‘सत्तावीस’ची साडेसाती...! (संदीप काळे)

sandip kale
sandip kale

‘दोन्ही मुलांचं संगोपन आम्ही करतो, तू दुसऱ्या लग्नाचा विचार कर,’ असं आजीबाईंच्या सासरच्या मंडळींनी त्यांना सुचवलं. माहेरच्या मंडळींनाही ही सूचना आवडली. मात्र, आपल्या मुलांचं काय होईल, या काळजीपोटी ‘दुसरं लग्न करायचं नाही,’ असा निर्णय आजींनी घेतला. सगळं आयुष्य एकटीनं काढत दोन्ही मुलांना आजींनी खूप शिकवलं...

त्या दिवशी सकाळी ढग भरून आले होते. तांबडं फुटायच्या वेळेलासुद्धा काळोखल्यासारखंच वातावरण होतं. ठरल्याप्रमाणे मी नवी मुंबईहून डोंबिवलीला पोहोचलो. डोंबिवलीत दोघांना भेटून मला मंत्रालयात जायचं होतं. डोंबिवलीत थोडं पुढं गेल्यावर एके ठिकाणी मला खूप कुत्रे दिसले. एक आजी त्या कुत्र्यांना बिस्किटं आणि कुत्र्यांसाठीचे वेगवेगळे खाद्यपदार्थ खायला घालत होत्या. गाडी थांबवून मी ते दृश्य दुरून पाहत राहिलो. पन्नासपेक्षा जास्त कुत्रे त्या आजींच्या अवतीभवती असावेत. आजींनी आणलेलं सगळं खाद्य वीस-पंचवीस मिनिटांत त्या कुत्र्यांनी फस्त करून टाकलं. त्या आजी आता काही कुत्र्यांना कुरवाळू लागल्या. आजींच्या जवळ जाण्याची त्या कुत्र्यांमध्ये जणू स्पर्धाच लागली होती. आजींच्या हातची माया प्रत्येक कुत्र्याला हवी होती! काही कुत्रे तर राहिलेलं खाणं सोडून कुरवाळून घेण्यासाठी पुढं येत होते.
मी आजींजवळ गेलो आणि म्हणालो : ‘‘किती प्रेम आहे तुमचं या कुत्र्यांवर! सगळे कुत्रे तुमच्या स्पर्शासाठी तुमच्याभोवती अक्षरशः पिंगा घालत आहेत.’’
आजी म्हणाल्या : ‘‘जनावरांवर जेवढं प्रेम करावं, तेवढी ती तुमच्याभोवती शेपटी हलवत येत तुमच्यावर प्रेम करतात.’’

आजींनी आणलेल्या दोन भल्या मोठ्या पातेल्यांमधलं थोडंबहुत राहिलेलं अन्न चाटून-पुसून खाण्याचं काम काही कुत्रे करत होते; तर काही कुत्र्यांना असंही वाटत असावं, की आपल्या अंगावर आजींचा हात फिरवला गेला म्हणजे आपलं पोट भरेल!
आजी फार काही बोलण्याच्या मूडमध्ये नव्हत्या. कारण, त्यांचं सगळं लक्ष त्या कुत्र्यांवर प्रेम करण्यावर होतं. आजूबाजूला अनेक लोक मॉर्निंग वॉकला येत-जात होते. काही लोक त्या कुत्र्यांच्या दिशेनं दुरूनच एक-दोन बिस्किटं फेकत होते आणि निघून जात होते. आजींचं मात्र तसं नव्हतं. त्यांनी सगळ्या कुत्र्यांना लळा लावला होता.
‘आता निघते मी,’ असं कुत्र्यांना उद्देशून म्हणत आजींनी रिकामी पातेली उचलली आणि त्या निघाल्या. मीही आजींसोबत बोलत बोलत निघालो.
आजींचं कुत्र्यांवरचं प्रेम पाहून मी त्यासंबंधीचे अनेक प्रश्न त्यांना विचारले. आजी म्हणाल्या : ‘‘अहो, त्यांना कुत्रे म्हणू नका. माझी लेकरं आहेत ती!’’
आजींनी विचारलं : ‘‘तुम्ही डोंबिवलीचेच का?’’
‘‘नाही. काही कामानिमित्त डोंबिवलीत आलो होतो. तुमचं प्राणिप्रेम बघून थांबलो आणि तुमच्याशी बोलण्याचा मोह आवरला नाही,’’ मी म्हणालो.
आजी म्हणाल्या : ‘‘माझा मुलगाही दिसायला तुमच्यासारखाच होता जवळपास.’’
‘‘ ‘होता’ म्हणजे?’’ आता तो नाहीय का?’’ मी विचारलं.
आजी म्हणाल्या : ‘‘नाही. त्याचा अपघात झाला आणि त्यात तो गेला.’’
यावर काय बोलावं ते मला सुचेना.
सकाळच्या वातावरणाप्रमाणे आतापर्यंत प्रसन्न असलेला आजींचा चेहरा, मुलाच्या आठवणीनं एकदम गंभीर झाला.
आजी म्हणाल्या : ‘‘चला, इथं जवळच माझं घर आहे. चहा घ्या आणि मग तुमच्या कामासाठी जा.’’
मी होकारार्थी मान हलवली.

आम्ही आजींच्या घरी पोहोचलो. आजींनी बेल वाजवताच एका मुलीनं दार उघडलं.
‘‘ही माझी मुलगी श्रुतिका. नोकरीनिमित्त दुबईला होती. या कोरोनाच्या काळात तिची नोकरी गेली. आता बाळंतपणासाठी माझ्याकडे आली आहे. तिचा नवराही दुबईत असतो. त्याचीही पगारकपात आणि इतर अनेक आर्थिक अडचणी सुरू झालेल्या आहेत,’’ आजींनी सांगितलं.
आजी चहा करायला स्वयंपाकघरात गेल्या...‘मी चहा घेत नाही,’ असं आजींना सांगितल्यावर त्या म्हणाल्या : ‘‘तुळशीचा काढा चालेल का?’’
मी ‘हो’ म्हटल्यावर त्यांनी काढा केला. काढा घेता घेता आमच्या गप्पा सुरू झाल्या. आता आमच्या संवादात मोकळेपणा आला होता. मी त्यांना प्रश्न विचारत गेलो, त्या बोलत गेल्या. एका महिलेला काय काय आणि किती किती भोगावं लागतं, एखाद्याच्या मागं लागलेला नियतीचा फेरा कसा सुटत नाही असंच आजींचा सगळा प्रवास ऐकून वाटलं.

डोंबिवलीतल्या टिळकनगरमधलं, सुयोग मंगल कार्यालयाजवळचं आजींचं ते घर मोठमोठ्या दुःखांचं साक्षीदार होतं.
डोंबिवली म्हणजे एकदम पुण्याच्या संस्कारांचा फील असलेला भाग!
मी ज्या आजींशी बोलत होतो त्यांचं नाव आहे शिल्पा सुनील राणे. (७०३९८९१९३९). साठी पार केलेल्या आजींचा मुक्‍या प्राण्यांवर अतिशय जीव. बाहेरच्या कुत्र्यांना आत्ताच खाऊ देऊन आलेल्या आजी घरातल्या एका कुत्र्याला आंघोळ घालत माझ्याशी बोलत होत्या.
त्यांचा एकूण प्रवास किती खाच-खळग्यांचा होता हे त्यांच्याशी गप्पा मारताना लक्षात येत होतं...

श्रुतिका आणि समीर ही दोन अपत्यं एक-दोन वर्षांची असतील तेव्हा आजींचे यजमान सुनील राणे यांचं हृदयविकाराच्या झटक्‍यानं निधन झालं. ‘दोन्ही मुलांचं संगोपन आम्ही करतो, तू दुसऱ्या लग्नाचा विचार कर,’ असं आजीबाईंच्या सासरच्या मंडळींनी त्यांना सुचवलं. माहेरच्या मंडळींनाही ही सूचना आवडली. मात्र, आपल्या मुलांचं काय होईल, या काळजीपोटी ‘दुसरं लग्न करायचं नाही,’ असा निर्णय आजींनी घेतला. दोन्ही मुलांना आजींनी खूप शिकवलं. समीर इंजिनिअर झाला आणि मुलगी श्रुतिका कॉमर्समध्ये उच्चशिक्षित. समीरला अमेरिकेत चांगली नोकरी मिळाली. अमेरिकेत जाण्यासाठी समीरला व्हिसाही मिळाला. पुढच्या आठवड्यात तो अमेरिकेला जाणार होता, त्यादरम्यानच समीरचा अपघात झाला आणि त्यात तो मरण पावला...
आंघोळ घातलेल्या कुत्र्याचं अंग टॉवेलनं पुसत आजींनी माहिती दिली.

आमच्या गप्पांमध्ये सहभागी होत श्रुतिका म्हणाली : ‘‘या घटनेची आठवण काढली तरी आई सुरुवातीला खूप रडायची; पण आता ती खूप कणखर बनली आहे. असं वाटतं की तिच्या डोळ्यांतले अश्रू आता संपलेत की काय...’’
हे सांगताना श्रुतिकाचे डोळे पाणावले. आजींच्या यजमानांच्या आणि मुलाच्या फोटोवरचे हार झुळकीनं हेलकावत होते.
आजी म्हणाल्या : ‘‘समीर गेल्यावर श्रुतिका हीच माझी आधार झाली.
श्रुतिकाला स्थळं पाहण्याच्या वेळची गोष्ट. लग्नानंतर मुलीची आईही तिच्यासोबतच राहील की काय या शंकेमुळे श्रुतिकाला खूप ठिकाणी नकार आले. श्रुतिका म्हणायची, ‘आई, मी तुला सोडून कुठंही जाणार नाही.’ बऱ्याच शोधानंतर आम्हाला जसं पाहिजे तसं स्थळ मिळालं. खूप वर्षांच्या मेहनतीनंतर सगळी घडी व्यवस्थित बसली होती. मात्र, अचानकपणे कोरोना आला आणि त्यात श्रुतिकाची नोकरी गेली. मी विचार केला, हेही दिवस जातील, अनेक संकटांत हे एक संकट आहे. आम्ही सकारात्मकतेनं दिवस कंठू लागलो. त्यातच काही दिवसांपूर्वी माझी तब्येत बिघडली. कर्करोग झाल्याचं तपासणीनंतर आढळून आलं. दोन वेगळ्या पद्धतीच्या शस्त्रक्रिया कराव्या लागणार आहेत. माझ्या पायाखालची जमीनच सरकली, तरी मी खचले नाही. हेही संकट जाईल ही आशा मी बाळगून आहे.’’

आजींचं बालपण मालवणचं, तर सासर रत्नागिरीचं. आपला संसार, आपलं माहेर याविषयीच्या अनेक गोड आठवणी आजींनी सांगितल्या.
सध्या आजींकडं घर चालवण्यासाठीही पैसा नाही अन् मोठ्या आजारावर इलाज करण्यासाठी पैसा नाही.
आजी म्हणाल्या : ‘‘श्रुतिकाचं हे पहिलंच बाळंतपण आहे. ते आनंदात करावं या हेतूनं तिला इथं आणलं; पण सगळाच हिरमोड झाला हो.’’
गप्पांच्या ओघात आजींनी एका विलक्षण योगायोगाकडे माझं लक्ष वेधलं व त्या योगायोगाच्या पुष्ट्यर्थ सगळी कागदपत्रंही माझ्या पुढ्यात ठेवली.
ती कागदपत्रं पाहून मीही थक्क झालो. तो योगायोग असा होता : सत्तावीस तारखेला आजींचं लग्न झालं. सत्तावीस तारखेला आजींच्या यजमानांचं निधन झालं. सत्तावीस तारखेलाच मुलगा समीरचा अपघात झाला. सत्तावीस तारखेलाच मुलगी श्रुतिकाची नोकरी गेली आणि आपल्याला कर्करोग झाला आहे हे आजींना निदानाद्वारे कळलं तेही मागच्या सत्तावीस तारखेलाच. किती योगायोग म्हणावा हा! माझा कुठल्याही प्रकारच्या भविष्यावर विश्र्वास नाही; पण सगळ्याच वेळी सत्तावीसच तारीख का यावी हा प्रश्‍न मलाही पडल्यावाचून राहिला नाही.

मी आजींना म्हणालो : ‘‘या सत्तावीस तारखेचं गणित मला काही कळलंच नाही.’’
त्या म्हणाल्या : ‘‘हो...मलाही पडलेले ते एक कोडंच आहे. जी कुठली घटना माझ्या आयुष्यात घडते ती सत्तावीस तारखेलाच घडते!’’
आजींनी कधी पोळी-भाजी केंद्र चालवलं, कधी ॲम्ब्युलन्सवर सहायक म्हणून काम केलं; तर कधी अनेक महिलांना समवेत घेऊन वेगवेगळी कामं केली. मुलांना खूप शिकवायचं आणि पुढं त्यांना आपल्या ‘आयुष्याची काठी’ बनवायचं, हे ठरवून आजी त्यांच्या तरुण वयात कामाला लागल्या खऱ्या; पण आज एका मोठ्या आजारानं त्यांच्या आयुष्यात एक गंभीर वळण आलं आहे. या आजारातून बाहेर पडण्यासाठी त्यांच्याकडं कुठलाही पर्याय शिल्लक नाही.

मला निघायची घाई असल्याचं माझ्या हालचालींतून आजींना जाणवलं असावं. त्या म्हणाल्या : ‘‘थांबा जरा. काही तरी खायला करते. काही न खाता कसे जाणार?’’
मी माझी अडचण सांगितली. मला निघावंच लागेल हे त्यांनाही पटलं.
मी सगळ्या घरावर एक नजर टाकली तेव्हा माझ्या लक्षात आलं, की किती वेगवेगळ्या दुःखांच्या साक्षीदार असलेल्या अनेक वस्तू या घरात आहेत. या घराच्या भिंतींनी जे जे काही पाहिलं आहे ते ते अनुभवलं आहे या आजींनी! या आजींमध्ये एवढी ताकद आयुष्यभर कशी टिकून राहिली असेल? माहेर-सासरचे संस्कार तर होतेच होते त्यांच्यावर; पण पोटच्या गोळ्यांचा प्रवास सुखकर झाला पाहिजे ही तळमळ त्याहून अधिक असावी. या तळमळीपोटीच त्या प्रतिकूल परिस्थिती तगून-टिकून राहिल्या. घरातली अनेक कागदपत्रं, फोटोंचे अल्बम पाहताना मागच्या सगळ्या जुन्या आठवणी माझ्याही डोळ्यांसमोर कल्पनेनं येत गेल्या.

निघताना मी आजींना म्हणालो : ‘‘आजी, तुमच्या आजारावरच्या उपचारांसाठी मी तुम्हाला नक्की मदत करणार आहे.’’
त्या मदतीचं स्वरूप काय असेल, शस्त्रक्रिया कशा पद्धतीनं होईल हे सगळं मी त्यांना समजावून सांगितलं. आजींनी हसून माझा हात हातात घेतला व म्हणाल्या : ‘‘अरे बाळा, नको काळजी करू एवढी माझी. होईल सगळं ठीक.’’
मी आजींचा निरोप घेतला. आजी मला रस्त्यापर्यंत सोडायला आल्या. त्यांच्यासोबत त्यांचं कुत्रंही शेपटी हलवत आलं.

थोडं दूर गेल्यावर मी आजींकडे वळून पाहिलं. त्या माझ्याकडेच एकटक पाहत होत्या. परतीच्या वाटेवर माझ्या मनात अनेक प्रश्‍न होते...कदाचित माझ्यात त्या आपल्या मुलाला पाहत असतील असं वाटून गेलं. घरापासून दूर आलो...सकाळच्या वेळी आजींसोबत दिसलेले सगळे कुत्रे आता रस्त्यावर शांतपणे बसलेले दिसले. त्या सगळ्या कुत्र्यांना आधार देणाऱ्या, खायला घालणाऱ्या एक आजी उद्या पुन्हा तिथं जातील.
कुत्र्यांना हे नक्की माहीत आहे! मात्र, आजींच्या आयुष्याला आधार द्यायला, मदत करायला कोण येणार या प्रश्नाला तूर्त तरी उत्तर नव्हतं.
नियतीशी लढा देणाऱ्या, झुंज देणाऱ्या अशा किती तरी आजी समाजातल्या कानाकोपऱ्यात असतील. त्यांच्यात इतकी ताकद कुठून येते माहीत नाही.
काहीही झालं तरी त्यांचा संघर्षमय लढा काही थांबत नाही. मग ‘सत्तावीस’सारख्या कितीही तारखा नागासारख्या फणा काढून वाटेत उभ्या राहिल्या तरी अशा आजी कधी डगमगत नाहीत!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com