शिवजयंती साजरी करायचीय; पण... (संदीप काळे)

sandip kale
sandip kale

सानिया, मलीहा, हफ़्सा, हुमा, नेहा...या पाचही मुली अत्यंत साध्या घरातल्या, साध्या कॉलनीमधल्या मुली आहेत. त्यांचं शिक्षण पदवीपर्यंत आता कुठं पोचलंय. मुस्लिमांच्या गरीब वस्तीमधल्या, कामगारांच्या मुली उच्च शिक्षणापर्यंत पोचल्या आहेत, असं दृश्य फार कमी प्रमाणात पाहायला मिळतं. मुस्लिम समाजातल्या या शिक्षित तरुणींना आणि याच समाजातल्या इतरही शिक्षित तरुणांना सकारात्मक असं खूप काही करायचंय, पण...

काही दिवसांपूर्वीची गोष्ट.
मित्र मो. दानिश यांच्या आग्रहामुळे नांदेडच्या देगलूर नाका परिसरात असणाऱ्या कै. वसंतराव काळे महाविद्यालयात दीक्षान्त समारंभाच्या आणि पदवीवितरणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग आला. या महाविद्यालयात मुस्लिम मुला-मुलींची संख्या शंभर टक्के आहे. स्टेशनपासून गाडी महाविद्यालयाच्या दिशेनं निघाली. केळीसंशोधन केंद्राच्या बाजूलाच ‘सीएए’विषयीचं आंदोलन सुरू होतं. छोट्या छोट्या बाळांना घेऊन शेकडो मुस्लिम महिला सरकारच्या निषेधार्थ त्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. रखरखत्या उन्हात जोरजोरात घोषणा देणाऱ्या त्या महिलांचा आवाज दिल्लीच्या तख्तापर्यंत पोचणार कसा?
गाडी पुढं आली आणि कॉलेजच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन थांबली. कार्यक्रम सुरू झाला, समोर चारशे-पाचशे विद्यार्थ्यांमध्ये पंचाण्णव टक्के मुली होत्या; तर पाच टक्के मुलं. सगळ्या मुली बुरख्यात आल्या होत्या. कुणी गोल्ड मेडल मिळवलं होतं; कुणी खेळात चॅम्पियनशिप मिळवली होती. कुणी वक्तृत्वात पहिला नंबर मिळवला होता; कुणी महाविद्यालयाचं नेतृत्व देशपातळीवर करत होतं. त्या दिवशी मंचावर आलेल्या प्रत्येक मुलीचा आनंद मला तिच्या डोळ्यांत दिसत होता. कारण, त्या मुलींचे डोळेच तेवढे मला दिसत होते.

माझ्या भाषणात मी म्हणालो : ‘‘तुमचा मी भाऊ, मुंबईहून तुम्हाला भेटायला आलो आहे. शाबासकीची थाप तुमच्या पाठीवर मारण्यासाठी आलो आहे...पण तुमच्यापैकी कोणत्याही बहिणीचा चेहरा मला दिसला नाही याचं दु:ख वाटत आहे.’’
माझं भाषण ऐकून काही मुलींनी चेहऱ्यावरचा बुरखा दूर केला. कार्यक्रम संपला. ज्या मुली बुरखा दूर करून खुलेआमपणे तिथं फिरत होत्या त्यांचं मला कौतुक वाटलं. दानिश यांचे आजोबा अॅड. मो. बहाउद्दीन हे वकिलीसाठी आणि सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध आहेत.
मी त्यांना म्हणालो : ‘‘मला काही मुस्लिम मुलींशी बोलायचं आहे; विशेषत: ज्या मुलींनी कार्यक्रमानंतर बुरखा काढला त्या मुलींशी मी बोलू शकतो का?’’
त्यांनी पाच मुलींना माझ्याशी बोलण्यासाठी बाजूला बोलावलं. बक्षीस घेण्यासाठी मंचावर येताना, पदक स्वीकाताना, हातात प्रमाणपत्र घेताना या मुली लाजत होत्या, संकोचत होत्या; पण त्यांचा उत्साहही मला दिसत होता.
‘धीटपणे बोलले पाहिजे’, असा आत्मविश्वास
दानिश यांचे आजोबा बहाउद्दीन यांनी माझ्याशी बोलणाऱ्या मुलींमध्ये निर्माण केला. चॅम्पियनशिप आणि वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये याच मुली पहिल्या, दुसऱ्या आल्या होत्या. त्या सर्व मुली समजूतदार होत्या. मी त्या पाचही मुलींशी बोलायला सुरुवात केली. माझ्या प्रश्नाला प्रतिप्रश्न करून अत्यंत चतुराईनं मला त्या उत्तरं देत होत्या.
***

मरियम सानिया म्हणाली : ‘‘माझ्या अनेक हिंदू मित्र-मैत्रिणी आहेत, त्यांच्याशी आमचे चांगले संबंध आहेत; पण हे संबंध आवडत नाहीत असाही एक वर्ग या ठिकाणी आहे. अनेक वेळा मलाही मनसोक्तपणे जगावंसं, बागडावंसं, स्वच्छंदीपणे सगळीकडे फिरावंसं वाटतं; पण आसपास घडणाऱ्या घटना मला अस्वस्थ करतात. किमान मी बुरखा घातला तर त्या नजरा माझ्यावर पडणार नाहीत हा दृष्टिकोन असतो.
मी शिवाजीमहाराजांविषयी खूप वाचलं आहे. त्यांनी हिंदूंना आणि मुस्लिमांना समवेत घेऊन स्वराज्याची स्थापना केली. आपणही शिवजयंती साजरी करावी, असं मला वाटतं; पण मी साजऱ्या केलेल्या शिवजयंतीबाबत माझ्या हिंदू बांधवांना काय वाटेल याची काळजीही माझ्या मनात असते. मी ज्या नई आबादी भागात राहते त्या भागातून जेव्हा शिवजयंतीची मिरवणूक आयोजिली जाते तेव्हा दोन दिवस सगळे जण तणावात असतात.’’
सानिया म्हणाली : ‘‘माझी आई अफ्तरी बेगम ही शिक्षिका आहे.
हिंदू-मुस्लिम भेदभाव करायचा नाही, अशी शिकवण तिनं मला लहानपणासूनच दिली आहे. माझ्या मित्रांपैकी मुस्लिम मित्रांची संख्या कमी आणि हिंदू मित्रांची संख्या जास्त आहे. अनेक वेळा जेव्हा दंगली होतात, दोन गटांत जेव्हा मारामाऱ्या होतात तेव्हाही आमची मैत्री अतूट राहते. कारण, आमची मैत्री जाती-धर्माच्या पलीकडची मैत्री आहे.’’
‘सीएए’च्या आंदोलनात सहभागी झाल्याचंही सानियानं सांगितलं.
* * *

मलीहा शहनाज म्हणाली : ‘‘माझे वडील सौदीमध्ये टॅक्‍सी ड्रायव्हर आहेत. आम्हा चार भावंडांना शिकवावं यासाठी वडील एवढ्या दूर जाऊन पैसे कमावतात. इस्लामपुरा या भागात आमचं छोटंसं घर आहे. आई शिलाईकाम करते. माझ्या वडिलांना चार बहिणी आहेत, त्या शिकलेल्या नाहीत. वडीलही फारसे शिकलेले नाहीत. शिक्षण नसल्यामुळे किती समस्यांना सामोरं जावं लागतं हे माझ्या वडिलांना माहीत असल्यामुळे आम्हा चारही भावंडांना उच्च शिक्षण देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. उर्दू बोललं पाहिजे, आपल्या धर्माच्या सर्व अटी-नियमांचं पालन केलं पाहिजे, असे संस्कार माझ्यावर आहेत. मला माझ्या धर्माचा आदर का आहे, तर ‘इतरांना मदत करा’, अशी शिकवण आम्हाला त्यातून दिली जाते म्हणून. मी बुरखा घालत असल्याचं माझ्या मैत्रिणीला फार कौतुक वाटतं.’’
मी तिला विचारलं : ‘‘तू बुरखा का घालतेस?’’ त्यावर ती म्हणाली : ‘‘सुरक्षेच्या दृष्टीनं मला बुरखा घालावा असं वाटतं म्हणून मी घालते. ‘तू बुरखा घालायलाच हवास,’ असं बंधन माझ्यावर कुणी लादलेलेलं नाही.’’
मलीहा हिचा फोन सारखा वाजत होता.
‘फोन घे,’ असं मी तिला सांगितल्यावर तिनं फोन घेतला. तिच्या आईचा फोन होता. मुलगी अजून घरी का आली नाही म्हणून आई
काळजी करत होती. मलीहाबरोबर असलेल्या तिच्या मैत्रिणी बेनजीर फातिमा आणि आफिका तरन्नुम या तिला ‘लवकर घरी चल ना’ असा आग्रह करत होत्या. मुलींना किती अडचणींना सामोरं जावं लागतं, किती वेळा पाळाव्या लागतात हे त्यांच्या तळमळीवरून दिसत होतं.
* * *

हफ़्सा मेहविन म्हणाली : ‘‘माझे वडील शिक्षक आहेत. आम्ही चार बहिणी आहोत. मला डॉक्‍टर व्हायचं आहे. मी थोरली असल्यानं मी आता लग्न करावं, असा माझ्या आजीचा आग्रह असतो. मी जेव्हा बाहेर जाते तेव्हा आजीला माझी खूप काळजी वाटते. माझ्या गल्लीतून ये-जा करतानाही मला भीती वाटते. कारण, आपण राहतो त्या भागातलं वातावरण बरोबर नाही, असं माझ्या मनावर सातत्यानं बिंबवलं जातं. माझ्या सगळ्या मैत्रिणी बुरखा घालतात; त्यामुळे मलाही बुरखा घालावा लागतो. मुलींची बदनामी कशी केली जाते, हे तिच्या एका मैत्रिणीचं उदाहरण देत हफ़्सा हिनं मला पटवून दिलं.
* * *

हुमा सदफ म्हणाली : ‘‘मी जिथं राहते तिथं हिंदू आणि मुस्लिम अशा दोन गल्ल्या आहेत. जेव्हा हिंदू-मुस्लिम गटांमध्ये भांडणं होतात तेव्हा सगळे मुस्लिम एक होतात; पण मुस्लिम-मुस्लिमांमध्ये जेव्हा भांडणं होतात तेव्हा मात्र भांडण सोडवायला कुणी येत नाही. समाजाची मानसिकता अशी का आहे हा प्रश्न मला उच्च शिक्षण घेतानाही पडला आहे.’’
हुमा ही खुदवाई भागात राहते. त्या भागातल्या समस्या कशा सांगाव्यात, असाही प्रश्न तिला पडला होता.
हुमा म्हणाली : ‘‘माझं लग्न ठरलं आहे.‘लग्न झाल्यावरही आपली मुलगी तिचं शिक्षण पूर्ण करेल’, याच अटीवर वडिलांनी माझं लग्न ठरवलं आहे. ‘तुम्हाला परवडेल एवढाच खर्च
माझ्या लग्नात करावा,’ असं मी वडिलांना विनंतीपूर्वक सांगितलं आहे आणि त्यांनाही ते पटलं आहे.’’
* * *

नेहा शेख हिचे वडील ड्रायव्हर आहेत. शिक्षणाचा आणि तिच्या पिढीचा तसा फारसा संबंध नाही; पण नेहाच्या वडिलांनी तिला उच्च शिक्षण द्यायचं ठरवलं. नेहा म्हणाली : ‘‘मी माझ्या मैत्रिणींबरोबर दिवाळी, होळी अशा सणांमध्ये उत्साहानं सहभागी होते. त्याही आमच्या सणांमध्ये अगदी उत्साहानं सहभागी होतात. मात्र, हे आमचं प्रेम दंगल घडल्यावर संशयग्रस्त बनतं आणि या बाबीचा खूप त्रास होतो.’’
एका हिंदू-मुस्लिम प्रेमविवाहानंतर तिच्या घराच्या अवतीभोवती निर्माण झालेल्या परिस्थितीविषयीही नेहा मोकळेपणानं बोलली.
ती म्हणाली : ‘‘ प्रेमाचा आदर केला गेला पाहिजे. प्रेमात पडल्यावर पळून जाणं हा पर्याय नसतो. आपल्या आई-वडिलांचाही विचार अशा वेळी करायला हवा. त्यांचं वडीलधारेपणही अशा वेळी समजून घेतलं पाहिजे. प्रेम हे धर्म-जात बघून नव्हे तर मन बघून केलं जातं. हे होत असताना दोन जातींमध्येसुद्धा वैमनस्य निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली गेली पाहिजे.’’
* * *
सानिया, मलीहा, हफ़्सा, हुमा, नेहा...या पाचही मुली अत्यंत साध्या घरातल्या, साध्या कॉलनीमधल्या मुली आहेत. त्यांचं शिक्षण पदवीपर्यंत आता कुठं पोचलंय. मुस्लिमांच्या गरीब वस्तीमधल्या, कामगारांच्या मुली उच्च शिक्षणापर्यंत पोचतात, असं दृश्य फार कमी प्रमाणात पाहायला मिळतं.
सर्व मुली आता आपापल्या घरी जायल्या निघाल्या.
* * *

मुलींशी बोलून झाल्यावर दानिशच्या आजोबाशी बोलत असताना माझा कॉलेजचा मित्र अहमद पटेल मला त्याच्या घरी घेऊन जाण्यासाठी आला होता. त्याचं घर जवळच होतं. आम्ही पायी पायी त्याच्या घरी गेलो. परिसरात कमालीची अस्वच्छता, दुर्गंधी, सांडपाणी असं चित्र होतं. ही माणसं या परिस्थितीत कशी राहत असतील या विचारानं मनाला अस्वस्थता आली.
परत येताना अहमद मला दुसऱ्या गल्लीतून घेऊन आला. ती गल्ली मात्र चकाचक होती.
मी अहमदला विचारलं : ‘‘हे कसं काय? इकडे स्वच्छता आणि तिकडे अस्वच्छता?’’ अहमदनं यावर फक्त स्मितहास्य केलं. त्याच्या त्या माफक हसण्यातून मला सगळी उत्तरं मिळाली होती.दानिशचे वडील प्रा. मझरुद्दीन आणि आई प्रा. अर्जुमंदबानो यास्मीन या दोघांचे मी आशीर्वाद घेतले आणि परतीच्या रस्त्याला लागलो.
* * *

आपल्या समाजाला सन्मानानं वागवलं जावं असं
आंदोलनाला बसलेल्या शेकडो मुस्लिम महिलांना
वाटतं...सानियाला शिवजयंती साजरी करायची आहे...दानिशला शिवाजीमहाराजांचे विचार घरोघरी पोचवायचे आहेत...अहमदला त्याची गल्ली स्वच्छ हवी आहे. या सगळ्या अपेक्षा, मागण्या खूप मोठ्या आणि वेगळ्या अजिबात नाहीत. या अपेक्षा, मागण्या करणारे हे सगळे लोक मुस्लिम समाजाचे आहेत. त्यांच्या या मागण्या प्रत्यक्षात येण्यासंदर्भात खूप अडचणी आहेत. ते वेगळ्या धर्माचे असल्यामुळे ही अपेक्षापूर्ती होत नसावी का, ते वेगळ्या धर्माचे आहेत म्हणून त्यांच्याकडे शंकेच्या नजरेनं पाहिलं जातं असावं का असे काही प्रश्न मला परतीच्या वाटेवर पडले. या प्रश्नांना कुठं ना कुठं, कधी ना कधी न्याय मिळावा अशी माझी अपेक्षा नक्कीच आहे.
आणि तुमची?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com