पालावरची पंगत (संदीप काळे)

संदीप काळे sandip.kale@esakal.com
रविवार, 26 एप्रिल 2020

माधवसिंह आणि त्यांची पत्नी समोर आली. दोघं आमच्यासमोर हात जोडून उभे राहिले. सुरकुत्या पडलेले ते वृद्ध चेहरे खूप काही सांगून जात होते. लहान मुलांच्या सुकलेल्या चेहऱ्यावर हसू पाहून आम्हाला आनंद वाटला. माधवसिंह यांच्या इतर भावांना आम्ही आवश्यक ते सामान दिलं आणि आपापल्या घरी निघालो.

माधवसिंह आणि त्यांची पत्नी समोर आली. दोघं आमच्यासमोर हात जोडून उभे राहिले. सुरकुत्या पडलेले ते वृद्ध चेहरे खूप काही सांगून जात होते. लहान मुलांच्या सुकलेल्या चेहऱ्यावर हसू पाहून आम्हाला आनंद वाटला. माधवसिंह यांच्या इतर भावांना आम्ही आवश्यक ते सामान दिलं आणि आपापल्या घरी निघालो.

कोरोनानं सर्वांनाच घरातली कामं करायला भाग पाडलं, त्यात मीही होतोच. लॉकडाउनच्या काळात आठवड्यातून किमान दोन वेळा
जीवनावश्यक सामान आणायला बाहेर पडावंच लागतं. त्या दिवशी असाच खारघरच्या परिसरात सामान आणण्यासाठी निघालो. खाकीतली माणसं सर्वत्र किल्ला लढवत होती. त्यांच्या कर्तव्यभावनेची मनोमन कमाल वाटली.
दुकानातून सामान घेऊन बाहेर पडलो. बाहेर आल्यावर दोन छोट्या छोट्या मुलांनी माझा रस्ता अडवला. म्हणाले : ‘‘काका, काहीतरी खायला द्या. दोन दिवसांपासून काही खाल्लं नाही हो.’’
बिस्किटांचे दोन पुडे मी त्यांना काढून दिले. त्यांच्या उदास चेहऱ्यांवर थोडा आनंद दिसला. ती दोन्ही मुलं पुन्हा दुसऱ्या माणसाकडे गेली व
‘काहीतरी द्या’ म्हणून मागू लागली. मुंबईत हे रोजचं आहे. असं मागणारे पावलोपावली भेटतात. मी सामान घेऊन घरी निघालो. चार दिवसांनंतर मी त्याच ठिकाणी सामान घेण्यासाठी परत आलो. सामान घेऊन बाहेर पडताना तीच दोन मुलं परत दिसली. ‘काका, खाण्यासाठी काही द्या,’ म्हणून त्यांनी हात पुढं केला. आता ती दोन्ही मुलं एकटी नव्हती. त्यांच्याबरोबर चार महिला होत्या. त्या चार महिला एरवीही भीक मागणाऱ्या असतील असं त्यांच्या राहणीमानावरून वाटत नव्हतं. पलीकडे असणाऱ्या औषधांच्या दोन दुकानांपुढं आणि दुसऱ्या बाजूला असणाऱ्या दोन किराणा दुकानांपुढं आणखी काही महिला, काही पुरुष आणि लहान लहान मुलं खाण्यासाठी काहीतरी मागत होती. मागच्या वेळपेक्षा या वेळचं हे चित्र विदारक होतं. काही तरी सूचित करणारं होतं. मी सामान गाडीत ठेवलं आणि पुन्हा त्या चार महिलांकडे आणि त्या मुलांकडे आलो. माझ्या हातात चिप्सचे दोन पुडे होते. ते मी त्या दोन्ही मुलांना दिले. त्या चार महिलांमधल्या एकीला विचारलं : ‘‘तुम्ही कुठून आला आहात? इथं नवीन आहात का? इकडे तुम्हाला कधी पाहिलं नाही...’’

मी तिला अधिक काही देईन या आशेनं ती महिला पुढं येऊन माझ्याशी बोलू लागली : ‘‘दादा, हमारा बहुत हाल चल रहा है, थोडा आटा ले के दो ना,’’
मी विचारलं : ‘‘आप कहाँ से हो?’’
ती म्हणाली : ‘‘राजस्थान से.’’
काही लोक जवळच पलीकडे भीक मागत होते. त्यांच्याकडे हात करत मी तिला विचारलं : ‘‘हे सगळे लोक तुमच्याबरोबरच आलेले आहेत का?’’
ती म्हणाली : ‘‘हो.’’
आमचं बोलणं सुरू असताना मी दुकानदाराला हाक मारली आणि म्हणालो : ‘‘अहो, पाच किलो कणीक द्या या महिलेला.’’
मग ती महिला कणीक घ्यायला दुकानाच्या दिशेनं लगबगीनं गेली. दुसरी महिला पुढं आली आणि हात जोडून मला धन्यवाद देऊ लागली.
मी म्हणालो : ‘‘चला, तुमचा चार दिवसांचा खाण्याचा प्रश्‍न तर मिटला.’’
ती बाई माझ्याकडे बघत म्हणाली : ‘‘दादा, पूरे पचास लोग है. इस से क्‍या होगा?’’
हे ऐकून मी एकदम दचकलो.
‘तुम्ही कुठले आहात? राहता कुठे? एवढे लोक एकत्रित आले कसे?’ असे सर्व प्राथमिक प्रश्‍न मी त्या बाईला विचारले. मुंबईत नेहमी बनाव करून भीक मागणारे जे लोक असतात त्यांपैकी हे लोक नव्हतेच याची खात्री मला पटली. त्या बाईच्या बोलण्यातून मला माहिती मिळाली ती अशी : राजस्थानमधून काही मंडळी व्यापार करण्यासाठी इथं आली असून लॉकडाउनच्या काळात त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
माझ्यासमोर उभ्या असलेल्या त्या बाईला मी म्हणालो : ‘‘तुम्ही जिथं राहताय तिथं मला घेऊन जाल का?’’
ती बाई अगदी काकुळतीनं म्हणाली : ‘‘दादा, आता दुकानं उघडलीत. ती दोन तासांनी पुन्हा बंद होतील, मग उद्याच उघडतील. आता आम्ही लोकांना मागितलं नाही तर लेकरंपण उपाशी झोपतील.’’
मी त्या बाईला म्हणालो : ‘‘मला तुमच्या सर्व कुटुंबाला मदत करायची आहे.’’
माझ्या बोलण्याचा तिला विश्‍वास वाटला; पण तिच्या मनात शंकेचीही पाल चुकचुकत होती...ती म्हणजे, समजा मी मदत नाही केली तर इकडे जी भीक मिळाली असती तीही गेली असती आणि तिकडे मी काही देणार होतो तेही नक्की मिळणार की नाही याची शाश्‍वती तिला नव्हती.
यावर तिनंच मधला मार्ग काढला.
ती म्हणाली : ‘‘दादा, हा मुलगा तुम्हाला घेऊन जाईल.’’
मी म्हणालो : ‘‘ठीक आहे.’’
मी त्या दुकानदाराचे पैसे दिले आणि ती माणसं जिथं राहतात त्या दिशेनं मी त्या मुलाबरोबर निघालो.

थोड्या वेळापूर्वी रस्त्यावरच्या येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना भीक मागत असलेला तो मुलगा गाडीत माझ्या शेजारी अगदी ऐटीत बसला होता. त्याचं नाव वीरेंद्र. वय अंदाजे सात-आठ वर्षं. आपली भूक विसरून तो या छोट्या प्रवासाचा आनंद घेत होता. या जगात सर्वात मोठं कुठलं संकट असेल तर ते भूकमारीचं आहे हे मघाशी त्या महिलेच्या चेहऱ्याकडं बघून मला जाणवलं होतं.
‘मामा, गाना लागाओ ना,’ म्हणत त्या मुलानं माझाकडे पाहिलं.
मी गाणं लावलं... ‘वो हमसफ़र था मगर उस से हमनवाई न थी...’आबिदा परवीन गात होत्या.
मी वीरेंद्रच्या चेहऱ्याकडे पाहिलं,
हे गाणं त्याला आवडलं नसल्याचं त्याच्या चेहऱ्यावरून मला जाणवलं.
ही सगळी मंडळी खारघरमधल्या सेक्‍टर पंधरामधल्या ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी आम्ही अवघ्या सात मिनिटांत
जाऊन पोचलो. आमची गाडी थांबताच त्या पालामध्ये, तंबूमध्ये असणारी चार-पाच मुलं बाहेर आली. माझ्या शेजारी बसलेल्या वीरेंद्रला पाहून ती मुलं गाडीच्या दिशेनं जोरात धावत आली. मुलं जवळ येताच वीरेंद्रनं गाडीतल्या गाण्याचा आवाज वाढवला. त्याला त्या मुलांपुढं इम्प्रेशन पाडायचं असावं! मुलं भूक विसरून वीरेंद्रकडे कौतुकानं पाहत होती. वीरेंद्रनं काच खाली करून सर्वांकडं पाहत एकदम फिल्मी स्टाईलनं हात हलवला.
तंबूच्या आतमध्ये असलेल्या म्हाताऱ्याकोताऱ्या माणसांना वाटलं, की हा मुलगा चुकून कुठल्या तरी गाडीतून आला असावा किंवा काही किरकोळ अपघात झाल्यामुळे त्याला सोडायला कुणीतरी आलं असावं...
वीरेंद्र बाहेर येऊन त्या सर्व माणसांशी जेव्हा बोलायला लागला तेव्हा त्यांना, मी इथं का आलो आहे, हे समजलं.
मी त्या माणसांना नमस्कार केला. त्यांनीही प्रतिसाद दिला. मी त्यांच्याशी बोलू लागलो.
ही माणसं कोण आहेत, इथं का बसली आहेत आणि आता भीक का मागत आहेत, हे मला कळलं.
तिथं एका बाजूला भरपूर सामान, सामान वाहून नेणारे दोन ट्रक, दोन जुन्या धाटणीच्या जीपगाड्या असा भलामोठा पसारा होता आणि किमान तीस ते पस्तीस माणसं सामावतील असा मोठा तंबू होता. एक मोठा परिवार आणि त्याचा भला मोठा संसार असं ते दृश्य होतं.
तंबूत असलेल्या कोरीव, नक्षीदार चटईवर मी त्या माणसांसमवेत बसलो. कुठल्या तरी
महालात बसून कुठली तरी कला मी अनुभवत आहे की काय असंच मला वाटलं. ते कोण आहेत आणि आता त्यांची अवस्था काय आहे हे सारं त्यांच्या बोलण्यातून उलगडत गेलं. राजस्थानमधल्या चित्तोडगड जिल्ह्यातल्या भदेसर या गावची ही सगळी मंडळी होती.
बनस नदीच्या काठी थोडी शेती आणि मोठा वाडा असं थाटात जगणारं हे चौहान कुटुंबीय.
एकेका पिढीगणिक परिस्थिती खालावत गेली.

कुटुंबाचा विस्तार होत गेला आणि ही मंडळी हळूहळू मोठमोठ्या शहरांत पोटासाठी पांगली. या सर्व कुटुंबाचे प्रमुख आहेत माधवसिंह चौहान. कुटुंबातले सर्वात ज्येष्ठ सदस्य. वय ८५ च्याही वर.
माधवसिंह सांगू लागले : ‘‘आम्ही अकरा भाऊ आणि तीन बहिणी. तिन्ही बहिणी गावाकडे. सहा भाऊ कोलकता इथं आहेत आणि आम्ही पाच भाऊ मुंबईत आहोत. आमचे सर्व पूर्वज महाराजा रतनसिंह यांच्या दरबारात सल्लागार म्हणून काम करायचे. एवढंच नाही तर, आमच्या घराण्याला ‘नक्षीदार काम करणारं घराणं...कलाकार घराणं’
म्हणून राजमान्यता होती.’’
हे सांगताना माधवसिंह यांच्या बोलण्यातून त्यांच्या घराण्यातल्या कलेविषयीचा स्वाभिमान झळकत होता
इथले पाचही भाऊ हे नवी मुंबईत जवळजवळ राहतात. त्यांनी तयार केलेल्या नक्षीदार मूर्ती, ताडपत्र्या, खुर्च्या, चटया आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीचं सामान पाहून मी अगदी थक्क होऊन गेलो. ती कलाकारी नक्कीच कदर करण्यासारखी होती.
एकेक वस्तू दाखवत माधवसिंह मला माहिती देत होते; पण माझं चित्त मात्र महाराजा रतनसिंह, राणी पद्मिनी, अल्लाउद्दीन खिलजी यांच्या इतिहासाकडे होतं. ‘पद्मावत' या चित्रपटातून तो सर्व इतिहास मी अनुभवला होता. तो इतिहास पुन्हा डोळ्यांपुढं येत राहिला. माधवसिंह यांनी महाराजा रतनसिंह यांचा फोटो दाखवला. त्या फोटोवर हात फिरवत मी पुन्हा भानावर आलो.
काय वेळ येते माणसावर पाहा...एकेकाळी राजमान्यता असलेल्या या परिवाराला गेल्या दहा वर्षांपासून मुंबईनं अगदी लेकरासारखं सांभाळलं आहे आणि आज मात्र कोरोनासारख्या महामारीनं त्यांच्यावर दारोदार फिरण्याची वेळ आणली आहे. म्हातारी माणसं, लहान लहान मुलं
मौल्यवान नक्षीदार वस्तूंची राखण करत घरी, म्हणजे या पालावर, थांबून आहेत, तर बाकीची सर्व मंडळी पोटाच्या खळगीसाठी परिसरातच इकडं तिकडं भटकून कुणाला काही, कुणाला काही मागत आहेत.
माझं आणि माधवसिंह यांचं बोलणं सुरू असताना त्यांची पत्नी तारामती मध्येच म्हणाल्या : ‘‘आमच्या मुलांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करा,’’
मीही लगेच होकारार्थी मान हलवली.
इकडे पालावर यायला निघाल्यापासूनच माझं त्याविषयीचं नियोजन मनातल्या मनात सुरू होतंच.
नोटाबंदीपासून या अशा काम करणाऱ्या कारागिरांचा धंदा पार बुडाला, त्यात आता ही महामारी...आणि पुढचं चित्र तर कल्पनेपलीकडचं होतं. लहान लहान मुलं, म्हातारी माणसं यांचं काय करायचं असा प्रश्‍न घरात काम करणाऱ्या तरण्याबांड माणसांना पडला होता.
कोरोनाच्या या काळात मुंबई शहरात काही सामाजिक संघटना गरीब लोकांसाठी काम करत असल्याचं मला माहीत होतं. अंधेरीच्या
‘अभिषेक सामाजिक व शैक्षणिक संस्था’ या एनजीओच्या प्रमुख सुनीता नागरे यांना मी फोन केला आणि या कुटुंबाविषयीची सर्व माहिती त्यांना सांगितली. नागरे या ‘सी वूड’ भागात काही लोकांना अन्न देण्यासाठी आल्याच होत्या.
त्या म्हणाल्या : ‘‘मला तिकडे येण्यासाठी दोन तास लागतील.’’
मग पुढचे दोन तास माधवसिंह यांना बरोबर घेऊन मी नवी मुंबईत असणारे माधवसिंह यांचे भाऊ आणि त्यांच्या राहत्या जागा कुठं आहेत हे शोधून काढलं. या प्रवासादरम्यान माधवसिंह म्हणाले : ‘‘पोलिस इथं रस्त्यावर फिरू देत नाहीत...आणि आमच्या राज्यात परत जाण्याचा प्रश्‍नच नाही. आता तिथं ना कुणी आमच्या ओळखीचं, ना कुणाकडे उसनंपासनं मागण्याची पत. काही दिवस लहान मुलंही आम्हा मोठ्यांसारखीच उपाशी झोपली.’’
हे ऐकून साहजिकच खूप वाईट वाटत होतं.

माधवसिंह यांचे भाऊ जिथं राहतात तिथं आम्ही पोहोचलो. माधवसिंह यांचा तंबू जसा होता तसाच त्यांच्या भावांचाही होता. सगळ्यांची कहाणी एकसारखीच. पुरुष, महिला, लहान मुलं सगळेच खूप देखणे. त्यांच्या अंगावर भरपूर प्रमाणात गोंदणकामही होतं.
दरम्यान, मी पाठवलेल्या लोकेशनवर नागरे आपल्या टीमसह पोचल्या होत्या. त्यांचा फोन आल्यावर मीही त्या जागी पोचलो. त्यांच्याबरोबर एक टेम्पोही होता. त्यात काही शिजलेलं अन्न आणि काही शिधा होता. बाहेर भीक मागायला गेलेली मंडळीही एव्हाना तंबूत परतली होती. आता त्या पालावर जेवायला सगळ्यांची पंगत बसली. मी आणि नागरेही त्या पंगतीत होतो. लोकांच्या लेखी ते केवळ पाल किंवा केवळ तंबू असेल; पण माझ्या लेखी ती एक अभिमानाची बाब होती. कारण, एकेकाळी राजमान्यता असलेल्या कलाकारांच्या शेजारी बसून मी जेवण करत होतो!
पंगत उठली...नागरे यांना मी बाकीच्या लोकांविषयी सांगितलं. काही शिजलेलं अन्न आणि थोडा शिधा तंबूत ठेवून टेम्पो पुढं निघाला.
निघताना माधवसिंह यांना नागरे म्हणाल्या : ‘‘आम्ही दर दोन दिवसांनी तुम्हाला धान्यधुन्य, शिधा आणि शिजवलेलं अन्न आणून देऊ. जर तुम्हाला काही अडचण असेल तर मला फोन करा,’’
नागरे यांनी त्यांचं कार्ड माधवसिंह यांना दिलं.
त्यानंतर दर दोन दिवसांनी या लोकांना अन्न देण्याचं काम होत गेलं. मी अनेक वेळा त्याचा साक्षीदार असायचो.
आम्ही जायला निघालो. माधवसिंह आणि त्यांची पत्नी समोर आली. दोघं आमच्यासमोर हात जोडून उभे राहिले. सुरकुत्या पडलेले ते वृद्ध चेहरे खूप काही सांगून जात होते. लहान मुलांच्या सुकलेल्या चेहऱ्यांवर हसू पाहून आम्हाला आनंद वाटला. माधवसिंह यांच्या इतर भावांना आम्ही आवश्यक ते सामान दिलं आणि आपापल्या घरी निघालो.
ज्यांच्या घरी सामान दिलं होतं त्यांची चूल तर पेटली होती; पण सकाळपासून आपल्याच घरी सामान गेलेलं नाही, हे घरी निघाल्यावर माझ्या लक्षात आलं!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang sandip kale write bhramanti live article