esakal | माता न तू ... (संदीप काळे)
sakal

बोलून बातमी शोधा

sandip kale

संतोषचं आयुष्य, टप्प्याटप्प्यानं वळणं घेत घेत कुणीकडे गेलं हे त्याच्या सगळ्या हकीकतीवरून कळलं. खरं तर हमाल असलेले संतोषचे आई-वडील "म्हातारपणी आधार देणारी काठी' म्हणूनही त्याच्याकडे बघत असावेत...हे सगळं संतोषलाही जाणवत नसेल असं नाही. मात्र, व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे त्यालाही काहीच करता आलं नसावं.

माता न तू ... (संदीप काळे)

sakal_logo
By
संदीप काळे

संतोषचं आयुष्य, टप्प्याटप्प्यानं वळणं घेत घेत कुणीकडे गेलं हे त्याच्या सगळ्या हकीकतीवरून कळलं. खरं तर हमाल असलेले संतोषचे आई-वडील "म्हातारपणी आधार देणारी काठी' म्हणूनही त्याच्याकडे बघत असावेत...हे सगळं संतोषलाही जाणवत नसेल असं नाही. मात्र, व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे त्यालाही काहीच करता आलं नसावं.

काही दिवसांपूर्वीची गोष्ट. आळंदीच्या एमआयटी कॉलेजचा कार्यक्रम आटोपून मी डॉ. सविता गिरे-पाटील यांच्याकडे वडूजला जाण्यासाठी निघालो होतो. मराठवाड्यातल्या माणसाला इतके छान रस्ते बघायची तशी सवय नसते. माझे मित्र प्रा. डॉ. प्रमोद दस्तूरकर एकदा चर्चा करताना मला म्हणाले होते : ""पश्‍चिम महाराष्ट्रातल्या रस्त्यांशी आपल्या मराठवाड्यातल्या रस्त्यांची तुलना होऊच शकत नाही.'' त्यांच्या चर्चेतल्या त्या सत्याची साक्षात्‌ प्रचीती मी घेत होतो.

साताऱ्याच्या दोन किलोमीटर पुढं गाडी थांबवली आणि पाय मोकळे करण्यासाठी खाली उतरलो. आजूबाजूला सगळीकडे खूप कचरा पडला होता. एक जण रेडिओ उंच दगडावर ठेवून इंग्लिश बातम्या ऐकत होता. क्षणभर मला काही कळेचना! कुठलं तरी एखादं रेडिओ स्टेशन चुकून लागलं असेल आणि या बातम्या सुरू झाल्या असतील असं मला सुरुवातीला वाटलं;
पण नंतर कळलं की या इंग्लिश बातम्या ऐकणारा माणूस कचरा वेचणारा आहे!
मी जसजसा पुढं जात होतो, तसतसा तो आवाज मला स्पष्टपणे ऐकू येत होता. कचरा वेचण्यासाठी ढिगावर चढलेल्या त्या माणसाला मी जोरात हाक मारली. सूर्याची तिरीप पडत होती म्हणून डोळ्यांवर हात धरत तो माणूस माझ्याकडे बघत राहिला. मी उगाचच हाक मारतोय असं वाटून त्यानं माझ्याकडे दुर्लक्ष केलं आणि तो पुन्हा प्लास्टिक वेचण्यात गर्क झाला. मी परत जोरात हाक मारली. आपल्यालाच कुणीतरी हाक मारतंय हे आता त्याच्या लक्षात आलं. जड पावलांनी तो माझ्याकडे येऊ लागला. दगडावर ठेवलेला रेडिओ बरोबर घ्यायला तो विसरला नाही. बातम्या सुरूच होत्या. माझ्याजवळ आल्यावर त्यानं रेडिओचा आवाज थोडासा कमी केला.

मी म्हणालो : ""अहो, बंद करा त्या बातम्या. काय कळतं त्यातलं तुम्हाला?''
तो हसला आणि त्यानं रेडिओ बंद केला.
मी त्याला म्हणालो : ""इतक्‍या उंच जाऊन काय करताय? पडाल ना...''
तो म्हणाला : ""उंच ठिकाणीच आजचा पडलेला ताजा कचरा असतो आणि त्यातूनच मला प्लास्टिक मिळतं, ते मी गोळा करतो.''
त्या माणसानं बोलायला सुरुवात करताच त्याच्या तोंडाचा मला वास आला. तो खूप दारू प्यायलाय हे लक्षात आलं. तो दारू प्यायलेला होता आणि कचरा वेचत होता इथपर्यंत ठीक होतं; पण तो इंग्लिश बातम्या का ऐकत होता हा मात्र मला प्रश्न पडला. पंचेचाळिशी ओलांडलेला तो माणूस बोलायला खूप नम्र होता. त्याच्या डोळ्यांत प्रामाणिकताही होती. बाजूलाच असलेल्या कडूलिंबाच्या झाडाखाली आम्ही थांबलो. त्याच्या खांद्यावर मी हात ठेवल्यावर बदबद धूळ माझ्या हाताला लागली; पण त्याची पर्वा न करता खांद्यावरचा हात मी तसाच राहू दिला. त्याची नम्रता, वागण्यातला सहजपणा मला खूप आवडला.

""तुम्ही कुठून आलात? रस्त्याच्या या आतल्या बाजूला कसे आलात?'' त्यानं विचारलं.
गाडीतून उतरणारा माणूस आपल्यासारख्या कचरा वेचणाऱ्याच्या खांद्यावर हात ठेवतो हेही त्याला साहजिकच अजब वाटलं. रेडिओ ठेवलेल्या बॅगमधून त्यानं पाण्याची बाटली काढली. तोंड धुता धुता तो माझ्याशी बोलत होता. उरलेलं सगळं पाणी त्यानं पिऊन टाकलं.
""अहो, मलाही पाणी प्यायचं होतं,'' मी म्हणालो. त्यावर तो म्हणाला : ""ते पाणी मी घरून आणलं होतं, बिसलरीचं नव्हतं ते.''
गाडीतून उतरणारी माणसं कधीही घरचं पाणी पीत नाहीत ते बिसलरीचंच पाणी पितात, असा त्याचा समज असल्यासारखं वाटलं
गप्पाटप्पा सुरू झाल्या.
मात्र, थोड्या वेळातच तो म्हणाला : ""निघतो मी आता, कामाची वेळ आहे.''
मी म्हणालो : ""काय राव? मी तिथून तुम्हाला भेटायला आलो आणि तुम्ही निघून चाललात... कामाची वेळ आहे म्हणता...''
मी केलेली ही माफक मस्करी त्याला आवडलेली दिसली. मधून मधून तो इंग्लिशमध्येही बोलत होता. मला नवल वाटलं.
मी म्हणालो : ""तुमचं शिक्षण काय झालंय?''
""काहीच नाही.''
""मग तुम्ही इंग्लिश कसं बोलताय?''
""येतं मला.''
तो मला काही तरी म्हणत होता, मी त्याला काहीतरी विचारत होतो...अशी आमची संवादाची गाडी हळूहळू पुढं जात होती.
मात्र, तो मध्येच म्हणायचा :
""जातो आता मी माझ्या कामाला.''
मी परत काहीतरी विचारून त्याला रोखून धरत होतो.
इंग्लिश तो चांगलं बोलत तर होताच; पण त्या भाषेचं त्याचं आकलनही चांगलं होतं हे मला एव्हाना समजलं. मी त्याला आणखी बोलतं करत गेलो...त्यानं सांगितलेली त्याची कहाणी चक्रावून टाकणारी होती.

रेडिओ असलेल्या पिशवीत त्यानं थोड्या वेळानं
परत हात घातला आणि दारूची बाटली काढून तो थोडीशी दारू प्यायला. मघाचा पाण्याचा प्रसंग लक्षात ठेवून त्यानं या वेळी मात्र मला आठवणीनं विचारलं : ""घेणार का साहेब?'' मी अर्थातच "नाही' म्हणालो. बाटलीचं झाकण घट्ट लावत तो म्हणाला : ""साहेब, तुम्ही हलकी दारू पीत नसणार, मला माहीत आहे. जी दारू चढत नाही ती दारू तुम्ही पीत असणार!''
तो दारूविषयीच बोलत राहिला.
आपले अनेक मित्र दिवसभर कसे फक्त दारूसाठीच काम करतात हे त्यानं मला सांगितलं. दारूबाबतचे काही किस्सेही सांगितले. तो याच विषयावर बराच वेळ बडबडत राहू शकतो हे माझ्या लक्षात आलं. विषय बदलायला हवा होता; पण तरीही मी विचारलं : ""तुम्ही दारू प्यायला कधी शिकलात...म्हणजे हे व्यसन तुम्हाला कधीपासून लागलं?''
""लहानपणीच!'' तो अगदी सहजपणे म्हणाला. ""लहानपणीच?'' मी साहजिकच शंकेनं विचारलं.
""हं! त्यात काय? आई-वडील घरात बसून दारू प्यायचे, मग मीही दारू प्यायला लागलो. "हमालीचं काम करताना एक दिवस तुलाही दारू प्यावी लागेलच, त्यामुळे आतापासूनच दारू प्यायला शीक!' असं म्हणत आईनं माझ्या तोंडाला दारूचा ग्लास लावला. तेव्हा मी जेमतेम दहा वर्षांचा असेन.''
त्याच्या बोलण्यावर सुरुवातीला माझा विश्वास बसत नव्हता; पण जसजसा तो पुढं पुढं सांगत गेला तसतसं "याच्या आईनंच याला दारू प्यायला शिकवलं असणार,' असं मलाही पटू लागलं. तरीही मनात आलं, "कुठली आई आपल्याच मुलाला अशी दारू प्यायला शिकवेल?' हे ऐकायलाही कसं तरी वाटतं.
* * *

कचऱ्यातलं प्लास्टिक वेचणाऱ्या या माणसाचं नाव संतोष. तो साताऱ्याचा. संतोषला तीन मुली आणि एक मुलगा. बायको कर्करोगानं मरण पावलेली. एका मुलीचं लग्न झालं. दोन मुली आणि मुलगा संतोषबरोबरच कचरा वेचण्याचं काम करतात. या सगळ्यांच्या जिवावर घरातली चूल पेटते. ना कुणाच्या शिक्षणाचा पत्ता, ना कुणाचा वेगळं काही करण्याचा विचार.
संतोष सांगू लागला : ""माझे आई-वडील पूर्वीपासूनच हमालीचं काम करायचे. दिवसभर ओझं वाहून वाहून ते दमून-शिणून जात असत. दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी दोघंही रात्री दारू प्यायचे. जेवढं कमवायचे त्याच्या किमान वीस टक्के पैसा दारूत घालवायचे. माझे आई-वडीलच नव्हे, तर आम्ही ज्या भागात राहायचो तिथली सगळीच जोडपी - जी हमालीचं काम करायची - आपापल्या घरी दारू प्यायची. नवरा-बायको एकत्र बसूनच हे दारू पिणं चालायचं. तसं या प्रकाराचं वाईट वाटायचं काही कारणच नव्हतं. लहान असताना मीही दारूच्या दुकानातून दारू घेऊन यायचो. दारू प्यायल्यानं जसा कामाचा थकवा दूर होतो, तशीच आयुष्यातली सगळी दु:खंही दूर होतात, हे माझ्या आईनंच माझ्या मनावर बिंबवलं आहे.
हे सगळं खोटं आहे याची जाणीव मला माझ्या पहिल्या मुलीच्या जन्मानंतर झाली...पण तोपर्यंत मी व्यसनात पार बुडून गेलो होतो.''
मी म्हणालो : ""तुम्ही मध्ये मध्ये इंग्लिश बोलता, इंग्लिश बातम्याही मघाशी ऐकत होतात...कुठून शिकलात तुम्ही इंग्लिश बोलायला?''
तो म्हणाला : ""माझे आई-वडील खूप कष्टाळू होते. दोघांनीही कष्टातून थोडासा पैसा जमवला आणि शहरातल्या चांगल्या वस्तीत आम्ही राहायला गेलो. आपल्या मुलांना शाळेत घालावं इतका पैसा त्यांच्याजवळ नव्हता; पण चांगल्या वस्तीत राहून काही तरी करता येईल, म्हणून त्यांनी तिथं घर घेतलं. माझे दोन भाऊ तरुणपणीच एका अपघातात वारले. "हमालाची मुलं' अशीच आमची त्या परिसरात ओळख होती.
आमच्या बाजूलाच एक बाई राहायला होत्या. त्यांचं आडनाव कुलकर्णी.
या कुलकर्णीकाकू रोज इंग्लिशचा क्‍लास घ्यायच्या. त्यांची मुलं शिकतात, लिहितात...एकटी शाळेत जातात याचं मला आश्‍चर्य वाटायचं. एकदा काकूंच्या मुलाशी माझं खूप भांडण झालं, मारामारी झाली. काकूंनी मला घरी बोलावून घेतलं आणि "अशी भांडणं करत जाऊ नकोस,' असं अगदी शांतपणे सांगितलं. त्यांच्या जागी जर माझी आई असती तर आपल्या मुलाशी भांडणाऱ्याला, त्याला मारणाऱ्याला तिनं पहिल्यांदा बडवून काढलं असतं, मग कदाचित समजावून सांगितलं असतं. काकूंच्या घरी गेलो तेव्हा त्यांचा मुलगा वाटी-चमचा घेऊन काहीतरी खात होता. मी त्याच्याकडे टक लावून बघत होतो. काकूंनी मलाही खायला दिलं. तो साजूक तुपातला शिरा होता. पुढं काकूंच्या मुलाची आणि माझी चांगली मैत्री झाली. तो शाळेतून कधी येईल आणि आम्ही कधी एकदा खेळू असं मला व्हायचं. रोज संध्याकाळी तो क्‍लासमध्ये बसायचा आणि मी बाहेर त्याची वाट बघत थांबायचो. मग एके दिवशी काकूंनी मलाही क्‍लासमध्ये बसायला सांगितलं. सलग दोन वर्षं मी त्या क्‍लासमध्ये होतो, तेव्हापासून मला इंग्लिशची गोडी लागली. मध्यंतरीच्या काळात माझे वडील लिव्हरच्या आजारानं वारले आणि आम्ही पुन्हा आधीच्याच ठिकाणी, हमालांच्या वस्तीत, राहायला गेलो. काही दिवसांनंतर आईही वारली. त्याच वस्तीत असलेल्या माझ्या एका हमाल मामानं माझं लग्न सतत आजारी असलेल्या त्याच्या मुलीशी लावून दिलं.

सहा वर्षांत तीन बाळंतपणं आणि आधीचं सततचं आजारपण यामुळे माझी बायकोही वारली. दोन मुली, मुलगा आणि मी असे चौघं आता आहोत. माझा मुलगाही आता मित्रांसोबत राहून दारू प्यायला शिकलाय. "दारू पिऊ नकोस,' असं मी जेव्हा त्याला सांगतो तेव्हा "तुम्ही सोडत असाल तर मीही सोडतो!'असं उत्तर तो मला देतो.''
मी मध्येच विचारलं :
""मग आता तुम्ही दिवसभर कचरा वेचता, त्यातून किती पैसे मिळतात आणि घर कसं चालतं?''
संतोष म्हणाला : ""सगळे मिळून पाच-सहाशे रुपये कमावतो. बाहेर कुठं ओझं वाहायचं काम असलं तर तेही करतो. पावसाळ्यात नदी-नाल्यावरचे खेकडे आणि मासोळ्या विकून चार पैसे कमावतो. सुरू आहे आपला गाडा.''
संतोष बोलताना कमालीचा आनंदी होता. त्याच्या डोक्‍यात दारूची नशा जरूर होती; पण त्याचे डोळे अगदी प्रामाणिक होते. मी पाचशे रुपयांची नोट काढून त्याच्या हातात ठेवली.
तो लगेच म्हणाला : ""नको साहेब. तुमची भीक मला नको.''
मी म्हणालो : ""भीक कसली हो? मित्र म्हणून देतोय.''
मी त्याला खूप आग्रह केला; मात्र शेवटपर्यंत त्यानं पैसे घेतलेच नाहीत.
""निघतो, साहेब,'' म्हणून त्यानं बातम्या ऐकण्यासाठा पुन्हा रेडिओ सुरू केला.
आम्ही दोघंही आपापल्या मार्गानं निघालो.
* * *

संतोषचं आयुष्य, टप्प्याटप्प्यानं वळणं घेत घेत कुणीकडे गेलं हे त्याच्या सगळ्या हकीकतीवरून कळलं. खरं तर हमाल असलेले संतोषचे आई-वडील "म्हातारपणी आधार देणारी काठी' म्हणूनही त्याच्याकडे बघत असावेत...हे सगळं संतोषलाही जाणवत नसेल असं नाही. मात्र, व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे त्यालाही काहीच करता आलं नसावं. "तू पुढं हमाल होशील आणि थकवा घालवण्यासाठी तुलाही दारू प्यावी लागेल,' असं म्हणून संतोषच्या आईनं त्याला लहानपणीच दारू प्यायला शिकवलं. तिच्या बुद्धीला जे काही सुचलं त्यानुसार तिनं संतोषला तरुणपणी येऊ शकणाऱ्या "संभाव्य थकव्या'वरचा "वास्तव उपाय' करायला त्याला लहान वयातच भाग पाडलं. मात्र, त्यामुळेच तर संतोषच्या आयुष्याचा सत्यानाश झाला होता. आता त्याचा मुलगाही दारू प्यायला शिकला आहे. संतोषसारखे अनेक जण आज व्यसनाच्या आहारी जाऊन आपलं आयुष्य संपवतात. अंतिम परिणाम माहीत असूनही आपणच स्वत:ला संपवत आहोत, यापेक्षा अजून वाईट काय असू शकतं? हे घडतं फक्त एका व्यसनामुळे; पण यात काही भाग लहानपणी घरून केल्या गेलेल्या संस्कारांचाही नाही काय?

loading image