sandip kale
sandip kale

भंगलेल्या स्वप्नांशी नातं! (संदीप काळे)

मी निघालो आणि अगदी हसतमुखानं रिताताईनं निरोपाचा हात वर केला. तो उंच हात मला ऊर्जा देणारा, माझाच आत्मविश्‍वास बळकट करणारा वाटला मला! त्या हास्यामागं एक अशी धाडसी महिला मी पाहत होतो जिच्यात खूप मोठं दुःख पचवण्याची ताकद आहे...कितीही संकटं आली तरीही ती डगमगणारी नाही... आपलं कुटुंब, आपल्या व्यवसायाशी निगडित सर्वांची कुटुंबं या सगळ्यांची जपणूक करताना सध्या तिची कोंडी होत असली तरीही परिस्थितीचा हा पिंजरा सर्वशक्तीनिशी तोडण्यासाठी ती पुढंच असते. अशा किती तरी ‘रिताताई’ स्वतःला सावरत, ‘हेही दिवस जातील’ म्हणून वाट पाहत असतील...नाही का?

मुंबई ते नांदेड असा माझा प्रवास सुरू होता. माझ्या ओळखीचे दिलीप माहुरे यांचा फोन आला. ते म्हणाले : ‘‘तुमची बहीण बोलणार आहे तुमच्याशी.’’ त्यांनी ताईकडे फोन दिला.
ताई म्हणाली : ‘‘दादा, किती वेळ आहे अजून पोहोचायला? मी वाट पाहतेय...’’
मी म्हणालो : ‘‘येतोय, येतोय. किती फोन करणार? तासाभरात पोहोचतोय.’’
ताईनं फोन ठेवला आणि मी महाराष्ट्रातल्या त्या सगळ्या बहिणींच्या आठवणींत हरवून गेलो, ज्यांच्याशी माझं असं नातं निर्माण झालेलं आहे. वाट पाहणारं असं बहिणीचं नातं राज्यातल्या जवळपास प्रत्येक जिल्ह्यात मला लाभलं आहे.
ही नाती माणसाला जगायला बळ देतात आणि जगायला शिकवतातही. काही दिवसांपूर्वी मी लता तायडे यांच्याविषयी याच सदरात लिहिलं होतं. त्यानंतर त्या म्हणाल्या : ‘‘तुमच्यामुळे मला महाराष्ट्रात अनेक भाऊ मिळाले.’’
तर अशी ही नाती बोलण्यातून, संवादातून आणि सुख-दुःख वाटून घेतल्यामुळे निर्माण होतात.

आता या सगळ्या बहिणींची आठवण येण्यामागं कारणही सण-उत्सवाचंच होतं. त्या दिवशी होती राखीपौर्णिमा आणि त्या दिवशी मी माझ्या आवडत्या नांदेड शहरात होतो आणि अनेक बहिणींकडून राखी बांधून घेत होतो. त्यांपैकीच असणारी रिताताई माहुरे (९९७०१५२८६६) ही अशीच एक गुणी बहीण. ‘राखीपौर्णिमेच्या/भाऊबीजेच्या निमित्तानं एकदा येऊन जा,’ असा आग्रह रिताताई दोन-तीन वर्षांपासून करत होती. तो योग परवाच्या राखीपौर्णिमेला
आला. मी नांदेडला रिताताईच्या घरी पोहोचलो. आगतस्वागत झालं. जेवण झालं. रिताताईनं मला राखी बांधली. ओवाळणी घालून झाल्यावर रिताताईचे यजमान दिलीपराव मला गमतीनं म्हणाले : ‘‘तुमच्याकडे काही रोख रक्कम असेल तर ती ओवाळणीत घाला. ती मला उपयोगी पडेल.’’
त्यावरही आमचे हास्यविनोद झाले. नंतर दिलीपराव एकदम शांत बसले. ते पाहून रिताताई त्यांच्यावर चिडली व माझ्याकडे पाहून म्हणाली : ‘‘दादा, आलेल्या संकटाला सर्व शक्तिनिशी सामोरं गेलं पाहिजे हे ह्यांना समजून सांगा; हे खूप घाबरतात असं मला सतत वाटतं.’’
मी रिताईला अचंब्यानं विचारलं : ‘‘कसलं संकट? काही झालंय का?’’
माझ्या या प्रश्नावर दोघंही शांत बसले. त्यांना तपशीलवार काही सांगायचं नसावं असं मला वाटलं.
मी विषय बदलायचा म्हणून विचारलं : ‘‘तुमची मुलं - वैष्णवी आणि वेदान्त- दिसत नाहीत ती...कुठं आहेत दोघं?’’
दिलीपराव म्हणाले : ‘‘दोघंही शिवाजीनगरमध्ये दुकानात बसले आहेत.’’
इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मी दोघांना परत आधीच्या मुद्द्यावर आणत विचारलं : ‘‘नक्की काय झालं हे मला सांगाल का?’’
तेवढ्यात दिलीपरावांना फोन आला आणि ते फोनवर बोलत बोलत बाहेर गेले. रिताताईनं त्यादरम्यानच्या काळात मला सगळं काही सांगितलं. आमचं बोलणं सुरू असताना दिलीपरावांनी मध्येच एकदा घरात डोकावून पाहिलं आणि ते पुन्हा बाहेर गेले.
तर रिताताईनं सांगितल्यानुसार, तिनं मोठ्या कष्टानं निर्माण केलेलं विश्व आता नेस्तनाबूत झालं होतं. सगळं ऐश्वर्य संपलं होतं.

रिताताई म्हणाली : ‘‘चार स्वप्नं उराशी बाळगून आम्ही नांदेडला आमचा संसार सुरू केला. आम्ही मूळचे विदर्भातले. काही लोकांच्या सोबतीनं फोटोग्राफीचा व्यवसाय सुरू केला. १० हजार रुपयांचा उद्योग महिन्याकाठी एक कोटीच्या घरात पोहोचला. आमची ज्या उद्योगावर एकच चूल पेटायची तिथं पाचशे चुली पेटू लागल्या. चांगलं काम, कमी किंमत यामुळे राज्यभरातून आमच्याकडे काम यायचं. अल्बम करणं, नवीन डिझाईन करणं, कॅमेऱ्यांची विक्री असं सगळं एका छताखाली सुरू झालं. सगळीकडे माल पाठवणं आणि नव्यानं सतत काहीतरी प्रयोग करत राहणं यात आम्ही सगळेजण गुंतलो होतो. ऑफिसचं काम, फोटोनिर्मिती करणाऱ्या छोट्याशा कारखान्याचं काम मी स्वतः पाहायची. माझे यजमान बाहेरचे सगळे व्यवहार बघायचे. खूप चांगलं सुरू झालं होतं. एके दिवशी अचानक आमच्या ऑफिसला आणि कारखान्याला मध्यरात्री आग लागली. दोन तासांत होत्याचं नव्हतं झालं. सगळा कोळसा झाला. आता उद्या करायचं कायं इथून सगळे प्रश्‍न सुरू झाले. ना इन्शुरन्स, ना कुणाच्या मदतीची अपेक्षा, अशा वातावरणात अगदी दारिद्य्रात आमचा एकेक दिवस जात होता. आपल्याला जेव्हा गरज असते तेव्हा कुणीच मदत करत नाही, यांसारखे अनेक अनुभव या काळानं मला दिले. उसने पैसे तर सोडाच; कुणी व्याजानंही पैसे द्यायला तयार होईना. जवळच्या नातेवाइकांची मदती, काही बॅंकेचं कर्ज असं करून पुन्हा नव्यानं सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. माझे यजमान तर कमालीचे हतबल झाले होते; पण ‘हतबल व्हायचं नाही, नियती आपली परीक्षा घेत असते, आपण त्या परीक्षेला सामोरं जायचं असतं,’
असं मी त्यांना सातत्यानं सांगत होते. आमच्या चुलीचा धूर जसा बंद झाला, तशी अनेकांच्या चुलीची अवस्था होती. व्यवसाय जसजसा वाढला होता, तसतसे आम्ही त्या नफ्यातून अजून गुंतवणूक करण्यासाठी अजून पुढं पुढं जात राहिलो. थोडीशी बचत असावी, संकटकाळ आल्यास ती उपयोगी पडेल याचा कधी विचारही केला नव्हता. एका वर्षात आम्ही बऱ्यापैकी कामाला लागलो होतो. एक दिवस अचानक कामगारांच्या गाडीला अपघात झाला. त्यात खूप आर्थिक नुकसान आम्हाला सोसावं लागलं. ही वेळ जाईल या आशेवर आमचे दिवस चालले होते. त्याच्या पुढं आठ दिवसांनंतर नोटाबंदी झाली आणि आमच्या व्यवसायाच्या सगळ्या नाड्या आवळण्यात आल्या. अचानक काय झालं कुणालाच कळेना. दिसायला फक्त नोटाबंदी झाली होती; पण आपल्या जगण्याचा श्र्वास काढून घेतला गेला आहे असं वाटायला लागलं. कितीही हात-पाय हलवा, उद्योगात भरभराट काही येईना. कर्ज घेण्यासाठी अनेक ठिकाणी दरवाजा ठोठावला; पण कर्ज देणारे ‘यांचं कसं चाललं आहे,’ हे पहिल्यांदा पाहतात. तिथंपण आम्हाला अपयश यायचं. नोटाबंदीचा फटका सगळ्यात मोठा होता. मागची चार वर्षं नोटाबंदीनं उद्योगाला मोकळ्या हवेत खेळूच दिलं नाही; पण तरीही वेगवेगळ्या काठ्यांचा आधार घेत मजल-दरमजल प्रवास सुरूच होता. काही महिन्यांत आपली पूर्वीसारखी परिस्थिती निश्‍चित होईल,
असं आता कुठं सहा महिन्यांपूर्वी वाटायला लागलं होतं; पण तितक्‍यात कोरोनाचं संकट आलं. कोरोनाची आपत्ती आली आणि त्या दिवसापासून आमचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला. दुकान, कारखाना सगळ्यांना कुलूप लावलेलं आहे. सोबतची जी कामगार माणसं होती, त्यांची चूल पेटेल इतका पगार त्यांना सुरू आहे; पण पैशाची आवक मात्र पूर्णतः बंद आहे. देणेकऱ्यांचं देणं थांबत नाही आणि त्यावरचं व्याजही. अशा परिस्थितीत मी खचले नाही आणि डगमगलेपण नाही. आज ना उद्या यश आपल्या पदरात पडेल आणि ते कायम टिकणारं असेल असा विचार करत त्या दिशेनं माझा प्रवास सुरू आहे.’’
काळ आणि निसर्ग एकाच व्यक्तीच्या मागं कसा लागू शकतो याचं रिताताई हे उदाहरण आहे. संसार, व्यवहार, नात्यांची जपणूक आणि संकटं यांना तोंड देणारी रिताताई मला एखाद्या पहाडासारखी वाटत होती. एक संकट आलं की पुरुष कोसळून पडतो; पण स्त्रियांचं तसं नसतं. भोवतीची प्रतिकूल परिस्थिती बदलण्यासाठी त्या सतत उभ्या राहतात. रिताताई तेच करत होती.

रिताताई ही सगळी कहाणी सांगत असतानाच तिची मुलगी वैष्णवी घरी आली. तिनं आईला धीर दिला.
माझ्या पाया पडत वैष्णवी म्हणाली : ‘‘मामा, तुम्ही आलात ते बरं झालं. तुम्ही आल्यामुळे आईचं मन तरी मोकळं झालं. एखाद्या वेळी बाबांना अश्रू आवरता येत नाहीत; पण आई मात्र फार खंबीर असते. तिला आम्ही रडलेलं कधीच पाहिलं नाही. तिचा चेहरा उदास कधीच नसतो.’’
दरम्यान, बाहेर गेलेले दिलीपराव आत आले. बॅंकांचा त्रास, वेगवेगळ्या धोरणांच्या नावाखाली उद्योगांची पिळवणूक करणारी धोरणं यांविषयी दिलीपरावांनी (९४२२१८५२८२) मला सांगितलं. ते म्हणाले : ‘‘जिथं चार हजार वीजबिल येत होतं तिथं २५ हजार रुपये यायला लागलं. जीएसटीच्या नावाखाली आणि शासकीय नियमावलीच्या आखणीमध्ये छोटे आणि मध्यम सगळे उद्योजक आपलं आयुष्य मुठीत धरून जगू लागले आहेत. आम्ही दिवस-रात्र मेहनत करायला तयार आहोत, सगळीकडे विश्‍वासाची माणसं उभी करायला तयार आहोत, सगळी उद्दिष्टं आम्ही सहजरीत्या गाठू शकतो, पण ‘सिस्टिम’ नावाच्या शब्दानं एक लक्ष्मणरेषा प्रत्येकाच्या अवतीभवती आखून ठेवली आहे. निराश होऊन उद्योजकांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या अधूनमधून ऐकायला मिळतात. जर माझी बायको खंबीर नसती आणि तिनं सगळं सावरलं नसतं तर माझ्यावरही हीच वेळ आली असती.’’

एखादा माणूस खूप जवळचा वाटत असला तर त्याच्याकडे दुःख व्यक्त करून थोडंसं मोकळं व्हायचं असा एक कोपरा माणूस सतत शोधत असतो. तो कोपरा माझ्यामुळे माहुरे कुटुंबीयांना मिळाला होता. त्यांचं दुःख हलकं झालं होतं.
रिताताई म्हणाली : ‘‘दादा, फार मनाला लावून घेऊ नका. हेही दिवस जातील.’’ मी निघालो आणि अगदी हसतमुखानं रिताताईनं निरोपाचा हात वर केला. तो उंच हात मला ऊर्जा देणारा, माझाच आत्मविश्‍वास बळकट करणारा वाटला मला! त्या हास्यामागं एक अशी धाडसी महिला मी पाहत होतो जिच्यात खूप मोठं दुःख पचवण्याची ताकद आहे...कितीही संकटं आली तरीही ती डगमगणारी नाही... आपलं कुटुंब, आपल्या व्यवसायाशी निगडित सर्वांची कुटुंबं या सगळ्यांची जपणूक करताना सध्या तिची कोंडी होत असली तरीही परिस्थितीचा हा पिंजरा सर्वशक्तीनिशी तोडण्यासाठी ती पुढंच असते. अशा किती तरी ‘रिताताई’ स्वतःला सावरत, ‘हेही दिवस जातील’ म्हणून वाट पाहत असतील...नाही का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com