...तो लाल कंदील (संदीप काळे)

sandip kale
sandip kale

आमची बराच वेळ चर्चा झाल्यानंतर, मी काहीतरी करतो, असा आशावाद देऊन तिथून निघालो. सुमन, विमल आणि कमल या तिघीही मोठ्या आशेनं माझ्याकडं पाहत होत्या. मला माहीत होतं, ज्या समाजानं पुरेपूर उपभोग घेऊन, 'वेश्‍या' नावाचा गोंडस शिक्का मारून त्यांना सोडलं, त्यांना आपलं म्हणायला त्यांचा गोपाल नावाचा मुलगाही येणार नव्हता. कसा येईल तो? तोही त्या दांभिक वृत्तीचा बळी ठरला असेल....
 

तब्बल दीड महिन्यानंतर मी पुण्यामध्ये आलो होतो. प्रचंड वाहतूक कोंडीतून लांब पल्ला पार करत मी आमच्या बुधवार पेठेमधल्या ऑफिससमोर गाडी लावत होतो. समोर पाहिलं तर एका वयस्कर महिलेसोबत ऑफिसच्या गेटवरचा वॉचमन वाद घालत होता. ती महिला आपणास आतमध्ये जायचंय म्हणत होती आणि वॉचमन म्हणत होता, ‘‘तुम्हाला आतमध्ये कोणाला भेटायला जायचं आहे, ते पहिल्यांदा सांगा; मग मी आतमध्ये सोडतो.’’
मी गाडी लावली आणि त्या महिलेच्या जवळ जाऊन तिला विचारलं, ‘‘कुणाला भेटायचं आहे तुम्हाला?’’
मराठी-हिंदीमिश्रित बोलणारी ती महिला म्हणाली, ‘‘मला बातमी द्यायची आहे. माझ्या मैत्रिणीनं मला सांगितलं, तू पेपरला बातमी दे. म्हणजे तुला तुझ्या मुलाला भेटता येईल, त्याचा शोध लागेल.’’
तिच्या बोलण्यावरून ती महिला निरक्षर असल्याचं जाणवत होतं. गेटच्या बाजूला असलेल्या एका छोट्याशा खोलीमध्ये, मी त्या महिलेला बसवलं. तिला पिण्यासाठी पाणी दिलं आणि तुम्हाला काय बातमी द्यायची आहे, असं मी त्यांना विचारलं. ती महिला काळजीत होती. काय बोलावं, कसं बोलावं, अशा गोंधळलेल्या अवस्थेमध्ये ती होती. चेहऱ्यावरचा घाम पुसत ती मला म्हणाली, ‘‘साहेब, अहो माझा मुलगा गेल्या दोन वर्षांपासून मला भेटत नाही. तीन दिवसांपूर्वी मुलाच्या मित्राशी मी बोलले. तो म्हणाला, मुलाचं प्रशिक्षण होऊन तो पुण्यात आलाय. तो कुठल्या तरी मोठ्या शासकीय कार्यालयामध्ये आता काम करतोय. मला त्याला भेटायचं आहे. त्याची बायको मला भेटू देत नाही. मी आणि माझ्या एका मैत्रिणीनं दोन-तीन दिवसांपासून सगळ्या पाहुण्यांचे, मुलाच्या मित्रांचे पत्ते घेऊन त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; पण त्याचा कुठंही शोध लागला नाही. शेवटी तीच मैत्रीण मला म्हणाली, तू वर्तमानपत्राच्या कार्यालयात जा आणि तिथं त्यांना सांग. बातमी दिल्यावर तुला तुझा मुलगा नक्की भेटेल," असं बोलून ती शांत झाली.

मी म्हणालो, "तुम्ही कुठं असता?" ती महिला म्हणाली, "इथं बुधवार पेठेमध्येच असते." मी पुन्हा म्हणालो, "बरं.. काय करता, घरी कोण असतं?" माझ्या या प्रश्नानंतर, पदर तोंडावरून फिरवत, नजर थोडीशी खाली घेत ती म्हणाली, "मी त्या गल्लीमध्ये राहते. (ती ज्या गल्लीचा उल्लेख करत होती, ती गल्ली देहविक्रय करणाऱ्या बायकांची गल्ली होती, त्यामुळं ती गल्लीचा थेट उल्लेख टाळत होती.) मी आणि माझ्या दोन मुली तिथं असतात." ती महिला काय करते, हे माझ्या सगळं लक्षात आलं. मी तिला विचारलं, "तुमचा मुलगा कोणत्या कार्यालयामध्ये आहे?" ती म्हणाली, "माहीत नाही. दोन वर्षांपूर्वी तो मला एकदा भेटायला आला होता. त्याच्यानंतर जो गेला, तो तिकडंच गेला." मी म्हणालो, "मुलासोबत काही भांडण झालं होतं का?"
ती म्हणाली, "नाही. तो जाताना मला एवढंच म्हणाला होता, की माझ्या बायकोला तुझ्याशी नातं ठेवलेलं अजिबात आवडत नाही. म्हणून तुझ्याशी कितपत बोलता येईल, भेटता येईल, हे सांगता येत नाही, असं मोकळेपणानं त्यानं मला सांगितलं होतं."
ती बोलतच होती... ‘‘मला वाटलं, किती झालं तरी तो माझ्या काळजाचा तुकडा आहे. नऊ महिने मी पोटात त्याला वाढवलं. मला त्याच्याकडून काहीही नको. एकदा येऊन भेटला, त्याला डोळे भरून पाहिलं तरी बस. अजून काय पाहिजे मला! दोन-दोन वर्षं तो मला भेटायला येत नसेल, तर काय म्हणावं!’’ असं म्हणत हातातील पदर तोंडाला लावत, ती महिला बिचारी आपल्या मुलाच्या आठवणीमध्ये धाय मोकलून रडत होती. मला काही सुचत नव्हतं. मी आपला भाबडेपणानं तिला म्हणत होतो, "येईल ना ताई, कुठं जाणार आहे तो. आज ना उद्या भेटेल तुम्हाला. एवढं काय!"

ती म्हणाली, "तसं नाही. माझ्या लहान मुलीला कॅन्सर आहे. ती कुठल्याही क्षणी जाऊ शकते. ती गेल्या दोन महिन्यांपासून म्हणते, मला दादाला भेटायचं, त्याला पाहायचं आहे. बिचारी कधी मरेल सांगता येत नाही हो... म्हणून माझी सगळी धडपड चाललीय." तिचं बोलणं झाल्यावर मी अगदी निःशब्द, शांत बसलो होतो. बाहेर असणाऱ्या वॉचमन काकांना आवाज देत, मी चहा मागवला. आमचं बोलणं सुरू असताना, त्या महिलेनं चहा घेतला. घडलेली सगळी 'आप बीती' ती महिला मला सांगत होती. कोणत्याही मातेच्या नशिबाला येऊ नये असे वाईट भोग या मातेच्या नशिबी आले होते. रेड लाइट एरियामध्ये देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या अनेक आईंना, असे वाईट अनुभव सातत्यानं येत असतीलच; पण या महिलेचा विषय काही वेगळा होता.
त्या बाईची एकूण परिस्थिती, कुठून आलेली आहे, तिनं आपल्या मुलाला कसं शिकवलं, हे सगळं ती मला सांगत होती. एका आईनं... ती कुठल्याही भागात राहत असो, कुठलंही काम करत असो, आपल्यावर असलेली जबाबदारी अतिशय चोखपणे पार पाडली होती.

मी ज्या महिलेशी बोलत होतो, तिचं नाव सुमन, तिला दोन मुली आहेत. एकीचं नाव विमल आणि दुसरीचं नाव कमल. या तिघी जणीही बुधवार पेठेतल्या त्या ‘बदनाम’ गल्लीमध्ये देहविक्री करत होत्या. त्या महिलेनं आपणास तीन अपत्यं, त्यांपैकी आपल्या मुलाला कोणाच्या तरी सांगण्यावरून शिकवायचं आणि त्याला मोठं करायचं ध्येय उराशी बाळगलं होतं. तिनं त्या मुलाला शिकवलं, मोठं केलं. साताऱ्यातील होस्टेलमध्येही तो काही दिवस शिकला. स्वतः शरीरावर अनेक घाव सोसत, सुमननं आपल्या मुलाला कशाचीही कमी पडू दिली नाही. तोही आपल्या आईवर आणि दोन्ही बहिणींवर जीवापाड प्रेम करायचा. बुधवार पेठेमध्ये आपल्या घरी चालणारा सगळा शारीरिक व्यापार त्या मुलानंही स्वीकारला होता. त्याची आई, म्हणजे सुमन मला हे सगळं सांगत होती. सांगता सांगता ती मध्येच म्हणाली, ‘‘साहेब, अशी काही बातमी देता येईल का? मला माझ्या मुलाची आणि त्याच्या बहिणींची भेट करून द्यायची आहे हो." व्याकूळ झालेल्या चेहऱ्यावरले केविलवाणे भाव पाहत, मी त्या महिलेची समजूत काढत होतो. "तुमची काही हरकत नसेल, तर मी तुमच्या घरी, तुमच्या दोन्ही मुलींना भेटायला आलो तर चालेल का?" असं मी अगदी हिंमत करत त्या महिलेला विचारलं.
ती महिला अगदी सहजपणे मला म्हणाली, ‘‘हो, चला ना, त्यात काय? काही अडचण नाही.’’

आमच्या कार्यालयाच्या गेटपासून चालत, चालत मी त्या महिलेच्या घरी गेलो. रस्त्यावरून जाताना, वाटेत बसलेल्या त्या भागातल्या देहविक्री करणाऱ्या महिला मला हटकत होत्या, खाणाखुणा करत होत्या. चालताना मला आडवं येणाऱ्या अनेक महिलांना सुमन समजावून सांगत, आमचा रस्ता मोकळा करत होत्या. आम्ही सुमन यांच्या घरी पोहोचलो. दरवाजा उघडला. सुमनची एक मुलगी शांतपणे झोपून होती आणि दुसरी मुलगी मेकअप करण्यात गुंतली होती. त्या दोन्ही मुलींना सुमननं माझी ओळख करून दिली. मी तिथं बसल्यावर त्यांनी मला अगदी पाहुण्यासारखं चहापाणी विचारलं. तिथलं वातावरण किळसवाणं असेल, तिथं जाणं म्हणजे खूपच पाप समजलं जाईल, असा कुठलाही विचार माझ्या मनामध्ये येत नव्हता. खिडकीतून मी एक नजर टाकली. त्या रस्त्यावर आपण कधीही विचार केला नसेल, असं दृश्‍य मला दिसत होतं. महिलांसारख्या ‘आदिशक्ती’ला या बाजारानं खरंच बदनाम केलं होतं, असं मला वाटत होतं. त्या महिला तिथं जे करतात ते काय त्यांच्या इच्छेनं? छे... हा तर वेगळा विषय होईल.

मध्य प्रदेशातील छत्तरपूर या शहरातून आलेल्या सुमनला आज पुण्यामध्ये स्थायिक होऊन ३५ वर्षं झाली होती. या ३५ वर्षांमध्ये आलेले अनेक वाईट अनुभव तिनं मला सांगितले होते; पण आता तिच्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न होता, तो म्हणजे आपल्या मुलाला भेटायचं कसं हा. वर्तमानपत्रात बातमी दिली तर काय होऊ शकतं, याबाबत मी सुमनताईंची समजूत काढत होतो. 'त्याला मागं-पुढं जर भेटायचं असेल, तर तुम्हाला तो पेपरमध्ये बातमी आल्यानंतर भेटेल की नाही, याची शाश्वती अजिबात उरणार नाही. त्याला ते नक्की आवडणार नाही,' असंही मी सुमन यांना सांगत होतो.
सुमनच्या दोन्ही मुली मला सांगत होत्या, "लग्नाच्या आधी दादा तसा नव्हता, तो सुटीमध्ये येत असे. सुख-दुःखांत तर नेहमी सोबत असायचा. त्याचं लग्न झालं आणि तेव्हापासून त्यानं आमच्याकडं येणं थोडं कमी केलं."

मी मध्येच म्हणालो, ‘‘तुमच्या भावाचं नाव काय?’’ विमल म्हणाली, ‘‘गोपाल. भाऊ कृष्ण जन्माष्टमीला जन्मला, म्हणून त्याचं नाव आम्ही गोपाल ठेवलं. त्याच्यासोबत शिकणाऱ्या मुलीसोबत त्यानं लग्न केलंय, त्यानंच आम्हाला लग्न झाल्यावर सांगितलं. आम्हाला त्यानं लग्नाला बोलावलं नाही, याचं काही वाईट वाटलं नाही.’’ मी त्यांचं बोलणं सुरू असताना मध्येच म्हणालो, ‘‘गोपालची बायको काय करते?’’
‘‘ती शिक्षिका आहे,’’ असं त्यांनी सांगितलं.
"तुमचं गोपालशी शेवटचं बोलणं कधी झालं होतं?" यावर गोपालची बहीण विमल म्हणाली, "वर्षभरापूर्वी दादानं मला फोन करून सांगितलं होतं. मला संपर्क करायचा प्रयत्न करू नका. माझ्या बायकोनं मला कडकपणे सांगितलं आहे, तू जर तुझ्या बहिणींशी, आईशी नातं ठेवलं, तर तुझा आणि माझा संबंध असणार नाही. मी त्या वेळी भावाची समजूत काढली होती. तुझी बायको म्हणते तसं तू कर; पण आम्हाला कधीमधी येऊन तर भेट. तुला शक्‍य नसेल तर तू सांग. आम्ही तिथं थोडा वेळ तुला भेटायला येतो. त्यावर भाऊ म्हणाला, मला कितपत जमेल, हे मला माहिती नाही. मी अधिकारी झालो तेव्हापासून मलासुद्धा अनेक वेळा तुमची ओळख सांगायला लाज वाटते." आपल्या भावासोबत झालेला मोकळा संवाद विमल अगदी बारकाईनं मला सांगत होती. कमल मध्येच म्हणाली, "साहेब, तुमच्यामार्फत आमची भेट होणार नाही का? माझा भाऊ एकदा भेटला, तर मी सुखानं मरेन. मी अजून एखादं वर्ष जगेन, असं डॉक्‍टरांनी मला सांगितलंय."

ती भाबडी बहीण मनातून माझ्याजवळ आपल्या भावाप्रती असलेली भावना व्यक्त करत होती. मी मनातल्या मनात विचार करत होतो, कसा हा भाऊ? वयाच्या बावीस-तेवीस वर्षांपर्यंत त्यानं आपल्या आईला आणि बहिणींना स्वीकारलं. आता जेव्हा त्या तिघींनाही त्याची गरज आहे, अशा वेळी तो आपलं तोंड दाखवायला तयार नाही. बहिणी आणि आई देहविक्री करतात म्हणून त्यांना स्वीकारण्याची त्याला लाज वाटते. कसं हे नातं?
वीस बाय वीसच्या त्या खोलीमध्ये नेहमी इज्जतीची लक्तरं वेशीवर टांगण्याचं काम होत होतं, हे अगदी खरं होतं; पण तिथं असणारी बहीण, तिथं असणारी आई, त्यांचं प्रेम मात्र अगदी तुमच्या-आमच्या आई-बहिणीसारखंच होतं.
आपल्याला भाऊ आणि मुलगा भेटेल, ही आशा अजून त्या आई आणि बहिणींनी सोडली नव्हती. कोरोनामुळं मी नाकाला मास्क लावला होता. कोरोना नसता, तरी तिथं आपण नाकावर काही तरी लावल्याशिवाय बसू शकलो नसतो. त्या घरात देवघर होतं. त्या घरात स्वयंपाक शिजवला जात होता. अगदी तुमच्या-आमच्या घरात जे होतं, तेच त्या घरात होत होतं. छोट्या छोट्या गल्ल्या आणि पावलोपावली असणाऱ्या शेकड्यानी महिला, नजर जाईल तिथपर्यंत बघायला मिळत होत्या. काहींच्या अंगाखांद्यांवर अनेक गोपाल खेळत होते. त्या गोपालांना घेऊन फिरणाऱ्या आईंना हे माहीत नव्हतं, की हा गोपाल जेव्हा चालायला लागेल, फिरायला लागेल, तेव्हा तो आपल्या हाती लागणार नाही आणि आपल्यालाही एक दिवस सुमनच व्हावं लागेल.

आपल्या मुलाच्या अनेक वस्तू, फोटो सुमन मला दाखवत होत्या. सुमन म्हणाल्या, "एकदा आमची सगळी वस्ती या ठिकाणावरून हटवावी, या मागणीसाठी मोठं आंदोलन झालं. आमच्या घरावरही दगडफेक झाली. आमच्या वस्तीचा वीजपुरवठा बंद करण्यात आला. महिनाभर माझ्या मुलानं या कंदिलाखाली अभ्यास केला होता," असं म्हणत समोर पडलेला कंदील आपल्या मुलाची आठवण आहे, असं सुमन मला सांगत होत्या. तो अतिशय स्वच्छ असलेला लाल कंदील, मी हातात घेतला. त्या 'रेड लाइट' एरियात, तो 'लाल कंदील' मला सामाजपरिवर्तनाची दिशा दाखवणारा मोठा 'सूर्य' वाटत होता. सुमन त्या 'सूर्या'भोवती आपला हात फिरवत होत्या, अगदी आपल्या मुलाला त्यात अनुभवत होत्या.

त्या भागात राहणाऱ्या सर्वच महिलांना इतर पुरुषांवर प्रेम करायचा, अधिकारानं कुणाबरोबर संसार थाटायचा अधिकारच नाही. तसं समाजाची चौकट ठरवणाऱ्यांनी ठरवून टाकलं आहे; पण आपल्या पोटच्या मुलावरचा तो अधिकार तर कायम असला पाहिजे, एवढं स्वप्न एखाद्या सुमननं उराशी बाळगलं, तर तिनं काय चूक केली?
आमची बराच वेळ चर्चा झाल्यानंतर, मी काहीतरी करतो, असा आशावाद देऊन तिथून निघालो. सुमन, विमल आणि कमल या तिघीही मोठ्या आशेनं माझ्याकडं पाहत होत्या. मला माहीत होतं, ज्या समाजानं पुरेपूर उपभोग घेऊन, 'वेश्‍या' नावाचा गोंडस शिक्का मारून त्यांना सोडलं, त्यांना आपलं म्हणायला त्यांचा गोपाल नावाचा मुलगाही येणार नव्हता. कसा येईल तो? तोही त्या दांभिक वृत्तीचा बळी ठरला असेल!

बोलता-बोलता सुमन मला सांगत होत्या. "चार पुस्तकं काय शिकला आणि आपल्या आई-बहिणीला विसरला. माझं लग्न झालं नाही म्हणून काय झालं, मला माहीत नाही का? लग्न झाल्यावर कसं वागतात ते. आपल्याच लोकांना विसरायचं?" मी शांतच होतो. यात दोष कुणाचा आणि कोण बरोबर, हा विचार करीत सुन्न डोक्‍यानं मी माझ्या वाटेला लागलो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com