अपहरणकर्त्यांच्या मागावर : १ (एस. एस. विर्क)

s s virk
s s virk

लोक, माध्यमं, राजकीय नेते नाराज होते. त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळत नव्हती. ‘पोलिसांचा तपास सुरू आहे,’ एवढंच राजकीय नेते सांगू शकत होते. एक दिवस मुख्यमंत्र्यांनी मला बोलावून घेतलं. मी प्रसारमाध्यमांशी बोलावं अशी त्यांची इच्छा होती; पण मी त्यांना नम्रपणे नकार दिला.

गेल्या वेळच्या लेखात मी लिहिलं होतं की ‘फिरौती’साठी एखाद्या श्रीमंत व्यक्तीचे अपहरण करण्याच्या केसेसमध्ये वाढ झाली आहे. पटकन पैसा कमावून देणाऱ्या या मार्गाची बऱ्याच गुन्हेगारांना भुरळ पडते; पण हा रस्ता त्यांना आणखी गंभीर गुन्ह्यांकडे घेऊन जाण्याची शक्‍यता मोठी असते. अपहृत व्यक्ती काही वेळापळून जाण्याचा प्रयत्न करतात. अपहृतानं सुटका करून घेतली तर पकडले जाण्याच्या भीतीपोटी त्यांच्या सावजाला ठार मारण्यापर्यंत अपहरणकर्त्यांची मजल जाते. अपहरणाचं प्रकरण एकदम खुनापर्यंत पोचतं आणि गुन्हा आणखी गंभीर होत जातो. शिवाय, गुन्हेगार कितीही सावध असले तरी ते काही ना काही खुणा मागं ठेवतातच आणि शेवटी पकडले जातात. अशाच एका अपहरणाची ही कहाणी.

अमृतसर हे पंजाबमधलं एक महत्त्वाचं व्यापारीशहर. चहा आणि तांदळाचा व्यापार, तसंच निर्यातीबरोबर पश्‍चिम किंवा मध्य आशियातून पाकिस्तानमार्गे आयात होणाऱ्या इतरही वस्तूंच्या व्यापाराच्या दीर्घ परंपरेनं अमृतसरमधले काही व्यापारी अत्यंत संपन्न आहेत. पन्नाशीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या दलजितसिंग
उर्फ डम्पी यांनीही अशाच निर्यातव्यवहारांमधून प्रचंड संपत्ती कमावली
होता. मध्य आशियाई देशांमध्ये निर्यात होणाऱ्या बासमती आणि इतर जातींच्या तांदळाचे ते मुख्य पुरवठादार समजले जायचे. वैयक्तिक आयुष्यातही ते अतिशय अभिरुचिसंपन्न होते. अमृतसरमधल्या उच्चभ्रू वर्तुळात त्यांची ऊठ-बस असायची. त्यांना उंची गाड्यांची आवड होती. संपत्ती वाढत गेली तशा अधिकाधिक महाग आणि प्रसिद्ध ब्रॅंडच्या गाड्या त्यांच्या ताफ्यात दाखल होत गेल्या होत्या. घरातल्या प्रत्येकासाठी एकेक गाडी होती. सगळ्या गाड्या परदेशी
बनावटीच्या. त्यांची सोळा वर्षांची मुलगी हरलीन आणि मुलगा प्रभजित यांना रोज शाळेत जाण्या-येण्यासाठीही स्वतंत्र गाड्या होत्या. गाड्यांचा ताफा, प्रचंड संपत्ती या सगळ्यामुळे डम्पी आणि त्यांचं सगळंच कुटुंब कायम चर्चेत असायचं, इतकं की काही जणांना त्यांचा हेवा वाटत असे; पण डम्पी त्यांच्या परिवारासह अत्यंत निःशंकपणे अत्यंत समृद्ध आयुष्य जगत होते.

अठरा वर्षांचा प्रभजित त्या वेळी इंजिनिअरिंगच्या प्रवेश परीक्षेची तयारी
करत होता. त्यासाठी त्यांनी एक क्‍लास जॉईन केला होता. सन २००५ च्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात क्‍लासला गेलेला प्रभजित संध्याकाळी परतलाच नाही. क्‍लास संपल्यावर त्याच्या काही मित्रांनी त्याला काही अनोळखी लोकांबरोबर जाताना पाहिलं होतं; पण कुणालाच काही वेगळं वाटलं नव्हतं. उशिरापर्यंत प्रभजित न आल्यानं त्याच्या घरच्या लोकांनी शोधाशोध सुरू केली. पोलिसांना कळवल्यावर त्यांनीही प्रभजितला किंवा त्याची कार शोधण्यासाठी काही पथकं पाठवली. कारचा नंबर आणि इतर सगळी माहिती वायरलेसवरून प्रसारित करण्यात आली. रात्रभर संपूर्ण शहर पालथं घालूनही प्रभजितचा शोध लागू शकला नव्हता.
फेब्रुवारी २००५ च्या एक तारखेलाच मी पंजाबच्या पोलिस महासंचालकपदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यानंतर लगेचच ही घटना घडली होती. अमृतसरच्या एका व्यापाऱ्याचा मुलगा बेपत्ता झाल्याचं कंट्रोल रूमकडून समजल्यावर मी अमृतसरच्या वरिष्ठ अधीक्षकांना फोन करून ‘मुलाला शोधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करा आणि तपासात काय प्रगती झालीय ते दुसऱ्या दिवशी सकाळी मला कळवा’ असं सांगितलं. या प्रकरणावर चर्चा करायला आणखी काही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनाही मी बोलावून घेतलं. प्रभजितच्या कुटुंबाची श्रीमंती सहज दिसून येत असल्यानं हा ‘फिरौती’साठी अपहरण करण्याचा प्रकार असावा असा माझा संशय होता; पण या प्रकरणाच्या तपासासाठी काहीतरी प्लॅन आखणं आवश्‍यक होतं. मीटिंगच्या आधी माझ्या सहकाऱ्यांनी या प्रकरणाची सगळी माहिती अमृतसरहून मागवून घेतली. प्रभजित नेहमीप्रमाणे क्‍लासला गेला होता. तिथून तो एकटाच बाहेर पडला. क्‍लासमधल्या काही मुलांनी त्याची कार उलट्या दिशेनं शहराबाहेर जाणाऱ्या रस्त्याकडे जाताना पाहिली होती. कारमध्ये आणखी काही लोक होते; पण अंधार असल्यामुळे त्यांच्याबद्दल कुणीच काही माहिती देऊ शकलं नाही. मात्र, प्रभजित कार चालवत नव्हता एवढी माहिती त्यांच्याकडून मिळाली. आम्ही बरीच चर्चा केली. आमच्या हातातल्या माहितीवरून प्रभजित स्वतःहून त्या लोकांबरोबर गेला असं दिसत नव्हतं. हा अपहरणाचाच प्रकार असला तरी अजूनही कुणी ‘फिरौती’साठी संपर्क साधलेला नव्हता. तपासाचा भाग म्हणून आम्ही काही समांतर फोनलाईन्स बसवून घेतल्या. चंडीगडमधल्या माझ्या ऑफिसमध्येही मी एक समांतर फोन बसवून घेतला; पण दुसऱ्या दिवशीही ‘फिरौती’साठी फोन आला नाही. प्रभजित बेपत्ता झाल्याच्या दुसऱ्या दिवशी लुधियानाजवळच्या एका गुरुद्वारापाशी एक गाडी सापडल्याची माहिती मिळाली. ती गाडी प्रभजितची निघाली. पोलिस गाडीची माहिती सगळीकडे कळवतील आणि ते पकडले जातील याची अपहरणकर्त्यांना कल्पना असावी त्यामुळे त्यांनी ती गाडी सहज सापडेल अशा तऱ्हेनं पार्क करून दुसऱ्या गाडीतून पळ काढला असावा; पण त्या गाडीवर आम्हाला हातांचे काही ठसे मात्र मिळाले.

आता प्रसारमाध्यमांमधूनही या प्रकरणाची चर्चा सुरू झाली होती. अपहरणाच्या तपासाला काहीतरी दिशा मिळावी यासाठी आम्ही धडपडत होतो; पण अजून तरी आम्हाला यश आलं नव्हतं. प्रभजितचे मित्र, त्याचं कॉलेज, क्‍लास, जिम अशा सगळ्या ठिकाणी आम्ही चौकशी करत होतो. क्‍लासबाहेरून त्याचं अपहरण झालं असेल तर
आधी कुणीतरी त्या परिसरात ‘रेकी’ केली असणार; पण तसंही काही हाती लागत नव्हतं.
प्रभजितच्या घरातल्यांकडूनही आम्ही माहिती घेतली. प्रभजितच्या वडिलांना हृद्‌रोग असल्यानं ‘फिरौती’साठी फोन आला तर फक्त प्रभजितच्या आईनंच तो घ्यायचा अशा सूचना आम्ही कुटुंबीयांना दिल्या. प्रभजितच्या आईशीही आम्ही तपशीलवार बोललो. गोंधळून न जाता त्यांनी फोन करणाऱ्या व्यक्तीला मुलाची सुटका करण्याची विनंती करावी, अपहरणकर्त्यांना काय हवं आहे ते समजून घ्यावं आणि फोन करणाऱ्या माणसाला जास्तीत जास्त वेळ बोलण्यात गुंतवण्याचा प्रयत्न करावा म्हणजे कॉल ट्रेस करण्यासाठी आम्हाला पुरेसा वेळ मिळेल, अशा सूचनाही आम्ही त्यांना दिल्या; पण हे अजिबात सोपं नव्हतं.

अपहरणाच्या अशा प्रकरणांमध्ये हात असणाऱ्या टोळ्यांचीही माहिती काढायलाही आम्ही सुरवात केली होती. पंजाबमध्ये असे गुन्हे करणारी टोळी आमच्या रेकॉर्डवर नव्हती; पण लगतच्या दिल्ली, पश्‍चिम उत्तर प्रदेश, हरियाना आणि राजस्थानमध्ये असे गुन्हे करणाऱ्या बऱ्याच टोळ्या होत्या. खबरदारीचा उपाय म्हणून मी पाच पथकं तयार केली. प्रत्येक पथकात अशा प्रकारचे गुन्हे हाताळण्याचा अनुभव असणारे पाच ते सहा अधिकारी होते. यातली दोन पथकं दिल्लीत राहून स्थानिक पोलिसांशी सतत संपर्क ठेवून असणार होती. उरलेल्यांपैकी एक मिरतमध्ये, एक गुरगांवला आणि एक पथक राजस्थानात पाठवण्यात आलं होतं. आम्ही दिवसातल्या दोन वेळा ठरवून घेतल्या होत्या; त्या वेळी त्यांनी माझ्याशी फोनवर संपर्क साधायचा होता; पण यातूनही तपासाला काही दिशा मिळाली नाही.
आम्ही अजूनही अंधारातच चाचपडत होतो.
गुन्हेगार सापडत नसल्याबद्दल वर्तमानपत्रं आणि इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांनी
आता पोलिसांना दोष द्यायला सुरुवात केली होती. अद्याप ‘फिरौती’ची मागणी झाली नव्हती, त्यामुळे खरोखरच प्रभजितचं अपहरण झालंय का, अशीही शंका माध्यमं उपस्थित करत होती. हे अपहरणच आहे हे दाखवण्याइतका पुरावा आमच्याकडे नसल्यानं आमची अवस्था अवघड झाली होती. समांतर फोनलाईन्सवर बारकाईनं लक्ष ठेवूनही काही उपयोग नव्हता.

चौथ्या दिवशी एक फोन आला. बोलणाऱ्या माणसानं ‘प्रभजितच्या वडिलांना, दलजितसिंग डम्पी यांना, फोनवर बोलवा’ असं सांगितलं. बोलणाऱ्याचा आवाज जाडाभरडा असला तरी त्याच्या आवाजात एक रुबाब होता आणि बोलण्यात ग्रामीण भागात बोलल्या जाणाऱ्या पंजाबी भाषेची झाक होती. आपण दहशतवादी असून पाकिस्तानातून बोलत असल्याचं सांगून त्या माणसानं दलजीतना ‘तुमचा मुलगा
आमच्या ताब्यात आहे. आम्हाला आणि आमच्या खालिस्तानी साथीदारांना काश्‍मीर आणि खालिस्तानच्या लढ्यासाठी पैसे हवे आहेत. तुम्ही पाच कोटी रुपये दिलेत तर तुमच्या मुलाला सोडू, नाहीतर मारून टाकू. काही तासांनी पुन्हा फोन करून
पैसे कसे द्यायचे ते कळवतो,’’ असं सांगितलं. फोन डिस्‌कनेक्‍ट होऊ न देता दलजितसिंगांनी त्या माणसाला आपल्या पत्नीशी बोलायला सांगितलं. मग प्रभजितच्या आईनं ‘मुलाला काही अपाय करू नका’ अशी विनवणी फोनवरून करायला सुरुवात केली.
आम्हाला मुलाशी बोलू द्या, आम्ही पैसे देतो; पण त्याला काही करू नका, असंही त्या सांगत राहिल्या. पैसे देण्याआधी मुलाशी बोलणं करून द्या, असंही त्या वारंवार सांगत होत्या; पण ‘‘पुन्हा फोन करतो,’’ असं म्हणत त्या माणसानं फोन कट केला.
फोन आल्यामुळे नाही म्हटलं तरी आमच्यावरचा ताण जरा हलका झाला होता. तपास करायला आम्हाला एक दिशा सापडली होती. आम्ही तातडीनं, फोन कुठून केला गेला होता,
याची माहिती घेणं सुरू केलं. ज्या नंबरवरून फोन आला होता तो नंबर
पाकिस्तानातला होता. आम्ही आमच्या टेलिकम्युनिकेशन तज्ज्ञांमार्फत
केंद्रीय यंत्रणांची मदत घेतली. दिवसभर खपल्यानंतर आमच्या हाती काही माहिती लागली. दिल्लीतल्या एका पब्लिक फोनवरून दुबईला एक आंतरराष्ट्रीय कॉल केला गेला होता आणि तोच कॉल नंतर पाकिस्तानातून प्रभजितच्या घरच्या फोन नंबरवर रूट केला गेला होता.

आमच्या या तपासाचा सुगावा बहुधा अपहरणकर्त्यांना लागला असावा. कारण, नंतर संध्याकाळी त्यांनी दिल्लीतूनच दुसऱ्या नंबरवरून फोन केला होता. हा फोन पाकिस्तानातून रूट झालेला नव्हता. आमच्या पथकांनी दोन्ही पीसीओंमध्ये चौकशी केली; पण तीन लोक पांढऱ्या रंगाच्या जुन्या मारुती कारमधून आले होते,
यापलीकडे फार काही माहिती मिळू शकली नाही. जेवढी माहिती मिळाली तिच्याआधारे आम्ही आमची रेकॉर्ड्‌सही तपासली. बाहेरच्या कुणाचा या अपहरणात काही हात आहे का हे तपासण्यासाठी आम्ही दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाना आणि राजस्थान पोलिसांच्याही संपर्कात होतो; पण स्थानिक माणसाच्या मदतीशिवाय असा गुन्हा करणं शक्‍य वाटत नव्हतं.

अपहरणकर्त्यांनी पुन्हा फोन केला. त्या वेळी पोलिसांची मदत घेतली म्हणून ते चिडले होते. ‘‘आमचं लक्ष आहे. पोलिसांच्या सल्ल्यानं चाललात तर तुमचा मुलगा मारला जाईल. मुलगा सुरक्षित राहायला हवा असेल तर पोलिसांपासून लांब रहा,’’ असं त्या अज्ञात व्यक्तीनं प्रभजितच्या आईला सांगितलं. फोन करणारी व्यक्ती
मुस्लिम आहे असं लक्षात आल्यावर प्रभजितच्या आईनं पवित्र कुराणातले दाखले देत, दया दाखवून मुलाला सोडा, असं त्याला सांगायला सुरुवात केली. हे सगळं संभाषण रेकॉर्ड होत होतं. नंतर ते पुनःपुन्हा ऐकून आम्ही बोलण्याचा ढंग, फोन सुरू असताना येणारे इतर आवाज यावरून आणखी काही दिशा मिळवण्याचा प्रयत्न
करत होतो. एकंदर बोलण्यावरून या व्यक्तीची बोलण्याची ढब पंजाबच्या ‘माझा’ या भागातल्यासारखी आहे, असं आमच्या लक्षात आलं; पण एवढं पुरेसं नव्हतं. आम्ही आमचं काम सुरूच ठेवलं. डम्पी यांच्या इतर काही नातेवाइकांच्या फोनवरही आमचं
लक्ष होतं; पण अजूनही आमच्या हाती काहीच लागलं नव्हतं.
‘‘पाच कोटी रुपये देण्याची आमची कुवत नाही. आमची परिस्थिती लक्षात घेऊन ‘फिरौती’ची रक्कम ठरवा. योग्य विचार केला तर तुम्हाला पैसे मिळतील आणि आम्हाला आमचा मुलगा परत मिळेल, यात कुणाचाच तोटा नाही; पण पाच कोटी इतकी रक्कम उभी करणं शक्‍य नाही,’’ असं प्रभजितच्या आईनं अपहरणकर्त्यांना सांगितलं होतं. मात्र, अपहरणकर्ते त्यांच्या मागणीवर अडून होते. ‘‘देवाची तरी भीड बाळगा, माझ्या मुलाला सोडा,’’ असं सांगताना प्रभजितच्या आईचा आवाज भरून आला होता. ‘मुलाशी बोलू द्या,’ असाही आग्रह त्या सतत करत होत्या. अपहरणकर्त्यांकडून येणाऱ्या फोन कॉल्समध्ये आता आम्हाला काही विशिष्ट पद्धत सापडत होती. जेव्हा ते प्रभजितचं त्याच्या आईशी बोलणं करून द्यायचे तेव्हा दर वेळी ते जागा बदलत होते. आम्ही कॉल ट्रेस करू अशी भीती त्यांना होती. ती खरीच होती. कारण, प्रत्येक कॉलनंतर आमची पथकं
तिथं पोचून फोन करणाऱ्या लोकांविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असत; पण फोन येण्याची ठिकाणंही खूप दूरदूरची होती. एक
फोन झांशीहून आला होता. नंतर एक फोन कानपूरहून, एक भटिंड्याहून आणि एक दिल्लीतून आला होता.

अपहरण होऊन आता तीन आठवडे उलटून गेले होते. पोलिसांवर खूप टीका होत होती. अमृतसरमधल्या विद्यार्थ्यांनी एक कॅंडल मार्चही काढला होता; पण आम्ही ‘अजूनही आम्हाला कोणतीच दिशा मिळालेली नाही,’ असंच सांगत होतो.
प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना आम्ही फक्त नकारार्थी उत्तरं देत होतो.
अपहरणकर्त्यांच्या फोनकॉल्सची छाननी सुरूच होती. जिथून कॉल केले गेले त्या प्रत्येक भागातल्या सगळ्या मोबाईल टॉवरवरून प्रत्येक कॉलच्या दहा मिनिटं आधी आणि दहा मिनिटं नंतर ज्या ज्या नंबरवर फोन झाले असे सगळे नंबर आम्ही एकत्र करत होतो. प्रत्येक टॉवरवर मिळणाऱ्या हजारो नंबरमध्ये काही समान नंबर मिळतात का, त्या काळात पंजाबमधल्या नंबरवर काही फोन झालेत का याचाही शोध
सुरू होता. झांशी, कानपूर, भटिंडा आणि दिल्लीच्या वेगवेगळ्या उपनगरांतल्या टॉवरवरून झालेल्या फोनचे नंबर आम्ही मिळवले होते. या सगळ्यातून आम्ही पंजाबमधल्या नंबरवर झालेल्या फोनकॉल्सवर लक्ष केंद्रित केलं होतं.

दिवसभराचं काम आटोपून मी स्वतः रोज संध्याकाळी पाच वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत या केसवर काम करत होतो. शेवटी, आमच्या हातात दहा नंबर उरले.
‘फिरौती’साठी जेव्हा फोन करण्यात आले तेव्हा ते फोन त्याच भागात ॲक्टिव्ह होते. हे सगळे नंबर पंजाबमधलेच होते. त्या सगळ्या फोनच्या मालकांचीही माहिती आम्ही मिळवली. त्यात एक माजी पोलिस होता. तस्करांशी संगनमत केल्याचा आरोपामुळे त्याला डिसमिस करण्यात आलं होतं. हे सगळं गाजावाजा न करता सुरू
होतं. आता चित्र थोडं स्पष्ट व्हायला लागलं आहे, असं वाटू लागलं होतं. तो बडतर्फ पोलिस, बुटासिंग, आमच्या संशयितांच्या यादीत होता.
दरम्यान, प्रभजितच्या कुटुंबीयांचा आमच्याबरोबरचा संपर्क कमी होतोय असं दिसू लागलं होतं. ते आमच्या अधिकाऱ्यांना टाळायला लागले होते. कदाचित आमच्या पाठीमागं, प्रभजितला अपाय होऊ न देता सोडवण्याचा त्यांचा प्रयत्न असावा. त्यांनी ‘फिरौती’ची रक्कम देऊन प्रभजितला सोडवायलाही माझी काही हरकत नव्हती. आम्ही आतापर्यंत जे प्रयत्न केले होते ते आम्हाला अपहरणकर्त्यांपर्यंत पोचवतील याबद्दल माझ्या मनात शंका नव्हती.
लोक, माध्यमं, राजकीय नेते नाराज होते. त्यांना त्यांच्या प्रश्नांची
उत्तरं मिळत नव्हती. पोलिसांचा तपास सुरू आहे, एवढंच राजकीय नेते सांगू शकत होते. एक दिवस मुख्यमंत्र्यांनी मला बोलावून घेतलं. मी
प्रसारमाध्यमांशी बोलावं अशी त्यांची इच्छा होती; पण मी त्यांना नम्रपणे नकार दिला.
‘‘आमच्या हाती अजूनही फार काही लागलेलं नाही, त्यामुळे हा समज
तसाच राहावा. ‘फिरौती’ची रक्कम द्यावी लागली तरी चालेल; पण त्या मुलाची सहीसलामत सुटका व्हावी असं मला वाटतं,’’ असं मी त्यांना सांगितलं. एकदा तो घरी परतला की मग आम्ही पुढचं पाऊल उचलू. ‘फिरौती’ द्यावी लागली तरी गुन्हेगारांना पकडून आम्ही ते पैसे परत मिळवू, या माझ्या म्हणण्याशी ते फारसे सहमत झाले नव्हते; पण त्यांनी ते मान्य केलं.

अपहरण झालेल्या मुलाच्या नातेवाइकांवरही आमचं बारकाईनं लक्ष होतं. दिल्लीतले त्याचे काही नातेवाईक एकाएकी ॲक्टिव्ह झाल्याचं एक दिवस आमच्या लक्षात आलं. मी दिल्लीतल्या आमच्या चारही टीमना सावध केलं. वेळ पडली तर साध्या वेशात पूर्ण तयारीनिशी, पुरेशा शस्त्रांसह त्या नातेवाइकांच्या मागावर रहाण्याच्या सूचना दिल्या. आम्ही त्यांच्या फोनवर लक्ष ठेवून असतानाच, प्रभजितचे दोन मामा दिल्लीतून बाहेर पडत असल्याचं आमच्या लक्षात आलं. दोन गाड्यांमधून ते उत्तर प्रदेशातल्या अगदी आतल्या भागाकडे निघाले
होते. आमच्या टीम त्यांच्या मागं होत्या. मीदेखील त्या टीमच्या संपर्कात होतो. संशय येणार नाही अशा पद्धतीनं गाड्या पुढं-मागं ठेवत पाठलाग करण्याच्या सूचना मी आमच्या टीमना दिल्या होत्या. खूप वेळ त्या दोन्ही गाड्या कुठंही थांबल्या नाहीत. नंतर एके ठिकाणी थांबून ते मोबाईलवर कुणाशी तरी बोलले. बहुधा कुणीतरी त्यांना कुठं जायचं ते सांगत होतं. काही वेळानं ते उत्तर प्रदेशातल्या पिलभित भागातल्या एका गुरुद्वारापाशी थांबले. आमचे अधिकारी काही अंतरावरून दुर्बिणींमधून त्यांच्यावर लक्ष ठेवून होते. दोन मारुती कारमधून आलेले काही लोक तिथं आधीपासूनच त्यांची वाट पाहत होते, असं दिसत होतं. प्रभजितच्या मामांनी आणलेली ‘फिरौती’ची रक्कम घ्यायला चार अपहरणकर्ते आले असावेत असं आमच्या लोकांना वाटत होतं.

‘‘सर, आम्ही आत्ता त्यांच्यावर हल्ला करू शकतो. ते चौघंच आहेत आणि त्यांच्याकडची शस्त्रंही लहान आहेत. आम्ही सोळा जण आहोत. आमच्याकडे एके-४७ पण आहेत. आम्हाला परवानगी द्या,’’ आमचे एक अधिकारी मला विचारत होते.
‘‘नाही,’’ मी म्हणालो : ‘‘त्यांनी प्रभजितला बरोबर
आणलेलं नाही. आपली घाई त्याच्या जिवावर बेतू शकते. जरा धीर धरा. तुम्ही आत्ता फक्त लक्ष ठेवा.’’
पोलिस त्यांच्या पाळतीवर असल्याचं त्या अपहरणकर्त्यांच्या लक्षात आलं होतं. त्यांनी फोन करून प्रभजितच्या वडिलांना धमकावलं. त्यांनाही पोलिस तिथं पोचल्याचं ऐकून धक्का बसला. त्यांनी लगेच मला फोन केला : ‘‘साहेब, कृपा करून तुमच्या माणसांना तिथून जायला सांगा. माझा मुलगा मारला जाईल. तुम्ही कशाला
तिकडे पोलिस पाठवलेत?’’
आमच्या टीम दिल्ली, उत्तर प्रदेश आणि बाकीच्या राज्यांमध्ये आहेत हे मी त्यांना आधीच सांगितलं होतं, हे मी त्यांच्या लक्षात आणून दिलं.
‘‘पिलभितमध्ये असताना त्यांना काही संशयास्पद हालचाली दिसल्या,’’ मी त्यांना म्हणालो.
‘‘प्लीज त्यांना तिथून जायला सांगा. नाहीतर ते माझ्या
मुलाला मारतील’’ प्रभजितचे वडिल पुन्हा म्हणाले.
मी माझ्या अधिकाऱ्यांना तिथून जायला सांगितलं; पण ते अजिबात तयार नव्हते.
जेमतेम चारशे यार्डांवर अपहरणकर्ते पैसे घेत असल्याचं त्यांना दिसत होतं. पोलिसांसमोर अशा गोष्टी क्वचितच घडतात.
‘‘तुम्ही तिथं थांबू नका. आपण पुन्हा त्यांना शोधून काढू; पण प्रभजितचा जीव गेला तर आपण सगळाच डाव
हरल्यासारखं होईल. आता एकही प्रश्न न विचारता तुम्ही तिथून निघा,’’ मी माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलं. मग दलजितसिंगना फोन करून माझे अधिकारी तिथून गेल्याचं त्यांना कळवलं. आता पैसे द्यायला काही अडचण नव्हती. प्रभजितची सुटका होईल असं मलाही वाटत होतं.

प्रभजित सुखरूप घरी पोचल्याचं त्याच्या वडिलांनी मला दुसऱ्या दिवशी फोन करून सांगितलं. अपहरणकर्त्यांनी त्याला तिकिटापुरते पैसे देऊन एका छोट्या रेल्वे स्टेशनवर सोडलं होतं. घरी फोन केल्यावर त्याच्या नातेवाइकांनी त्याला लुधियाना स्टेशनवरून घरी नेलं. पाच आठवड्यांनी मुलगा घरी परतल्यानं घरी आनंदाचं वातावरण होतं. पोलिसही दोन गोष्टींमुळे खूश होते. एक, प्रभजित सुखरूप परतला होता आणि दुसरं म्हणजे, आता प्रभजितच्या सुरक्षेची काळजी
नव्हती. आता आम्हाला जमा केलेल्या माहितीचा उपयोग करून गुन्हेगारांपर्यंत पोचता येणं शक्‍य होतं.
पुढं काय करायचं याचा प्लॅन माझ्याकडे तयार होता. मी मुख्य गुन्हेगारांच्या अगदी जवळ पोचलो आहे, असं मला वाटत होतं. मी फक्त प्रभजित सुखरूप परतण्याची वाट पाहत होतो.
खरा मजेदार गेम आता सुरू होणार होता...

(या कहाणीतल्या व्यक्तींची नावं बदलण्यात आली आहेत.)
(या लेखाचे बौद्धिक संपदा हक्क लेखकाकडे आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com