पोलिस इन्टेरोगेशन : एक कला - II (एस. एस. विर्क)

s s virk
s s virk

‘‘तुझ्या हातावरचा डाग बघितल्यावरच मला संशय आला होता; पण तूच तुझ्याबद्दल सगळी माहिती मला सांगावीस असं मला वाटत होतं. तुझ्यावर दबाव आणायला तूच भाग पाडलंस मला,’’ मी म्हणालो.

पंजाबमधल्या दहशतवाद्यांची चौकशी करणं हे इतर गुन्हेगारांच्या चौकशीच्या तुलनेनं बऱ्याचदा अवघड असायचं. कारण, अनेकदा त्यात गंभीर स्वरूपाचे धोके असायचे, जोखीम घ्यावी लागायची. अटकेत असलेल्या आपल्या गटाच्या दहशतवाद्यांकडून पोलिसांना काय माहिती मिळते यावर त्या गटातले दहशतवादी लक्ष ठेवून असायचे. कोणतीही कसर न ठेवता दहशतवाद्यांची चौकशी करणारे अधिकारीही काही वेळा दहशतवादी गटांचे लक्ष्य होत असत. अनेक चौकशी अधिकारी बॉम्बस्फोटांमध्ये किंवा प्रत्यक्ष हल्ल्यांमध्ये मारले गेले होते. प्रत्येक फोर्समध्ये काही ‘ब्लॅक शिप्स’ असतात. कधी अगदी किरकोळ पैशांसाठी, काही धार्मिक किंवा अन्य पूर्वग्रहांपोटी ते आपल्या व्यावसायिक तत्त्वांशी तडजोड करायलाही मागं-पुढं पाहत नाहीत. पकडलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीचे तपशील बाहेर दहशतवाद्यांना मिळत होते याची मला कल्पना होती. कोणत्याही परिस्थितीत चौकशीचे तपशील बाहेर जाऊ न देण्यासाठी खात्रीलायक यंत्रणा बांधण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत होतो. संबंधित प्रमुख अधिकाऱ्यांनाच किंवा प्रत्यक्ष चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनाच चौकशीविषयी माहिती असायची.

अमृतसरच्या माल मंडी भागात आमचं इन्टेरोगेशन सेंटर होतं. तिथं सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) तुकड्या तैनात केलेल्या असायच्या. एखाद्या कडव्या दहशतवाद्याला अटक केल्यानंतर माल मंडीमध्ये आणलं जायचं. वेगवेगळ्या टीम्स तिथं त्या दहशतवाद्याची कसून चौकशी करत असत. वेळ-काळाचं बंधन न ठेवता ही चौकशी सुरू असायची. चौकशीतून मिळालेली माहिती व्यवस्थितपणे नोंदवून पुढच्या चौकशीसाठी ती त्या त्या जिल्ह्यातल्या पोलिसांकडे वेळेत पोचवण्याची जबाबदारीही चौकशी करणाऱ्या या टीम्सवर असायची. चौकशीची माहिती घेण्यासाठी आणि आवश्‍यकता असल्यास तातडीनं कारवाई करण्याबाबत निर्णय घेता यावेत यासाठी अमृतसरमधले सर्व महत्त्वाचे अधिकारी दिवसातून किमान एकदा माल मंडीतल्या इन्टेरोगेशन सेंटरमध्ये भेटत असत.

कडव्या दहशतवाद्यांच्या चौकशीत वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही सहभाग असायचा. काही वेळा पकडलेले दहशतवादीच चौकशी अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा, धमकावण्याचा प्रयत्न करायचे, माहिती द्यायचे नाहीत. मात्र, त्यांना बळाचा वापर करण्याचा धाक दाखवला, कधी थोडाफार बळाचा वापरही केला आणि मुख्य म्हणजे योग्य प्रकारे प्रश्न विचारत गेलं तर ते वठणीवर यायचे. बऱ्याच वेळा मी स्वतःही अशा चौकश्यांमध्ये सहभागी होत होतो. दिशाभूल झाल्यानं अनेक तरुण मुलं दहशतवाद्यांना सामील झाली होती. पकडले गेल्यावर चौकशी करताना या मुलांशी भावनिक पातळीवर संवाद साधला तर अनेकदा ही मुलं खरी माहिती द्यायची.

सन १९८७ मधली गोष्ट आहे. एका दहशतवादी गटाच्या म्होरक्‍याची चौकशी करत असताना त्यानं मला चांगलाच धक्का दिला होता. ‘‘परदेशातल्या सहानुभूतीदारांकडून कशी मदत मिळते,’’ असं विचारल्यावर तो म्हणाला : ‘‘परदेशातून त्यांना भरपूर पैसा मिळतो.’’ खालिस्तानच्या लढाईत शस्त्रे खरेदी करण्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणावर पैसा मिळत होता. किती पैसा येत होता आणि त्याचा कसा गैरवापर होत होता याची मला कल्पना होती; पण आंतरराष्ट्रीय पातळीवर चालणारी शस्त्रांची अवैध खरेदी-विक्री लक्षात घेता दहशतवाद्यांना मिळणाऱ्या पैशापैकी दहा टक्के जरी शस्त्रखरेदीसाठी वापरले गेले असते तरी ती रक्कम खूप मोठी होती. हा धोका सर्वात मोठा होता. शस्त्रास्त्रांच्या अवैध व्यापाराची व्याप्ती प्रचंड होती. त्या काळात एखादी एके-४७, चार मॅगझिन्स आणि त्याच्या काहीशे गोळ्या अवघ्या दोनशे डॉलरमध्ये मिळायच्या. या परिस्थितीत एकूण मिळालेल्या पैशातले पाचेक हजार डॉलर जरी शस्त्रखरेदीसाठी वापरले गेले तरी त्यातून दहशतवाद्यांना मोठा शस्त्रसाठा मिळवता येत असे. त्याला तोंड देणं हे आमच्या कुवतीबाहेरचं होतं. आम्ही अजूनही दुसऱ्या महायुद्धातल्या .३०३ रायफली, काही थोड्या सेल्फ लोडिंग रायफली आणि प्रत्येक प्लाटूनमागं एक एलएमजी -म्हणजे लाईट मशिनगन अशा सामग्रीनिशी दहशतवाद्यांशी लढत होतो.

‘‘परदेशातले तुमचे शीख सहानुभूतीदार फार धूर्त आहेत,’’ असं मी पकडलेल्या मुलांना नेहमी म्हणायचो.
‘‘तुम्ही लढत रहावं म्हणून ते शस्त्रं पुरवत राहतात; पण या शस्त्रांच्या वापरामुळे मरतं कोण? एखादा नागरिक, पोलिस किंवा एखादा दहशतवादी. हे सगळे इथलेच असतात, पंजाबचे सुपुत्र असतात. परदेशात राहून तुम्हाला मदत करणारे लोक त्यांच्या मुलांना खालिस्तानसाठी लढायला का पाठवत नाहीत?’’ असा प्रश्न विचारल्यावर त्या दहशतवाद्यांचा जोश ओसरून जायचा. परदेशात राहून खालिस्तानचा प्रचार करणाऱ्या लोकांनी आपल्याला फसवल्याची त्यांना जाणीव व्हायची. अशा चर्चांनंतर अनेक सक्रिय दहशतवाद्यांनी तो मार्ग सोडून दिला होता; पण मी मगाशी ज्या दहशतवाद्याबद्दल सांगत होतो त्यानं मला जबरदस्त धक्काच दिला.‘‘साहेब, इथल्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यासाठी ते आता कॅनडातून प्रशिक्षित कमांडो पाठवणार आहेत, असं मी पाकिस्तानात गेलो होतो तेव्हा कॅनडातल्या आमच्या कोऑर्डिनेटरनं मला सांगितलं. ते सगळे कॅनडात सेटल झालेले शीख आहेत.’’ तो म्हणाला.
ही माहिती अतिशय चिंताजनक होती. मी आणखी माहिती मिळवण्याच्या प्रयत्नाला लागलो. पाकिस्तातून प्रशिक्षण घेऊन आलेले काही दहशतवादी माझ्या हाती लागले होते. खालिस्तानच्या लढाईसाठी कॅनडातून काही प्रशिक्षित मर्सिनरीज्‌ -भाडोत्री सैनिक -येणार आहेत, असं ऐकल्याचं त्यांनीही मला सांगितलं. सहा कॅनेडियन्स‌चा एक गट पाकिस्तानात पोचून सध्या आयएसआयबरोबर काम करत आहे, अशीही माहिती मला नंतर काही आठवड्यांनी मिळाली. आपण पाकिस्तानातल्या एका प्रशिक्षणतळावर त्या सहाही जणांना भेटल्याचं एकानं मला चौकशीत सांगितलं. त्यातल्या दोघांनी अत्यंत उत्तम प्रशिक्षण घेतलं आहे, असंही तो म्हणाला.
अमेरिकी स्पेशल फोर्समधून निवृत्त झालेल्या कॅम्पर नावाच्या एक इसमानं मर्सिनरीज्‌साठी प्रशिक्षणकेंद्र उघडल्याचीही माहिती मला मिळाली होती. या कॅम्परनं तयार केलेले भाडोत्री सैनिक नंतर जगभरातल्या वेगवेगळ्या दहशतवादी गटांना सामील होत असत. याचा अर्थ या कॅम्परचे दोन लोक आणखी चौघांना घेऊन पाकिस्तानात पोचले होते आणि आता ते भारतात घुसण्याच्या तयारीत होते.
आम्ही त्या सहाही जणांची शक्‍य तेवढी माहिती गोळा केली. त्यांची शारीरिक ठेवण, उंची, चेहरेपट्टी, बोलण्या-चालण्याच्या सवयी, त्यांची ओळख पटवू शकतील अशा अंगावरच्या खुणा वगैरे. त्या सहाजणांपैकी एकाच्या उजव्या हातावर एक मोठा काळा डाग होता. कॅम्परकडून प्रशिक्षण घेतलेल्या दोघांवर आम्ही लक्ष केंद्रित केलं होतं. असे प्रशिक्षित मर्सिनरीज्‌ पंजाबमधल्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याची शक्‍यता लक्षात घेऊन आम्हाला अत्यंत दक्षता बाळगावी लागणार होती.

पण पंजाबमधल्या हिंसाचाराच्या आणि दहशतवादविरोधी कारवायांच्या बातम्या आता नेहमीच्याच झाल्या होत्या. काळ पुढं सरकतच होता.
एक दिवस मी जालंधरमध्ये असताना, ‘काही दहशतवाद्यांना चौकशीसाठी माल मंडीत आणल्यानं तुम्ही तिथं पोचावं’ असा निरोप मला मिळाला. मी लगेचच निघालो. गुरुदासपूरच्या पोलिसांनी तीनजणांना पकडलं होतं. त्यांच्या खबऱ्याच्या माहितीनुसार, ते तिघंही अत्यंत महत्त्वाचे लोक होते. त्यांच्या चौकशीतून काहीच हाती न लागल्यानं तिथल्या वरिष्ठ अधीक्षकांनी आतापर्यंतच्या तपासाच्या नोंदींसह त्यांना अमृतसरच्या चौकशी अधिकाऱ्यांच्या हवाली केलं होतं. माल मंडीत त्यांची पूर्ण एक दिवस चौकशी केल्यावरही फार काही माहिती मिळाली नव्हती. मी पोचलो तेव्हा अमृतसरचे वरिष्ठ अधीक्षक आणि इतर काही अधिकारी त्या तिघांना वेगवेगळ्या ठिकाणी बसवून त्यांची चौकशी करत होते. एकाचं उत्तर दुसऱ्याला कळू नये म्हणून त्यांची वेगवेगळी चौकशी होत होती. मी एका ठिकाणी बसून त्यांची प्रश्नोत्तरं ऐकत होतो. त्या तिघांनीही कुर्ता, पायजमा असे ग्रामीण ढंगाचे कपडे घातले होते. पंजाबच्या ग्रामीण भागात हा पेहराव सर्रास दिसून येतो. आमच्या खबऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, त्यातला एक जण त्यांचा म्होरक्‍या होता; पण त्या तिघांपैकी कुणीही अजून फार काही माहिती दिली नव्हती. हा जो म्होरक्‍या होता त्याची नजर चंचल असल्याचं मला प्रश्‍नोत्तरं ऐकताना जाणवलं. प्रश्नांना उत्तरं देताना तो समोरच्या माणसाकडं न पाहता उत्तरं देत होता. अशा लोकांकडे मी नेहमी संशयाच्या नजरेनं पाहत असतो.

थोड्या वेळानं आमच्या टीम्स जेवणासाठी उठल्या.
‘‘ माझं जेवण झालं आहे. मी जरा बोलतो या लोकांबरोबर,’’ मी म्हणालो. मुख्यतः मला त्या चंचल नजरेच्या माणसाशी बोलायचं होतं.
‘‘काही उपयोग नाही सर. आम्ही काल रात्री भरपूर वेळ घालवलाय. आताही आम्ही परत त्याची चौकशी केली. त्याच्याकडून काही मिळेल असं मला वाटत नाही; पण आज पकडलेल्या दोघांकडे तुम्ही चौकशी करा,’’ वरिष्ठ अधीक्षक म्हणाले.
‘‘तुम्ही त्या म्होरक्‍याला प्रश्न विचारताना मी पाहत होतो. तो काहीही बोलत असला तरी त्याची नजर काही वेगळंच सांगत होती. तो काहीतरी लपवतोय असा मला संशय आहे. आता मी जरा त्याच्यावर वेळ घालवतो,’’ मी म्हणालो.
वरिष्ठ अधीक्षक काही म्हणाले नाहीत; पण त्या ‘संशयिताची नजर काही तरी वेगळं सांगत होती’ वगैरेवर त्यांचा काही फारसा विश्वास बसला नव्हता असं मला वाटलं.
ते जेवायला गेल्यावर मी त्या तथाकथित म्होरक्‍याला माझ्यासमोर आणायला सांगितलं. कुलदीप शर्मा नावाचे सीआरपीएफचे एक डेप्युटी कमांडन्टही तिथंच होते. ऑपरेशन्ससाठी एकदम पक्का अधिकारी. मी त्यांनाही बाकीच्यांबरोबर जेवायला जायला सांगितलं; पण त्यांना माझ्याबरोबर थांबायचं होतं.
‘‘सर, मी पाहत होतो, तुम्ही शांतपणे त्या संशयितांचं निरीक्षण करत होतात. माझं थोडं खाणं झालंय. आता मी लगेच जेवायला नाही गेलो तरी चालेल. आज काहीतरी मोठं घडणार आहे असं मला वाटतंय. कदाचित तुम्हाला माझी मदत लागेल,’’ ते म्हणाले.

‘‘कुलदीप, उगाच उपाशी राहू नका. जेवण करा आणि मग या,’’ मी त्यांना सांगायचा प्रयत्न केला; पण माझं काहीच न ऐकता ते तिथंच बसून राहिले.
मी त्या म्होरक्‍याला आतले कपडे सोडून त्याचे बाकी सगळे कपडे काढायला सांगितलं. मी त्याचं निरीक्षण करत होतो. उंची बेताची, वर्ण गव्हाळ, ठसठशीत चेहरा, सडपातळ; पण व्यायामाची अंगकाठी अशी त्याची वैशिष्ट्यं माझ्या लक्षात आली. मी त्याचे हात आणि बोटं पाहिली. त्याच्या उजव्या अंगठ्यावर एक ठळक काळा डाग होता. हातावर असा काळा डाग असणाऱ्या व्यक्तीबद्दल मी ऐकलं होतं; पण तूर्त मी त्याबद्दल काहीच बोलायचं नाही असं ठरवलं. त्याचा ठावठिकाणा विचारल्यावर त्यानी गुरुदासपूरमधल्या एका गावाचं नाव सांगितलं. त्याच्या आई-वडिलांबद्दल त्यानं दिलेली माहितीची शहानिशा करण्यासाठी आम्ही संबंधित पोलिस ठाण्यांशी संपर्क साधला होता. त्या नावांची माणसं आणि त्यानं दिलेले त्यांचे पत्ते अस्तित्वात नाहीत, हे आम्ही लगेचच शोधून काढलं. त्याच्या समोर मी कुलदीप शर्मांशी इंग्लिशमध्ये बोलायला सुरवात केली. मी त्या संशयिताची प्रतिक्रिया पाहत होतो. आम्ही काय बोलतोय ते त्याला समजत होतं असं दिसत होतं. विचारलेल्या सगळ्या प्रश्नांना त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली होती. त्यानं दिलेली नावं आणि पत्ते खोटे आहेत हे समजल्यावर मात्र आता थोडं कडक व्हावं लागेल असं मला वाटू लागलं.
तीन दिवस तो आमच्या ताब्यात होता. वेळ जात असल्यानं आमची पुढची कारवाई थंडावल्यासारखी झाली होती. त्याचे इतर साथीदार त्यांचा तळ, शस्त्रं वगैरे हलवून दुसरीकडे नेण्याची शक्‍यता होती. तो जर खरंच दहशतवाद्यांच्या वर्तुळातला महत्त्वाचा माणूस असेल तर त्याच्याकडून लवकरात लवकर माहिती मिळवणं आवश्‍यक होतं. मी त्याला थेटच प्रश्न विचारायचं ठरवलं; पण त्याची उत्तरं तीच होती. त्याच्या गटाबद्दल, त्याच्या सहकाऱ्यांबद्दल विचारल्यावर त्यानं त्याचा कुठल्याही दहशतवादी गटाशी संबंध असल्याचं साफ नाकारलं. त्यानं आई-वडिलांबद्दल आणि इतर गोष्टींबद्दल दिलेली माहिती खोटी होती, तरीही त्याच्या उत्तरांत काही फरक पडला नव्हता. ‘आपला कशाशीच संबंध नाही’ एवढंच तो सांगत राहिला.
पकडले गेल्यास पोलिसांची दिशाभूल कशी करायची याबाबत आयएसआयनं त्यांना विशेष प्रशिक्षण दिल्याचं मी ऐकलं होतं. गरीब शेतकरी असल्याची बतावणी करत राहणं हा त्याच युक्‍त्यांचा एक भाग होता. आता मात्र तातडीनं काहीतरी करावं लागणार होतं.

‘पुढची दहा मिनिटं तोंडातून अवाक्षरही काढायचं नाही’, अशी तंबी मी त्याला दिली. ‘मी जर खऱ्या अर्थानं पोलिस अधिकारी असेन तर पुढच्या दहा मिनिटांत तू मला सगळी खरी माहिती देशील,’ असं म्हणत मी हातातलं घड्याळ काढलं. हे चौकशीचं एक थोडं गुंतागुंतीचं तंत्र होतं. अगदी कधीतरी ‘रेअरेस्ट ऑफ द रेअर’ प्रकरणांतच मी ते वापरत असे. मी घड्याळ काढून हातात घेतलं आणि ‘आता दहा मिनिटं तू काही बोलायचं नाहीस,’ असं सांगत माझा प्रयोग मी सुरू केला.
हातातल्या घड्याळाकडे बघत मी शांतपणे बसून होतो. अचानक त्यानं ओरडायला सुरवात केली.
‘‘मी सगळं सांगायला तयार आहे. कृपा करा, नीट विचारा मला, मी सगळं सांगतो,’’ तो ओरडतच म्हणाला.
हे होईपर्यंत माझ्या दहा मिनिटांतली फक्त अडीच मिनिटं झाली होती.
‘‘आधी मला तुझी आणि तुझ्या गटाची माहिती सांग,’’ मी म्हणालो. आता तो बोलायला लागला होता.
‘‘सर, मी सुरिंदरसिंग कॅनडियन. आम्ही सहाजण या चळवळीत सामील होण्यासाठी कॅनडातून आलो आहोत. मी खालिस्तान कमांडो फोर्ससाठी काम करतो. मी तुम्हाला सगळं सांगतो; पण माझ्यावरचं हे प्रेशर कमी करा. मला हा दबाव सहन होत नाहीये.’’
‘‘तुझ्या हातावरचा डाग बघितल्यावरच मला संशय आला होता; पण तूच तुझ्याबद्दल सगळी माहिती मला सांगावीस असं मला वाटत होतं. तुझ्यावर दबाव आणायला तूच भाग पाडलंस मला,’’ मी म्हणालो.
मी त्याला स्टूलवर बसून बोलायला सांगितलं.

सुरिंदरसिंग कॅनडियनचे आई-वडील साठच्या दशकात कॅनडात जाऊन स्थायिक झाले होते. इतर बऱ्याच शीख तरुणांप्रमाणेच तोही दहशतवादी चळवळीमुळे प्रभावित झाला होता. सन १९८४ मध्ये झालेल्या ‘ऑपरेशन ब्लू स्टार’चाही त्याच्यावर परिणाम झाला होता. त्यानं काही मित्रांबरोबर भारतात येऊन खालिस्तानी चळवळीत सामील होण्याचं ठरवलं. त्याच्या बरोबरच्या दोघांनी कॅम्परच्या ब्रिटिश कोलम्बियातल्या दहशतवादी प्रशिक्षण तळावर प्रशिक्षण घेतलं होतं. सुरिंदरसिंग बाकीच्या पाच जणांसह पाकिस्तानात आला. तिथं आयएसआयनं त्यांना दहशतवादी लढाईचे, शस्त्रास्त्रं आणि स्फोटकं वापरण्याचे प्रशिक्षण दिलं होतं.
दहशतवाद्यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील वावर समजून घेण्यासाठी सुरिंदरसिंग आमच्यासाठी फारच महत्त्वाचा माणूस होता.
‘‘तू आम्हाला तुझे साथीदार आणि शस्त्रं कुठं आहेत ते दाखवणार का?’’ मी त्याला विचारलं.
‘‘सर, माझ्या साथीदारांनी आतापर्यंत जागा बदलली असेल; पण आम्हाला मिळालेली शस्त्रं आम्ही जिथं ठेवली आहेत तिथं मी तुम्हाला घेऊन जाऊ शकेन,’’ तो म्हणाला.
‘‘तिथं छापा घातला तर काहीतरी हाती लागेल याची खात्री आहे तुला?’’ मी त्याला पुन्हा विचारलं. होकारार्थी उत्तर देत त्यानं मला आमच्या लोकांना वेळ न घालवता तिकडे पाठवण्यास सांगितलं.
(क्रमशः)

(या घटनेतल्या काही व्यक्तींची आणि स्थळांची नावं बदलण्यात आलेली आहेत.)
(या लेखाचे बौद्धिक संपदा हक्क लेखकाकडे आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com