भाऊसाहेब -२ (एस. एस. विर्क)

एस. एस. विर्क virk1001ss@gmail.com
रविवार, 8 डिसेंबर 2019

भाऊसाहेब पाटणकर आज आपल्यात नाहीत; पण त्यांची शायरी आजही मला त्यांच्या हृदयाची विशालता, मोकळेपणा आणि त्यांच्या मोहक व्यक्तिमत्त्वाची आठवण देत राहते.

भाऊसाहेब पाटणकर आज आपल्यात नाहीत; पण त्यांची शायरी आजही मला त्यांच्या हृदयाची विशालता, मोकळेपणा आणि त्यांच्या मोहक व्यक्तिमत्त्वाची आठवण देत राहते.

रात्रभरच्या धावपळीनंतरचा चहाचा तो कप म्हणजे मोठा रिलिफ होता, माझ्यासाठी आणि भाऊसाहेबांसाठीही. त्यांची रात्रही बहुधा अस्वस्थेतच गेली होती. चहा होईपर्यंत ते गप्प गप्प होते. नंतर ते म्हणाले : ‘‘मी अतिरेकी, उजव्या विचारांचा, प्रतिगामी हिंदू पुढारी आहे असा तुमचा समज झालाय असं मला वाटतं आहे. मी असा कुणीच नाही. माझ्या नातेवाइकांपैकी काही जण अगदी निष्ठावान हिंदू पुढारी आहेत म्हणून मी आत्ता इथं आहे आणि ते मी नाकारत नाही; पण माझं म्हणाल तर मी एक नेमस्त प्रकृतीचा भारतीय हिंदू आहे, हिंदू असण्याच्या वैश्विक आणि व्यापक धारणांची मला कल्पना आहे. तुम्ही आता ज्या लोकांना स्थानबद्ध करत आहात त्यांच्याशी माझे काही तात्त्विक मतभेद आहेत; पण हे सगळं सांगण्याची ही वेळ नाही.’’

ते अस्वस्थ दिसत असले तरी त्यांच्या आवाजातला सच्चेपणा जाणवत होता. बोलताना त्यांना खोकल्याची उबळ आली, तसं मी त्यांना शांत होण्यास सांगितलं आणि त्यांना पाण्याचा ग्लास दिला. मग मी त्यांच्या व्यवसायाबद्दल विचारपूस केली. पहिल्या भेटीत त्यांच्याशी बोलताना, त्यांच्याबद्दल, त्यांच्या व्यवसायाबद्दल जाणून घेताना मला काहीच वावगं दिसलं नाही. अधिक जाणून घेण्यासाठी मला आमच्याकडे, त्यांची काही माहिती आहे का तेही तपासावं लागणार होतं. मात्र, ते खूप आजारी होते, याबद्दल माझ्या मनात काहीच शंका नव्हती. मला त्यांच्या तब्येतीचीच काळजी वाटत होती. त्यांचं वय झालं होतं, मोतीबिंदूमुळे त्यांना दिसत नव्हतं आणि त्यांना प्रचंड खोकलाही होता. त्यांची प्रकृती इतकी खराब दिसत होती की काही महिने कारागृहात काढणं त्यांना झेपेल याबद्दल मलाच खात्री वाटत नव्हती. त्यांना त्या परिस्थितीत पाहून मला वाईट वाटत होतं. त्यांना मदतीची गरज होती; पण त्या आधी मला त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेणं भाग होतं.

थोड्या वेळानं मी माझ्या ऑफिसात पोचलो. तिथंही आणीबाणीशी संबंधित कामाची धावपळ सुरू होती. संबंधित अधिकाऱ्यांना मी आमच्या रेकॉर्डला भाऊसाहेब पाटणकरांबद्दल काही प्रतिकूल नोंदी आहेत का ते तपासण्याच्या सूचना दिल्या. आमच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं काही जादा कर्मचाऱ्यांची मदत घेतली, सगळी रेकॉर्ड्‌स काळजीपूर्वक तपासली. काही तासांतच सर्व संबंधित कागदपत्रं माझ्या टेबलावर आली. त्या सगळ्या नोंदींमध्ये भाऊसाहेबांबद्दल कुठल्याही मुद्द्यावर कुठलीच प्रतिकूल नोंद नव्हती. इतकंच नव्हे तर, आणीबाणी जाहीर झाल्यानंतर बंदी घालण्यात आलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी किंवा अन्य कोणत्याही संघटनेशी त्यांचा संबंध जोडता येईल असंही काही आमच्या रेकॉर्डला नव्हतं. माहितीची शहानिशा केल्यावर भाऊसाहेबांची वैद्यकीय तपासणी करून, त्यांना स्थानबद्ध करण्याच्या दृष्टीनं डॉक्‍टरांचा अहवाल घ्यावा अशा सूचना मी यवतमाळच्या वरिष्ठ उपनिरीक्षकांना दिल्या.

मग मी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन एस. डी. म्हस्केसाहेबांना या सगळ्या घडामोडींची माहिती दिली. त्यांनीही भाऊसाहेबांच्या तब्येतीविषयी काळजी व्यक्त केली; पण भाऊसाहेबांना स्थानबद्ध न करण्याच्या बाबतीत मात्र ते अनुकूल नव्हते. सरकारच्या आदेशानुसार भाऊसाहेबांना स्थानबद्ध करावं आणि ती प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सरकारला त्यांच्या तब्येतीविषयी कळवावं असं त्यांचं मत होतं. त्या वेळची परिस्थिती लक्षात घेता, आम्ही एका स्थानबद्धाला वाचवण्याचा प्रयत्न करतो आहोत असा ठपका आमच्यावर आला असता. आमच्या या निर्णयावर टीका होऊन कदाचित सरकारचे आदेश आम्ही ‘पाळले नाहीत’ असाही शिक्का आमच्यावर मारला गेला असता, असं म्हस्केसाहेबांना वाटत होते.

मला मात्र हे मान्य होत नव्हतं. स्वातंत्र्य मिळाल्यापासून, १९४७ पासून, त्यांच्याबद्दल एकही प्रतिकूल नोंद नसल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारनं भाऊसाहेबांचं वय, त्यांचा गंभीर आजार, तसंच ते परावलंबी आहेत ही वस्तुस्थिती लक्षात घ्यावी असं मला वाटत होतं. यावर आम्ही बरीच चर्चा केली; पण म्हस्केसाहेबांनी माझं म्हणणं मान्य केलं नाही. अशा एखाद्या किरकोळ मुद्द्यावर मी फार उत्तेजित होऊ नये, असं त्यांचं मत होतं. एखाद्याची काही चूक नसताना त्याच्यावर कारागृहात जाण्याची वेळ येते अशासारख्या गोष्टी घडत असतात, असं त्यांचा शासकीय नोकरीतला अनुभव त्यांना सांगत होता. सरकारी अधिकारी या नात्यानं प्रश्न न विचारता शासनाचे आदेश पाळणं हे आमचं कर्तव्य होतं.

पण माझा मुद्दा वेगळाच होता. आम्ही नेमकं काय करायला हवं, शासनाच्या प्रतिमेचा विचार न करता आम्ही यंत्रासारखं काम करावं की शासनाच्या प्रतिमेला धक्का पोचू शकेल असं जिथं आम्हाला वाटतं तिथं ती परिस्थिती शासनाच्या नजरेला आणून देऊन त्या परिस्थितीत पुढं काय करावं याबद्दल आदेश घ्यावेत, हा माझा मुद्दा होता. खूप चर्चा झाल्यानंतर याबाबतचा माझा अहवाल शासनाकडे पाठवण्यास म्हस्केसाहेब राजी झाले; पण भाऊसाहेबांची तब्येत आणि त्यासंबंधीच्या सगळ्या कायदेशीर बाजूंविषयी माझा अहवाल अगदी बिनचूक असला पाहिजे, असं त्यांनी मला बजावलं. भाऊसाहेबांच्या तब्येतीची स्थिती आणि आजवर त्यांच्याबद्दल एकही प्रतिकूल नोंद नसल्याच्या पार्श्वभूमीवर एक अहवाल तयार करून जिल्हादंडाधिकाऱ्यांमार्फत मी तो शासनाकडे पाठवायचा असं आम्ही ठरवलं.

भाऊसाहेबांच्या प्रकृतीविषयी डॉक्‍टरांचा अहवाल थोड्याच वेळात मला मिळाला. ते आजारी होते, अशक्त झाले होते आणि मोतीबिंदूची स्थितीही गंभीर असल्यानं त्यांना दोन्ही डोळ्यांनी नीट दिसत नाही हे त्या अहवालावरून स्पष्ट होत होतं. त्यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्याचं ठरलं होतं त्याविषयीची कागदपत्रंही अहवालासोबत जोडलेली होती. त्या वैद्यकीय अहवालाच्या आधारे मी माझा अहवाल लिहिला. स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत त्यांच्याबद्दल एकही प्रतिकूल नोंद पोलिसांच्या रेकॉर्डला नसल्याचाही उल्लेख केला. त्यांना स्थानबद्ध करण्यासाठी आम्ही त्यांना ताब्यात घेतलं आहे; पण त्यांची गंभीर स्थिती पाहता शासनानं जुन्या संदिग्ध नोंदींच्या आधारे निर्णय न घेता त्यांच्या स्थानबद्धतेविषयी पुन्हा विचार करावा असं मला वाटत असल्याचं मी नमूद केलं. शासनाचा निर्णय होईपर्यंत आम्ही त्यांना पोलिस ठाण्यातच ठेवत आहोत, असंही मी शासनाला कळवलं होतं.
मग मी परत पोलिस ठाण्यात गेलो. भाऊसाहेबांना सगळी परिस्थिती सांगितली.
‘‘भाऊसाहेब, सरकार काय निर्णय घेईल हे मला सांगता येणार नाही; पण आम्ही आमच्या परीनं सर्व ते प्रयत्न करतो आहोत. आपण वाट पाहूया,’’ मी त्यांना म्हणालो.
दुसरा काही मार्ग नसल्यानं भाऊसाहेबांनी आमच्या प्लॅनप्रमाणे
एक-दोन दिवस पोलिस ठाण्यातच रहाण्याचंही मान्य केलं.
म्हस्केसाहेबांनी माझा अहवाल मान्य करून तो शासनाकडे पाठवला. तो घेऊन रात्रीच्याच रेल्वेनं मुंबईला जाण्याची जबाबदारी मी एका अधिकाऱ्यावर सोपवली. मुंबईतल्या सर्व संबंधितांकडे तो अहवाल सकाळीच पोचला पाहिजे, अशा सूचना देऊन मी त्या स्पेशल मेसेंजरला पाठवून दिलं. आणीबाणीशी संबंधित असल्यानं या अहवालावर तातडीनं विचार होईल असं मला वाटत होतं.

काय होईल याचा मला काहीच अंदाज नव्हता. आपली प्रशासकीय यंत्रणा इतकी असंवेदनशील आणि अलिप्तपणे काम करत असते की ‘स्थानबद्धतेच्या आदेशाचं पालन करा’ एवढंच उत्तरही मिळू शकतं, असं म्हस्केसाहेबांना वाटत होतं.
‘‘निर्णय बदलणार नाही. आपल्या व्यवस्थेकडून होणारी एक चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न आपण केला, एवढं समाधान तुम्हाला मिळेल एवढं खरं,’’ ते मला म्हणाले.
मग आम्ही आमच्या इतर कामांना लागलो. आणीबाणीशी संबंधित खूप कामं समोर होती. दोन दिवस कसे गेले ते समजलंच नाही.
तिसऱ्या दिवशी सकाळी वायरलेसवर आलेल्या मेसेजेसची पहिली फाईल नेहमीप्रमाणे माझ्याकडे आली. पहिलाच मेसेज माझ्या अहवालाबाबत होता. ‘अहवालात नमूद केलेल्या मुद्द्यांचा विचार करता पाटणकर यांच्याविरुद्धची कारवाई रद्द करण्यात यावी,’ असं त्या मेसेजमध्ये म्हटलं होतं. मी लगेच म्हस्केसाहेबांना फोन केला. बातमी ऐकून ते ही खूश झाले. एकेक कप चहा घेऊन आमचं हे यश साजरं करण्यासाठी त्यांनी लगेच मला त्यांच्या घरी बोलावलं.

म्हस्केसाहेबांनाही इतका आनंद झाला होता की त्यांनी एकदम मला मिठीच मारली. संवेदनशीलतेचं नुसतंच प्रदर्शन न करता आपली ‘प्रामाणिक मतं’ शासनापर्यंत पोचवल्याबद्दल त्यांनी माझं अभिनंदन केलं. अत्यंत आजारी असणाऱ्या; पण चुकीनं स्थानबद्धांच्या यादीत गेलेल्या एखाद्या सामान्य नागरिकाच्या विरुद्धची कारवाई, केवळ वस्तुस्थितीच्या आधारे दिलेला अहवाल प्रमाण मानून रद्द होते, असं एकही उदाहरण त्यांच्या शासकीय नोकरीच्या संपूर्ण काळात त्यांच्या पाहण्यात नसल्याचं त्यांनी मोकळेपणानं मान्य केलं. शासनानं एक अत्यंत योग्य मुद्दा त्यातील वस्तुस्थितीच्या आधारे मान्य केला, असं मला वाटत होतं. त्या वेळचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी हा निर्णय घेतला होता. अत्यंत कडक शिस्तीचे भोक्ते असणारे चव्हाणसाहेब न्यायाच्या बाजूनं उभे राहणारे आणि प्रत्येक परिस्थितीत योग्यायोग्यतेचा विचार करून निर्णय करणारे नेते होते, असा माझा अनुभव होता.
आता आम्हाला काही औपचारिकता पूर्ण करायच्या होत्या; पण मला शक्‍य तितक्‍या लवकर भाऊसाहेबांना भेटून त्यांना ही बातमी द्यायची होती. बातमी ऐकल्यावर त्यांचा विश्वासच बसला नाही.

‘असं कसं झालं? माझी कुणाशी ओळखपाळख नाही. माझ्याशी कुणी काही बोललं नव्हतं, मग सरकारनं आपलाच आदेश असा कसा फिरवला? विर्कसाहेब, तुम्ही तर चमत्कारच करून दाखवलात,’ ते म्हणाले. मलाही त्यांच्याइतकंच आश्‍चर्य वाटत होतं. मी जरा फिलॉसॉफिकल झालो होतो. आपला परमेश्वरावर किंवा नियतीवर विश्वास असतो आणि आपण ‘कर्मा’च्या सिद्धान्ताविषयीही बोलत असतो.
‘‘भाऊसाहेब,’’ मी म्हणालो : ‘‘सर्व काही तुमच्या बाजूनं जुळून आलं आणि हा चमत्कार घडला. मला व्यवस्था जेवढी माहीत आहे ती पाहता माझा अहवाल नाकारला जाईल याची मला खात्री होती; पण माझ्या प्रयत्नांना यश आलं. चमत्कार घडला आहे आणि आता लवकरच तुमची सुटका होणार आहे.’’

भाऊसाहेबांच्या स्थानबद्धतेचं प्रकरण पूर्णपणे बंद करण्याचे आदेश येणार असल्यानं मी पुन्हा ऑफिसला परतलो. थोड्याच वेळात ते आदेश माझ्या हातात आले आणि मी ते भाऊसाहेबांकडे दिले. आमच्या ठाणेदारांनी कागदपत्रांची सगळी औपचारिकता पूर्ण केली. मग मी उपनिरीक्षकांना ठाण्याच्या जीपमधून भाऊसाहेबांना त्यांच्या घरी सोडून यायला सांगितलं. ‘नंतर एकदा वेळ काढून मी तुमच्या घरी येऊन जाईन,’ मी त्यांना म्हणालो. त्यांनीही ते आनंदानं मान्य केलं.

माझा अहवाल आणि त्यामुळे झालेली भाऊसाहेबांची सुटका याविषयी समजल्यावर माझं अभिनंदन करण्यासाठी बरेच लोक मला भेटायला आले. त्या मंडळींशी बोलताना भाऊसाहेब पाटणकर मराठीतले एक नामवंत शायर असल्याचं मला समजलं. त्यांच्या ‘जिंदादिल’ शायरीबद्दल ऐकायला मिळालं. मलाही कवितांची आवड आहे. मराठीतल्या एका नामवंत कवीला आपल्याकडून मदत झाली आहे हे समजल्यावर मला आणखी बरं वाटलं. कवी बऱ्याचदा एकांतवास पसंत करत असतात. मित्रमंडळींचा गोतावळाही त्यांना फारसा पसंत नसतो. भाऊसाहेबांविरुद्ध झालेली कारवाई योग्य नव्हती याबद्दल माझी आणखी खात्री झाली आणि आता शासनानं योग्य निर्णय घेऊन ती कारवाई रद्दही केली होती.
नंतर भाऊसाहेबांशी माझी चांगली मैत्री झाली. त्यांच्याबरोबर त्यांच्या घरी झालेली पहिली भेट हा माझ्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव आहे. ते राहत असलेल्या भागात एका संध्याकाळी मी पेट्रोलिंग करत होतो. मी जीप त्यांच्या घराकडे वळवायला सांगितली. भाऊसाहेबांनीच दरवाजा उघडला. त्यांची तब्येत जरा बरी दिसत होती. मोतीबिंदूची शस्त्रक्रियाही झाली होती. दरवाजा उघडून त्यांना मला त्यांच्या ‘बैठकी’त घेतलं.
‘‘काय घेणार?’’ त्यांनी विचारले.
‘‘काहीही. तुम्हीही जे घ्याल ते...पण चहा चालेल,’’ मी म्हणालो. त्यावर मोकळेपणानं हसून मदिरेवरचं त्यांचं प्रेम व्यक्त करत भाऊसाहेब म्हणाले : ‘‘सूर्यास्तानंतर मी चहा घेत नाही.’’
मी चहाच घेईन; पण त्यांनी त्यांचं आवडतं पेय घ्यायला माझी हरकत नसल्याचं मी त्यांना सांगितलं. थोड्याच वेळात आम्ही शायरीच्या विश्वात हरवून गेलो. भाऊसाहेबांची प्रतिभा, कल्पनाशक्ती व शब्दांवरची हुकमत विलक्षण होती. विलक्षण सहजपणे त्यांची शायरी उलगडत जात असे. पुढं आमची मैत्री आणखी घट्ट झाली. खूपदा रात्री उशिरापर्यंत आमच्या मैफली चालायच्या. मैफलींमध्ये त्यांच्या प्रत्येक रचनेला चढत्या श्रेणीनं दाद मिळत असे आणि भाऊसाहेबही मग त्यात रंगून जात असत.

भाऊसाहेबांच्या शायरीला एक वैश्विक परिमाण होतं. अनेक उत्तम उर्दू शायरांप्रमाणे भाऊसाहेबांची शायरीही मानवी स्वभाववैशिष्ट्यांच्या विविध पैलूंना स्पर्श करत असे. भाऊसाहेबांच्या काही रचना मला आजही आठवतात. त्यांच्या रचनांना कोणताच विषय वर्ज्य नव्हता, माणसाच्या भाव-भावना, दुःख आणि अश्रूही त्यांच्या रचनांमध्ये डोकावतात :-

आसवे नयनात जर या निर्मिली नसती कुणी
नावही त्या शायरीचे ऐकले नसते कुणी
ज्यांनी दिला हा दर्द, नयनी आसवेही निर्मिली
मी नव्हे ही शायरीही त्यांनीच आहे निर्मिली
पाटणकर थोर शायर मिर्झा गालिबनाही चॅलेंज देण्यास मागं-पुढं पाहत नाहीत! आज नसली तरी ‘आम्ही गेल्यानंतर’ आम्हालाही तेवढीच कीर्ती मिळणार आहे, असं ते गालिबना सांगतात :-

गालिब, अरे अमुच्याहि दारी, आहेच कीर्ती यायची
फक्त आहे देर थोडी, मरणास अमुच्या यायची
येणार ना अमुच्या पुढे ती, प्राण असती तोवरी
कीर्ती प्रिया माझी अरे, ही भलतीच आहे लाजरी

इष्कात स्वतःला झोकून देतानाही शायर पाटणकर स्वाभिमान सोडत नाहीत
खेळलो इष्कात आम्ही, बेधुंद येथे खेळलो
लोळलो मस्तीत नाही पायी कुणाच्या लोळले
अस्मिता इष्कात साऱ्या, केव्हाच नाही विसरलो
आली तशीही वेळ तेव्हा इष्क सारा विसरलो

शेवट जवळ येताना त्यांना जणू जाणवत होता. माणसातल्या सौंदर्याला, मोहकतेला आवाहन करताना त्यांना उरलेल्या वेळेच्या मर्यादेचीही कल्पना आहे :-
ऐसे नव्हे की आजही कंटाळलो तुम्हांस मी
सौंदर्य का विषयातले या केव्हा कुठे होते कमी
आज घटिका जीवनाची संपावयाला लागली
शुक्रिया, दारी कुणाची चाहूल यावी लागली

माणसाच्या जगण्याच्या प्रत्येक पैलूवर भाष्य करणाऱ्या त्यांच्या अशा कितीतरी रचना आठवत राहतात. त्यांच्या शायरीबद्दल लिहिताना प्रत्येक पैलूविषयी लिहीत गेलो तर जागा पुरणार नाही, यात मला मुळीच शंका नाही.

भाऊसाहेब आज आपल्यात नाहीत; पण त्यांची शायरी आजही मला त्यांच्या हृदयाची विशालता, मोकळेपणा आणि त्यांच्या मोहक व्यक्तिमत्त्वाची आठवण देत राहते. ही कहाणी सांगत असताना एक सांगायला हवं, की भाऊसाहेबांवरची कारवाई रद्द करावी हा माझा प्रस्ताव फेटाळला जाणार अशी माझी खात्री होती. सरकारी नोकरांनी ‘अवांच्छित’ लोकांचं प्रतिनिधित्व केलेलं सत्ताधाऱ्यांना रुचत नाही, असंही मला सांगण्यात आलं होतं. ज्या व्यक्तीला स्थानबद्ध करायचं आहे ती व्यक्ती गंभीर आजारी आहे हे समजल्यावरही मी त्या व्यक्तीला कारागृहात पाठवायचं, कारण सरकारचा तसा हुकूम आहे, की ही वस्तुस्थिती सरकारच्या नजरेस आणून देऊन आदेशाचा पुनर्विचार करण्याची विनंती करायची? अगदी आपली यंत्रणा ‘प्रचंड असंवेदनशील’ आहे असं आपलं मत असलं तरी इथं त्या यंत्रणेचा प्रतिसाद सकारात्मक होता. भाऊसाहेबांविरुद्धची कारवाई रद्द झाली होती. या अनुभवामुळे आपल्या व्यवस्थेवरचा आणि मानवी स्वभावातल्या मूळच्या चांगुलपणावरचा माझा विश्वास अधिक दृढ झाला. आपण जर प्रामाणिकपणे वस्तुस्थिती मांडली आणि सरकारची प्रतिमा राखण्याचा प्रयत्न केला तर सत्तेतल्या कुणाचाही प्रतिसाद नकारात्मक असत नाही. आपली यंत्रणा अशाच प्रामाणिकपणे आणि मोकळेपणाने काम करत राहील अशी आशा आपण बाळगू या. मराठीतले आजच्या पिढीतले कवी आणि शायर भाऊसाहेबांची परंपरा पुढं नेतील, अशीही आशा मी व्यक्त करतो आणि भाऊसाहेबांना माझा सलाम करून ही कहाणी संपवतो.

(वरील लेखात उल्लेखिलेल्या भाऊसाहेब पाटणकर यांच्या ओळी
पुणे येथील ‘उत्कर्ष प्रकाशना’नं प्रसिद्ध केलेल्या ‘दोस्त हो!’ या पुस्तकातून साभार.)
(या लेखाचे बौद्धिक संपदा हक्क लेखकाकडे आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang s s virk write in and out crime article