वाट (संदीप गवई)

sandip gawai
sandip gawai

रंजनाची वटवट ऐकून पारूमामीचे कान किटले म्हणून मग ती उठली. काठीच्या आधारानं पायऱ्या उतरली. तशीच काठी टेकवत मधल्या गल्लीतून बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ आली. पुतळ्याच्या पुढंच बुलढाणा रोड होता. काठीच्या टोकावर दोन्ही हातांनी शरीर तोलून धरत पारूमामी तिथंच उभी राहून बुलढाण्याकडून येणाऱ्या गाडीची वाट पाहू लागली.

पहाट झाली.
चिमण्यांच्या चिवचिवाटानं पारूमामी उठली. अंगावरचं मळकं लुगडं तिनं नीटनेटकं केलं. ती उठली तेव्हा अनिल नेमकाच आंघोळ करून आला होता. टाॅवेल काढून कपडे घालत होता. रंजना त्याच्या मागं चहाची कप-बशी घेऊन उभी होती.
पारूमामी बाजेवर उठून बसली अन् तशीच अनिलला म्हणाली :
‘‘चाल्ला का रे बा तू आता?’’
‘‘हौ वं माये...’’ आरशात पाहून भांग पाडता पाडता अनिल म्हणाला.
कमरेला पदर व ओचा खोचलेल्या अवस्थेत रंजना अजून मागं तशीच उभी होती.
‘‘मंग बबनले म्हनतू का येकदा, शीलूबाईले फोन लावायचा ते...?’’
पारूमामीचं हे वाक्य ऐकल्यावर रंजनानं तोंड कडूईक केलं. पारूमामीकडं पाहून तिनं मोरका मुरडला.
‘‘उठला नसंन वं माये त्यो आजूक...लय रातलोक बाहीर राह्यते आन् पह्याटं मंग चेव येत नाही त्याले टायमावर...’’ असं म्हणतच अनिलनं रंजनाच्या हातातली कप-बशी घेतली अन् उभ्या उभ्याच कपातला चहा बशीत ओतून तो पिऊ लागला. चहा पिऊन झाल्यावर अनिल कामावर निघून गेला. तो गायकवाडांच्या पेट्रोलपंपावर कामाला होता.
पारूमामी उठली. देहविधीसाठी जाऊन आली. तसं कालपासून तिच्या पोटात काहीच नव्हतं. काही खाल्लंच नव्हतं तिनं. नाही म्हणायला परवाच्या राती निकाळज्यांच्या सुनेनं आणून दिलेला अर्धा ग्लास डाळिंबाचा रस तेवढा तिच्या पोटात गेला होता. त्याशिवाय तिनं काहीच खाल्लं-पिल्लं नव्हतं. ती उठली. तोंड धुतलं. 'चहा प्यायचाच नाही' असं जालन्याच्या डाॅक्टरांनी तिला सांगितलं होतं, तेव्हा चहाचा प्रश्नच नव्हता. सिंगलभर पाणी पिऊन पारूमामी स्वतःच बबनकडं गेली; पण तो अद्याप झोपलेलाच होता म्हणून मग ती गेल्यापावली परत आली. पाहते तर, दरम्यानच्या काळात राजामती घरी आली होती.
‘‘कुटंशिक गेल्ती वं पारूमाये?’’ पारूमामीला पाहताच राजामतीनं विचारलं.
‘‘आवं तू कवशिक आली वं माय झोपडपट्टीवून ? इतल्या पह्याटंच कशाले आली?’’
‘‘नारेळपानी घिऊन आले मी तुपल्यासाठी...काल निकाळज्याची सून भेटली होती पुतुळ्याजवळ. तं म्हनू लागली की दाळिंबाचा ज्यूसच पेयेल हाये म्हनं दोन दिवस झाले त्वाहा...म्हनूनसनी म्हन्लं घिऊन जावाव काही न् काही...’’
आतल्या घरात पोळ्या करता करता रंजना हे सारं ऐकत होती. ती तशीच म्हणाली : ‘‘हौ, घाला नं खाऊ माय, पोट फुटोस्तोर...आन् म्हतारीनं लुगडं भरवलं की या मंग तुम्हीच ते खराब झाल्यालं लुगडं धुवायले. तुमचा झाला लाड आन् मानगी या लागली आम्हाले करू करू...’’
तर राजामती तशीच उलटं तिला म्हणाली,
‘‘अय वह्यनी, लय बोलायचं काम न्हाई लगे...भरलं-चरलं मी धुऊन टाकीन जसं...पारूमाय घान करती तं मंग का उपाशी ठुता का तिले? काय कायदाकानून झाला मायबाई ह्यो तं...’’
‘‘आवं, तं निस्तं म्हनता तुम्ही...साक्षात करायले कोन्ही काळं कुत्रं न् ऊनऊतरं येत नाही मंगसन्या इथं...’’
राजामती ओट्यावर उभी राहून, तर रंजना ओसरीतून एकमेकींना असं बोलत असलेल्या पाहून थकल्या-दमल्या आवाजात पारूमामी म्हणाली :
‘‘राजामती, बोलू नको बाई...ऱ्हाव दे...कशाले आनलं वं माय, मले? मले आजिबातच भूक न्हाई माय लगे...’’
पारूमामीचं राजामतीनं ऐकलं आणि ती तिच्या जवळ आली. पारूमामी ओट्यावरच पोत्यावर बसलेली होती. राजामतीही पोत्याजवळ भुईवरच बसली. हलक्या आवाजात म्हणाली : ‘‘आसं करून कसं चालंन वं पारूमाय?’’
‘‘नको माय, खाच न्हाई वाटत मले काहीच...नको...’’
‘‘आवं माय, मंग का उपाशी राहून मरती?’’
‘‘तसं बी मले आसं किद्दी जगायचं? जाल्हन्याच्या डाक्तरनं काय सांगलं तं आयकेल हे नं मी मह्या सक्क्या कानानं!’’ मग आणखी काळजीच्या सुरात पारूमामी पुढं म्हणाली : ‘‘माय मही शिलूबाई आली न् भेटली का बिनघोर होते मी...मंग काहीच नको मले.’’
‘‘येते म्हनी का शीलाआक्का?’’
‘‘रातीच बसायचं म्हनू लागली ती. बसली आसंन...’’
‘‘आसं, इंदूरवून बसनार होती का? पहाटलोक येती मंग बुलढाण्यात आन् तिथून चिखला गाडीत येईल मंग ती.’’
दोघींच्या अशा बराच वेळ गप्पा झाल्या. राजामती जायला निघाली. निघता निघता कडीचा डबा पारूमामीच्या पुढं धरत म्हणाली : ‘‘दोन-तीन घोटाचंच तं हाये वं माय हे नारेळपानी. घे येक्या झटक्यात पेऊनसनी...’’
‘‘मंगसन्या पेईन मी,’’ डबा बाजूला ठेवत पारूमामी म्हणाली.
राजामती गेली. बबन आला. पायऱ्या चढून तो ओट्यावर आला नाही तोच घरातून आरती पळतच बाहेर आली अन् तिला रंजनानं फेकून मारलेलं लाटणं बबनलाच लागलं. रंजनाची चेष्टा करत बबन म्हणाला : ‘‘मले काहून मारता वं वह्यनी? म्या काय केलं बाॅ तुम्हाले?’’
हे ऐकून रंजना खजील झाली. लाजली. लाजत लाजतच लाटणं उचलत म्हणाली, : ‘‘आवं, काट्टी कव्हाची मले बेजार करून राह्यली. पाच रुपय दे म्हनती. तिच्या का बापानं ठुयेल हायेत का मह्याजोळ पयशे?’’
असं म्हणतच ती पुन्हा पोळ्या करायला स्वयंपाकघरात गेली.
बबनला पाहून पारूमामीला बरं वाटलं. ती काही म्हणणार तेवढ्यात बबनच म्हणाला : ‘‘पारूमामी, कशाले आल्त्या वं पह्याटंच?’’
‘‘बरं झालं बापा तू आला. जरसाक फोन लावतू का शिलूबाईले? कुठोरलोक आली कान्नू?’’
‘‘बरं, आत्ता लावतो.’’ असं म्हणत बबननं शर्टाच्या खिशातून मोबाईल काढला. जी दाबायची ती बटणं दाबली अन् मोबाईल कानाला लावला. थोडा वेळ काळजीपूर्वक ऐकल्यावर म्हणाला : ‘‘शिलूबाईचा फोन स्वी-झप हे वाट्टे गड्या!’’
‘‘पुन्हा लावून पाह्यनं नायतं...’’
बबननं पुन्हा फोन लावला; पण शीलाचा फोन बंदच होता. घराकडं जाता जाता बबन म्हणाला : ‘‘पारूमामी, मी मंगसन्या लावून पाह्यतो आन् सांगतो मंग कुठोरलोक आली शिलूबाई तं...’’
बबन निघून गेला. रंजना स्वयंपाक करता करताच बोलणं उरकू लागली,
‘‘इतकी लेक तालेवाराच्या पोटची हे तं काहून नाही आली मंग इतल्या दिसाची? बंधं आम्ही करा लागलो इथं...काय खाल्लं कान्नू, तं पोटाचा कॅन्सर का काय ते झाला म्हनं...तोंड संबळता येत न्हाई. जिभीचं लाड तुमी करायचं आन् इकडं आम्हाले आना लागल्या दलिंदरी...ती जाल्हन्याची लेक बी तशीच...तिच्या गावात गेलो माय दवखान्यात...आवं तं बंधं आम्हालेच करा लागलं...येखांद्या दुसऱ्या गावात जायाले पुरलं आस्तं माय...’’

पारूमामी काहीच उत्तर देत नव्हती म्हणून मग रंजनाचा आवाज पुन्हा सुरू झाला, ती शीलाच्या रोखानं बोलू लागली ‌: ‘‘आवं मोठी दिल्ली ले राहा लागली, तं एकदा तं येऊन पाह्या मायचं तोंड...तिचं बारकंसारकं कोन करते ते तं पाह्या... तस्सीलदाराच्या पोटची...! ‘या लागले, या लागले' म्हून फोन करायचा आन् दुसऱ्या दिशी पुन्हा फोन करून सांगायचं की, ‘पाव्हन्याले सुट्टी नाही भेटली...’ लयंदा झालं आसंच...’’
रंजनाची वटवट ऐकून पारूमामीचे कान किटले म्हणून मग ती उठली. काठीच्या आधारानं पायऱ्या उतरली. तशीच काठी टेकवत मधल्या गल्लीतून बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ आली. पुतळ्याच्या पुढंच बुलढाणा रोड होता. काठीच्या टोकावर दोन्ही हातांनी शरीर तोलून धरत पारूमामी तिथंच उभी राहून बुलढाण्याकडून येणाऱ्या गाडीची वाट पाहू लागली.
तिथं शेजारच्या घरातच दिनकर टेलर मशिनवर शिवणकाम करत होता. कपडे शिवता शिवता त्याचं लक्ष पारूमामीकडे गेलं. तो म्हणाला : ‘‘काय झालं पारूमामी?’’
‘‘बुलढाणा गाडी आली का रं बा? शिलूबाई येऊन राह्यली नं.’’
‘‘गाडी तं वापस जाऊन आर्धा घंटा झाला!’’
‘‘इस्टानावर उतरली आसंन तं...’’
‘‘येतांनी इथं उभी राह्यली व्हती पन गाडी...आली आस्ती तं तव्हाच नस्ती का उतरली शीलाबाई?’’
पारूमामी निराश होऊन घरी परतली. दमून गेली होती. ओट्यावर टाकलेल्या पोत्यावर तिनं अंग झोकून दिलं.

राजामतीनं मघाशी आणलेलं नारळपाणी तरी प्यावं म्हणून तिनं डबा हातात घेतला तर तो रिकामा दिसला. तिनं रंजनाला विचारलं : ‘‘नारेळपानी होतं नं वं इच्यात?’’
‘‘ते देलं म्या आरतीले पाजून...तुमी काय पेत नाही, मंग फेकून देल्यापरता बरं नाही का लेकरानं पेल्यालं...?’’ न्हाणीत कपडे धुत असलेली रंजना म्हणाली.
‘‘बरं देलं माय पाजून...मलेच कुटं प्या वाट्टे लगे...?’’ असं म्हणत पारूमामी डोळे मिटून घेत पोत्यावर लवंडली. मनातल्या मनात म्हणू लागली, ‘येती का न्हाई कान्नू माही शिलूबाई? का करती पह्यल्यावानीच...? अनिलचा बाप आस्ते तं आशे पामरावानी दिस नस्ते आले माय आपल्याेर...राजाचा बाप होतो आपुन आपल्या काळात...! ह्या पोहरायंसाठी कष्ट लय केले. मोठ्या सुनीलले लय लाड लावला; पन काय बाव भरली त्याच्या टकुऱ्यात आन् पोर्गं गेलं कुटं कान्नू निंघूनसनी...कुटं आसंन तं आसो माय. सुखाचा राह्य रे बाप्पा...जाल्हन्यात मह्या लिलूबाईनं दवखाना केला म्हनूनसनी आजलोक जित्ती हे मी. ह्या रंजीले काहे म्हनायले...अनिलबी लय नादर होता लगंन होवोस्तोक...बायकू आली आन् झाला बायकूच्या बुद्दीचा...! आता काय न्हाई, फक्त शिलूबाईले डोळ्यानं पाह्याचं...’ शिलाच्या विषयापासून सुरू झालेली पारूमामीच्या विचारांची साखळी शिलाजवळच येऊन तुटली, तशी पारूमामी गपकन् उठून बसली. गपकन् उठल्यानं तिला चक्कर आली. आपण आता मरतोय असं तिला वाटलं. थोडा वेळ ती तशीच खाली मान घालून बसली. चक्कर गेल्यावर उठली. काठी घेऊन चालत पुन्हा पुतळ्याजवळ आली. न्याहाळ धरून बुलढाणा रोडकडं पाहू लागली. पुन्हा दिनकर टेलरचं लक्ष तिच्याकडे गेलं; पण या वेळी तो म्हणाला काहीच नाही. पारूमामी काठीच्या आधारानं उभी राहिली राहिली अन् अवजड पावलांनी परत घरी आली. सिंगलभर पाणी पिऊन तिनं पोत्यावर अंग टाकलं. डोळे मिटले.

दुपार कधीचीच टळून गेली होती. दिवस मावळतीकडं झुकला तेव्हा पारूमामीला जाग आली तशी ती शिलाच्या आठवणीनं पुन्हा कासावीस झाली. विचार करू लागली, ‘आत्तालोकतं याले पाह्यजेत व्हती माय मही शिलूबाईतं... न्हाई येत कान्नू आता...करती मांघलच्यावानीच या बारीनं बी...शिलूबाई ढळढळ दिसा लागली मले मह्या डोळ्यांपुढं...काय करू आता?’
संध्याकाळची गाडी पाहावी म्हणून पारूमामी पुन्हा उठली. उठल्याबरोबर तिचं अवसान गळालं अन् ती तशीच भतकन् खाली बसली. लवंडली. डोळे मिटून पडली. त्याचबरोबर रंजना बाहेरून आली. राखुंडेच्या सुनेकडं ब्लाऊज शिवायला टाकण्यासाठी ती गेली होती. पारूमामीला पाहून तिनं तोंड वाकडं केलं. म्हणाली : ‘‘मायबई! आज तं चईनच पडेना बाप्पा...लाडा-नवसाची लेक या लागली तं ‘हावरी होऊ का नवरी होऊ’ आसं चालवलंय पह्याटपसून लगे...’’
पण याही बोलण्यावर पारूमामीनं काहीच उत्तर दिलं नाही. ती निपचित पडून राहिली.
दिवस मावळला.
पक्षी-पाखरं ओळीओळीनं घरट्याकडं निघाली. ढोरं-वासरं घराची वाट चालू लागली. दिवेलागणीची वेळ झाली. दिनकर टेलरनं लाईट लावला अन् मशिनचं दर्शन घेतलं. शिवण्यासाठी कापड कापतानाच त्याचं लक्ष रोडवर गेलं. बुलढाणा-भुमराळा गाडी येऊन उभी राहिली. धूळ उडाली. त्या धुळीतूनच दोन मुली, एक मुलगा अन् शीला येताना दिसली. दोन्ही मुलींजवळ एकेक बॅग व शीलाजवळ मोठी सुटकेस होती. दिनकर टेलरच्या समोरून जसा त्यांचा ताफा पार झाला, तसा त्यानं मोबाईल घेतला अन् बटणं दाबून कानाला लावला. म्हणाला,
‘‘बबन, शिलाबाई आली रे... हं...सांग पारूमामीले... हौ नं, लय वाट पाह्यली म्हतारीनं इळंन्माळ लेकीची. आँ...’’ एवढं बोलून त्यानं फोन ठेवून दिला.
फोन बंद करून खिशात ठेवतच बबन ओट्याच्या पायऱ्या चढला. पारूमामी पोत्यावरच लवंडलेली दिसली. तसा तो जवळ जाऊन पारूमामीला हलवत म्हणाला : ‘‘पारूमामी, शिलूबाई उतरली गाडीतून...चला उठा...’’
पारूमामी उठली नाही. त्यानं पुन्हा हलवून उठवण्याचा प्रयत्न केला; पण पारूमामी झोपलेलीच. पारूमामी उठत नसल्याचं पाहून तो घाबरला. घाबरतच तो पुन्हा ओरडला : ‘‘पारूमामी ऽ ऽ’’
इतक्यात शीला आणि तिची लेकरं ओट्याच्या पायऱ्या चढून वर आली. बबनच्या आवाजानं रंजना अन् आरती घाईवाई ओसरीतून तिथं आल्या. शेजारीपाजारी धावले.

पारूमामी गेली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com