पाड्यावरची बाई... (संदीप काळे)

sandip kale
sandip kale
Updated on

सुनीताताई नागरे यांची मुंबईत अंधेरी इथं एक एनजीओ आहे. या एनजीओच्या माध्यमातून त्या राज्यभरातल्या आदिवासी पाड्यांवरच्या समस्यांसंदर्भात काम करतात. आदिवासी पाड्यांवर शैक्षणिक जाणिवा निर्माण व्हाव्यात यासाठीच प्रामुख्यानं त्यांचं काम चालतं...

आदिवासी समाज हा इथला खरा राजा आहे; पण हा समाज आज मोठ्या प्रमाणावर उपेक्षित आहे. या समाजाला मुख्य प्रवाहात आणायचं काम कुणीच करत नाही. ना सरकार, ना राज्यकर्ते. या समाजाकडे मतांपुरतंच पाहिलं जात असावं की काय अशी शंका यावी. चार पुस्तकं शिकून जी मुलं शहरांत आली तीच काय ती शहराची झाली. बाकी, एकूण लोकसंख्येपैकी दहा टक्के असणारा हा समाज आजही आपला कुणीतरी उद्धारक येईल या प्रतीक्षेत जगतोय. या समाजाची नैसर्गिक साधनसंपत्ती जागतिकीकरणाच्या विळख्यात अडकून संपून गेलीय. जंगल हे या आदिवासी समाजाचं आधाराचं खरं ठिकाण; पण तेही चहूकडून नष्ट होत आहे. जंगलाच्या भोवती छोट्या छोट्या वस्त्यांमध्ये राहणारा हा समाज आजही शहरी माणसाला शत्रूच समजत असतो. कारण, शहरातल्या माणसांनी स्वार्थासाठी या आदिवासी बांधवांच्या गळचेपीचं काम केलं आहे. महाराष्ट्रातल्या प्रमुख दहा शहरांमध्ये आदिवासी समाजाची व्याप्ती बघायला मिळते. या दहा शहरांमध्ये ठाणे, रायगड आणि नाशिक अशा मोठ्या शहरांचादेखील समावेश आहे.

महिनाभरातून एका आदिवासी पाड्यावर जायचं हा माझा उपक्रम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. मंदार फणसे यांच्या नजरेतून आम्ही हे पाडे पाहिले आणि या आदिवासी पाड्यांबद्दल नवं काहीतरी जाणून घ्यायची उत्कंठा फणसे यांच्यामुळेच माझ्या मनाला लागलेली असते. मी मुंबईत राहत असल्यानं पालघर आणि नाशिक असे दोन्हीकडचे पाडे मला दोन दिवस जाऊन राहण्यासाठी सोईचे ठरतात. नाशिकजवळच्या कुंदेवाडी या गावानजीकच्या अदिवासी पाड्यात मी त्या दिवशी मुक्कामाला होतो. माणसं आत्मीयतेनं कशी भरलेली असतात आणि किती इमानदार असतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे आदिवासी बांधव! कुणाचं सोनं पडलं तरी त्याला हात लावणार नाहीत, असं वर्तन इथल्या आदिवासी बांधवांचं होतं.

शहरी माणसाला उगवत्या सूर्याचं फार अप्रूप! कारण, जगण्याच्या धबडग्यात उगवता सूर्य पाहायला त्याच्याकडे वेळच नसतो. पाड्यावरचा सूर्य मात्र सगळ्यांना ऊर्जा देऊन उगवणारा भासला. शंभर ते दीडशे लोकांचं गाव, जवळपास सगळ्या झोपड्याच.
नाटक-चित्रपटांत, इतिहासात ज्या पद्धतीनं रंगवलेला उपेक्षित आदिवासी समाज आपण पाहतो त्यापेक्षाही कितीतरी वाईट चित्र इथं होतं.
इथं मला सकाळी सकाळी हळदीचा आणि तुळशीचा काढा देण्यात आला होता. तो घेऊन मी बसलो होतो. फोनवरची काही कामं आटोपून घ्यावीत म्हणून फोन घेतला तर इथं रेंजच नव्हती. रेंजची वाट पाहत बसण्याशिवाय पर्याय नव्हता. तितक्‍यात एका महिलेला पाहून ‘ताई आली, ताई आली’ असं म्हणत पाड्यावरची काही मुलं-मुली त्या महिलेच्या दिशेनं पळताना दिसली. ती महिला आणि तिच्यासोबत आलेली पाच-सहा मुलं-मुली गावातल्या मुख्य चौकाच्या दिशेनं गेली.

मी ज्या झोपडीत थांबलो होतो त्या झोपडीच्या बाजूलाच शेणानं सारवलेल्या जमिनीवर मोठी सतरंजी टाकण्यात आली होती. शेजारच्या छोट्याशा मंदिरात केलेली पूजा, देवाला वाहिलेली वेगवेगळ्या प्रकारची फुलं यामुळं वातावरणात प्रसन्नता होती.
शेजारच्याच झोपडीत चुलीवर स्वयंपाक सुरू असावा...तिथून धूर बाहेर पसरताना दिसत होता, कुठल्या तरी भाजीला वगैरे कढीलिंबाच्या पानांची फोडणी दिली गेली होती...तोही खमंग वास दरवळत होता.

त्या सतरंजीवर ती महिला आणि मुलं-मुली बसल्या. गावातल्या अनेक महिला तिथं आल्या. माणसं जमायला लागली. आपल्या पिशवीतून आणलेला खाऊ आणि कपडे त्या महिलेनं आणि तिच्या सोबतच्या मुला-मुलींनी इतर आदिवासी महिलांना द्यायला सुरुवात केली. थोडा वेळ त्यांच्या गप्पाटप्पा झाल्या आणि गावातल्या काही घरांमध्ये जाऊन ते सगळे जण विचारपूस करू लागले. एकमेकांचे हात हातात घेऊन ते सगळे प्रेमानं बोलत होते.
सत्तरी पार केलेले आणि धड बोलताही येऊ शकत नसलेले एक आजोबा माझ्यापासून काही अंतरावर बिडी ओढत बसले होते.

मी त्यांना विचारलं : ‘‘ही माणसं रोज इकडं येतात का? कोण आहेत ही माणसं?’’
माझं बोलणं आजोबांना फारसं काही कळलं नाही. हातवारे करत आणि दोन्ही हात जोडत तो पुन्हा बिडी ओढायला लागला. देवाला वाहिलेल्या फुलांचा वास, मघाच्या फोडणीचा वास आणि आजोबा ओढत असलेल्या बिडीचा वास...सगळ्या वासांचं मिश्रण वाऱ्यावरून वाहत होतं. काहीसं चमत्कारिक...नकोसंही. या संमिश्र वासासारखीच इथल्या आदिवासी बांधवांची अवस्था झाली आहे असं वाटून गेलं! आपण नेमकं काय स्वीकारावं हे त्यांना कळत नाहीय! किंबहुना, त्यांना कळावं अशी व्यवस्थाच नाहीये! बाप रे...आपण त्यांच्यासाठी किती योजना आणि काय काय करून ठेवलंय...पण हे त्यांच्यापर्यंत जात का नाहीये मग? असा प्रश्न सातत्यानं आदिवासी पाड्यांवर जाणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तींना पडणं अगदी साहजिकच आहे. जेमतेम रस्ते आणि विकासाचा, शिक्षणाचा, आरोग्याचा काहीच संबंध नाही अशा विळख्यात हा समाज आजही अडकलेला दिसतो.

सूर्य हळूहळू माथ्यावर येत होता. अवघ्या पाड्याला वेढा घालून ती महिला आणि तिच्यासोबतचे सगळे जण परत त्याच सतरंजीवर येऊन बसले. गणू हा त्याच पाड्यावरचा माझा मित्र. त्यानं जाऊन त्यांची सगळी माहिती आणली. त्या आलेल्या घोळक्‍यात दोन-तीन डॉक्‍टरही होते. मी आवरलं आणि जिथं ते सगळे जण बसले होते तिथं गेलो. त्या महिलेच्या आपुलकीच्या संवादातून लक्षात आलं की ती या लोकांना आजच भेटत नाहीये. गणूनं त्या महिलेशी माझी ओळख करून दिली.
गणू म्हणाला : ‘‘या सुनीताताई. आमच्याकडे नेहमी येत असतात आणि इथले प्रश्न सोडवण्यात त्यांचा पुढाकार असतो.’’

आमचा नमस्कार झाला. त्या पुन्हा कामात व्यग्र झाल्या. त्यांनी आणलेले डबे आणि पाड्यावर शिजलेलं काही अन्न यातून आलेल्या सगळ्या पाहुण्यांची पंगत बसली. तीत मीही होतो. त्या पाड्यावर शिजलेलं अन्न रुचकर होतं. तोंडल्याची भाजी, दोडक्‍याची भाजी,
भाकरी, उडदाचं वरण...जेवण आटोपलं आणि मी त्या सगळ्या मुलांशी गप्पा मारल्या. नंतर मी सुनीताताईंशी म्हणजेच सुनीता नागरे (७९७७८६८६१८) यांच्याशी बोलायला सुरुवात केली. आदिवासी पाड्यावरचं भीषण वास्तव त्यांनी त्यांच्या शब्दांत सांगितलं. मला जितकं माहीत होतं त्याहून कितीतरी पटींनी अधिक माहिती त्यांच्याकडे होती. राज्यातल्या बहुतेक पाड्यांवर त्या दोन-तीन वेळा तरी जाऊन आलेल्या आहेत. त्या भागाचं त्यांनी सर्वेक्षणही केलं आहे. शिक्षणाच्या आणि आरोग्याच्या दृष्टीनं त्यांनी अनेक सामाजिक संघटनांशी चर्चा करून त्या पाड्यांवरचं वर्षांनुवर्षांचं संकट दूर कसं होईल यासाठी पुढाकार घेतला आहे. सुनीताताईंची मुंबईत अंधेरी इथं ‘अभिषेक शैक्षणिक, सामाजिक संस्था’ या नावाची एनजीओ आहे. या एनजीओच्या माध्यमातून त्या राज्यभरातल्या आदिवासी पाड्यांवरच्या समस्यांसंदर्भात काम करतात. आदिवासी पाड्यांवर शैक्षणिक जाणिवा निर्माण व्हाव्यात यासाठीच प्रामुख्यानं त्यांचं काम असल्याचं लक्षात आलं.

‘‘या सगळ्या लोकांबरोबर काम करावं असं तुम्हाला का वाटलं?’’ मी सुनीताताईंना विचारलं.
त्या म्हणाल्या : ‘‘पालघरमधल्या एका आदिवासी पाड्यावर मी दिवाळीत दोन दिवस मैत्रिणीबरोबर मुक्कामी होते. तेव्हा मी तिथले सगळे बारकावे पाहिले. आदिवासी समाज हा मेहनत करणारा समाज आहे. अनेक कलागुणांनी परिपूर्ण आहे. तरीही या समाजाकडे सातत्यानं दुर्लक्ष झालेलं आहे. शिक्षणाचं महत्त्व त्यांना पटवून देण्यासाठी शासन पुढं येत नाही की कुठल्या संस्थाही पुढं येत नाहीत. या आदिवासी पाड्यांवरच्या भावी पिढीसाठी आपण काम करायचं असं मी त्याच दिवाळीपासून ठरवलं. शिक्षण हा विषय मध्यवर्ती ठेवायचा असंही निश्चित केलं. आज महाराष्ट्रातल्या दीडशेहून अधिक पाड्यांवरचे त्या त्या भागातले माझ्याशी जोडलेले लोक शिक्षणासाठी काम करत आहेत. प्रत्येक पाड्यावरची किमान पंचवीस मुलं दर वर्षी शाळेसाठी पुढं आली पाहिजेत हे आमचं छोटंसं लक्ष्य आहे. अर्थात गेल्या चार-पाच वर्षांपासून ही संख्या वाढत आहे. आजही जादूटोण्याचा वापर करून आरोग्याचे प्रश्न सोडवायचे, ही धारणा बाळगून असणाऱ्या आदिवासी समाजापुढे आरोग्याच्या गंभीर प्रश्नाचंही मोठं आव्हान आहे. काही एनजीओंना, सेवाभावी असणाऱ्या व्यक्तींना समवेत घेऊन आम्ही काम सुरू केलं आहे. माझी ताकद खूप कमी आहे; पण रोज नव्यानं कुणीतरी माझ्या या चळवळीशी जोडलं जातं आहे आणि हे काम दिवसेंदिवस मोठं होताना दिसत आहे. एखाद्या लहान मुलाचा हात हातात घेऊन, त्याच्या गालाचा पापा घेऊन त्याच्याशी आपण बोललो, त्याला विश्वासात घेतलं तर आपल्या स्पर्शासाठी ते लहान मूल आसुसल्याचं मी सातत्यानं पाहिलं आहे.

एकदा भेटलं की मुलं ओळख विसरत नाहीत. सांगितलेलं काम ती चोखपणे बजावतात. चांगलं काम होत असेल तर गावातली माणसंही कधी विरोध करत नाहीत. आज माझ्या टीमच्या माध्यमातून तीन ते साडेतीन हजार मुलं शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आलेली आहेत आणि एक मोठी आशा या समाजाच्या उन्नतीसंदर्भात निर्माण झाली आहे. या लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी काम करते. हे काम निःस्वार्थीपणे वाढत जावं यासाठी माझे सातत्यानं प्रयत्न असतात.’’
मुंबईत फूटपाथवरच्या मुलांसाठी काम करणाऱ्या सुनीताताई आज महाराष्ट्रातल्या अनेक पाड्यांवर जाऊन आदिवासी मुलांसाठी
मोठं काम उभारत आहेत. पदरमोड करत ज्यांनी कुणी मदत केली त्यांची मदत घेत हे एक वेगळं काम दिवसेंदिवस वाढत आहे.

शिक्षण, आरोग्य आदींसदर्भात आदिवासी समाजासाठी भरपूर काही करायला आणखीही खूप वाव असला तरी स्वतःत बदल करण्यासाठी हा समाज उत्सुक आहे हेही दिसत होतं. अज्ञानी असणाऱ्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिकलेली किती पावलं या पाड्यांकडे वळतील हे माहीत नाही. मात्र, सुनीताताईंसारख्याच आणखी दोन-चार व्यक्ती या चळवळीच्या निमित्तानं घडल्या तर इथला राजा असलेला हा आदिवासी समाज मुख्य प्रवाहात नक्कीच येईल.
आदिवासी पाड्यांवर जाताना आपण त्यांना चिरंतन टिकणारं काय देऊ शकतो हा विचार करून आणि त्याचं योग्य ते नियोजन करून सुनीताताई आणि त्यांची टीम या चळवळीला बळकटी देण्याचं काम करत आहे. सुनीताताईंना भेटण्यासाठी बऱ्याच आदिवासी महिला आल्या होत्या. अंग व्यवस्थित झाकलं जाईल इतकेही कपडे त्या आदिवासी महिलांपैकी अनेकींकडे नव्हते; पण त्यांचं मन आशेनं काठोकाठ भरलेलं आहे. त्यांच्या मनात अनेक प्रश्न होते आणि त्या प्रश्नांची उत्तरं त्यांना सुनीताताईंच्या कामातून हवी होती. सुनीताताई या काही शासनाच्या प्रतिनिधी नाहीत की राज्यकर्त्यांच्याही. त्या भाग आहेत तिथं जमलेल्या प्रत्येकाच्या आशेच्या!
या आदिवासींच्या आशा पूर्ण कशा होतील यासाठी आपल्या सगळ्यांचा काय वाटा असेल यावर विचार व्हायला हवा. चर्चा व्हायला हवी.
निरोपाच्या वेळी सुनीताताईंच्या गालांवरून हात फिरवणाऱ्या त्या म्हाताऱ्या महिला म्हणत होत्या, ‘माझी लेक गं तू, लवकर ये...’

जणू आपली लेक आता माहेरून सासरला चालली आहे असं तिथलं वातावरण होतं. निरोप द्यायला आलेल्या त्या म्हाताऱ्या महिला आणि इतर माणसं...ते चित्र आजही स्मरणात आहे. किती आपुलकी असते या माणसांमध्ये! आणि तुम्ही-आम्ही मात्र या माणसांविषयीचा माणुसकीचा धर्म विसरत चाललो आहोत. इथला जो मूलनिवासी, त्यालाच ओळख देणं विसरत चाललो आहोत आपण. मात्र, अजूनही वेळ गेलेली नाही. आपण सगळ्यांनी मिळून या लोकांसाठी काहीतरी करायला हवं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com