खडकीतली घरफोडी (एस. एस. विर्क)

एस. एस. विर्क virk1001ss@gmail.com
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

एकूण परिस्थिती पाहिल्यावर चोरटे हे शर्मा पती-पत्नीच्या पाळतीवर असले पाहिजेत असं मला वाटलं. चोरी करताना घरात कुणीही नसणार हे त्यांना माहीत असणार असं स्पष्ट दिसत होतं. चोरट्यांनी जर पाळत ठेवली असेल तर काही तास ते त्या बंगल्याच्या आसपास वावरले असणार आणि त्या परिस्थितीत कुणीतरी त्यांना नक्की पाहिलं असणार असा माझा कयास होता...

एकूण परिस्थिती पाहिल्यावर चोरटे हे शर्मा पती-पत्नीच्या पाळतीवर असले पाहिजेत असं मला वाटलं. चोरी करताना घरात कुणीही नसणार हे त्यांना माहीत असणार असं स्पष्ट दिसत होतं. चोरट्यांनी जर पाळत ठेवली असेल तर काही तास ते त्या बंगल्याच्या आसपास वावरले असणार आणि त्या परिस्थितीत कुणीतरी त्यांना नक्की पाहिलं असणार असा माझा कयास होता...

मी पुण्यात ‘झोन टू’चा पोलिस उपायुक्त असतानाची ही कहाणी आहे. वर्ष होतं १९७९. कंट्रोल रूमकडून सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना रोजच्या रोज विविध गुन्ह्यांचे तपशील दिले जात असतात. एके दिवशी सकाळी कंट्रोल रूमकडून मिळालेल्या माहितीमध्ये इतर काही घटनांबरोबर खडकीतल्या एका लष्करी अधिकाऱ्याच्या घरात झालेल्या घरफोडीविषयी मला सांगण्यात आलं. मेजर आर. एल. शर्मा (नाव बदललं आहे) यांच्या बंगल्यात छताची कौलं काढून चोरटे शिरले होते. आत उतरल्यावर बाजूचं एक दार उघडून त्यांनी घरातल्या मौल्यवान वस्तू चोरल्या होत्या. मेजर शर्मांच्या आयुष्यातला तो दिवस विलक्षणच होता. कारण, त्याच दिवशी ते खडकीच्या ॲम्युनिशन फॅक्‍टरीतून निवृत्त झाले होते. त्यानिमित्तानं त्यांच्या सहकाऱ्यांनी क्‍लबमध्ये त्यांच्यासाठी निरोपसमारंभ आयोजिला होता. मेजरसाहेब पत्नीसह त्या समारंभाला गेले असल्यानं चोरट्यांना रान मोकळं मिळालं होतं. त्या वेळच्या किमतीनुसार, पन्नासेक हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता.

समारंभ संपल्यानंतर क्‍लबमध्येच एक चित्रपट पाहून शर्मा दांपत्य मध्यरात्रीनंतर घरी परतलं. घरातलं सामान अस्ताव्यस्त पडल्याचं पाहिल्यानंतर चोरी झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं होतं. मेजर शर्मांनी पोलिसांशी तत्काळ संपर्क साधल्यानं स्थानिक पोलिसांनी रात्रीच त्यांच्या घरी जाऊन तपासाला सुरवात केली होती.
खडकी माझ्या हद्दीत असल्यानं ‘मीदेखील तातडीनं घटनास्थळी जातो आहे,’ असा निरोप पोलिस ठाण्याला देण्याविषयी कंट्रोल रूमला सांगून मी तिकडे जायला निघालो. सहायक पोलिस आयुक्त, स्थानिक पोलिस ठाण्याचे निरीक्षक खांडेकर, खडकी बाजार पोलिस चौकीचे उपनिरीक्षक शेख हे इतर कर्मचाऱ्यांसह मेजर शर्मांच्या घरीच होते. मी पोचलो तेव्हा गुन्ह्याची घटना रिकन्स्ट्रक्‍ट करून गुन्हा नेमका कसा घडला याचा आढावा घेण्याचं काम सुरू होतं.

मेजर शर्मांचा बंगला मुख्य रस्त्याला लागूनच होता. रस्त्यावरून घर जसं दिसत होतं, तसंच थोड्या अंतरावर असलेल्या झोपडपट्टीतूनही घरातल्या सगळ्या हालचाली दिसत असणार असं जागेची पाहणी करताना माझ्या लक्षात आलं. झोपडपट्टीला लागूनच जो रस्ता होता तिथून खडकीच्या दारूगोळा कारखान्याकडे एक रेल्वे लाईन गेली होती. रोज अनेक वेळा रेल्वेच्या मालगाड्या तिथून कारखान्याकडे जात-येत असत. मी जवळपास दोन तास तिथं होतो. तेवढ्या वेळात दोन-तीन रेल्वेगाड्या तिथून आल्या-गेल्या. रेल्वे गेल्यानंतर रुळांच्या बाजूला पडणारे अर्धवट जळालेले कोळशांचे तुकडे घरातल्या जळणाकरता वेचण्यासाठी वस्तीतल्या बायकांची आणि मुलांची झुंबड उडायची असं माझ्या लक्षात आलं.

‘‘सर, गाड्यांची ही ये-जा चोवीस तास सुरू असते,’’ पीएसआय शेख मला म्हणाले. कोळसा वेचायला येणाऱ्या बायका-मुलांपैकी कुणीतरी मेजर शर्मांच्या घराच्या आसपास घुटमळणाऱ्या लोकांना पाहिलं असण्याची शक्‍यता होती. त्यांना विचारायला हवं, असा विचार माझ्या मनात आला. मलाच ही चौकशी करायची होती; पण गणवेशात असल्यानं त्या वेळी मी ते टाळलं.
शर्मा पती-पत्नींना या घटनेमुळे खरोखरच धक्का बसला होता.

‘‘माझ्या सगळ्या चीजवस्तू लुटल्या गेल्या आहेत. कालच मी निवृत्त झालो आणि हे घडलं. आर्थिकदृष्ट्याही आम्हाला हा फार मोठा फटका आहे,’’ ते मला म्हणाले. ते खरोखरच खूप बेचैन दिसत होते. मी त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला; पण त्या सांगण्याला तसा काही अर्थ नव्हता हे मलाही समजत होतं. लष्करी नोकरीत असताना आयुष्य बरंच सोपं असतं; पण निवृत्त होताना सगळी पुंजी चोरीला जावी, हा मोठाच धक्का होता. ‘आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू’, असं मी त्यांना सांगितलं; पण खरं तर एखादा खून उघडकीस आणणं जास्त सोपं असतं, घरफोडीचा तपास लावणं हे खूप कठीण असतं याची मला कल्पना होती. हा गुन्हा कसा शोधायचा याच विचारात मी होतो.

आमच्या फिंगरप्रिंट एक्स्पर्टना बंगल्यातल्या एका अलमारीवर बोटांचे ठसे सापडले होते. इन्स्पेक्‍टर खांडेकरांना सांगून मी त्या भागाचं व्हिलेज क्राईम नोटबुक मागवून त्यांच्या ऑफिसमध्ये ठेवायला सांगितलं. दुपारी पोलिस ठाण्यात गेल्यानंतर मी आधीच्या सगळ्या नोंदी नीट वाचून काढल्या. त्या नोंदींमध्ये मला रमेश आणि प्रकाश अशी दोन नावं सापडली. दोघंही भाऊ घरफोड्या करणारे म्हणून कुप्रसिद्ध होते. त्यांना आधीही अशा गुन्ह्यांसाठी शिक्षा झाली होती. घरावरची कौलं काढून घरात उतरून चोऱ्या करणं ही त्या दोघांचीही ठरलेली पद्धत होती. त्या दोघांना शोधून त्यांच्याकडे चौकशी करण्याच्या सूचना मी खांडेकरांना दिल्या. पोलिसांनी शोध घेतल्यावरही ते दोघं न सापडल्यानं आता आमच्या दृष्टीनं ते प्रमुख संशयित होते. त्यांना शोधण्यासाठी आम्ही वस्तीत छापेही घालायला सुरवात केली.

त्याच संध्याकाळी मी पुन्हा मेजर शर्मांच्या घरी गेलो. या वेळी मी साध्या कपड्यांमध्ये होतो. नेहमीप्रमाणे रेल्वेगाडी गेल्यानंतर कोळसे वेचायला बायका-मुलांची झुंबड उडालेली होती. तिथं जाऊन त्यांच्याबरोबर रेल्वेलाईनवरून चालता चालता मी प्रत्येकाकडे, ते रोज कोळसे जमा करतात का, याची चौकशी केली. काल संध्याकाळी मेजर शर्मांच्या बंगल्याच्या आसपास कुणाला पाहिलं होतं का असं विचारल्यावर मात्र प्रत्येकानं नकारार्थी उत्तर दिलं. मग मी पुन्हा मेजर शर्मांच्या घराकडे मोर्चा वळवला. चोरट्यांनी घरातून पळवलेल्या ट्रंका आणि बॅगा घराजवळच, साधारणतः दोनेकशे यार्डांवर नेऊन फोडल्या होत्या. त्यातल्या मौल्यवान वस्तू काढून घेऊन उरलेल्या वस्तू तिथंच टाकून त्यांनी पोबारा केला होता. एकूण परिस्थिती पाहिल्यावर चोरटे हे शर्मा पती-पत्नीच्या पाळतीवर असले पाहिजेत असं मला वाटलं. चोरी करताना घरात कुणीही नसणार हे त्यांना माहीत होतं असं स्पष्ट दिसत होतं. चोरट्यांनी जर पाळत ठेवली असेल तर काही तास ते त्या बंगल्याच्या आसपास वावरले असणार आणि त्या परिस्थितीत कुणीतरी त्यांना नक्की पाहिलं असणार असा माझा कयास होता. त्यांना पाहणारा साक्षीदार शोधणं सोपं नव्हतं. शांत राहून थोडे कष्ट करायला हवे होते. दुर्दैवानं चोरट्यांच्या हालचाली पाहणारं कुणीच मिळत नव्हतं; पण हार न मानता मी आणखी काही लोकांशी बोलायचं ठरवलं. तशाही रोज बऱ्याच गाड्या तिथून ये-जा करत असत.

मी अशा विचारात असतानाच आणखी एक गाडी गेली आणि कोळसा वेचणाऱ्यांची पुन्हा धांदल उडाली. पुन्हा विचारल्यावर मला पुन्हा तेच उत्तर मिळालं : ‘आम्ही कुणालाच पाहिलं नाही.’
ही चौकशी सुरू असताना कोळसे वेचणाऱ्यांत सगळ्यांत मागं असलेल्या एका महिलेलाही मी तोच प्रश्न विचारला. तिच्याकडूनही मला वेगळ्या काही उत्तराची अपेक्षा नव्हती.
‘‘मी पाहिलंय त्यांना,’’ ती बाई कोळसे गोळा करता करताच म्हणाली. माझ्याकडे न पाहताच ती बोलत होती : ‘‘ते त्या पुलाच्या कठड्यावर बसले होते.’’
‘‘कोण होते ते?’’ मी विचारलं.
‘‘तेच, तुम्ही ज्यांचा शोध घेता आहात, ज्यांच्यासाठी छापे चालले आहेत तेच होते. इथं काही विचारू नका मला. रात्री माझ्या खोलीवर या. पोलिस ठाण्यातल्या डीबीच्या शिवाजीभाऊंना माझी खोली माहीत आहे. त्यांनाही मी सगळं सांगितलं आहे. त्या बदमाशांना जर समजलं की मी तुमच्याशी काही बोलले आहे तर ते माझे तुकडे करून टाकतील. तुमचा त्या दोघांवरचा संशय बरोबर आहे. मी त्या दोघांना पाहिलं आहे; पण माझं नाव कुणाला सांगू नका. तुम्हाला यायला जमणार नसेल तर शिवाजीभाऊंना पाठवा; पण मी पोलिस ठाण्यात येणार नाही,’’ ती म्हणाली.
तिचं नाव होतं मीना (नाव बदललं आहे). तिच्या सांगण्यानुसार, ती त्या वस्तीतच राहून छोठी-मोठी कामं करून उदरनिर्वाह करायची. तिच्याकडची माहिती फार महत्त्वाची होती.

पोलिस ठाण्यातल्या डिटेक्‍शन ब्रॅंचमधल्या कॉन्स्टेबल शिवाजी यांना मी बोलावून घेतलं. त्यांच्या म्हणण्यानुसार, मीना चांगली खबरी होती. छोट्या-मोठ्या कामांबरोबर उदरनिर्वाहासाठी ती देहविक्रयही करायची. तिला भेटून यापुढं आणखी माहिती कशी मिळवायची हा प्रश्न होता. तिनं माहिती दिल्याचं ठाण्यातल्या बाकीच्या स्टाफला कळू नये अशीही तिची अट होती. शेवटी शिवाजीनंच प्रश्न सोडवला. कॅन्टोन्मेंटची हद्द जिथं सुरू होते तिथं लष्कराचं एक तपासणीनाकं होतं. मीना आणि शिवाजी एका रिक्षातून तिथं आले. कुणाला कळू नये म्हणून शिवाजी स्वतःच रिक्षा चालवत आले होते. त्या नाक्‍यावरच्या लष्कराच्या ऑफिसमध्ये ते दोघं मला भेटले. मीनानं त्या दिवशी संध्याकाळी रमेशला आणि प्रकाशला मेजर शर्मांच्या घराजवळच्या छोट्या पुलाच्या कठड्यावर बसलेलं पाहिलं होतं. नंतर काही वेळानं अंधार पडत असताना कोळशासाठी ती परत त्या बाजूला गेली होती, तेव्हा त्या दोघांना बॅगा आणि ट्रंका घेऊन येताना व नंतर त्या ट्रंका फोडून आतलं सामान घेऊन पळ काढतानाही तिनं पाहिलं होतं.
‘‘साहेब, त्यांनीच ही चोरी केलीय हे नक्की; पण माझं नाव कुठंही येऊ देऊ नका,’’ तिनं मला पुन्हा आठवण करून दिली. मी बक्षीस म्हणून तिला पाचशे रुपये दिले आणि ती मला भेटली होती हे विसरून जायला सांगितलं.

आता आम्ही आणखी कसोशीनं रमेशला आणि प्रकाशला पकडण्याचे प्रयत्न सुरू केले. काही दिवसांतच ते आमच्या हाती लागले. त्यांच्याकडून काही दागिने, काही सूट आणि चोरलेल्या इतर काही वस्तूही आम्ही जप्त केल्या. गुन्ह्याच्या जागी सापडलेले बोटांचे ठसे आमच्या रेकॉर्डवरच्या त्यांच्या ठशांशी जुळत होते. शिवाय, त्यांच्याकडून जप्त केलेल्या एका मनगटी घड्याळाच्या मागच्या बाजूला मेजर आर. एल. शर्मांचं नावही कोरलेलं होतं. ते घड्याळ त्यांना प्रशिक्षणादरम्यान पारितोषिकादाखल मिळालेलं होतं. हा मोठाच पुरावा होता. मुद्देमाल जप्त करून, आवश्‍यक ते पुरावे गोळा केल्यावर आम्ही न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं. संशयितांचा गुन्ह्याशी असणारा संबंध स्पष्ट दाखवणारे अनेक पुरावे आमच्याकडे होते.

नंतर खटला होऊन दोन्ही भावांना शिक्षा झाली; पण त्याआधीच एक दिवस आम्ही मीनाला माझ्या ऑफिसमध्ये बोलावून घेतलं. गुन्हा उघडकीस आणायला आम्हाला मदत केल्याबद्दल तिला एक प्रमाणपत्र आणि एक हजार रुपयांचं बक्षीस दिलं. तिला खूपच आनंद झाला होता. मेजर शर्माही त्या वेळी तिथं होते. त्यांनीही तिला बक्षीस म्हणून काही रक्कम दिली. चोरीला गेलेल्या त्यांच्या मौल्यवान वस्तू मिळाल्यानं तेही खूप खूश होते. मीनाची कहाणी इथं संपली असली तरी पुढं कित्येक वर्षं न चुकता राखीपौर्णिमेला ती पोस्टानं मला राखी पाठवायची. मी पंजाबमध्ये गेल्यानंतरही तिच्याकडून राखी येत असे. तिच्याकडून आलेली राखी पाहिल्यावर दरवेळी मला खडकीची ती घरफोडी, रेल्वेचे रूळ, कोळसे वेचणाऱ्या लोकांची झुंबड आणि ज्या पद्धतीनं आम्ही घरफोडीचा तो गुन्हा उघडकीस आणून चोरीला गेलेल्या बऱ्याचशा वस्तू मेजर शर्मांना परत केल्या होत्या त्याची आठवण व्हायची. या तपासात मला आणखी एक ‘सबक’ मिळाला होता : एखादी व्यक्ती कुठं, कुठल्या परिस्थितीत राहते आणि पोटाची खळगी भरण्यासाठी काय व्यवसाय करते यावर त्या व्यक्तीचं बरं-वाईटपण ठरत नसतं; चांगली माणसं कुठंही राहत असली, काहीही ‘व्यवसाय’ करत असली तरी ती समाजासाठी चांगलंच काही तरी करत असतात.

(या लेखाचे बौद्धिक संपदा हक्क लेखकाकडे आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang s s virk write in and out crime article