उत्तरं शोधायला शिकवावं ! (संपदा कुलकर्णी)

संपदा कुलकर्णी
Sunday, 25 October 2020

आईचा वेगळा दृष्टिकोन आणि तिची शिकवण मी मुलीला शिकवताना अमलात आणली. मी मुलीला, अर्थात शर्वरीला सांगितलं, की क्षेत्र कुठलंही असो; समाजात सगळ्या प्रकारची माणसं असतात, त्यामुळं आपण वेंधळं राहायचं नाही आणि एक्स्ट्रा स्मार्टही राहायचं नाही.

आईचा वेगळा दृष्टिकोन आणि तिची शिकवण मी मुलीला शिकवताना अमलात आणली. मी मुलीला, अर्थात शर्वरीला सांगितलं, की क्षेत्र कुठलंही असो; समाजात सगळ्या प्रकारची माणसं असतात, त्यामुळं आपण वेंधळं राहायचं नाही आणि एक्स्ट्रा स्मार्टही राहायचं नाही. विनाकारण कोणाला दुखवायचं नाही; पण आपल्याला कणा आहे हे दाखवून द्यायचं. सोयीनं अबला आणि सोयीनं खांद्याला खांदा, असं करायचं नाही, एक तर एकच भूमिका ठेवायची.

माझे वडील नाट्यरसिक होते. एक एक नाटक ते शंभर वेळा पाहायचे. नाटकांची, कलेची आवड त्यांच्याकडून माझ्याकडं आली. वाचनाची आवडदेखील त्यांच्याकडूनच माझ्याकडं आली आहे. माझी आई शिक्षिका होती. तिनं माझ्यात जगण्याची मूल्यं पेरली. चांगली कलाकार किंवा बुद्धिवादी होण्याच्या आधी ‘चांगला माणूस’ हो, हे तिनं मला शिकवलं. या गोष्टी तिनं शब्दांतून सांगितल्या नाहीत, तर तिला मी तसं वागताना बघितलं. बेडेकर शाळेत ती आवडती शिक्षिका होती. फक्त नव्वद टक्के मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांवरच प्रेम करणारी ती नव्हती, तर ‘बॅक बेंचर्स’वरसुद्धा सारखंच प्रेम करायची. ती नेहमी म्हणायची, ‘‘आयुष्यात कोण, केव्हा चमकेल हे सांगता येत नाही. आपल्यातली सुप्त गुणवत्ता कोणाला केव्हा समजेल हे सांगता येत नाही. त्यामुळं कोणाबद्दलही लगेच निष्कर्ष काढू नये किंवा ताबडतोब फुली मारू नये. समोरच्या व्यक्तीला बदलण्यासाठी, सिद्ध करण्यासाठी थोडा वेळ द्यावा, त्यामुळं चिडचिड कमी होते.’’ ही शिकवण पुढं माझा स्थायीभाव बनली. मला खूप आनंदी राहायला, हसायला आवडतं; आईची ही शिकवण माझ्या जगण्याचा भाग बनली.

माझे आई व बाबा दोघं अतिशय मोकळे व बिनधास्त होते, त्यामुळं ‘मुलगी’ म्हणून आईनं मला सांगितलेल्या गोष्टी इतर पालकांपेक्षा काहीशा वेगळ्या होत्या. मी वयात आल्यावर आईनं मला सांगितलं होतं, की रस्त्यावर कोणी धक्का मारला, तर रडत घरी नाही यायचं, त्याला धक्का देऊन पाडून यायचं. ‘ठकासी असावे ठक’ हे तिचं सांगणं होतं. त्रास देणाऱ्या व्यक्तीला जाणीव करून द्यावी, की तू आता या क्षणी जर कोणाला मनस्ताप दिला आहे, तर तो तुलाही मनस्तापच देणारा क्षण असला पाहिजे. त्या वेळी मी माझ्या मैत्रिणींच्या आयांचा याच बाबतीतला दृष्टिकोन बघत होते, ‘‘ कशाला काही बोलायचं? आपण लक्ष नाही द्यायचं, निघून यायचं...’’ वगैरे अशा प्रकारचं त्यांचं सांगणं असायचं. पण आईचा इतका विश्वास होता, की तू आवाज उठव, चार चांगली माणसं तुझ्या बाजूनं उभी राहतीलच, असं ती सांगायची. हा तिचा संस्कार माझ्या पुढील वाटचालीसाठी पाया ठरला. या तिच्या शिकवणीमुळं ती इतर पालकांमध्ये वेगळी वाटायची. केवळ दुसऱ्याचंच नाही, तर आपलं वागणंही मर्यादेतच असलं पाहिजे, यावरही तिचा विलक्षण भर होता.

आईची ही सगळी शिकवण मी माझ्या मुलीला, शर्वरीला जशीच्या तशी दिली आहे. कारण तीसुद्धा आता अभिनयाच्याच क्षेत्रात आली आहे. पुणे विद्यापीठातून तिनं पदवी घेतली आहे. तिला मी सांगितलं, की ‘‘ क्षेत्र कुठलंही असो; समाजात सगळ्या प्रकारची माणसं असतात. त्यामुळं आपण वेंधळं राहायचं नाही आणि एक्स्ट्रा स्मार्टही राहायचं नाही. विनाकारण कोणाला दुखवायचं नाही; पण आपल्याला कणा आहे हे दाखवून द्यायचं. सोयीनं अबला आणि सोयीनं खांद्याला खांदा, असं करायचं नाही, एक तर एकच भूमिका ठेवायची.’’

आईच्या आणि माझ्या पालकत्वामध्ये काळाचा आणि परिस्थितीचा फरक आहे. शर्वरी माझी एकुलती एक मुलगी आहे, तर आईला आम्ही तिघी बहिणी होतो, त्यामुळं तिचा वेळ तिघींमध्ये विभागला जायचा. त्या तुलनेत शर्वरीला मात्र मी नक्कीच जास्त वेळ देऊ शकते. माझ्या आई-बाबांना आम्हा तिघी बहिणींकडून वेगवेगळ्या गोष्टींचं समाधान मिळालं, तर मी मात्र एकीतच सगळ्या गोष्टी शोधायला बघते. माझ्या पालकांना तीन मुली आणि घरात इतरही माणसं असल्यामुळं त्यांनी आमच्या प्रत्येक लहानसहान गोष्टीत फारसं लक्ष घातलं नाही. तू हेच का केलं, असं का वागलीस, असं त्यांनी केलं नाही. तसंच, मीदेखील ठरवलं, की आपली एकच मुलगी असल्यानं आपल्याकडून शर्वरीच्या बाबतीत तिच्या प्रत्येक लहानसहान गोष्टीत जास्त हस्तक्षेप होऊ शकतो, आपल्याकडून ते टाळायचं, तिलाही थोडी स्पेस द्यायची. शिवाय, आपल्या मूल्यांवर आपला विश्वास हवाच, असा विचार करून तिला थोडं मोकळं सोडलं पाहिजे. ही गोष्ट मी ठरवून केली. आमच्या दोघांच्या पालकत्वात असणारा आणखी एक फरक म्हणजे, आमच्या आई-वडिलांना मुलगा हवा होता; पण मी माझ्या अपत्याकडं या दृष्टीनं बघतच नाही. आपल्या पोटी येणारा एक जीव म्हणून त्याकडं बघते. मग तो मुलगा असो वा मुलगी! तू आमचा आधारही ठरू शकतेस, तू उद्धारही करू शकतेस. तू मुलगी आहे की मुलगा यावर माझं मत मी अवलंबून नाही ठेवत.

काळानुसार माझ्या आणि माझ्या मुलीच्या पिढीत काही फरक नक्कीच जाणवतात. आमची पिढी भाबडी होती, श्रद्धाळू होती. अमुक एक गोष्ट मोठ्यांनी सांगितली आहे, तर काहीही प्रश्न न विचारता त्या गोष्टी आम्ही बऱ्याचदा केलेल्या आहेत. पण, आताची पिढी, ‘बाप दाखव, नाही तर श्राद्ध कर’, अशा विचारांची आहे. कुठलीही गोष्ट सिद्ध कर, असा त्यांचा आग्रह असतो. तू वडील वा आई आहेस म्हणून मी तुझी प्रत्येक गोष्ट मान्य नाही करणार, असं त्यांचं म्हणणं असतं. त्यामुळं मी ज्या गोष्टी आईला कधी विचारल्याच नाहीत, त्या गोष्टी शर्वरी मला सहज विचारते. आताची पिढी धीट आहे आणि त्यांना कुठल्याही गोष्टीचं लॉजिक जाणून घ्यायचं असतं. त्यामानानं आमची पिढी फारच भाबडी होती. एकदा एका मानसोपचारतज्ज्ञांनी सांगितलं होतं, की आपल्या पिढीला खूप सारे सरप्रायजेस मिळत गेले; पण आताच्या पिढीला जग जवळ आल्यामुळं सगळंच खूप लहानपणापासून सहज माहिती असतं, त्यामुळं कशाचं अप्रूप वाटणं हा भाग राहिलेला नाही. परिणामी एकप्रकारचा कोरडेपणादेखील त्यांच्यामध्ये येत जातो.
तसंच, आताच्या पिढीला जेवढे पर्याय समोर आहेत, तेवढी ती जास्त गोंधळलेली दिसते. आधीच्या पिढीसमोर पर्यायही कमी होते आणि त्यातही एक मार्ग पकडला, की त्याला धरून सरळ चालणारे सारे होते. आता दरवर्षी मुलांसमोर नवीन पर्याय येतात, त्यामुळं ती गोंधळलेली दिसतात. हा गोंधळ मोबाईल, लॅपटॉप घेताना, हॉटेलमध्ये ऑडर देताना, इतकंच काय, लग्नाचा निर्णय घेतानासुद्धा दिसून येतो. अशा वेगवेगळ्या बाबतींत मला दोन पिढ्यांमध्ये फरक दिसून येतो.

आई होणं, पालक बनणं हे खूप आनंदीदायी; पण तेवढंच जबाबदारीचं असतं. माझा पालकत्वाचा अनुभव खूप छान, गोड आहे. मी सुरुवातीलाच ठरवलं होतं, की मुलगा असो वा मुलगी, एकच अपत्य होऊ द्यायचं. त्याला पुरेपूर वेळ द्यायचा, त्याच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्याचा पुरेपूर आनंद घ्यायचा. त्याप्रमाणे रांगणं, बोबडं बोलणं यापासून, तर आई तुझ्या नाटकातील हे पडदे चांगले नाहीत, असं शर्वरी सांगेपर्यंतचा प्रत्येक टप्पा एन्जॉय केला. मी डोहाळे जेवणापासून सगळ्या गोष्टींचा आनंद घेतला. शर्वरी एक वर्षाची होईपर्यंत मी घरीच होते, तेव्हा तिच्या सगळ्या गोष्टी अगदी मनापासून केल्या. ओळखीच्यांपैकी जे कोणी बाळासाठी अनुभवाचा सल्ला द्यायचे, ते मी उत्साहानं केलं.
पालक म्हणून मुलांना वाढवताना कुठलाही उद्देश न ठेवता त्यांना चांगले विचार दिले पाहिजेत. ते विचार कसे आणि कुठं वापरायचे, हे मुलांनी स्वतः ठरवावं. जसं - गणितात आपल्याला फॉर्म्युला दिला जातो आणि नंतर तो वापरून उत्तर आपल्याला काढावं लागतं, तसंच मुलांना आपण थेट उत्तरं देऊ नयेत. मी शर्वरीला रेडिमेड म्हणजे थेट निर्णय कधीच दिला नाही. तिनं अभिनय क्षेत्रात काम करायचं ठरवल्यानंतर मी तिला एवढंच सांगितलं, की कशाप्रकारच्या भूमिका तू करणार आहेस, हे आधी ठरवून घे. तुझा पोर्टफोलिओ तयार करताना असे फोटो काढ, ज्यावरून तुला हव्या असणाऱ्या भूमिका तुला मिळू शकतात. उगाच फॅशन आहे म्हणून सरसकट फोटो काढलेस, तर तशा भूमिका तुला येतील. त्या तू करायच्या की नाही हा निर्णय तुझा असेल. शिवाय, तू ज्या भूमिका निवडशील त्याला स्वतः आन्सरेबल राहा, दुसऱ्यांचं नाव घेऊ नकोस. थोडक्यात, तुझ्या निर्णयाची जबाबदारी तू स्वतः घे आणि निर्णय घेताना परिणामांचा विचारही कर. मी तिला अशाप्रकारे प्रत्येक बाबतीत केवळ विचार सांगितला; पण तयार उत्तर कधीच नाही दिलं.

शर्वरीनं मला काही गोष्टी शिकवल्या आहेत. प्रॅक्टिकल निर्णय घ्यायचं मी तिच्याकडून शिकले. बहुतेक बायकांना दुःख अनावर झालं, की रडत बसायची सवय असते. मग ते दुःख त्या घोळत राहतात आणि त्याभोवती झिम्मा घालत बसतात. असं काही झालं तर शर्वरी म्हणते, ‘‘आई थांब ! आता तुला नेमकं कशाचं वाईट वाटतयं ते समजून घे आणि मग ते सुधारायला जा.’’ मी अलीकडं 'चि.सौ.कां. रंगभूमी' हे नाटक करत आहे, त्यासाठी मला वेगवेगळ्या लेखकांची परवानगी घ्यावी लागली. कारण, त्यात मी वेगवेगळ्या नाटकांचे प्रवेश घेतले आहेत. तेव्हा शर्वरी म्हणाली, "आई आता इथं खचून नाही जायचं. आपल्याला परवानगी हवी आहे, त्यांनी ती नाही दिली, तर का नाही दिली, हे विचारण्याचाही तुला हक्क आहे. तू कशाला स्वतःला कमी लेखते? जाऊन त्यांच्याशी बोल." अशा प्रकारे तिनं मला खूप छान पद्धतीनं त्या सर्व प्रोसेसमध्ये समजावून सांगितलं आणि माझ्या सोबत राहिली. माझ्यासाठी ती अशाप्रकारे उभी राहू शकते, ही गोष्ट मला खूप सुखावून गेली आणि त्याचबरोबर आपली मुलगी विचारांनी इतकी प्रगल्भ झाली, याचा अभिमानही वाटला. शर्वरीच्या जबाबदारपणाचा आणखी एक अनुभव सांगते. माझी आई गेली त्या वेळी माझ्याजवळ घरात मोठं कोणीच नव्हतं. सासूबाई नव्हत्या, राहुल कोकणात गेला होता, फक्त शर्वरी होती. मी आईला घरी आणलं होतं आणि आई गेली. मला काहीच सुचत नव्हतं. त्या वेळी शर्वरीनं अँब्युलन्स बोलावण्यापासून सगळं मॅनेज केलं. ती केवळ वीस वर्षांची होती. ते सगळं बघून मला तिचं अतिशय कौतुक वाटलं होतं. शर्वरी अतिशय शांत स्वभावाची आहे, म्हणूनच ती प्रत्येक निर्णय विचारपूर्वक आणि सुसूत्रपणे घेऊ शकते. निर्णय घेताना तिच्या मनात गोंधळ नसतो. ही गोष्ट मी तिच्याकडून शिकले आणि आता माझ्या प्रत्येक वाटचालीसाठी त्याचा वापर करते.

शर्वरी साधारण आठवीत असेल, त्या वेळी तिच्या सर्व मित्रमैत्रिणींकडं मोबाईल होते, त्यामुळं तीदेखील मोबाईल घेऊन दे म्हणून मागं लागली. "सर्वांकडं आहे, फक्त माझ्याकडं नाही, सगळे मला हसतील..." वगैरे गोष्टी ती सांगत होती. तेव्हा एक दिवस मी तिला समोर बसवून समजावून सांगितलं, "हे बघ, मोबाईल ही आता तुझी गरज आहे की फक्त फॅशन म्हणून तो हवा आहे? जेव्हा तू ठाणे सोडून कॉलेजात किंवा इतर कारणांसाठी बाहेर जाशील, तेव्हा आपल्यात संभाषणासाठी मोबाईलची गरज लागेल. आता अशी गरज आहे का? की केवळ मैत्रिणींकडं आहे म्हणून तुला फोन हवा आहे, याचा तू शांतपणे विचार कर आणि दोन दिवसांनी मला सांग." तिला माझं म्हणणं पटलं आणि त्यानंतर पुढची दोन वर्षं तिनं माझ्याकडं मोबाईल मागितला नाही. एका टीन एजच्या मुलीनं अशाप्रकारे पुन्हा हट्ट न करणं, हे माझ्या दृष्टीनं नक्कीच कौतुकाचं होतं.
शर्वरी वर्षाची झाली तेव्हापासून मी काम सुरू केलं. तिला मी जो वेळ देत होते, त्यात मी नेहमी 'क्वालिटी टाइमचा' विचार केला. कोणाच्यातरी एका मुलाखतीत मी ऐकलं होतं, की कोणतीही आई किंवा वडील मुलांबरोबर चोवीस तास राहात आहेत; पण त्यात त्यांनी मुलांना प्रत्यक्ष किती वेळ दिला, हे बघणं गरजेचं आहे. ते मुलांबरोबर किती वेळ राहतात हे महत्त्वाचं नाही, तर त्यांच्या सोबतचा वेळ किती दर्जेदार पद्धतीनं घालवतात हे महत्त्वाचं आहे. हे वाक्य डोक्यात पक्कं बसलं होतं. त्यामुळं शर्वरी सोबत जेव्हा मी असायचे, तेव्हाचा पूर्ण वेळ तिचाच असायचा. घरी माझ्या सासूबाई तिच्याबरोबर असायच्या आणि तिची व्यवस्थित काळजी घ्यायच्या, त्यामुळं मला शर्वरीची कधी चिंता वाटली नाही. मला एक प्रसंग आवर्जून सांगावासा वाटेल; माझं एकदा शूटिंग सुरू होतं आणि शर्वरीला दुपारी ताप भरला. त्या दिवशी चित्रीकरण रात्री अकरा-साडेअकरापर्यंत लांबलं. मी दर दोन तांसांनी नेहमीप्रमाणे घरी फोन करत होते; पण मला सासूबाईंनी सांगितलं नाही, की तिला ताप आहे. मी घरी आल्यावर, फ्रेश झाल्यावर मला सांगितलं, की आज शर्वरीला जरा ताप होता; आणि तो एकपर्यंत गेला होता; पण औषध दिलं, आता ठीक आहे. मी तिकडं अस्वस्थ होऊ नये म्हणून त्यांनी ही गोष्ट मला सांगितली नाही, याचं मला खूप विशेष वाटलं. शर्वरीला नेहमी खूप चांगली माणसं मिळाली. ती एकटी राहिली आणि आपल्याकडं लक्ष द्यायला कोणी नाही, अशी भावना तिला कधी जाणवली नाही. मी जवळ असायचे तेव्हा तिच्या आवडीचे पदार्थ करणं, शाळेच्या प्रोजेक्टमध्ये मदत करणं, मिटिंग्जला जाणं वगैरे सर्व करायचे. मी स्वतः टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप बघत नाही. त्यामुळं घरी असताना मी त्यात गुंतलेली आहे, असं कधी झालं नाही. तो वेळ शर्वरी व घरच्यांसाठीच असायचा व असतो. माझ्या कामासाठी नवऱ्याचा, म्हणजे राहुलचा सुरुवातीपासून पाठिंबा होता; पण सासू-सासऱ्यांचा विरोध होता. हे सोडून तू काहीही कर, असं त्यांचं म्हणणं होतं. कारण हे क्षेत्र त्यांना अगदी नवीन होतं. गैरसमज कानांवर आल्यामुळं या क्षेत्राबाबत आधीची काही मतं होती. म्हणून मीदेखील सुरुवातीची दोन-अडीच वर्षं काम केलं नाही. पण, नंतर त्यांना माझ्याबद्दल इतका विश्वास निर्माण झाला, की मी प्रत्येक गोष्ट व्यवस्थित करेन आणि हाताळेन याची खात्रीच त्यांच्यात निर्माण झाली. कुठलीही समस्या मी सोडवूनच येईन, हे त्यांना समजलं. मग त्यांनी अगदी मनापासून आणि पूर्णपणे पाठिंबा दिला.
शर्वरी आमची एकुलती एक मुलगी असली, तरी तिनं मागताच लगेच एखादी गोष्ट दिली, असं कधी आम्ही केलं नाही. मोबाईल असेल, सायकल असेल, प्रत्येक वेळी तिला थोडं थांब, असं सांगितलं. कारण मुलांना 'नाही' ऐकण्याचीपण सवय असली पाहिजे, हे मला नेहमी वाटायचं. यामुळं पुढील आयुष्यात तिला आणि तिच्या जवळच्या इतरांना या सवयीचा त्रास होऊ नये, ही त्यामागची माझी भावना होती. तसंच, कुठलीही वस्तू घेताना ती आपल्याजवळ का असली पाहिजे, त्याची गरज किती आहे, हे समजणंही गरजेचं होतं.

मला पाल्य म्हणून माझ्या पालकांनी घडवलं, तर पालक म्हणून शर्वरीनं घडवलं. जसं - एखाद्या नाटकात काम करण्याआधी ते कसं करायचं, काय करायचं याचा आपण विचार करतो; पण प्रयोग होत जातात, तसं आपण त्या नाटकाकडून आणि त्याच्या अनुभवावरून खूप काही शिकत जातो. तसंच, आई झाल्यानंतर आपल्याला जे नवनवीन अनुभव येतात, त्यातून आपण खूप काही शिकत असतो आणि पालक म्हणून अधिक प्रगल्भ होत जातो. म्हणून मला त्या 'नात्यानं' जास्त शिकवलं असं मी म्हणेन. हे लायसन्स मिळण्यासारखं आहे. म्हणजे ड्रायव्हिंगचं लायसन्स मिळालं म्हणजे आपण लगेच उत्तम ड्रायव्हर होत नाही, प्रशिक्षणादरम्यान आपण ड्रायव्हर नसतो, तर प्रत्यक्ष गाडी चालवण्याच्या अनुभवातून आपण बरा ड्रायव्हर, वाईट ड्रायव्हर, उत्तम ड्रायव्हर ठरत असतो. तसंच पालकत्वाचंपण आहे, कारण बायोलॉजिकल मदर होणं ही काही फार मोठी गोष्ट नाही. शारीरिकदृष्ट्या तेवढ्या क्षमता असल्या की ते होतं. पण, पुढं पालक म्हणून आपण मानसिकरीत्या चांगल्या प्रकारे घडणं गरजेचं असतं. मुलांच्या वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यावर वेगवेगळ्या समस्या असतात, त्या सांगून समजत नाहीत. पालक म्हणून त्या त्या अनुभवाला आपण कसं सामोरं जातो, त्यावरून आपण घडत जातो; पालक म्हणून अधिक समृद्ध होत जातो. नात्याच्या प्रत्येक टप्प्यावरची गंमत आपल्याला अनुभवता आली पाहिजे.
(शब्दांकन - मोना भावसार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang sampada kulkarni write parents article