आयुष्याचा जमा-खर्च... (संदीप काळे)

sandip kale
sandip kale

ऊस तोडणारा, व्यवसाय करणारा, साखरकारखान्यात काम करणारा हे सगळेजण एका निर्ढावलेल्या व्यवस्थेचे बळी आहेत. त्यांच्या आयुष्याचं एकूण गणित जर केलं तर ‘बाकी शून्य’च येते. तरीही ही सगळी माणसं या कारखानदारीच्या आसऱ्याला का आयुष्य काढतात हे मात्र न उमगणारं कोडं आहे.

मराठवाड्यातलं ते रखरखतं ऊन्ह डोक्यावर घेऊन बीड आणि उस्मानाबाद यांच्या दरम्यान माझा प्रवास सुरू होता. गाडीचा एसी कितीही वाढवला तरी तापत्या सूर्यापुढं त्याचा असा कितीसा टिकाव लागणार? ऊस वाहून नेणाऱ्या बैलगाड्यांची लांबच लांब रांग आणि इतर वाहनांची रस्त्यावर वर्दळ सुरू होती. कारखान्याच्या मळीचा उग्र वास आसमंतात दाटला होता. ड्रायव्हरनं गाडी अचानक थांबवली. चाक पंक्चर झालं होतं.
गाडीतून उतरलो. तिथंच एका बाजूला ऊसतोड कामगारांची वस्ती होती आणि थोडंसं पलीकडच्या बाजूला कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांची वस्ती होती.
पंक्चर निघेपर्यंत एखाद्या झाडाखाली थांबावं असा विचार करून दाट सावलीचं झाड शोधू लागलो. एवढा मोठा कारखाना आजूबाजूला; पण झाड काही कुठं दिसेना. एका छोट्याशा हॉटेलात चार-पाच माणसं गप्पा मारत बसली होती. लिंबूसरबत हे तिथलं सर्वात थंड पेय. पुढच्या प्रवासाचा मार्ग कसा आहे आणि किती वेळ लागेल याची माहिती कुणाकडून तरी घ्यायची होती. तिथं असलेल्या एका आजोबांना मी विचारलं.
‘‘मला माहीत नाही,’’ असं उत्तर त्यांनी दिलं.
मग मी हॉटेलात पत्ते खेळत बसलेल्या चारजणांपैकी एकाला विचारलं, त्यांनी
व्यवस्थित उत्तर दिलं.
कुठूनं आलात, काय करता अशी माझी चौकशी केली.
‘‘गाडी पंक्चर झालेली दिसते,’’ पुढच्यानं विचारलं.
‘‘हो,’’ मी म्हणालो.
उकाडा खूपच होता. एका हातानं घाम पुसत दुसऱ्या हातानं मी वारं घेण्याचा प्रयत्न करत होतो.
ते चौघंही साखर कारखान्याशी संबंधित होते. एक बाजीराव पाटील...शेजारच्याच गावचे,
दुसरे सदाशिवराव मुंडे...ऊसतोड कामगार, तिसरे लक्ष्मण तिरोके...साखरकारखान्यातले कामगार आणि चौथे संजय जाधव...हे या हॉटेलचे मालक.

शिक्षणाचा पत्ता नाही; पण व्यवहारज्ञान प्रचंड, अशी ही सगळी माणसं मला वाटली. तुम्ही कुण्या गावचे, मूळ गाव कोणतं, इकड कुठं असे सगळे प्रश्न त्यांनी मला विचारले.
साखरकारखाना आणि त्याभोवतीचं राजकारण याची अनेकांना कल्पना असते; परंतु कारखान्यात आणि परिसरात काम करणारी माणसं, त्यांची सुख-दुःखं, त्यांच्या समस्या याविषयी कदाचित फारच कमी लोकांना माहिती असते. साखरकारखान्यांसंदर्भात सांगायचं झालं तर ‘जिंदगी काट रहे है’ आणि ‘जिंदगी जी रहे है,’ असे दोन वर्ग असतात. ‘जिंदगी जी रहे है,’ हा वर्ग साखरकारखाना चालवणारा असतो आणि ‘जिंदगी काट रहे है’ हा वर्ग साखरकारखान्याशी संबंधित असलेला बाकीचा सगळा वर्ग असतो. कामगार, शेतकरी, मजूर, कर्मचारी हे
‘जिंदगी काट रहे है’मध्ये येतात हे मला या सगळ्यांशी चर्चा केल्यावर हळूहळू समजलं.
कुणाच्याच आयुष्यात ‘बाकी शिल्लक’ काहीच नाहीये. आर्थिकदृष्ट्या.
‘आजचा दिवस आनंदानं घालवायचा, उद्याचं उद्या पाहू,’ अशा परिस्थितीत ही सगळी माणसं जगत आहेत. पाटील यांचा चार एकर ऊस आहे. गेल्या बारा वर्षांपासून त्यांनी आपल्या शेतात ऊस घेतलाय. कधी तरी ऊस वेळेवर जातो, कधी तरी भाव मिळतो, कधी तरी उसाच्या पैशाचे हप्ते वेळेवर मिळतात, कधी तरी ऊसलागवड करताना साखरकारखान्याकडून मदत मिळते. पाटील यांच्या बोलण्यात ‘कधी तरी’ हा शब्द वारंवार येत होता.
मी त्यांना विचारलं : ‘‘तुमचा मुलगा काय करतो?’’

पाटील म्हणाले : ‘‘काही नाही. शिक्षणासाठीचं वातावरण आमच्या अवतीभोवती नाही. माझे आजोबा, माझे वडील, स्वत: मी आणि माझा पोरगा असं कुणीही शिकलेलं नाही.’’
सरबताचा ग्लास घेऊन आलेला संजय जाधव हा याच भागातला एक तरुण. कारखान्याच्या हंगामाच्या काळात तो या हॉटेलचा छोटा व्यवसाय करतो. कधी दिवसाकाठी दोनशे रुपये मिळतात, तर कधी मिळतही नाहीत.
संजय म्हणाला : ‘‘गावात पत्ते खेळायला कंपनी मिळत नाही म्हणून मी या फाट्यावर हे छोटंसं हॉटेल उघडलं! माझे आई-वडील कारखान्यात राख भरायचं काम करतात आणि मी हे हॉटेल चालवतो.’’
‘‘तुमचं शिक्षण काय झालंय?’’ मी विचारलं.
तो म्हणाला : ‘‘दहावी नापास.’’
गप्पांमध्ये सहभागी होत मुंडे म्हणाले : ‘‘साहेब, आमच्या परिसरातले कुणीही तुम्हाला शिकलेले दिसणार नाहीत. एक तर शिकायची मानसिकता नसते, दुसरं म्हणजे, पैसा नसतो आणि तिसरं म्हणजे, शिक्षणासारखं अवघड माध्यम डोक्यात शिरत नाही!’’
मी त्यांना विचारलं : ‘‘तुमची किती माणसं इथं काम करतात, ती काय काम करतात, किती पैसे मिळवतात?’’
मुंडे म्हणाले : ‘‘दरवर्षी हंगामात मी, माझी बायको, दोन मुलं आणि मुलगी ऊसतोडीसाठी फडावर जातो. मुकादमाकडून अगोदर उचल घेतलेली असते. त्याचं व्याज आणि मुद्दल भरता भरता आख्खा हंगाम कसा निघून जातो ते कळत नाही. ऊसतोडीचा हंगाम संपल्यावर लोकांच्या शेतात काम करतो. हे असं माझ्या आजोबांपासून सुरू आहे.’’
पाटील यांनी पत्ते पिसले.
‘‘तुम्हाला टाकू का?’’ असं त्यांनी मलाही विचारलं.
मी म्हटलं : ‘‘मला जमत नाही हो खेळायला.’’
कुणालाच ते खरं वाटेना.
* * *

उन्हामुळं माझ्या अंगाची लाही लाही होत होती. मला उन्हाचा होत असलेला त्रास तिरोके यांच्या लक्षात आला.
ते म्हणाले : ‘‘खूप ऊन्ह आहे हो. तुम्ही एसी लावून गाडीतच बसा.’’
मी हसलो आणि ‘‘थांबतो थोडा वेळ. आता होईलच पंक्चर काढून,’’ असं म्हणालो.
यावर आग्रह करत तिरोके म्हणाले : ‘‘चला, आपण पुढं बसू या.’’
ते जिथं राहतात तिथं ते मला घेऊन गेले.
कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ती कॉलनी होती. शे-दोनशे लोकांची कॉलनी, कॉलनीच्या शेजारूनच सांडपाणी वाहून नेणारं उघडं गटार. त्या सांडपाण्याची कमलीची दुर्गंधी येत होती. कुणाचं घर मोठं, कुणाचं घर छोटं, कुणाचं पत्र्याचं, तर कुणाचं चटईचं. कारखान्यातल्या कर्मचाऱ्यांच्या ग्रेडनुसार ती घरं होती.
मी तिरोके यांना म्हणालो : ‘‘अहो, या तट्ट्याच्या एका घराला आग लागली तर आख्खी कॉलनी जळून खाक होईल.’’
तिरोके ‘नाही-हो' करत म्हणाले : ‘‘जरा आवघड आहेच ना?’’
मात्र, त्या विषयावर फारसं काही बोलण्याच्या मनःस्थितीत ते नव्हते असं दिसलं.
तिरोके यांच्या घरी आम्ही पोचलो. त्यांचं घर म्हणजे दोन-तीन माणसं बसू शकतील एवढंच. त्यांच्या पत्नी टेबल-फॅन लावून दारातच झोपल्या होत्या. त्यांनी आम्हाला प्यायला पाणी दिलं.
‘‘सावकाश प्या,’’ म्हणाल्या.
तिरोके यांचा मुलगाही घरात होता. त्याचं नाव सचिन. तो बारावी नापास आहे. साखरकारखान्यात हेल्पर म्हणून काम करतो. तिरोके हे बॉयलर अटेंडंट आहेत. त्यांचे वडीलही कारखान्यातच कामाला होते. म्हणजे, तिरोके यांच्या तीन पिढ्यांना साखरकारखान्यातल्या कामाचा अनुभव.
आमच्या गप्पा सुरू असतानाच ड्रायव्हरचा फोन आला. पंक्चर काढून झालं होतं. दरम्यान, तिरोके यांच्या पत्नीनं केलेले पोहे खाल्ले. पगार, बोनस, सुख-दुःख यावर बऱ्याच गप्पा झाल्या.
साखरकारखान्याच्या कामगारांची अवस्था किती वाईट आहे हे त्या गप्पांमधून लक्षात येत होतं. या साखरकारखान्याहून तो
साखरकारखाना असं करावं लागत असल्यानं या कामगारांच्या आयुष्यात कायमचीच अस्थिरता, अस्वस्थता असते. साखरकारखान्यात माणूस कामावर गेल्यावर तो घरी येईपर्यंत त्याचा भरवसा नसतो, इतक्या जोखमी या कारखान्यात काम करणाऱ्यांच्या आयुष्यात असतात.
साखरकामगारांच्या मुलांचं आयुष्य कसं बरबाद होतंय, हे तिरोके यांच्या बोलण्यातून वारंवार जाणवत होतं. चार-पाच हजार रुपयांसाठी लोक या कारखान्याहून त्या कारखान्यावर कामासाठी जातात. सरकारची इच्छा, निसर्गाची इच्छा, मालकांची इच्छा, बाजारपेठेची इच्छा...आणि या सगळ्या इच्छा पूर्णपणे अमलात आल्या तर मग कुठं जेमतेम असलेला पगार वेळेत होणार!
तिरोके सांगत होते व मी ऐकत होतो.
या कामगारांचं सेवानिवृत्तीनंतरचं आयुष्यही समस्यांनी भरलेलं असतं.
अनेक आजारांनी, व्याधींनी ही माणसं ग्रासलेली असतात. सणवार नाही, कुटुंब नाही, पाहुणे नाहीत आणि बँकबॅलन्स नावाचा प्रकारही आयुष्यात शिल्लक नाही. कारखान्यातील काही मोठ्या पदांवरची, महत्त्वाची माणसं वगळता इतर कुणाच्याच - ज्यांच्या जिवावर कारखान्याचा डोलारा सुरू असतो - आयुष्यात कसलीच सुरक्षितता नसते.
सचिन म्हणाला : ‘‘माझ्याबरोबर काम करणारा एक मुलगा कारखान्यात अपघात होऊन काही दिवसांपूर्वी मृत्युमुखी पडला. रसाच्या धारांचा रंग अचानक लालसर दिसू लागला. शोध घेतला असता कळलं की तो आतमध्ये पडलाय. त्याच्या रक्तामुळे रसाच्या धारा लाल दिसत होत्या. त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले होते. त्याचा मृतदेह गोळा करून घरी आणावा लागला.
वर्षातून असे एक-दोन अपघात होतातच.’’
हे ऐकतानाही अंगावर काटा येत होता.
सचिनची आई त्याला मध्येच म्हणाली : ‘‘कशाला वारंवार तो विषय काढतोस? राहू दे ना आता.’’

तिला तो विषय वारंवार काढायचा नव्हता आणि सचिन कारखान्यातलं दबावाचं, संघटनांचं, पगारवाढीचं राजकारण याविषयी सगळं काही सांगत होता. ज्यांच्या जमिनी गेल्यात आणि जे राजकीय लोकांच्या संगतीत आहेत अशांच्या वेगळ्याच अडचणी आणि जे बाहेरून आले आहेत, जे वेगळ्या राज्यांतून आले आहेत, ज्यांच्याकडे कौशल्य आहे; परंतु कुणाचं पाठबळ नाही अशांच्या वेगळ्या अडचणी.
ते सगळं ऐकल्यावर ‘हा साखरकारखाना आहे की अडचणींचा कारखाना?’ असाच प्रश्न पडला.
मी निघालो. तिरोके बाप-लेक मला गाडीपर्यंत सोडायला आले. साखरकारखानदारीमध्ये काम करताना किती धाकात राहावं लागतं, अंतर्गत राजकारणाला, दबावाला कसं तोंड द्यावं लागतं हे मला या दोन तासांत कळलं होतं.
गाडी सुरू झाली. मी माझ्या मार्गानं निघालो. कारखान्यातून निघणाऱ्या धुराची बरीच काळी भुकटी गाडीच्या काचांवर पडली होती. ती भुकटी साफ करायला ड्रायव्हर विसरला होता. त्यानं गाडी परत थांबवली आणि काचा पुसून स्वच्छ केल्या. गाडीच्या काचा स्वच्छ करता येऊ शकल्या; पण साखर कारखान्याशी संबंधित असलेल्या माणसांच्या आयुष्यातल्या दुःखांचा, समस्यांचा काळा रंग असा पुसून निघणारा नव्हता. ऊस तोडणारा, व्यवसाय करणारा, कारखान्यात काम करणारा हे सगळेजण या साखरकारखानदारीच्या निर्ढावलेल्या व्यवस्थेचे बळी आहेत. त्यांच्या आयुष्याचं एकूण गणित जर केलं तर बाकी शून्यच येते. तरीही ही सगळी माणसं या साखरकारखानदारीच्या आसऱ्याला का आयुष्य काढतात हे मात्र न उमगणारं कोडं आहे. यात कोण दोषी आहेत आणि याला कोण जबाबदार आहे याच्या अधिक खोलात मी शिरत नाही; पण साखरकारखानदारीशी संबंधित असलेला कामगार आपलं आयुष्य मुठीत घेऊन जगत असतो एवढं मात्र नक्की.

शेवटी उतारवय, म्हातारवय सुरू झाल्यावर कळतं की आपण अवघ्या आयुष्यात काहीही कमावलं नाही...म्हणजे, आयुष्याचा पूर्ण जमाखर्च ‘बाकी शून्य’असाच!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com