अपहरणकर्त्यांच्या मागावर : २ (एस. एस. विर्क)

s s virk
s s virk

आमच्यातल्या काही अधिकाऱ्यांनी उत्साहाच्या भरात सगळ्या गुन्हेगारांचं एन्काउंटर करण्याविषयीही सुचवलं. त्यामुळे गुन्हेगारांना एक जबरदस्त ‘तगडा मेसेज’ जाईल असं त्यांना वाटत होतं. मात्र, मी ते हसून टाळलं.

‘फिरौती’साठी झालेल्या अपहरणांचा तपास अत्यंत काळजीपूर्वक करावा लागतो. थोड्याशाही निष्काळजीपणामुळे अपहरणकर्त्यांच्या मनात भीती, शंका उत्पन्न झाली तर अपहृत व्यक्तीच्या जिवावर बेतण्याची शक्‍यता असते. प्रभजितच्या प्रकरणातही मला असा धोका पत्करायचा नसल्यानं मी अमृतसरच्या वरिष्ठ पोलिस अधीक्षकांना या प्रकरणाचा तपास करताना फारसा गवगवा न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. गुन्हेगारांना गाफील ठेवण्यासाठी आम्हाला गाजावाजा न करता हालचाली करणं भाग होतं. प्रसारमाध्यमांना किंवा अगदी प्रभजितच्या कुटुंबीयांनाही आमच्या प्रयत्नांची खबर लागू न देता आम्ही हातातल्या माहितीवर काम करत होतो.

आमच्या हाताला अजूनही ठोस असं काहीच लागलेलं नव्हतं. प्रभजितच्या सोडून दिलेल्या गाडीवर काही ठसे मिळाले होते; पण आमच्या रेकॉर्डवरच्या कोणत्याच ठशांशी ते जुळत नव्हते. गुन्हेगार एकतर याआधी कधी पोलिसांच्या तावडीत सापडले नव्हते किंवा ही त्यांची पहिलीच वेळ होती. दिल्ली, हरियाना, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातल्या पोलिसांकडे केलेल्या चौकशीतून, कोचिंग सेंटरमधल्या इतर विद्यार्थ्यांकडून किंवा पीसीओ मालकांकडूनही फारशी माहिती मिळालेली नव्हती. संशयितांवर लक्ष ठेवताना आमच्या टीममधल्या काही लोकांनी त्यांना पीलीभीतच्या गुरुद्वाराजवळ दुर्बिणीतून पाहिलं होतं; पण तेव्हाही आपल्यावर लक्ष आहे हे लक्षात आल्यावर संशयितांनी लगेच चेहरे झाकून घेतले होते. मात्र, त्या वेळी त्यांची शारीरिक ठेवण काहीशी लक्षात आली होती. त्यांच्यातले दोघे चांगले भक्कम दिसत होते. त्यातला एकजण जरा जास्तच जाडजूड होता. त्याचा वर्ण गव्हाळ होता, तर दुसऱ्याचा चेहरा काळसर आणि ओबडधोबड होता. पहिल्यानं दाढी, मिश्या सफाचट केल्या होत्या, तर त्या दुसऱ्या काळसर माणसानं छोटी दाढी ठेवली होती. हे दोघं म्होरके असावेत. कारण उरलेले साधारण शरीरयष्टीचे दोघं पहिल्या दोघांच्या सांगण्यानुसार बॅगा गाडीत ठेवण्याची वगैरे कामं करत होते. चौघांचे कपडेही साधेच होते; पण या सगळ्या माहितीतूनही तपासाला नेमकी दिशा मिळेल असं काहीच पुढं येत नव्हतं.
मात्र, आता प्रभजितची सुटका झाल्यानं गुन्हेगारांना पकडण्यासाठी आमच्याकडे भरपूर वेळ होता. मी आता थोडा धोकाही पत्करू शकत होतो; पण त्याआधी प्रभजितला अपहरणाच्या धक्‍क्‍यातून सावरण्यासाठी थोडा वेळ द्यायला हवा होता. थोडे दिवस गेल्यानंतर प्रभजितच्या घरी जाऊन त्याच्यावर दबाव येणार नाही अशा बेतानं त्याच्याकडून माहिती घेण्याच्या सूचना मी अमृतसरच्या अधिकाऱ्यांना दिल्या. त्यातूनही फार काही मिळालं नाही. मग मी दलजितसिंगना मुलाला घेऊन चंडीगडला मला भेटायला बोलावलं. मी अमृतसरला गेलो असतो तर त्याला विनाकारण प्रसिद्धी मिळाली असती म्हणून मी ते टाळलं. प्रभजितला मोकळेपणाने बोलता यावं म्हणून त्यांना भेटण्यासाठी आम्ही सुटीचा दिवस निवडला. त्यामुळे इतर रूटीन कामांचाही प्रश्न नव्हता, प्रभजितला भरपूर वेळ देता येणार होता. आदल्या दिवशी रात्री त्यांनी चंडीगडमध्ये यावं म्हणजे सकाळी एकत्रच ब्रेकफास्टही घेता येईल, असं मी त्यांनी सुचवलं. इतर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही मी बोलावलं होतं. आम्ही सगळेच साध्या वेशात होतो. प्रभजितच्या आवडी-निवडी एव्हाना आम्हाला समजल्या होत्या. त्यानुसार ब्रेकफास्टचा बेत होता. प्रभजितला मोकळं वाटावं असा आमचा प्रयत्न होता. ब्रेकफास्ट करतानाही आम्ही इतर विषयांवरच बोलत होतो.

नाश्ता झाल्यावर प्रभजितनं त्याची हकीकत सांगायला सुरुवात केली. त्याच्यासाठी माझ्याकडे बरेच प्रश्न होते; पण आधी मला त्याच्याकडून पूर्ण स्टोरी ऐकायची होती. त्या दिवशी क्‍लास संपल्यानंतर तो त्याच्या गाडीकडे जात असताना त्याला चारजणांनी अडवलं. चौघांनीही चेहरे झाकून घेतले होते. त्यातले दोघं चांगले जाडजूड होते. त्याला पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांनी प्रभजितला ‘आमच्याबरोबर आला नाहीस तर मारून टाकू’ अशी धमकी दिली. घाबरून गेल्यानं, ‘मला मारू नका’ म्हणत तो त्यांच्याबरोबर जायला तयार झाला. त्यांनी त्याला त्याच्याच गाडीत समोरच्या सीटवर दोघाजणांच्या मध्ये बसवलं, उरलेले दोघं मागच्या सीटवर बसले आणि तिथून ते अमृतसर शहराच्या बाहेरच्या रस्त्याकडे निघाले. कुठल्या दिशेनं जातोय हे प्रभजितला कळू नये म्हणून त्याच्या तोंडावर त्यांनी एक फडकं बांधून टाकलं होतं.
प्रवासादरम्यान अपहरणकर्ते आपापसात बोलत होते; पण त्यांच्या बोलण्यात कुणाचीच नावं आली नाहीत. प्रभजितच्या तोंडावरचं फडकं वाऱ्यानं उडत असल्यानं अधूनमधून त्याला काही गोष्टी दिसत होत्या. चौघांमधला एक कमी जाड माणूस गाडी चालवत होता आणि दुसरा एक काळसर माणूस त्याच्या बाजूला बसला होता. त्याच्या आवाजात जरब होती, बहुदा तो टोळीचा म्होरक्‍या होता. बाकीचे तिघे त्याचं ऐकत होते. आणखी एक किंवा त्याहून अधिक गाड्या बहुधा त्यांच्या मागं असाव्यात. कारण, त्यांच्या बोलण्यात ‘मुर्गा’, ‘ठिकाण’ किंवा ‘छोटी गड्डी’, ‘वड्डी गड्डी’ असे शब्द येत होते. ते त्यांनी आधी ठरवून घेतलेले असावेत. त्यांची भाषा खेडवळ होती आणि बोलताना ते भरपूर शिव्या देत होते. प्रभजितलाही ते धमकावत होते; पण त्यांनी त्याला धक्काबुक्की, मारहाण केली नाही. मध्येच एकदा त्याच्या चेहऱ्यावरचं कापड वाऱ्यानं उडून पडल्यावर त्याला त्यांचे चेहरे पाहता आले; पण मागं बसलेल्या माणसानं पुन्हा त्याचा चेहरा झाकून टाकला. आणखी एकदा कापड उडालं असताना आपण बियास नदीच्या पुलावरून जात असल्याचं त्याच्या लक्षात आलं. तो तिथून बऱ्याचदा आला-गेला असल्यानं तो पूल त्याच्या माहितीचा होता. पुलाच्या दोन्ही बाजूंना पोलिस नाकी होती. त्याच्या डावीकडे बसलेल्या माणसानं पोलिसांकडे पाहून हात हलवल्यावर एका पोलिसानं त्या माणसाला सॅल्यूट केला असं प्रभजितला वाटलं.
पोलिसांमधलंच कुणीतरी या प्रकरणात असेल का? तपास करताना हा मुद्दाही लक्षात घ्यायला हवा होता. संशयित पोलिसांच्या हालचाली तपासणंही आवश्‍यक होतं.
दोन-तीन तासांच्या प्रवासानंतर अपहरणकर्त्यांनी त्याला दुसऱ्या एका गाडीत बसवलं, प्रभजित सांगत होता. जिथं त्यांनी गाडी बदलली तिथं कीर्तनाचा आवाज ऐकू येत होता. म्हणजे दुसऱ्या दिवशी प्रभजितची गाडी जिथं सापडली त्या लुधियानातल्या गुरुद्वाराजवळच त्यांनी गाडी बदलली असावी. आणखी दोन तासांच्या प्रवासानंतर त्यांनी प्रभजितला एका घरात नेलं. पुढचे काही दिवस त्याला याच घरातल्या एका खोलीत कुलूपबंद करून ठेवलं होतं. त्या घरात आणखी दोन वेगळी माणसं होती. त्याला ज्यांनी पळवलं होतं ते लोक आता कुठं दिसत नव्हते. ठराविक वेळेला एक वृद्ध शीख व्यक्ती प्रभजितला खोलीतच जेवण आणि चहा देत असे. बाकी वेळेला ती खोली बंद असायची. जेवण देणारा वृद्ध बहुधा स्वयंपाकी असावा. तो बाकी काही बोलायचा नाही. एकदा फक्त प्रभजितनं खोकला झाल्याचं सांगितल्यावर त्या वृद्धानं त्याला औषध आणून दिलं होतं.

आपण कुठं किंवा कुठल्या शहरात आहोत याचा प्रभजितला काहीच अंदाज नव्हता. बऱ्याचदा रात्री अवेळी पोलिसांच्या गाड्यांच्या सायरनचा आवाज ऐकू यायचा तेवढाच. त्याच्या आईशी फोनवर बोलण्यासाठी म्हणून अपहरणकर्ते त्याला काही वेळा बाहेर घेऊन गेले; पण प्रत्येक वेळी त्याच्या तोंडावर कापड बांधलेलं असायचं. फोन करायला जातानाही पाच-सहा तासांचा प्रवास व्हायचा. त्या वेळी मात्र त्याला पळवून आणणारी ती दोन जाड माणसं नेहमीच त्याच्याबरोबर असायची. ते त्याला कुठं कुठं घेऊन जायचे त्याचाही काही अंदाज प्रभजितला नव्हता. परत आल्यावर पुन्हा त्याला त्याच खोलीत बंद करून ठेवलं जायचं. असं खूप वेळा घडलं. मग एके दिवशी सकाळी अपहरणकर्त्यांनी पुन्हा चेहरा झाकून त्याला बाहेर काढलं. थोड्या वेळानं त्याच्या तोंडावरचं फडकं काढून त्यांनी प्रभजितला थोडे पैसे दिले आणि एका रेल्वेस्टेशनवर सोडलं. रेल्वेगाडीनं तो लुधियानाला आला. तिथून एका पीसीओतून त्यानं घरी फोन केला. थोड्या वेळानं काही नातेवाइकांनी येऊन त्याला लुधियानातल्या त्यांच्या घरी नेलं व नंतर घरातल्या लोकांनी येऊन त्याला अमृतसरला आणलं.

प्रभजितची कहाणी लांबलचक असली तरी अपहरणकर्ते कोण होते याविषयी किंवा तपासाला उपयोगी पडेल अशी काहीच माहिती त्यातून हाताला लागत नव्हती.
आम्ही वेगवेगळ्या शक्‍यता तपासून पाहत होतो. काही वेळा खूप धावपळ व्हायची, रात्री उशिरापर्यंत काम करावं लागायचं. तो मार्च महिना असल्यानं प्रभजित आणि त्याच्या वडिलांबरोबर दिवसभर बोलल्यानंतर मी त्यांना अपहरणकर्त्यांना दिलेली ‘फिरौती’ची रक्कम इन्कमटॅक्‍स रिटर्न भरताना त्यात दाखवायचा सल्ला दिला. ‘फिरौती’ दिल्याचं दलजितसिंग यांनी साफ नाकारलं. मी कुणालाच फिरौती दिलेली नाही, असं ते म्हणाले. ‘फिरौती’साठी त्यांनी सव्वा कोटी रुपये कुणाकुणाकडून जमवले आणि त्यांना पैसे देणाऱ्या लोकांनी ते कोणकोणत्या बॅंकांमधून काढले, याची सगळी माहिती माझ्याकडे असल्याचं मी अत्यंत शांतपणे त्यांच्या नजरेस आणून दिलं. सर्व संबंधितांकडून आम्ही ऑफिशियली ही माहिती मिळवून ठेवली होती. ‘‘लवकरच ते गुन्हेगार माझ्या हाती लागतील, पैसेही परत मिळतील; पण तुम्ही जर पैसे दिल्याचंच नाकारणार असाल तर गुन्हेगारांविरुद्ध पुढची कारवाई करणं आमच्यासाठी अवघड होऊन बसेल. ‘फिरौती’ दिल्याचं तुम्ही मान्य करायला हवं,’’ मी त्यांनी म्हणालो.
त्यांचा मुलगा सुखरूप परतल्यानं पैसे द्यावे लागल्याचं त्यांना फारसं दुःख झालं नव्हतं असं दिसत होतं. प्रभजित सुखरूप राहावा अशीच माझीही इच्छा असल्यानं आम्ही आतापर्यंत कुठलीच जोखीम घेतली नव्हती; पण आता तो परत आल्यामुळे मी धोका पत्करू शकत होतो, असेही मी दलजितसिंग यांना सांगितलं. तपासात लक्षात आलेल्या अनेक मुद्द्यांचा आम्ही अजूनही पाठपुरावा केलेला नाही. पोलिस आपल्या मागावर आहेत असा संशयही मला त्या गुन्हेगारांना येऊ द्यायचा नव्हता. पोलिस आपल्या जवळपासही पोचलेले नाहीत हा त्यांचा समज तसाच राहावा अशीच माझी इच्छा होती, हेदेखील मी स्पष्ट केलं.

आमच्याकडे असलेल्या फोनकॉलच्या सगळ्या नोंदी आम्ही अत्यंत काळजीपूर्वक तपासत होतो. नुसते फोन नंबरच नव्हे तर कॉल करण्यासाठी जे हॅंडसेट वापरले गेले त्याचेही तपशील आम्ही मिळवले होते. तपशीलवार अभ्यासाअंती ज्या हॅंडसेटमध्ये वेगवेगळी सिमकार्ड वापरून पंजाबमध्ये फोन केले गेले होते ते हॅंडसेट आम्ही वेगळे काढले. मग पंजाबमध्ये कोणत्या कोणत्या नंबरांवर हे फोन झाले ते आम्ही शोधून काढलं. या फोन क्रमांकांचा माग काढताना त्यातले काही क्रमांक सीमावर्ती भागातल्या कुटुंबांचे असल्याचं निष्पन्न झालं होतं. या कुटुंबांचे काही फरारी गुन्हेगारांशी संबंध होते. त्या क्रमांकांवर लक्ष ठेवायला सुरुवात केल्यावर त्यातला एक नंबर सीमा सुरक्षा दलातून निलंबित झालेल्या बुटासिंगचा असल्याचं आढळून आलं. दहशतवाद्यांशी आणि तस्करी टोळ्यांशी असलेल्या संबंधांसाठी कुख्यात असणारा बुटासिंग अमली पदार्थांपासून ते सुपारी घेऊन खून करण्यापर्यंत अनेक गुन्ह्यांमध्येही सामील होता. बुटासिंग दिल्लीतून अजनालाजवळच्या एका गावात राहणाऱ्या त्याच्या कुटुंबीयांना फोन करत होता. त्याच्या फोनवर नजर ठेवल्यानं खूप महत्त्वाची माहिती मिळायला सुरवात झाली. काही शंकास्पद लोक त्याच्या नियमित संपर्कात होते. पैसे मिळणार असतील तर तो कोणताही गुन्हा करायला मागं-पुढं पाहायचा नाही, असंच त्याचं आतापर्यंतचं रेकॉर्ड होतं. तो गुन्हेगारीपासून फार काळ लांब राहू शकत नाही असं आम्हाला त्याच्या काही जुन्या सहकाऱ्यांकडून समजलं होतं. आधी विशेष पोलिस अधिकारी (एसपीओ) असणाऱ्या बलवंतसिंग ऊर्फ बंताबरोबर तो सध्या दिसत असल्याचंही आम्हाला समजलं होतं. हा बंता दहशतवादी बनला होता आणि मग त्यानं त्याचे राजकीय लागेबांधे वापरून मुख्य प्रवाहातही येण्याचा प्रयत्न केला होता. पैसा मिळवण्यासाठी बंताही गुन्हेगारी मार्गानं जाणाऱ्यातला होता आणि ‘फिरौती’च्या गुन्ह्यांमध्ये पैसा तर बराच होता.

या सगळ्यांवर नजर ठेवल्यावर ही गॅंग प्रभजितच्या अपहरणात किंवा तसल्याच दुसऱ्या कुठल्या तरी मोठ्या गुन्ह्यात सहभागी असणार याची जवळपास खात्री झाली होती; पण त्यांच्याकडे तपास केला असता तर ते सावध होण्याची शक्‍यता होती. त्यातून कदाचित प्रभजितच्या जिवालाही धोका होऊ शकला असता. ते मला अजिबात नको होतं. त्यामुळे आम्ही शांतपणे सगळ्या गॅंगची माहिती गोळा करत होतो. त्यांनी नक्की काहीतरी मोठं केलेलं आहे अशी बुटासिंगला भेटलेल्या त्याच्या एका जुन्या सहकाऱ्याची खात्री होती. गुन्ह्याच्या तयारीत नसेल तर बुटासिंग अमली पदार्थांच्या नशेत असायचा. एरवी खूप बडबड करणारा बुटासिंग अशा वेळी मात्र गप्प गप्प असायचा; पण त्याचा सध्याचा साथीदार बंतासिंग मात्र अत्यंत उलट्या काळजाचा होता. दोघांमध्ये तो अधिक क्रूर आणि धीट होता. मी त्या दोघांवरही लक्ष केंद्रित केलेलं होतं; पण मी प्रभजित परत येण्याची वाट पाहत होतो.

आम्ही बंताच्या काही जुन्या सहकाऱ्यांना शोधून काढलं होतं. ‘जीता’ हा त्यातलाच एक. दरोड्याच्या एका प्रकरणात दोघंही आरोपी होते; पण संशयाचा फायदा मिळून ते सुटले होते. बंता जर त्याला प्रत्यक्ष भेटला तर तो नक्की काहीतरी बोलेल, असा ‘जीता’ला विश्वास होता. आम्ही मग त्याला थोडेफार पैसे दिले. ‘बंताबद्दल काही महत्त्वाची माहिती दिलीस तर तुला अजून बक्षीस देऊ’ असंही आम्ही त्याला सांगितलं. बंताचा फोननंबर त्याला मिळेल अशीही व्यवस्था केली. ‘जीता’नं बंताला एक मोठा गुन्हा करण्याची ऑफर द्यायची आणि त्या आमिषानं बंता बाहेर आला की त्याला पकडायचं असा प्लॅन आम्ही आखला.
बंताचा आणखी एक जवळचा मित्र होता जगदीश. ‘जीता’चाही तो चांगला मित्र होता. ‘जीता’नं जगदीशकरवी बंताला एका अपहरणाची ऑफर दिली. चार-पाच दिवसांत चार-पाच कोटी रुपये मिळून जातील, असं त्यानं बंताला कळवलं आणि हुरळून गेलेल्या बंतानं लगेच ‘जीता’शी उलट संपर्क साधला. लुधियानातल्या एका प्रसिद्ध व्यापाऱ्याचं अपहरण करून ‘फिरौती’ मागण्याचा ‘प्लॅन’ होता.

‘‘त्या व्यापाऱ्याला ठेवण्याकरता मी तुला एक सुरक्षित जागाही देईन. तीन-चार दिवसांत सहज पाच कोटी रुपये मिळून जातील,’’ ‘जीता’नं त्याला सांगितलं. बंताला ही ऑफर मनापासून आवडली; पण सध्या तो ‘फारच बिझी’ असल्यामुळे त्यांनी एक आठवड्यानं पुन्हा भेटायचं ठरवलं. तोपर्यंत आणखी माहिती काढून ठेव असं त्यानं ‘जीता’ला सांगितलं. याच टोळीनं प्रभजितचं अपहरण केलं याची आता खात्री पटत चालली होती. बंता आणि बुटासिंग पंजाबबाहेर फारसे जात नसत. आता इतका काळ ते पंजाबमध्ये नसल्यानं ते कुठल्या तरी मोठ्या प्रकरणात गुंतले असावेत अशी आता खात्री वाटू लागली होती. आता प्रभजितच्या सुरक्षेचा प्रश्‍न नसल्यानं आम्ही आमची योजना अमलात आणू शकत होतो.
पीलीभीतमध्ये आमच्या टीमनं दुर्बिणीतून बंता आणि बुटासिंगला पाहिलं होतं. आमच्याकडची वर्णनं त्यांच्याशी जुळत होती. आमच्या रेकॉर्डमधून आम्ही त्या दोघांचे जुने फोटोही मिळवले. प्रभजितनं त्या दोघांनाही ओळखलं. त्या फोटोंतल्यापेक्षा ते आता आणखी थोडे जाड झाले होते. प्रभजित परत आल्यानंतर काही दिवसांनी बंतानं ‘जीता’ला फोन करून, ‘तो आणि त्याची सहा-सात माणसं लुधियानाला येत आहोत, आपण एक-दोन दिवस रेकी करू आणि मग काम करून टाकू,’ असं सांगितलं. गुन्ह्यासाठी लागणारी वाहनं बंताची गॅंगच आणणार होती, प्रत्यक्ष ऑपरेशनही तेच करणार होते आणि पळवलेल्या व्यापाऱ्याला ठेवण्यासाठी योग्य जागाही बंता आणि त्याची गॅंगच निवडणार होती. माहिती दिल्याबद्दल ‘जीता’ला आधी ठरल्याप्रमाणे ‘फिरौती’तले फक्त दहा-वीस टक्के मिळणार होते. एखाद्या एक्स्पर्टप्रमाणे बंताला ते अपहरण ‘टर्न की बेसिस’वर झालेलं हवं होतं. सगळी महत्त्वाची कामं तोच करणार होता. टेक्‍निकल सर्व्हिलन्सदरम्यान आम्ही त्यांची ही सगळी बोलणी पुनःपुन्हा ऐकत होतो. हे गुन्हेगार आता अपहरणव्यवस्थापनात खरोखरच तज्ज्ञ बनत चालले होते आणि आम्ही त्यांना रोखून गजाआड करण्याच्या तयारीत होतो.

‘‘दिल्लीहून दुपारी लवकर निघून आम्ही संध्याकाळपर्यंत लुधियानाला पोचतो. पोचल्यावर त्या रात्री आपण नीट प्लॅनिंग करू, मग आराम करू. दुसऱ्या दिवशी दुपारी आपण कामाच्या जागेची, संबंधित माणसाची, तिथून पळून कसं जाता येईल त्याची पाहणी करू. मग आम्ही एक सुरक्षित जागा पाहून ठेवू’’, बंतान ‘जीता’ला प्लॅन सांगितला. प्रभजितच्या प्रकरणामुळे त्याचा आत्मविश्वास बराच वाढलेला वाटत होता.
दिल्लीतून निघाल्यापासून त्यांच्या दोन्ही गाड्यांवर आमचं लक्ष होतं. प्रत्येक गाडीत दोघं दोघं होते. दिल्लीकडून येणारा रस्ता शंभूजवळ पंजाबमध्ये प्रवेशतो. तिथंच त्यांना अडवण्याचा आमचा प्लॅन होता. तिथं आम्ही फारसा नजरेत भरणार नाही असा एक नाका लावला होता. बंता, बुटा आणि त्यांचे इतर दोन साथीदार तिथं पोचताक्षणीच त्यांना काही कळायच्या आत त्यांच्या कपाळावर पिस्तुलं टेकवली गेली होती आणि हातात हातकड्या पडल्या होत्या. टेपनं त्यांची तोंडं बंद करण्यात आली होती आणि तगड्या जवानांनी त्यांच्या गाड्यांचा ताबा घेऊन गाड्या वेगळ्या रस्त्यावर घेतल्या होता.

तिथून जवळच्याच एका जागी नेऊन त्या चौघांची स्वतंत्रपणे विचारपूस करण्यात आली. त्यांच्याजवळ सापडलेल्या दहा लाख रुपयांच्या कोऱ्या करकरीत नोटांबद्दलही ते फार काही सांगू शकले नाहीत. नोटांच्या बंडलांवर फरिदाबादच्या एका बॅंकेचे शिक्केही होते. प्रभजितच्या मामांनी फरिदाबादमधल्या बॅंकेतून पैसे काढल्याचं आम्हाला माहीत होतं. नोटांच्या बंडलांच्या संख्येसकट सगळी माहिती बॅंकेच्या व्यवस्थापनाकडून आमच्या तपासपथकानं आधीच मिळवलेली होती. प्रभजितच्या अपहरणप्रकरणाचे सूत्रधार आता आमच्या हाती होते. बलवंतसिंग ‘बंता’नं त्याच्या बाकीच्या साथीदारांनाही संध्याकाळपर्यंत लुधियानाला पोचायला सांगितलं होतं, त्या सगळ्यांनाही अटक करायची असल्यानं आम्हाला फार गडबड करून चालणार नव्हतं.
त्या गुन्हेगारांनी प्रभजितच्या अपहरणाची, त्याला जवळजवळ पाच आठवडे डांबून ठेवल्याची आणि पीलीभीतला त्याच्या मामांकडून सव्वा कोटी रुपयांची ‘फिरौती’ घेतल्याची कबुली लगेचच दिली. आता आम्हाला ‘फिरौती’च्या बाकी रकमेचा शोध लावायचा होता.

बंता आणि बुटासिंगला वेगळं वेगळं बसवून मी स्वतः त्यांची चौकशी केली. त्यांच्याच भल्याकरता त्यांनी खरं बोलावं, असं सांगितल्यावर ते ‘फिरौती’ची रक्कम काढून द्यायला तयार झाले. त्वरेनं हालचाल करून आम्ही ७५ लाख रुपये जप्त केले. पस्तीस लाख रुपये हवालामार्फत बाहेर पाठवून बंताची बायको राणी इंग्लंडला निघून गेली होती. बंता आणि बुटानं पाच लाख रुपये माखन, गुरमित, बरजिंदर, झंडा, गुरमेज, रणजित आणि बंटी या साथीदारांमध्ये वाटले होते. बाकीच्या रकमेचं वाटप अजून व्हायचं होतं. प्रभजितच्या अपहरणात, त्याला डांबून ठेवण्यात या सगळ्यांचा हात होता. लुधियानातल्या ठरलेल्या ठिकाणी त्यांच्यातला एकेक जण जसा पोचत होता, तसा तो आमच्या हातात पडत गेला. रात्री उशिरापर्यंत आम्ही सगळ्यांना, म्हणजे नऊच्या नऊ जणांना, ताब्यात घेतलं होतं.

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही प्रभजितच्या अपहरणप्रकरणी नऊ जणांना अटक करून ‘फिरौती’चे ८५ लाख रुपयेही जप्त केल्याचं जाहीर केलं. प्रसारमाध्यमांनी आणि लोकांनीही आमचं खूप कौतुक केलं; पण आम्ही मात्र या यशाचा फारसा गाजावाजा केला नाही. तपास होत नसल्यानं दबावाला सामोरं जाणाऱ्या पोलिस दलातही तपासाबद्दल ‘खुशीची लहर’ दिसून येत होती.

अनेक सहकारी अधिकाऱ्यांकडूनही आमचं कौतुक होत होतं. आमच्यातल्या काही अधिकाऱ्यांनी उत्साहाच्या भरात सगळ्या गुन्हेगारांचं एन्काउंटर करण्याविषयीही सुचवलं. त्यामुळे गुन्हेगारांना एक जबरदस्त ‘तगडा मेसेज’ जाईल असं त्यांना वाटत होतं. मी ते हसून टाळलं. त्यापेक्षा हे प्रकरण तडीस नेऊन आपण एक उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवू या असं मी नम्रपणे त्यांना सांगितलं. पुढं तपास पूर्ण करून आम्ही आरोपपत्र दाखल केलं. खटला संपेपर्यंत एकाही आरोपीला जामीन मिळाला नाही. सुनावणी सुरू असतानाच बंता हृदयविकारानं मरण पावला. जिल्हा न्यायाधीशांनी बाकीच्या आठ जणांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हा खरा जबरदस्त मेसेज होता. सगळे आरोपी आजही तुरुंगात शिक्षा भोगत आहेत.
या प्रकरणात तपास गुंतागुंतीचा, अनेक वळणावळणांचा होता तरीही कायद्याचे ‘लंबे हाथ’ गुन्हेगारांपर्यंत पोचलेच. गुन्हेगार कितीही हुशार असला तरी त्याच्या पापाचा घडा भरतोच भरतो. त्याच्या गुन्ह्यांची किंमत त्याला मोजावीच लागते.
(उत्तरार्ध)

(या कहाणीतल्या व्यक्तींची नावं बदलण्यात आलेली आहेत.)
(या लेखाचे बौद्धिक संपदा हक्क लेखकाकडे आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com