कष्टाच्या रेषा... (संदीप काळे)

sandip kale
sandip kale

कुठल्या तरी अनामिक क्षणी ज्येष्ठ व्यक्तीकडून एका तरुणाला प्रेरणा मिळाली आणि त्यानं स्वतःची वाट शोधायचं ठरवलं. स्वतःचं असं काहीतरी करायचं असा निर्णय त्यानं घेतला आणि होता-करता त्याला हळूहळू यश मिळत गेलं. आत तो तरुण ‘यशस्वी उद्योजक’ म्हणून एका व्यवसायात स्थिरावला आहे...

त्या दिवशी पुण्यात बाणेरच्या एसआयएलसी ऑफिसात मीटिंग्ज् होत्या. मीटिंगमधून बाहेर आल्यावर फोन बघितला तर प्रवीण गायकवाड यांचे चार-पाच मिस्ड् कॉल दिसले. त्यांना परत फोन केला. ते म्हणाले : ‘‘आहात कुठं? तीन वाजता भेटायचं आहे आपल्याला. आठवण आहे ना?’’
ठरल्यानुसार त्यांच्या ऑफिसमध्ये तीन वाजता आम्ही भेटलो. आम्ही बोलत बसलो असताना एक तरुण त्यांच्या शेजारी येऊन बसला. त्यांनी मला त्याची ओळख करून दिली. त्याचं वर्षभरातलं काम सांगितलं.
राहुल शिवाजी पापळ (९८२२८९०१३१) हा पस्तिशीचा तरुण आमच्यासमवेत बसला होता. राहुलचा आजवरचा सगळा प्रवास एखाद्या चित्रपटातल्या कहाणीसारखा वाटला. आठवी नापास असलेला राहुल आज कोट्यवधींची उलाढाल असलेल्या कंपनीचा मालक आहे. हजारो हात त्याच्या अवतीभवती राबत आहेत. हे सगळं एका साक्षात्कारामुळे घडलं आणि राहुल आज मोठा उद्योजक म्हणून समोर आला आहे.
गायकवाड यांचं बोलणं झाल्यावर ते राहुलला म्हणाले : ‘‘तू बोल आता...’’
राहुल सांगू लागला : ‘‘सन २०१२ मध्ये मी शिवजयंतीची वर्गणी मागण्यासाठी प्रवीण गायकवाड यांच्याकडे गेलो होतो. तेव्हा त्यांनी मला खूप सुनावलं...‘किती दिवस असे पैसे मागत फिरणार आहेस? एवढा मोठा झालास; पण चार पैसे कमवायची अजून अक्कल नाही.’ इत्यादी. त्यांनी वर्गणी तर दिलीच नाही; पण ‘आयुष्यात आपण काय करत आहोत...’ याची तीव्र जाणीव करून दिली. नंतरचे दोन दिवस काहीच सुचेना, तेव्हा मी आइस्क्रीमच्या एका कंपनीत छोटासा जॉब करत होतो. त्याच कंपनीत मेहनतीच्या बळावर माझं पोस्टिंग एरिया मॅनेजर म्हणून करण्यात आलं; पण कमी पगार आणि खूप अपेक्षा यांचा ताळमेळ कुठं बसेना. शेवटी, स्वत:चा व्यवसाय करायचं ठरवलं व पाचशे रुपयांमध्ये कुल्फीचा व्यवसाय सुरू केला. काही दिवस तो चालवला आणि पुन्हा लक्षात आलं की या व्यवसायात काही वेगळेपणा शोधायला हवा आणि तो वेगळेपणा शोधता शोधता, अनेक प्रयोग करता करता चार वर्षं गेली. त्या चार वर्षांत मी खूप काही शिकलो.

जवळ होतं-नव्हतं ते सगळं गहाण ठेवत ‘लाडाची कुल्फी’ नावाचा ब्रॅंड नव्यानं सुरू केला आणि तो विकसित करत नेला. दोन वर्षांत दीडशे शाखा झाल्या आणि आता पाचशेपर्यंत शाखा काढाव्यात अशी मागणी होत आहे. एवढंच नाही तर दुबई, शारजा, जर्मनी आणि अमेरिका या ठिकाणीसुद्धा ‘लाडाची कुल्फी’ सुरू करावी अशी मागणी आहे. आम्ही तिथंही शाखा सुरू करणार आहोत.’’
राहुलनं दिलेल्या माहितीनुसार माझ्या नजरेसमोर त्याच्या व्यवसायाचा सगळा पसारा आला. त्यानं सुरुवात कशी केली असेल? त्याची फॅक्‍टरी/कंपनी कशी असेल? त्यानं तयार केलेल्या मालाची चव कशी असेल? असा विचार मी करू लागलो
मी गायकवाड यांना म्हणालो : ‘‘आपण राहुलची फॅक्टरी/कंपनी पाहायला एकदा नक्कीच जाऊ या.’’

उत्साही स्वभावाचे गायकवाड लगेचच म्हणाले : ‘‘कधी कशाला? आजच जाऊ या.’’
राहुलच्या फॅक्‍टरी/कंपनीकडे आम्ही लगेचच निघालो. पुण्यात कात्रजला ती आहे. काही अंतरावरच त्याचं ऑफिसही आहे. स्वच्छ, टापटीप असणारी माणसं शास्त्रीय पद्धतीनं तिथं काम करत असताना दिसली. एकेक करून राहुलनं सगळ्या विषयांची माहिती दिली. गायकवाड यांच्याकडे हात करत राहुल मध्येच म्हणाला: ‘‘यांनी जर मला वेळीच जमिनीवर आणलं नसतं तर हे घडलं नसतं.’’
गायकवाड म्हणाले : ‘‘मी तुला फक्त परिस्थितीची जाण करून दिली, मित्रा. मी सगळ्यांना जे सांगतो तेच तुलाही सांगतो...खिशाला आर्थिक बळ पाहिजे आणि मनात शिवाजीमहाराजांचं स्मरण पाहिजे. असं असेल तर आयुष्याची लढाई लढता येते आणि जिंकताही येते. तुमची किंमत तुमच्या बॅंकेच्या पासबुकावरून कळत असते!’’
थोरल्या भावाच्या भूमिकेतून गायकवाड पुन्हा सगळं राहुलला सांगू लागले.
सोहम भाटी नावाच्या एका मित्रानं राहुलला फॅक्टरी/कंपनी उभारण्यासाठी मदत केली. सोहमचा उल्लेख राहुलच्या बोलण्यात वारंवार येत होता. राहुलला आता उत्पादनप्रक्रिया करणाऱ्या ऑटोमॅटिक सिस्टिमवर सगळ्या फॅक्टरीचं/कंपनीचं काम उभं करायचं आहे. त्यासंदर्भात राहुलला भेटण्यासाठी काही मुलं आली होती. राहुलनं त्या सहा मुलांची ओळख करून दिली. सहाही जण इंजिनिअर आहेत.
राहुलनं काढून दिलेल्या आइस्क्रीमच्या शाखांमधून त्यातल्या तिघांनी काम सुरू केलं आहे. त्यांना मी विचारलं : ‘‘तुम्ही इंजिनिअर असूनही आईस्क्रीम विकायचं काम का करता?’’
ते म्हणाले : ‘‘इंजिनिअर असूनही आम्हाला एका कंपनीत तीस ते चाळीस हजार रुपये मिळायचे. आता या व्यवसायातून महिन्याला लाखभर रुपये मिळतात.’’
त्यांचं हे उत्तर पुरेसं बोलकं होतं.
फॅक्‍टरी/कंपनीपासून काही अंतरावरच राहुलचं घर आहे.
‘‘आपण आईला भेटून येऊ,’’ असं म्हणत राहुलनं आम्हाला त्याच्या घरी नेलं. राहुलच्या आई आशाताई पापळ, पत्नी अक्षदा आणि तीन वर्षांची मुलगी राजस या तिघी घरी होत्या.
आम्ही गप्पांना सुरुवात केली. माझं सहजच समोर लक्ष गेलं तर आशाताई फुलांचे हार करत बसल्या होत्या.
मी त्यांना विचारलं : ‘‘काही कार्यक्रम आहे का? तुम्ही एवढे हार तयार करतायत ते.’’ त्या हसल्या आणि काहीच न बोलता पुन्हा हार करू लागल्या. गायकवाड फोनवर बोलत होते.
राहुल माझ्याजवळ येऊन म्हणाला : ‘‘आईचं हे नेहमीचं काम आहे. हार करायचं हे काम आई पंधरा-सोळा वर्षांपासून करते. माझे वडील सुतारकाम करायचे. ते कॅन्सरनं गेले. त्यांच्या पश्र्चात आम्हा
बहीण-भावांना सांभाळायची जबाबदारी आईवर आली. धुणी-भांडी करून आईनं आम्हाला लहानाचं मोठं केलं. नंतर, घरीच काहीतरी काम करावं म्हणून ती हार करण्याच्या या कामाकडे वळली. सकाळी माळीबुवा फुलं आणून देतात आणि संध्याकाळी तयार झालेले हार घेऊन जातात.’’
मी आशाताईंच्या हातांकडे बारकाईनं पाहिलं. त्यांचे हात हातात घेतले. सुईनं छिद्र पडून पडून त्या हातांची अगदी चाळण झाली होती.
आशाताईंचे हात मी हातात घेतल्यावर राहुलचे डोळे भरून आले.
राहुलची मुलगीही मग त्याला येऊन बिलगली. आईच्या काबाडकष्टांचे काही प्रसंग राहुलनं मला सांगितले. राहुल हळव्या मनाचा आहे हे माझ्या लक्षात आलं. माझ्या मनात आलं, एखादा भविष्य सांगणारा जेव्हा या हातावरच्या रेषा पाहून भविष्य बघेल तेव्हा तो काय भविष्य सांगेल? आशाताईंनी कष्टाच्या रेषांचे असे संस्कार राहुलवर लहानपणापासूनच केले असल्याचं दिसत होतं. त्यातून त्यानं व्यवसायाचा मोठा पसारा आकाराला आणला.

राहुल म्हणाला : ‘‘माझ्या आईनं खूप सोसलं आहे माझ्यासाठी.’’
मी म्हणालो : ‘‘होय. ते दिसत आहे. त्यांच्या हाताची पार चाळण झाली आहे.’’
आशाताई म्हणाल्या : ‘‘असं काही नाही. काम करताना हातावर खुणा उमटणारच...’’
मी विचारलं : ‘‘किती पैसे मिळतात तुम्हाला या कामातून?
आशाताई म्हणाल्या :‘‘अडीच रुपयांना एक हार. तो सोळा दोऱ्यांनी विणलेला असतो. असे पंचवीसेक हार दिवसभरात होतात आणि हे सगळे तयार झालेले पुण्यातल्या एका नामवंत गणपतीमंदिरात विक्रीसाठी जातात. आता या कामाची सवय झाली आहे. त्यामुळे काम सहजपणे उरकलंही जातं.’’
ज्यांची आई खूप मेहनती असते आणि ज्यांची आपल्या कामावर श्रद्धा असते ती माणसं नेहमीच यशस्वी होत असल्याची खूप उदाहरणं मी पाहिली आहेत. राहुलचंही तसंच होतं.
आशाताई मला सांगू लागल्या : ‘‘ हे काम आता तसं मी कमी कमीच करत आणलं आहे. राहुलनं मलाही आइस्क्रीमचं एक दुकान टाकून दिलं आहे. आता दरवर्षी पंधरा दिवस मी सगळी देवस्थानं फिरते. दुपारच्या वेळी जेव्हा दुकान बंद असतं तेव्हा मी हे हारांचं काम करत बसलेली असते.’’
राहुलची पत्नी अक्षदा सीए आहे. राहुलचा सगळा बिझनेस अक्षदा सांभाळतात. सोबतीला सकारात्मक जोडीदार असेल तर कोणतंही स्वप्न प्रत्यक्षात आणता येतं याचंच हे उदाहरण.

बाहेर रातकिड्यांची किरकिर सुरू झाली होती. आता निघायला हवं होतं. तत्पूर्वी, अक्षदा यांनी वेगवेगळ्या प्रकारची कुल्फी गायकवाड यांना आणि मला टेस्टसाठी दिली. कुल्फीचे ते विविध प्रकार रसनातृप्ती करणारे होते.
मी राहुलला विचारलं : ‘‘आम्हाला मुंबईत ही कुल्फी खायची असेल किंवा कुठल्याही शहरात जाऊन या कुल्फीचं दुकान शोधायचं असेल तर काय करावं लागेल?’’
राहुल म्हणाला : ‘‘मी लोकेशनबद्दलचं ॲप तयार केलं आहे. तुम्ही ज्या कुठल्या शहरात असाल त्या नावासह ‘लाडाची कुल्फी’ असं सर्च केलं की त्या शहरातल्या दुकानाचा पत्ता तुम्हाला आपोआप मिळेल.’’ राहुलनं आणखी एक माहिती दिली.
तो म्हणाला : ‘‘मला जेवढा नफा होतो त्याच्या वीस टक्के नफा मी गडसंवर्धनासाठी खर्च करतो. गड पाहायला जायला मला लहानपणापासूनच आवडायचं. आपण किल्ल्यांसाठी काही तरी केलं पाहिजे असंही तेव्हापासूनच वाटत आलं आहे. त्यामुळे आर्थिक मदत करायची असं ठरवून मी ही मदत करत असतो. प्रमोद मांडे या माझ्या गुरूंनी आयुष्यभर गड-किल्ल्यांसाठी काम केलं. त्यांनी भारतातले चार हजार गड-किल्ले पाहिले. त्याचे फोटो काढले. आता ते नाहीत. त्यांची अधुरी राहिलेली अनेक स्वप्नं मला पूर्ण करायची आहेत.

मांडे सर म्हणायचे, ‘मराठी माणसानं खूप पैसा कमावून एक तरी किल्ला दत्तक घेतला पाहिजे.’ त्यांचा तो विचार मी प्रत्यक्षात उतरवणार आहे. या कामासाठी मी माझ्या व्यवसायातून सात लाख रुपये गोळाही केले आहेत.’’
गायकवाड यांना राहुलचं एवढं कौतुक का होतं याचा उलगडा होऊ लागला. गायकवाड अनेकांना सांगतात,‘तुम्ही स्वत:चा उद्योग सुरू करा. काम-धंदा वाढवा.’ त्यांचा हा सल्ला तसा अवघड असतो, त्यामुळे फार कमी मुलं तो ऐकतात! राहुलनं मात्र त्यांचा हा सल्ला ऐकला. मनावर घेतला. काहीतरी वेगळं करून दाखवलं. गायकवाड यांना त्याचं कौतुक आहे ते त्यामुळेच.

राहुलचा आणि त्याच्या घरच्यांचा आम्ही निरोप घेतला. गायकवाड त्यांच्या घरी गेले, मी मुंबईच्या रस्त्याला लागलो. कामाची लाज बाळगणाऱ्या अनेक तरुणांचे चेहरे माझ्या नजरेसमोर तरळत गेले. ‘चार पैशांची नोकरीच करतो’ असाच बहुतेक मुलांचा कल का असतो? एक तरुण रोजगार उभा करून हजारो हातांना काम देऊ शकतो. असा रोजगार सुरू करण्यासाठी इतर मुलं पुढं का येत नाहीत? अनेक जण बेरोजगार असतात, ते ‘राहुल’ का होऊ इच्छित नाहीत? कितीतरी प्रश्न मला पडले होते...काळ कुणासाठी थांबत नाही; पण काळाला साजेसं असं काहीतरी उभं करायचं हे आपल्याच हातात नसतं का? हे धाडस आपण दाखवणार आहोत की नाही? राहुलकडे बघून जर आणखी चार ‘राहुल’ घडले तर राहुलच्या आईच्या चाळण झालेल्या हातांचं चीज होईल! गायकवाड यांच्या धडपडीचं चीज होईल.
...पण, उद्योगात तरुण पिढी अशी भरारी घेईल?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com