कुटुंब रमलंय पुस्तकांत...! (संदीप काळे)

संदीप काळे
Sunday, 28 June 2020

पुण्यातली ‘सखी पुस्तक भिशी’ आणि सोलापूरमधला ‘अभिरुची बुक क्‍लब’ यांसारखे उपक्रम हे आजच्या काळाची गरज बनले आहेत. पुणे आणि सोलापुरातल्या उपक्रमांसारख्या माध्यमांतून महिला एकत्रित येत असतील तर किती छान...! अशा महिला आपल्या कुटुंबासह इतर असंख्य कुटुंबांना समृद्ध करत असतील तर हा नक्कीच एक वेगळा प्रयोग आहे.

पुण्यातली ‘सखी पुस्तक भिशी’ आणि सोलापूरमधला ‘अभिरुची बुक क्‍लब’ यांसारखे उपक्रम हे आजच्या काळाची गरज बनले आहेत. पुणे आणि सोलापुरातल्या उपक्रमांसारख्या माध्यमांतून महिला एकत्रित येत असतील तर किती छान...! अशा महिला आपल्या कुटुंबासह इतर असंख्य कुटुंबांना समृद्ध करत असतील तर हा नक्कीच एक वेगळा प्रयोग आहे.

 

घटना पहिली :
आमचं ऑफिस म्हणजे एक कुटुंब आहे. ऑफिस सुरू झाल्यावर आणि ऑफिस संपल्यावरही माणसामाणसातलं कौटुंबिक नातं कायम राहतं. त्या दिवशी मी पुण्यात होतो. ‘घरी पिठलं-भाकरी खायला चला,’ असा आग्रह माझे सहकारी उमेश पिंगळे गेल्या अनेक दिवसांपासून करत होते. त्या दिवशी तो योग होता. त्यांच्या गाडीत बसून आम्ही पिंपळे सौदागर इथल्या त्यांच्या घरी पोचलो. पिंगळे यांच्या पत्नी शलाका यांनी दार उघडलं. आत पाहतो तर, घर महिलांनी भरून गेलेलं दिसलं. कोणत्या तरी विषयावर चर्चा सुरू होती. आम्ही फ्रेश होऊन आतल्या खोलीत गेलो. बाहेर महिलांची चर्चा सुरूच होती.
शलाकावहिनी पाणी घेऊन आल्या. पिंगळे यांना म्हणाल्या : ‘‘आम्हाला थोडासा वेळ लागेल. तुम्हाला चालेल ना?’’
पिंगळे म्हणाले : ‘‘हो.’’
माझी ओळख करून दिली जाण्यापूर्वीच त्या म्हणाल्या : ‘‘मागच्या ‘भ्रमंती’चा विषय खूप छान होता. माझ्या मैत्रिणी तुमच्या लेखांविषयी माझ्याशी बोलत असतात. आम्ही त्यावर चर्चाही करतो.’’
एवढं सांगून त्या मैत्रिणींच्या तिथं जाऊन बसल्या. दया पवार यांच्या ‘बलुतं’ या आत्मकथनावर चर्चा सुरू होती. पुस्तक वाचून आपल्याला काय वाटलं याविषयी बारीकसारीक चर्चा चालली होती.
‘या महिला कोण आहेत, त्या का आल्या आहेत, नेहमीच येतात का,’ असे प्राथमिक प्रश्‍न मी पिंगळे यांना विचारले. त्यांनी उत्तरं दिली.
महिलांचं चर्चासत्र संपलं. मग मीही त्या महिलांशी बोललो. नंतर सगळ्या जणींनी निरोप घेतला व घरी गेल्या.
जेवण सुरू असताना वहिनी शलाका पिंगळे (९०१११४९०५३) यांना मी या उपक्रमाविषयी विचारलं. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार वर्षांपूर्वी या सगळ्या गृहिणी एकत्रित आल्या. त्यांनी पुस्तकाची भिशी सुरू केली. ‘सखी वाचन भिशी’ असं नाव तिला दिलं. दोन, चार, सहा असं करत करत अनेक महिला या भिशीच्या सदस्या झाल्या. पैसे गोळा करायचे, त्यांची पुस्तकं विकत घ्यायची, त्या महिन्याभरात तेवढी पुस्तकं वाचून काढायची, वाचलेल्या पुस्तकांवर चर्चासत्र घ्यायचं...वाचनानं मिळालेली समृद्धी एकमेकींना वाटायची! एवढ्यावरच न थांबता या महिलांनी आणखी एक उपक्रम राबवला. दर महिन्याला पुस्तकाएवढीच रक्कम बाजूला काढायची...वर्षाच्या अखेरीस ती रक्कम एकत्रित करायची आणि तीमधून एका गरजूला भरघोस मदत करायची. शाळा, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, वैयक्तिक गरजू अशा अनेक जणांना महिलांचा हा ग्रुप मदत करतो.
वहिनी म्हणाल्या : ‘‘पुस्तक वाचून व्यक्तिगत समृद्धी मिळते याचा तर आनंद आहेच आहे; पण कुणाला काही तरी देऊन येणाऱ्या समृद्धीचा आनंद काही वेगळाच असतो. मी आणि माझी मैत्रीण मृदुला कर्वे अशा आम्ही दोघींनी मिळून या उपक्रमाची सुरुवात केली. खरं तर आमच्यात लहान, मोठं, पदाधिकारी असं कुणीही नाही. आम्ही सगळ्या जणी एका कुटुंबाप्रमाणे या उपक्रमाचे झाड वाढवत आहोत. शिवाय, एकमेकींच्या सुख-दुःखांतही आम्ही सहभागी असतोच. या उपक्रमाच्या निमित्तानं एकमेकींच्या अंतःकरणात डोकावून पाहण्याचाही आमचा प्रयत्न असतो. किती पुस्तकं आली, ती कुणाकडे गेली, तिथून ती कुणाला भेट दिली इथपासून ते कुठल्या पुस्तकावर काय चर्चा झाली, कुणी काय मतं मांडली, याचं सगळं रेकॉर्ड आमच्याकडे आहे. आमची भिशी पाहून पुण्यात अनेक महिला ग्रुप्सनीही पुस्तकांचे उपक्रम सुरू केले आहेत. ते ग्रुप वाढावेत यासाठी मी आणि माझ्या मैत्रिणीनं अनेक महिलांना प्रोत्साहित केलं आहे. आत्मिक समाधान आणि सुख म्हणजे काय तर, ‘हे तू करतेस ना ते खूप छान आहे,’ असं आपल्या आतल्या आवाजानं आपल्याला सांगितलं पाहिजे...आणि अशी ही दृष्टी वाचल्याशिवाय येत नाही.’’
पिंगळे यांच्या घरातल्या मुलांच्या हातात मोबाईल नव्हता, ती गेम खेळत नव्हती की कॉम्प्युटरलाही चिकटलेली नव्हती. ती पुस्तकं वाचण्यात रमली होती. घरातल्या घरात जोपासल्या जाणाऱ्या या वाचनसंस्कृतीनं आता व्यापक रूप धारण केलं आहे.
मी पिंगळे यांच्या घरून बाहेर पडलो. सतत टीव्ही पाहणारी अनेक घरांमधली आणि मोबाईलमध्ये गुंगून गेलेली मुलं माझ्या डोळ्यांपुढं एकीकडे येत होती, तर ‘पुस्तक एके पुस्तक’ हा ध्यास घेऊन वाचनात रमून गेलेलं पिंगळे यांचं कुटुंब मला दुसरीकडे दिसत होतं. ‘सखी पुस्तक भिशी’च्या माध्यमातून असंख्य महिलांच्या घरांपर्यंत पुस्तकवाचनाची ही चळवळ पोहोचली आहे. पुस्तकांत रमलेल्या ‘सखी पुस्तक भिशी’च्या सर्व महिलांना मानाचा मुजरा.

 

घटना दुसरी...
सोलापूरला माझं अनेक वेळा जाणं होतं. नातेवाइकांना भेटून झाल्यावर दुपारनंतर काय करावं असा प्रश्‍न मनात असतो. त्या दिवशी सोलापूरमध्ये होतो. वर्तमानपत्र वाचून झालं होतं. ते पुन्हा एकदा चाळताना, आज शहरात काही कार्यक्रम, उपक्रम आहे का यावर नजर टाकली. आमच्या ‘सकाळ’मधल्या बातमीवर नजर खिळली. सोलापुरातल्या काही महिलांनी एक बुक क्‍लब स्थापन केला होता आणि त्या बुक क्‍लबचा आज वर्धापनदिन होता. त्यानिमित्त परिसंवाद होणार होता. वाचनालयाचा, बुक क्‍लबचा वर्धापनदिन आहे असं आजपर्यंत कधी ऐकलं-वाचलं नव्हतं. संध्याकाळी या कार्यक्रमाला जायचं असं मी ठरवलं. अवनी, अथर्व, अर्णव यांना बरोबर घेऊन मी कार्यक्रमाला गेलो. सोलापूरमधल्या जुन्या आरटीओ कार्यालयाच्या जवळ एक छानसं घर आहे. त्या घरातच हा कार्यक्रम होणार होता. मोजकीच; पण पुस्तकावर भरभरून प्रेम करणारी माणसं या कार्यक्रमाला आली होती. मंजूषा गाडगीळ (९८२३२६४९०१), डॉ. वैशाली देगावकर या दोघींच्या संकल्पनेतून अनेक महिला एकत्रित आल्या होत्या आणि त्यांनी पुस्तकांची ही चळवळ सोलापुरात सुरू केली होती. प्रामुख्यानं डॉक्‍टर, प्राध्यापक, शिक्षिका या चळवळीत सहभागी होत्या. वर्षभरात राबवण्यात आलेले उपक्रम आणि या ‘लायब्ररी कल्ब’च्या माध्यमातून सोलापुरात चालवली जात असलेली सांस्कृतिक चळवळ याविषयी कार्यक्रमात सांगितलं जात होतं.
कार्यक्रमानंतर मंजूषा गाडगीळ यांना भेटलो.
‘‘तुमचं सदर मी आवर्जून वाचत असते,’’ असं सांगून त्या पुस्तकचळवळीविषयी म्हणाल्या : ‘‘आमच्या उपक्रमाचं नाव ‘अभिरुची बुक क्‍लब’ असं आहे. इथं महिला दर महिन्याला पैसे भरतात, आवडीची पुस्तकं मागवतात आणि ती वाचून झाल्यावर, सगळ्यांकडून वाचून आल्यावर आपल्याला आवडणारी पुस्तकं आपल्या घरी घेऊन जातात. या उपक्रमात प्रमुख असलेल्या एकूण १८ महिला आहेत. सोलापूरच्या विविध भागांत वाचन वाढलं पाहिजे, कौटुंबिक संस्कृती वाचनातून समृद्ध झाली पाहिजे, यासाठी या १८ जणींनी मोठं काम उभं केलं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांत या महिला काम करत असल्यामुळे या उपक्रमाची माहिती आणि त्याचं महत्त्व अधिकाधिक महिलांपर्यंत नेणं त्यांना सोपं झालं. या महिलांमुळे अनेक घरांमध्ये वाचक तयार झाले. या महिलांमधल्या काही महिला बदली होऊन दुसऱ्या गावी जातात आणि तिथंही त्या याच प्रकारचे फिरते वाचन क्लब सुरू करतात. डॉ. वैशाली देगावकर या कोल्हापूरला स्थलांतरित झाल्या आणि त्यांनी तिथं असा क्‍लब सुरू केला. या उपक्रमात एकत्रित आलेल्या महिलांचा एक मोठा ग्रुप कार्यान्वित झाला आहे. पुस्तक वाचून दर चार दिवसांनी परिसंवाद, चर्चासत्र घडवून आणणं एवढंच या महिलांनी केलं आहे असं नाही, तर सामाजिक मदत पुरवणं, सहलींद्वारे वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देऊन सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजन करणं असेही उपक्रम राबवले जातात. हे सगळं पुस्तकांच्या मैत्रीतून शक्‍य झालं आहे.’’

‘पुस्तकांवरचं प्रेम’ या एकसमान धाग्यानं या सगळ्या जणींना जोडलेलं आहे हे प्रत्येकीशी झालेल्या संवादातून जाणवत होतं. समृद्ध करणाऱ्या एका वेगळ्या चळवळीची मला सोलापुरात ओळख झाली. मंजूषा आणि त्यांच्या मैत्रिणींचा निरोप घेऊन मी निघालो.
पुण्यातली ‘सखी पुस्तक भिशी’ आणि सोलापूरमधला ‘अभिरुची बुक क्‍लब’ यांसारखे उपक्रम हे आजच्या काळाची गरज बनले आहेत. पुणे आणि सोलापुरातल्या उपक्रमांसारख्या माध्यमांतून महिला एकत्रित येत असतील तर किती छान...! अशा महिला आपल्या कुटुंबासह इतर असंख्य कुटुंबांना समृद्ध करत असतील तर हा नक्कीच एक वेगळा प्रयोग आहे.
पुस्तकांच्या वाचनावर श्रीमंती मोजली जायला हवी. अशा ‘श्रीमंती’ची ओढ तुमच्या घरातल्या छोट्या सदस्यांना लागली तर ती श्रीमंती आणखी किती तरी वाढेल. याबाबत तुम्ही-आम्ही विचार करायला हवा. अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही-आम्ही पुणे-सोलापूर इथल्या चळवळींचा घटक बनू शकतो. आपलं कुटुंब, आपला समाज आणि आपल्या देशाच्या समृद्धीला हातभार लावू शकतो. कधी करणार मग सुरुवात...?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang sandip kale write bhramnti live article