पोलिस इन्टेरोगेशन : एक कला - III (एस.एस. विर्क)

s s virk
s s virk

पकडलेला शस्त्रसाठा आणि दारूगोळा ठेवण्यासाठी आम्ही आधीच मोठी जागा रिकामी करून ठेवली होती. टीमनं एकेक करून शस्त्रं उतरवण्यास सुरवात केली. नोंदी करून त्यांच्या याद्या करायच्या होत्या. त्यातली अनेक शस्त्रं आम्हालाही नवीन होती, आधी आम्ही तशी शस्त्रं कधीच पाहिली नव्हती.

सुरिंदरसिंग कॅनेडियन याच्यासारखा कडवा दहशतवादी इतक्‍या सहज माहिती द्यायला तयार झाला याचं मला आश्र्चर्यच वाटत होतं. त्याला एकदा ताळ्यावर आणल्यानंतर मग मात्र तो स्वतःहून मोकळेपणाने बोलू लागला, माहिती देऊ लागला. त्याला त्रास देण्याची, मारहाण करण्याची माझी इच्छा नव्हती; पण तो काहीच सांगायला, कबूल करायला तयार नसल्यानं त्याच्यावर मानसिक व शारीरिक दबाव टाकण्याखेरीज माझ्याकडे दुसरा काही उपाय नव्हता, असं मी त्याला सांगितलं.
आता मला सुरिंदरनं दिलेल्या माहितीनुसार छापा घालण्यासाठी एका टीमची जुळवाजुळव करायची होती. जेवायला न जाता माझ्याबरोबर थांबलेले कुलदीप शर्मा तिथंच होते. त्यांनी त्यांची टीम घेऊन छापा घालण्याची तयारी दाखवली.
‘‘कुलदीप आपल्या हाताशी वेळ कमी आहे. तुमची बटालियन इथून पाच किलोमीटरवर आहे. आपण आत्ता ४९ व्या बटालियनच्या तळावर आहोत. ते पटकन तयारी करू शकतात,’’ मी कुलदीपना म्हणालो.

‘‘सर तुम्ही दोन्ही बटालियनना आदेश द्या, जी लवकर येईल ती टीम तुम्ही पाठवून द्या,’’ कुलदीप यांनी मधला मार्ग सुचवला. त्याला माझी ना नव्हती.
आश्चर्य म्हणजे पाच किलोमीटर लांब असूनही कुलदीप यांची टीम आधी पोचली.
‘‘सर, आपल्याला आज काहीतरी मोठं घबाड मिळणार असं मला वाटतंय,’’ टीमबरोबर विजयी मुद्रेनं बाहेर पडताना कुलदीप म्हणाले. सुरिंदरला त्यांनी गाडीत आपल्या बरोबरच ठेवलं होतं. आता त्याच्याही वागण्यात बराच मोकळेपणा आला होता.
‘‘सर, मी तिथून फोन करतो तुम्हाला,’’ असं सांगून कुलदीप पट्टीच्या दिशेनं रवाना झाले. त्यांना जवळपास ८० किलोमीटरचा प्रवास करायचा होता.
दहशतवाद्यांच्या आंतरराष्ट्रीय हालचाली हा माझ्यासाठी चिंतेचा नवा विषय होता. चळवळीसाठी पैसा पुरवणं ही एक बाजू होती; पण शिकले-सवरलेले आणि दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेतलेले तरुण बाहेरून येऊन खालिस्तानच्या चळवळीत सामील होणार असतील तर दहशतवाद्यांची ताकद बऱ्याच प्रमाणात वाढणार होती. भविष्यात दहशतवाद्यांच्या वाढत्या प्रभावाला तोंड देण्यासाठी तयारीत असण्याची गरज मला वाटत होती. त्यासाठी आमची गुप्तचर यंत्रणा अधिक मजबूत करून बाहेरच्या देशांतून दहशतवाद्यांना मिळणाऱ्या मदतीवर लक्ष ठेवणं आवश्‍यक होतं.

मी अशा विचारात असतानाच इन्टेरोगेशन टीम आणखी एका संशयिताला घेऊन आली आणि मी त्याच्या चौकशीला लागलो. जवळजवळ तीन तास मी त्याच्याकडे विचारपूस करत होतो. तितक्‍यात कुलदीप शर्मांच्या टीमला ‘शस्त्रं आणि दारूगोळ्याचा प्रचंड साठा’ मिळाल्याचा मेसेज आल्याचं वायरलेस ऑपरेटरनं मला कळवलं. कुलदीप यांना फोन लावावा असं मी वायरलेस ऑपरेटरना सांगितलं. अत्यंत आधुनिक शस्त्रांचा मोठा साठा सापडल्याचं कुलदीप यांनी फोनवर सांगितलं.
‘‘सर, यातली बरीचशी वेपन्स‌ मी कधी पाहिलेलीही नाहीत. ही लष्कराच्या वापरातली शस्त्रं दिसताहेत. तुम्ही लगेच पट्टीला या, सर,’’ कुलदीप म्हणाले.
मी कुलदीप आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन केलं. आता अंधार पडला होता. एवढ्या लांब जाऊन काहीच साधणार नव्हतं.
‘‘तो सगळा शस्त्रसाठा घेऊन तुम्हीच लवकरात लवकर इकडे या,’’ असं मी त्यांना सांगितलं. गरज पडली तर मदतीसाठी म्हणून मी आधीच ४९ व्या बटालियनची टीमही पट्टीकडे पाठवून दिली होती. आता तो शस्त्रसाठा हलवण्यासाठी त्यांच्याकडे पुरेशी वाहनं आणि मनुष्यबळही होतं.

मी डीजीपी ज्युलिओ रिबेरोसाहेबांना आणि माझे आयजी केपीएस गिलसाहेबांना फोन करून शस्त्रसाठा पकडल्याची माहिती दिली. दोघांनीही या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला आणि पकडलेली शस्त्रं पाहिल्यानंतर त्या शस्त्रांचे तपशील कळवण्यास सांगितलं. रात्री आठ वाजण्याच्या सुमाराला कुलदीप शर्मा आणि त्यांच्या टीम्स मालमंडीत परतल्या. पकडलेला शस्त्रसाठा आणि दारूगोळा ठेवण्यासाठी आम्ही आधीच मोठी जागा रिकामी करून ठेवली होती. टीमनं एकेक करून शस्त्रं उतरवण्यास सुरवात केली. नोंदी करून त्यांच्या याद्या करायच्या होत्या. त्यातली अनेक शस्त्रं आम्हालाही नवीन होती, आधी आम्ही तशी शस्त्रं कधीच पाहिली नव्हती. आरपीजी-२ आणि आरपीजी-७ बनावटीचे रॉकेट लाँचर, त्याचे शेल्स्‌, ग्रेनेड लाँचर, मशिनगन्स, एके-४७ रायफली, पिस्तुलं आणि त्यासाठी लागणाऱ्या दारूगोळ्याचा प्रचंड साठा आमच्या हाती लागला होता.
ती शस्त्रं, त्यांचा वापर याबद्दल चौकशी करण्यासाठी मी सुरिंदरसिंगला बोलावून घेतलं. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या आविर्भावात त्यानं आम्हाला प्रत्येक प्रकारच्या शस्त्राबद्दल आणि दारूगोळ्याबद्दल माहिती दिली.
कुलदीप यांनी पेढ्यांचा पुडा आणला होता. सुरिंदरला पेढा दिल्यावर त्यानंही तो खाल्ला. चौकशीत कबूल केल्यानुसार सुरिंदरनं आम्हाला आतापर्यंतचा सर्वांत मोठा शस्त्रसाठा पकडून दिला होता.
नंतर मी कुलदीपकडून छाप्याची माहिती घेतली. सुरिंदरसिंग त्यांना
पट्टीजवळच्या एका फार्महाउसवर घेऊन गेला होता. तिथं त्यांना तो आऊटहाऊसमधल्या भुयारातून जमिनीखालच्या एका बंकरमध्ये घेऊन गेला. तिथं हा सगळा दारूगोळा साठवून ठेवला होता. जमिनीखाली असला तरी त्या बंकरमध्ये पुरेशा प्रकाशाची व्यवस्था केलेली होती. काही लोक थोडे दिवस लपून राहू शकतील एवढ्या सोईही तिथं होत्या. वेळ पडल्यास निसटून जाण्यासाठी गोठ्यातून एक वेगळा रस्ताही केलेला होता. तिथून बाहेर पडून मागच्या बाजूनं शेतातून पळून जाणं सहजशक्‍य होतं.
पत्तीच्या स्थानिक पोलिसांनी फार्महाऊसच्या मालकालाही अटक करून तिथं पहारा लावला होता.

दुसऱ्या दिवशी आम्ही पत्रकार परिषद घेऊन शस्त्रसाठा पकडल्याचं जाहीर केलं. रिबेरोसाहेब आणि गिलसाहेबही आले होते. सुरिंदरसिंगला भेटल्यावर त्यांनाही खालिस्तानची चळवळ आता कोणत्या गंभीर वळणावर उभी आहे याचा अंदाज आला.
सुरिंदरशी आणखी बोलून दहशतवाद्यांचं कॅनडातलं नेटवर्क, इतर कोणत्या देशांमध्ये ते दहशतवादी चळवळीबद्दल प्रसार-प्रचार करत आहेत, तिथले त्यांचे संबंध या सगळ्याविषयी आणखी माहिती घेण्याची गरज असल्याचं मला जाणवलं.
मी पुन्हा सुरिंदरसिंग कॅनेडियनशी बोललो. आता तो अधिक मोकळेपणानं बोलत होता. त्याचा नजरही भिरभिरत नव्हती.
‘‘सर, कॅनडात आम्हाला ब्रेन वॉश करण्यात आले,’’ तो म्हणाला :
‘‘ ‘पंजाबमधल्या सगळ्या शिखांना खालिस्तान हवं आहे. आता फक्त एक शेवटचा धक्का दिला की खालिस्तानचं लक्ष्य साध्य होणार,’ असं आम्हाला वारंवार सांगण्यात येत होतं. तो शेवटचा धक्का देण्यासाठीच आम्ही आलो होतो.’’
मात्र, पाकिस्तानातून भारतात आल्यानंतर परिस्थिती खूप वेगळी असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांच्या मनावर बिंबवलं होतं तसा खालिस्तानच्या मागणीला लोकांचा व्यापक पाठिंबा नसल्याचं त्यांना दिसून आलं. त्यामुळे त्यांची खूप निराशा झाली.
‘‘आम्ही प्रचंड तयारीनिशी आलो होतो, त्यामुळे लगेच परत जाण्याचा आमचा विचार नव्हता,’’ तो म्हणाला.

चळवळ आणि त्यांच्या गटाच्या सदस्यांबाबतही त्यांचा अनुभव चांगला नव्हता. ते धार्मिक नव्हते तर जास्तकरून त्यांचा कल गुन्हेगारीकडे असल्याचं सुरिंदरसिंग आणि त्याच्या साथीदारांच्या लक्षात आलं. ते फार्महाऊसवर दरोडे घालून पैसे लुटायचे, सुपारी घेऊन खून करायचे, ‘फिरौती’साठी अपहरण करायचे; पण तरीही हे सहाजण वेगवेगळ्या दहशतवादी गटांच्या संपर्कात राहिले आणि त्यांना पैसा आणि शस्त्रं मिळवून दिली. पाकिस्तानातून कशा पद्धतीनं या दहशतवाद्यांना त्यांनी पैसा आणि शस्त्रं पोचवली याचेही तपशील सुरिंदरसिंगनं दिले. हे सगळं नेटवर्क उद्‌ध्वस्त करणं आवश्‍यक होतं. पुढं मी ही सगळी माहिती उच्चपदस्थांना दिली. परदेशातल्या तरुण मुलांना भुलवून खालिस्तानच्या चळवळीकडे आकर्षित करणाऱ्या प्रचाराला आळा घालण्यासाठी ही माहिती खूप उपयोगी होती.
कॅनडातून सुरिंदरसिंगबरोबर आलेल्या बाकी पाच जणांचीही माहिती आम्ही मिळवली. पुढच्या दोन-तीन वर्षांत देशाच्या वेगवेगळ्या भागांत त्यांचा माग काढला गेला. त्यातले चारजण मारले गेले आणि एक पकडला गेला.
सुरिंदरसिंगच्या माहितीवरून आणखी काही दहशतवाद्यांना पकडण्याचेही मी प्रयत्न केले; पण एका मर्यादेपलीकडे त्यात मला यश आलं नाही. कारण, तो मुख्यतः खालिस्तान कमांडो फोर्सबरोबरच काम करत असल्याने त्याबाहेर त्याच्याकडं फारशी माहिती नव्हती; पण दहशतवाद्यांच्या आंतरराष्ट्रीय हालचालींबद्दल त्याच्याकडून मिळालेली माहिती महत्त्वाची होती. त्याआधारे दहशतवाद्यांना पैसा आणि शस्त्रं पुरवणारे अनेक रस्ते आम्ही बंद करू शकलो.

नंतर सुरिंदरची रवानगी तुरुंगात झाली. त्याच्यावरचा खटलाही सुरू झाला; पण काही महिन्यांनी तो कोठडीतून पळाला आणि पुन्हा दहशतवाद्यांना सामील झाला. पुन्हा पकडला गेल्यावर त्यानं खोटी कागदपत्रं देऊन जामीन मिळवला. आपल्या देशातल्या एकंदर व्यवस्थेचा बहुधा त्याला फारच चांगला अंदाज आला होता. दहशतवाद्यांना सामील झाल्यानंतर तो पुन्हा सक्रिय झाला. काही वर्षांनी कपूरथळा जिल्ह्यात जीटी रोडवर अकस्मात झालेल्या एका चकमकीत तो मारला गेला. चुकीच्या रस्त्याला लागलेल्या एका हुशार, उमद्या तरुणाच्या कहाणीचा असा शेवट झाला.
(संपूर्ण)

(या घटनेतल्या काही व्यक्तींची आणि स्थळांची नावं बदलण्यात आलेली आहेत.)
(या लेखाचे बौद्धिक संपदा हक्क लेखकाकडे आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com