराव्यात आणि अजिबात करू नयेत अशा अनेक बाबी आहेत. या ‘डूज्‌’ आणि ‘डोन्ट्‌स’च्या तपशिलांमध्ये मी आत्ता जात नाही. काही प्रकरणं अशी आहेत जिथं दिशा सापडत नाही म्हणून तपास बंद करण्यात आला होता. मी ती प्रकरणं उलगडली. अशा एक-दोन कहाण्या मी आपल्याला सांगेनच. अत्यंत सावध चित्तानं, संयमानं आणि पूर्णपणे लक्ष केंद्रित करून विचारपूस करावी लागते. संशयिताला त्याची बाजू सांगायला प्रवृत्त करणं हे सर्वात चांगलं. पोलिस अधिकाऱ्याला मग त्यातले कच्चे दुवे शोधता येतात. एका संशयिताचं म्हणणं दुसऱ्या संशयिताच्या म्हणण्याशी किंवा साक्षीदारांच्या जबाबाशी ताडून पाहता येतं. त्यातून तपासासाठी आणखी काही मुद्दे मिळून जातात, तपासालाही दिशा मिळू शकते; पण तरीही अनेक पोलिस अधिकारी महत्त्वाच्या कामांच्या रेट्यामुळे गुन्हेगारांच्या चौकशीसाठी फार वेळ देऊ शकत नाहीत, हे सत्य राहतंच.
ही गोष्ट घडली त्या काळात पंजाबमध्ये स्थिती खूपच खराब होती. दहशतवाद्यांची चौकशी करणारा अधिकारीच दहशतवाद्यांचं लक्ष्य होत असे. सुरवातीला ज्या अधिकाऱ्यांनी काही कडव्या दहशतवाद्यांची कसून चौकशी करून गुन्हे उघडकीस आणले त्यांच्या हत्या झाल्यानं एक भीती निर्माण झाली होती. कसून चौकशी करूनही, सर्व प्रकारची दबावतंत्रं वापरूनही दहशतवादी बधत नाहीत, त्यांच्याकडून माहिती मिळत नाही असं कनिष्ठांकडून वरिष्ठांना सांगितलं जात असे. ऑगस्ट १९८४ मध्ये जालंधरला वरिष्ठ पोलिस अधीक्षक म्हणून रुजू झाल्यावर मलाही या परिस्थितीचा अनुभव आला.

दुर्दैवानं, त्या काळात पंजाबमध्ये एखादा अधिकारी किती जोरात शिवीगाळ करतो यावर त्याची कार्यक्षमता आणि व्यावसायिकता जोखली जात असे. (गेल्या तीन दशकांत मात्र या परिस्थितीत बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे). पंजाबमधल्या माझ्या पहिल्या महिन्याभरात मी आरडाओरडा केला नाही किंवा शिव्या दिल्या नाहीत असं लक्षात आल्यानंतर ‘कुणावरही न ओरडणारा ‘सॉफ्ट’ अधिकारी’ असा शिक्का माझ्यावर बसला; पण मी अधिकाऱ्यांना त्यांच्या त्यांच्या भागांमध्ये गस्त वाढवायला सांगितलं होतं, दहशतवादी कारवायांवर वचक ठेवण्याविषयी सूचना दिल्या होत्या. मी स्वतः पेट्रोलिंगदरम्यान किंवा इतर कामांदरम्यान त्या चेक करत असे. ‘ऑपरेशनल प्लॅन’प्रमाणे त्यांच्या हालचाली होतील याकडे लक्ष दिल्यानं आम्हाला काही चांगले रिझल्ट्‌सही मिळाले.

दहशतवाद्यांनी केलेल्या हत्यांच्या तपासासाठी मी काही पथकं स्थापन केली होती. ‘हव्या असलेल्या’ संशयितांच्या मागावर ही पथकं होती. आमच्या अधिकाऱ्यांच्या मनातल्या भीतीची मला कल्पना होती; पण त्यांच्याकडूनच चांगली कामगिरी करून घ्यायची होती. मी अधिकाऱ्यांना दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणांवर, घरांवर छापे घालण्यास प्रोत्साहित केलं. दहशतवाद्यांपैकी अनेकांचं स्वतःच्या घरीही नियमित येणं-जाणं असायचं, त्यांना कोणत्याच यंत्रणेची भीती राहिली नव्हती याची मला कल्पना होती. अशा परिस्थितीत कोणता अधिकारी जीव धोक्‍यात घालेल? यावर मात करण्यासाठी मी दहशतवाद्यांच्या घरांच्या आसपास खबऱ्यांचं जाळं विणायला सुरवात केली. एक दिवस ऑफिसमध्ये असताना एका खबऱ्यानं मला फोन करून बराच काळ लपून राहिलेला बलजितसिंग हा जालंधरमधल्या घरी आल्याची ‘बातमी’ दिली. बलजितसिंगच्या घराला मागूनही एक दार आहे, तिथून तो निसटून जाऊ शकतो अशीही माहिती माझ्या त्या खबऱ्यानं मला दिली होती.

मिळालेल्या माहितीवर काम केल्यानंतर मी साध्या वेशातल्या पोलिसांच्या एका टीमला घराच्या मागच्या बाजूवर लक्ष ठेवायला सांगितलं. एक एसपी, एक डीएसपी आणि काही लोक घेऊन मी पुढच्या दारानं गेलो. अपेक्षेप्रमाणे बलजितनं मागच्या दारातून पळण्याचा प्रयत्न केला आणि तो अलगद आमच्या टीमच्या हाती लागला. टीमशी झटापट करत बलजितनं त्यांना खूप धमक्‍या दिल्या; पण त्याच्या धमक्‍यांना भीक न घालता, बळाचा कमीत कमी वापर करून त्याला ताब्यात घेण्याच्या सूचना मी टीमला दिल्या होत्या. खुनाच्या एका प्रकरणात हवा असणारा बलजित दोन वर्षं कायद्याला हुलकावण्या देत होता. आणखी दोन खुनांमध्ये त्याचा हात असावा असा आम्हाला संशय होता. ज्या पद्धतीनं आम्ही त्याला ताब्यात घेतलं होतं त्यामुळे त्याचा प्रतिकार संपून तो एकदम मऊ पडला होता. पंजाब पोलिसांच्या मनातली दहशतवाद्यांची भीती एकाएकी संपून ते इतके कसे आक्रमक झाले, असा प्रश्‍न कदाचित त्याला पडला असावा.

बलजितच्या प्रकरणांचा तपास जिल्हा पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे असल्यानं त्यांनी त्याला अटक केली. चौकशीसाठी त्याला चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश होता. तपासाचा आढावा घेण्यासाठी मी दुसऱ्या दिवशी गुन्हे शाखेत गेलो त्या वेळी दोन उपनिरीक्षक बलजितकडे चौकशी करत होते. आणखी काही वेळानं डीएसपी आणि एक निरीक्षकही तिथं आले. ‘‘सर, आम्ही त्याची कसून चौकशी केली; पण अजून तरी आम्हाला त्याच्याविरुद्ध ठोस पुरावे मिळालेले नाहीत,’’ ते म्हणाले.
मी बलजितशी बोललो तेव्हा त्यानं, ‘मी निरपराध आहे आणि पोलिस मागं लागल्यानं लपून राहणं भाग पडलं,’ असं सांगितलं. बरेच स्थानिक नगरसेवक त्याला ओळखत होते आणि तो निर्दोष असल्याची ग्वाही ते देऊ शकतील, असंही तो सांगत होता. त्याच्या डोळ्यात पाहिल्यावर मला त्याच्या नजरेत लबाडी जाणवली. चौकशी करताना मी नेहमी संशयिताची नजर वाचण्याचा प्रयत्न करत असे. बलजित प्रश्नकर्त्याच्या नजरेला नजर देण्याचं टाळत असे. काही वेळा प्रश्न विचारणाऱ्याकडे न पाहताच तो उत्तर द्यायचा, काही वेळा तो व्यवस्थित समोर बघून बोलायचा. ‘‘मीपण उद्या त्याच्याशी बोलेन,’’ असं सांगून मी तपास अधिकाऱ्यांना त्याच्यावर आणखी दबाव आणून खरं काय ते शोधण्याविषयी सूचना दिल्या. मी येईन तेव्हा एक मोठा दोरखंड आणि काही काठ्यांचीही व्यवस्था करण्याच्या सूचना मी दिल्या.

दुसऱ्या दिवशी महासंचालकांचा दौरा असल्यानं सकाळी मला जमलं नाही; पण बलजितच्या डोळ्यांत बघितल्यानंतर तो काहीतरी लपवतो आहे, असं मला माझ्या अनुभवावरून वाटत होतं. मात्र, शांतपणे समोर बसून मला त्याला प्रश्न विचारावे लागणार होते. मी जेव्हा जेव्हा गुन्हे शाखेत जात असे तेव्हा तेव्हा बलजितला माझ्यासमोर उचलून आणलं जायचं, जणू काही तपास अधिकाऱ्यांनी त्याचा खूप छळ केलाय. तपास अधिकारीही, आपण सगळे मार्ग वापरतो आहोत, असं दाखवायचा प्रयत्न करायचे; पण त्यात मला काही तथ्य वाटत नव्हतं. प्रत्यक्षात फार काही न करता, खूप काही केल्याचं दाखवलं जात होतं.

महासंचालकांचा दौरा आटोपल्यावर मी गुन्हे शाखेत गेलो. तिथं नेहमीचेच सगळं नाटक पुन्हा पार पडलं; संशयिताला चालता येत नसल्यानं दोन पोलिसांना उचलून आणलं वगैरे. मी जवळपास पंधरा मिनिटं त्याच्याशी बोललो; पण ‘मी निर्दोष आहे’ यापलीकडे जायला बलजित तयार नव्हता. खुराणा नावाच्या एका राजकीय कार्यकर्त्याच्या मुलाच्या खुनाबद्दल मी त्याला विचारत होतो. जिथं खून झाला तिथं जात असताना त्याला काही जणांनी पाहिलं होतं. नंतर त्याला स्कूटरवरून पळून जाताना पाहणारेही लोक होते. त्याच्या कपड्यांचा, फेट्याचा आणि स्कूटरचा रंग आणि इतर वर्णनही त्या साक्षीदारांकडून मिळालं होतं आणि ते सगळे त्यांच्या म्हणण्यावर ठाम होते.

तपासाच्या काही युक्‍त्या क्वचितच अपयशी ठरतात. मी संशयितांना मारहाण करण्याच्या किंवा थर्ड डिग्री वापरण्याच्या बाजूचा नाही; पण एखादी धमकीही पुरेशी असते. मी बलजितवर मानसिक दबाव आणण्याच्या प्रयत्नात होतो. ‘‘ बलजित, मी तुला शेवटची संधी देतो. तू खरं काय ते सांगितलं नाहीस तर मला फोर्स वापरावा लागेल. कारण, तुझं वागणंही संशयास्पद आहे. दोन वर्षं तू गायब होतास. तुझे इतके कॉन्टॅक्‍ट्‌स आहेत. तू निर्दोष असतास तर त्यांच्या मदतीनं तू पोलिसांना सरेंडर झाला असतास,’’ मी त्याला म्हणालो.

अजूनही तो ‘माझा त्या प्रकरणाशी काहीच संबंध नाही,’ असंच सांगत होता. माझ्यासोबत मदतीसाठी काही जवान होते. बाकीच्यांना मी बाहेर जायला सांगितलं होतं. बलजितवर ‘रोप ट्रिक’चा प्रयोग करायचं ठरवून मी त्याला एकामागोमाग एक प्रश्न विचारत होतो. एकदम मी म्हणालो : ‘‘खून तुम्हीच केलात अशी माझी खात्री आहे. कारण, आमच्याकडे एक साक्षीदार आहे. तो हे तुमच्यासमोरही सांगायला तयार आहे.’’ यावर बलजित गोंधळल्यासारखा दिसला. त्याचे हात थरथरत होते. मी दोन जवानांना त्याचे हात मागं बांधायला सांगितलं. नगरसेवक खुराणांच्या मुलाचा मसंद चौकाजवळ खून केल्याचं त्यानं स्वतःच कुणाला तरी सांगितल्याचं आम्हाला माहीत असल्याचं मी त्याला पुन्हा सांगितलं. ‘‘साहेब, म्हणजे माझ्या त्या चुलतभावाच्या, हीरासिंगच्या, पोटात काही राहिलं नाही तर! त्यानं तुम्हाला सांगून टाकलं. मी बघून घेईन त्याच्याकडं.’’ तो एकदम बोलून गेला.

‘‘मला कुणी काय सांगितलं ते महत्त्वाचं नाही. मुद्दा तू काय केलंस याचा आहे. तूच ते सांगितल्यानं आता लपवण्यात काही अर्थ नाही,’’ मी म्हणालो.
मग त्यानं मला सगळं सांगितलं. ‘ऑपरेशन ब्लू स्टार’च्या वेळी खुराणांच्या मुलानं मिठाई वाटली होती म्हणून त्याचा खून केल्याची कबुली बलजितनं दिली. गुन्ह्यात वापरलेल्या पिस्तुलाबद्दलही त्यानं माहिती दिली. शहरात गोंधळाचं वातावरण असताना खुराणांचा मुलगा सायकलवरून जाताना दिसल्यावर त्यानं त्याच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. ‘‘नंतर मी हीरासिंगच्या घरी जाऊन त्याला सगळं सांगितलं. पिस्तूलही त्याच्याकडे ठेवायला दिलं,’’ बलजित म्हणाला.

आम्ही लगेचच हीरासिंगला ताब्यात घेऊन ते पिस्तूल मिळवलं. त्याच्याकडून आम्हाला तेजासिंग आणि अमीरसिंग अशा आणखी दोन साथी गुन्हेगारांची नावं समजली. त्यांनीही हीरासिंगसारखीच माहिती दिली. आधीच्या दोन खुनांमध्येही त्यांचा हात असल्याची त्यांनी कबुली दिली. एका दहशतवादी हल्ल्यात वापरलेली स्टेनगन आणि आणखी एक रायफलही त्यांच्याकडून आम्ही जप्त केली. न थकता अखंड चौकशी, छापे, पुन्हा चौकशी यातून चोवीस तासांत आम्ही तीन गुन्ह्यांची उकल केली होती.
अशा प्रकारच्या चौकशीच्या पहिल्याच अनुभवात जे हाती लागलं त्यामुळे गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांना आश्‍चर्य वाटत होतं. बलजितचा छळ झाल्याची कथाही बनावट असल्याचं एव्हाना स्पष्ट झालं होतं.

ही सगळी प्रकरणं जुनी असल्यानं बलजित आणि इतर दोघांनाही काही महिन्यांनी जामीन मिळाला. नंतर ते पुन्हा दहशतवाद्यांना सामील झाले. पुढं ते तिघंही वेगवेगळ्या पोलिस कारवायांमध्ये मारले गेले. मी त्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत होतो.

(या घटनेतल्या व्यक्तींची आणि स्थळांची नावं बदलण्यात आलेली आहेत.)
(या लेखाचे बौद्धिक संपदा हक्क लेखकाकडे आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com