‘प्राणी’नाथ (संदीप काळे)

sandip kale
sandip kale

आजोबा म्हणाले : ‘‘मी ज्या अंधेरी भागात राहत होतो तिथं अनेक मुलांचे आई-वडील कुत्र्या-मांजरांसोबत शेवटचे दिवस काढतात. काहींची मुलं नोकरीनिमित्त परदेशी असतात, काहींची मुलं भांडणं करून वेगळी राहतात. माझं तसं तर काही नाहीये. मी पहिल्यापासून माझ्या या ‘लेकरां’बरोबर अगदी आनंदात राहतोय!’’

लॉकडाउनमुळे मुंबईचा श्वास कोंडतोय. लोकल बंद आहेत, त्यामुळे रस्त्यावर वाहनांची मुंग्यांसारखी गर्दी आहे. घामाघूम होणारं शरीर आणि त्रासून टाकणारी वाहतूकव्यवस्था पाहिली की असं वाटतं, मुंबईत नको फिरायला, मुंबईबाहेर कुठंतरी निवांत जावं...असे विचार मनात सुरू असतानाच मुरबाड भागात असणाऱ्या सचिन पाटील या मित्राचा फोन आला. सचिन म्हणाला :
‘‘ ‘शेतीतले तुझे प्रयोग बघायला येतो एकदा’ असं तू मला किती दिवसांपासून म्हणत आहेस; पण येत मात्र नाहीस.’’
फोनवरचं आमचं संभाषण संपलं आणि मी ठरवलं की उद्या सचिनकडे जायचं...
दुसऱ्या दिवशी सकाळी निघालो. सकाळी सकाळीही रस्त्यावर खूप गर्दी होती. कल्याण-कर्जत हाय वेवर तर आणखी गर्दी दिसली.
एका बॅंकेसमोर भलीमोठी रांग लागली होती. त्या रांगेतले बहुतेकजण वयोवृद्धच होते. मी तिथं थांबलो आणि ‘इतकी मोठी रांग का’ अशी चौकशी केली तेव्हा कळलं की ती रांग पेन्शनसाठी होती.
रांगेतल्या एका आजोबांना विचारलं : ‘‘दर महिन्याला तुम्हाला असाच त्रास सहन करावा लागतो का?’’
आजोबा म्हणाले : ‘‘हो. असंच रांगेत उभं राहावं लागतं. अहो, बॅंकेत काम करणाऱ्या माणसांनी तरी काय करायचं? तिथं दोन माणसं आहेत आणि त्यांना पाच माणसांचं काम एकाच वेळी करावं लागतं. कसं शक्‍य होणार? शेवटी, तीही माणसंच नाहीत का?’’
त्या आजोबांचा सकारात्मक दृष्टिकोन पाहून मला छान वाटलं. रांगेतल्या बाकीच्या सगळ्यांचा सूर तक्रारीचा होता. बऱ्याच प्रतीक्षेनंतर आजोबांना बॅंकेतून पैसे मिळाले.
मी आजोबांना म्हणालो : ‘‘जोरात खरेदी करणार असं दिसतंय? आजी एकदम खूश. हो ना...?’’
आजोबा स्पष्टवक्ते होते. ते म्हणाले : ‘‘नाही हो. या पैशांचा वापर मी माझ्या ‘लेकरां’साठी करतो. मी खूप कुत्री-मांजरं पाळली आहेत. तीच माझी मुलं-बाळं आहेत. त्यांच्याशिवाय मला कुणी नाही.’’
आजोबा हे काही तरी वेगळंच सांगत होते.
मी विचारलं : ‘‘किती प्राणी आहेत तुमच्याकडे?’’
ते म्हणाले : ‘‘आज वीसच्या आसपास आहेत. या संख्येत सतत वाढच होत असते.’’
आजोबा जे काही काम करत असतील ते नक्कीच वेगळं असावं असं मला वाटलं.
मी आजोबांना विचारलं : ‘‘तुम्ही कुठं राहता? इथून किती अंतरावर?’’
त्यांनी माहिती दिल्यावर मी विचारलं : ‘‘मी तुमचं सेंटरला पाहायला येऊ शकतो का?’’
ते म्हणाले : ‘‘ते सेंटर माझं नाही. मी तिथं राहतो. तुम्ही पाहायला येऊ शकता. काही हरकत नाही.’’

आम्ही बोलत बोलत निघालो. आठ किलोमीटरचा प्रवास केल्यावर आम्ही माहेश्वर गेटजवळ पोहोचलो. इथं ‘पीएडब्ल्यूएस’ नावाची एक एनजीओ आहे. तिथं प्राण्यांवर उपचार केले जातात. आम्ही आत शिरताच बरीचशी कुत्री-मांजरं आजोबांच्या दिशेनं धावत आली. आजोबासुद्धा ‘मेरा बच्चा, मेरा बच्चा’ म्हणत त्या सगळ्या कुत्र्या-मांजरांना स्पर्श करू लागले. जिकडे पाहावं तिकडे प्राणीच प्राणी होते. कुणाला मार लागलाय...कुणाला आजार झालाय...कुणाचा अपघात झालाय...असे अनेक पीडित आणि काही धडधाकटही प्राणी तिथं होते.
आजोबा हे ‘रसायन’ काही वेगळंच होतं. पांढरीशुभ्र लांब दाढी, अंगावर खादीचे साधे कपडे आणि इकडे तिकडे भिरभिरणारी चाणाक्ष नजर...
आजोबांनी सगळी संस्था मला दाखवल्यावर आम्ही त्यांच्या छोटेखानी खोलीत येऊन बसलो.

आजोबांशी खूप गप्पा झाल्या. एकनाथ पाटील (८३७८९९०८८२) हे या आजोबांचं नाव. अंधेरीतल्या दादाभाई नौरोजीनगरमधल्या प्रगत विद्यामंदिरात ते शिक्षक होते. आता सेवानिवृत्त आहेत. त्यानंतर त्यांनी वीस वर्षं डोंबिवलीला भाड्याच्या घरात काढली, तेव्हाही त्यांच्यासोबत प्राणी होतेच. आता गेल्या आठ वर्षांपासून ते मुरबाडला या एनजीओच्या आवारातल्या खोलीत राहतात. आताही त्यांच्याकडे खूप प्राणी आहेत.
आजोबांचा हा सगळाच प्रवास खूप वेगळा आणि प्रेरणादायी आहे.
‘‘मी तत्त्वांशी, मूल्यांशी कधी तडजोड केली नाही,’’ असं समाजवादी विचारसरणी असलेले आजोबा सांगतात. लोकहितासाठी चळवळ, आंदोलन, कारावास हे सगळे टप्पे त्यांच्या आयुष्यात येऊन गेले. प्राण्यांविषयी त्यांना पहिल्यापासूनच प्रेम.आता उतारवयात हे प्राणिप्रेमच त्यांच्या जगण्याचा आधार ठरलं आहे.
आजोबांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचं सगळं आयुष्य खूपच गुंतागुंतीचं आहे. त्यांना मोठे आजार झाले...अनेक संकटं आली...पण ते डगमगले नाहीत. स्वतःजवळ जे काही होतं ते इतरांना दान करून आजोबा मोकळ्या हातानं इथल्या प्राण्यांची सेवा करत प्रत्येक दिवस आनंदानं घालवत आहेत.

आजोबा म्हणाले : ‘‘माझं बालपण रत्नागिरी जिल्ह्यातल्या नातुंडे या गावी गेलं. तिथंच मला कुत्र्या-मांजरांचा लळा लागला. तिथं मामाच्या घरी जेवायला बसलो की मांजरं ताटाभोवती येऊन बसायची. कधी कधी ताटात तोंड घालून घासही मटकवायची. बाहेर बरेच कुत्रेही अपेक्षेनं उभे असायचे. त्यामुळे कुत्र्या-मांजरांच्या सहवासात रमायची मला लहानपणापासूनच सवय लागली. ती सवय आज त्र्याऐंशिव्या वर्षीही कायम आहे.’’
‘‘तुम्हाला कुणी नातेवाईक नाहीत का?’’ मी आजोबांना विचारलं.
‘‘नातेवाईक आहेत; पण ते आपापल्या विश्वात आणि मी माझ्या विश्वात! मी प्राण्यांमध्ये राहतो. प्राण्यांमध्ये सतत राहिल्यामुळे मला अस्थमासारखे आजारही आहेत. मी मुरबाडला राहायला येऊन आता आठ वर्षं होऊन गेली आहेत. या काळात मला कुणी भेटायला आलं नाही.’’
आजोबा अविवाहित आहेत, हे त्यांच्याशी झालेल्या गप्पांमधून मला कळलं होतं. त्या अनुषंगानं मी विचारलं : ‘‘तुम्ही लग्न का केलं नाही?’’
आजोबा म्हणाले : ‘‘खूप इच्छा होती. काही मुली पाहिल्याही...पण मी त्यांना किंवा त्यांच्या घरच्यांना माझ्या प्राणिप्रेमाबद्दल सांगायचो तेव्हा त्यांच्याकडून नकार यायचा.’’
एका आवडणाऱ्या मुलीनं मला पत्र पाठवलं होतं, ‘आय लव्ह यू, बट मांजर आणि कुत्रा असल्यामुळे, आय हेट यू!’ आता मला सांगा, मी ज्या प्राण्यांवर जिवापाड प्रेम केलं तेच प्राणी कुणाला आवडत नसतील, तर मला ते कसं चालेल? अशी एकेक अडचण येत गेली आणि जसंजसं आयुष्यही पुढं सरकत राहिलं तसतशी मलाही माणसांशिवायच राहण्याची, एकटं राहण्याची सवय पडली. माझ्या सगळ्या ‘लेकरां’बरोबर राहायला मला आवडायला लागलं. आता तेच माझ्या आयुष्याचा भाग आहेत.’’

‘‘सर्व प्राण्यांवर होणारा खर्च, तुमचा खर्च हे सगळं पेन्शनमध्ये कसं भागतं?’’ हा माझा प्रश्न ऐकल्यावर आजोबा हसत म्हणाले : ‘‘निसर्गानं ठरवलं तर सगळं काही ठीक होतं. माझं तसंच सुरू आहे. आता पैशाची अडचण तर काय प्रत्येकालाच येत असते. मला १७ हजार रुपये पेन्शनचे मिळतात आणि महिन्याकाठी २५ ते ३० हजार रुपये खर्च येतो. तुमच्यासारखे अनेक मित्र मला मदत करतात आणि त्यातून माझं भागतं. दवाखान्याच्या खर्चासाठी अनेकदा अडचण येते; पण तेही कसं तरी निभावलं जातं.’’
आजोबांनी तिथल्या कुत्र्या-मांजरांची नावंही मजेशीर ठेवली आहेत. अपघातामुळे एका कुत्र्याचे पाय गेले असून त्याला रॉड बसवण्यात आले आहेत. त्या कुत्र्याचं नाव आजोबांनी ठेवलं आहे ‘रॉडी’! सगळ्या प्राण्यांना खाऊ-पिऊ घालण्याचं वेळापत्रकही वेगवेगळं आहे. म्हणजे, भूक लागली की हे प्राणी विशिष्ट आवाजात ओरडतात, त्यावरून, आता यांना भूक लागली आहे हे आजोबा ओळखतात. आजूबाजूला कुणी व्यक्ती येत असेल आणि तिच्याबद्दल या प्राण्यांना काही संशयास्पद वाटलं तर त्या वेळचं या प्राण्यांचं ओरडणं वेगळं असतं. असं प्रत्येक वेळचं वेगवेगळं ओरडणं आता आजोबांच्या परिचयाचं झालं असून प्राण्यांच्या या आवाजाची परिभाषा ते नेमकी ओळखतात.

कोकणातलं ‘गणेशगुळे’ हे आजोबांचं मूळ गाव. तिथल्या पाळीव प्राण्यांविषयीही आजोबांनी मोठ्या आस्थेनं माहिती दिली.
मी आजोबांना मध्येच विचारलं : ‘‘एवढं मोठं आयुष्य आहे...तुम्हाला कुणाची तरी सोबत असायला पाहिजे. तुम्ही आयुष्य एकट्यानं काढणार कसं?’’
यावर त्या सगळ्या प्राण्यांकडे बघत आजोबा म्हणाले : ‘‘हे बघा ना, आहेत माझ्या सोबतीला सगळेजण.’’
मी पुन्हा म्हणालो : ‘‘आजोबा, मी माणसांविषयी विचारतोय. तुमच्या सोबतीला कुणी नाहीये ना? तुमचं लग्न झालेलं नाही...तुम्हाला मूल-बाळ नाही...आपल्याला कुणी आधाराची काठी नाही याचं तुम्हाला वाईट वाटत नाही का?’’
यावर आजोबा म्हणाले : ‘‘नातेवाइकांबाबत मला कधी वाईट वाटलं नाही आणि वाटणारही नाही. मधल्या काळात, म्हणजे १९९० ला, माझी भाची शालिनी पेटकर ही लग्नानंतर चार महिन्यांत मरण पावली, त्याचं मला खूप वाईट वाटलं. तिच्यावर माझा फार जीव होता. आता सोलापूरची ऊर्मिला आगरकर आहे. अगदी मुलीसारखी माझी काळजी घेते.’’
आगरकर यांच्याबद्दल आजोबा भरभरून बोलले. आगरकर यांचं पुस्तक आजोबांनी वाचलं आणि त्यातून त्यांच्याशी बोलल्यावर दोघांची मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर वडील-मुलीच्या नात्यांत झालं.

मी आजोबांना सहजच विचारलं :‘‘तुमच्याकडे आजघडीला किती पैसे शिल्लक आहेत?’’
आजोबा म्हणाले : ‘‘अहो, १७ हजार रुपये पेन्शनचे येतात. त्यातही खातं सुरूच राहावं म्हणून ठरावीक रक्कम बॅंकेत कायमस्वरूपी ठेवावी लागते. त्या रकमेपोटीचे एक हजार रुपये बॅंकेत आहेत. शिल्लक म्हणाल तर तेवढेच आहेत. त्यातूनही कुणी जर मदत मागितली तर काही तरी मदत मी करतोच.’’
विषय पुन्हा कुत्र्या-मांजरांकडे वळवत मी म्हणालो : ‘‘आजोबा, मी कुत्र्या-मांजरांना खुणावलं, जवळ बोलावलं तर ती माझ्याकडे येत नाहीत आणि तुम्ही बोलावलं की लगेच येतात. हे कसं काय?’’
‘‘मी इंग्लिशचा शिक्षक होतो, त्यामुळे माझ्या इंग्लिश भाषेचा प्रभाव या सगळ्या माझ्या ‘लेकरां’वरही आहे!’’ काहीसं गमतीदार उत्तर देत आणि लगेच गंभीर होत आजोबा पुढं म्हणाले : ‘‘मी ज्या अंधेरी भागात राहत होतो तिथं अनेक मुलांचे आई-वडील कुत्र्या-मांजरांसोबत शेवटचे दिवस काढतात. काहींची मुलं नोकरीनिमित्त परदेशी असतात, काहींची मुलं भांडणं करून वेगळी राहतात. माझं तसं तर काही नाहीये. मी पहिल्यापासून या ‘लेकरां’बरोबर अगदी आनंदात राहतो. त्यांच्याविषयी मला प्रेम आहेच आहे. प्राण्यांवर प्रेम केल्यावर आयुष्य वाढतं हे मी अनेक ठिकाणी वाचलेलं आहे. त्या विचारांचा प्रभाव माझ्यावर आहे. मला अजून जास्त आयुष्य हवं आहे ते केवळ या माझ्या ‘लेकरां’साठी...’’ आजोबा आता काहीसे भावुक झाले होते. त्यांनी जवळचंच एक मांजर छातीशी धरलं. त्या जखमी मांजराकडे पाहून त्यांचे डोळे पाणावले...
आजोबा म्हणाले :‘‘शहरात अनेक ठिकाणी नवं घर घेण्याचा मी प्रयत्न केला. तिथं राहण्याचं ठरवलं; पण माझ्याबरोबर असलेलं माझं हे ‘कुटुंब’ पाहून लोकांना ते आवडायचं नाही. माझ्या ‘लेकरां’मुळे माझे अनेकजणांशी वाद झाले. भांडणं झाली. या संस्थेतले नीलेश भनंगे माझ्या परिचयाचे होते. त्या ओळखीतून मला इथं राहायला छोटीशी जागा मिळाली.’’

आजोबांचा प्राणिप्रेमाचा एकूण प्रवास ऐकून मी थक्क झालो. माणसं प्रेमासाठी वाटेल ते करतात हे अनेक वेळा ऐकलं-पाहिलं होतं; पण आजोबांचं हे प्राणिप्रेम मात्र त्याहून नक्कीच वेगळं होतं. आजोबांचा निरोप घेताना ते मला म्हणाले : ‘‘तुम्ही चार प्राण्यांना जीव लावून बघा, प्राणीसुद्धा तुम्हाला तितकाच जीव लावतात. त्या प्राण्यांना माणसांसारखं स्वार्थी व्हायला जमतच नाही!’’
आपलं सगळं आयुष्य प्राण्यांच्या सेवेसाठी समर्पित केलेल्या आजोबांचं हे म्हणणं खरं होतं. आजारी असलेले कुत्रे, लोकांनी सोडून दिलेली, उपाशीपोटी असणारी कुत्री-मांजरं यांचा शोध घेऊन त्यांना बरं करून त्यांची सेवा करण्यातच आजोबांचा सगळा आनंद सामावलेला आहे.
आजोबा माणसांविषयी तसे कठोर वाटतात, त्यांना माणसंं नको आहेत; पण घरातल्या कुठल्याही कुत्र्या-मांजराला थोडं जरी काही झालं तरी आजोबा त्याला कुशीत घेऊन झोपतात. एखादं कुत्रं, मांजर दगावल्यावर घरातलं माणूस कायमचं सोडून गेल्यावर जसं दुःख होईल तसं दुःख आजोबांना होतं. त्यांना रडू येतं.
माणसं माणसावर प्रेम करत नाहीत; पण प्राणी मात्र माणसांवर प्रेम करतात... आजच्या माणुसकीची परिभाषा हीच आहे जणू. याच माणुसकीच्या परिभाषेतून काही नातं निर्माण व्हावं यासाठी किती जणांना असं आजोबा होता येईल?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com