भाऊसाहेब (एस. एस. विर्क)

s s virk
s s virk

माझ्यासमोर साधारणतः पासष्टी-सत्तरीची व्यक्ती होती. वर्ण उजळ. नाकेली. नाकावर चष्मा. व्यक्तिमत्त्व एकदम नजरेत भरण्यासारखं आणि प्रसन्न. माझ्या अचानक येण्यानं आणि ज्या सहजतेनं मी मराठीत त्यांना माझा परिचय करून दिला त्यामुळे तेही जरा गोंधळल्यासारखे झाले होते.

एका उर्दू शायराचा एक प्रसिद्ध शेर आहे :-
जिंदगी इक हादसा है और ऐसा हादसा
मौत से भी खत्म जिसका सिलसिला होता नही
अगदी खरं आहे. अखेरीस माणसाचं जगणं म्हणजे काय असतं? आपल्या भविष्याला आणि असण्याला आकार देणाऱ्या अपघातांची ती एक मालिकाच असते. अचानक घडणाऱ्या काही घटना अनेकदा आयुष्य अशा एका वळणावर नेऊन उभ्या करतात की त्या घटना जगण्याच्या प्रवासात अपार महत्त्वाच्या बनून जातात. आज मी जी गोष्ट सांगणार आहे, तो असाच एक ‘हादसा’ आहे.

औरंगाबादला अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख काम करत असताना सन १९७५ च्या मे महिन्यात मला बदलीचे आदेश मिळाले. यवतमाळ जिल्ह्याच्या पोलिसप्रमुखपदाची जबाबदारी माझ्याकडे सोपवण्यात आली होती. लवकरच सामानसुमान बांधून मी यवतमाळकडे निघालो आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात नव्या जागी रुजू झालो. पूर्वीच्या मध्य भारतातल्या (सेंट्रल प्रोव्हिन्सेस) वऱ्हाड प्रांताचा भाग असलेला यवतमाळ भौगोलिकदृष्ट्या बऱ्यापैकी मोठा जिल्हा होता. यवतमाळच्या बहुतेक सगळ्या तालुक्‍यांमध्ये खूपशा भागात जंगलं होती. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईकांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळमध्ये विकासाची कामंही चांगल्यापैकी झालेली होती.

कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेचच मी संपूर्ण जिल्ह्याचा दौरा केला. जिल्ह्यातल्या सगळ्या उपविभागांच्या, तालुक्‍यांच्या ठिकाणी जसा जाऊन आलो, तसा काही अगदी आतल्या गावांमध्येही जाऊन आलो. वातावरण चांगलंच तप्त होतं. एक तर उन्हाळा होता आणि त्या वेळच्या काही घटनांमुळे राष्ट्रीय स्तरावरही वातावरण तापत होतं. जयप्रकाश नारायण आणि त्यांचे समर्थक गुजरात आणि बिहारसह देशाच्या इतर काही भागांतही आंदोलनं करत होते. काही ठिकाणी आंदोलनांना हिंसक वळणही लागलं होतं. काही ठिकाणी पोलिसांकडून दडपशाहीपण होत होती. दिवसेंदिवस स्थिती बिघडत चालली होती. महाराष्ट्रात शांतता असली तरी राज्यात काही घडू नये यासाठी आम्हाला डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावं लागत होतं. प्रतिबंधात्मक उपाययोजनांद्वारे शांतता राखण्यासंदर्भात आमच्या बैठका सुरू होत्या, त्यादृष्टीनं आम्ही आमच्या योजना आखत होतो.

जूनच्या २६ तारखेला राष्ट्रपतींनी देशात आणीबाणी जाहीर केली. शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याचे आदेश आम्हाला देण्यात आले. आंदोलनं व काही ठिकाणच्या हिंसाचारामुळे देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण झाल्यानं आणीबाणी जाहीर करण्यात आली, असं कारण देण्यात आलं होतं. नवी दिल्ली आणि अन्य राज्यांमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांची धरपकड झाली होती. वृत्तपत्रांवरही कठोर निर्बंध आले होते. प्रसिद्ध होणारी प्रत्येक बातमी आधी एका समितीकडून मंजूर करून घेणं आवश्‍यक झालं होतं. राज्यघटनेनं दिलेले सगळे मूलभूत अधिकार स्थगित करण्यात आले होते. आंदोलनांमध्ये सहभागी होणाऱ्यांना किंवा कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना स्थानबद्ध करण्याचेही आदेश होते. स्थानबद्धतेच्या कारवाईच्या तरतुदी अत्यंत कडक होत्या. आपल्या लोकशाहीनं याआधी हा अनुभव कधीच घेतला नव्हता. आणीबाणी हे दुधारी शस्त्र होतं, हक्क आणि जबाबदाऱ्या यांच्या दरम्यान लोकशाहीचा समतोल काळजीपूर्वक राखणं हे मोठं आव्हान असतं. दोन्हींबाबत काळजी घ्यायची असते. लोकशाहीमध्ये आता ‘हुकूमशाही अंमल’ सुरू झाला होता आणि प्रशासनाचा भाग या नात्यानं आम्हाला लोकशाहीमार्गानं निवडून आलेल्या सरकारचे आदेश पाळावे लागणार होते.
एक-दोन दिवसांतच आम्हाला सरकारकडून काही नावांच्या याद्या मिळाल्या. समाजाच्या किंवा देशहिताच्या विरुद्ध कारवायांमध्ये हे लोक सहभागी असल्याचे जुने पुरावे असल्यानं किंवा तसा संशय असल्यानं त्या लोकांना अंतर्गत सुरक्षा कायद्याखाली (मेन्टेनन्स ऑफ इंटर्नल सिक्‍युरिटी ॲक्‍ट - मिसा) स्थानबद्ध करण्याचा आम्हाला हुकूम होता. मी ज्या समतोलाविषयी वर बोललो तो समतोल बिघडला होता. हे पाऊल कठोर होतं हे खरं असलं तरी बऱ्याच राज्यांमध्ये आंदोलनं, दंगली, व्यापक हिंसा, सरकारशी असहकार अशा कारणांमुळे संपूर्ण प्रशासन ठप्प झाल्यासारखी, हतबल झाल्यासारखी स्थिती होती; विशेषतः गुजरात आणि बिहारमध्ये. कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असणाऱ्या यंत्रणा सर्वशक्तीनिशी आणि स्थानबद्धतेचा कायदा घेऊन कायदे मोडणाऱ्या आंदोलकांच्या विरोधात उतरल्यानंतर दोनचार दिवसांतच सर्वत्र शांतता प्रस्थापित झाली. कोणतीही जबाबदारी न घेता फक्त ‘हक्कां’चा वापर करणारी मंडळी प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेच्या सावटाखाली आल्यावर एकदम कायद्याचा आदर करायला लागली. असो.

त्या काळात जे काही घडलं ते चूक होतं वा बरोबर या चर्चेत मला वाचकांना ओढायचं नाही. माझी कहाणी थोडी वेगळी आहे. अशा असामान्य गंभीर परिस्थितीतही एखादा सरकारी अधिकारी कसा समतोल साधू शकतो याविषयी. अशा परिस्थितीविषयी जिथं तुम्ही शांतता राखण्याचे आदेश पाळत असतानाच एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक हक्कांचीही बूज राखता आणि तुमच्या सद्‌सद्विवेकबुद्धीचं सांगणंही ऐकता.
आमच्यासमोर फार काही पर्याय नव्हते. ज्यांना स्थानबद्ध करायचं त्यांच्या याद्या आमच्याकडे आल्या होत्या. त्यातली काही माहिती कारवाईच्या दृष्टीनं खूपच संदिग्ध आणि जुनी असली तरी त्या सगळ्यांवर स्थानबद्धतेचे आदेश बजावून, त्यांना ताब्यात घेऊन, आदेशांप्रमाणे त्यांना कारागृहात पाठवायचं होतं. कारवाई पूर्ण केल्याचे अहवालही तातडीनं पाठवणं अपेक्षित होतं. त्या वेळी एस. डी. म्हस्के यवतमाळचे जिल्हाधिकारी आणि जिल्हादंडाधिकारी होते. पन्नाशी उलटून गेलेले म्हस्केसाहेब प्रशासनात येण्यापूर्वी लष्करात होते. अत्यंत कष्टपूर्वक, निष्ठेनं प्रयत्न करून त्यांनी त्यांचं करिअर घडवलं होतं. मी त्या वेळी फक्त २६ वर्षांचा होतो आणि ते पंचावन्नचे. त्यांच्याबरोबर काम करणं हा एक चांगला अनुभव होता. ते माझे सल्लागार, मार्गदर्शक आणि मित्र तर होतेच; पण त्याही पलीकडे जात त्यांचं माझ्यावर धाकट्या भावासारखं किंवा अगदी मुलासारखं प्रेम होतं. आमचा परिचयही जुना होता. ते जळगावचे जिल्हादंडाधिकारी असताना मी तिथं उपविभागीय पोलिस अधिकारी होतो. तेव्हापासून आमचं मैत्र जुळलं होतं.

आणीबाणी लागू झाल्यानंतर जिल्ह्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन मी त्यांना नव्या परिस्थितीची आणि आमच्या नव्या भूमिकेची कल्पना दिली. आम्हाला नव्यानं मिळालेले अधिकार आणि त्याबरोबर आलेल्या नव्या जबाबदाऱ्या खबरदारीनं आणि संयमानं पार पाडायच्या होत्या आणि अर्थातच सरकारच्या आदेशानुसार, ज्या लोकांना स्थानबद्ध करायचं आहे त्यांच्यावर कारवाई करून त्याबाबतचे अहवालही वेळेत द्यायचे होते.
त्या यादीतल्या प्रत्येक व्यक्तीला स्थानबद्ध करण्याचे आदेश काढण्याविषयीचे प्रस्ताव तयार करून पाठवणं हे जिल्हा पोलिसप्रमुख म्हणून माझं काम होतं. प्रत्येक प्रस्तावात सरकारी आदेशानुसार स्थानबद्धतेची कारणं नमूद केलेली असायची. प्रस्ताव आल्यावर जिल्हाधिकारी कार्यालयातली संबंधित शाखा त्या त्या व्यक्तीला स्थानबद्ध करण्याचे आदेश काढत असे. पोलिस त्यानुसार त्या त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन कारागृहात पाठवत असत. मग त्यासंदर्भातला अहवाल शासनाला पाठवला जात असे. प्रस्ताव तयार करणं, लोकांना ताब्यात घेऊन त्यांना कारागृहात पाठवणं या कामांसाठी आम्ही वेगळ्यावेगळ्या टीम केल्या होत्या.
पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकांमध्ये सगळ्या सहकाऱ्यांना मी एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायला सांगितली होती व ती म्हणजे आपण ज्यांना स्थानबद्ध करणार आहोत ते ‘गुन्हेगार’ नाहीत, ते राजकीय बंदी आहेत, त्यामुळे त्यांच्याशी योग्य पद्धतीनं वागलं, बोललं पाहिजे. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर लॉकअपमध्ये न ठेवता एखाद्या स्वतंत्र खोलीत त्यांची बसण्याची व्यवस्था करावी, असंही मी अधिकाऱ्यांना सांगितलं होतं. उत्तम शिकलेले अनेक चांगले, जबाबदार नागरिकही स्थानबद्धांच्या यादीत होते. रात्रंदिवस आमचं काम सुरू होतं. गडबड सुरू झाल्यावर पहिल्याच दिवशी कामाचा आढावा घेण्यासाठी मी पोलिस ठाण्यात गेलो.

यवतमाळचं पोलिस ठाणं एका जुनाट इमारतीत होतं. पार्टिशन घालून तयार केलेल्या एका खोलीत ठाणेदार असणारे वरिष्ठ उपनिरीक्षक बसायचे. पोलिस ठाण्याला दोन दारं होती. मुख्य दारातून आत गेल्यावर लगेच ठाणे अंमलदारांचं टेबल होतं. एका बाजूला लॉकअप होतं. ठाणे अंमलदारांसमोर दोन-तीन तुटक्‍या खुर्चा असायच्या. त्याच्या बाजूला एकाला एक लागून ठेवलेल्या कपाटांच्या भिंतीमुळे पलीकडे आपोआपच आणखी एक खोली तयार झाली होती. त्या बाजूनंही ठाणेदारांच्या खोलीकडे जाता येत असे. मी कुणाला न सांगता बाजूच्या दारातून ठाणेदारांच्या जागेवर जाऊन बसलो. बरेचसे कर्मचारी स्थानबद्धांच्या यादील्या लोकांच्याच मागं असल्यानं लॉकअपशी पहाऱ्यावर असणारा एक कर्मचारी, हेड कॉन्स्टेबल असणारे ठाणे अंमलदार आणि त्यांच्याबरोबरचा एक कर्मचारी असे वगळले तर बाकी सामसूम होती.
ठाणेदारांच्या जागेवर मला बाजूच्या खोलीतलं बोलणं स्पष्ट ऐकू येत होतं. स्थानबद्धांच्या यादीतलं कुणीतरी ठाणे अंमलदारांच्या समोर बसलं होतं. गृहस्थ वयस्कर असावेत असं त्यांच्या आवाजावरून वाटत होतं. बोलताना त्यांना खोकल्याची प्रचंड उबळ येत होती. त्यांची तब्येत बहुधा ठीक नसावी. काहीच चूक नसताना सकाळी सकाळीच पोलिस ठाण्यात आणल्याबद्दल ते नाराज होते. त्यांचा आवाज जरा मोठाच होता.
‘‘मला इथे कशाला आणलं आहे? काय चूक झाली माझ्याकडून?’’ असं ते ठाणे अंमलदारांना विचारत होते.
ठाणे अंमलदारही त्यांना थोडक्‍यात उत्तरं देत होते : ‘‘बाबा, मलाही काही माहिती नाही. थोडं थांबा. आमचे अधिकारी आले की सगळं सांगतील तुम्हाला. तोपर्यंत तुम्ही इथंच या खुर्चीवर बसा.’’

या उत्तरानं समाधान न झाल्यानं ते गृहस्थ अस्वस्थ होऊन ठाणे अंमलदारांना पुनःपुन्हा प्रश्न विचारत होते आणि ठाणे अंमलदारांना ते काही फारसं रुचत नव्हतं.
थोड्या वेळानं ठाणे अंमलदारांनी त्या गृहस्थांना ‘‘पाणी हवंय का?’’ असं विचारलं. ते ‘‘हो’’ म्हणाले. पाणी प्यायल्यावर ते जरा शांत झाले; पण त्यांचे प्रश्न सुरूच होते.
‘‘सध्या तुमचे डीएसपी कोण आहेत?’’ त्यांनी विचारलं.
हेड कॉन्स्टेबलना माझ्याबद्दल फार काही माहीत नव्हतं.
‘‘विर्क म्हणून कुणीतरी नवीनच आहेत,’’ ते म्हणाले.
‘‘ते खात्यातूनच बढती मिळालेले आहेत की थेट अधिकारी म्हणूनच आले आहेत?’’ त्या वयस्कर गृहस्थांनी चौकशी केली.
‘‘ते डायरेक्‍ट आयपीएस आहेत आणि शीख आहेत; पण तुम्ही हे का विचारताय?’’ ठाणे अंमलदारांनी त्यांना प्रश्न केला.
‘‘ते डायरेक्‍ट आयपीएस असतील तर त्यांना भेटून मला इथं असं का आणलं आहे ते त्यांना विचारायचं आहे; पण ते जर बढती मिळालेले असतील तर त्यांना प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही. कारण, ते फक्त आदेशाची अंमलबजावणी करणार,’’ ते गृहस्थ म्हणाले.

‘‘बाबा, कृपा करून शांत बसा; बघू आपण काय होतंय ते,’’ ठाणे अंमलदार म्हणाले.
मग त्यांनी बहुतेक त्यांच्या समोरच्या कागदांत डोकं घातलं असणार.
मी ऐकत होतो. मी जर थेट सेवेतून आलो असेन तर मला भेटून त्यांची कैफियत माझ्या कानावर घालण्याची त्या गृहस्थांची इच्छा होती. मी थेट सेवेतून आलो होतोच. तरुण होतो. वय होतं फक्त २६. अनुभव असा फारसा नव्हता; पण त्यांची जर मला भेटण्याची इच्छा असेल तर त्यांना भेटलं पाहिजे असं मला वाटलं. मी उठून ठाणे अंमलदारांच्या खोलीत गेलो. मी गणवेशात होतो. माझं तिथं येणं कुणालाच अपेक्षित नव्हतं. टेबलावर ठेवलेली टोपी गडबडीनं डोक्‍यावर चढवत ठाणे अंमलदारांनी मला सॅल्यूट केला. मी त्या गृहस्थांना म्हणालो : ‘‘मी एस.एस. विर्क. मी इथला नवीन एसपी आहे. मी शेजारच्या खोलीतून तुमचं बोलणं ऐकत होतो. तुम्ही मला भेटण्याबद्दल बोलत होतात, म्हणून मला वाटलं की येऊन आपल्याशी बोलावं.’’
शुद्ध मराठीत मी त्या वयस्कर गृहस्थांना माझा परिचय करून दिला.
माझ्यासमोर साधारण पासष्टी-सत्तरीची व्यक्ती होती. वर्ण उजळ. नाकेली. नाकावर चष्मा. व्यक्तिमत्त्व एकदम नजरेत भरण्यासारखं आणि प्रसन्न. माझ्या अचानक येण्यानं आणि ज्या सहजतेनं मी मराठीत त्यांना माझा परिचय करून दिला त्यामुळे तेही जरा गोंधळल्यासारखे झाले होते.
खुर्चीतून उठून नमस्कार करून त्यांनी त्यांचा परिचय करून दिला.
‘‘मी भाऊसाहेब पाटणकर. इथं जवळच राहतो. व्यवसायानं वकील आहे. माझी काहीच चूक नसताना मला पोलिस स्टेशनला आणल्यामुळे मी जरा संभ्रमात पडलो आहे; पण ते राहू दे...आधी मला सांगा, तुम्ही महाराष्ट्रातलेच आहात का? तुम्ही अगदी उत्तम मराठी बोलता.’’ आता ते खूपच शांत झाले होते.
‘‘आता मी खरंच महाराष्ट्रातलाच आहे,’’ मी म्हणालो.
‘‘माझा जन्म जरी पंजाबमध्ये झाला असला तरी पाच वर्षांपूर्वी मी बाडबिस्तरा बांधून महाराष्ट्रात आलो. त्यामुळे आता मी इथलाच आहे. माझी कामांतही मी मराठीतच बोलतो आणि मराठी शिकण्यासाठी मला फार काही करावं लागलं नाही, बहुतेक माझ्याआधी मराठी भाषेनंच मला आपलंसं केलं असंच मला वाटतं. आता तुमच्या प्रश्नाचंही उत्तर द्यायला हवं. चला, आपण शेजारच्या खोलीत बसून बोलू या.’’
आम्ही उठून शेजारच्या खोलीत गेलो.
‘‘विर्कसाहेब, माझं वय आणि माझी स्थिती पाहता मी जेलमध्ये राहिलो काय आणि बाहेर असलो काय दोन्ही माझ्यासाठी सारखंच आहे,’’ भाऊसाहेब पाटणकर म्हणाले : ‘‘त्यामुळे काही आठवडे किंवा काही महिने जेलमध्ये जायला माझी काहीच हरकत नाही; पण माझी तब्येत फारशी ठीक नाहीये. मला आता दिसतही नाही. पुढच्या आठवड्यात माझं मोतीबिंदूचं ऑपरेशन ठरलं आहे. सध्यातरी मी अगदी पंगू झालो आहे.’’

त्यांची ती स्थिती लक्षात येतच होती. चालताना त्यांना काठीचा आधार घ्यावा लागत होता आणि त्यांना नीट दिसतही नव्हतं हेही कळत होतं. ‘‘भाऊसाहेब,’’ मी म्हणालो : ‘‘मी रात्रभर जागा आहे. मला चहा घ्यायचाय. तुम्हीही माझ्याबरोबर चहा घेणार का?’’
ते ‘‘हो’’ म्हणाल्यावर मी ठाणे अंमलदारांना आमच्या दोघांसाठीही चहा मागवण्यास सांगितलं.

(क्रमशः)
(या लेखाचे बौद्धिक संपदा हक्क लेखकाकडे आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com